डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला डाळवडा खूपच आवडायचा. मात्र मला तो क्वचितच परवडे. दोस्तमंडळींना हे माहीत होतं. त्यामुळे त्यांची प्रेमपत्रं लिहून घ्यायला ते मला डाळवड्याचं आमिष दाखवीत. एखाद्या प्रेमवीराला माझं प्रेमपत्र खूपच आवडलं, तर तो दोन डाळवडे खाऊ घाली. माझी चैन असे. परंतु अंदरकी बात कुणालाच माहीत नव्हती. मला स्वत:ला ती प्रेमपत्रं लिहिणं खूप आवडत असे. प्रत्येक प्रेमवीरागणिक म्हणजेच त्याच्या-त्याच्या प्रेमभावनेनुसार मला वेगवेगळा मजकूर लिहिता येई. विविध उपमा मला वापरता येत. माझ्या प्रतिभेला अशा वेळी धुमारे फुटत.  

आमच्या लहानपणी रडवे चित्रपट मोठ्या संख्येने यायचे आणि मग कुठल्या रडव्या सिनेमात आपण किती रडलो, हे सांगण्याची आमच्यात चढाओढ लागायची. माझ्यापुरतं सांगायचं तर ‘बेटी बेटे’ आणि ‘तू सुखी रहा’ पाहून मी आठ दिवस रडलो होतो. जो चित्रपट पाहून खूप दिवस रडलो, तो अर्थातच चांगला चित्रपट- अशी एक धारणा, समजूत तयार झाली होती. त्या अर्थाने माझ्या लेखी हे उत्तम चित्रपट!

आमच्या शेजारी एक कानडी कुटुंब होतं. त्यांची प्रभावती नावाची मुलगी माझ्याच वयाची आणि माझ्याच वर्गात होती. ती या रडव्या चित्रपटांबद्दल बोलताना भलतीच रडवी होऊन जायची. तिच्या बोलण्यात एक शब्द सातत्याने यायचा- ‘पापबिच्चारा’! त्या अमुक-तमुक पापबिच्चाऱ्यावर कसला प्रसंग कोसळला आणि तो पापबिच्चारा कसा रडवेला झाला, हे सांगताना ती स्वत:च रडवेली व्हायची. प्रभावती आणि इतर मित्रमंडळी अशा भावविभोर, रडव्या चित्रपटांच्या भलत्याच प्रेमात असायची. मलाही ते आवडायचे, पण मला इतरही सिनेमे आवडायचे. ‘बेटी बेटे’ मला जितका आवडला, त्याच ओढीने मी दारासिंग- मुमताजचा ‘लुटेरा’ पाहिला. परंतु, एकूणच चित्रपट पाहून दु:खाचा उत्सव करावा आणि तो इतरांच्या नजरेसदेखील आणावा- असा तो सारा प्रकार होता. भावुकपणाचं असं जाहीर प्रदर्शन करायला आम्हाला खूप आवडायचं... आणि आम्हाला ते करायला लावायचा अवती-भवतीचा सिनेमा!

शिवाय प्रत्येकाचे आवडते नट-नट्या असत. आपापल्या आवडत्या नट-नट्यांचे चित्रपट पाहायचा सर्वांना भलताच उत्साह असायचा. पण इथे पुन्हा माझी वाट वेगळी. म्हणजे माझेही तसे कुणी ना कुणी आवडते होतेच. उदाहरणार्थ- दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद हे सर्वाधिक लोकप्रिय असलेले हीरो मलाही आवडायचे. शिवाय राजकुमार आवडायचा. त्याची ती सुप्रसिद्ध डायलॉगबाजी, त्याचं ते स्टायलिश चालणं, त्याचे ते पांढरे बूट, गळ्याभोवती भिरकावून दिल्यासारखा टाकलेला मफलर... यामुळे तो विशेष नजरेत भरायचा. धसमुसळेपणा करणारा शम्मी कपूरही आवडायचा. इतकंच काय, राजेंद्रकुमारदेखील आवडायचा. या सगळ्यात बलराज सहानी वेगळे वाटायचे. परंतु मी अगदी प्रदीपकुमार आणि विश्वजित यांचे चित्रपटदेखील पाहत असे. गुजरातमध्ये प्रदीपकुमारला ‘प्रदीप पोणया’ म्हणायचे. पोणया म्हणजे बावळट. परंतु मला त्याने फरक पडायचा नाही. कारण बहुतेक चित्रपटांत त्याच्याबरोबर मीनाकुमारी असायची. ती भलतीच आवडायची. कारण त्या वेळच्या बऱ्याचश्या रडव्या चित्रपटांत तीच असायची. दु:खाची आळवणी करावी तर तिनेच, हे ठरलेलं असायचं. शिवाय ती मोठ्या बहिणीसारखी वाटायची... आणि मग तिच्यावर कोसळलेल्या दु:खाने खूपच हळवं होऊन जायला व्हायचं. तिला प्रदीपकुमारच्या प्रेमात पडावं लागायचं, यामुळेदेखील तिच्याबद्दल वाईट वाटायचं. अधिकच सहानुभूती वाटायची. नर्गिस, मधुबाला, गीता बाली, वहिदा रेहमान, वैजयंतीमाला आवडायला लागल्या; तो काळ थोडा पुढचा आहे. मात्र एक बाब गमतीदार होती. एकीकडे मीनाकुमारी अशी खूप आवडायची तर दुसरीकडे माला सिन्हा! ती आवडण्याचं कारण वेगळं होतं! त्या वयात नेमकं कळत नव्हतं; परंतु पडद्यावर ती दिसली की, नजर तिच्या अंगभर फिरत राहायची. न कळणारी कसली तरी ओढ असायची तिला पाहायची.

रडारडीचे चित्रपट पाहण्याची हौस माझ्यापुरती मात्र एका वेगळ्याच प्रसंगाने थांबली.

सहावीत असताना माझे एक अत्यंत आवडते शिक्षक देशपांडेगुरुजी शाळा सोडून गेले. त्यांच्या निरोपाच्या सभेत हेडगुरुजी गावकर म्हणाले, ‘‘माझ्या नऊ पुतळ्यांच्या माळेतली एक पुतळी आज गळाली.’’ आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अवघी सभाच मुसमुसून रडत होती. मला अधिकच कढ आले, कारण ते माझे लाडके शिक्षक होते. त्यांचाही माझ्यावर खूप लोभ होता. आम्हाला पाचवीपासून ते हिंदी शिकवायचे. राष्ट्रभाषा सभेच्या हिंदीच्या परीक्षा असायच्या त्या काळी. ते आम्हाला त्या द्यायला लावायचे. त्यासाठीचा अभ्यास शाळेत तासभर अधिक थांबवून घ्यायचे किंवा माझ्यासारख्या दोन-चार मुलांना घरी बोलावून शिकवायचे. त्याहीपेक्षा त्यांनी एक विशेष गोष्ट माझ्या बाबतीत केली होती. त्यांनीच लिहिलेली एक हिंदी नाटिका जेव्हा बसवायला घेतली, तेव्हा त्यातल्या दोन महत्त्वाच्या भूमिकांमधली एक मला दिली होती. तालमीच्या दरम्यान ते माझ्यावर खूश असत. कारण त्यांनी शुद्ध हिंदीत लिहिलेल्या संवादांचे मी तेवढ्याच शुद्ध हिंदीत उच्चार करीत असे. हिंदी सिनेमे ‘बघताना’ मी ते बहुधा तितक्याच डोळसपणे ‘ऐकत’ही असावा! बाकीच्यांना ते जमत नसे. त्यांच्या हिंदीत गुजराती शब्द आणि उच्चारपद्धती यांची सरमिसळ झालेली असायची.

काही तालमी झाल्यानंतर देशपांडेगुरुजींनी आम्हाला आपापल्या भूमिकांसाठी आवश्यक असलेली वेशभूषा सांगितली. अर्थातच कपडे आमचे आम्हाला आणायचे होते. माझी भूमिका श्रीमंत माणसाची होती. म्हणून मला फुल पँट, फुल शर्ट, टाय, हॅट आणि बूट आणायचे होते. माझ्याकडे यातलं काहीच नव्हतं. मी नेहमीप्रमाणे आईकडे रडूनबिडून मागण्या केल्या, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी गुरुजींना सांगितलं. परिणामी; ज्याला भिकाऱ्याचं काम दिलं होतं, त्या जगन्नाथला माझी भूमिका देण्यात आली. तो घरचा बरा तर होताच, परंतु लाडावलेलाही होता. त्यामुळे तो श्रीमंती जामानिमा आणू शकला. मी झालो भिकारी. मग मलाही जुनेपुराणे, फाटके कपडे आणता आले. मला अर्थातच त्रास झाला. थोडंसं अपमानित झाल्यासारखं वाटलं. देशपांडेगुरुजींनी माझी मन:स्थिती ओळखली. मला सगळं नीट समजावून दिलं. तालमी संपल्या नाटिका पार पडली आणि मला एकट्यालाच अभिनयाचं एकमेव पारितोषिक मिळालं. माझी भूमिका चांगली वठली होती, कारण ती खूप करुण होती. भरपूर रडाबिडायचं होतं, हळवं व्हायचं होतं. आणि तोवर पाहिलेल्या चित्रपटांनी ते सारं माझ्याकडून करून घेतलं होतं.

तर असे हे देशपांडेगुरुजी शाळा सोडून जाताना मला रडू येणार... पुन:पुन्हा भडभडून येणार, हे स्वाभाविकच होतं. त्यामुळे घरी आल्यावरदेखील जिन्याच्या कठड्यावर बसून मी रडतच होतो. त्याच वेळी तळमजल्यावर राहणाऱ्या गऊमावशी कशाला तरी बाहेर आल्या. त्यांनी मला रडताना पाहिलं.

‘‘का रं रडतूयास?’’

मी रडत-रडतच म्हणालो, ‘‘देशपांडेगुरुजी शाळा सोडून गेले...’’

‘‘आरं, गुर्जी साळाच सोडून गेला ना? उलाथला नाही ना?’’

माझं रडणं एका झटक्यात थांबलं. गऊमावशींचं बोलणं हे असं खाश्या शैलीतलं असायचं. त्या कशावरही अतिशय उत्स्फूर्तपणे मार्मिक असं काही तरी बोलून जायच्या आणि सर्वांची हसून-हसून पुरेवाट व्हायची. मलाही आता असंच हसू आलं.

‘‘आता हसतोस व्हय रं? खरा कंचा तू... रडनारा का हसनारा..?’’

त्या आपल्या कामाला गेल्या. त्या वेळी मी नेमका काय विचार केला, मला माहीत नाही; परंतु कसलं तरी दु:ख कुरवाळत बेहिशेबी रडणं काही बरोबर नाही, हे मात्र मला जाणवलं असावं. कारण त्यानंतर मी असा ‘प्रदर्शनीय’  रडल्याचं मला आठवत नाही. ‘दोस्ती’, ‘ससुराल’, ‘जिंदगी’, ‘अनपढ’, ‘पूजा के फूल’, ‘दिल एक मंदिर’, ‘मदर इंडिया’, ‘मानिनी’, ‘मोलकरीण’, ‘खानदान’, ‘मै चूप रहूँगी’ असे काही रड-रड रडवणारे चित्रपट मी भावविवशतेवर बऱ्यापैकी ताबा ठेवत पाहिले... आणि म्हणूनच कदाचित मला ते आजही चांगले आठवतात.

रडवे चित्रपट आवडीने पाहणं, ते पाहता-पाहता रडणं, नंतरही दिवसच्या दिवस रडणं हे जसं आवडायचं; तसंच हीरो- हिरोईनचा रोमान्सही पागल करून टाकायचा. अगदी शाळकरी वयातही आम्ही प्रेमाबिमात पडायचो. ते अर्थातच बहुतांशी एकतर्फी प्रेमप्रकरण असायचं. एकतर्फी तर एकतर्फी, पण रोमँटिक वाटायचं, एवढं मात्र खरं. आणि हे अर्थातच सिनेमा पाहून झालेल्या संस्कारांतून मुख्यत: घडायचं. त्यामुळे आमच्या लव्हस्टोऱ्याही फिल्मीच असायच्या. त्या एकमेकांना रंगवून-रंगवून सांगायची हौस असायची. सगळा मामला एकतर्फीच असल्यामुळे काही घडलेलंच नसायचं, परंतु तरीही आमच्या लव्हस्टोऱ्या घटनांनी खचाखच भरलेल्या असायच्या. ऐकणाऱ्याला ही सगळी फेकाफेक आहे, हे कळायचं; पण तो मन लावून ऐकायचा. कारण त्याचीही लव्हस्टोरी इतरांनी ऐकलेली असायची.

आपण एखाद्या मुलीच्या कसे प्रेमात पडलो आणि मग ते तिच्यापर्यंत पोचविण्यासाठी काय काय केलं, हे कुणी सांगू लागला की; त्यामागे कुठल्या सिनेमाची स्टोरी आहे, ते आम्हाला सहज कळायचं. कारण प्रत्येक जण अशाच कुठल्या तरी सिनेमातल्या गोष्टीप्रमाणे प्रेमात पडलेला असायचा. त्या त्या चित्रपटात हीरोने हिरोइनच्या प्रेमात पडणं, तिला पटविण्यासाठी एकेक प्रताप करणं आणि मग तिचा अनुनय करीत राहणं, एवढ्यापुरतीच आमची लव्हस्टोरी असायची. लग्नाबिग्नापर्यंत ती जायचीच नाही. का, ते आठवत नाही; परंतु लग्न किंवा त्याआधी स्वत:च्या तसेच तिच्या आई-वडिलांशी करावा लागणारा संघर्ष करण्याचं अजून आपलं वय झालेलं नाही याची जाणबीण असावी.

नाही म्हणायला, काही जण या ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ खेळाच्या पलीकडे जात आणि प्रत्यक्ष कृती करीत. आमचा एखादा मित्र एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला की, तो काही दिवस तिला इथून-तिथून पाहत राही. मग तिच्या आसपास मुद्दाम घोटाळे. यातून त्याला तिचा अंदाज येई. कधी कधी खरंच ती मूक प्रतिसाद देई, तर बऱ्याचदा मुलांना तसा भास होई. मग पुढची स्टेज म्हणजे तिच्या    समोरून चालत यायचं आणि तिच्यासमोर फूल टाकायचं. सिनेमात हीरो टपोरा गुलाब टाकी; आम्हाला कुठून गुलाब मिळणार? आमच्या चाळीच्या आसपास खाचर होतं आणि तिथे बऱ्यापैकी जंगली झुडुपं आडवीतिडवी वाढलेली होती. तिथलंच जंगली फूल आमचा हीरो त्याच्या हिरोईनच्या वाटेवर टाकायचा. थेट सिनेमातल्या हीरोच्या स्टाइलने, दुडक्या चालीने चालत. एखादी मुलगी गंमत वाटून, तर एखादी चक्क लाजूनबिजून ते फूल उचलायची आणि मग तिच्या पावलांना अचानक एक वेगळ्या प्रकारचा वेग यायचा. तिनेही अशा वेळी सिनेमातली हिरोईन काय करते, हे अर्थातच पाहिलेलं असायचं. तिच्याही मनात तसंच काही तरी असायचं... आणि हे सारं घडून यायचं. एरवी मुलं-मुली आपसात बोलत, एकत्र खेळत; पण एखाद्या मुला- मुलीमध्ये असा टाका भिडला, तर ते थेटपणे बोलत नसत. मग हे असं दुरून-दुरून पाहणं, एकमेकांच्या आसपास मुद्दाम वावरणं आणि हे असं फूल टाकणं. एखादा धाडसी प्रेमवीर चिठ्ठी पण टाकायचा. एखाद्याला अशी चिठ्ठी द्यावीशी वाटली की, तो माझ्याकडे यायचा. त्याच्या मनात जे काही असेल, ते तो सांगायचा. मी मग ते लिहून द्यायचो. तो ती चिठ्ठी स्वत:च्या अक्षरात नकलून काढायचा. त्याला दोन कारणं होती. एक तर माझं अक्षर वाईट होतं; आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्हा मित्रमंडळींना एकमेकांची अक्षरं माहीत होती. त्यामुळे माझ्या अक्षरातली चिठ्ठी वाचून ‘ती’ मुलगी माझ्या प्रेमात पडायची भीती त्या प्रेमवीराला असायची!

मी लिहिलेल्या चिठ्ठ्या पोरांना खूप आवडत. ती माझं कौतुक करीत. शाळेत माझे निबंध सर्वांना वाचून दाखविले जात. आमच्या लपायच्या अड्ड्यावर मी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचं जाहीर वाचन होई. चांगल्या चिठ्ठ्या लिहितो म्हणून मला बक्षीस मिळे. आमच्या चाळीतला एक मुलगा घरी केलेले मद्रासी डाळवडे विकत फिरत असे. अर्ध्या आण्याला म्हणजे तीन नव्या पैशाला एक. मला डाळवडा खूपच आवडायचा. मात्र मला तो क्वचितच परवडे. दोस्तमंडळींना हे माहीत होतं. त्यामुळे त्यांची प्रेमपत्रं लिहून घ्यायला ते मला डाळवड्याचं आमिष दाखवीत. एखाद्या प्रेमवीराला माझं प्रेमपत्र खूपच आवडलं, तर तो दोन डाळवडे खाऊ घाली. माझी चैन असे. परंतु अंदरकी बात कुणालाच माहीत नव्हती. मला स्वत:ला ती प्रेमपत्रं लिहिणं खूप आवडत असे. प्रत्येक प्रेमवीरागणिक म्हणजेच त्याच्या-त्याच्या प्रेमभावनेनुसार मला वेगवेगळा मजकूर लिहिता येई. विविध उपमा मला वापरता येत. माझ्या प्रतिभेला अशा वेळी धुमारे फुटत. शाळेतल्या निबंधापलीकडे स्वतंत्र असं लेखन मला करायला मिळे, हीच माझी खरी कमाई असे. डाळवडा हा तर बोनस असे.

प्रेमपत्र पोरीला देऊन झालं की, हा प्रेमवीर तिच्या आसपास वावरत राही आणि मग थोड्या मोठ्या आवाजात गाणं म्हणे,

ये मेरा प्रेमपत्र पढ कर के तुम नाराज ना होना

के तुम मेरी जिंदगी हो, के तुम मेरी बंदगी हो-

ये मेरा प्रेमपत्र पढ कर...

एवढ्यावरच ही गानकला तो आवरती घ्यायचा नाही... तो पुढलं संगीतदेखील गायचा! कधी तरी कुणाच्या तरी लक्षात येई. ‘‘हा साला याचं स्वत:चं प्रेमपत्र कधी वाचून दाखवीत नाही.’’

मग मला त्याबद्दल विचारलं जाई. मी खरं-खरं सांगे की, मी कधीच कुठल्या मुलीला प्रेमपत्र लिहिलं नाही. त्यांना अर्थातच ते खरं वाटत नसे. आमच्यासाठी एवढी छान-छान पत्रं लिहितो, तर स्वत:साठी काय अफलातून पत्र लिहीत असेल. पण खरंच मी कधी असं प्रेमपत्र लिहिलं नाही. म्हणजे मी या माझ्या दोस्तांसारखा प्रेमात पडलोच नव्हतो, असं नाही. माझीही एक लव्हस्टोरी होती. मी चौथीत गेलो तेव्हा आमची शाळा दुपारची झाली. सकाळची शाळा सुटायच्या आधीच मी एकटा शाळेत यायचो. तिसरीतली एक मुलगी मला आवडायची. ती अतिशय नाजूक चणीची, गोरीपान होती. मला लवकर आलेला पाहून आमचे करमरकरगुरुजी मला या तिसरीतल्या मुलांना गोष्ट सांगायला सांगायचे. मीही उत्साहाने गोष्ट सांगायचो. जवळपास रोजच हे घडायचं. चांदोबातल्या, कुठे कुठे ऐकलेल्या गोष्टी मी सांगायचो. नसलीच गोष्ट हाताशी, तर मी जुळवाजुळव करून सांगायचो. करमरकरगुरुजी म्हणायचे, ‘‘गोष्टी छान रचतोस!’’.

शाबासकी द्यायचे. परंतु त्यांना कुठे माहीत होतं की, हे सर्व माझ्यात येतं कुठून..!

Tags: सिनेमा पाहणारा माणूस अशोक राणे प्रेमपत्र सिनेमा हे सर्व येत कुठून शाळा He Sarv Yete Kuthun नायक Shala Hero Prempatra Cinema Cinema Pahanara Manus Ashok Rane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके