डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला वाटते की आनंद ही एक वृत्ती आहे. ती स्थळ, काल आणि व्यक्तिसापेक्ष असावी. ‘चिंटू’ या गाजलेल्या व्यंगचित्र मालिकेतील चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांची एक व्यंगचित्र मालिका आठवली. पहिल्या चित्रात चिंटूचे पप्पा वर्तमानपत्र वाचताहेत- रोजच्याच दंगलीच्या, मारामारीच्या, अपघाताच्या, खून, बलात्कार याच्या बातम्या वाचत असताना ते उद्वेगाने म्हणतात, ‘‘अरे, या जगात आनंदाची काही चांगली बातमी आहे की नाही?’’ दुसऱ्या चित्रात वर्तमानपत्र थोडे बाजूला करून चिंटू त्यांना सांगतो, ‘‘पप्पा, गणिताच्या चाचणी परीक्षेत माझा पहिला नंबर आला’’; तिसऱ्या चित्रात पप्पांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अभिमान आणि आनंद दिसत होता. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ याचा अनुभव घ्यायचा झाला तर आपल्याला तर पुलंसारखा आनंदयात्री होऊनच घ्यावा लागेल.

आठवीच्या मराठीच्या पुस्तकात अनंत काणेकरांचा ‘मोठे शून्य’ हा निबंध होता. निबंधात त्यांनी बालपणी त्यांना पडलेला एक प्रश्न मांडला होता की पाचातून पाच गेले की शून्य उरते आणि पाच हजारांतून पाच हजार गेले तरी शून्यच उरते हे कसे काय? बालपणी त्यांना वाटे- पाच हजारांमधून पाच हजार वजा केल्यावर येणारे शून्य पाचातून पाच वजा केल्यावर येणाऱ्या शून्यापेक्षा मोठे असले पाहिजे.

त्याचे उत्तर त्यांना मोठे झाल्यावर मिळाले, असे त्यांनी प्रतिपादन केले होते. त्यांच्या मते सामान्य माणसाचे सुख आणि दु:ख सारखेच असते आणि मोठ्या माणसाचे सुख आणि दु:ख सारखेच असते. पण सामान्य माणसाचे जसे सुख लहान असते तसेच त्याचे दु:खही लहान असते. आणि मोठ्या माणसाचे सुखही मोठे असते तसेच त्याचे दु:खही मोठे असते. निष्कर्ष हाच- की दोघांच्याही सुखदु:खांची वजाबाकी केली तर शून्यच उरते, म्हणून पाचातून पाच केले आणि पाच हजारांतून पाच हजार गेले तरी शून्यच उरते.

पण या निष्कर्षाला छेद देणारी काही उदाहरणे साहित्यात आणि प्रत्यक्ष जीवनात आढळतात. कालनिर्णय दिनदर्शिकेच्या एका पानावर पु.ल.देशपांडे यांचा एक लेख वाचला होता. त्यामध्ये गुत्तीकर नावाचे एक पात्र होते. ते नकारात्मक वृत्तीचे होते. पुलंनी त्याचे वर्णन ‘गुत्तीकर म्हणजे की चालते बोलते विरजण’ असे केले होते. आणि दुसरे पात्र म्हणजे य.य. कुलकर्णी. हा माणूस प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा. बाजारात चांगले मटार मिळाले तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असे. साध्या साध्या गोष्टींतसुद्धा आनंद भरलेला असतो, हे आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांचे निरीक्षण प्रत्यक्ष जीवनातसुद्धा दिसून आले. पु. ल. म्हणायचे की, एखाद्या कलाकाराची तीन तासांची मैफल कदाचित रटाळ झाली असेल, पण त्या तीन तासांत जर तीन मिनिटे जर तो चांगला गायला असेल किंवा एखादी तान/जागा अशी काही घेतली असेल की ती लक्षात ठेवा. तिचा आनंद घ्या.

सात-आठ वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामाकरता सतत मुंबईला जावे लागे. अशाच एका प्रवासात डिमेलो रस्त्यावरील दाणाबंदर पदपथावरील झोपड्या उठवलेल्या दिसल्या. पदपथ पूर्ण मोकळा केला होता. अशा पदपथावर एक पन्नाशीतला अगडबंब गृहस्थ आणि एक तीन-चार वर्षांची मुलगी दिसले. बहुधा आजोबा आणि नात असे नाते असावे. सकाळचे दहा वाजले होते. आजोबांच्या अंगात फक्त निळ्या रंगाची साध्या कापडाची कळकट आणि कित्येक दिवसांत धुतलेली नसावी अशी चड्डी आणि नातीच्या अंगात त्याहून कळकट फ्रॉक होता. आजोबांची दाढी आणि केस अस्ताव्यस्त वाढलेले. नातीचीही परिस्थिती तशीच. केसांच्या झिंज्या झालेल्या आणि दोघांच्याही केसाला तेलच नव्हे तर पाणीही त्याला कित्येक दिवसांत लागलेले नसावे, असे दिसत होते. कदाचित सकाळपासून अन्नाचा एखादा कणही पोटात गेलेला नसावा. आजोबा पदपथावर उन्हात भिंताला टेकून बसले होते आणि आणि नात त्यांना नाच करून दाखवत होती. मध्येच त्यांच्या गळ्यात पडत होती आणि आजोबा खळखळून हसत होते आणि दोघांच्याही आनंदाला उधाण आले होते. क्षणभर वाटले की आनंद आनंद म्हणतात तो हाच. सर्वच बाबतींत उणीव असूनही ते दोघे इतके आनंदी दिसत होते. मग प्रश्न पडला की नेमके आनंद म्हणजे काय?

पन्नास-साठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात बाबू टांगेवाला नावाचा एक क्रिकेटप्रेमी होता. साधा टांगेवाला- पण त्याच्या क्रिकेटवरील प्रेमामुळे जगप्रसिद्ध झालेला. सामन्यात एखाद्या खेळाडूने शतक मारले की बाबू मैदानावर पळत पळत जाऊन त्या खेळाडूला फुलांचा हार घालत असे. हाराची किंमत ती काय असणार? पण तो हार म्हणजे बाबू टांगेवाला नावाच्या क्रिकेटप्रेमीने मनापासून दिलेली दाद असे. हार घातल्यावर खेळाडूच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे आणि हा सन्मान परदेशी खेळाडूसुद्धा तितक्याच आनंदाने स्वीकारत. आजकाल कोटी रुपयांची बक्षिसे स्वीकारताना दिसणारा खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा त्या हार स्वीकारताना झालेल्या आनंदापुढे फिका पडतो. मराठा वृत्तपत्रात आचार्य अत्रे यांनी बाबूवर अग्रलेख लिहिला होता.

आजकाल आपण ‘पद्मश्री’सारख्या पुरस्कारासाठीच्या शिफारशीसाठी धडपडणाऱ्या आणि नावलौकिकासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे वर्तमानपत्रांत वाचतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या गाजलेल्या कादंबरीतील एक पात्र ‘कारभारी’ तालमीच्या उद्‌घाटनासाठी आलेला असताना औंधचा राजा त्याला पाठीवर हात ठेवतो आणि ‘काय पाटील?’ म्हणून संबोधतो. राजाने आपल्याला ‘पाटील’ संबोधले याचा त्याला इतका आनंद होतो आणि त्यातच त्याला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तालमीचे उद्‌घाटन झाल्यावर काही दिवसांतच कारभारी मरण पावतो. मरतेसमयी तो आपल्या जवळच्या आप्तेष्टांना सांगतो की, मी आता चाललो; पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. एवढा मोठा राजा आला त्याने आपल्याला ‘पाटील’ म्हणून हाक मारली यातच त्याच्या जीवनाचे सार्थक झाले, आता मिळवण्यासारखे काही राहिले नाही म्हणून आनंदाने निरोप घेतो.

‘जोगवा’ चित्रपटातील असाच एक प्रसंग. एका मुरळीचा एका धनिकाशी झुलवा लागणार असतो आणि तिचे इतर साथीदार वाघ्या आणि मुरळी तिला विचारतात की झुलवा लागल्यावर आम्हांला काय देणार? ती अगदी आनंदाने सांगते- यल्लमाच्या जत्रेला गेल्यावर सगळ्यांना भजी खायला देईन. या आश्वासनावर सर्वांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि हास्य शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. त्या सामान्य माणसाच्या जीवनात केवळ जत्रेतली भजी खाणे हीसुद्धा एक चैनीची गोष्ट होती आणि यात केवढा आनंद भरलेला आहे, हे या प्रसंगात छान दाखवले आहे. एका गंभीर विषयावरच्या ह्या चित्रपटातील हा एक आनंद देणारा सुंदर प्रसंग आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नायिका जयश्री गडकर यांनी एकदा त्याच्या मुलाखतीत सांगितलेली आठवण- त्या एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर एका हमालाने त्यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली गं’ या गाजलेल्या लावणी नृत्यासाठी कौतुक म्हणून त्यांना सहा आणे बक्षीस दिले होते. दिग्दर्शक अनंत माने यांना ही गोष्ट सांगितल्यावर त्यांनी हे सर्वांत मोठे बक्षीस आहे आणि याच्यापुढे सर्व पुरस्कार फिके आहेत असे सांगितले होते. ते पैसे जयश्रीतार्इंनी पुडीत बांधून ठेवून ती पुडी देव्हाऱ्यात कित्येक वर्षे जपून ठेवली होती.

असेच दुसरे उदाहरण म्हणजे जगप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचे. उस्ताद बरकत आली खां आणि मुबारक अली खां यांच्याकडे शिकताना खांसाहेब सर्व शिष्यांना आव्हान देत की शिकवत असताना त्यांनी गायलेली बंदिश जो कुणी लगेचच आणि बरोबर सादर करून दाखवेल त्याला ते पाच रुपये बक्षीस देत असत. असे पाच-पाच रुपये त्यांनी तीन वेळा जिंकले आणि ते तसेच जपून ठेवले आहेत. या पाच रुपयांपुढे त्यांना जगातली सर्व संपत्ती तुच्छ वाटते.

अगदी अलीकडची गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील आपल्या नृत्याने, अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अजूनही घर केलेल्या जुन्या पिढीतील नायिका वैजयंतीमाला या पुण्याला एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. बालगंधर्व नाट्यगृहात कार्यक्रम होता. त्यांना थोडा उशीर झाला होता. नाट्यगृहात जाण्यापूर्वी त्यांनी वेणीवाल्याकडे मोगऱ्याची वेणी खरेदी केली. वेणीची किंमत फार तर पाच-दहा रुपये असेल. पैसे देत असताना त्या वेणीवाल्याने त्यांना मी तुम्हांला ओळखले असून, मी तुमचे खूप चित्रपट पाहिले आहेत आणि मी तुमचा चाहता आहे, असे सांगून वेणीचे पैसे स्वीकारण्यास नकार दिला. इतक्या वर्षांनंतरही एक चित्रपटरसिक आपल्याला ओळखतो आणि दाद म्हणून वेणीचे पैसे घेण्याचे नाकारतो हे पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. आणि त्यांच्या भाषणात त्यांनी त्याचा विशेष उल्लेख केला होता. इतर कुठल्याही पुरस्कारापेक्षा एका रसिकाने दिलेली फुलांची वेणी त्यांना खूप आनंद देऊन गेली असे त्यांनी सांगितले होते.

मला वाटते की आनंद ही एक वृत्ती आहे. ती स्थळ, काल आणि व्यक्तिसापेक्ष असावी. ‘चिंटू’ या गाजलेल्या व्यंगचित्र मालिकेतील चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांची एक व्यंगचित्रमालिका आठवली. पहिल्या चित्रात चिंटूचे पप्पा वर्तमानपत्र वाचताहेत- रोजच्याच दंगलीच्या, मारामारीच्या, अपघाताच्या, खून, बलात्कार याच्या बातम्या वाचत असताना ते उद्वेगाने म्हणतात, ‘‘अरे या जगात आनंदाची काही चांगली बातमी आहे की नाही?’’ दुसऱ्या चित्रात वर्तमानपत्र थोडे बाजूला करून चिंटू त्यांना सांगतो, ‘‘पप्पा गणिताच्या चाचणी परीक्षेत माझा पहिला नंबर आला.’’ तिसऱ्या चित्रात पप्पांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अभिमान आणि आनंद दिसत होता.

लहानपणी सुट्टीला आल्यावर आमचा राममामा परत जाताना एक एक रुपया देत असे. खरे तर दोन किंवा पाच पैशातसुद्धा त्या वेळी लहान मुलांच्या खेळाच्या, खाऊच्या गरजा भागत. पतंग पाच पैशांत येत असे, दोन पैशांत काचेच्या गोट्या येत असत. श्रीखंडाच्या गोळ्या येत. दहा पैशांत भोवरा येत असे. मावळे आणि शिवाजी दहा-पंधरा पैशांत मिळत. अशा वेळी एक रुपया म्हणजे गाडीच्या चाकाएवढा भासत असे. आठ-आठ दिवस तो रुपया न मोडता खिशात घालून मित्रांना माझ्याकडे रुपया आहे म्हणून दाखवत असू. तो लवकर मोडावासा वाटत नसे, रुपयाची ऊब म्हणजे काय हे त्या वेळी जाणवे. तशी रुपयाची ऊब नंतरच्या आयष्यात लाखो रुपये मिळाले तरी जाणवली नाही. 40-45 वर्षांनंतर जेव्हा हे फोनवर बोलताना मामाला सांगितले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला इकडे लँडलाइन फोनवर बोलताना त्याच्या बोलण्यातून दिसला होता.

तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ याचा अनुभव घ्यायचा झाला तर आपल्याला पुलंसारखे आनंदयात्री होऊनच घ्यावा लागेल. म्हणजे लहान लहान गोष्टींत किती आनंद भरलेला असतो ते कळेल आणि सुखदुःखांच्या वजाबाकीनंतर उरणारे शून्य लहान की मोठे हा प्रश्नच मनात येणार नाही.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके