डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चंगळवादाला पायबंद घालण्याचा निर्धार करावा

स्वार्थरहित माणसे सत्तेपासून दूर जाऊ लागली व बुद्धिमान तरुण, संपत्ती व यशासाठी परदेशी जाऊ लागले आहेत. परिणामी आज देशात चंगळवाद बोकाळला आहे. स्वातंत्र्यपूर्व कालापासून राजकीय विचार पुढे नेण्याची कामगिरी ज्यांनी बजावली आहे.

नेताजी सुभाषचंद्रांनी 1938 साली हिरपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना इंग्रज भारतातून जाण्यापूर्वी देशाचे दोन तुकडे करतील असे प्रतिपादन केले होते व घरादाराला पेटती चूड लावून आंदोलनात यावे असा गांधीजींचा आदेश होता. कमीत कमी खर्चात गुजराण करण्याचे प्रयोग त्या काळात होत होते. पण आज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण सत्ताधीश बनून कामाचे 'मोल' मागू लागलो आहोत. स्वार्थरहित माणसे सत्तेपासून दूर जाऊ लागली व बुद्धिमान तरुण, संपत्ती व यशासाठी परदेशी जाऊ लागले आहेत. परिणामी आज देशात चंगळवाद बोकाळला आहे. स्वातंत्र्यपूर्व कालापासून राजकीय विचार पुढे नेण्याची कामगिरी ज्यांनी बजावली आहे. अशा तरुणांनी चंगळवादाविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा निर्धार करायला हवा.' असे उद्गार सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत श्री. दत्ता ताम्हणे यांनी 22 जून रोजी नायगाव येथील कार्यकर्ता शिबिरात 'स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वप्ने व वस्तुस्थिती' या विषयावर भाषण करताना काढले, साने गुरुजी बालविकास मंदिर स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी समितीतर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

अनेक मान्यवर सदर शिबिरास उपस्थित होते. पवई आय.आय.टी. कॉलेजमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक व गांधी विचाराचे भाष्यकार डॉ. लक्ष्मणराव भोळे 'गांधी विचारांची मौलिकता व अपरिहार्यता' या विषयावर शिबिरात बोलताना म्हणाले, 'गांधीजींनी व्यक्तिगत व सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे. 'चारित्र्याविना ज्ञान' नीतिमत्तेशियाय व्यवसाय, तत्त्वहीन राजकारण किंवा माणुसकाविना विज्ञान यांची गणना गांधीजींनी महापातकांत केली आहे. रंजल्या-गांजलेल्या प्राणिमात्रांची दुःखमुक्ती हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. जोपर्यंत गरिबाला भाकरी व शांती मिळत नाही, तोपर्यंत चंगळवाद करणे म्हणजे कार्य आहे असे ते म्हणत बाजारी अर्थव्यवस्थेची सुरुवात श्रीमंतापासून होते. तर गांधीजींच्या अर्थव्यवस्थेची सुरुवात अंत्योदयापासून होत आहे. जगात शांती हवी असेल तर गांधी विचारांना पर्याय नाही, असा निष्कर्ष जगातील सर्व नोबेल पारितोषिक विजेत्यांनी काढला आहे. विविध क्षेत्रांतील सुमारे 125 कार्यकर्ते दिवसभराच्या सदर शिबिरास उत्साहाने उपस्थित होते.

Tags: चंगळवाद दत्ता ताम्हणे साने गुरुजी महात्मा गांधी डॉ. लक्ष्मणराव भोळे आत्माराम शिंदे Changalism Datta Tamhane Sane Guruji Mahatma Gandhi Dr. Lakshamrao Bhole Aatmaram Shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके