डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी या तीन घरांतल्या लोकांच्या पाळतीवर असायचो. म्हणजे ती मंडळी कधी वाचतात, कधी त्यांचं वर्तमानपत्र  इथे-तिथे पडलेलं असतं. हळूहळू मला या वेळा नेमक्या कळायला लागल्या. मग थोडं सोप्पं झालं. कारण मला माझा  अभ्यास असायचा. माझा अभ्यास म्हणजे, उरकला एकदाचा  गृहपाठ असा नसायचा. सगळं मन लावून, मनापासून आणि  रोजचं रोज नीट समजून घेत. शिवाय तर्खडकरांचा स्वतंत्र अभ्यास असायचाच!  शिवाय रोजची कामं. आणि यातच मी  ही सारी वर्तमानपत्रं वाचायचो. नवसारीत मंगूभाई ‘तारू सू  काम छापामा’ असं झापायचे. इथे तसं कुणी करायचं नाही.  उलट हळूहळू चाळीतल्यांना मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे, हे जाणवायला लागलं.

सातवी झालो आणि नवसारी सुटली. मुंबईला आलो, कारण नवसारीतील मराठी शाळा  फक्त सातवीपर्यंतच होती. मुंबईत मुक्काम प्रभादेवीला नागू सयाजीच्या वाडीत थोरल्या  बहिणीकडे! दोन मजली चाळीत एकखणी घरांतून मुख्यत: गिरणी कामगारांचे संसार. त्यात  मुख्यत: कोकणातला मालवणी समाज, काही उत्तर प्रदेशची मंडळी आणि एखाद-दुसरं  मारवाडी कुटुंब! समोरच्या वाकड्या चाळीत घाटावरच्या लोकांचा भरणा. ते सगळे  सडेफटिंग. एकेका खोलीत दहा-पंधरा जण. त्यांचं एक वेगळंच जग. प्रथमच माझ्या नजरेस  पडलेलं. बाहेरून मुंबईत आलेल्याला हा पहिला धक्का असतो. ही मुंबईची पहिली ओळख असते! घर कसलं, खुराडंच म्हणावं अशा टीचभर जागेत ढीगभर माणसं! बहिणीकडेही हीच परिस्थिती. बहीण, मेहुणे, त्यांची तीन मुलं, मी आणि रिटायर्ड होऊन साताऱ्याला परत  गेलेल्या त्यांच्या एका स्नेह्यांचा मुलगा- किसन!  

माझी शाळा सकाळी सातची. आमच्या या ओरिएंट हायस्कूलमध्ये कधी काळी पु. ल. देशपांडे, सुनीताबाई शिक्षक होते. त्यांच्यानंतर कधी तरी सतीश दुभाषीही गणिताचे शिक्षक  होते. हे मला अर्थातच नंतर कळलं. एका ‘बड्या’ नावाचा संदर्भ आमच्या या शाळेला मी  तिथे होतो तेव्हाही होता. शाळेला लागूनच एक बंगलीवजा घर होतं. त्या घराच्या अंगणात  एक छोटा गोड दिसणारा मुलगा तिचाकी सायकल चालवताना दिसायचा. तो होता मा. सचिन!  खूप मुलं गर्दी करून आपल्याला वरून पाहताहेत हे लक्षात आलं की, तो सायकल तिथेच  टाकून घरात पळ काढायचा.  शाळेचा पत्ता माहिम, परंतु ती होती माटुंग्यालाच. जवळच एका बाजूला शिवाजी पार्क  आणि दुसऱ्या बाजूला टायकलवाडी. दोन्हीकडे अगदी परस्पर भिन्न वातावरण आणि अगदी  भिन्न संस्कृती! हेही अर्थातच नंतर लक्षात आलं.

या टायकलवाडीच्या कोपऱ्यावरच पुढे कधी  तरी बादल-बिजली-बरखा ही तीन एअरकन्डिशण्ड थिएटर्स आली. नागू सयाजीच्या वाडीतून निघून सैतान चौकीला गोखले रोडला यायचं आणि पोर्तुगीज  चर्च, हरी निवास (तेव्हा अलीकडच्या कोपऱ्यावर उजवीकडे कोहिनूर मिल आणि इराणी  होता. आता इराण्याच्या जागी सेनाभवन आणि कोहिनूरच्या जागी उभी राहत असलेली  टोलेजंग इमारत) ओलांडत राजा बढे चौकात उजवीकडे वळायचं. एक इमारत सोडून तिथेच आमची चार मजली शाळा. हे एवढं अंतर आठवी आणि नववी दोन वर्षं पायीच तुडवलं. बसमधून प्रवास केल्याचं आठवतच नाही. आठवीत सकाळी सातची शाळा. सहाला उठून कसबसं अंघोळ, चहा (चहाशी रात्रीच्या  चपात्या, क्वचित कधी पाव) उरकून धावतच शाळा गाठायचो. पाऊणला शाळा सुटली की  कडाक्याच्या भुकेने प्रेरित होऊन धावत-पळत घर गाठायचो.

जेवलो की लगेचच दुधाच्या  दोन बाटल्या असलेला क्रेट घेऊन वरळी गावात जायचो. अर्थातच चांगलं मैलभर चालत, दूध  केंद्रावरून दूध आणायला. ते एक वेगळंच जग असायचं. तिकडून आलो की जेमतेम थोडा  वेळ मिळायचा, त्यात माझं पेपर वगैरे वाचन. तेवढ्यात साडेतीन वाजायचे आणि ‘पाणी  इला, पाणी इला’ अशी आरोळी ठोकत कुणी तरी चाळीला वर्दी द्यायचा. सकाळपासूनची  कामंधामं आवरून नुकत्याच कुठे आडव्या झालेल्या आयाबाया अस्सल मालवणी शिव्या  घालीत, तरीही वीरश्री अंगात संचारल्यासारख्या उठायच्या आणि पाण्याची भांडीकुंडी घेऊन  घरात जो कुणी असेल त्याच्या नावाने शंख करीत तळमजल्यावरच्या सार्वजनिक नळाच्या  दिशेने धावत सुटायच्या. मीही दुसऱ्या मजल्यावरून हंडे, कळश्या घेऊन निघायचो. सोबत बहीण असायची. माझ्या बरोबरीचा भाचा आणि तिच्याकडे आश्रयाला राहिलेला मुलगा हे दुपारच्या शाळेत (त्याला दुपारचे अधिवेशन म्हटले जाई. मी सकाळच्या अधिवेशनाला! कसं  भारदस्त वाटायचं!), त्यामुळे ते फक्त शनिवार-रविवारीच असायचे.

सार्वजनिक नळावर जे काही नाट्य घडायचं, त्याचं वर्णन  त्या गिरणगावातच परिचयाच्या झालेल्या दोन शब्दांतच  करता येईल- किचाट आणि राडा! खांद्यावरून भरलेले हंडे दोन मजले चढवून-चढवून ओलंचिंब व्हायला व्हायचं.  नंबर-बिंबर लागून अख्ख्या चाळीला पाणी मिळेपर्यंत हे  पाणी भरणं चांगलं दोनेक तास चालायचं. मग कपडे बदलून चहा. चहाशी पाव किंवा खारी किंवा टोस्ट. चपाती तर  ठरलेलीच. हे झालं की माझं दप्तर घेऊन बोगद्यात!  चाळीच्या जिन्याशी बऱ्यापैकी ऐसपैस मोकळी जागा  असायची. घराच्या खुराड्यातून थोडी मोकळीक मिळावी  म्हणून ही जागा चाळकऱ्यांसाठी, तसेच पोरांना अभ्यास  करण्यासाठी, बरोबर मधोमध बल्ब टांगून कॅरम खेळण्यासाठी आणि रात्री तरुण पोरांना झोपण्यासाठी असायची. वास्तुरचनेचे विलक्षण असे असंख्य आविष्कार पुढे जगभर  पाहिले, परंतु त्याच्या खूप आधी या चाळींचा वास्तुरचनाकार नजरेत भरला.

तेव्हा वास्तुरचनाकार किंवा आर्किटेक्ट अशी  काही मंडळी असतात हे माहीतही नव्हतं, परंतु तरीही मी त्याला त्या वेळी दाद दिली. चाळी-चाळीतले हे बोगदे आणि  कॉमन गॅलऱ्या यांना चाळकऱ्यांच्या जगात खूपच महत्त्वाचं  स्थान होतं; आहे.  सिनेमा पाहणाऱ्या माझ्यातल्या माणसाची गोष्ट सांगताना  नेहमी नाही, परंतु मधूनच कधी तरी मी माझ्या आयुष्यातले  इतर काही तपशील सांगत असतो. कुणाला वाटेल याचा आणि या सिनेमा पाहणाऱ्या माणसाचा संबंध काय ? आहे.  तसा माझ्या एकूणच जगण्याचा आणि सिनेमा पाहत पाहत  इथवर केलेल्या प्रवासाचा संबंध आहे, परंतु तरीही मी  सगळंच सांगणार नाही. काही निवडक गोष्टी तेवढ्याच  सांगणार आहे. यात, आत्मकथेच्या अलिखित नियमाप्रमाणे  काही लपविण्यासाठी म्हणून नव्हे, तर माझ्यातल्या सिनेमा  पाहणाऱ्या माणसाच्या संदर्भात जेवढं महत्त्वाचं आणि  आवश्यक आहे, तेवढंच सांगणार आहे. आणखी एक गोष्ट या  टप्प्यावर स्पष्ट करावीशी वाटते की, मी मुळात आत्मचरित्र  लिहीतच नाहीय. मी लिहितोय माझ्यातल्या एका सिनेमा  पाहणाऱ्या माणसाची गोष्ट!

हवं तर ‘त्या’ माणसाचं  आत्मचरित्र म्हणा! आणखीही एक गोष्ट इथे नमूद करावीशी  वाटते;  आणि ती म्हणजे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ केवळ  सिनेमाबद्दलच बोलेल, असंही कुणी गृहीत धरू नये. कारण  सिनेमा पाहतानाच मी अगदी लहानपणापासून एका ओढीने, एक प्रकारचं कुतूहल जागवत नाटकंही पाहत होतो. वाचनवेडदेखील होतंच. जिरय्या स्वामींना चित्रं काढताना  पाहत होतो. निर्मिती-प्रक्रियेसंबंधी मुळापासून असलेलं  कुतूहल मला केवळ सिनेमाचंच नव्हे तर एकूणच कलांचं  अंतरंग समजून घ्यायला उपयोगी पडलं. शिवाय एकूण जगणं, सतत बदलत जाणारं भोवतालचं जग, भेटणारी माणसं यांतून  माझ्यातला सिनेमा पाहणारा माणूस बदलत, घडत गेलाय.  उदाहरणार्थ- मुंबईतल्या माझ्या सुरुवातीच्या दिवसांतला  तपशील! हे एवढ्या विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे, मी  तोवर म्हणजे सातवीपर्यंत नवसारीला असेपर्यंत पुढ्यातलं ताटही उचलायचो नाही आणि इथे आल्या-आल्या कामाला  लागलो- कसलीही तक्रार न करता. जणू मला अशा कामांची  मुळापासूनच सवय असावी आणि आवडही! परंतु तसं नव्हतंच. ‘विदिन नो टाइम’ म्हणतात, तसा मी हा बदल  चट्‌कन अंगी बाणवला.

हे सारं सांगताना पाहा मी कसा  प्रतिकूल परिस्थितीत वाढलोय, असा नगारा अजिबात  पिटायचा नाही मला. सिनेमा,  साहित्य,  नाटक आणि इतर  कलांचं, तसेच एकूणच जगण्याचं भान या परिस्थितीमुळेही  लाभलं हेच कुठे तरी नोंदायचं आहे. माझ्या फिल्म  ॲप्रिसिएशनच्या म्हणजेच चित्रपट रसास्वादाच्या  कार्यशाळेच्या सविस्तर टिपणाचा शेवट मी एका ओळीने  केलाय, तो याच साऱ्या जडणघडणीचा भाग आहे. ती ओळ  आहे- ‘अंडरस्टँडिंग सिनेमा इज अंडरस्टँडिंग लाईफ’!  ...तर मुंबईला आलो आणि एक वेगळंच जग समोर  आलं. ‘क्षितिज रुंदावलं’ ही आजची भाषा झाली, परंतु  मामला असाच होता. या नव्या जगात माझं मुळातलं कुतूहल  घेऊन मी सहजपणे मिसळूनही गेलो. आठवी-नववी अशी दोनच वर्षं मुंबईत होतो. त्यादरम्यान फारच थोडे चित्रपट पाहिले- ‘किस्मत’, ‘भारतमाता’ आणि ‘प्लाझा’  याच तीन थिएटर्समध्ये!

एकदाच फक्त थोरल्या  भावाबरोबर रीगलला गेलो. तिथे ‘इट्‌स मॅड मॅड मॅड वर्ल्ड’  पाहिला. फोर्टमध्ये जाऊन इंग्रजी सिनेमा पाहायचा म्हणजे  काय थाट वाटायचा. नवसारीला सातवीपर्यंत इंग्रजी नव्हतं  आणि इथे मुंबईत आठवीत ‘कॉम्प्लेक्स सेन्टेन्स’, ‘कपाऊंड  सेन्टेन्स’, ‘डायरेक्ट-इनडायरेक्ट स्पीच’ असं घनघोर इंग्रजी!  माझी बोंबच सगळी! मी तर्खडकरांच्या पुस्तकांच्या आधाराने  शाळेतल्या इंग्रजीच्या तासाला तगून राहण्याचा प्रयत्न  करायचो. तर अशा अवस्थेत मला ते ‘मॅड वर्ल्ड’ काय  कळणार ? परंतु भरपूर ॲक्शन असल्यामुळे मी तो एन्जॉय  केला. घरापासून दूर, तेही टॅक्सीने आणि थेट फोर्टात जाऊन  सिनेमा पाहणे, हा अनुभव मात्र थोर होता.

नवसारी इतक्या  सातत्याने सिनेमे जरी पाहायला मिळाले नाहीत, तरी  वाचनाच्या बाबतीतली माझी उपासमार संपली होती. मी  अधाशासारखं वाचत सुटलो होतो. मुख्यत: वर्तमानपत्रंच;  मग काही मासिकं आणि पुस्तकं. आमच्या घरी ‘नवशक्ती’  यायचा. डावीकडच्या दोन घरांत  अनुक्रमे ‘मराठा’ आणि ‘लोकसत्ता’ ... आणि चाळीतल्या  सर्वांत भांडखोर, राडेबाज घरात ‘महाराष्ट्र टाइम्स’!  मला  जसजशी या सर्व वर्तमानपत्रांची प्रकृती आणि स्वतंत्र ओळख  व्हायला लागली तसतशी त्याची अधिकच गंमत वाटू लागली. असो.

मी या तीन घरांतल्या लोकांच्या पाळतीवर असायचो. म्हणजे ती मंडळी कधी वाचतात, कधी त्यांचं वर्तमानपत्र  इथे-तिथे पडलेलं असतं. हळूहळू मला या वेळा नेमक्या कळायला लागल्या. मग थोडं सोप्पं झालं. कारण मला माझा  अभ्यास असायचा. माझा अभ्यास म्हणजे, उरकला एकदाचा  गृहपाठ असा नसायचा. सगळं मन लावून, मनापासून आणि  रोजचं रोज नीट समजून घेत. शिवाय तर्खडकरांचा स्वतंत्र अभ्यास असायचाच!  शिवाय रोजची कामं. आणि यातच मी  ही सारी वर्तमानपत्रं वाचायचो. नवसारीत मंगूभाई ‘तारू सू  काम छापामा’ असं झापायचे. इथे तसं कुणी करायचं नाही.  उलट हळूहळू चाळीतल्यांना मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे, हे जाणवायला लागलं. माझं वाचन त्यामुळे व्यवस्थित चालू  राहिलं. बातम्या वाचणं, काही लेख वाचणं- असं माझं वाचन  असायचं. अग्रलेख वगैरे वाचल्याचं आठवत नाही. त्या वेळी आजच्यासारख्या सिनेमा, मनोरंजन अशा साप्ताहिक पुरवण्या  नसायच्या. असा सारा मजकूर रविवारच्या पुरवणीतच  यायचा. खोटं वाटेल, परंतु सिनेमाची एवढी आवड असूनसुद्धा मी सिनेमाविषयक सगळा मजकूर वाचायचो नाही. एक तर तेवढा वेळ नसायचा आणि मला इतरही काही  वाचायचं असायचं. त्यामुळे अग्रक्रम ठरवून वाचायचो.

दुसरं  म्हणजे, सिनेमाविषयक सगळाच मजकूर मला तेव्हाही  संपूर्णपणे वाचावा असा कधी वाटला नाही. त्या वेळी  लिहिणाऱ्या काहींच्या मी पुढे संपर्कात आलो, त्यांच्या बरोबरीने वावरलो;  परंतु तेव्हाही या मंडळींचं चित्रपटविषयक  लेखन मला फारसं आवडलं नाही. ‘मराठा’त संपूर्णत: अत्र्यांचं राज्य होतं. त्यात सतत कंसात  ‘हशा’, ‘टाळ्या’ असं असायचं. त्याची गंमत वाटायची. ‘नवशक्ती’त काही चांगले लेख असायचे. ‘लोकसत्ता’ही बरा  असायचा. परंतु मला जास्त आवडायचा- ‘महाराष्ट्र टाइम्स’!

त्यात महाराष्ट्राबाहेरचं, देशाबाहेरचं काही वाचायला  मिळायचं. भूगोल माझा आवडता विषय होता. त्यामुळे पृथ्वीवरचे विविध देश मला चांगलेच माहीत होते. ‘मटा’मुळे तिकडच्या अनेक गोष्टी कळायला मदत झाली. मुख्यत: तिकडचं जग ‘दिसायला’ लागलं. मराठी साहित्य, नाटक, संगीत यासंबंधी वाचता-वाचताच रशियात बोरिस पास्तरनाक नावाचा लेखक आहे आणि त्याची ‘डॉ. झिवॅगो’ ही कादंबरी खूप गाजलेली आहे, हेही कळलं. ‘नवा काळ’मध्ये कामगारजगताच्या खूप बातम्या  असायच्या. आमच्या चाळीत तळमजल्यावर लाल  बावट्याचं ऑफिस होतं. आमची ही बोटावाला चाळ आणि  समोरची पोस्टाची चाळ म्हणजे लाल बावट्याचा अड्डाच!  पूर्वी डांगेही इथे काही काळ राहिले होते. ‘नवा काळ’मध्ये  गिरणी कामगारांचं हलाखीचं जिणं, पगारवाढ- बोनससाठी  आंदोलनं, संप आणि अखेरीस अगदी दिवाळीच्या तोंडावर  सहा-आठ टक्के बोनस... असा सारा मजकूर असायचा. बोनस जाहीर होईपर्यंत उधार-उसनवार करून, रेशनच्या  रांगेत तासन्‌तास उभं राहून मिळविलेल्या आणि जादा दाम  मोजून वाण्याकडून आणलेल्या जिनसांसह दिवाळीचा फराळ  बहुतेक घराघरांतून तयार होत असलेला असायचा.

हे सारं मी  डोळ्याने पाहत होतो. अनुभवत होतो. त्यामुळे मी ‘नवा काळ’ कधी फारसा वाचायचो नाही. ‘नवा काळ’मध्ये रोजच ‘लोकलखाली दोन ठार किंवा  चार ठार’ अशी बातमी आवर्जून असायची. आणखी काही खळबळजनक बातम्याही असायच्या. मला आठवतं... एकदा वरळी गावातून पेपरची लाईन टाकणाऱ्या बहिणीच्या दिराचे उरलेले पेपर मी आणि माझा भाचा घरी घेऊन येताना ‘नवा काळ’मधील ‘बायकोने नवऱ्याचे कान कापले’  हा  बातमीचा मथळा जोरजोरात ओरडत हातातले पेपर  झेंड्यासारखे फडकावत आलो होतो... आणि गंमत म्हणजे,  तीन अंकदेखील विकले गेले. एक अंक एक आण्याचा!

Tags: इट्‌स मॅड मॅड मॅड वर्ल्ड’ मुंबई... एक नवे जग..! जिरय्या स्वामी मराठा नवाकाळ मटा लोकसत्ता अशोक राणे सिनेमा पाहणारा माणूस Jirayya Swami It’s Mad Mad Mad World Maratha Navakal Mata Lokstta Mumbai… Ek Nave Jag…! Ashok Rane Cinema Pahnara Manus weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके