डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चाळीतल्याच एका खोलीत जिरय्या स्वामी आपले मोठ-मोठे ट्रंक आणि  नटमंडळी घेऊन हजर होत. एवढ्याशा त्या खोलीत खूप दाटीवाटी व्हायची. परंतु  मी घुसायचो आणि कोपऱ्यातील जागा पकडून अंग आक्रसून बसायचा. एकेक नट  मग स्वामींच्या समोर बसत असे. त्याआधी त्यांच्या पायांना हात लाऊन तो  नमस्कार करी. पहिला मार्कंडेय. त्याचा मेकअप तसा साधाच असे. तरीही संबंध  चेहेरा फिकटसा गुलाबी आणि कपाळावर आडवं भस्म. त्यानंतर पाळी शंकराची. त्याला चेहऱ्यापासून थेट कमरेपर्यंत ते निळा करीत. शेवटी स्वत:चा मेकअप. आधीच त्यांचे डोळे गोल गरगरीत. आता मेकअपमुळे त्यात ते उठावपणा  आणीत. मेकअप झाला की केसांचे टोप, पोषाख चढविला जाई. पहाता-पहाता  होणारा हा त्या नटांचा कायापालट मी पापण्याही न हलवता पहात राही. तो अनुभव इतका भन्नाट असायचा की यात किती वेळ गेला याचं भानच नसायचं... 

माझं नाटकाचं कुतूहल पुरेपूर पुरवलं जिरय्या  स्वामी यांनी! साधा गिरणी कामगार असलेला हा माणूस म्हणजे अंतर्बाह्य कलावंत होता. ते नट  होते, लेखक-दिग्दर्शक होते, मेकअप तेच  करायचे, नाटकासाठी लागणारे पोषाखही तेच तयार करायचे. त्यांच्या पेशी-पेशीत नाटक होतं. आजच्या भाषेत म्हणायचं तर, नाटक हे त्यांचं  पॅशन होतं! गव्हाळी रंगाचा मध्यम उंचीचा  गोलमटोल देह, तसेच गोल गरगरीत डोळे आणि  कुरळे केस असं त्यांचं रूप होतं. कायम पांढरट  म्हणता येईल असा शर्ट (त्याला खमीस असं  म्हटलं जाई) आणि धोतर असा त्यांचा पोषाख  असायचा. वर्षातून दोन-तीनदा तरी चाळीत  त्यांचं नाटक व्हायचं. त्यांची नाटकं कायम  पुराणातील कथेवर आधारित असायची. ते तेलुगू  भाषक असल्यामुळे त्यांची नाटकं तेलुगू भाषेतच असायची. मला त्यातलं ओ की ठो कळायचं  नाही आणि तरीही मी पहाटेपर्यंत चालणारं त्यांचं  नाटक आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घराच्या  व्हरांड्यात बसून पाहत असे.

सिनेमाइतकंच मला नाटकही आवडायचं- अगदी वेडबीड म्हणण्याइतपत! नाटक  पाहण्याचे योग मात्र फारच क्वचित यायचे. माझ्या वडलांचे एक परब नावाचे मित्र होते. ते आमच्या चाळीतलं बडं प्रस्थ होतं. चाळीतील एकमेव श्रीमंत! एक हॉटेल, एक जळणाच्या लाकडाची वखार, एक टांगा आणि नवसारी स्टेशनाच्या पलीकडल्या भागातील मध्यमवर्गीयांच्या वस्तीत बंगला अशी त्यांची इस्टेट होती. ते आणि माझे वडील, दोघेही  गिरणीत जॉबर, परंतु त्यांच्याकडे एवढी सारी इस्टेट होती. त्यावरून आई वडलांना अधूनमधून सुनवायची- त्यांच्याकडे  बघा केवढं काय काय आणि इथे आपल्याकडे काय? आई- वडिलांमध्ये होणारा हा वाद आणि शाळेत दिले जाणारे सुसंस्कारांचे पाठ; तसंच वाचनातून, सिनेमातून कळणाऱ्या सत्याने, प्रामाणिकपणाने वागण्याचे फायदे याची संगती लावण्याचा माझा प्रयत्न चालायचा.

तर, हे परब मास्तर मुंबईतल्या त्यांच्या जावयाच्या नाटक कंपनीला आमंत्रित करायचे. मोठमोठ्या ट्रंका व आपला लवाजमा घेऊन हे जावईबापू यायचे आणि त्यांचे कामगार रंगभूमीवरचे नाटक सादर करायचे. प्रयोगाच्या खूप आधी परब मास्तर, माझे वडील आणि  त्यांची काही मित्रमंडळी नाटकवाल्यांची व्यवस्था बघायला जात. मीही हट्ट करून वडिलांबरोबर जात असे. त्यांना तिथे करावी लागणारी धावपळ आणि मग चार तास चालणारं  नाटक, यात मी कंटाळेन-दमेन असं त्यांना वाटायचं. पण मी काहीएक ऐकायचा नाही. माझी रडारड थांबविण्यासाठी ते मला सोबत नेत. शेंडेफळ असण्याचाही फायदा व्हायचा. गिरणीचा एक मोठा हॉल होता. त्याला स्टेजही होतं. तिथेच ही नाटकं होत. एरवी हा हॉल  कामगार मंडळी डबा खाण्यासाठी करीत. मीही तिथे वडिलांचा डबा नेत असे. मोठमोठ्याने बोलत, हसत, खिदळत पण वाघ मागे लागल्यासारखी मंडळी जेवत असत. कारण जेवणाची  सुट्टी अर्ध्या तासाचीच असायची.

परंतु याच हॉलमध्ये मी जेव्हा नाटक पाहायला जाई, तेव्हा माझ्यासाठी तीच जागा काही तरी विलक्षण गोष्ट होऊन जात असे. त्यातही नाटकाच्या आधी  आल्यामुळे प्रयोगाची पूर्वतयारी पाहताना मला भलतेच हरखून जायला होत असे. काही  नाटकवाले रंगमंचावर पडदे लावताहेत, तर कुणी पारदर्शी रंगीबेरंगी कागद लावून लाईटची  व्यवस्था पाहतेय, तर आणखी कुणी ध्वनियंत्रणेची तपासणी करतेय... आणि तिकडे आत  मेकअपरूममध्ये पाहता-पाहता ती साधीसुधी माणसं काय  एकेक रूप धारण करताहेत... साक्षात आपल्यासमोर काही तरी आकाराला येतंय आणि आपण ते सारं पाहतोय... मी अक्षरश: भान हरपून हे सारं पाहत असायचा. ही नाटकं  मुख्यत: ऐतिहासिक आणि ऐतिहासिक काल्पनिक असायची. ऐतिहासिक म्हणजे शिवाजीमहाराज आणि ऐतिहासिक  काल्पनिक म्हणजे ‘चांदोबा’त असायच्या तशा गोष्टींतील  काल्पनिक राजे, जादूगार, महाभयंकर राक्षस आणि त्यांची  चमत्कृतीजन्य जादूई दुनिया! मला दोन्ही प्रकार सारखेच आवडायचे. कारण मला मुळातच नाटक आवडायचं.

पडदा  वर गेल्यावर रंगमंचावर जे काही अद्‌भुत अवतरायचं, ते मी अनिमिष नजरेने अधाशासारखा पाहत राहायचो. काही  नटमंडळी त्यांची पल्लेदार संवादफेक, त्यांचा रंगमंचावरचा  एकूणच वावर यामुळे भारावून टाकायची; तर काही अर्धीमुर्धी  नटमंडळी कॉमिक वाटायची. मी हे सारं पहिल्या रांगेत बसून पाहत असे. नाटक तीन अंकी आणि चालायचं जवळपास  चार-साडेचार तास; परंतु मी टक्क जागा! बाकीची बच्चे कंपनी कंटाळलेली, झोपाळलेली असायची. त्यामुळे अवतीभवती असलेल्या वडिलधाऱ्यांना माझं कौतुक वाटायचं. मधेच कुणी तरी म्हणायचं, ‘‘काय रे, झोप येत नाही तुला?’’ मी मात्र नाटकात रमलेला.

नाटक संपल्यानंतर पुन्हा मी  वडिलांबरोबर रंगमंचावर जायचो. नाटकवाल्यांची आवरा- आवर पाहायचो. मला तेही पाहत राहवंसं वाटायचं. काही  तासांपूर्वी पेटाऱ्यातून आलेली ही जादूई दुनिया पुन्हा पेटाऱ्यात  जाताना किंवा संपलं नाटक, असं मला कधी उदास वाटलं नाही. नाटक म्हटलं की हे सगळं असंच असणार, हे असं अगदी स्पष्टपणे नाही तरी कुठे तरी जाणवायचं. एक मात्र  मनात यायचं की- आता पुढलं नाटक कधी...? या आवरा- आवरीत आणखी एका गोष्टीची गंमत वाटायची. एकीकडे अंगावरचा इतिहासकालीन पोषाख आणि दाढी-मिशा, मेकअप काढता-काढता काही नटमंडळींना घाई असायची. पाचेक तास रोखून धरलेली विडीची तल्लफ आता अनावर झालेली असायची. एकदा का ते आपल्या पूर्वरूपात  अवतरले की, सर्वप्रथम ते विडी शिलगवायचे आणि मस्त  जोरदार झुरका घ्यायचे. आणि म्हणायचे, ‘‘कदी एकदा इडी ओडतंय, असा झाला होता. शिवशाहीत कशी वडनार इडी?’’

एकदा कधी तरी म्हणे शिवाजीची भूमिका करणाऱ्या नटाने  शिवाजीचा पोषाख अंगावर असताना विडी ओढली होती. त्याला डायरेक्टरने सॉलिड झापलं होतं. मला हे ऐकून प्रश्न पडला की, शिवाजीची वस्त्रे लेऊन जर कुणी नटाने विडी ओढली, तर बिघडतं काय...? पण मी हे कोणाला  विचारणार? या अशा ऐतिहासिक आणि ऐतिहासिक काल्पनिक नाटकांच्या अधेमधे एक-दोन सामाजिक नाटकं पाहिल्याचं  आठवतंय. त्यांतलं एक नाटक आठवतं. त्याचं नाव होतं, ‘हे बाळ कोणाचे?’ त्या नाटकातली नायिका, ‘हे आपलंच मूल आहे’ असं पुन:पुन्हा रडून, आकांत करून नवऱ्याला सांगत  होती; परंतु तो पठ्ठ्या तिचं काहीएक ऐकून घेत नव्हता. या  कथाशयातला सगळाच पेच कळला असेल असं नाही, परंतु ती नटी मात्र मला साक्षात मीनाकुमारीच वाटली. शिवाय, ‘एका अभागी पतिव्रतेची सत्त्वपरीक्षा पाहणाऱ्या हे परमेश्वरा, तुला तिची दया कशी रे येत नाही?’ हा तिचा संवाद, त्या  वेळचा तिचा आकांत आणि पायपेटी, व्हायोलिनवर वाजणारं  करुण संगीत अगदी आजही आठवतंय.

याच अर्थाचं काही तरी सिनेमातदेखील ऐकायला मिळायचं. सिनेमा पाहताना किंवा नंतरही सारखं एक वाटत राहायचं की, हे सगळं कसं करत असतील? ते एक कुतूहल मला  कायम असायचं. सिनेमा कसा बनतो, हे पाहायला मिळणं शक्यच नव्हतं. नवसारीत फक्त एकदाच शूटिंग झालं होतं. तेसुद्धा दूर कुठे तरी होतं, त्यामुळे पाहायला जाणं अशक्यच  होतं. कधी झालं, तेही कळलं नाही. मात्र त्या सिनेमाचा हीरो  शैलेशकुमार नवसारीच्या स्टेशनवर गाडीची वाट पाहत  थांबलाय, असं कळल्यानंतर आम्ही धावत-पळत तिथे  गेलो. त्याला पाहिलं. पण मला फारसं काही विशेष वाटलं  नाही. शूटिंग पाहायला मिळालं असतं तर निदान कळलं तरी  असतं की, सिनेमा कसा बनवतात. मात्र हे कुतूहल  नाटकाच्या बाबतीत बऱ्यापैकी उलगडलं. सिनेमाच्या संदर्भातली एक गोष्ट मात्र पाहायला मिळाली.

माझ्या वडिलांच्या हाताखाली बदली कामगार असलेल्या  चिमणभाईचा ऑर्केस्ट्रा होता. तो स्वत: त्यात एक वादक  होता. एकूण आठ-दहा जणांचा चमू होता. गुलाब नावाचा एक मुस्लिम तरुण लता-आशाच्या आवाजात गायचा. दुसरा एक मुकेशची गाणी गायचा. त्याची बहीण ही माझ्या थोरल्या  बहिणीची मैत्रीण. ती नखशिखांत वैजयंतीमाला दिसायची. तर, या ऑर्केस्ट्राच्या रिहर्सलला मी चिमणभाईबरोबर जात  असे. रिहर्सल पाहणं मला खूप आवडायचं. ते जी गाणी  म्हणत, ती त्या वेळची गाजलेली गाणी असत. ती सारी गाणी  इतक्या जवळून ऐकायला मिळतात, याहीपेक्षा त्याची तयारी  कशी करतात ते पाहायला-ऐकायला मला आवडत असे. प्रत्येक वादक प्रथम आपलं वाद्य जुळवून घेई. त्या वेळी त्यांचं  बरंच काही तरी बोलणं, सूचना देण व्हायचं. काळी एक, काळी दोन, पांढरी एक, पांढरी दोन- असं बोलत ते वाद्यमेळ  जुळवीत आणि मग एका क्षणी, ‘ठीक है... चलो... तीन... दो... एक’ असं त्यांच्यातला एक म्हणे आणि एका आवेगात गाणं सुरू होई.

त्या वेळी गाणं ऐकण्यापेक्षा कोण कधी आपलं  वाद्य वाजवतं, कधी थांबवतं, दुसरा कुणी कसा सुरू होतो  आणि मग तो गाणारा... गाणं सुरू असताना हे सारं जे  घडायचं, तेच मला विलक्षण आवडायचं. आपला बारीकसा  सहभाग देणारं एखादं नगण्य वाद्यही माझ्या नजरेत भरायचं  आणि त्याचं महत्त्व कळायचं. मी फक्त रविवारीच या रिहर्सलला जायचो. सकाळी नऊला वगैरे सुरू झालेली ही  रिहर्सल दुपारी दोनपर्यंत चालायची. मग चिमणभाई मला  सायकलवरून घरी सोडायचा. तिकडे थोडंफार खाणं व्हायचं, परंतु मला भूक अशी लागायचीच नाही. रविवारच्या खास मांसाहारी जेवणाचीही आठवणदेखील व्हायची नाही. माझं नाटकाचं कुतूहल पुरेपूर पुरवलं जिरय्या स्वामी यांनी!  

साधा गिरणी कामगार असलेला हा माणूस म्हणजे अंतर्बाह्य  कलावंत होता. ते नट होते, लेखक-दिग्दर्शक होते, मेकअप  तेच करायचे, नाटकासाठी लागणारे पोषाखही तेच तयार करायचे. त्यांच्या पेशी-पेशीत नाटक होतं. आजच्या भाषेत  म्हणायचं तर, नाटक हे त्यांचं पॅशन होतं! गव्हाळी रंगाचा  मध्यम उंचीचा गोलमटोल देह, तसेच गोल गरगरीत डोळे  आणि कुरळे केस असं त्यांचं रूप होतं. कायम पांढरट म्हणता  येईल असा शर्ट (त्याला खमीस असं म्हटलं जाई) आणि  धोतर असा त्यांचा पोषाख असायचा. वर्षातून दोन-तीनदा  तरी चाळीत त्यांचं नाटक व्हायचं. त्यांची नाटकं कायम पुराणातील कथेवर आधारित असायची. ते तेलुगू भाषक  असल्यामुळे त्यांची नाटकं तेलुगू भाषेतच असायची. मला  त्यातलं ओ की ठो कळायचं नाही आणि तरीही मी पहाटेपर्यंत  चालणारं त्यांचं नाटक आमच्या पहिल्या मजल्यावरच्या  घराच्या व्हरांड्यात बसून पाहत असे. काही वेळ आई, इतर  भावंडं सोबत असत. मध्यरात्र होत आली की ती झोपायला  जात. मी एकटाच जागत बसलेला असे.

समोरच्या घरातील  गुजराती काकी वारली होती. तिचं भूत म्हणे सारखं जिन्यात  वावरायचं. मला कधी दिसलं नाही. पण आई आणि इतर  शेजारणींच्या तिच्या वावराविषयीच्या कथा ऐकून-ऐकून  मला तिचं अस्तित्व कायम जाणवायचं. त्यामुळे दिवसा- ढवळ्याही जिन्यातून एकटा जाताना माझी तंतरायची. परंतु समोर नाटक चालू असताना मध्यरात्र उलटून गेल्यावरदेखील  ना मला तिची आठवण यायची, ना तिचं भय वाटायचं. नाटक  आणि सिनेमाच्या सान्निध्यात मला कायम सुरक्षित वाटलं, वाटत राहिलं. तर, या जिरय्या स्वामींनी मला खऱ्या अर्थाने नाटक या अद्‌भुताची ओळख करून दिली. पुढल्या आयुष्यात  नाटकाच्या म्हणून ज्या थिअऱ्या, स्कूल्स आणि एकूण त्याची निर्मितीप्रक्रिया हे जे काही कळलं; ते सारं या माझ्या पहिल्या  गुरूमध्ये होतं. त्यांच्यात जेवढं पॅशन होतं तेवढं त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नव्हतं. परंतु जिरय्या स्वामींच्या  मार्गदर्शनाखाली ती सारी मंडळी अशी काही तयार झालेली होती की, एक नटसम्राट आणि भोवती खुरटी रोपं असा प्रकार  नव्हता.

नाटक रंगविण्यात त्यांचाही सहभाग लक्षणीय  असायचा. परंतु मी रंगमंचावरच्या जिरय्या स्वामींना भान  हरपून पाहत रहायचा. काय त्यांचा तो वावर, त्यांचा डौल, त्यांची एकूण देहबोली, त्यांचा आवाज आणि संवादफेक! पुढल्या आयुष्यात जगभरचे केवढे तरी अभिनयसम्राट  पाहिले, परंतु त्या पहिल्या नटसम्राटच्या प्रतिमा मनात आजही जशाच्या तशा आहेत. महाभारतावर आधारित एका नाटकात  त्यांनी केलेला कर्ण तर मी कधीच विसरू शकत नाही. अभिनय म्हणजे काय, याचा तो एक वस्तूपाठच होता. रात्री, पुराणातल्या एखाद्या भारदस्त व्यक्तिरेखेने अवघा रंगमंच  व्यापून टकाणारे जिरय्या स्वामी एरवी इतर कुणाही सामान्य  माणसासारखे वावरत. ते फारसे कुणाशी बोलत नसत. सतत तंद्रीत असल्यासारखे असत. त्यांना बोलताना पाहायचो ते  रात्री चाललेल्या त्यांच्या सत्संगात! मी आईचा पदर धरून  तिथेही जायचो.

अशाच एका सत्संगात त्यांनी सांगितलेली  एक गोष्टही आठवते. आपल्या प्रजेची आपल्या मुलाबाळांसारखी काळजी घेणारा राजा एकदा प्रधानाला विचारतो, ‘‘आपण प्रजेसाठी एवढं करतो, मात्र प्रजेच्या तोंडून  आपल्याविषयी कधी काही बरं बोललेलं ऐकू येत नाही. असं  का?’’ प्रधान राजासारखा भाबडा नव्हता. चांगलाच इब्लिस  होता. तो म्हणाला, ‘‘महाराज, हे असंच आहे. कुणाचं काही चांगलं केलं तर ते बोलणार नाहीत, परंतु थोडं जरी वाईट केलंत तर शिव्या घालतील.’’ राजा केवळ भाबडाच नव्हता, तर अतिशय निर्मळ मनाचा  होता. त्याला प्रधानाचं म्हणणं काही पटलं नाही. ‘‘छे, छे- काही तरीच काय? आपली प्रजा तशी नाही.’’ ‘‘बघायचंय आपली प्रजा कशी आहे ते? मग एक काम करू या. आजच एक आदेश काढू या की इथून पुढे  तिरडीवरून प्रेत नेताना- ते बाईचं असो की पुरुषाचं, कुठल्याही वयाचं असो- ते पालथं आणि उघडं न्यायचं.’’ राजाला काही ते पटेना. परंतु काय लायकीची प्रजा आहे  हे जर जाणून घ्यायचं असेल, तर असं काही तरी करू याच, असा प्रधानाने अट्टहास धरला. राजाने नाखुषीने आदेश  काढला आणि अगदी त्याच क्षणापासून प्रजा म्हणू लागली, ‘‘हा काय राजा आहे!’’ हे जिरय्या स्वामी खूप वेळा वाचीत बसलेले दिसत.

इतर  काही घरांतून देवाधर्माच्या पोथ्या दिसायच्या, परंतु  स्वामींच्या घरी मोठमोठाले ग्रंथ होते. मी त्यांच्या नकळत किंवा त्यांना त्रास होणार नाही अशी काळजी घेत, संधी शोधत त्यांच्या आसपास वावरायचो. त्यांना अर्थातच ते जाणवत असावं, परंतु त्यांनी कधी मला हटाकलं नाही. लहान  मुलं जर अशी सारखी आसपास वावरत राहिली की वडिलधारी मंडळी अगदी हमखास दटावतात. ‘‘जा तिकडे पोरांच्यात. इकडे काय आहे?’’ स्वामींनी ते कधी केलं नाही. मला जवळ बसवून काही  सांगावं-बोलावं, असा प्रकारही नव्हताच. इतकंच नाही, तर  कधी त्यांनी मला आपलं काही बारीक-सारीक कामही  सांगितलं नाही. ते आपल्या कामात आणि मी अंतर ठेवून त्यांच्या आसपास... त्यांना न्याहाळत! माझं ते एक गुरुकुलच  होतं. सगळा अभ्यास मुक्यानेच!

दर वर्षी नारळी पौर्णिमेला नवसारीतल्या तेलुगू समाजाच्या  देवळात जत्रा भरायची. त्या वेळी आमच्या चाळीतून हे तेलुगू लोक पालखी काढायचे. त्या पालखीच्या मागे एका भल्या  मोठ्या उघड्या खटाऱ्यावर जिरय्या स्वामी एक देखावा  उभारायचे. महादेवाच्या पिंडीला मिठी मारून बसलेला  मार्कंडेय, पिंडीतून अवतरलेला महादेव आणि मार्कंडेयाच्या  गळ्यात फास घातलेला यमराज- सोबत त्याचं वाहन... रेडा. यात स्वामी यमराज व्हायचे. हा देखावा आणि पालखी  जवळपास शहरभर फिरायची. पाच-सहा तास तरी लागायचे. काही मोजकी मुलं त्या खटाऱ्यात दाटी करून बसलेली  असत, त्यांत एक मी असायचा. खूप अप्रूप वाटायचं.

परंतु याहीपेक्षा मला या सर्वाची जी पूर्वतयारी चालायची, ती पाहायला जास्त आवडायची. चाळीतल्याच एका खोलीत जिरय्या स्वामी आपल्या  मोठ-मोठ्या ट्रंक आणि नटमंडळी घेऊन हजर होत. एवढ्याशा त्या खोलीत खूप दाटीवाटी व्हायची, परंतु मी घुसायचो आणि कोपऱ्यातील जागा पकडून अंग आक्रसून  बसायचो. एकेक नट मग स्वामींच्या समोर बसत असे. त्याआधी त्यांच्या पायांना हात लावून तो नमस्कार करी. पहिला मार्कंडेय. त्याचा मेकअप तसा साधाच असे. तरीही  संबंध चेहरा फिकटसा गुलाबी आणि कपाळावर आडवं भस्म. त्यानंतर शंकर. त्याला चेहऱ्यापासून थेट कमरेपर्यंत ते  निळा करीत. शेवटी स्वत:चा मेकअप. आधीच त्यांचे डोळे  गोल गरगरीत. आता मेकअपमुळे त्यात ते उठावपणा  आणीत. मेकअप झाला की केसांचे टोप, पोषाख चढविला  जाई. पाहता-पाहता होणारा हा त्या नटांचा कायापालट मी  पापण्याही न हलवता पाहत राही. तो अनुभव इतका भन्नाट  असायचा की, यात किती वेळ गेला याचं भानच नसायचं...

Tags: अशोक राणे रंगमंच नवसारी शैलेशकुमार हे बाळ कोणाचे मीनाकुमारी कामगार चिमणभाई ड्रामा सिनेमा नाटक जिरय्या स्वामी माझं गुरुकुल सिनेमा पाहणारा माणूस Rangmanch Navsari ShaileshKumar He Baal Kunache Meenakumari Kamgaar ChimanBhai Cinema ashok rane Drama Natak Jiryya Swami Ashok Rane Maajh Gurukul Cinema Pahanara Manus weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके