डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकदा ‘मोती’ला राजेश खन्नाचा ‘सच्चा झूठा’ पहायला गेलो. सहाचा शो. नऊला जेमतेम थिएटरमधून बाहेर पडतो तोच अचानक दंगल उसळली. इथून-तिथून सोडावॉटरच्या बाटल्या, ट्यूबलाइट्‌स, दगडांचा मारा सुरू झाला. भयानक राडा. मी जाम घाबरलो. लोक सैरावैरा पळत कुठे-कुठे आडोसा गाठत होते. मीही जीव खाऊन धावत सुटलो. माझ्या पुढचे काही लोक एका इराण्याच्या हॉटेलात शिरले. मीही धावलो. आम्ही आत शिरता-शिरता इराण्याने शटर खाली ओढलं. कसाबसा आत आलो. घामाने डबडबलो होतो. प्रचंड घाबरलो होतो. मुंबईतले राडे याआधीही पाहिले होते. शिवसेनेने 1969 मध्ये घडवून आणलेल्या राड्यात मी मुंबईत अडकून पडलो होतो. पण इथे तर मी राइट ॲट द सेंटर ऑफ द ॲक्शन...! बाहेर घमासान राडा चालला होता. थोड्या वेळाने सायरन वाजवीत पोलिसांच्या व्हॅन्स आल्या. पोलिसांच्या बुटांचे आवाज ऐकून सुरक्षित वाटलं. हळूहळू बाहेर शांतता पसरली.

सी.एस.टी.च्या चाळीतून सांताक्रूझला वाकोला ब्रिजजवळच्या चाळीत राहायला आलो आणि एक वेगळंच जग समोर आलं. हे होतं झोपडपट्टीचं जग! कमरेएवढी सिमेंटची भिंत आणि त्यात खोवलेले पत्रे. छतही पत्र्याचं. उन्हाळ्यात कमालीचे हाल व्हायचे. पावसाळ्यात आणखीनच वेगळे. गळक्या छताखाली जागोजाग पातेली ठेवून जागा करून झोपायचं. खूपच पाऊस आला, तर घरातच पाणी. मग रात्रभर पाणी उपसा. घाण, दुर्गंधी तर बघायलाच नको. असो. यह भी एक दुनिया है. देख ली. सिर्फ देखी नहीं, जी भी ली... 

या साचलेल्या पाण्यावरून आठवलं. दर पावसाळ्यात दोन-तीनदा तरी अख्खी मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईच्या बराचशा सखोल भागात इतकं पाणी साचतं की, मुंबई हे नदी-तळ्यांचं शहर आहे, असं वाटावं. रेल्वे-लाइनची अशीच तळी होतात. गाड्या जागच्या जागी. एका पावसाळ्यात पावसाने असंच थैमान मांडलं होतं. घनघोर पावसात मुंबईचं काय होतं, हे मुंबईकरांना माहीत असूनही मुंबईकर रस्त्यावरचं पाणी तुडवत स्टेशन गाठतात. मीही असाच स्टेशनात पोचलो. गाड्या अनियमित वेळेवर रडत-रखडत चालल्या होत्या. आमचं टोळकं कसंबसं एका गाडीत चढलं. प्रचंड रेटारेटी. मजल-दरमजल करीत गाडी तासाभराने दोन स्टेशनं पुढे आली. वांद्रे स्थानकाच्या अलीकडेच किती तरी वेळ उभी राहिली. या गतीनं ही चर्चगेटला पोचणार कशी आणि कधी? म्हणून मग आमच्या टोळक्याने निर्णय घेतला की, इथेच उतरायचं. कुठलं तरी थिएटर गाठायचं. पिक्चरला बसायचं. सर्वांनी रुळांतच उड्या मारल्या. सर्वत्र पाणीच पाणी. वाट काढीत आम्ही बांद्रा टॉकीज गाठलं. साडेअकराचा शो होता. अप्पर स्टॉल, बाल्कनी तेवढ्या घनघोर पावसातही फुल्ल! सिनेमा की जय हो! लोअर स्टॉलची तिकिटं होती. 

‘‘तिकिट देगा लेकिन अंदर पानी भरा है.’’ खिडकीतला माणूस म्हणाला. 

आम्ही आधीच चिंब भिजलो होतो. आम्हाला आता कसलं पाण्याचं भय? मेलेल्याला कसलं मृत्यूचं भय म्हणतात, तसं! तिकिटं घेतली. आत गेलो. सिनेमा नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे पडद्याकडे पाहतच आम्ही पाण्यातून चालत राहिलो. लोअर स्टॉलमधल्या आमच्या खुर्च्यांवर बसलो- मांडी घालून. कारण खाली पाणीच पाणी... थेट अगदी खुर्चीच्या लेव्हलपर्यंत! पडद्यावरून ऐकू येणाऱ्या आवाजात लोअर स्टॉलमधल्या डुचमळणाऱ्या पाण्याचा ‘डुबुक्‌ डुबुक्‌’ आवाज मिसळत होता. कुठल्या-कुठल्या घाण पाण्यातून चालत आल्यामुळे सभोवतालच्या दुर्गंधीचं काहीच वाटत नव्हतं. त्यात समोर मस्त सिनेमा चालू होता... ‘कारवाँ’!

आजही देशात, परदेशात राजेशाही थाटात सिनेमा पाहताना मधेच मला या प्रसंगाची आठवण येते आणि मी पायाखाली पाणी किती साचलंय ते पाहून घेतो आणि मग स्वत:शीच हसतो. अकरावीतला शेवटचा तास घेणाऱ्या शेळकेसरांनी ‘उघड्या’ जगाबद्दल जे सांगितलं होतं, ते सी.एस.टी.च्या चाळीत राहत होतो तेव्हापासूनच समोर दिसायला लागलं होतं. पी.डीमेलो रोडवरची मुंबई वेगळी. हा रस्ता गोदीला लागूनच. समांतर आणि ऐसपैस. मोठमोठाल्या ट्रक्सची सतत ये-जा असायची. क्वचित बस किंवा एखादं खासगी वाहन. हा रस्ता मालवाहतुकीचा- मुंबई हे बंदर आहे याची साक्ष पटविणारा! त्याची एक खास अशी शान होती. अलीकडे ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हलला हंगेरीचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक इस्तवान झाबो आले होते, तेव्हा बऱ्याच वर्षांनी या रस्त्याने प्रवास केला. खरं तर करावा लागला- ड्रायव्हरच्या मूर्खपणामुळे! 

कुठून कसं जायचं, हे त्या ड्रायव्हरला सांगून मी झाबो आणि त्यांचे फ्रेंच निर्माते इव्ह पास्कॅर यांच्याशी बोलण्यात गुंतलो. आमच्या छान गप्पा झाल्या. मग झाबो म्हणाले, ‘‘आपण आपापल्या भाषेतलं एकेक गाणं म्हणू या.’’ त्यांच्या हंगेरियन, फ्रेंच गाण्यानंतर मी ‘सुरवंता’ या चित्रपटातलं ‘शेजी सायीले बाई गं थोर नवलाव झाला’ म्हटलं. गाता-गाता माझं बाहेर लक्ष गेलं... तर आम्ही भलत्याच रस्त्याने चाललोय, हे माझ्या लक्षात आलं. गाण्यातला नवलाव घशातच अडकला. रस्त्याच्या दोन्ही कडेला दाट, गिचमिड झोपडपट्टी. ती फुटपाथवरून थेट रस्त्यावर ओसंडतेय. सर्वत्र घाणीचं, दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं. उघड्या-नागड्या माणसांचाही खच. गाडीचा वेग कमी झालेला. एरवी गाडीच्या एका वेगात झर्रकन नजरेसमोरून गेलं असतं ते आता स्लो मोशनमध्ये तपशीलवार दिसत होतं. मी जवळपास ओरडलोच, 

‘‘अरे, कुठून आणलीस गाडी?’’ 

‘‘साहेब, हा पी.डीमेलो रोड. शॉर्टकट आहे, फोर्टमध्ये जायला.’’ 

मी कपाळावर हात मारून घेतला. भोवतालचा नरक पाहण्यापलीकडे मी काहीही करू शकत नव्हतो. मला दोन धक्के बसले होते. एक- या परदेशी पाहुण्यांना मी अशा घाणीतून घेऊन चाललो होतो आणि दुसरं म्हणजे... हा पी.डीमेलो रोड आहे, की ही धारावीची झोपडपट्टी! ऐकून होतो की पी.डीमेलो रोडवर बांगलादेशी निर्वासितांनी वस्ती उभी केलीय, ती त्या दिवशी पाहिली. मुंबईचं कसं भलं थोरलं गटार झालंय, हेही लक्षात आलं. मी अस्वस्थ झालो. हळूच झाबोंकडे पाहिलं. त्यांची अवस्था माझ्यापेक्षा बिकट होती. ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. 

या पी.डीमेलो रोडवरून मी चालत-चालत रे रोडपर्यंत यायचो. माझं चालणं हा एक वेगळाच विषय आहे. इकडे असा रे रोडपर्यंत तर तिकडे थेट कुलाब्याच्या दांडीपर्यंत! तिथे कुलाब्याची पण दोन रूपं- एक श्रीमंत मुंबई, तर दुसरी सर्वसामान्यांची मुंबई! समुद्राला लागून कोळ्यांची केवढी तरी मोठ्ठी वस्ती. कुलाब्यातल्या गल्ली- बोळांतूनही हिंडलोय. मग इकडे गिरगाव म्हणजे अवघी मराठी मुंबई. तिच्या एका बाजूला सी.पी.टँक म्हणजे गुजरात! त्याच्या पलीकडे डोंगरी, भेंडीबाजार म्हणजे ‘मिनी पाकिस्तान’! खाली सरकलं की रेड लाइट एरिया! खिशात पैसा नसायचा आणि हाताशी वेळच वेळ! त्यामुळे मी एकेक दिशा पकडीत हे असं मुंबईदर्शन करायचो. असाच एकदा पाठ झालेल्या सी.एस.टी. ते जे.जे.हॉस्पिटल व्हाया भेंडीबाजार जात असताना डावीकडे गोल देवळाकडे वळलो. तिथे असलेल्या दोन थिएटर्सचा शोध लागला. ‘अलंकार’ आणि ‘मोती’. तिथून सरळ न जाता उजवीकडे वळलो. काही अंतर चाललो. मी आपला माझ्याच नादात चाललेला आणि इथून-तिथून ‘श्युक... श्युक...’ कानावर आलं. मागोमाग, ‘ए हीरो... ए चिकने...’. मी सभोवताली पाहिलं. मुंबईत ‘अशीही’ वस्ती होती, हे ऐकून होतो; परंतु त्या दिवशी माझ्या मुंबईदर्शनात मी थेट तिथेच येऊन पोचलो होतो... गोलपिठ्यात! मी वळलो आणि पळतच सुटलो. त्यानंतर मी गोल देवळापर्यंत जायचो. ‘अलंकार’ आणि ‘मोती’मध्ये सिनेमे पाहायला; परंतु तिथवरच! 

एकदा ‘मोती’ला राजेश खन्नाचा ‘सच्चा झूठा’ पहायला गेलो. सहाचा शो. नऊला जेमतेम थिएटरमधून बाहेर पडतो तोच अचानक दंगल उसळली. इथून-तिथून सोडावॉटरच्या बाटल्या, ट्यूबलाइट्‌स, दगडांचा मारा सुरू झाला. भयानक राडा. मी जाम घाबरलो. लोक सैरावैरा पळत कुठे-कुठे आडोसा गाठत होते. मीही जीव खाऊन धावत सुटलो. माझ्या पुढचे काही लोक एका इराण्याच्या हॉटेलात शिरले. मीही धावलो. आम्ही आत शिरता-शिरता इराण्याने शटर खाली ओढलं. कसाबसा आत आलो. घामाने डबडबलो होतो. प्रचंड घाबरलो होतो. मुंबईतले राडे याआधीही पाहिले होते. शिवसेनेने 1969 मध्ये घडवून आणलेल्या राड्यात मी मुंबईत अडकून पडलो होतो. पण इथे तर मी राइट ॲट द सेंटर ऑफ द ॲक्शन...! बाहेर घमासान राडा चालला होता. थोड्या वेळाने सायरन वाजवीत पोलिसांच्या व्हॅन्स आल्या. पोलिसांच्या बुटांचे आवाज ऐकून सुरक्षित वाटलं. हळूहळू बाहेर शांतता पसरली. इराण्याने शटर बारीकसं वर करून वाकून बाहेर पाहिलं. मग शटर पूर्ण उघडीत म्हणाला, 

‘‘चलो जाव... राडा खतम... भागो...’’ 

आम्ही अंदाज घेत दबकत-दबकतच बाहेर आलो. वातावरण निवळलं होतं, तरी एक प्रकारचा ताण होताच. मला सी.एस.टी.ला जाणारी 130 नंबरची बस येताना दिसली. मी तिच्या मागून धावत सुटलो. अचानक कुणी तरी माझं बखोटं धरलं आणि खाड्‌कन माझ्या मुस्काटीत ठेवून दिली. ‘‘भागता काय कू बे साले...?’’ मी तोंडातल्या तोंडात ‘नय... नय...’ बोलत राहिलो. क्षणभरच त्याच्याकडे पाहिलं. दहा-बारा वर्षांचा पोरगा होता. मी मग न धावता भराभर चाललो आणि मागे वळून पाहिलं- तो कुठेच दिसला नाही तसा परत धावत सुटलो. बस गाठली. घर गाठलं. असो. 

तर सांगत होतो- माझं चालणं आणि मुंबई- दर्शनबद्दल! कुलाबा ते अंधेरी आणि इकडे कुलाबा ते सायन मी गल्ली-बोळ पालथा घातलाय. त्यापलीकडची मुंबई अगदी गल्ली-बोळ पार करत पाहिली नसली तरी बऱ्यापैकी पाहिली. अर्थातच चालत. हिंडण्या-फिरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचा कधी कधी रागही यायचा. परंतु पदरात जे पडायचं, त्याने बरंही वाटायचं. पायी फिरून जे जग दिसतं ते वाहनातून दिसत नाही, दिसणार नाही हेही लक्षात आलं. त्यामुळे पुढे परिस्थिती सुधारल्यावरदेखील चालायची सवय काही सुटली नाही. पन्नाशीनंतर फक्त प्रमाण कमी झालं. मुंबईत त्या काळी चाललो ते पैसे नव्हते म्हणून, पुढे परदेशात पैसे वाचविण्यासाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिकडचं जग पाहण्यासाठी खूप चाललो. एकदा न्यूयॉर्कमध्ये क्वीन्स ते डाऊन टाऊन चालत आलो. नंतरही अनेक वेळा चाललो. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, बर्लिन आणि काही प्रमाणात ॲमस्टरडॅममधून मी तुम्हाला गल्ली-बोळांतून फिरवून आणू शकतो. अशी ही माझी आयुष्यभराची पायपीट आहे. 

त्या वेळच्या मुंबईची, तिच्या एकेका इलाख्याची स्वत:ची अशी खास ओळख होती. आज आमच्या पिढीला ती मुंबई हरवल्याची खंत आहे. आजच्या तथाकथित श्रीमंत मुंबईत... शांघाय व्हायला निघालेल्या मुंबईत आमची अवस्था... आहे मनोहर तरी गमते उदास... अशी झाली आहे... सांताक्रूझला राहायला येईपर्यंत पायपीट करीत अशी मुंबई पाहत आलो होतो, आता तिचा काही प्रमाणात अनुभव घ्यायचा होता. दहा बाय दहासुद्धा मोठी जागा वाटावी, अशा छोट्या जागेत तरण्या पोरांनी रात्री उशिरा घरी फक्त झोपायलाच यायचं, असा एक अलिखित नियम या अशा वस्तीत असतो. मधल्या वेळात अंघोळ, खाण्या-पिण्याच्या वेळा एवढ्यापुरतंच घर. बाकी सारा वेळ घराबाहेर. 

बाहेरचं जग म्हणजे मग खऱ्या अर्थाने उकिरडा. तिथे त्याच लायकीचे मित्र भेटणार. मलाही असे मित्र भेटले. काही, अगदी एका हाताच्याच बोटांवर मोजण्याइतके बरेही मित्र भेटले. बरे-वाईट, कसे का असेनात; मित्र हवेच असायचे. एक तर अडनिडं वय आणि घरात जागा नाही. एक चोर मित्र होता, असं याआधी सांगितलंय. तो याच वस्तीतला. सुमन, अनिल ही राडेबाज पोरं. या सुमनबरोबर एकदा गरबा खेळण्यासाठी आम्ही कालिनाला गेलो. अचानक कुठून तरी पाच-सात पोरं हातात हॉकी स्टिक्स, सायकलच्या चेन्स वगैरे घेऊन आली आणि त्यांनी आम्हाला घेरलं. माझी तर दातखीळच बसली. आम्ही एकमेकाला खेटून जीव मुठीत घेऊन उभे होतो. मी आणि एक-दोघे सोडले तर बाकीची आमची गँग पण राडेबाज. कालिनाच्या पोरांनी आम्हाला हे असं शस्त्रसज्ज होऊन घेरल्यानंतर मिनिट-दोन मिनिटांचाच वेळ गेला असेल. परंतु त्या वेळी ती दोन मिनिटंही खूप मोठी वाटली. 

सुमनने त्याच्या पद्धतीने अंदाज घेतला... आणि तो जोरात ओरडला... ‘‘हर हर महादेव... भागो...’’ आणि आम्ही दिसेल त्या दिशेने धावत सुटलो. कोण कुठे गेलं, काही कळलं नाही. मी मात्र एकदाही मागे वळून न बघता धावत सुटलो. आता जिथे कालिनाला मुंबई विद्यापीठ आहे तिथे त्या काळी अस्ताव्यस्त पसरलेलं खाचर होतं. सर्वत्र मिट्ट काळोख... आणि मी धावत होतो. भीतीमुळे सतत वाटत होतं की, माझ्यामागे त्या गुंडांपैकी कुणी तरी आहे. प्रत्यक्षात कुणीच नव्हतं. कारण त्यांचं लक्ष्य सुमन होतं. दुसऱ्या दिवशी भेटलो तेव्हा कळलं की, कुणालाच मार बसला नाही. मिशन पलायन सक्सेसफुल झालं होतं. मी कानाला खडा लावला- सुमन आणि गँगपासून दूर राहायचं. पण एक गोष्ट आठवणीने विचारलीच, ‘‘ही ‘हर हर महादेव’ची भानगड काय रे?’’ तो खळखळून हसला. हसताना गोड दिसायचा. गालावर छान खळी पडायची त्याच्या. चांगला गोरागोमटा, अगदी देखणा म्हणावा असा होता. ‘‘अरे सोन्या, ‘हर हर महादेव’ म्हणतच मराठे कायम हरले. काल आपल्यालाही हरायचंच होतं-’’ बोलता-बोलता थांबला. ही एक त्याची नेहमीची सवय. अर्धं बोलायचं आणि मग समोरच्याची प्रतिक्रिया अजमावीत उरलेलं बोलायचं. ‘‘ते सोड. ‘हर हर महादेव’ म्हटलं की, कालिन्याची क्रिस्तावांची गँग सॉलिड टरकते. त्याचा फायदा घेऊन आपण सटकलो.’’ या पोरांबरोबर असे एकेक उद्योग त्या काळात मी केले की, इतर कोणाचं सोडा; मीसुद्धा विेशास ठेवणार नाही. 

एक जण तारेचा वापर करून गाड्या सुरू करायचा आणि आम्ही मध्यरात्रीनंतर त्या गाड्या घेऊन जुहूला मनसोक्त मजा करायचो. आंटीकडे जाऊन पहिल्या धारेच्या मालाचा ग्लास एका दमात मोकळा करायचो. ग्लास खाली ठेवून समोरच्या बशीतल्या मिठात करंगळीजवळचं बोट टेकवून ते जिभेवर लावायचो. अस्सल दारूबाजपणा. मी हे सारं या दोस्त-मंडळींबरोबर करत होतो, परंतु मनापासून नव्हतोच त्यात. थोडासा संगतीचा परिणाम; बस्स! सुमनला आणि त्या अनिलदादालाही कळायचं हे. ते खिदळत म्हणायचे, ‘‘गाव करतं म्हणून आपण नाय करायचं.’’ मलाही ते नकोच असायचं. माझं सिनेमे, नाटकं पाहणं चाललंच होतं. वाचनही होतं. पण ते सगळं माझ्यापुरतं... माझ्याजवळ! 

एक दिवस मी वस्तीतल्या रस्त्याने चाललो होतो. पोरं व्हॉलीबॉल खेळत होती. सुमनही होता. त्याने मला पाहिलं. हातातला बॉल टाकला आणि तडक माझ्याकडे आला. माझा हात धरून मला ओढत नेऊ लागला. ‘‘अरे, कुठे नेतो आहेस मला...?’’ तो काही बोलला नाही. गालावरची खळी उमटवत हसत राहिला. दोन चाळींच्या मधल्या वाटेने एका उघड्या घराशी घेऊन आला. आत एक आमच्याच वयाचा तरुण पुस्तक वाचीत बसला होता. सुमनने मला जवळपास आत ढकललं. स्वत: दाराशीच उभा राहिला. मला म्हणाला, ‘‘हा एक तुझ्यासारखा भोटमामा... पुस्तकं वाचणारा... बसा दोघं वाचत... आणि आय घाला...’’ तो वळून निघून गेला. मी त्या भोटमामाकडे पाहत राहिलो. तोही माझ्याकडे पाहत होता. 

Tags: थिएटर शिवसेना मुंबईदर्शन इस्तवान झाबो मामि फिल्म फेस्टिव्हल सिनेमा झोपडपट्टी सांताक्रूझ सी.एस.टी. मुंबई अशोक राणे ॲट द सेंटर ऑफ द ॲक्शन सिनेमा पाहणारा माणूस Theatre Shivsena Mumbai Darshan Istvan Szabo MAMI Film Festival Cinema Slum Santacuz CST Mumbai Ashok Rane At the center of action Cinema Pahnara Manus weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके