डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पोरं बोलत होती. कुठल्या कुठल्या कथा ऐकवत होते. कुणी तरी भूत पाहिलं आणि त्याला ताप भरला अन्‌ त्यातच तो गेला. मी जरी भित्रा होतो, भुता-खेतांच्या गोष्टींना घाबरायचो; तरी या असल्या कथा त्या वयापासूनच भाकडकथा वाटायच्या. तरीही ‘भूत बंगला’ पाहिला आणि भरत गेला, यातला गूढ संबंध उलगडायचाच नाही... दोन भुतांचे हे दोन प्रताप... एक रामूवरचं देव आनंदचं भूत, तर दुसरं भूत बंगल्यातलं भूत...!

‘‘खोया खोया चाँद खुला आसमान

 आँखों में सारी रात जायेगी  

तुमको भी कैसे नींद आयेगी होऽऽ

होऽ खोया खोया चाँद.

जिन्यावरून येताना आमच्या चाळीतला रामू नेहमी हे गाणं म्हणत खाली यायचा. दुडक्या चालीनं यावं तशा त्याच्या दुडक्या उड्या... त्याही हलकेच... देव आनंदच्या लयीशी लय  जुळवत यायचा. पडद्यावर हे गाणं म्हणताना देव आनंद टेकडीवरून घरंगळत आल्यासारखा  येतो. रामूही तसाच खाली यायचा. दोन्ही हात तसेच- देव आनंदसारखे खांद्यापासून  लोंबकळत ठेवलेले... उजवीकडे कलंडलेला... देवसारखाच रामूचा सडपातळ देह... आणि हो, शर्टाची कॉलर कायम उभी..! रामू म्हणजे मूर्तिमंत देव आनंद! देहबोली तंतोतंत तशीच देव  आनंदसारखी...!

जेमतेम विशीला आलेला रामू देखणा आणि गोरापान. गिरणीत नोकरीला असलेल्या  विधवा आईचा एकुलता एक मुलगा... आणि म्हणूनच लाडावलेला. चाळीतल्या, त्याच्या  वयाच्या इतर पोरांच्या मानाने त्याच्या अंगावर सतत नवे आणि अर्थातच फॅशनबाज कपडे  असायचे. तोही गिरणीतच नोकरीला होता. घरात माणसं दोनच आणि दोघंही कमावती. त्यामुळे त्याच्या हाती बऱ्यापैकी पैसा असायचा. त्याला नवनवे फॅशनबाज कपडे, घड्याळं, बूट परवडायचे... आणि त्यातच तो स्वत:ला देव आनंद समजायचा.

आमच्या एकमजली चाळींच्या- त्यांना ‘ब्लॉक्स’ असे म्हटले जात असे- मागे  असलेल्या बैठ्या चाळीत रामूचा मामा राहत असे. मामाही गिरणी कामगारच होता. त्याला  दोन मुलं- एक मुलगा, एक मुलगी. लक्ष्मी थोरली. श्यामू छोटा. रामू आणि लक्ष्मीचं लग्न हे  घरीदारी गृहीतच धरलेलं होतं. एक तर ती मामाची मुलगी आणि दुसरं म्हणजे त्यांचा तमिळ  समाज आकाराने छोटाच! योग्य वयाची उपवर मुलं-मुली मिळणं तसं अवघडच. रामू आणि  लक्ष्मीच्या बाबतीत मामला सारा चोखच होता. परंतु प्रत्यक्षात जेव्हा लग्नाचा विषय निघाला, तेव्हा रामूने स्पष्ट नकारच दिला. आई आणि मामाला- अर्थातच लक्ष्मीलाही- हा धक्का होता. कोणाच्या घरात बारीकसं जरी काही घडलं तरी अख्ख्या वस्तीला कळायचं, त्यामुळे ही  बातमीही घराबाहेर गेली. सर्वांनाच धक्का बसला, कारण  प्रत्येकाने रामू-लक्ष्मीचं लग्न गृहीतच धरलेलं होतं.

प्रथम आईने, मामाने, मग त्यांच्या समाजातील, तसेच  चाळीतील इतर वडिलधाऱ्यांनी रामूला समजावण्याचा प्रयत्न  केला; परंतु पठ्ठ्याने आपला हेका काही सोडला नाही. तो  आपल्या नकारावर ठाम राहिला. घरच्या-दारच्या  वडिलधाऱ्यांनी मग असा निर्णय घेतला की, थोडे दिवस हा  विषय बाजूला ठेवायचा आणि मग पुन्हा एकदा रामूची  समजूत घालायची. वडिलधाऱ्यांत होणारं बोलणं आमच्याही  कानांवर यायचं. त्यातून लक्ष्मीचा भाऊ श्यामू आमच्याच  वयाचा. त्याच्याकडूनही गोष्टी कळायच्या. तो रामूबद्दल चिडून बोलायचा. म्हणायचा,

‘‘खुद को देवानंद समझताय साला...’’

...आणि हे तर खरंच होतं. तो ‘देवानंद’च तर होता. त्याच्या पुढे लक्ष्मी म्हणजे एक सामान्य रूपाची मुलगी. काळीच म्हणावी अशी. दाट, कुरळे केस... त्यांची तोकडीच  वेणी. अवतीभवती आणि सिनेमाच्या पडद्यावरच्या पोरी  कशा लांबसडक केसांच्या असायच्या! लांबसडक वेण्या  स्टाइलमध्ये उडवायच्या! लक्ष्मीकडे यातलं काहीच नाही. त्यातच तिच्या डोळ्यांत दोष- तिरळी! वस्तीलाही दोघांच्या  रूपातली ही तफावत दिसायची... त्यावर बोललंही जायचं आणि तरीही, ‘रूपाचं काय एवढं कौतुक? ते काय जलमभर पुरतंय होय’- अशा प्रतिक्रियाही उमटायच्या.

कुणी तरी म्हणायचं, ‘‘...गोरा आहे म्हणजे झालं का सगळं?’’

तर कुणी म्हणायचं,

‘‘पोरगी आहे दिसायला अशी-तशीच, पण आई  गेल्यापासून बाई म्हणून घरात तीच सगळं करते आहे ना? पोरीला वळण आहे चांगलं. बायको संसार करायला हवी की  लाली-पावडर लावून सोबत फिरवायला?’’

रामूलाही हे असं सारं थेटपणे सुनावलं गेलं असणारच; परंतु त्याच्यातल्या देव आनंदला नूतन, वहिदा, साधनाची  स्वनं पडत असणार... मी त्या वेळी सहावीत असेन. रामूचा हा सारा एपिसोड मी  माझ्या नजरेतून पाहत होतो. त्याचा अर्थ लावत होतो. देव  आनंद आवडणं आणि देव आनंदच होऊन जाणं- हे असं कसं  होत असावं...?

मधे काही दिवस, काही महिने गेले. वस्ती आपल्या  उद्योगात, रहाटगाडग्यात गुंतली. ‘आज ना उद्या रामूला लक्ष्मीशीच लग्न करावं लागेल, जातो कुठे!’ असं अधूनमधून बोललं जात होतंच... आणि...

...आणि एक दिवस रामू एका विचित्र अपघातात  सापडला. तळमजल्यावरच्या व्हरांड्याच्या कठड्यावरून तो  खाली पडला. जेमतेम पाच-सहा फुटांवरून. त्याचा उजवा  हात दुखावला होता. रक्त आलं नव्हतं फार, परंतु वेदना  जबरदस्त होती. त्याला प्रथम गिरणीच्या दवाखान्यात, तिथून  सरकारी इस्पितळात आणि मग आठवड्याभराने सुरतच्या  मोठ्या इस्पितळात नेण्यात आलं. त्याच्या तब्येतीविषयीच्या  बातम्या अगदी मोघमपणे येत असायच्या. मुख्यत: कळायचं  ते असं की- त्याची प्रकृती सुधारतेय, तो लवकरच घरी येईल. यात तीनेक महिने गेले आणि एक दिवस रामू सुरतच्या  इस्पितळातून परतला. त्याला पाहून वस्ती हादरून गेली.

रामू पार बदललेला होता. त्याच्यात देव आनंदचा  लवलेशही राहिला नव्हता. पार रया गेली होती. चेहरा पार वाळला होता. निस्तेज दिसत होता... आणि उजवा हात? तो  तर अर्धाच होता!...

रामू मग दिवसच्या दिवस घरातच असायचा. क्वचित बाहेर  पडला... तर जिन्यातून कधी खाली आला, ते कळायचं नाही. कारण आता ‘खोया खोया चाँद’ नसायचं. एकटा- एकटाच कुठे कुठे फिरत राहायचा. कुणात मिसळायचा नाही, कुणाशी काही बोलायचा नाही. गप्प-गप्प राहायचा. चेहरा  कायम उदास, भकास... भूत उतरवल्यावर माणूस जसा  गलितगात्र होऊन पडतो, तसा... असेच काही दिवस, काही महिने गेले आणि वस्तीत  बातमी पसरली... रामू आणि लक्ष्मीचं लग्न ठरलं. मागोमाग  तयारी सुरू झाली.

त्या वेळी वस्तीतल्या लग्नात मंडप आणि लाऊडस्पीकर  ठरलेला असायचा. जवळपास अख्ख्या वस्तीला जेवण असायचं. काही लग्नांत बँडही असायचा. मला एक खोड  होती. मी या बँडवाल्यांमधल्या क्लॅरिनेटवाल्यासमोर उभा  राहून मुद्दाम चिंच चोखत राहायचो. त्यामुळे त्याच्या तोंडाला  पाणी येऊन क्लॅरिनेट वाजेनाशी व्हायची. मग मला समोरून  हाकललं जायचं. रामूच्या लग्नात मात्र मला हा व्रात्यपणा करायची संधी मिळाली नाही. कारण बँडच नव्हता, लाऊडस्पीकरही नव्हता. मंडप साधासाच होता. वस्तीत सर्वांना बहुधा निमंत्रणही नव्हतं. त्यामुळे जेवणावळीही  बाद... अशा साधेपणात रामू-लक्ष्मीचं लग्न झालं.

एकच गोष्ट माझ्या नजरेत आणि कायम स्मरणात राहिली- आणि ती म्हणजे, लक्ष्मीचा चेहरा! लक्ष्मीला लग्नमंडपात  नेताना मी तळमजल्यावरच्या ओट्यावरून पाहत होतो.  तिच्या डोकीवर चार-सहा बायकांनी चादर धरली होती. त्या पारंपारिक तमिळ गाणी म्हणत होत्या... आणि संथ पावले  टाकीत लक्ष्मी चालली होती... मला तिचा हळदीने  माखलेला चेहरा दिसला... नेहमीसारखाच साधा, शांत! दिसत असेपर्यंत मी तो निरखीत राहिलो. तिच्या मनात काय चाललं असावं, याचा विचार मी बहुधा करत होतो. लक्ष्मीचा तो चेहरा कायमचा माझ्या मनावर कोरला गेला. सिनेमातला  ‘क्लोज-अप’  पुढे कधी तरी कळला, परंतु तो मी त्याही आधी प्रत्यक्षात पाहिला होता...

याच सुमारास कायमचा चटका लावून गेलेली आणखी एक गोष्ट घडली. नुकताच ‘भूत बंगला’ नावाचा भयपट जहांगीर टॉकीजमध्ये दाखल झाला होता. ‘आओ टि्वस्ट करें’सारखी वेगळ्या धर्तीची त्यातली गाणी रेडिओवर गाजत होती. त्या वेळच्या सुमधुर चालींच्या माहोलमध्ये हे काही तरी वेगळंच होतं. संगीत वेगळं, चाल वेगळी, गाणारा  आवाज- शैलीही वेगळी! पन्नास-साठच्या दशकांत भयपट, रहस्यपटांतही सुरेल गाणी असायची. ‘बीस साल बाद’मधलं ‘कहीं दीप जले कहीं दिल,’  ‘बेकरार करके हमें यूँ न जाइये’,  ‘कोहरा’मधलं ‘झूम झूम ढलती रात’,  ‘ये नयन डरे डरे’,  ‘वह कौन थी’मधील ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’,  ‘जो हमने दास्तां अपनी सुनाई’, ‘गले से, फिर ये हसीं रात हो न हो’... अशी ही गाणी खूपच लोकप्रिय होती.

कायम  गुणगुणली जायची. या गाण्यांमध्ये भयपटाचे वातावरण निर्माण करणारे काही ध्वनी-परिणामदेखील असायचे. परंतु  गाणेच मुळात मेलोडियस असायचे. रेडिओवर, लाऊड  स्पीकरवर गाणी ऐकता-ऐकता कधी एकदा ते सिनेमे पाहतो, असं वाटत राहायचं... आणि मग ते सिनेमे लागले की नाना  उपद्‌व्याप करून मी ते पाहायचो. मात्र ‘बीस साल बाद’, ‘कोहरा’, ‘वह कौन थी’ पाहायचं दुरूनही कधी माझ्या मनात  आलं नाही. कारण मी प्रचंड भित्रा होतो. रात्री घरातल्या घरात  एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला घाबरायचो. त्यामुळे हे सारे भयपट पाहण्याचा प्रश्नच नव्हता. बरोबरची दोस्त- मंडळी पाहून यायची आणि माझ्या भित्रेपणाची चेष्टा  करायची. मी काही ते मनाला लावून घ्यायचो नाही, कारण  नसती वीरश्री दाखवण्याचा माझा स्वभावच नव्हता.

मुळातच  भित्रा आणि वर आईकडून ऐकलेल्या एकेक नामी भूतकथा! माझी हिंमतच व्हायची नाही. मी त्या वाटेला गेलोच नाही. हे  सर्व चित्रपट मी मोठेपणी पाहिले. आल्फ्रेड हिचकॉकचा ‘सायको’ तर मी किती तरी उशिरा पाहिला. ‘वह कौन थी’ पाहून आलेले लोक येता-जाता त्यातल्या  एकाच दृश्याबद्दल पुन:पुन्हा बोलायचे...

...मनोजकुमार एका निर्जन रस्त्याने गाडीतून जात  असतो... आणि अचानक त्याला रस्त्याच्या मध्येच उभी  असलेली पांढऱ्या साडीतील साधना दिसते... तो तिला  गाडीत घेतो... गाडी कबरस्तानाशी येताच ती गाडी  थांबवायला सांगते... एकटीच उतरते... चालू लागते... आणि फाटकाचं दार आपोआप उघडतं... इकडे मनोजकुमार  घाबरलेला... त्याचा चेहरा घामाने चिंब भिजलेला...

हे असं तपशीलवार वर्णन करणारा मित्र, आपोआप  उघडणाऱ्या त्या दाराचा ‘कर्र... कर्र...’ आवाजही काढायचा. रात्रीची वेळ, पांढऱ्या साडीतील बाई, कबरस्तान  आणि ते आपोआप उघडणारं दार... हे ऐकूनच माझी विकेट  गेलेली असायची आणि त्यावर सांगणाऱ्याचं हे ‘कर्र... कर्र...’ असा आवाज काढणं... झालंच! माझी काय बिशाद  असला सिनेमा पाहण्याची?.. आणि अशातच ‘भूत बंगला’ आला. कधी नव्हे ती माझी उत्सुकता बारीकशी चाळवली. मी दोस्तमंडळींना ‘भूत बंगला’ पाहणार, असं सांगून टाकलं. त्यांनी माझी पुन्हा चेष्टा केली.

 ‘‘येड्या, ॲडल्ट सिनेमा आहे तो.’’

काही चित्रपट फक्त प्रौढांसाठीच असतात, हे नुकतं-नुकतं  कळायला लागलं होतं. ‘बीस साल बाद’, ‘कोहरा’, ‘वह कौन थी’ हेही त्याच प्रकारचे होते. मग आमच्या दोस्तांनी कसे पाहिले? ‘‘तुला नाय कळणार...’’

असं मला ऐकवत एक-दोघांनी काय काय आयडिया  लढवल्या, त्याच्या कहाण्या सांगितल्या. किती खऱ्या-किती  खोट्या, त्यांचं त्यांना ठाऊक! एक कथा अशी की- तिकिटाच्या रांगेतल्या कुणा वयस्कर माणसाला तिकीट  काढायला सांगायचं, अर्थातच पिटातलं. पाच आण्याचं... आणि मग पठाण आत सोडतो तेव्हा जी झुंबड उडते, त्यात शिरायचं की झालं... किंवा मग कोळशाने मिशी रंगवायची... किंवा बिनधोक मार्ग म्हणजे तिकीट दाखवताना  डोअरकीपरच्या हातात दोन आणे कोंबायचे. मला हे सुचलंच नसतं; जमणं त्याहून अशक्य! परंतु ‘भूत बंगला’ पाहता  येईल, असा योग जुळून येत होता. माझा वर्गमित्र भरत हा जहांगीर टॉकीजला लागूनच  असलेल्या बैठ्या चाळीत राहात होता. टॉकीजचा एक  डोअरकीपरदेखील त्याच चाळीत राहायचा. भरतने  त्याच्याशी छान दोस्ती केली होती. हे सर्व त्याच्याच बोलण्यातून येई. भरत आमच्यापेक्षा  जास्त सिनेमे पहायचा, त्यामुळे तो सांगत असल्याप्रमाणे  डोअरकीपरशी असलेल्या दोस्तीमुळेच त्याला हे शक्य होत असावं, असं सगळं पटण्यासारखं होतं. 

मग आम्ही, ‘‘आम्हालाही ‘भूत बंगला’ दाखव.’’ अशी गळ घातली. तोही तयार झाला. ‘डोअरकीपरशी बोलतो’ म्हणाला. शाळा  भरताना आम्ही त्याला शोधत असायचो. तो कधीच शाळेत  वेळेवर यायचा नाही. त्याला जवळपास रोजच त्याबद्दल  शिक्षा व्हायची, परंतु त्याच्यात काही फरक पडायचा नाही. मी कधी तरी त्याला विचारलं की, हे असं रोज शिक्षा करून  घेण्यापेक्षा शाळेत वेळेवर का येत नाहीस? त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मीही परत कधी विचारलं नाही. खरं तर आम्ही  कुणीच त्याच्या जवळ जायचो नाही, कारण त्याच्या सर्वांगाला लसणाचा वास यायचा. तो लाडू खावा तसा मजेत  लसणाचा कांदा खात असायचा. त्याची आणखी एक आठवण आहे. अभ्यासात अगदी ‘ढ’च होता. एकदा  मास्तरांनी विचारलं,

 ‘‘दुधाला पूर्णान्न का म्हणतात?’’

...आणि इथे-तिथे पाहत भरतलाच नेमकं उभं केलं  आणि त्यानेही क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिलं,

‘‘कारण दुधात सर्व प्रकारचे जंतू असतात.’’

असा एकदा आणि शेवटचाच त्याचा ‘अभ्यास’  पाहायला  मिळाला. त्याचा हा नामी ‘ढ’पणा आणि अंगाचा लसूणगंध  यामुळे तो कुणाच्या खिजगणतीतच नसायचा... आणि आता  त्याला आमच्या लेखी महत्त्व प्राप्त झालं होतं!... कारण तो आम्हाला ‘भूत बंगला’ दाखवणार होता! ... आणि म्हणून आम्ही त्याची वाट पाहत होतो. कधी तरी तो वर्गात यायचा आणि मग मधली सुट्टी झाली रे झाली  की, आम्ही त्याला गाठायचो.

‘डोअरकीपरशी बोलणं झालंय. तो तुम्हाला सिनेमा दाखवायला तयार आहे. कधी, ते मात्र नंतर सांगेन- असं म्हणाला’, असं तो सांगायचा.

आम्ही  आपले रोज वाट पाहत राहायचो. एक दिवस मधल्या सुट्टीत  खुशीत येऊन म्हणाला,

 ‘‘आज रात्री नऊच्या शोला तो मला ‘भूत बंगला’  दाखवणार आहे.’’ ‘‘अरे, मग आमचं काय?’’ ‘‘तुम्हाला कसं येता येईल? मी टॉकीजजवळच राहतो.’’

हे मात्र खरंच होतं. रात्री नऊचा शो तसाही आम्हा शाळकरी पोरांना शक्य नव्हता आणि समजा- परवानगी मिळालीच, तर मग शो संपल्यानंतर आमच्या वळणावळणाच्या रस्त्याने घरी कसं यायचं...? आणि त्यातल्या एका वळणावर कोपऱ्यात बसलेलं ते भूत... शिवाय पुढच्या  वळणावरच्या खजुराच्या झाडावरची हडळ... बाप रे! मला  एरवी दिवसाढवळ्याही ही भुतं चक्क दिसायची... ‘भूत बंगला’ पाहून आल्यानंतर तर नक्कीच दिसतील...

‘‘ठीक आहे. आज मी पाहतो. पण तुम्हाला नक्की  दाखवणार एक दिवस.’’

दुसऱ्या दिवशी आम्ही ताणलेल्या उत्सुकतेने भरतची वाट  पाहिली. वर्ग भरेपर्यंत तो आलाच नाही. नेहमीप्रमाणे उशिरा  आला असेल. हेडमास्तरांच्या ऑफिसबाहेर ओणवा उभा  असेल. येईल काही वेळाने... आणि मग मधल्या सुट्टीत  त्याच्या तोंडून अख्खा ‘भूत बंगला’...! पण त्या दिवशी नेहमीसारखा शिक्षा भोगून तो आलाच  नाही- म्हणजे शाळेतच आला नाही. दुसऱ्या दिवशी वाट पाहिली. मग तिसरा दिवस उजाडला. पण तो आलाच  नाही... चौथ्या दिवशी कळलं, तो गेला...!

मागोमाग कळलं की, ते तीन-चार दिवस त्याला सडकून ताप भरला होता  आणि त्यातच तो गेला... एक मात्र आम्हाला गूढच  राहिलं... त्या रात्री त्याने ‘भूत बंगला’ पाहिला होता का..? पोरं बोलत होती. कुठल्या कुठल्या कथा ऐकवत होते. कुणी तरी भूत पाहिलं आणि त्याला ताप भरला अन्‌ त्यातच  तो गेला. मी जरी भित्रा होतो, भुता-खेतांच्या गोष्टींना  घाबरायचो; तरी या असल्या कथा त्या वयापासूनच  भाकडकथा वाटायच्या. तरीही ‘भूत बंगला’ पाहिला आणि  भरत गेला, यातला गूढ संबंध उलगडायचाच नाही... दोन भुतांचे हे दोन प्रताप... एक रामूवरचं देव आनंदचं भूत, तर दुसरं भूत बंगल्यातलं भूत...!                     

Tags: सायको. आल्फ्रेड हिचकॉक आओ ट्वीस्ट करो खोया खोया चांद कोहरा बीस साल बाद भूत बंगला दोन भूतं अशोक राणे सिनेमा पाहणारा माणूस Psycho Alfred Hitchcock Aao Twist Karo Khoya Khoya Chand Kohra Bees Sal Baad Bhoot Bangala Dev Anand Don Bhoot Ashok Rane Cinema Pahanara Manus weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके