डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हशा पिकला. परंतु एक गोष्ट नोंदवण्यासारखी होती ती म्हणजे बहुतांश मुलींनी नकारार्थी मान हलवली. त्या मुलीचं हे उत्तर, त्या मुलाचं निरीक्षण आणि चित्रपट साक्षरतेची चुणूक दाखविणारी मोजकी मुलं, हे सारं अनुभवताना मला सतत आठवणारं ख्यातनाम पंजाबी कवयित्री अमृता प्रितम यांचं विधान आठवलं. त्या म्हणाल्या होत्या, "या देशात एकाच वेळी अनेक शतकं चालू असतात.’’

1981 ची गोष्ट आहे ही...! मी प्रथमच आमच्या ‘प्रभात चित्र मंडळ' या फिल्म सोसायटीच्या कार्यकारिणीचा सदस्य झालो होतो. माझ्यासह आणखी तिघे होते. सर्वसाधारण सभेनंतर अनौपचारिक गप्पा मारताना प्रभातचे एक संस्थापक आणि खजिनदार दिनकर गांगल यांनी आम्हां चौघांना एक प्रश्न विचारला.

"फिल्म सोसायटी चळवळीबद्दल तुम्हांला काय वाटतं? 'प्रभात' ने नेमकं काय करायला हवं?"

मी सोडून त्या तिघांनी एकाच वेळी बोलायला सुरुवात केली. मग एकेक जण बोलला. मी गप्पच होतो. त्यांचं बोलून झालं तसं गांगलांनी माझ्याकडे मोर्चा वळविला.

‘‘काय रे, तू का बोलत नाहीस?" ही माझी सवय. विशेषत: विशीच्या जवळ आल्यानंतर अंगात भिनलेली. आपल्याला खूप काही कळलंय, आपलीही काही मतं आहेत, असा आविर्भाव न आणता गप्प राहायचं आणि मग थोडा वेळ घेऊन बोलायचं. त्या आधी माझ्यातदेखील तो दुर्गुण होता. मिसरुडं आणि मतं एकाच वेळी फुटतात हे माझ्याही बाबतीत घडलं होतंच. त्यात पुन्हा मी हुशार विद्यार्थी होतो. मास्तरांचा प्रश्न विचारून संपायच्या आत सर्वांत आधी माझं बोट वर आणि मग वर उचललेल्या हाताआडून वर्गाकडे काहीशा अहंभावाने पाहणं... पाहा मी किती हुशार आहे! केवळ जातीच्याच संदर्भात नव्हे, तर इतरही अनेक बाबतींत अनेकांमध्ये हा 'उच्चवर्णीय' अहंभाव असतो. माझ्यातदेखील तो होता. परंतु नववीत असताना कुठेतरी आयझॅक न्यूटन यांचं एक वाक्य वाचलं आणि हा तथाकथित ‘उच्चभ्रूपणा'चा, सर्व काही 'कळतंय'चा अहंभाव हळूहळू गळून पडला. ते वाक्य होतं... "मला तुम्ही महान शास्त्रज्ञ, महान विद्वान म्हणता, पण विज्ञान हा जर सागर आहे, तर त्या सागराकाठच्या विस्तीर्ण वाळूतला एक कण आताशा कुठं माझ्या हाती आलाय असं मी म्हणेन."

मला ह्या शब्दाचा मार कायमचा पुरला. त्यामुळे मी सावध झालो. इतकंच नाही तर आपल्याला अजून बरंच काही कळायचंय, हेही लक्षात आलं आणि सर्वांच्या आधी वर जाणारं बोट शहाणं झालं. त्यामुळे गांगलांचा प्रश्न येताच मी चटकन काही बोललो नाही. त्या तिघांचं बोलून झाल्यावर आणि गांगलांनी पुन्हा एकदा थेट मलाच विचारल्यावर मी बोललो.

‘‘आपण आता इथे 'प्रभात’ च्या ऑफिसमध्ये बसून फिल्म सोसायटी चळवळ आणि जागतिक सिनेमाच्या गप्पा मारत आहोत. मला वाटतं आपल्या ऑफिसच्या चारही दिशांनी जाणाऱ्या माणसांच्या लोंढ्यात अशी कितीतरी माणसं असतील, ज्यांना उद्या या जागतिक सिनेमाची ओळख झाली तर त्यातील अनेक जण या बाबतीत आपल्यापेक्षा अधिक जाणकार निघतील. त्यामुळे मुळातच मूठभर लोकांपर्यंत असलेली ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत नेली पाहिजे.’’

1982 किंवा 83 साली नटवर्य प्रभाकर पणशीकर नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. आता मुंबईत माटुंगा इथे उभं राहिलेलं यशवंत नाट्यसंकुल तेव्हा बरंच चर्चेत होतं. मी पणशीकरांना एक पत्र लिहिलं, माझं पत्र त्यांना आवडलं. त्यातील मुद्दे त्यांना पटले. 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी माझ्या त्या पत्राचा उल्लेखदेखील केला. प्रश्न माझ्या कौतुकाचा नाही, माझा मुद्दा त्यांनी उचलून धरला होती. त्यात मी म्हटलं होतं,"कलाकार आणि विद्वान फक्त मुंबई-पुण्यातच असतात, हा समज निदान आता तरी सोडून देऊ या आणि महाराष्ट्रात सर्वदूर छोट्या-मोठ्या शहरांत, खेड्यापाड्यांत असलेल्या कलाकारांचा शोध घेऊ या आणि त्यांना मुंबई-पुण्याच्या मान्यवर व्यासपीठावर आणू या. त्यासाठी नव्याने उभं राहत असलेलं नाट्यसंकुल महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.’’

आज हे सारं आठवण्याचं कारण सध्या मी माझ्या 'फिल्म ॲप्रिसिएशन यात्रे'च्या निमित्ताने करत असलेला महाराष्ट्राचा दौरा 7 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या पाच आठवड्यांत मी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई परिसर या भागातील 25 शहरांतील 25 कॉलेजांत जाऊन आलो, आणि मी 
मुंबई-पुण्यापलीकडल्या जगाविषयी वेळोवेळी जे बोलत आलो त्याचा प्रत्यय तिथे घेतला. जिथे एक प्रकारच्या प्रगत सांस्कृतिक वातावरणाचा अभाव आहे, अशा दूरवरच्या छोट्या शहरातूनदेखील मला सिनेमाची जाण असलेली मुले भेटली. मला हे अजिबात अचंबित करणारं नव्हतं. सुखावणारं निश्चितच होतं. याबरोबरच आणखी एक गोष्ट लक्षात आली. मुंबई / पुण्याच्या लोकांना तथाकथित उच्चभ्रूपणाचा अहंगंड आहे, आणि या इतर ठिकाणच्या लोकांना एक प्रकारचा न्यूनगंड आहे. अर्थात, ते मला अतिशय स्वाभाविक वाटल्यामुळे मी ते समजूनदेखील घेतलं. हा दोष त्यांचा नसून आपला म्हणजे मुंबई/पुण्यावाल्यांचा आहे. हा न्यूनगंड आपण त्यांना दिला आहे. तेथील अनेकांनी तो वेळोवेळी भिरकावूनही दिला आहे.

माझ्या या यात्रेचा हेतू आहे चित्रपट शिक्षणाविषयी समाजात, विशेषतः शिक्षणक्षेत्रात जागरूकता निर्माण करणं! शाळा-कॉलेजच्या पातळीवर चित्रपटविषयक शिक्षण दिलं जावं, असं फिल्म सोसायटी चळवळीतील आम्हां मंडळींना कायम वाटत आलंय आणि चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यांचा पाठपुरावादेखील करीत आलोय. तर हे शिक्षण नेमकं कशा प्रकारचं असेल, असावं? याची कल्पना सर्वप्रथम विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि अर्थातच पालकांना द्यावी, म्हणून मी महाराष्ट्रातल्या 50 शहरांत एक दिवसाचं फिल्म ॲप्रिसिएशन वर्कशॉप, म्हणजेच चित्रपट रसास्वाद कार्यशाळा ठरविली. एरवी यात आम्ही जवळपास 25 विषय शिकवितो; परंतु एका दिवसात आणि तेही सहा तासांत ते शक्य नाही. म्हणून मी फक्त पाचच महत्त्वाचे विषय निवडले. चित्रपट इतिहास (माध्यम, स्वरूप आणि कार्य), चित्रपटाची भाषा, चित्रपट : आणि इतर पारंपरिक कला, चित्रपट कला की धंदा आणि चित्रपट रसग्रहण! या पाच विषयांवर बोलता बोलताच विषयाच्या आणि मुद्यांच्या अनुषंगाने चित्रपटाचे जनक फ्रान्सचे ल्यूमिर बंधू यांचा जगातला सर्वांत पहिला चित्रपट, दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र'मधली तसेच जगभरच्या इतर काही चित्रपटांतली महत्त्वाची दृश्ये, काही लघुपट मी दाखवतो. या यात्रेदरम्यान चित्रपट साक्षरतेच्या संदर्भातले काही अनुभव मी घेतले आणि वर म्हटल्याप्रमाणे ही साक्षरता दूरवरच्या छोट्या गावांतून आहे याचा प्रत्यय घेतला. साक्षरतेचे प्रमाण कमी असेल, तसं ते मुंबई-पुण्यातही कमीच आहे. परंतु या साक्षरतेविषयीचं कुतूहल मात्र अनेक ठिकाणी जाणवलं आणि माझ्यापुरतं म्हणायचं तर ते सुखावणारं होतं, प्रेरणादायक होतं. कसं ते सांगतो. 

धुळे येथील जयहिंद कॉलेजात एका मुलीने मला एम.एफ.हुसेन यांच्या 'गजगामिनी'विषयी विचारलं. तिने दोनेक वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. त्याविषयी तिच्या मनात अनेक प्रश्न होते. परंतु त्यांची उत्तरं देणारं कुणी सापडत नव्हतं. चित्रपट रसास्वाद कार्यशाळेमुळे तिला तो चित्रपट समजून घ्यायला दिशा सापडली आणि नव्याने काही प्रश्न तिला पडले. ते सारे तिने मला विचारले. मी माझ्या परीने त्यांची उत्तरे दिली. एकीकडे तिचे समाधान झाल्यासारखे वाटले, तर दुसरीकडे फारशा प्रचलित नसलेल्या या वेगळ्या फिल्म स्कूलविषयी तिला नव्याने कुतूहल वाटले. त्यातल्या काही चित्रपटांची यादी तिने माझ्याकडून घेतली. एरवी सर्वत्र चित्रपटांसंबंधी होणारी चर्चा आणि पडणारे प्रश्न इथेही होतेच. परंतु 'गजगामिनी' समजून घेण्याचा प्रयत्न करणारी एखादी होतीच. आणि नेहमीच्या वाटणाऱ्या चर्चेलादेखील वेगळी दिशा देणाऱ्या प्रतिक्रिया आल्या.

‘हॅपी अॅनिव्हर्सरी' हा लघुपट दाखविल्यानंतर रसग्रहणाच्या अंगाने सविस्तर चर्चा झाली. चित्रपटाची भाषा, आशय आणि आकृतिबंध यांचा परस्परसंबंध असे अनेक मुद्दे आले. नंतर जेवणाची सुटी झाली. मी वर्गाबाहेर पडत असताना एक मुलगा आला आणि म्हणाला, 

"सर मुझे कूछ पूछना है। मैं हिंदी में पूछुंगा।’’

"कोई बात नहीं। मैने शुरू में ही कहा था, हम किसी भी भाषा में बोल सकते हैं। लेकिन आप ने सब के सामने क्यों नहीं  पूछा?"

‘‘थोडा डरसा लगा. अब बोल सकता हूँ। सर, इस फिल्म में जो पत्नी थी, उसने पति घर आने से पहले ही खा लिया. अगर वो भारतीय नारी होती, तो ऐसा नहीं होता।" 

मी म्हटलं,

"इसका थोडा विस्तार से उत्तर देना होगा. पहले खा लेते हैं। बाद मे बोलते हैं।’’ 

त्याने होकारार्थी मान हलवली. आम्ही जेवायला गेलो. जेवणानंतरच्या सत्राची सुरुवात मी त्याच्या निरीक्षणानेच केली. अर्थातच त्याचं नाव न घेता! आपण हे सर्वांसमोर विचारलं तर मुलं हसतील, ही त्याला वाटणारी भीती मी समजून घेऊ शकलो. मलाही त्याचं हसू होऊ द्यायचं नव्हतं. "तुमच्या एका मित्राचं म्हणणं असं आहे," असे म्हणत, मी त्याचं निरीक्षण नोंदवलं आणि मुलांनाच त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितलं. त्यावर इकडची तिकडची थोडी चर्चा, थोडे हास्यविनोद झाल्यानंतर एक मुलगा म्हणाला,

"खरं तर, असा प्रश्न पडणंच चुकीचं आहे. कारण या लघुपटात पॅरिसमधल्या जोडप्याची गोष्ट सांगितलेली आहे. मग भारतीय स्त्री नवऱ्याच्या आधी जेवली असती की नाही, हा मुद्दाच फिजूल आहे.’’

एरवी 'विदिन द फ्रेम' बोलायला हवं, हे मला सांगत बसावं लागतं. इथं ते परस्पर एका मुलानेच सांगून टाकलं. फरक फार तर इतकाच की त्याने 'विदिन द फ्रेम' या संकल्पनेचा उल्लेख केला नाही. परंतु तो मुद्याचं आणि नेमकं बोलला होता. मी नंतर गंमत म्हणून मुलींना विचारलं, "तुम्ही जेवणार की नाही नवऱ्याच्या आधी?"

हशा पिकला. परंतु एक गोष्ट नोंदवण्यासारखी होती ती म्हणजे बहुतांश मुलींनी नकारार्थी मान हलवली. त्या मुलींचं हे उत्तर, त्या मुलाचं निरीक्षण आणि चित्रपट साक्षरतेची चुणूक दाखविणारी मोजकी मुलं, हे सारं अनुभवताना मला सतत आठवणारं ख्यातनाम पंजाबी कवयित्री अमृता प्रितम यांचं विधान आठवलं. त्या म्हणाल्या होत्या, "या देशात एकाच वेळी अनेक शतकं चालू असतात.’’

हे आहे खरं आपल्या देशाचं, समाजाचं वास्तव! परंतु या वास्तवाच्या आसपासच नव्याची चाहूल घेणारी स्वागतशीलताही दिसते, ही गोष्ट निश्चितच सुखावणारी आहे. आणि मुख्य म्हणजे ती मुंबई-पुण्याच्या पल्याडदेखील आहे. त्याचा प्रत्यय केवळ मी धुळे इथेच घेतला नाही, तर अगदी भंडाऱ्यापर्यंत महाराष्ट्रभर पाहिला. अनुभवला!

Tags: सांस्कृतिक चळवळ ग्रामीण भाग - न्यूनगंड शहरी भाग - अहंगंड चित्रपट साक्षरता पॅनोरमा cultural movement rural areas - inferiority urban areas - egoism film literacy panorama weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके