डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चित्रपट या अत्यंत संवेदनशील माध्यमाबद्दल आशयसंपन्न अंतदृष्टी देणारे, या विषयाचे ज्येष्ठ जाणकार अशोक राणे यांचे सदर या अंकापासून महिन्यातून दोनदा......

दादा कोंडके असं म्हणतात की “सिनेमाने करमणूक करायला हवी.” तीनेक महिन्यांपूर्वी नाशिक येथील दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीने, माझे दोन दिवसांचं ‘चित्रपट आस्वाद शिबिर’ आयोजित केलं होतं. त्यात दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात एका विद्यार्थ्याने हे विधान केलं. त्यावर मी काहीशी चिडक्या सुरात 'प्रतिक्रिया' दिली.

"दादा कोंडके तुम्हांला 'फिलोसॉफर वाटतात का?" कधी नव्हे तो माझा तोल गेला होता. मी चिडलो होतो. आवाजाची पातळी फारशी चढली नव्हती; पण माझी मला ती जाणवली होती. त्या विद्यार्थ्यालाही ती जाणवली असणार. तो गप्पच राहिला. पुढच्याच क्षणी माझ्या लक्षात आलं होतं; की आपलं चुकलंय परंतु त्याक्षणी दुरुस्ती करणही शक्य नव्हतं आणि तशी त्यावेळची मनःस्थितीदेखील नव्हती. राग, चीडचीड मनात साठली होती. मी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करीत, माझं बोलणं चालू ठेवलं. परंतु मनाच्या एका कोपऱ्यात ते राहिलंच, त्यानंतर आजवर मला सातत्याने एक प्रकारच्या अपराधी भावनेनं ग्रासलंय... मी उगाचंच त्या मुलावर चिडलो.... मास्तराने असं चिडीला येणं काही खरं नाही. मी गेली पंधरा वर्षे 'चित्रपट आस्वाद शिबिरात मास्तरकी करतो आहे आणि एकदाही मी असा चिडलेलो नाही.

माझा मित्र प्रसिद्ध नाटककार वामन तावडे एकदा माझ्या शिबिराला तासाभरा साठी हजर होता. त्याला इतरांसारखंच चित्रपट आस्वाद शिबिर' हे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यात नेमकं काय आणि कसं शिकवितात, याविषयी कुतूहल होतं. तिथून निघाल्यानंतर तो मला म्हणाला, "सिनेमातलं तुला किती कळतं, त्यावर तुला किती बरं-वाईट लिहिता येतं, यावर बोलून झालंय. तू त्यावर बोलतोसदेखील चांगलं, हेही या तासाभरात मी अनुभवलं. परंतु मला तुझ्यातली सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे शांत चित्ताने शिकवण, मघा त्या मुलाने, सगळे 'रामायण' सांगून झाल्यानंतर 'सीता रामाची कोण', असला बावळट प्रश्न विचाल्यानंतरदेखील तू शांतपणाने पुन्हा सगळे चित्रपट आस्वादनाचं 'रामायण' पहिल्यापासून सांगायला सुरुवात केलीस. मला तुझे कौतुक वाटलं. तुझ्या जागी मी असतो तर डस्टर फेकून मारला असता." मला अर्थातच बरं वाटलं. कौतुक कुणाला आवडत नाही? परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी होती की माझ्या मनाशी उत्तम शिक्षकाची जी लक्षणं होती, ती माझ्यात थोडीफार अवतरली आहेत, याची जाणीव! आणि परवा माझ्यातल्या त्या मास्तराचा तोल गेला होता...

दोन दिवस जगभरचे चित्रपट दाखवून, ते चित्रपट व त्यांचे दिग्दर्शक, इतर पारंपरिक कला, चित्रपट आणि इतर क्षेत्रांतील विचारवंत असं बरंच काही बोलून झाल्यानंतर, त्यावर सर्व अंगांनी तपशीलवार चर्चा घडवून आणल्यानंतरही जर कुणी दादा कोंडकेचं विधान पुढे केले तर चीडचीड होणारच का? त्याक्षणी माझे चिडणं स्वाभाविक होतं! परंतु पुढल्या क्षणापासून मला वाटायला लागलं... गड्या चुकलंच आपलं!

चित्रपट हे निव्वळ करमणुकीचं माध्यम आहे, ही जाणीव भारतीय समाजमनात सर्वदूर पोचलेली आहे. जात, धर्म, प्रांत, शिक्षण, वय अशा अनेक बाबतीत भारतीयांची विविध मते असतील. परंतु चित्रपटाच्या बाबतीत त्यांच्यात एक आणि एकच मत आहे... चित्रपट हे केवळ करमणुकीचं माध्यम आहे, दोन घटका मस्त टाईमपास, एवढीच चित्रपटाकडून तमाम भारतीयांची एककलमी मागणी आहे. बाकी कशाच्या बाबतीत नसली तरी चित्रपटाच्या (आणि क्रिकेटच्या) संदर्भात भारतीय जनतेत एकात्मतेची भावना लक्षणीय आहे. ज्येष्ठ चित्रपट पत्रकार इसाक मुजावर एकदा गंमतीने म्हणाले होते, ‘अयोध्येला राम मंदिर किंवा मशीद न बांधता एक सिनेमा थिएटर बांधा; एकमेकांवर लाठ्या उगारणारे दोन्ही गटाचे लोक गुण्यागोविंदाने तिथे मिटक्या मारीत सिनेमे पाहतील…’ यातला विनोदाचा भाग सोडला तरी एक तथ्य उरतंच. भारतीय माणसाला सिनेमाचं.... दोन घटका, मस्त टाईमपास करणाऱ्या सिनेमाचं छानसं आकर्षण आहे, नव्हे व्यसनच आहे! दादा कोंडकेंच्या विधानाची साक्ष काढणारा तो विद्यार्थी याच मानसिकतेचा आहे.

हे सारं वाचताना कुणाचाही असा समज होणं स्वाभाविक आहे की मला करमणुकीचं वावडं आहे. दादा कोंडके किंवा तत्सम मंडळी ही माझ्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये आहेत; पण नाही, तसं मुळीच नाही! करमणूक कुणाला नको असेल? दोन घटका हसावं, खिदळावं असं कुणाला वाटणार नाही? तात्पर्य काय, तर करमणुकीची अपेक्षा करणं यात गैर काहीच नाही. परंतु ही करमणूक म्हणजे नेमकं काय, याचे भान नको का ठेवायला? दादा कोंडके यांचंच उदाहरण घेऊ या... हसवण्याचा धंदा करणाऱ्या या अवलियाने 'सोंगाड्या'नंतर पहिल्या दोन-चार चित्रपटात निखळ मनोरंजन केलं. परंतु पुढे पुढे त्यांचा तोल इतका सुटत गेला की त्यांचे चित्रपट हिडीस वाटायला लागले. परंतु त्यांचं जनमानसावर एवढं 'गारुड' झालं होतं की, प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांना कायमच गर्दी करीत राहिले. त्यांना भानच राहिले नाही किंवा त्यांनी ते ठेवलंच नाही, करमणुकीच्या नावावर आपण काय पदरात घेतोय!"

महाराष्ट्रातील एका मोठ्या शहरातल्या एका नामांकित शाळेत माझं खास शिक्षकांसाठी व्याख्यान होतं. हिंदी, मराठी आणि हॉलिवूड-पल्याडचा जगभरचा सिनेमा कसा आहे, व्यक्तिमत्त्व विकासात सिनेमा कशी प्रगल्भतेने भूमिका बजावतो, इतर तमाम पारंपारिक कलांप्रमाणेच सिनेमा हीदेखील कशी एक सशक्त व संपन्न कला आहे; आदी बाबींची शिक्षकांना जाण करून द्यावी, अशी ते व्याख्यान आयोजित करणाऱ्या आमच्या शिक्षक मित्राची कल्पना होती. मी चांगला दीड तास बोललो. माझ्याकडून या मुद्यांच्या संदर्भात जेवढं काही सांगण्यासारखं होतं. ते सारं सविस्तर बोललो. नंतर मुख्याध्यापक बोलायला उभे राहिले. त्यांनी माझे औपचारिक आभार मानले. विषयाच्या जाणकारी आणि मांडणीबद्दल बोलताना ते म्हणाले, "आपले वक्ते छान बोलले. त्यांची विषयाची जाण, अभ्यास चांगला आहे. मांडणी चांगली आहे. परंतु सिनेमा कला आहे, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे शिकायला हवं, हे त्यांचे म्हणणं त्यांच्यासारख्या अभ्यास करणाऱ्याला ठीक आहे. आपल्याला सिनेमा कसा हवा... झ्याक करमणूक करणारा... टाण टाण अशी झकास ढोलकी वाजावी आणि पडद्यावर बाईनं आणि थेटरात आपण धुडगूस घालावा. याला म्हणतात सिनेमा...!”

मी चिडलो नाही. शांत राहिलो. सिनेमाने करमणूक आणि केवळ करमणूकच केली पाहिजे या आग्रही मागणीमुळे प्रेक्षक कसा बहकतो आणि त्याला कसलंच कसं भान राहत नाही, हे अवतीभवती मी पहात आलो होतो. त्यामुळे मला यात नवं काही नव्हतं. हे भान सुटणं कुठल्या थराला जाऊ शकतं, हे त्या दिवशी मी अनुभवत होतो. सिनेमाच्या करमणुकीने नादावलेले एक मुख्याध्यापक श्रोतृवर्गात आपल्या सहकारी शिक्षिका आहेत. हे विसरले होते आणि पडद्यावरच्या बाईचं अघळपघळ (खरं तर ओंगाळवाणं) वर्णन करत सुटले होते. विशेष म्हणजे त्या शिक्षिकांनाही कणभर कुठे अवघडल्यासारखं झालं होतं, असं वाटलं नाही. कारण त्याही अखेर... ‘केवळ करमणूक’, दोन घटका मस्त टाइमपास... या मानसिकतेच्या प्रेक्षकवर्गातच मोडणाऱ्या होत्या. मी आणखी एक गोष्ट नोंदली आणि ती म्हणजे, एका आदर्श शाळेचा शिक्षकवर्गदेखील (त्यात काही अपवाद असतील) थोड्या वेळासाठीही सिनेमाच्या बाबतीत गंभीर व्हायला तयार नव्हता.

अलीकडचीच गोष्ट. मुंबईच्या आमच्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात, माझ्यासमोर बसलेले माझ्यासारखेच दोन पन्नाशीचे मित्र गप्पांत रंगले होते. दोघांचं छान हसणंखिदळणं चाललं होतं. बोलता बोलता एक दुसऱ्याला म्हणाला, "तुमने 'साथिया' देखा क्या? देखो! राणी मुखर्जी क्या सॉलीड माल दिखती यार...!"

राणी मुखर्जीच्या वयाच्या यांच्या मुली असतील. परंतु हे कॉलेजच्या वयाचे असल्यागत तिला 'सॉलिड माल' म्हणणार. कारण सिनेमातली हिरॉईन आणि तिची देहसंपदा ही जिभल्या चाटतच पहायची असते. तिचं पडद्यावर असणं हे प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या मागणीच्या संदर्भातच असतं, ती कुटल्या तरी गोष्टीतली व्यक्तिरेखा असत नाही. ती असते प्रेक्षकांच्या वासना चाळवणारी एक मदनिका! तिच्याकडे कुठल्याही वयात बुभुक्षित नजरेनेच पहायचं असतं. किंबहुना आपलं वयच विसरायचं असतं. वास्तवापासून पळण्यासाठी मसालेदार सिनेमा पहायचा आणि इतकं पळायचं की मग कसलंच भान ठेवायचं नाही. प्रेक्षकांचं दोन घटका छानसं मनोरंजन व्हावं म्हणून निर्माते, दिग्दर्शक कसला कसला मसाला पेरत असतात. बलात्कारसुद्धा असा काही रंगवतात की पडद्यावरच्या खलनायकाइतकाच थिएटरातले पुरुषही तो मनोमन 'एन्जॉय’ करतात आणि हे सारं करमणुकीच्या नावावर चाललेल असतं. त्याने इतकं नादाऊन टाकलेलं असतं, इतकं गारुड केलेलं असतं, की बरं-वाईट ठरविण्याची क्षमताच आपण गमावलेली असते.

माझ्या शिबिरातला तो विद्यार्थी हा त्यापैकीच एक होता. देशभरातल्या, जगभरातल्या तमाम अभिजात कलावंतांचे, त्यांच्या अभिजात कलाकृतींचे दर्शन घडूनसुद्धा, आणि त्याचबरोबर अनेक विचारवंतांचे कलाविषयक आणि पर्यायाने जीवनविषयक भाष्य कानावर पडूनसुद्धा त्याला दादा कोंडके आणि त्यांचे करमणुकीचं तत्त्वज्ञान आठवलंच. खरं तर मीच चिडायला नको होतं... मी ते नेहमीप्रमाणे समजूनच घ्यायला हवं होतं. आपलं चुकलंच याची टोचणी म्हणूनच मनाला लागून आहे.

Tags: कलाकार सिनेमा मराठी चित्रपट दादा कोंडके Artist Movies Marathi Cinema Dada Kondke weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके