डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कधी तरी आयफेल टॉवर पाहू, हे जसं ठरवून टाकलं होतं; तसंच मोठे होऊन मुंबईला जाऊ तेव्हा मा.विनायकांचे चित्रपट आणि केशवराव भोसले व नानासाहेब फाटक यांची नाटकं पाहू, असं मी मनोमन ठरवलं. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांची तुलना करताना ते काही गोष्टींबद्दल तसंच तावातावाने बोलायचे. त्या चर्चेतून दोन नावं सारखी कानावर पडायची. ती चर्चा मात्र कळायची नाही, पण ती दोन नावं लक्षात राहिली. एक जेधे, दुसरे जवळकर!

‘‘हे घे पाच आणे आणि तुझ्या मित्रांबरोबर ‘संगम’ बघ.’’- माझ्या थोरल्या भावाने (माझ्या हाती पैसे देत) असं म्हणताच त्याचा मित्र केवढ्याने तरी दचकून म्हणाला, ‘‘एवढ्याशा पोराला ‘संगम’ पाहायला पाठवतोस...?’’

मी तेव्हा सहावीत होतो आणि भाऊ व त्याचा मित्र अकरावीला. म्हणजे मी प्राथमिक शाळेत, तर ती दोघं हायस्कूलात. म्हणजे माझ्यासारखीच हाफ पँटीत. भावाचा मित्र अजून धक्क्यातून सावरला नव्हता, ‘‘कमी कपड्यांतली वैजयंतीमाला पाहायला...?’’

भावाने मित्राला उत्तर दिलं, ‘‘नाही... पॅरिसचा आयफेल टॉवर पाहायला...!’’

त्या वेळी हा माझा थोरला भाऊ भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन संस्थांना पत्रं पाठवून त्यांची माहिती पत्रकं मागवायचा. माहिती किती वाचायचा, माहीत नाही; परंतु त्यातली चित्रं कापून वेगळी करायचा आणि त्यांचे राज्यवार छान आल्बम करायचा. त्याच्या या अशा स्वरूपाच्या पर्यटन आवडीतूनच त्याला मी ‘संगम’ पाहावा- मुख्य म्हणजे आयफेल टॉवर पाहावा- असं वाटलं. वैजयंतीमाला कमी कपड्यांत वावरते, हे त्याच्या लक्षात आलं नसावं किंवा त्याला आयफेल टॉवरच्या पुढे ते महत्त्वाचं वाटलं नसावं.

मी ‘संगम’ पाहिला. कमी कपड्यांतल्या वैजयंतीमालाला पाहिलं आणि आयफेल टॉवरही पाहिला. भावाच्या मित्राने वैजयंतीमालाचा विशेष उल्लेख केल्यामुळे सिनेमा पाहायला जाताना डोक्यात तीच होती. पॅरिस आणि आयफेल टॉवरविषयी भावानेच दिलेल्या जुजबी माहितीपलीकडे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे सोबतच्या दोस्तमंडळींना मी पाहण्याआधीच वैजयंतीमालाविषयी विशेष माहिती पुरवली. परंतु, त्यांच्याकडे माझ्यापेक्षा अधिकचा तपशील होता! उदाहरणार्थ- ‘संगम’मध्ये वैजयंतीमालाने काम करावं म्हणून राज कपूरने कसा तिचा पिच्छा पुरविला होता. अखेर एक, ‘बोल राधा बोल संगम होगा के नहीं?’ अशी तार पाठविली आणि मग तिनेही कसं तारेनेच ‘होगा... होगा... होगा...’ असं उत्तर पाठविलं... मग त्याचंच कसं गाणं बनवलं... इथपासून ते आणखी किती तरी चविष्ट गोष्टी माझ्या या दोस्तांच्या पोतडीत होत्या.

‘संगम’ अर्थातच खूप आवडला. रेडिओवर आणि समारंभांतून वाजणाऱ्या लाऊड स्पीकरवरून त्याची गाणी आधीच ओठांवर आली होती. रेडिओ सिलोनवर त्या वेळी उभ्या- आडव्या देशाला वेड लावणारा ‘बिनाका गीतमाला’ हा धमाकेबाज कार्यकम सादर व्हायचा. तो सादर करणाऱ्या अमीन सयानीचा जादूभरा, भरदार तितकाच मखमली आवाज आणि त्यांची सादरीकरणाची अनोखी व तितकीच अभूतपूर्व शैली यामुळे समस्त आबालवृद्धांना पार वेड केलं होतं. ‘बिनाका’त गाणं गाजलं, त्याला बिनाका सरताज गीतचा किताब मिळाला की, त्या चित्रपटाबद्‌दल अफाट औत्सुक्य असायचं.

‘बिनाका’त ‘संगम’ची गाणी गाजत होती. ‘ये मेरा प्रेमपत्र पढ कर तुम नाराज ना होना’ तर सतत काही आठवडे सरताज गीत ठरलं होतं. ‘संगम’मधली इतरही गाणी गाजत होती. पडद्यावर ती पाहताना भान हरपलं... तिकडे पडद्यावर राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार गायला लागले तसे प्रेक्षकांनी त्यांच्या सुरात सूर मिसळले. त्या जल्लोषात मीही सामील झालो. नादावलो. पण तेवढ्यातही मी लक्ष ठेवून होतो. मला आयफेल टॉवर, पॅरिस पाहायचं होतं. त्यासाठीच तर भावाने मला पाठवलं होतं. मी ते पाहून घेतलं. नवसारीतून आम्ही सुट्टीत मुंबईला आलो की त्या वेळी आम्हाला परदेशी आल्यासारखं वाटायचं... पॅरिस तर किती तरी दूर... कल्पनेच्या पलीकडे. परंतु कधी तरी आयुष्यात आयफेल टॉवर पाहायचाच, असं ठरवून टाकलं. आणि मग डोक्यात घोळत राहिली सुंदर-राधा-गोपालची त्रिकोणी प्रेमकथा, गाणी... आणि वैजयंतीमाला...!

कधी   कधी माझं मलाच वाटायचं की- आपण असं सारखं मनातल्या मनात का, होईना वैजयंतीमालाला ‘तस्सं’ पाहू नये. मनात काही वाईट विचार आले की पाप घडतंय, असं वाटून त्या वेळी घाबरायला व्हायचं. अशा वेळी देव्हाऱ्यासमोर उभं राहून डोळे मिटून ‘देवा, चुकलं माझं. क्षमा कर-’ असं तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखं केलं की थोडं निवांत वाटायचं. पण वैजयंतीमाला कुठे तरी दडी मारून बसलेली असायचीच. एका मित्राला बिचकत-बिचकत हा प्रकार सांगितला. तो म्हणाला,

‘‘पाप वैजयंतीमालाने केलंय, तू नाही.’’

कुठल्याही प्रश्नाचं असं एका झटक्यात उत्तर देणाऱ्या मित्रांचं मला नेहमीच कौतुक वाटायचं. नाही तर आपण!... डोक्यात घेऊन बसतो आणि उत्तरही सापडत नाही!

याच सुमारास कधी तरी मुंबईला राहणारे माझे मामा नवसारीला आले. अधूनमधून ते आमच्याकडे यायचे. ते आणि माझे वडील हे मेहुणे-मेहुणे या नात्यापेक्षा जानी दोस्तासारखे वागायचे. संध्याकाळी त्यांची बैठक जमे. आम्ही भावंडं आसपासच कुठे तरी अभ्यास करत बसलेली असायचो. मला मुळातच एक सवय होती. वडीलधारी मंडळी बोलत असली की एक कान त्यांच्याकडे करायचा- अर्थातच त्यांच्या नकळत. खूप काही कानांवर पडतं. काही कळणारं, बरंचसं न कळणारं. काही गोष्टींची गम्मत वाटते, काही संभ्रमात पाडतात. कधी तरी न कळलेलं मोठ्या भावंडांना विचारावं तर ते, ‘हवेत कशाला हे नस्ते उद्योग’ म्हणून झापायचे. पण माझी सवय म्हणा, खोड म्हणा- जायची नाही.

मामा आणि वडील यांच्या बोलण्यात सतत काही विषय आणि नावे यायची. संगीत, नाटक आणि सिनेमा यांवर ते तावातावाने बोलायचे. कसल्या कसल्या आठवणी काढायचे. काही नावे उच्चारताना भारल्यासारखे बोलायचे. अशा काही त्यांच्या आठवणी आणि काही नावे ते दर वेळच्या गप्पांत घेत असल्यामुळे माझ्या मनावर ते सारं अक्षरश: कोरलं गेलं. लक्षात राहिलं.

‘‘भालजी पेंढारकरांचा ‘श्यामसुंदर’ प्रदर्शित झाला, तेव्हा सतत आठ दिवस आपण दोघे कसे रांगा लावत होतो आणि नवव्या दिवशी कसं एकदाचं तिकीट मिळालं!’’ अशा त्यांच्या आठवणी निघत. देशातला हा पहिला रौप्यमहोत्सवी चित्रपट, असंही त्यांच्या बोलण्यात येई. ‘श्यामसुंदर’ त्यांना आवडला होता, तरी त्यांच्या लेखी चित्रपट दिग्दर्शक म्हणून मा.विनायकच श्रेष्ठ होते. मग कोण कोण श्रेष्ठ, अशी त्यांची  चर्चा रंगायची. दोघांचंही प्रत्येक गोष्टीवर जवळपास एकमत असायचं. थोडेफार मुद्दे वेगळे असायचे आणि ते त्यांनी मांडताच, ‘बरोब्बर!’ असं मोठ्याने म्हणत एकमेकांना टाळ्या देणं व्हायचं. दोघेही खूश असायचे.

चित्रपट दिग्दर्शक म्हणून जसे मा.विनायक श्रेष्ठ तसेच संगीत नाटकांत केशवराव भोसले, तर गद्य नाटकात नानासाहेब फाटक श्रेष्ठ! त्या वेळी या तिघांविषयी मामा आणि वडील यांच्याकडून माझ्या कानावर जे काही यायचं, त्यापलीकडे मला काहीच माहीत नव्हतं. या दोघांनी त्यांच्या या आवडत्या कलाकरांचे चित्रपट, नाटकं मुंबईत पाहिलेली असायची. नवसारीत यातलं काही पाहायला मिळायचं नाही. मराठी वर्तमानपत्रं, नियतकालिकं येत नसल्यामुळे मला कुठे काही वाचायला मिळणंही शक्य नव्हतं. तेव्हा मामा आणि वडील हाच माझा सोर्स आणि ज्या अर्थी ते इतकं भारावून अन्‌ पुन:पुन्हा बोलतात तेव्हा ही मंडळी ग्रेटच असणार, अशी माझी खात्रीच झालेली असायची.

कधी तरी आयफेल टॉवर पाहू, हे जसं ठरवून टाकलं होतं; तसंच मोठे होऊन मुंबईला जाऊ तेव्हा मा.विनायकांचे चित्रपट आणि केशवराव भोसले व नानासाहेब फाटक यांची नाटकं पाहू, असं मी मनोमन ठरवलं. बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांची तुलना करताना ते काही गोष्टींबद्दल तसंच तावातावाने बोलायचे. त्या चर्चेतून दोन नावं सारखी कानावर पडायची. ती चर्चा मात्र कळायची नाही, पण ती दोन नावं लक्षात राहिली. एक जेधे, दुसरे जवळकर!

तर... अतिशय मोकळेपणाने अशा छान गप्पाटप्पा करणारे मामा आणि वडील मधूनच अचानक दबक्या आवाजात बोलायला लागायचे. ती चर्चा, ते बोलणं मिटक्या मारीत चालायचं. या वेळचं त्यांचं हसणं, खिदळणं, टाळ्या देणं वेगळंच असायचं. चोरट्या आवाजातलं त्यांचं तेही बोलणं ऐकण्यासाठी मी कान अधिकच टवकारायचो. एवढंसं आमचं घर आणि त्यात एवढीशी आमची बैठकीची खोली; किती आवाज चोरणार ते? त्यामुळे माझ्या कानावर तोडकं- मोडकं काही तरी यायचंच आणि जेवढं यायचं, त्यातून बऱ्यापैकी कळायचं. शिवाय दर वेळच्या त्यांच्या गप्पांत हा विषय आणि हे असं दबक्या आवाजात बोलणं व्हायचंच! त्यामुळे मोडकं-तोडकं जे कानावर पडायचं, त्यातून मग ते कशासंबंधी बोलतात ते कळायला लागलं. ते बोलायचे मा.विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटाबद्दल. मग एक नाव कानांवर पडायचं... मीनाक्षी! बाकी अधलंमधलं नीटसं कळायचं नाही, परंतु त्यापुढला प्रकार मात्र बुचकळ्यात  टाकायचा. ही वडिलधारी माणसं एकाएकी अशी कशी खुळावल्यासारखी होतात? कारण दोघेही मग रंगून एका सुरात गायला लागत, ‘यमुना जळी खेळु खेळ कन्हैया, का लाजता’... आणि ‘का लाजता’ दोन-तीनदा वेगवेगळ्या प्रकारे आळवून ते टाळ्या देत. नंतर काय झालं, माहीत नाही; परंतु माझं देव्हाऱ्यासमोर जाऊन डोळे मिटून उभं राहणं, तोंडातल्या तोंडात पुटपुटणं कधी तरी बंद झालं.

माझा एक यशवंत नावाचा मित्र होता. आम्ही दोघेही अभ्यासात हुशार आणि अभ्यासाची आवड असणारे. त्यामुळे आम्हा दोघांना एकत्र अभ्यास करायला आवडायचं. बऱ्याच वेळा मी त्याच्या घरी अभ्यासाला जात असे. त्याचं घर जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं, तरीही मी त्याच्याकडे जाई. कारण तिथे छानशी शांतता असे. आमच्या चाळीत नेहमीचच गजबजाट. त्याचं घर म्हणजे पिठाच्या गिरणीत आडोसा करून केलेली एक छोटीशी खोली. तो आणि त्याचे वडील असे ते दोघंच तिथे राहायचे. ते खूपच गरीब होते. यशवंत सदान्‌कदा एकच लांबुडका शर्ट घालून शाळेत यायचा. तो त्याच्या वडलांचाच असायचा. तो गुडघ्यापर्यंत असल्यामुळे तो शर्ट तेवढाच दिसायचा. पोरं मग त्याच्या नकळत इकडून-तिकडून येत शर्ट वर उचलीत, ‘पँट घातलीस का?’ असं विचारीत. आजूबाजूची पोरं मग खिदळत. हा भाऊ मात्र चिडत नसे. रागावत नसे. मुळात त्याला त्याचं काही वाटतच नसे. आपण गरीब आहोत आणि कुणी हसलं म्हणून आपल्याला काही नवे कपडे मिळतील अशी शक्यता नाही, हे त्याला माहीत होतं. म्हणून मग तो असा शांत राही. त्याच्या डोक्यात सतत अभ्यासच असे.

यशवंतचे वडील त्या गिरणीत कामगार होते. यांच्या खोलीला लागून पलीकडे आणखी एक खोली. यशवंतच्या वडिलांबरोबर गिरणीत हरकाम्या असलेला एक गुजराती पोरगा तिथे आपल्या बायकोबरोबर राहायचा. आजूबाजूला विरळ वस्ती. परिसरात दाट झाडी होती. एक छोटेखानी वाडीच ती. तिथे कमालीची शांतता असायची. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर होणारी झाडा-पानांची सळसळ मुद्दाम ऐकली नाही तरी सहज ऐकू यायची. शनिवारी मी तिथे अभ्यासाला जायचो, कारण शनिवारी गिरणी बंद असायची. त्यामुळे मुळातली तिथली शांतता अधिकच गहिरी होऊन जायची आणि त्यात ही एका लयीत ऐकू येणारी सळसळ... दाट झाडी असल्यामुळे छानसा गारवा असायचा. गेल्या-गेल्या माठातलं गार पाणी प्यावं आणि त्या निवांत गारव्यात निवांतपणे अभ्यास करीत बसावं- असा आमचा नेहमीचा परिपाठ. आमची छान तंद्री लागायची. बोलणं अगदी मोजकं, गरजेपुरतं. असाच एकदा आमचा छान अभ्यास चालला होता... आणि कानावर आलं,

‘आधा है चंद्रमा रात आधी

रह न जाए तेरी मेरी बात आधी,

मुलाकात आधी आधा है चंद्रमा...’

क्षणात माझं अभ्यासातून लक्ष उडालं. यशवंत गणितं सोडविण्यात मग्न होता. मी आवाजाच्या दिशेने पाहत राहिलो. काही वेळाने यशवंतच्या लक्षात आलं.

‘‘कुठे लक्ष आहे तुझं..? ती गाते अशी अधूनमधून. चल, सोडव गणित.’’

मी होतोच कुठे गणितात? मी भान हरपल्यासारखं गाणं ऐकत राहिलो. यशवंत वैतागला.

‘‘तिला बघायचंय...? बघ जा. ते बघ, तिथे एक भोक आहे. बघ काय बघायचे ते.’’

मग बारीकसा हसला.


‘‘मीच केलंय ते भोक. ती दोघं रंगात आली की मी बघतो तिथून. मजा येते.’’

मी अजूनही गाण्यातच होतो. मग मी उठलो. भिंतीशी गेलो. त्या भोकातून पाहिलं. ती पाठमोरी उभी होती. समोरच्या खुंटीला लावलेल्या फुटक्या आरशात पाहत ती डोळ्यात काजळ भरत होती. मला त्या आरशात ती दिसली. तिच्या चेहऱ्याचा काही भाग आणि काजळ भरला जाणारा तिचा एक डोळा. मी भान हरपल्यासारखा पाहतच राहिलो... आणि ती गात होती- ‘आधा है चंद्रमा रात आधी... ’ मी आणखी किती तरी वेळ तसाच तिला पाहत राहिलो असतो. यशवंतने मला ओढून खाली बसवलं.

‘‘पुरे..! अभ्यास पुरा करायचाय...’’

मी बसलो खरा, परंतु डोळ्यांसमोर तीच होती. त्या आरश्याच्या एवढ्याशा तुकड्यातून दिसणारी, डोळ्यांत काजळ भरणारी... आणि गाणारी... नंतर कधी तरी लवकरच ‘नवरंग’ पाहिला. पडद्यावर संध्या नाचत होती, लता गात होती अन्‌... माझ्या डोळ्यांसमोर मात्र तीच होती... आणि तीच गात होती...

‘आधा है चंद्रमा रात आधी...’

 

Tags: राज कपूर अमीन सायनी वैजंतीमाला संगम सिनेमा अशोक राणे ब्रम्हचारी श्यामसुंदर भालाजी पेंढारकर Brmhchari Shyamsundar Bhalaji Pendharkar Paris Raj Kapoor Amin Sayni Vaijantimala Sangam Cinema Ashok Rane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके