डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कॅस्ट्रो हे कठोर आदर्शवादी आहेत आणि कोणतीच तडजोड न करता त्यांनी आपला आदर्शवाद राबवला आहे. हे करत असताना सतत त्यांची नजर सर्वांत तळाच्या माणसाकडे असते हे आपण इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्या देशातलं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे यावर कॅस्ट्रोचा कटाक्ष असतो. एवढंच नव्हे तर त्याला पुरेशा कॅलरीज मिळाल्या पाहिजेत याबद्दल ते आग्रही आहेत. सव्वा कोटी लोकसंख्येच्या क्यूबात शंभरी पार केलेल्या सुमारे तीन हजार व्यक्ती आहेत हीच गोष्ट पुरेशी बोलकी आहे. साऱ्या जगाचं वैभव एका मक्याच्या दाण्यात सामावू शकतं असं कॅस्ट्रोचं म्हणणं आहे.

लेनिन, गांधी, माओ, हो चि मिन्ह, नेल्सन मंडेला अशा मोठ्या नेत्यांच्या मालिकेत शोभून दिसेल अशा एका नेत्याने राज्यशकट हाकण्याच्या कामातून निवृत्ती जाहीर केली आहे. पण दुसऱ्या एका कामाला रुग्णशय्येवर पडल्यापासून त्याने सुरुवात केलेली आहे. त्यांनी शस्त्रसंन्यास घेतलेला नाही, मात्र बंदुकीऐवजी आता लेखणी हातात घेतली आहे. गेले किमान दोन वर्षे मी स्वतः कॅस्ट्रोंचे लेख वाचतो आहे. पर्यायी माध्यमांत- म्हणजे तूर्त तरी इंटरनेटवर- हे लेख प्रसिद्ध होत असतात आणि त्याच्या मागच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि ज्या संघर्षातून कॅस्ट्रो गेले आहेत ते पाहता त्यांच्या शब्दांना विलक्षण वजन आहे, यात मला कोणतीही शंका नाही.

फिडेल कॅस्ट्रोना आपल्या काळातला एक श्रेष्ठ योद्धा म्हणून पाहणं उचित ठरेल. आणखी एक गोष्ट आहे. क्यूबा हा एका वेढा पडलेला देश आहे आणि हा वेढा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने घातलेला आहे. अमेरिकेचे दहा अध्यक्ष आले आणि गेले, पण हा नेता त्या साऱ्यांना पुरून उरलेला आहे.

लोकशाही आणि हुकूमशाही या दोन संकल्पनात निरनिराळ्या प्रती असतात काय? काळा आणि पांढरा असे दोनच रंग आपल्यासमोर असतील आणि काळा म्हणजे हुकूमशाही आणि पांढरा म्हणजे लोकशाही असं सरधोपट समीकरण मांडलं तर कॅस्ट्रोना काळ्या यादीतच टाकावं लागेल. पण वास्तव याहून अधिक गुंतागुंतीचं आहे. आपण आपल्या देशातल्या आजच्या काळातल्या नेत्यांकडे थोडी नजर टाकू. सांप्रतच्या किती नेत्यांना लोकशाहीबद्दल मूलभूत आस्था आहे? खरं तर यातली बहुतेक मंडळी या आस्थेच्या इतकी पलीकडे गेलेली आहेत, की असल्या गोष्टींबद्दल ही मंडळी काही विचार करीत असतील असं वाटत नाही. (यातल्या अनेक नेत्यांच्या नावावर फौजदारी गुन्हेसुद्धा दाखल आहेत.) नरेंद्र मोदींसारखे नेते तर यापलीकडे जाऊन मुस्लिमविरोधी कुटिल कारवायांचं राजकारण पुढे चालवत आहेत आणि आपले अभिजन या नेत्याकडे भारताचा भावी प्रमुख नेता म्हणून पाहत आहेत.

यातले बहुसंख्य नेते सधन वर्गांच्या हितसंबंधात इतके अडकलेले आहेत की जनतेच्या बऱ्या-वाईटाबद्दल त्यांना काही आस्था आहे असं मानणं हे दिवास्वप्नासारखं आहे. मग केवळ ते मतपेटीच्यामार्फत निवडून येतात म्हणून ते लोकशाही मानतात याला काहीच अर्थ नाही. सेझसारख्या लुटमारीच्या धंद्यात हे नेते कार्यरत आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी केलेल्या कृती आणि केलेल्या धोरणांचा पाठपुरावा पाहिला, तर ते जनताभिमुख आहेत असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही. खाजगीकरणाला त्यांनी दिलेला पाठिंबा हा त्याच्या सधन वर्गांना बिलगलेला असण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. धनाढ्यांच्या आणि स्वत:च्या हितसंबंधांना इजा न पोहोचवता (उलट ते जपत आणि त्यांचं संवर्धन करीत) जेवढं जमेल तेवढं आपले राजकारणी करीत आहेत. नववैश्यांच्या जागतिकीकरणाच्या सिद्धांतांना या मंडळींनी गृहीतच धरलं आहे आणि केवळ याच मार्गाने जणू काही जनतेचा उद्धार होईल, असं जनतेला पटवून देणं हा त्यांच्या सिद्धांतांचा आणि कामाचा एक भाग आहे. मग या नेत्यांना लोकांविषयी आस्था आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे? उलट ते करत असलेल्या अनेक गोष्टी जनताविरोधी आहेत. आणि जनतेविषयी आस्था हा लोकशाही विचारांचा गाभाच नव्हे काय?

याउलट फिडेल कॅस्ट्रोसारखे नेते या हितसंबंधांच्या साखळ्यांना धुडकावून लावत आपल्या समजुतीप्रमाणे आणि आपल्या विचारांनी सतत जनतेच्या बाजूने उभे राहिले यातच त्यांचं मोठेपण आहे. हे करत असताना दरवेळी त्यांनी केलेल्या कृती बरोबरच होत्या असं नाही; कधी त्यांच्या हातून प्रमादही घडले असतील, पण त्यांच्या हेतूंविषयी शंका घेता येणार नाही. 

अमेरिका आणि क्यूबा यांच्यातला संघर्ष हा खरं तर वादळ आणि दिव्याच्या फडफडणाऱ्या ज्योतीच्या प्रतीकासारखा आहे. गेली पन्नास वर्षे अमेरिकेने क्यूबावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. आणि या निर्बंधांना कोणताही नैतिक आधार नाही. जगातल्या जवळजवळ सर्व राष्ट्रांनी या निर्बंधांना जाहीरपणे विरोध केला आहे; त्यांच्याविरुद्ध मोठ्या संख्येने संयुक्त राष्ट्रांत मतदान केलं आहे. (अर्थात असल्या आंतरराष्ट्रीय लोकशाहीला अमेरिकेने कधीच जुमानलेलं नाही.) जर लोकशाही हा आधार म्हणायचा तर अत्यंत विकृत आणि हिंसक हुकूमशहांना अमेरिकेने पाठीशी घातलं आहे. आयंदे, सुहार्तो, सद्दाम हुसेन, बॅटिस्टा, सोमोझा यांसारख्या अनेक हुकूमशहांची अमेरिकेने पाठराखण केली आहे. याह्या खान, अयूब खान, जनरल मुशर्रफ अशा हुकूमशहांना पाठिंबा दिला आहे. अमेरिकेतल्या ज्यू आणि ख्रिश्चन मूलतत्त्ववाद्यांच्या लॉबीच्या दबावाखाली 
इस्रायलमार्फत पॅलेस्टाईनच्या लोकांची सर्व प्रकारची मुस्कटदाबी करण्याची कृती गेली पन्नास वर्षे अमेरिका करीत आली आहे. गाझा पट्टी आज घडत असलेलं उपासमारीचं दबावतंत्र हा याचाच पुढचा भाग आहे.

फिडेल कॅस्ट्रोना मारण्याचे किती प्रयत्न झाले त्याची मोजदादच नाही आणि यातले बहुसंख्य प्रयत्न सी. आय.ए.ने घडवून आणले हेही आता जगजाहीर आहे. डोलन कॅनेल नावाच्या माणसाने ‘कॅस्ट्रोना मारण्याचे 638 प्रयत्न’ या अर्थाचं शीर्षक असलेला एक माहितीपट यावर काढला आहे. 28 नोव्हेंबर 2006 या दिवशी ब्रिटनच्या ‘चॅनेल 4’ या वाहिनीवर हा माहितीपट दाखवला गेला आहे. राजकीय, लष्करी आणि आर्थिक दहशत असूनही क्यूबा ताठ कण्याने उभा राहिला; इतकेच नव्हे तर एवढ्याशा छोट्या देशाचं बलाढ्य अमेरिका काहीच वाकडं करू शकली नाही. या साऱ्याचं एक कारण फिडेल कॅस्ट्रोसारखा एक लढवय्या या देशात पहाडासारखा उभा होता हे आहे. अमेरिकेच्या राजकीय शब्दकोशात लोकशाहीच्या कल्पनेचा खरा अर्थ जनतेच्या सत्तेशी संबंधित नसून तो तिथल्या मूठभरांच्या हितसंबंधांशी (म्हणजे पर्यायाने सत्तेशी) जोडलेला असतो. हे संबंध म्हणजे सामान्य अमेरिकन माणसाचे हितसंबंध अशी सहमती गृहीत धरलेली असते ज्या प्रमाणात अमेरिकेच्या भांडवलाला एखाद्या देशात घुसावला मोकळीक असते, तितक्या प्रमाणात तेथील लोकशाही समर्थनीय आहे असं समजलं जातं. जर या कल्पनेला कोणी विरोध करू लागला तर मात्र अमेरिका आपल्या भात्यातले सर्व बाण वापरून त्या सत्तेचा पाडाव करू पाहते. यात साम, दाम, दंड आणि भेद अशा साऱ्या मार्गांचा बिनदिक्कत अवलंब केला जातो आणि लोकशाहीबद्दल बोलताना हे सारे प्रमाद भोळ्याभाबड्या माणसांनी नजरेआड करावे अशी त्यांची अपेक्षा असते. 

लोकशाही हे अमेरिकेच्या लेखी एक चमकदार वेष्टन आहे आणि त्याच्या आत भांडवलाधिष्ठित कल्पनांचं चॉकलेट गुंडाळलेलं आहे. नेमक्या याच चॉकलेटला कॅस्ट्रोनी विरोध केला आणि त्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेची वाकडी नजर पडली. ते अमेरिकेच्या रोषाला पात्र ठरले. हे वास्तव जर आपण समजून घेतलं नाही तर आपण कॅस्ट्रोंवर सरधोपट टीका करत राहू. त्यांच्या विरोधात असलेले सर्वजण जणू काही निर्मळ मनाने हे काम करीत होते असे गृहीत धरू; आणि कॅस्ट्रो हे जणू काही एकमेव हुकूमशहा आहेत असं भाबडेपणाने मानत राहू. जेव्हा सद्दाम हुसेन अमेरिकेचा मित्र होता तेव्हा त्याने त्याच्याच जनतेवर केलेल्या अत्याचारांबद्दल अमेरिकेच्या सिनेटमध्ये निषेधाचा ठरावही अमेरिकेने येऊ दिला नाही. तेव्हा अमेरिकेच्या लोकशाहीच्या प्रेमाबद्दल न बोललेलंच बरं. निरनिराळ्या वित्तसंस्था, स्वयंसेवी संस्था, लष्कर, मदतीचा पैसा, भ्रष्टाचार या साऱ्यांतून विविध मार्गाने ज्या लोकशाहीचा आविष्कार होत असतो ती लोकशाही आणि कॅस्ट्रोसारख्यांचा समाजवाद ह्या कल्पना जवळजवळ परस्परविरोधी आहेत असं म्हणता येईल. कॅस्ट्रोनी आपल्या आयुष्यात या साऱ्या लोकशाहीपासून दूर राहणं पसंत केलं आणि त्यांच्यावर हुकूमशाहीचा शिक्का बसला. ज्या आर्थिक निर्बंधाच्या वेढ्यात क्यूबा अजूनही अडकलेला आहे, त्या संदर्भातच कॅस्ट्रोसारख्यांच्या समाजवादाचा आविष्कार लक्षात घेणं आवश्यक आहे.

लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यात विविध स्तर आहेत काय हा प्रश्न स्वत:ला विचारला तर गुंतागुंतीचं वास्तव समजायला कदाचित मदत होईल. 

दुसरं म्हणजे आपण कुठल्या दृष्टीने कॅस्ट्रोकडे पाहतो हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. कॅस्ट्रो हे कठोर आदर्शवादी आहेत आणि कोणतीच तडजोड न करता त्यांनी आपला आदर्शवाद राबवला आहे. हे करत असताना सतत त्यांची नजर सर्वांत तळाच्या माणसाकडे असते हे आपण इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. सामाजिक विचाराच्या क्षेत्रात वाढ आणि संपत्तीचं न्याय्य वाटप असे दोन शब्द सतत वापरले जातात. यापैकी वाढ हा शब्द भांडवली अर्थशास्त्र मानतं आणि समाजवादी मंडळी सतत संपत्तीच्या न्याय्य वाटपाबद्दल बोलतात. पण होतं असं की पहिल्या विचारात संपत्तीच्या न्याय्य वाटपाकडे दुर्लक्ष होत राहतं आणि समाजवादात वाढ होत नाही. यापैकी कॅस्ट्रोनी आपल्या समजेप्रमाणे समाजाच्या तळच्या वर्गाकडे पूर्ण लक्ष दिलं पण क्यूबाची अर्थव्यवस्था बहुतेक वेळा कुंठितावस्था राहिली. 

जागतिकीकरणाबद्दल जेव्हा एवढा गवगवा सुरू आहे तेव्हा कॅस्ट्रो यांच्या आंतरराष्ट्रीय वादाबद्दल बोललं जात नाही हा केवढा विनोद आहे? जागतिकीकरण आणि फिडेल यांचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन ही खरं तर दोन टोकं आहेत. जागतिकीकरणाचं इंजिन आंतरराष्ट्रीय भांडवल आहे तर कॅस्ट्रोंचा आंतरराष्ट्रवाद त्याच्या मनुष्यकेंद्री समाजवादी दृष्टिकोनातून स्फुरलेला आहे. विकसनशील देशांमध्ये जिथे जिथे आपत्ती येतात तिथे क्यूबाची वैद्यकीय पथकं जाऊन मदतकार्य करतात. पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या भूकंपातही या पथकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. एकूण अठरा देशात क्यूबाचे सुमारे 29000 वैद्यक तज्ज्ञ आरोग्यसेवा पुरवीत आहेत. अमेरिकेत हाहाकार उडवणाऱ्या कतरीना वादळाच्या वेळी खुद्द अमेरिकेला क्यूबाने वैद्यकीय पथकं देऊ केली होती. मात्र अमेरिकेने क्यूबाच्या आवाहनाला उत्तरसुद्धा पाठवलं नाही. अनेक विकसनशील देशातल्या लोकांवर क्यूबाच्या डॉक्टरांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि त्याही मोफत. क्यूबाचे आरोग्यविषयक अनेक निर्देशांक प्रगत राष्ट्रांची बरोबरी करणारे आहेत.

क्यूबाच्या अठ्ठावीस वैद्यकीय कॉलेजांतून सुमारे बावीस हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तीस देशांतून आलेले आहेत. या सर्वांच्यात एकच सामायिक गोष्ट आहे. ती म्हणजे या साऱ्या विद्यार्थ्यांना एरवी हे शिक्षण घेता आलं नसतं. बहुतेक वेळा जवळजवळ सारा खर्च क्युबाचा शासन करतं. कधीकधी व्हेनेझुएला त्यासाठी मदत करतो. गंमतीची गोष्ट म्हणजे खुद्द अमेरिकेतून क्यूबामध्ये जाऊन शिक्षण घेतलेल्यांची पहिली बॅच गेल्याच वर्षी बाहेर पडली. यात अमेरिकेच्या गरीब घरातले विद्यार्थी होते.

आपल्या देशातलं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे यावर कॅस्ट्रोचा कटाक्ष असतो. एवढंच नव्हे तर त्याला पुरेशा कॅलरीज मिळाल्या पाहिजेत याबद्दल ते आग्रही आहेत. सव्वा कोटी लोकसंख्येच्या क्यूबात शंभरी पार केलेल्या सुमारे तीन हजार व्यक्ती आहेत हीच गोष्ट पुरेशी बोलकी आहे. साऱ्या जगाचं वैभव एका मक्याच्या दाण्यात सामावू शकतं असं कॅस्ट्रोचं म्हणणं आहे. हवानाच्या रस्त्यावर लावलेल्या एका फलकाचं चित्र नुकतंच पहायला मिळालं होतं. त्यात म्हटलं होतं, ‘घर नसल्यामुळे जगातली कोट्यवधी मुलं रस्त्यावर झोपतात, हवानामधलं एकही मूल रस्त्यावर झोपत नाही. गांधीजींच्या अंत्योदयाचं स्वप्न तरी याहून कुठे वेगळं होतं?’

कॅस्ट्रोंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत; आणि ते संबंधित घडामोडींसह लिहायचे झाले तर एखादं पुस्तकच लिहावं लागेल. कॅस्ट्रोची स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे असं म्हटलं जातं. कॅस्ट्रोच्या वाचनाबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. गॅब्रियल गार्सिया मार्किझ हा जगप्रसिद्ध लेखक कॅस्ट्रोचा मित्र. जेव्हा आपलं लिखाण तो कॅस्ट्रोना वाचायला देई तेव्हा नंतरच्या काहीच दिवसात कॅस्ट्रो त्यावर खुणा करून ठेवत आणि मग त्यांच्या त्यावर चर्चा होत. 

क्यूबाची क्रीडा क्षेत्रातील भरारी हा जगातला आणखी एक कौतुकाचा विषय आहे. मुंबईएवढी लोकसंख्या असलेल्या क्यूबाने ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत असंख्य पदकं मिळवली आहेत. भारतासारख्या भल्या मोठ्या देशाला आजपावेतो एखाद्याच पदकावर समाधान मानावं लागलं आहे. आणखी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. क्यूबामध्ये तुम्ही कुठेही जा; तुम्हाला सगळीकडे संगीत भेटत राहील असा उल्लेख मी नुकताच एका पुस्तिकेत वाचला आणि ती पुस्तिका क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाने प्रसिद्ध केली नव्हती; तर एका प्रवासी गाईडमध्ये ही माहिती होती.

थोडक्यात म्हणजे जे जे काही मानवी होतं ते सारं साधायचा कॅस्ट्रोनी प्रयत्न केला. अगदी कठोरपणे केला. ह्यूगो चावेझसारखे कॅस्ट्रोचे मानसपुत्र आज कॅस्ट्रोंचा विचार पुढे नेत आहेत. जोडीला एवो मोरालेस (बोलिव्हिया), राफेल कोरिया (इक्वाडोर) अशा नेत्यांची नवी पिढी पुढे सरसावली आहे. पण या साऱ्यांनी कॅस्ट्रोचा कठोर आदर्शवाद जपण्याऐवजी मधला मार्ग पसंत केला आहे. नवभांडवलशाहीच्या अतिरेकात जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं जात होतं; त्याऐवजी त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. आणि कॅस्ट्रोची भूमिका अनुभवी वडीलधाऱ्यांची आहे. त्यात नवे नेते यशस्वी होतील का? की कायम मध्यम मार्गातच अडकून पडतील? कॅस्ट्रोसारखं साहस आणि तशी धडक त्यांना देता येईल का? काही झालं तरी कॅस्ट्रोचं काम असंख्य माणसांना स्फूर्ती देत राहील यात शंका नाही.

Tags: आंतरराष्ट्रीय राजकारण समाजवाद आदर्शवाद जागतिकीकरण नवभांडवलशाही एवो मोरालेस राफेल कोरिया क्युबा अमेरिका fidel castro weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके