डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘सँडिनिस्टा काही सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्यात मग्रुरी आणि उद्धटपणा भरपूर होता. त्यांच्या राजकीय विचारात पुष्कळ विसंगती होत्या. पण ते विवेकी आणि सुसंस्कृत होते. एका स्थिर, सभ्य आणि विचारवैविध्य मानणाऱ्या समाजाच्या निर्मितीचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला होता. त्यांच्या राजवटीत फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. एक लाख शेतकऱ्यांना त्यांनी मरणाच्या दाढेतून ओढून बाहेर काढलं होतं. अभिनव साक्षरता प्रसार मोहीम राबवून निरक्षरतेचे प्रमाण त्यांनी 15 टक्क्यांपर्यंत खाली आणलं होतं. मोफत शिक्षण जारी केलं; मोफत आरोग्यसेवा सुरू केली. बालमृत्यूंचं प्रमाण तीस-पस्तीस टक्क्यांनी खाली आणलं. पोलिओचं तर समूळ उच्चाटन झालं.’

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील एक छोटेखानी देश. लोकसंख्या 56 लाख म्हणजे मुंबईच्या निम्मी. क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या अंदाजे चाळीस टक्के. तिथली जवळजवळ निम्मी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगते. निकाराग्वात 2006 साली निवडणुका झाल्या. या निवडणुकांमुळे आपल्या खंडात अस्थैर्य माजेल असं अमेरिकेला वाटत होतं. त्याचं नेमकं कारण काय आहे ? अमेरिकेचा विरोध असूनही 2006 साली तिथे झालेल्या निवडणुकीत सँडिनिस्टांचे नेते डॅनियल ओर्तेगा अध्यक्षपदी निवडून आले. या सँडिनिस्टांचा इतिहास पाहणं उद्बोधक आहे. पण त्यापूर्वी निकाराग्वामधल्या घटनांची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे.

स्पॅनिश लोकांनी 1522 साली आताच्या निकाराग्वावर आक्रमण केलं. आक्रमणाच्या वेळी तिथल्या एका प्रमुख रेड इंडियन टोळी प्रमुखाच्या नावावर निकाराग्वा चे नाव पडलं आहे. 1838 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तिथल्या राजकारणात दोन गट होते. एक उदारमतवादी तर दुसरा परंपरावादी. त्यातल्या परंपरावादी गटाला अमेरिकेचा पाठिंबा होता. या गटाला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेने 1912 ते 1925 या काळात आपले सैनिक पाठवले होते. 1924 मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर काही राजकीय अस्थैर्य तिथे निर्माण झालं. निकाराग्वात 1926 साली एक मोठा उठाव झाला होता. पुन्हा एकदा अमेरिकेचं सैन्य निकाराग्वामध्ये आलं. अमेरिकन सैनिक तिथल्या प्रतिगामी हुकूमशाही राजवटीला मदत करायला निकाराग्वा आले होते. 1927 ते 1933 या काळात सेझार ऑगस्टो सँडिनो (1895 - 1934) या नावाचा जनरल तिथे अमेरिकेच्या सैन्याबरोबर गनिमी पद्धतीचा लढा देत होता. सँडिनोच्या नेतृत्वाखाली डाव्या गनिमी सैनिकांनी तिथल्या हुकूमशाहीला आव्हान दिलं. गनिमी सैनिकांनी अनेक अमेरिकन सैनिकांना कंठस्नान घातलं. 1933 साली अमेरिकेने आपलं सैन्य तिथून हटवलं होतं. हे युद्ध 1934 सालपर्यंत चाललं.

नंतर ‘नॅशनल गार्ड’ या संघटनेचे नेते जनरल अॅनास्तेसिओ सोमोझा यांनी बोलणी करण्यासाठी सँडिनोला बोलावलं. सँडिनो बोलणी करायला आला असता त्याला कपटाने ठार मारण्यात आलं. ही हत्या 1934 साली झाली. सोमोझाच्या नॅशनल गार्ड या नावाच्या पोलीस दलाने ही हत्या केली. हे पोलीस दल अमेरिकेने स्थापन केलं होतं. जनरल सोमोझाची सत्ता मजबूत व्हावी यासाठी हे दल स्थापन करण्यात आलं होतं. ऑगस्टो सँडिनोचं नाव घेऊन पुढे क्रांतिकारक स्वत:ला सँडिनिस्टा म्हणवून घेऊ लागले. 1937 साली अॅनास्तेसिओ सोमोझाने निकाराग्वाची सत्ता आपल्या हातात एकवटली आणि तो तिथला सर्वेसर्वा झाला. सोमोझाच्या दोन पिढ्या पुढे निकाराग्वा वर 1937 ते 1979 अशी बेचाळीस वर्ष सत्ता गाजवत होत्या. ही वर्षं राजकीय दडपशाही आणि संपत्तीची गडपशाही या दोन्ही अर्थानी गाजली. या काळात, विशेषतः सुरुवातीच्या काळात अमेरिकेबरोबर निकाराग्वा संबंध मैत्रीचे होते. 

1956 मध्ये अॅनास्तेसिओ सोमोझाची हत्या झाली. त्यानंतर त्याचा मुलगा लुईस सत्तेवर आला. 1967 साली त्याचा मृत्यू होईपर्यंत तो सत्तेवर होता. त्याच्यानंतर त्याचा भाऊ मेजर जनरल अनास्तासिओ सोमोझा डेबायल हा सत्तेवर आला. सोमोझा घराण्याने निकाराग्वावर निर्घृणपणे सत्ता चालवली. या काळात सोमोझाच्या अनेक विरोधकांना परागंदा व्हावं लागलं आणि या घराण्याच्या नावावर अमाप संपत्ती जमा झाली. निकाराग्वा अमेरिका आर्थिक मदत करत होती; आणि अमेरिकेची निकाराग्वातली गुंतवणूक वाढत होती. मात्र सोमोझा कुटुंबीयांची जनतेतली प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत होती. पुढे ती इतकी बिघडली की अमेरिकेलासुद्धा सोमोझाबद्दल विश्वास वाटेनासा झाला. 1972 साली तिथे मोठा भूकंप झाला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून मदत आली. पण ती सारी जनतेपर्यंत पोचण्याऐवजी सोमोझा कुटुंबीयांच्या खिशात गेली. 
1977 साली जिमी कार्टर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी सोमोझाना आपली प्रतिमा सुधारायला सांगितलं. पण सोमोझा कुटुंबीय ‘नॅशनल गार्ड’ या संघटनेच्या साहाय्याने हिंसा घडवून आणत होते आणि मानवाधिकारांची सर्रास पायमल्ली सुरू होती.

जनरल सँडिनो हे तिथल्या गनिमी हल्लेखोरांचं स्फूर्तिस्थान होतं. त्यापासून सँडिनिस्टा हे नाव आलं. 1961 साली सँडिनिस्टांच्या राष्ट्रीय मुक्ती-आघाडीची स्थापना झाली. 1970 च्या दरम्यान सँडिनिस्टांची ही आघाडी जनतेत लोकप्रिय होऊ लागली होती. सँडिनिस्टांना सोव्हिएत किंवा चिनी पद्धतीच्या एकपक्षीय राजवटीऐवजी निवडणुकांच्या मार्गाने सत्ता हवी होती आणि जनतेचा सक्रिय सहभाग असलेली लोकशाही हवी होती. त्याचबरोबर त्यांना संपत्तीचं समान वाटपही हवं होतं.

स्थूलमानाने सँडिनिस्टांवर तीन प्रभाव होते. एकीकडे त्यांच्यावर मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव होता. दुसरीकडे ऑगस्टो सँडिनोच्या विचारांपासून त्यांनी स्फूर्ती घेतली होती. तिसरा महत्त्वाचा प्रभाव होता, ख्रिश्चन धर्मातल्या लिबरेशन थिऑलॉजी या पंथाचा. या पंथाच्या लोकांनी शीतयुद्धाच्या काळात लॅटिन अमेरिकेत लोकजागृतीचं महत्त्वाचं काम केलं होतं. रोमन कॅथलिक पंथाची अमेरिकेच्या सत्ताधिशांबरोबर असलेली जवळीक या पंथाच्या लोकांना मान्य नव्हती. ख्रिस्ताला ही मंडळी क्रांतिकारक लोकनेता मानत होती. आणि धर्माने सदैव जनतेच्या बरोबर त्यांच्या लढ्यात असलं पाहिजे असं हे लोक मानत होते. लॅटिन अमेरिकेतल्या नंतरच्या पिढीतले काही नेते लिबरेशन थिऑलॉजी आणि डावे विचार अशा दुहेरी प्रभावाखाली असलेले दिसून येतात.

22 ऑगस्ट 1978 या दिवशी सँडिनिस्टांच्या चोवीस गनिमांनी राजधानी मॅनाग्वाच्या प्रासादावर हल्ला चढवला आणि पुढे जुलै 1979 पर्यंत सत्ता ताब्यात घेण्याचं काम पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पाच महत्त्वाच्या नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्या हातात सत्ता दिली.

सत्तांतराच्या वेळी निकाराग्वाची अर्थव्यवस्था दैन्यावस्थेत होती. डोक्यावर 1600 कोटी डॉलरचं कर्ज होतं. सोमोझाविरोधी संघर्षात 50000 नागरिक मारले गेले होते. एक लाख वीस हजार नागरिकांनी शेजारच्या देशात पलायन केलं होतं आणि सहा लाख लोक बेघर होते. सोमोझा राजवटीतल्या ‘नॅशनल गार्ड’ या कुप्रसिद्ध संघटनेच्या अनेकांनी शेजारच्या होंडुराजमध्ये पलायन केलं होतं. त्यांनी तिथून सँडिनिस्टांच्याविरुद्ध तयारी सुरू केली. या ‘तयारी’ ला अर्थातच अमेरिकेचा पाठिंबा होता. इकडे निकाराग्वात अन्न आणि इंधनाचे साठे नष्ट झाले होते आणि रोगराई पसरली होती. निकाराग्वातल्या कुपोषित बालकांची संख्या 75 टक्के होती. आंतरराष्ट्रीय साहाय्य संघटना त्यावर मात करण्यासाठी झगडत होत्या. सोमोझा राजवटीबद्दल जवळजवळ सर्व जनतेत तिरस्काराची भावना होती. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या सर्वच अर्थाने विषमतेच्या गर्तेत गेलेल्या जनतेला नव्या नेत्यांबद्दल आशा वाटत होती.

पुढे 2006 साली निवडून आलेले डॅनियल ओर्तेगा हे त्यावेळी या पाचातले महत्त्वाचे नेते होते. सत्ता ताब्यात घेतल्यावर सँडिनिस्टांनी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या, त्यात शिक्षण आणि आरोग्य यांवर भर होता आणि या कामात त्यांना क्यूबाची साथ होती. सहा महिन्यांच्या अवधीतच त्यांनी निरक्षरतेचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात खाली आणलं. सुमारे ऐंशी हजार कार्यकर्ते या शिक्षण अभियानात सामील होते. या त्यांच्या कार्याची युनोस्कोने दखल घेऊन निकाराग्वाला 1980 सालचा साक्षरतासंबंधी विशेष पुरस्कार दिला. याचप्रमाणे आरोग्यविषयक अभियान निर्माण करून त्यांनी पोलिओ, गोवर, क्षयरोग यांच्या संख्येत लक्षणीय घट केली. त्यांचा एकात्म आरोग्याचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. सँडिनिस्टांच्या काळात बालमृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली. ‘विकसनशील देशांचा विचार करता ही सुधारणा नाट्यमय वाटेल इतकी (मोठी) आहे’ या शब्दांत युनिसेफने या कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे. ‘ऑक्सफॅम’ ही स्वयंसेवी संघटना ज्या चार देशात त्या काळात काम करीत होती (एल साल्वादोर, ग्वाटेमाला, होंडुराज आणि निकाराग्वा) त्यांच्यापैकी फक्त निकाराग्वामध्ये भरघोस काम सुरू होत

जागतिक बँकेनेही काही क्षेत्रात निकाराग्वातलं काम असाधारण यशस्वी असल्याची वाखाणणी केली होती. ‘इंटर अमेरिकन बँके’ नेही अशाच शब्दांत निकाराग्वाचं कौतुक केलं होतं. बाजूच्या कोस्टा रिकामधले लोकशाहीचे प्रपितामह समजले जाणारे जोस फिगरेस यांनी म्हटलं; ‘निकाराग्वामध्ये पहिल्यांदाच जनतेची काळजी घेणारं शासन प्रत्यक्षात आलं आहे.’

सँडिनिस्टांचे कार्यक्रम लक्षात घेतले म्हणजे त्याच्या विचारांची दिशा स्पष्ट होते. हे कार्यक्रम असे होते...
0 सोमोझा आणि त्याच्या आप्तस्वकीयांनी बळकावलेल्या जमिनीचं राष्ट्रीयीकरण.

0 ग्रामीण आणि नागरी कामगारांच्या काम करण्याच्या जागी सुधारणा.

0 जमीनसुधारणा कायदे.

0 अन्न, वस्त्र, निवारा यांच्या उपलब्धीत सुधारणा,

0 शिक्षणाची कवाडं साऱ्या जनतेसाठी खुली करणं, व्यापक साक्षरता अभियान, माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध.

0 नैसर्गिक संपत्ती आणि खाणी यांचं राष्ट्रीयीकरण आणि संरक्षण.

0 राजकीय छळ आणि हत्याकांड आणि मृत्युदंडाची शिक्षा नष्ट करणं.

0 स्त्रियांना समान अधिकार.

0 राजकीय संघटना, कामगार संघटना करायला पूर्ण मोकळीक, लोकशाही हक्कांची पुनर्स्थापना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य.

0 अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण.

0 कीटकनाशकांच्या वापरावर बंधनं, पर्यायी उर्जासाधनांवर भर, नैसर्गिक संपत्तीचं आणि वन्यजीवांचं रक्षण या काळात उद्योगधंदे आणि वित्तीय संस्था यांच्यापैकी जवळजवळ पन्नास टक्क्यांचं राष्ट्रीयीकरण झालं. यात सोमोझा घराण्याने बळकावलेल्या संसाधनांचा समावेश होता. सँडिनिस्टांच्या कार्यक्रमाचे परिणाम पहिल्याच चार वर्षांत दिसून आले.

निकाराग्वाच्या दरडोई उत्पन्नात 1979-83 या काळात 7 टक्क्यांनी वाढ झाली; तर त्याच्या शेजारच्या देशात या काळात दरडोई उत्पन्न चौदा टक्क्यांनी घटलं.

या साऱ्या कार्यक्रमांमुळे रशिया आणि क्यूबा या देशांनी सँडिनिस्टांना पाठिंबा दिला. सुरुवातीच्या काळात तर अमेरिकेनेही सँडिनिस्टांच्या राजवटीला मान्यता दिली; पण नंतरच्या काळात अमेरिका आणि निकाराग्वा यांच्यातले संबंध तणावाचे होऊ लागले.

नव्या सरकारने एक प्रातिनिधिक सल्लागार मंडळ स्थापन केलं. यात सँडिनिस्टांखेरीज समाजातल्या इतर अनेक घटकांना प्रतिनिधित्व होतं. यात धर्मगुरु होते तसंच व्यापार उदीमातली मंडळीही होती. पण यांवर असणाऱ्या सँडिनिस्टांच्या वर्चस्वामुळे अंतर्गत कुरबुरी वाढल्या. 1980 मध्ये व्हायोलेटा शामेरो या महिलेने या आघाडीतून राजीनामा दिला. पुढे याच महिलेने सँडिनिस्टांविरुद्ध आघाडी उघडली. या आघाडीला अमेरिकेचा पाठिंबा होता. 1981 साली अमेरिकेच्या सी.आय.ए.ने ‘एफ.डी.एन.' या नावाची एक सेना निकाराग्वात तयार केली. याशिवाय आणखी काही सेनांना अमेरिकेचा पाठिंबा होता. या सेनांचं आपापसात जमत नसलं तरी सँडिनिस्टांच्या विरुद्ध ते एकत्र येत होते. सोमोझा राजवटीतल्या कुप्रसिद्ध ‘नॅशनल गार्ड’ या संघटनेचे काही लोकही या संघटनांत कार्यरत होते. या विविध संघटनांची आघाडी ‘काँट्रा’ या नावाने ओळखली जात असे. 

अमेरिकेकडून या काँट्रा बंडखोरांना शस्त्रं आणि लढाईचं प्रशिक्षण दिलं जात असे. बहुपक्षीय लोकशाही राजकारणाचं आश्वासन जरी सँडिनिस्टांनी दिलं असलं तरी त्या गोष्टी ते प्रत्यक्षात आणू शकले नाहीत किंवा असं करण्यात अनेक अडथळे येत होते. याचा अर्थातच अमेरिकेला फायदा झाला. सँडिनिस्टांच्या काळात जमीनदार जंगलात पळून गेले आणि तिथूनच त्यांनी सूत्रं हलवायला सुरुवात केली. अमेरिका, जमीनदार आणि काँट्रा हे सारे एकत्र येऊन सँडिनिस्टांविरुद्ध आघाडी उघडत होते. 1980 ते 84 या काळात अमेरिकेने निकाराग्वाचं आर्थिक साहाय्य बंद केलं. काँट्राजसाठी शेजारच्या होंडुराजमध्ये तळ स्थापन करून त्यांना शस्त्रसज्ज केलं जाऊ लागलं. निकाराग्वाचे पूल तेलसाठे यांच्यावर हल्ले सुरूच होते. 1984 साली तर निकाराग्वाच्या बंदरांत सुरुंग पेरण्यापर्यंत मजल गेली.

अमेरिका आणि काँट्राज यांच्या कारवायांमुळे 1982 मध्ये निकाराग्वाला आणीबाणी जाहीर करावी लागली. सँडिनिस्टांना आपल्या प्रस्तावित निवडणुका पुढे ढकलाव्या लागत होत्या. निवडणुकांच्या प्रक्रियेत बंडखोरांचा सहभाग असावा अशी अमेरिकेची मागणी होती. मात्र सोमोझाच्या ‘नॅशनल गार्ड’ संघटनेच्या वतीने या तथाकथित बंडखोरांनी हिंसाचार केल्याने सँडिनिस्टांचा या सहभागाला विरोध होता. थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेला आपली माणसं या निवडणुकीच्या रिंगणात हवी होती, काँट्राजबरोबर कोणतीही बोलणी करायला सँडिनिस्टांनी नकार दिला. या निवडणुकांसाठी निरीक्षक नेमले जावेत अशी मागणी अमेरिकेने केली. दोन प्रकारच्या आघाड्या या निवडणुकांत होत्या. एकीकडे काहीशा डाव्या आणि उदारमतवादी संघटनांची आघाडी होती, तर दुसरीकडे कोऑर्डिनेडोरा या नावाच्या आघाडीला अमेरिकेचा पाठिंबा होता. आर्टुरो क्रुझ या नावाचा एक उमेदवार या आघाडीतर्फे अध्यक्षीय उमेदवार म्हणून उभा राहिला. पण त्याने शेवटी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काँट्राजनी मतदानाला जाऊन लोकांनी आपली मतं मुद्दामहून बाद करावी असं त्यांनी मतदारांना आवाहन केलं. चार नोव्हेंबर 1984 रोजी निवडणुका होऊन तिच्यात डॅनियल ओर्तेगा यांना 67 टक्के मतं मिळाली. बाद मतांची संख्या फक्त सहा टक्के भरली. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी ही निवडणूक व्यवस्थित पार पडल्याचा निर्वाळा दिला, तर अमेरिकेने या निवडणुका गैरपद्धतीने झाल्याचं म्हटलं.

1985 ते 1990 या काळात काँट्रा बंडखोरांनी सीमेवर हल्ले सुरू केले होते; तर कोसळत्या अर्थव्यवस्थेने आणि वाढत्या महागाईने सँडिनिस्टांची राजवट त्रस्त झाली होती. परिणामी सँडिनिस्टांनी अधिकाधिक दडपणुकीची भूमिका घेतली होती. पुढे 1990 मध्ये निवडणुका होऊन त्यात सँडिनिस्टांचा पराभव झाला आणि विरोधी आघाडीच्या व्हायोलेटा शामोरा या महिलेच्या हातात सत्ता आली. हे सत्तांतर झाल्यावर काँट्राजनी आपली गनिमी लढाई थांबवली. काँट्राजच्या कारवाया, त्यासंबंधी अमेरिकेत उठलेलं वादळ हे एका स्वतंत्र लेखाचे विषय आहेत. त्याबद्दल वेगळेपणाने लिहावं लागेल.

हॅरॉल्ड पिंटर या ब्रिटिश नाटककाराने 2005 मध्ये साहित्याचं नोबेल पारितोषिक स्वीकारताना सँडिनिस्टांबद्दल काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेत. पिंटर म्हणतात....

‘सँडिनिस्टा काही सर्वगुणसंपन्न नव्हते. त्यांच्यात मग्नुरी आणि उद्धटपणा भरपूर होता. त्यांच्या राजकीय विचारात पुष्कळ विसंगती होत्या. पण ते विवेकी आणि सुसंस्कृत होते. एका स्थिर, सभ्य आणि विचार वैविध्य मानणाऱ्या समाजाच्या निर्मितीचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला होता. त्यांच्या राजवटीत फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. एक लाख शेतकऱ्यांना त्यांनी मरणाच्या दाढेतून ओढून बाहेर काढलं होतं. एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी कसत असलेल्या जमिनीची मालकी दिली. दोन हजार नव्या शाळा बांधल्या. एक अभिनव साक्षरता प्रसार मोहीम राबवून निरक्षरतेचे प्रमाण त्यांनी 15 टक्क्यांपर्यंत खाली आणलं होतं. मोफत शिक्षण जारी केलं; मोफत आरोग्यसेवा सुरू केली. बालमृत्यूंचं प्रमाण तीस-पस्तीस टक्क्यांनी खाली आणलं. पोलिओचं तर समूळ उच्चाटन झाले.’

पुढे पिंटर म्हणतात; ‘या साऱ्या कर्तृत्वाला अमेरिकेने ‘मार्क्सवादी लेनिनवादी विकृती’ म्हटलं. अमेरिकेच्या दृष्टीने एक नवं धोकादायक उदाहरण समोर येत होतं. (त्यांची भीती अशी होती की) आर्थिक आणि सामाजिक न्यायाचे निकष जर निकाराग्वा स्वतंत्रपणे ठरवू लागला आणि आरोग्य, शिक्षण यांच्यात सुधारणा करून जर सामाजिक एकता आणि राष्ट्रीय सन्मान पुन: प्रस्थापित करू लागला तर आजूबाजूचे देशसुद्धा (हे आपल्याकडे का होत नाही) असे प्रश्न विचारतील आणि त्याच मार्गावर वाटचाल करू पाहतील…

... अध्यक्ष रेगन यांनी निकाराग्वाचं वर्णन ‘एकाधिकारशाहीचा तुरुंग’ या शब्दांत केलं आहे. हे सारं जणू काही योग्य वर्णन आहे असं माध्यमं आणि ब्रिटिश सरकार मानतं. पण सँडिनिस्टांच्या कारकिर्दीत मृत्युपथकं नव्हती. त्यांच्या कारकिर्दीत छळ झाल्याचं कुठेच प्रसिद्ध झालेलं नाही. लष्कराने वा सरकारने कुठेच हिंसात्मक कारवाया वा अतिरेक केल्याचं निष्पन्न झालेलं नाही. धर्मगुरूंचा छळ झाल्याचाही कुठेच उल्लेख नाही. उलट त्यांच्या शासनात तीन धर्मगुरु होते.... एकाधिकारशाहीचा तुरुंग हा खरेतर शेजारच्या एल साल्वाडोरमध्ये वा ग्वाटेमालामध्ये आहे. ग्वाटेमालामध्ये तर 1954 साली अमेरिकेने तिथलं लोकशाही सरकार उलथून पाडलं होतं आणि त्यानंतर एकापाठोपाठ आलेल्या लष्करी शासनांच्या कारवायांना अंदाजे दोन लाख लोक बळी पडले होते.’ 

अनेक कारणांनी सँडिनिस्टांचा हा प्रयोग दीर्घकाळपर्यंत तग धरू शकला नाही. त्याची कारणं आणि अमेरिकेचं या मागचं ‘योगदान’ यावर स्वतंत्र भाष्य करावं लागेल. ते पुन्हा केव्हातरी. पण असं काहीतरी जगात अस्तित्वात येऊ शकतं- आणि तेही स्वतःजवळ फारशी संसाधनं नसताना आणि अमेरिकेचा प्रखर विरोध असताना, हे कळण्यासठी एवढा लेखनप्रपंच !

Tags: अशोक राजवाडे निकाराग्वा आंतरराष्ट्रीय राजकारण हॅरॉल्ड पिंटर सँडिनिस्ट एकाधिकारशाही एल साल्वाडोर ग्वाटेमाला nicaragua weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके