डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

रा. शं. दातार नाट्य पुरस्कार : आनंदभोग मॉल
मनोगत । आशुतोष पोतदार 

माणूस कितीही आधुनिक झाला, प्रागतिक झाला, सुसंस्कृत झाला, सुशिक्षित झाला तरी त्याच्या मनातली जात, जाता जात नाही. या नाटकाचा हा आशय केवळ जातीपुरताच मर्यादित राहत नाही, तर आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पर्यावरणाशी तो नातं जोडतो आणि आधुनिक माणसाचा, जगाचा एक सर्वसमावेशक छेद अत्यंत तरलतेनं, सूचकतेनं आणि नाट्यपूर्ण रीतीनं प्रकट करतो. पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्या व्यामिश्रतेत धडपडणारा माणूस इथं प्रत्ययाला येतो. मिळणाऱ्या संधीचा फायदा घेऊन पुढे जाणारा ब्राह्मणेतर वर्ग, दुखावलेला ब्राह्मण वर्ग, जागतिकीकरणाचा रेटा, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांत प्रत्येक मूल्याशी करावी लागणारी तडजोड आणि अस्तित्वासाठी करावी लागणारी धडपड या सर्वांतून मार्ग काढायला नायकनायिकेला हवाय फक्त चकचकाटानं दिपवणारा मॉल.

गुरुवारच्या भजनाची वेळ होते. भजनाच्या दुकानात आजोबा, गुरुवय्या स्वामी, देवाप्पा नायकवडी, बसगोंडा पाटील, पांडबा हेगडे टाळ सोडवत, तबला लावून आणि पेटी धरत सूर लावतात. आजोबांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं पण खादी चळवळ आणि विठ्ठलाच्या नादानं धंदा करायला जमला नाही. म्हणून दुकानाच्या जागी भजन थाटलं तेव्हापासून त्याला भजनाचं दुकान म्हणतात. तर, वीणा घेऊन मी मधे बसलोय आणि पंचपदी संपायला यायची वाट बघतोय. तेवढ्यात, म्हमूलाल सांगावकर नेहमीसारखे वाऱ्याच्या लकेरीसारखे येतात. तबल्यावर बसतात. सगळे हरकलेत कारण म्हमूलाल सांगावकरांची जादूई बोटे. पंचपदी संपायची ती विठ्ठोबारखुाइ र् च्या गजराने. विठोबाच्या गजराला तबल्याचा ठेका माझ्यासाठी ॲडजस्ट करायचा नित्याचा भाग, कारण मी नाचणार असतो. म्हमूलाल माझ्यासाठी नजाकतीचे बोल सादर करतात, कारण दमवेपर्यंत मला नाचवायचे हा त्यांचा अजेंडा! आज नेहमीपेक्षा झोकात नाचला म्हणून सगळ्यांचा जास्ती चहा प्यायचा मला आग्रह. बाळाबाई तिचा गोड चहा आणून देते. आठवड्यात मला एकदाच मिळणारा चहा मी पितो. दरम्यान, सगळे दिवसभरातल्या तक्रारी, आपापले उद्योग एकमेकांना सांगतात. बसगोंडा पाटलांचे चहा पिऊन होते. ते मला खांद्यावर घेऊन घराकडे सोडतात. मी अर्धाुर्धा झोपलेला. नाटक नावाच्या परफॉर्मिंग आर्टसाठीचं हे माझं पहिलंवहिलं एक्स्पोझर. भरभरून संवाद साधणारं. असं काही मला लिहिता येईल काय? स्पेसचं असं डायनॅमिक माझ्या नाटकातून मला उभं करता येईल काय? हे माझ्यासाठी नेहमीचे मुद्दे राहिले आहेत. मला वाटतं की नाटक हे माध्यम अवकाशाच्या अशा मुद्यासाठी व्हलनेरबल असतं. रूपातच ते लपलंय - अंगभूत असावं - कारण त्याचा लाइव्हलीनेस, त्याचं ‘मधले’पण.

म्हटलं तर एका बाजूला ते आत्यंतिक व्यक्तिगत असतं. दिवसभर राबणाऱ्या बाळाबाईला चहासाठी उशीरपर्यंत ताटकळत बसावं लागायचं. शिवाय, मोजक्या पैशात दूध आणि साखरेसाठी चिडचिड व्हायची ती निराळीच. भरीत भर कसला ‘च्या’ करतीस म्हणून भजनकरी बापयं नाकं मोडायचे ते वेगळंच. दुसऱ्याच क्षणी, ‘मी असण्या’ची सारी चिलखतं फेकून लोकांना सामोरं जाण्याची सामूहिकता परर्फॉन्समधे असते जी मला भजनाच्या अवकाशाने पयल्यांदा दाखविली. अगणित शक्यता निर्माण करत लोकावकाशात रममाण होणारे आणि वेळप्रसंगी आव्हान देणारे नाटकाचे ‘मधले’पण मला भावते. आणि तसे नाटक लिहिण्याची आकांक्षा मी बाळगून असतो. नाटक लिहिणे - एखादी कविता लिहिणे वा भाषांतर करणे म्हणजे स्वत:कडे आणि भवतालाकडे, लोकावकाशाकडे पहाण्याची नामी संधी असते. लिहिताना पाहाण्याची दृष्टी मिळते. नाटक लिहून होते आणि सतर्क समाज ते रंगमंचावर पाहू लागतो तेव्हा ती दृष्टी विकसित होत जाते. पण, लिहिण्याच्या आधी आपण ‘बघण्या’ची दृष्टी घडवत असतो. आपण काय वाचतो, कुठे राहतो, आपला इतिहास काय, त्या इतिहासाकडे आपण कसे बघतो या सगळ्यांतून आपले ‘बघणे’ घडत असते.

‘आनंदभोग मॉल’ लिहिताना कोल्हापूर आणि भवतालाने दिलेल्या दृष्टीतून स्वत:कडे आणि भवतालाकडे बघू शकलो. ‘बघणे’ निव्वळ भौगोलिक नव्हते. ते, नाटक लिहिताना, माझ्या ओळखीशी निगडित होते. प्रकटीकरणाच्या अनेक शक्यता सांगाव आणि कोल्हापूरने दिल्या. गावे आणि गावांचे ‘असणे’पण मला भावनिक पाठबळ देतात. ऊर्जेला बळ देतात. इंपल्सेसना जागरूक करतात. एका क्षणी नाटकाच्या रचनेचे, रूपाचे आणि आशयाचे भान देतात. या अर्थाने लिहिणे हा कोरडा व्यवहार नसतो - र्फॉ शोधण्याचा किंवा आशयाने भरण्याचा. या संदर्भात भावना आणि विचार यांची रूढार्थाने केलेली विभागणी आपल्याला मान्य करता येत नाही. आशय आणि रूप असेच आपल्या ओळखीचे भाग असतात - एकत्रितपणे. पात्रे, त्यांचे विचार - रूप, रूपाचे भान आणि त्याची रचना निर्मितिप्रक्रियेत सहज मिसळलेले असतात. लेखक म्हणून आपण त्यात सामील होतो आणि लांबवर पण उभे असतो. दसरा चौकात उभारल्याप्रमाणे. कोल्हापूरचा दसरा चौक मला सामील होणे, तटस्थ राहणे, चिकित्सा करणे, समर्थन करणे अशा वेगवेगळ्या बाबींचा मेळ घडवणारा अवकाश वाटतो. सरंजामी व्यवस्था, पारंपरिक विचारचौकटी, अधलीमधली आधुनिकता आणि त्याचबरोबरीने प्रस्थापित ज्ञानव्यवस्थेला हालवत नवपरिवर्तनाला दिशा देणाऱ्या यंत्रणा इथे एकसाथ सतर्क असतात. सांगावतून शिकायला येताना रस्ता इथे थांबायचा आणि मग, तिथून पुढे गावाच्या संदर्भात ‘आधुनिक’ वाटणारे रस्ते भेटायचे. सरंजामी चौकट आणि जातव्यवस्था भक्कम ठेवत ‘आधुनिक’तेकडे आणि ‘प्रगती’कडे वाटचाल करणाऱ्या बदलातील कोल्हापूरसारखी गोलबल शहरे ‘ना इधरका ना उधरका’ अशा अवस्थेत लटकलेली. ‘शिवाजी आमचा आणि शिवाजी तुचा’ अशी द्विध्रुवात्म मांडणी अशाच गोलबल जगातल्या राजकारणाचा परिपाक. भांडारकर आणि जेम्स लेन प्रकरणानंतर द्विध्रुवात्म ओळखी आणि त्यामागच्या अस्मितांचे राजकारण अधिकाधिक मजबूत होत आहे. ओळख आणि अस्मिता यांच्या जोरावरचे ताणेबाणे आणि राजकारण आपली विविध रूपे दाखविताना गोविंद पानसरेंनी लिहिलेल्या 


‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेच्या निमित्ताने ‘दसरा चौक परंपरे’ला व्यापक भान दिले. इथे, मुद्दा फक्त पुस्तिकेचा नाही तर ‘शिवाजी कोण होता चळवळी’ने द्विध्रुवात्म चौकटी मोडून समाजाला मूलगामी जीवनदृष्टी देण्याचा भाग आहे. एका टप्प्यावर मी जाँ जने या फ्रेंच नाटककाराचे ‘द मेडस्‌’ हे नाटक रूपांतरित केले, त्या वेळेस लक्ष्मी आणि भारती या कामवाल्या बाया आपल्या कोल्हापुरी भाषेत स्त्री-पुरुष, शोषित-शोषक यांच्यातल्या सत्ताकारणाची आणि उतरंडीची चौकट मोडताना दिसल्या. दारिओ फो चा ‘आई-दहशतवाद्याची’ हा नाट्यांक हुकूमशाही मूलतत्त्ववाद्यांविरुद्ध आवाज उठवत राहिला. ऑगस्ट स्टिंडबर्गचे ‘मिस ज्युलि’ भाषांतरित करताना शोषितांकडे अभिनव नाट्यशैलीतून पाहणे आले. हे सारे प्रयत्न ‘शिवाजी कोण होता चळवळी’ने दिलेल्या व्यापक भानाचा परिपाक असावे असे वाटते. ‘आनंदभोग मॉल’ लिहिताना ‘गोलबल’ जगातील मानवी नात्यांचे व्यवहार - त्यांच्यातले ताणेबाणे आणि राजकारण कोणकोणत्या पातळ्यांवर पोहोचले आहेत हे पाहाण्याचा नाटकीय प्रयत्न होता. भांडारकर संशोधन संस्था प्रकरणानंतर गोलबल जगात त्याचे काय पडसाद पडले? या ताण्या-बाण्यांत अत्यंत व्यक्तिगत पातळीवर स्त्री-पुरुष काय भूमिका वठवत होते? शारीरसंबंधाच्या क्षणी स्त्री-पुरुषांची शरीरे ऐन मोक्याच्या घडीला जातिभेदाच्या मुद्यांना काय आणि कशी प्रतिक्रिया देतात? खेड्यापाड्यांतून स्थलांतरित होणारा मानवी समुदाय ‘आधुनिकी’करणात सहभागी होताना मॉलस्‌ आणि हायवेच्या रूपातून ‘प्रगत’होण्याची रमणीय स्वप्ने पाहातो, त्या वेळेस बिनजातीची/बि न-उतरंडीची व्यवस्था निर्माण होते काय? की, आणखी एका नव्या उतरंडीची भर पडते? अशा प्रश्नांना भिडत मी ‘आनंदभोग मॉल’ हे नाटक लिहिले. ‘प्रश्नांना भिडत’ याचा अर्थ उत्तर शोधण्यासाठी नाटक असा मी धरत नाही.

निष्कर्ष काढण्यासाठी कलारूप मानून कलेला अप्लाईड करून मी मर्यादित करू इच्छित नाही. यापेक्षा, इतिहास आणि समकालीन जगण्याचे आकलन आणि कलारूपाचा शोध घेणे, या भूमिकेतून मी नाटकाकडे पाहातो. लोकावकाशातील गुंत्यांना थेट आणि लाइवली भिडण्यासाठी नाटक या रूपाची निवड हीच एक भूमिका असते. चिकित्सक आकलनाच्या प्रक्रियेतील सतत बोलणारी, सतत वसवस करणारी, सतत उणे-दुणे काढणारी आणि पापुद्रे काढणारी माझी पात्रे मला अस्वस्थ करत राहिली. ती अस्वस्थता माझा मित्र अतुल पेठेला पाच वर्षांपूर्वी जाणवली होती. निर्मितीच्या एका टप्प्यावर महेश एलकुंचवारांनी नाटकातल्या सब-टेक्स्टवर विचार करण्यास मला अधिक प्रवृत्त केले. शेवटी, ‘आसक्त’च्या मोहित टाकळकर या माझ्या नाटकाच्या दिग्दर्शकाला आणि समकालीन मित्राला हे सगळे दिसले नसते तर नाटक सतर्क समाजापर्यंत पोहोचले नसते. गिरीश कुलकर्णी हा माझा जवळचा मित्र आणि अनिता दाते (मी लिहिलेल्या आधीच्या नाटकाची दिग्दर्शिका) मोहितला काय पोहोचवायचे आहे ते प्रभावीपणे आपल्या रंगभाषेतून पोहोचवतात. नाटकानंतरचे नाटकही तेवढेच नाटकीय असते. एका विशिष्ट टप्प्यावर लिहिलेले नाटक माझ्यासाठी ‘मागे’ पडते. भवताल बदलत जातो. आपण बदलत असतो. नवे पेच आणि नव्या मांडणीचे वेगवेगळे मार्ग सापडत राहतात. आताशा, मला भारतातील आणि कधी कधी भारताबाहेरची नाटके बघायला मिळतात.

कधी-कधी नाटक नको वाटावं इतकं नाटक होतं. शिवाय, इतर कलारूपंही खुणावत राहातात. या अर्थाने, व्यक्त होण्यासाठी रूपाच्या शिस्तीचे बंधन नको वाटते. मग, म्हमुलाल सांगावकरांना कंटेम्पररी कोरिओग्राफीमधल्या आस्ताद देबूंशी जोडू पहातो. तर, कधी, जर्मनीतला डफवाला मोहम्मद पिराजी सरनाईकांसाठी डफ वाजवतोय असं वाटतं. बारीक-बारीक तुकड्यांत विखुरतोय आपण. समकालीन नातेसंबंध आणि समाजाच्या अंतर्रचना बदलतायत. बहुविध दृष्टिकोन, भाषा आणि जीवनशैली आकाराला येतायत. या पार्श्वभूीवर, ‘शेअर’ करता येईल अशा लोकावकाशात नाटक कसे नेता येईल? त्यासाठी त्याचे रूप कसे असेल? फेसबुक वा एस्‌एम्‌एस्‌ किंवा ग्रामपंचायती आणि लोकसभा यांसारख्या नव्या ‘परफॉर्मिंग अव्हेन्यूज’च्या संदर्भात मी कसले नाटक लिहायचे? ‘बिग बॉस’ चवीने पाहात बसलेल्या घरापर्यंत किंवा बारडीभर पाण्यासाठी सकाळपासून रांगेत ताटकळत उभारलेल्यांपर्यंत माझे म्हणणे पोहोचेल काय? की, नाटकाची आवाहकता दोन-चार लहान-मोठ्या शहरांतील छोटेखानी बंदिस्त नाट्यगृहातील मोजक्या प्रेक्षकांपुरती राहील? पण, भोवतालच्या आकलनाचे कोणते नाटकीय रूप आकाराला येईल? असे आणि असे इतर प्रश्न माझ्यासमोर उभे राहत असतात. या प्रश्नांचे चिकित्सक आकलन करून घेण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा पुरस्कार मला बळ देईल असा विचार मी करतो. 

Tags: आशुतोष पोतदार नाटक आनंदभोग मॉल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके