डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तान : विदीर्ण आणि भरकटलेल्या देशाची भीतिचित्रं

पाकिस्तानच्या समाजजीवनाचं जे भीतिचित्र आज समोर आहे त्याला अनेक राजकीय संदर्भ आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जे तथाकथित दहशतवादविरोधी युद्ध सुरू आहे आणि त्यातील अमेरिकेची इस्रायलधार्जिणी जी भूमिका आहे त्यामुळे पाकिस्तानमधला संघर्ष निवळण्याचं कोणतंच चिन्हं नाही. इराक, अफगाणिस्तानातलं युद्ध, अमेरिकेची इराणविरोधी भूमिका, मानवविरहित विमानांधून अमेरिकेचे पाकिस्तानवर होणारे हल्ले यांमुळे या आगीत आणखीच भर पडत आहे. पाकिस्तानी राष्ट्रवाद आणि धार्मिक अतिरेकी गट यांची युती अधिकच कडवे रूप धारण करते आहे.

4 जानेवारी 2011 या दिवशी पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तसीर यांची हत्या झाली. त्यांच्याच सुरक्षेसाठी नेमलेल्या मलिक मुमताझ काद्री नावाच्या सैनिकाने इस्लामाबादच्या भरवस्तीत एका रेस्टॉरंटच्या आवारात त्यांच्यावर सव्वीस गोळ्या झाडल्या. अराजकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशावर आणखी एक आघात झाला. पाकिस्तानात उदार लोकशाहीवादी आणि बहुसांस्कृतिकतेचा वारसा सांगणाऱ्या शक्ती आधीच दुर्बळ आहेत. त्या आणखी दुर्बळ झाल्याची जाणीव अनेकांना झाली.

पाकिस्तानात स्थूलमानाने दोन प्रवाह आहेत. एकीकडे इस्लामच्या धर्मवेडात गुंतलेला, धर्माच्या प्रत्येक वाक्याला प्रमाण मानणारा, परंपरेच्या गर्तेत अडकलेला असा एक समूह आहे; तर दुसरीकडे विज्ञान, तंत्रज्ञान, भांडवलशाही वा समाजवाद यांतून आलेली मूल्ये मानणारा एक आधुनिक प्रवाह आहे, पण हे वर्णन स्थूल झालं. बहुतेक जनता या दोहोंचे कमी-जास्त प्रमाणात मिश्रण आहे. एकीकडे धर्म मानणारा, पण बहुधार्मिकता, बहुसांस्कृतिकता यांचा आदर करणारा आणि एकूण उदारमतवादी असा समूहही दुर्लक्षणीय नाही. सलमान तसीर हे या गटात मोडत. पाकिस्तान आणि त्याबद्दलचा अभिमान हा त्यांच्या एकूण विचारसरणीचा भाग होता. पण त्याच वेळी झिया उल हक यांच्या राजवटीत ज्या कठोरपणे इस्लामचे कायदे समाजावर लादले जात होते, त्यांविरुद्ध आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं होतं. तसीरना भीती नावाची गोष्ट माहीत नसावी. आपल्याला पटणाऱ्या गोष्टी बेधडकपणे करायला ते मागेपुढे पाहत नसत. झिया उल हकच्या काळात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती आणि या राजवटीविरुद्ध झुल्फिकार अली भुत्तोंच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्यांत ते अग्रभागी होते. मात्र अशा उदारमतवादी प्रवाहाचं पाकिस्तानी समाजातून हळूहळू उच्चाटन होत आहे आणि अधिक कडवे प्रवाह समाजाचा ताबा घेत आहेत हे पुन्हा एकदा तसीर यांच्या हत्येभोवतीच्या घटनांनी स्पष्ट झालं आहे. ज्या तत्कालीन कारणामुळे तसीर हे कडव्या धर्मवाद्यांच्या रोषाला कारणीभूत झाले ती आसिया बिबीची गोष्ट पाहिली तर तिच्यातून पाकिस्तानात चाललेल्या घटनांचा अंदाज येतो.

आसिया बिबी ही नानकाना साहिब जिल्ह्यातली एक साधी शेतमजूर स्त्री. ती ख्रिश्चन आहे. धर्मनिंदेच्या आरोपावरून तिला देहांताची शिक्षा झाली. इतकी कठोर शिक्षा झालेली पाकिस्तानातली ती पहिलीच व्यक्ती आहे. आसिया बिबीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्ती धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर तिचे खटके उडत होते. नॅशनल कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन या संघटनेने जेव्हा आसिया बिबी प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यात असं आढळलं की तिच्यावरचा गुन्हा वैयक्तिक आकसातून दाखल केला गेला होता आणि त्यामागे गावातले काही वजनदार लोक होते. तिचा खटला चालवण्यासाठी आसिया बिबीला साधा वकीलही मिळू शकला नाही असं तिने ॲनेस्टी इंटरनॅशनलला सांगितलं.

आसिया बिबीवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला; तिला रस्त्यावरून फरफटत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला असं मत सलमान तसीर यांनी मांडलं. इतकंच नव्हे तर तिची तुरुंगात जाऊन भेट घेतली. धर्मनिंदेचा कायदा अत्यंत ढिसाळ आणि अंधुक शब्दांत मांडलेला असल्याने या कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे; त्यामुळे ह्या कायद्यात सुधारणा व्हाव्या असं तसीर यांचं मत होतं. पाकिस्तानच्या दुसऱ्या एका भूतपूर्व मंत्री आणि आताच्या सांसद शेरी रहमान या बार्इंनी या कायद्याच्या संबंधात  पाकिस्तानच्या संसदेत एक बिल मांडलं होतं. याखेरीज, भूतपूर्व क्रिकेट खेळाडू इम्रान खान आणि माजी प्रधानमंत्री चौधरी शुजात हुसेन हे दोघे परंपरावादी असले तरी त्यांनीही या धर्मनिंदेच्या कायद्यात सुधारणा होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या कायद्यामुळे पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांवर सतत हल्ले व्हायला एक प्रकारे साहाय्य झालं आहे.

अहमदिया नावाचा एक अल्पसंख्यांक गट पाकिस्तानात आहे. 1953 पासून त्याच्यावर हल्ले होत आहेत. हा गट स्वत:ला मुस्लिम समजतो; पण हे मान्य करायला कट्टरपंथीयांचा विरोध आहे. जनरल झियांनी त्यांच्या कारकिर्दीत मुस्लिम धर्माची व्याख्या करणारे कायदे केले. त्याअन्वये अहमदियांना गैरमुस्लिम म्हणून घोषित करण्यात आले. स्वत:ला मुस्लिम म्हणवून घ्यायला त्यांना आजही बंदी आहे. तसं केल्यास ती धर्मनिंदा समजली जाते आणि त्याबद्दल कायद्याने त्यांना शिक्षा होऊ शकते. धर्मनिंदेच्या कायद्यात बदल व्हावा ही मागणी मुख्यत: ह्या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याने पुढे आली. पण अशा कृती जाज्वल्य धर्मवीरांना कधीच पसंत पडत नाहीत. विशेषत: सलमान तसीर यांच्यासारख्या ‘आपल्या’ धर्माच्या माणसाने ‘इतर’ (म्हणजे इथे ख्रिश्चन) धर्मीयांची बाजू घेतली तर धर्मवीरांचा तिळपापड होतो. त्यामुळे तसीर यांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या. या साऱ्यांची अखेर तसीर यांच्या हत्येत झाली.

तसीर यांच्या हत्येनंतर घडलेल्या घटना अधिक चिंताजनक आहेत. 9 जानेवारीला नझीम ए इस्लामी या संघटनेने कराचीत एक सभा घेतली. या सभेला पन्नास हजार लोक उपस्थित होते. धर्मनिंदेच्या कायद्यात सुधारणा करण्याविरुद्ध तिथे आवाज उठले. फझलूर रहमान नावाच्या मौलानांनी या सभेत भाषण केलं. खुद्द तसीर हेच त्यांच्या हत्येला कसे कारणीभूत आणि जबाबदार आहेत हे त्यांनी ठासून सांगितलं. या सभेला पन्नास हजार लोक उपस्थित होते. या सभेत शेरी रहमान यांच्यावरही टीका करण्यात आली. मात्र तसीर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी कराचीत जो मेणबत्ती मोर्चा निघाला त्याला काही डझन लोकच उपस्थित होते. मुताझ काद्रीला न्यायालयात नेताना सुमारे दोनशे वकिलांनी त्याला हार घातले आणि पोलीस कस्टडीत असताना काहींनी त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची वृष्टी केली. हसऱ्या चेहऱ्याने कॅमेऱ्याला सामोरा जाणारा मारेकरी मुताझ काद्री तिथल्या धर्मवीरांचा पोस्टरबॉय बनला आहे.

मुताझ काद्रीने तसीरना गोळ्या झाडल्या, त्याला तिथल्या पोलिसखात्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी अपात्र ठरवलं होतं. कारण त्याच्यावर धार्मिक प्रभाव होते असं त्या खात्याला वाटत होतं. पण मग पुन्हा त्यालाच तसीर यांच्या संरक्षणासाठी निवडलं गेलं ही घटना बुचकळ्यात टाकणारी आहे. काद्रीला पाठिंबा देणाऱ्यांत सुन्नी तहरीक या गटाचे मुल्ला बहुसंख्येने आहेत. हा गट मवाळ आहे आणि तो तालिबानविरोधी समजला जातो. या गटाचा मौलाना सरफराझ ताइमी या नावाचा एक नेता 2009 मध्ये तालिबानच्या आत्मघातकी बाँबस्फोटात मारला गेला होता. आत्मघातकी हल्ल्यांना विरोध करणारी वक्तव्ये त्याने केल्यामुळे त्याला ही शिक्षा मिळाली. अशा गटांपर्यंतही धार्मिक हिंसाचाराचं लोण पसरावं ही परिस्थिती पाकिस्तानमधल्या परिस्थितीचं गांभीर्य सूचित करणारी आहे.

मुशर्रफनी 2007-08 मध्ये देशाच्या सरन्यायाधीशाची उचलबांगडी केली तेव्हा तेथील वकील मोठ्या संख्येने लढ्यात उतरले होते. पाकिस्तानातल्या वकिलांकडे तेव्हा जग मोठ्या आशेने पाहत होतं; कारण न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेसाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता. पण आज त्यांची मजल मारेकऱ्याला हार घालण्यापर्यंत गेली आहे. कुंपणच जर असं शेण खाऊ लागलं तर तसीर यांच्या मारेकऱ्याच्या गुन्ह्यासाठी पुरेसा पुरावा पुढे येऊन त्याला शिक्षा होणं कठीण बनेल. कायदे जाणणारा वर्गच असा भीतिग्रस्त होणं किंवा धार्मिकतेच्या पक्षात सामील होणं ही घटना पाकिस्तानातलं धर्मांध शक्तीचं वर्चस्व दाखवणारी आहे.

तसीर यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्याला पाठिंबा देणारं एक पत्रक तेथील वकिलांच्या एका संघटनेनं काढलं. या पत्रकावर एक हजार वकिलांच्या सह्या होत्या. राव अब्दुर रहमान या नावाचे एक तरुण वकील तसीरविरोधी आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. लॉयर्स फोरम या नावाची त्यांची एक संघटना आहे. प्रेषित महंमदाच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपण ही संघटना काढली आहे असं ते म्हणतात. धर्मनिंदेच्या कायद्यात सुधारणा करायला त्यांचा सक्त विरोध आहे. मात्र सारे वकील या मताचे आहेत असं नव्हे. आपल्या समाजात विलक्षण दुभंगलेपणा निर्माण झाल्याची कबुली काही वकील देतात. कारी हनीफ आणि इश्तियाक शहा या दोघा धर्मगुरूंच्या प्रभावाखाली येऊन आपण तसीर यांची हत्या केल्याची कबुली मारेकरी मुताझ काद्री याने दिली आहे. पोलीस आता या धर्मगुरूंना पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. या धर्मगुरूंना पकडण्यात येऊन त्यांना शिक्षा दिली जावी अशी मागणी तेथील डेली टाइम्स या वृत्तपत्राने केली आहे. विद्वेषी भाषणं करून खुनासाठी एखाद्याला प्रवृत्त करणं हा पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. तसेच ज्या वाहिन्या आणि वृत्तपत्रं अशिक्षित मुलांना आणि धर्मवीरांना बोलावतात आणि तसीर आणि शेरी रहमान यांच्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी वाव देतात त्यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करावे असं या वृत्तपत्राने म्हटलं आहे, पण पाकिस्तानातलं आजचं कट्टर धार्मिकतेचं वातावरण लक्षात घेता त्यांना पकडणं आणि नंतर आरोप सिद्ध करणं हे अवघड होऊ बसलं आहे.

पाकिस्तान आज एका कड्याच्या टोकावर उभे आहे. तिथल्या लोकशाहीवादी, बहुसांस्कृतिकतेचा वारसा सांगणाऱ्या राजकीय शक्ती एकीकडे भ्रष्टाचारात बुडालेल्या आहेत आणि दुसरीकडे प्रतिगामी धार्मिक शक्तींविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी इच्छाशक्ती नाही. तसा प्रखर विचार त्यांच्या कृतीतून दिसून येत नाही. उलट आपल्या फायद्यासाठी धर्मांध शक्तींच्या काही गटांचा त्यांनी विविध वेळी वापर केला आहे.

मात्र अशा पुरोगामी शक्ती पाकिस्तानात पुरेशा प्रमाणात अस्तित्वात आहेत असं मत बेनझीर भुत्तो यांची भाची आणि कवयित्री फातिमा भुत्तो हिने मांडलं आहे. अलीकडे कराचीमधून दोन मुलींना जेव्हा पळवून नेण्यात आलं आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला तेव्हा झिया उल हकप्रणित कायद्याप्रमाणे बलात्कारी व्यक्तीऐवजी बळी पडलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. पण तिथे  स्त्रियांनी उग्र निदर्शने करून आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं. स्त्रियांची शक्ती ही उदारमतवादाबरोबर असणं हे स्वाभाविक आहे असं मत फातिमा भुत्तो यांनी मांडलं आहे. पण त्यात त्यांचा आशवाद किती आणि वास्तविकता किती हे तपासून पाहावं लागेल.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान परगण्यातून गेल्या दशकात सुमारे दहा हजार व्यक्ती गायब झाल्या आहेत असं तिथल्या स्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि यांतल्या बहुसंख्य व्यक्ती पुरोगामी आणि किंवा डाव्या विचारांच्या आहेत.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या लष्कराला अब्जावधी डॉलरची मदत केली आहे; पण दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या सामाजिक शक्तींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. आज कट्टर धर्मवाद्यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. यात संरक्षणाच्या क्षेत्राचाही समावेश आहे. अगदी साध्या सैनिका-शिपायापर्यंत हे लोण पसरलं आहे हे तसीर यांच्या हत्येवरून स्पष्ट झालं आहे. तसीर यांच्यावर मारेकऱ्याने सव्वीस गोळ्या झाडल्या, पण हे होताना त्यांच्याबरोबरच्या इतर सुरक्षा सैनिकांनी मारेकऱ्याचा प्रतिकार करण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही, ही गोष्ट गंभीर आहे.

1977 ते 1988 या काळात पाकिस्तानात झिया उल हक यांच्या राजवटीने पाकिस्तानातला प्रागतिक विचार बाजूला सारून तिथे इस्लामी कायदे आणले. धर्मनिंदेचा कायदा याच काळात आला. याखेरीज हुदूदवर आधारित अनेक कायद्यांची मालिकाच समोर आली. विवाहबाह्य संबंधांना देहांताची शिक्षा, विवाहपूर्व संबंधांसाठी स्त्रीला देहांताची शिक्षा असे कठोर कायदे अस्तित्वात आले. झियांच्या राजवटीत धर्मातीत विचार बाजूला सारून त्या जागी जिहादची उदात्तता सांगणारा आशय शालेय शिक्षणात आणला गेला. या काळात सौदी अरेबिया, पाकिस्तानी राजवट आणि अमेरिका यांनी अफगाणिस्तानात रशियन आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी जिहादी गटांना सक्रिय पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्यांना शस्त्रे पुरवली गेली. या साऱ्याची परिणती विचार, संघटन आणि शस्त्रसामग्री या सर्व अंगांनी जिहादी गट प्रबळ होण्यात झाली. 1988 मध्ये झिया उल हक यांचा काहीशा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला. त्यानंतर कट्टर इस्लामचा ऱ्हास होईल अशी वेडी आशा तिथल्या पुरोगाम्यांना वाटत होती. अर्थात असं काही झालं नाही. इस्लाममधल्या उदार मतप्रवाहाऐवजी अधिक कट्टर आणि प्रतिगामी अशा वहाबी पंथावर आधारित प्रतिगामी विचारांचे पीक तिथे जोरात आले.

पाकिस्तानचे लष्कर हे राजकारणापासून कधीच अलिप्त नव्हते. गेली अनेक दशके लष्कराने अनेक कट्टरपंथीयांना प्रत्यक्षपणे वा कधी छुपेपणाने पाठीशी घातलं आहे. त्यामुळे लष्कराने अशा हिंसक धार्मिक गटांविरुद्ध ब्रदेखील काढला नाही, हे अपेक्षित होतं. परिणामत: अशा प्रसंगात साऱ्या लोकशाहीवादी आणि प्रागतिक शक्ती अधिकाधिक एकट्या पडल्याचं दृश्य समोर येत आहे. पाकिस्तानच्या अस्थिर आणि रक्तलांच्छित वातावरणात धार्मिक अतिरेक्यांनी तसीरविरोधाची आणि मारेकऱ्याच्या समर्थनाची तोफ नव्याने डागली आहे. यातून ज्या आरोळ्या उठत आहेत त्यामागे इस्लामवर आधारित समाज निर्माण करण्याचा अट्टाहास आहे आणि याचा संबंध प्रेषिताच्या शांतिपूर्ण इस्लामशी नसून वहाबी पंथाशी आहे आणि एकदा हा चष्मा घातल्यानंतर त्यातून दिसलेला इस्लाम कसा असेल याची चुणूक विविध कट्टरपंथीयांनी मुलींच्या शाळा जमीनदोस्त करण्याच्या आपल्या कार्यक्रमातून दाखवली आहे. हे तथाकथित इस्लामचं जग कसं असेल? यात स्त्रियांचं शिक्षण, समाजजीवनात मुक्त वावर, त्यांचे अधिकार यांना कोणतंही स्थान असणार नाही. बुरखा आणि घराच्या चार भिंतींमध्ये त्या कोंडल्या जातील. विज्ञान, तंत्रज्ञानाचा जीवनात भरपूर वापर होईल. अगदी एके 47 रायफल्स, विमानं, आधुनिक शस्त्रास्त्रं यांच्या वापराला मज्जाव नसेल. पण कोणतेही आधुनिक विचार माणसाच्या जाणिवेत शिरू नयेत याची ‘खबरदारी’ शासनाचे सांस्कृतिक पोलीस घेतील. संगीताला या जगात स्थान नाही. अपवाद फक्त परमेश्वराचं गुणगान करणाऱ्या संगीताचा. छायाचित्रण, चित्रकला अशांनासुद्धा नाकं मुरडली जातील. पतंग उडवण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टींनासुद्धा तिथे मज्जाव असेल. तुमची केशभूषा, वेशभूषा, दाढी, विजार आणि टोपीचा आकार यांसारख्या बाबींवरसुद्धा सांस्कृतिक पोलिसांचा पहारा असेल.

मात्र इस्लामचं हे रूप सर्वच इस्लामी विद्वानांना मान्य आहे असं समजता येणार नाही. उलट हिंसाचाराने भारलेल्या इस्लामला अनेकांनी प्रखर विरोध केला आहे. विशेषत: अमेरिकेवर 9/11चा झालेला हल्ला आणि आपल्याकडील 26/11 चा हल्ला या संदर्भात अनेक धार्मिक नेत्यांनी आवाज उठवले आहेत. दहशत ही पूर्णपणे इस्लामविरोधी आहे असं स्पष्ट मत यांतील अनेकांनी मांडलं आहे. मौलाना वहिदुद्दिन खान यांनी यासंबंधी आपली मते अलीकडे एका लेखात स्पष्टपणे मांडली आहेत. त्या मतांना तसीर यांच्या हत्येचा संदर्भ आहे. धर्मनिंदा म्हणजे स्वातंत्र्याचा दुरुपयोग असला तरी तो साधा दखलपात्र गुन्हासुद्धा नाही. त्यामुळे त्यासाठी साधी शिक्षासुद्धा होणं योग्य योग्य नव्हे असं त्यांनी म्हटलं आहे. अशी धर्मनिंदा जर कोणी करत असेल तर तो प्रेषिताबद्दलचा गैरसमज आहे असं समजून त्या गैरसमजाचं निराकरण करणारं साहित्य त्या निंदकाला वाचायला देणं, त्याच्याशी युक्तिवाद करणं हे त्यावरचे उपाय आहेत. इस्लाममध्ये फक्त एकाच गुन्ह्यासाठी देहांताची शिक्षा सांगितली आहे. तो म्हणजे खून! आणि ही शिक्षा फक्त कायद्याने स्थापन केलेलं न्यायालय कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावरच देऊ शकते. कुराण म्हणजे फौजदारी कायद्याची संहिता नव्हे; माणसाचं मतपरिवर्तन करण्यावर त्याचा भर आहे. त्यामुळे मुस्लिमांनी तर्क आणि शांतिपूर्ण संवाद यांच्या माध्यमातूनच अशा धर्मनिंदेच्या घटनेकडे पाहिलं पाहिजे असं मौलाना वहिदुद्दिन म्हणतात.

कुराण आणि हदिथमध्ये धर्मनिंदेसाठी कोणत्याच शिक्षेचा उल्लेख नाही. धर्मनिंदेचा कायदा अब्बासिदच्या कालखंडात अस्तित्वात आला. तेव्हा मुस्लिमांचं वर्चस्व आणि साम्राज्य प्रस्थापित झालं होतं. त्या भरात त्यांनी हा कायदा आणला, पण हदिथप्रमाणे अशा बदलाला नाकारणं आवश्यक आहे.

पाकिस्तानच्या समाजजीवनाचं जे भीतिचित्रं आज समोर आहे त्याला अनेक राजकीय संदर्भ आहेत. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जे तथाकथित दहशतवादविरोधी युद्ध सुरू आहे आणि त्यातील अमेरिकेची इस्रायलधार्जिणी जी भूमिका आहे त्यामुळे पाकिस्तानमधला संघर्ष निवळण्याचं कोणतंच चिन्ह नाही. इराक, अफगाणिस्तानातलं युद्ध, अमेरिकेची इराणविरोधी भूमिका, मानवविरहित विमानांमधून अमेरिकेचे पाकिस्तानवर होणारे हल्ले यांमुळे आगीत आणखीच भर पडत आहे. पाकिस्तानी राष्ट्रवाद आणि धार्मिक अतिरेकी गट यांची युती अधिकच कडवे रूप धारण करते आहे. निवडणुकींच्या मार्गाने सत्तेवर येणाऱ्यांना जर आपण लोकशाहीवादी आणि उदार गट मानू लागलो तर ह्या गटांत अमेरिकेच्या कलाने चालणारे बरेच आहेत. पण दुसरीकडे ह्या वर्गाला कोणताच विधिनिषेध नसल्याने धार्मिक गट ते अमेरिका यांच्यापर्यंत कुणाशीही ते तडजोड करू शकतात. हा वर्ग भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे, त्यामुळे त्यांच्यात विश्वासार्हता राहिलेली नाही. परिणामी पाकिस्तानमधले उदारमतवादी आणि लोकशाही गट एकटे पडत आहेत. याउलट मुल्ला आणि मौलवींचे गट हे मतपेटीच्या राजकारणात मुरलेले नसले तरी रस्त्यावरच्या राजकारणाशी त्यांचा निकटचा संबंध आहे, त्यामुळे ते या राजकारण्यांना जेरीस आणू शकतात. जनतेच्या दैनंदिन जीवनावर, तिच्या सांस्कृतिक बाबींवर राजकारण्यांपेक्षा ते आपला अधिक प्रभाव पाडू शकतात. एकूणच या उपखंडात अस्थिरतेचं वातावरण आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून निघून जावे आणि पाकिस्तानवरचे अमेरिकी वर्चस्व नष्ट व्हावे असे तिथे प्रत्येकाला वाटले तर नवल नाही. पण अमेरिका खरोखरच तिथून निघाली तर तिथे काय होईल अशी भीती अनेकांना पडली आहे. असं घडलं तर तिथले कट्टरपंथीय अधिक सक्रिय होतील आणि जनतेवर सर्वंकष धार्मिक नियंत्रणाची छाया पडेल अशी धास्ती अनेकांना वाटते. तालिबानला नुसतं अमेरिकेला तिथून हटवायचं नाही. त्यांना सर्वंकष धर्माधारित सत्ता हवी आहे. इराणमध्ये जनप्रक्षोभ होऊन अमेरिकाधार्जिण्या शहाचा पाडाव झाला तेव्हा कट्टरपंथी धर्मगुरूंची सत्ता कशी आली आणि त्याचे परिणाम काय झाले हा इतिहास ताजा आहे. काहीशा अशाच गोष्टी पाकिस्तानात घडू शकतात.

आपण अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाचं समर्थन करण्यासाठी अमेरिकेला या भूप्रदेशातला हा तळ हलवायची इच्छा नाही. त्यामुळे नैतिकदृष्ट्या दुर्बल आणि भ्रष्ट मतपेटीवाल्यांना हाताशी धरून, लष्करी बळ वापरून त्यांना तालिबानशी शह द्यायचा आहे, पण लष्करासकट तेथील प्रत्येक संस्था धर्मशक्तींनी भारलेली असल्याने हा लढा सोपा नाही. परकी सत्ता विरुद्ध स्वकीयांचा राष्ट्राभिमान, आधुनिकता विरुद्ध परंपरा अशा अनेक अंगांनी हा संघर्ष सुरू आहे, पण हा संघर्ष अधिक खोलवर गुंतागुंतीचा आहे. परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. उदारमतवाद्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबरोबर तिथे विविध पंथीयांच्या आपापसात मारामाऱ्या सुरू आहेत. एका गटाने दुसऱ्या गटाच्या माणसांवर हल्ले चढवणं, विरोधकांच्या धर्मस्थळांवर बाँबस्फोट घडवणं अशा गोष्टी सर्रास सुरू आहेत. कोणत्याही अर्थाने हे चित्र उदार, शांतिपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाचं नव्हे.

पाकिस्तानचा आरसा आपण समोर धरला तर आपण त्यात कसे दिसतो? मागच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याने इथे धार्मिक शक्ती काहीशा दुर्बळ झालेल्या दिसल्या तरी त्या उग्रवादी स्वरूपात पुन्हा समोर येत आहेत. स्वामी असीमानंदांनी दिलेले कबुलीजबाब पुरेसे बोलके आहेत. प्रस्थापित राजकीय वर्ग एकीकडे दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक गाठत आहे; तर दुसरीकडे महागाईसारख्या आपल्या रोजच्या जीवनातल्या समस्यांचं निराकरण करण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्यांकडे नाही अशी भावना सर्वसामान्यांमध्ये प्रबळ होते आहे. अशा राजकीय वर्गाजवळ धार्मिक दहशतीविरुद्ध लढण्यासाठी पुरेसा आत्मविश्वास असेल काय? की तोही एक दिवस पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांप्रमाणे धर्मांध शक्तींचं लांगूलचालन करत एक दिवस त्यांना शरण जाईल? हे प्रश्न येथील राज्यकर्त्यांना विचारायला हवेत.

भाजप-युतीचा केंद्रात जोर असतानाच्या काळात मधेच एकदा मृदू हिंदुत्वाचे वारे काँग्रेसमध्ये वाहत होते याची आठवण विसरता येणार नाही. आणि आजही काँग्रेसच्या युतीतल्या इतर पक्षनेत्यांची भूमिकाही या बाबतीत ठोसपणे धर्मातीत नाही; अनेकदा तर ती जातीयवादी शक्तींना पाठीशी घालताना दिसते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे या बाबतीतले रेकॉर्ड स्वच्छ नाही. त्यांचे नेते मधूनमधून सेनेशी वा तत्सम गटांशी संबंध साधण्याची भूका उठवून राजकीय फायदे उपटू पाहतात हे चित्र विषण्ण करणारे आहे.

Tags: अशोक राजवाडे सलमान तासीर परवेज मुशरफ झिया उल हक पाकिस्तान ashok rajwade salman tasir parvez mushharf jia-ul-haq  pakistan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके