डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वनस्पतीजीवन स्वविसर्जनातून सर्जन

‘वृक्षवल्लींना सगे सोयरे मानणाऱ्यां’ना आपण उठताबसता तोंडी लावण्यापुरतं ठेवलं. वनस्पतींच्या भावभावना व संवेदनांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैज्ञानिकांना पूर्णपणे बाजूला ठेवलं (अघोषित अस्पृश्य!). तरीही वनस्पतींच्या जीवनाचा अर्थ शोधण्यात आयुष्य वेचणाऱ्यांचं कार्य चालूच आहे. आधीच्या पिढीनं आणून दिलेलं लोण पुढे नेताना त्यात उत्तम भर घालणारे वैज्ञानिक नव्या उमेदीनं आपल्याला वनस्पतींकडे पाहण्याचा आग्रह करत आहेत.     आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात. (खरं तर उलट- त्यांच्यामध्ये आपण असतो.) तरीही ‘वनस्पती’ असण्याचा मथितार्थ आपल्या ध्यानात आलेलाच नसतो. कॉचिआ म्हणतात, ‘‘वनस्पती ह्या सभोवतालच्या पर्यावरणात विसर्जन करण्याचं (इमर्शन) मूर्तिमंत उदाहरण आहेत. हे विसर्जन अजिबात लक्षात येऊ नये इतकं नैसर्गिक व सेंद्रिय आहेे. कोणतीही इतर कृती  न करता केवळ स्वत:च्या असण्यातून, अस्तित्वातून जग बदलण्याची किमया वनस्पतींना साधलेली आहे. त्यांचं असणं (टू बी) हे आपल्यासाठी जग घडविणं (टु मेक वर्ल्ड) आहे. सर्जन करणाऱ्या वनस्पतींचं आयुष्य हे पूर्णपणे अनावृत, खुलं व पर्यावरणाशी विलय पावण्यात आहे.

पृथ्वीचा एकेक अवयव निकामी करावयाच्या महामार्गावर मानवप्राणी निघाला होता. त्याने आता फुप्फुसदेखील अत्यवस्थ करून टाकण्यात यश मिळवलं आहे. पृथ्वीवरील एकंदरीत ऑक्सिजनपैकी 20 टक्क्यांचा पुरवठा करून 2.2 अब्ज टन कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेणारं ॲमेझॉन विकलांग झालं आहे. जुलैमध्ये वैज्ञानिक जगतातील अग्रगण्य नियतकालीक ‘नेचर’नं जाहीर केलं, ‘‘ॲमेझॉन, कर्बवायू शोषून घेण्यापेक्षा अधिक कर्बवायू उत्सर्जित करू लागलं आहे.’’  स्वत: फांदीच्या शेंड्याकडे बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या इसमास आपण ‘ऐतिहासिक मूर्ख’ अशी ख्याती मिळवून दिली आहे. तर संपूर्ण जंगलांचा नायनाट करणाऱ्या समाजासाठी सुयोग्य शब्दप्रयोग तयार करावा लागेल.

पृथ्वीचा जन्म हा 4.5 अब्ज वर्षांपूर्वीचा, त्यावरील जीवोत्पत्ती ही 3.7 अब्ज वर्षांपूर्वीची आहे असे मानण्यात आले, तर आपले पूर्वज होमो सेपियन हे 3 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ॲमेझॉनचं वय आहे सुमारे 5.5 कोटी वर्षे! जगाच्या कार्बन चक्राचा व जलचक्राचा आधार असलेल्या ॲमेझॉनच्या सदाहरित  अरण्यात  आजपर्यंत 40,000 वनस्पतींच्या प्रजाती, 1294 प्रकारच्या पक्ष्यांच्या, 378 सरपटणारे प्राणी, 428 उभयचर, 2200 माशांच्या, तर 440 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती नांदत आहेत. वर्गीकरण करता न आलेल्या प्रजातींच्या संख्येचा अंदाज नाही. असं हे वनस्पती व प्राणी जगताच्या उत्क्रांतीचं अमूल्य संग्रहालय धोक्यात आलं आहे. विशालता कथन करणारी सर्व विशेषणे थिटी पडतील असा ॲमेझॉन विस्तार हा तब्बल 17 अब्ज एकर किंवा 60लक्ष चौरस किमी क्षेत्रफळ (भारताचे क्षेत्रफळ 32.8 लक्ष चौरस किमी आहे.) एवढा आहे.

‘दरवर्षी जगातून सुमारे 73 लाख एकर जंगल नष्ट होत आहे. जगातील जंगलतोड ही विनाअटकाव, दर सेकंदाला 1.5 एकर ह्या वेगाने चालू आहे.’ असं ‘फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’चं सर्वेक्षण सांगतं.  2001 ते 2018 ह्या काळात जगातून 36 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं (भारतापेक्षा अधिक) जंगल नाहीसं झालं. जगाने मागील 40 वर्षांत 100 कोटी हेक्टर अरण्य गमावलं आहे. ह्या सतत वाढत्या वेगाने 2100 मध्ये जगातील सदाहरित अरण्यांचा अंत झालेला असेल. तेव्हा जग कसं असेल?त्या पिढ्या आपल्याला काय म्हणतील?

जगातील वृक्षांनी अंदाजे 700 अब्ज टन कार्बनडाय ऑक्साइड साठवण्याची जबाबदारी पेलवली आहे. (2020 मध्ये जगातील कर्बवायू उत्सर्जन 4.5 अब्ज टन होतं.) अरण्यांचा विनाश होताना वृक्षांनी साठवलेला कार्बनडाय ऑक्साइड पुन्हा हवेत सोडला जातो. त्यामुळे निर्वनीकरण हे हवामान बदलामागील दुसरं महत्त्वाचं कारण आहे. (पहिला मान वीजनिर्मितीला जातो.)      

‘पृथ्वीवर बलात्कार होत आहे!’ असा मथळा देण्यास कोणताही पत्रकार वा लेखक धजावला नसता आणि संपादकांंनी व प्रकाशकांनी तो तत्काळ नाकारला असता. अशी पायरी गाठावी, असा विचार वैज्ञानिकांच्या मनात चुकूनही शिवला नसता. तरीही तसं कृत्य झालंच असतं तर वैज्ञानिक संस्थांनी तशा व्यक्तीवर कठोर कारवाई केली असती. 2013 मध्ये हिमनदीतज्ज्ञ जेसॉन बॉक्स यांनी वैज्ञानिक परिषदेत ‘वाढतं कर्बउत्सर्जन व हवामान बदलाचे परिणाम’ स्पष्ट करणारा शोधनिबंध सादर करताना, असं असभ्य वाटणारं शीर्षक देण्याचं धाडस दाखवलं होतं. तो ऐकून अनेकांचे चेहरे कडवट झाले. परंतु निबंध ऐकल्यावर  तो मथळा सार्थ असल्याचं त्या परिषदेतील सर्व वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. जगातील अनेक अग्रगण्य दैनिकांनी त्या मथळ्यासह सविस्तर बातमी केली. आणि मग तो वाक्प्रयोग सर्रास रूढ होत गेला. 2021 मध्ये तो अतिशय मिळमिळीत वाटावा अशा सुसाट वेगाने पृथ्वीचा विनाश चालू आहे. हा काळाचा महिमाच असा आहे. ‘काळ’ आला ही जाणीव वैज्ञानिकांना आधीच झाली होती. जनतेला त्याची पदोपदी प्रचिती येत आहे.

यंदा संपूर्ण जग एकामागून एक व एकापेक्षा एक भयंकर आपत्तीतून जात आहे. क्षणभंगुरतेचा अनुभव हा नेहमीचा झाला आहे. एक विषाणू यच्चयावत जगाला पूर्णपणे ठप्प पाडू शकतो, असं अक्रीत जगानं अनुभवलं आहे. वैज्ञानिक वेळोवेळी ह्या व अशा संकटांची जाणीव करून देत होते. आपली ‘युगान्ता’कडील वाटचाल जाणवून प्रतिभावंत लेखक महेश एलकुंचवार बजावत आहेत,

‘‘आपण फार तर शंभर वर्षांसाठीचे ‘पाहुणे’ आहोत. मग पाहुण्यांसारखं राहू की. पाहुण्यांना शिस्त, तहजीब असते. किती ओरबाडायचं यजमानांना? आपण सभ्यपणानं वागतच नाही.’’ वैज्ञानिकही सर्व सीमा ओलांडून बोलू लागले, त्याची अशी कारणं आहेत. ‘करोना हे अभूतपूर्व संकट एकमेव नसेल’, असं सांगताना वैज्ञानिक म्हणत आहेत, ‘‘करोना ही निसर्गविनाशामुळेच ओढवून घेतलेली आपत्ती असून सध्याची मानवी वाटचाल निसर्गाच्या अंताकडे आहे.’’

सर्वांचा असल्यामुळे तो कोणाचाही नाही, अशा निसर्गाची लागणारी वाट वेळोवेळी लक्षात आणून देण्याचं कार्य वैज्ञानिक व त्यांच्या संस्था करीत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर, ‘संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण प्रकल्पा’ने यंदाच्या पर्यावरण दिनी ‘पर्यावरण यंत्रणा संवर्धन दशका’चा आरंभ केला आहे. सध्याच्या निर्णायक दशकात ह्या संकल्पनेला किती प्रमाणात वास्तवात आणता येतं? यावर शतकाचं आणि पृथ्वीचं भवितव्य अवलंबून आहे.

अशा ऱ्हासपर्वात निसर्गातील अनेक रहस्यांचा शोध घेऊन निसर्गाची महती पटविण्याचा आयुष्यभर आटापिटा करणारे वैज्ञानिक वरचेवर वाढत आहेत. मागील पिढ्यांच्या खांद्यावर बसून जग पाहण्याचं भाग्य मिळाल्यावर पुढील पिढीला अधिक उंच करून जग दाखवावं, अशी प्रक्रिया चालू आहे व त्यातून निसर्गाची नवनवीन रहस्ये उलगडत आहेत.

पृथ्वीतलावर सुमारे 3 कोटी वर्षांपूर्वी वनस्पती आल्या, मागाहून प्राणिसृष्टी आणि अंदाजे 3 लाख वर्षांआधी मानवप्राणी आला आहे, याचं भान आपल्याला नसतं. वनस्पती ह्या सजीव आहेत असं म्हणत आपण त्यांना यत्किंचितही किंमत देत नसतो. वनस्पती-सृष्टिविषयक अनास्था हा माणसांचा स्थायी भाव आहे. प्रत्येक काळातील द्रष्टे सर्व जीवांंचा सन्मान करत. ‘वृक्षवल्लींना सगे सोयरे मानणाऱ्यां’ना आपण उठताबसता तोंडी लावण्यापुरतं ठेवलं. वनस्पतींच्या भावभावना व संवेदनांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैज्ञानिकांना पूर्णपणे बाजूला ठेवलं (अघोषित अस्पृश्य!). तरीही वनस्पतींच्या जीवनाचा अर्थ शोधण्यात आयुष्य वेचणाऱ्यांचं कार्य चालूच आहे. आधीच्या पिढीनं आणून दिलेलं लोण पुढे नेताना त्यात उत्तम भर घालणारे वैज्ञानिक नव्या उमेदीनं आपल्याला वनस्पतींकडे पाहण्याचा आग्रह करत आहेत.                              

उत्क्रांतिशास्त्राचे जनक चार्ल्स डार्विन (1809-1882) यांनी ‘द पॉवर ऑफ मुव्हमेंट्‌स इन प्लान्ट्‌स’ या पुस्तकात, ‘‘वनस्पतींच्या लतातंतूंना हालचाल कुठे करावी, याचं ज्ञान असतं. खालच्या श्रेणीतील प्राण्यांच्या मेंदूप्रमाणे त्यांचं कार्य चालतं,’’ असं म्हटलं होतं. वनस्पतीच्या संवेदनाइंद्रियाचा विचार व्हावा, अशी डार्विन यांची इच्छा होती. सर जगदीशचंद्र बसू (1858-1937) यांनी 1901 मध्ये लंडनच्या ‘रॉयल सोसायटी’मध्ये एका वनस्पतीला ब्रोमाइडच्या द्रावणात बुडवून ठेवलं. त्यानंतर त्या रोपाच्या हालचाली वाढत गेल्या आणि काही वेळात ते रोप शांत झालं. विषबाधा झाल्यावर उंदीर तडफडून मरतो तशीच प्रक्रिया वनस्पतीबाबत होते, हे त्यांनी दाखवून दिलं. पुढे त्यांनी वनस्पती प्रकाश, पाणी, खत व सूक्ष्म ध्वनिलहरींना कसा प्रतिसाद देतात? याचं संशोधन करण्यासाठी क्रिस्कोग्राफ उपकरण तयार करून अनेक प्रयोग केले. त्यांनी ‘रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग’(1902) व ‘द नर्व्हस मेकॅनिझम्स ऑफ प्लान्ट्‌स’ (1926) ह्या दोन पुस्तकांतून वनस्पतींना संवेदनाज्ञान कसं होतं, यावर प्रकाश टाकला आहे.

त्यानंतर काही शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या संवेदना व त्यांचं मेंदूजीवशास्त्र (न्यूरोबायॉलॉजी) यांवर अनेक संशोधनं सादर केली. ‘‘वनस्पतींमध्ये चेतापेशी नसतात, त्यामुळे हे विज्ञानच होऊ शकत नाही,’’ अशीही जोरदार टीका झाली. तरीही अनेक शास्त्रज्ञ  रेण्वीय जीवशास्त्राच्या संशोधनामुळे वनस्पतींकडून मिळणारे संकेत व इशारे यांचं शास्त्रीय विश्लेषण करत राहिले. प्रकाश, पाणी, तापमान, मातीची संरचना, पोषक तत्त्वे, विष, रसायने व शाकाहारी प्राणी ह्या बाह्य घटकांची वनस्पतींना समज असते व त्यांना त्या प्रतिसाद देत असतात. यावरून वनस्पतींमध्ये माहिती मिळवणे व त्यावर प्रक्रिया करणारी मेंदूसारखी यंत्रणा असावी, असं त्यांच्या लक्षात आलं. त्या काळात अमेरिका व युरोपमधील अनेक शास्त्रज्ञ एकमेकांशी संपर्क साधून वनस्पती रहस्यांवर संशोधन करत होते. रासायनिक व विद्युत इशारे समजून घेणे व पाठवणे, यासाठी प्राण्यांमधील मज्जासंस्था कार्य करते तशीच यंत्रणा वनस्पतींमध्येही आढळते. सिरोटॉनिन, डेपेमाइन व ग्लुटामेट ही संदेशवाहक रसायने (न्युरोट्रान्समीटर) वनस्पतींमध्येही दिसून येतात.                                          

सतत होत असलेल्या अशा संशोधनांतून वनस्पतींच्या कार्यपद्धती उमजत आहेत. वृक्ष व अरण्य यांची महत्ता सांगून त्यांना आटोकाट का जपलं पाहिजे? या संबंधी सखोल व विस्तृत माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे.

पीटर वोल्हेबेन हे जर्मनीतील वनव्यवस्थापक होते. उद्योगांना लाकूड पुरवठा करणे हा मूळ उद्देश असल्यामुळे 1990 पर्यंत जंगलांना ‘जमिनीवरील खाण’ असंच रूप आलं होतं. कीटकनाशकांपासून ते अजस्र यंत्रांपर्यंत विविध तऱ्हांनी वृक्ष आडवे पाडून जास्तीतजास्त ओंडके पाठवण्याचं नियोजन ते करीत होते. पुढे त्यांच्यावर पर्यटकांसोबत भ्रमण करून जंगल दाखविण्याची जबाबदारी आली. तेव्हा वृक्षप्रेमी व संशोधक यांच्या समवेत राहण्यातून त्यांना झाडांकडे पाहण्याची वेगळी नजर मिळत गेली. अनेक वैज्ञानिकांचं लेखन वाचून ते पुरते बदलून गेले. अरण्याचं मन:पूर्वक सूक्ष्म निरीक्षण करीत अधिकाधिक खोलात जाऊ लागले. एकदा त्यांना जंगलात फिरताना शेवाळाने पूर्णपणे झाकून गेलेली भव्य शिळा दिसली. ती पाहताच वोल्हेबेन तिच्या प्रेमात पडले आणि निरखून ती शिळा पाहू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तो एका प्राचीन वृक्षाचा बुंधा आहे. ‘हा निष्पर्ण बुंधा इतकी वर्षं तगून कसा राहिला असेल? त्यांनी ह्या शंकेचा पिच्छा चालू केला. आणि ते आमूलाग्र बदलून गेले. वृक्षांना क:पदार्थ मानणारा वनस्पतींच्या अनेक गूढांचा शोध घेऊ लागला. त्यांच्या अरण्यप्रेमाच्या प्रवासात वृक्षांच्या जीवनाचं विरहस्यीकरण सुरू झालं. वोल्हेबेन यांनी ‘वृक्षांची मूळ यंत्रणा ही अतिशय सजग असते. त्यातून वृक्ष परस्परांशी संपर्क साधतात.’ असं सांगून त्याला ‘काष्ठजाल’ (वुडवाइड वेब) अशी संज्ञा दिली. शेजारचे वृक्ष एकमेकांना मदत करतात. त्यातून हा बुंधा जगू शकला, हे लक्षात आल्यावर वोल्हेबेन वृक्षांमधील संपर्क (कनेक्टिव्हिटी) पद्धतीच्या खोलात गेले. त्यातून ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज’ (2015) हे पुस्तक साकार झालं. त्यात ते म्हणतात, ‘‘येणाऱ्या संकटांचं निवारण करण्यासाठी वृक्षांकडे प्रतिकार यंत्रणा असते. आफ्रिकेच्या उष्ण भागातील गवताळ प्रदेशात (सावना) वृक्षांची पाने खायला जिराफांची टोळी येत असते. त्या वेळी ते वृक्ष पानांमध्ये विष तयार करू लागतात. इतकंच नाही तर त्या प्रदेशातील सर्व वृक्षांना ह्या संकटाची जाणीव करून देतात. त्यामुळे सर्व वृक्ष जिराफ परतवून लावणारी रसायने पानात निर्माण करू लागतात. कीड वा शाकाहारी प्राणी यांच्यापासून वाचण्यासाठी वनस्पती आटोकाट प्रयत्न करत असतात. ‘जगा आणि जगू द्या’ हे खऱ्या अर्थाने जगत असतात. वेळोवेळी होत असलेल्या संपर्कांच्या देवाणघेवाणीतून वृक्षांचं समूहजीवन समृद्ध होत जातं.’’

वोल्हेबेन संशोधक वृत्तीने अरण्यांविषयी सखोल तरीही सुलभ मांडणी करून लेखन करत आहेत. त्यांनी ‘द सिक्रेट  विस्डम ऑफ नेचर’, ‘कॅन यू हिअर द ट्री टॉकिंग?’ ह्या पुस्तकांतून वनस्पती व प्राणी यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या भावना, त्यांची संपर्कपद्धती यांविषयीची आपल्याला अजिबात ज्ञात नसलेली अनेक रहस्ये उलगडून दाखवली आहेत. नुकत्याच आलेल्या ‘द हार्ट बीट ऑफ ट्रीज- एम्ब्रेसिंग अवर अन्शेन्ट बाँड विथ फॉरेस्ट्‌स अँंड नेचर’ ह्या पुस्तकात त्यांनी अनेकांगांनी वृक्षांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते पाणी हे वृक्षांसाठी रक्तासमान आहे. जमिनीतील पाणी मुळांच्या वाटे झाडाच्या शेंड्यांपर्यंत कसं पोहोचतं, याचं आजतागायत समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. हंगेरीतील डॉ. आंद्रे झ्लिंझ्सकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑस्ट्रिया व हंगेरीतील भोजवृक्षांचा अभ्यास केला. त्यांनी लेसर किरणांच्या साह्याने वृक्षाच्या मितींचं मोजमाप चालू केलं. रात्रीच्या काळात भोजवृक्षाच्या शाखांची लांबी 4 इंचांनी कमी होते आणि दिवसा ती पूर्ववत होते, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यावरून त्यांनी म्हटलंय, ‘‘रात्रीच्या वेळी वृक्ष विश्रांती घेत असावेत’’ असा निष्कर्ष काढला. मग त्यांनी दिवसाच्या आठ प्रहरांत 22 भिन्न प्रजातींच्या वृक्षांचं संशोधन चालू केलं. तेव्हा त्यांना फांद्यांच्या लांबीतील फरक होण्याची प्रक्रिया जाणवलीच. परंतु केवळ दिवस व रात्रीत लांबीत फरक पडतो असं नाही. तर दर 3 ते  4 तासांनी फांद्यांच्या लांबीत फरक पडतोय, तसंच वृक्षांच्या व्यासामध्ये 1/2 मि.मी.ने फरक पडतोय. असं अति सूक्ष्म निरीक्षणामुळे लक्षात आलं. वृक्षांचं आकुंचन-प्रसरण ही पाणी उपसण्याशी संबंधित प्रक्रिया असावी, ही वृक्षांची हृदयस्पंदनेच आहेत. त्यांच्या विलक्षण संथ गतीमुळे ती मानवाला जाणवत नाहीत.’’ अशाच निरीक्षण व संशोधनातून वनस्पतींकडे असलेल्या संवेदकांमुळे (सेन्सर) त्यांना प्रकाशाची जाणीव होत असते. त्यामुळे त्यांना दिवस व रात्र, प्रकाश व अंधार यांतील फरक कळतो, हेदेखील लक्षात आलं.     

पूर्वजांना मिरवण्यासाठी उपयुक्त ‘शब्देविण संवाद’ आपण तेवढ्यापुरताच ठेवून टाकला आहे. आपल्याला शब्दांच्या व चिन्हांव्यतिरिक्त होऊ शकणाऱ्या संभाषणाविषयी कल्पनासुद्धा करता येत नाही. वास्तवात आपल्या पंचेंद्रिय क्षमतांच्या पलीकडेही संवेदन असतं. वटवाघळं व हत्तींचा संपर्क करण्याचा ध्वनी मानव ऐकू शकत नाही. अशी त्या ध्वनीची कंपनसंख्या असते. वनस्पतींचाही संपर्क अशाच कंपनसंख्येच्या ध्वनीतून होत असतो. वैज्ञानिकांनी मोहरीवर्गीय वनस्पतींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्या 200 हर्ट्‌झ कंपनसंख्येला प्रतिसाद देऊन त्या दिशेने वळतात, असं त्यांच्या लक्षात आलं. वनस्पतींवरून सुरवंटांच्या हालचालीतून होणारी स्पंदनेसुद्धा वनस्पतींना जाणवतात. हा धोका ओळखून वनस्पती स्वत:चा बचाव करण्यासाठी रसायने तयार करतात. सुरवंटांनी तोंड लावू नये अशी तजवीज करणारी रसायने तयार करून ठेवली. सुरवंटांच्या हालचालीतील स्पंदने कृत्रिमरीत्या तयार करून सुरवंट नसलेल्या वनस्पतींना ऐकवली, तेव्हा त्यांनी आक्रमणापासून वाचण्यासाठी रसायने तयार करून टाकली. ह्या संशोधनात, ‘‘वनस्पतींना वाहत्या पाण्याचा आवाजसुद्धा ऐकू येतो आणि त्या दिशेने मुळांची हालचाल चालू होते. धोकादायक न वाटणाऱ्या ध्वनींकडे त्या दुर्लक्ष करतात,’’ असंही लक्षात आलं. कदाचित मानवाचा आवाज हा त्यापैकीच असावा. मानवाला वृक्षांशी संवाद साधण्याची अतीव इच्छा आहे. अनेक लोक तसे प्रयत्नही करतात. परंतु अजून तरी त्यात यश आलं नाही. वनस्पती व मनुष्य हे दोन भिन्न जगांत वावरत असतात. 

सजीव वनस्पतींना भावना, वेदना, संवेदना असतात? याचा शोध घेताना वोल्हेबेन बॉन विद्यापीठातील प्रो. फ्रँटिसेक बलुस्का यांना भेटले. बलुस्का 2005 पासून वनस्पतींचं आकलन (परसेप्शन) व त्यांची संकेत पद्धती यांवर संशोधन करत आहेत. ते म्हणतात, ‘‘वनस्पती ह्या माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या, निर्णय घेऊ शकणाऱ्या बुद्धिमान सजीव आहेत.’’ त्यांनी भक्ष्यांना गिळकृंत करणाऱ्या कीटकभक्षी मांसाहारी वनस्पतींना भूल दिली. त्यानंतर त्यांच्या लतातंतूंची (टेंड्रिल) हालचाल मंदावून त्या जागीच वेटोळे घालू लागल्या. भूल उतरताच लतातंतूंचं वर्तन पुन्हा पूर्ववत झालं. वनस्पती ह्या माणसांप्रमाणेच भूल उतरल्यावर जाग्या होतात काय? तसं असेल तर वनस्पतींना बोध होतो का, असा प्रश्न विचारल्यावर प्रो. बलुस्का म्हणतात, ‘‘त्याचं उत्तर त्यांच्याशिवाय इतर कोणीही देऊ शकणार नाही. त्यामुळे ते त्यांनाच विचारावं लागेल.’’

वोल्हेबेन यांनी अरण्य पर्यावरणशास्त्रज्ञ प्रो.डॉ.सुझान सिमर्ड यांच्याकडून वृक्षांचं सहजीवन समजून घेतलं. सिमर्ड यांनी 40 वर्षे ह्या विषयाला वाहून घेतलं आहे. त्यांच्या लेखनामुळे अरण्यप्रेमींची संख्या वाढतच आहे. रिचर्ड पॉवेर्स यांची कादंबरी ‘द ओव्हरस्टोरी’ (पुलित्झर विजेती) यामधील मध्यवर्ती कल्पना सिमर्ड यांच्या संशोधनातूनच साकारली आहे. ह्या मांडणीतूनच जेम्स कॅमेरॉन यांना ‘अवतार’ चित्रपटाची प्रेरणा मिळाली होती. 

प्रो. सिमर्ड ‘फाइंडिंग द मदर ट्री : डिस्कव्हरिंग द विस्डम ऑफ द फॉरेस्ट’ ह्या पुस्तकात म्हणतात, ‘‘अरण्य म्हणजे एकलकोंड्या-एकेकट्या वृक्षांचा समूह नसून ते असंख्य प्रकारच्या जीवांचं जाळं आहे. ती, आंतरसंबंध उत्क्रांत होत जाणारी जीवसंपदा आहे.  अरण्यांतील वृक्ष व वनसंपदा यांमध्ये स्पर्धा वा चढाओढ नसून त्यांच्यामध्ये कमालीचं सहकार्य असतं. वृक्षांकडे जाळं असतं. यातून माहितीची देवाणघेवाण व एकमेकांशी संपर्क साधून वृक्ष वसाहतीने नांदत असतात. वृक्षांना आपल्या पिलांच्या अवस्थेची जाणीव असल्यामुळे बाल्यावस्थेत अन्न पुरवठा करून, ते त्यांना जपत असतात. वृक्ष एकमेकांना जीवनसत्त्व पुरवतात. कीड वा पर्यावरणीय संकटाची जाणीव करून देतात. परस्परावलंबन, साहचर्य व सहजीवन हे अरण्यांचं असामान्य वैशिष्ट्य आहे. एकेकट्याने राहणाऱ्या वृक्षांपेक्षा वसाहतीने जगणाऱ्या अरण्यातील वृक्षांचं आयुष्य अधिक असतं ते त्यामुळेच!’’

(निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांनी निसर्गावर अनेक बंदिशी रचल्या. चैत्रातील कडुनिंबाचा बहर व घमघमाट पाहून, त्यांनी ‘निमोरी का मौरा है रे’  असं सुंदर वर्णन केलं होतं. ते म्हणत, ‘‘झाडांना पाहावं ते एकत्रच! वनराई, आमराईतील झाडं समूहात असल्यामुळे मजेत असतात. त्यामुळे ते मस्त बहरतात. एकटे असले की ते केविलवाणे वाटतात.’’ सूक्ष्म निरीक्षण असणाऱ्या कवी व तत्त्वज्ञांचं संपूर्ण निसर्गावर प्रेम होतं. त्यांना, निसर्गात परस्परसंवाद असल्याची जाणीव होती. आता विज्ञान त्याचे पुरावे देत आहे.)

संपन्न जीव-विविधता ही अरण्यांची शक्ती असून त्यामुळे अरण्यांना स्थैर्य येतं आणि संकटांचा सामना करून पूर्वपदावर येण्याची क्षमता वाढते. अरण्यात विविध प्रजाती कमालीच्या समन्वयाने राहत असतात. त्यातून त्यांची सामूहिक शक्ती (सिनर्जी) देणारी यंत्रणा निर्माण होते. नत्र स्थिर करून इतरांना अन्न देणाऱ्या वनस्पतीला पाण्याची निकड असते. खोलवर मुळे गेलेले वृक्ष त्यांना पाणी उपलब्ध करून देतात. अशा परस्परावंलबनातून पर्यावरणीय यंत्रणा उन्नत होत जाते.

सिमर्ड यांनी कार्बनच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर करून मातीमधील माहिती व संपर्कांचा अभ्यास केला. त्यांच्या सत्यशोधन यात्रेतून आपल्या आकलन शक्तीपलीकडील अनेक वृक्षरहस्ये उलगडली जात आहेत. अरण्यामधील वयोवृद्ध व विशाल वृक्षास सिमर्ड यांनी ‘मातृवृक्ष’ अशी संज्ञा दिली आहे. ‘‘मातृवृक्ष हे अरण्यातील साहचर्य जपण्यात मुख्य भूमिका पार पाडत असतात. प्रकाश संश्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले मातृवृक्ष मातीमधील कर्ब धरून ठेवणे, नत्र पुरवठा करणे,  पाण्यास प्रवाही ठेवणे अशी महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. अरण्यांना अनेक कठीण प्रसंगांतून सावरण्याची भूमिका पार पाडणाऱ्या मातृवृक्षांना जिवापाड जपणं, हे मानवजातीचं आद्य कर्तव्य आहे. मातृवृक्षांची अरण्यांमधील कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी सिमर्ड यांनी अमेरिका-कॅनडामधील 900 कि.मी. परिसरावर असलेल्या अरण्यातून ‘मातृवृक्षांची शोध मोहीम’ प्रकल्प चालू केला आहे.

ह्याच काळात शतकानुशतकांपासून चालत आलेल्या अरण्यातील जैविक जाळ्यांना संपवून टाकण्याच्या ‘उद्योगां’चा वेग वाढत  आहे.  हवामान बदल व जंगलविनाशाच्या धोक्यांपासून स्वत:चा बचाव करणं वृक्षांना अशक्य होत आहे. भुंग्यांसारख्या कीटकांच्या अनेक प्रजाती नामशेष होत असल्यामुळे जंगलातील कीड वाढून वृक्ष दगावत आहेत. जंगल हे बाष्पोत्सर्जन करून पावसाला हातभार लावतं. तसंच ते कार्बन वायू शोषून आपत्तिरोधक संरक्षक कवचसुद्धा होत असतं. मानवजातीला अनेक आपत्तींपासून वाचवणाऱ्या अरण्यांना वाचवण्यासाठी वैज्ञानिक त्यांच्या परीने पराकाष्ठा करीत आहेत.

अनेक विद्वानांनी भौतिकशास्त्र व तत्त्वज्ञानातील सिध्दान्त यांमधील साम्यस्थळे दाखवून दिली आहेत. विश्वाचे अलंकार असलेली वनस्पती सृष्टीसुद्धा जगासंबंधी विचार करण्याची नवी दृष्टी  देऊ शकते. ‘वनस्पतींकडून तत्त्वज्ञान कसं समजून घ्यावं?’ पॅरिस येथील तत्त्वज्ञानाचे प्रो.इमॅन्युएल कॉचिआ हे असा पूर्णपणे वेगळा विचार मांडत आहेत. त्यामुळे वनस्पतींकडे  केलेल्या प्रदीर्घ व लक्षणीय दुर्लक्षाची कसर काही अंशी भरून निघत आहे. निसर्गाचं व विश्वाचं गूढ समजून घेण्यातून तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. मात्र केवळ निसर्गाच्या सांनिध्यात असल्यावर निसर्गातील सर्जनशीलता पाहून मनुष्य विचारमग्न झाला तरी तत्त्वज्ञानाने निसर्गाचा सूक्ष्मपणे विचार केला नाही. प्रो. कॉचिआ म्हणतात, ‘‘ह्या जीवसृष्टीत मानवच सर्वश्रेष्ठ आहे, या अहंकारातूनच इतर सजीवांकडे पाहिलं गेलं. आपलं जग हे आधी वनस्पतीचं आहे, नंतर प्राण्यांचं; याचा आपल्याला विसर पडला. जीवन विज्ञान, तत्त्वज्ञान इतकंच काय जीवशास्त्रानंसुद्धा वनस्पतींकडे लक्ष दिलेलं नाही. ‘वनांचा सांभाळ करते ती वनस्पती’ असा फुकाचा उद्‌घोष करत मरणासन्न अवस्थेला ‘वनस्पतिजन्य अवस्था (व्हेजिटेटिव्ह)’ अशी विशेषणं तयार करून त्यांची पुरेपूर उपेक्षा केली. वनस्पतींच्या तुलनेत आपल्याला प्राणी जवळचे वाटतात. त्यामुळे आपलं उत्क्रांतिविषयक साहित्य हे प्राणिकेंद्रित राहिलं. त्यामुळे अनेक प्राण्यांना अभय व त्यांचे संवर्धन यांसाठी प्रयत्न होत आहेत. तसं महत्त्व वनस्पतींना कधीही मिळालं नाही. आपल्या बौद्धिक विश्वात वनस्पतीला स्थान नाही.’’

प्रो.कॉचिआ यांनी ‘द लाइफ ऑफ प्लान्ट्‌स - अ मेटॅफिजिक्स ऑफ मिक्स्चर’ ह्या पुस्तकातून वनस्पतींकडे पाहण्याची नवा दृष्टिकोन दिला आहे. आपण आपल्या नकळत सदा सर्वकाळ व पूर्णपणे गृहीत धरलेली बाब म्हणजे श्वसन! त्यासंबंधी ते निरूपण करतात, ‘‘ह्या जगाचा एक अतूट भाग होऊनच मानव जगात येतो. जगणं म्हणजे श्वसन!  आपण श्वास आत घेतो तेव्हा जगाचा अंश किंवा जगच आपल्या आत येत असतं. श्वास सोडणं म्हणजे स्वत:ला ह्या जगात प्रक्षेपित करणं. हे श्वसन व ह्या जगात असणं, ही एक इंद्रियांच्या पलीकडील वा इंद्रियातीत विसर्जनाची (ट्रान्सेन्डेटल इमर्शन) अनुभूती आहे. (चेतन आणि जड याचं मर्म बहिणाबाई चौधरी यांनी  ‘जगनं मरनं एक सासाचं अंतर’ असं सांगून ठेवलंय.) श्वसन ही निसर्गाशी एकरूप होण्याची एक प्रक्रिया आहे. आपल्याला श्वास लाभतो तो, निसर्गातील प्राणवायूमुळे! आपल्याला मिळणारा प्राणवायू हा भूगर्भशास्त्रीय वा इतर घडामोडींमुळे मिळत नाही. तो इतर जीवांचा उच्छ्‌वास आहे. माझा श्वास हा कोणाचा तरी उछ्‌श्वास तसंच माझा उच्छ्‌श्वास हा इतरांचा श्वास आहे. असं ते सजीवांचं नातं आहे. वनस्पतींनी उत्सर्जित केलेल्या वायूंना शोषून मानव जगत राहतो. इतर जीवांच्या जगण्याचे ते उपउत्पादन आहे. आपण जगताना पावलोपावली परावलंबी आहोत. निसर्गात असं परस्परावलंबी व परस्परपूरक नातं आहे. वनस्पतींमुळे पृथ्वी ही श्वसनक्रियेसाठी इंद्रियातीत अवकाश (मेटॅफिजिकल स्पेस) होऊ शकली. वनस्पतींविना मानवाचं जगणं अशक्य होईल.’’

इ.स.पूर्व पाचव्या शतकात (सॉक्रटीसपूर्व) काळात होऊन गेलेले तत्त्वज्ञ ॲनाक्सागोरस यांनी, ‘‘ हे जग म्हणजे  सर्व काही सर्वांत असणारं भेदरहित परस्परपूरक (रेसिप्रोकल) वैश्विक मिश्रण आहे.’’ अशी मांडणी केली होती. ती  भारतीय अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणेच आहे. ‘‘आपलं जगणं, श्वसन करणं,  विचार करणं, कल्पना करणं, ह्या प्रक्रियांत जगातील अगणित भौतिक व पराभौतिक वा इंद्रियातीत (मेटॅफिजिकल) तपशील आपल्या आत येत असतात. जग ही एक सर्व- सर्वांत विसर्जन होत असलेली अवस्था आहे. तत्त्वज्ञान व विज्ञान दोन्हीही,

‘ह्या जगात जड व चैतन्य असा भेदच नाही,’ ह्या निष्कर्षापर्यंत आले आहेत.

आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात. (खरं तर उलट- त्यांच्यामध्ये आपण असतो.) तरीही ‘वनस्पती’ असण्याचा मथितार्थ आपल्या ध्यानात आलेलाच नसतो. कॉचिआ म्हणतात, ‘‘वनस्पती ह्या सभोवतालच्या पर्यावरणात विसर्जन करण्याचं (इमर्शन) मूर्तिमंत उदाहरण आहेत. हे विसर्जन अजिबात लक्षात येऊ नये इतकं नैसर्गिक व सेंद्रिय आहेे. कोणतीही इतर कृती न करता केवळ स्वत:च्या असण्यातून, अस्तित्वातून जग बदलण्याची किमया वनस्पतींना साधलेली आहे. त्यांचं असणं (टू बी) हे आपल्यासाठी जग घडविणं (टु मेक वर्ल्ड) आहे. सर्जन करणाऱ्या वनस्पतींचं आयुष्य हे पूर्णपणे अनावृत, खुलं व पर्यावरणाशी विलय पावण्यात आहे. जडाचे (मॅटर) चैतन्यात रूपांतर करण्याची तसेच चैतन्याला पुन्हा जडात रूपांतरण करण्याची अद्भुत किमया पृथ्वीवरील आद्यतम  सजीव वनस्पतींना साधली आहे.’’

वनस्पतींच्या अगदी उलट बाजूने मनुष्य व वरच्या श्रेणीतील प्राणी हे अतिशय परावलंबी व पराधीन आहेत. त्यांना जगण्यासाठी वनस्पती वा प्राण्यांनी निर्मिलेल्या वस्तूंची गरज भासते. त्यांचं जगणं म्हणजे इतरांचं जीवन हिरावून घेणं. त्यांनी ‘जगा आणि जगू द्या’ याचा अर्थ ‘मला जगू द्या- तुम्हांला जमलं तर जगा’, असा लावला आहे. हे जीवोपजीवन (पॅरासाइटिझम) वा वैश्विक नरभक्षकता आहे. वनस्पती मात्र जगताना इतर कोणावर अवलंबून असत नाहीत. त्यांना प्रकाश, पाणी, हवा, माती व खडक अशा विश्वातील अत्यंत मूलभूत घटकांची निकड भासते. अशा वनस्पतींमुळे संपूर्ण जग बदलून जातं. अधिवास करण्यास अनुकूलता येते. वनस्पतींमुळे जग चालतं राहतं.

सतराव्या शतकाच्या आरंभी स्विडिश तत्त्वज्ञ व लेखक चार्ल्स बोने यांनी ‘‘वनस्पतींचं रोपण हे केवळ जमिनीत होत नसून ते हवेतसुद्धा असतं. मातीपेक्षा वातावरण हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं माध्यम आहे,’’ अशी मांडणी केली होती. हा धागा पकडून कॉचिआ वेगळ्या पद्धतीने उत्क्रांतीची उकल करतात. ‘‘जीवसृष्टीचा उगम पाण्यातून- सागरातून झाला. त्यानंतर हा जीव सागराकडून कोरड्या जमिनीवर आला, असा मानण्याचा प्रघात आहे. वास्तविक तो जल पर्यावरणाकडून वातावरणात (ॲटमॉस्फिअर) आला. जीवाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रवाही अवकाश (फ्लुइड स्पेस) अनिवार्य आहे. वातावरणाचे स्वरूप व संरचना भिन्न असली तरीही ते प्रवाही माध्यम आहे. असंख्य जीव सामावून घेणारं, त्यांना जगू देणारं व त्यांच्यात संपर्क घडवण्याचं कार्य वातावरण पार पाडत असतं. मानव हा पृथ्वीवासीय असला तरी त्याचा अधिवास हा वातावरणात असतो. कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील प्राणवायूविना जगू शकणाऱ्या जीवांचं (अनएरोबिक- अवायुजीवी) साम्राज्य होतं. सायनोबॅक्टेरियांनी प्रकाश संश्लेषण क्रिया करण्याचा आरंभ केल्यामुळे पृथ्वीवर प्राणवायू उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे अवायुजीवी जीव नष्ट होत गेले आणि वायुजीवींनी पृथ्वी व्यापून टाकली. वातावरणाच्या सान्निध्यात कोरड्या भूमीतून नवनवीन जीव निर्माण होऊ लागले. पृथ्वीवर वनस्पतींची वसाहत झाली आणि वनस्पतींनी ह्या विश्वाचे रूपांतर विशाल वातावरणीय सागरामध्ये केलं. प्रकाश संश्लेषणामुळे सौर ऊर्जेचं रूपांतर जैवभारात (बायोमास) होऊ लागलं आणि पृथ्वी ही एक वैश्विक प्रयोगशाळा होऊ शकली. प्रकाश संश्लेषण ही विश्वोत्पत्तीसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची घटना आहे.’’ 

मुळे, फुले व बियांविषयी लिहिताना कॉचिआ यांची भाषा बहरते. मातीतून वरच्या दिशेने जाणाऱ्या वनस्पतींच्या फांद्यांपेक्षा कैक पटींनी अधिक मातीच्या आत वाढणारी मुळे ही कमालीची जटिल यंत्रणा आहे. (राय वृक्षांच्या मुळांची यंत्रणा ही सुमारे 400 चौरस कि.मी. जाऊ शकते. त्याने जमिनीवर व्यापलेल्या क्षेत्रफळाच्या ती 130 पट जास्त आहे.) कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्यासाठी ‘मूळ’ ही संकल्पना होऊन गेली. ‘विचार करणारा मेंदू हे आपलं मूळ’ असा संबंध लावून प्लेटो ‘‘माणूस म्हणजे उलटा केलेला वृक्ष आहे.’’(गीतेमधील ‘खाली शाखा वरी मूळ’ ह्या उपमेप्रमाणे) असं म्हणाला होता. यातूनच मूळ यंत्रणा हा वनस्पतींचा मेंदू असतो, असं सूचित केलं होतं. मुळांचा शेंडा हे एक संवेदना पोहोचवणारे इंद्रिय आहे. वनस्पतीला माती, खडक, पाणी व एकंदरीत पर्यावरणाविषयीची माहिती मुळांकडून मिळत असते. मुळांमुळे कठीण व टणक माती पूर्णपणे बदलून जाते. कॉाचिआ यांना ‘एकमेकांत गुंतून व गुंफून जाणारी मुळे व माती यांचा संबंध  आध्यामिक आहे,’ असं वाटतं.

‘रंगांचा विस्फोट घडवून विश्वाला आकृष्ट करणारी अत्यल्पजीवी फुले म्हणजे सर्जनाचं स्थान!’ ‘फुले, जगाला आकृष्ट करून स्वत:च्या रूपांतरास सज्ज असतात!’ ‘फुले म्हणजे रूप व स्वरूप याचं विलोभनीय प्रात्यक्षिक!’,  ‘बी हे विराट रूप धारण करू शकणाऱ्या शक्यतांचं सूक्ष्म, महत्त्वपूर्णता येऊ शकणाऱ्या शक्यतांचं नगण्य रूप आणि विविध आकार घेऊ शकणाऱ्या शक्यतांचं निराकार तत्त्व आहे. वनस्पती निर्माण करीत असलेलं विरागी बी हे पूर्णत्वाचं रूप- कॉचिआ, वनस्पतीकडे शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ, विश्लेषक व कवी अशा विविध दृष्टीने पाहतात. अप्रतिम शब्दकळा व वजनदार भाषा यांमुळे त्यांचं ‘संस्कृती निर्माण करण्याचा विशेषाधिकार हा काही केवळ मानवाला मिळालेला नाही. जीवसृष्टीतील अनेक जीव त्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे समजावून सांगताना चार्ल्स डार्विन म्हणाले होते, ‘‘जग बदलण्यात, इतिहासातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा कैक पटीने महत्त्वाची भूमिका गाांडुळांनी पार पाडलेली आहे.’’ दरवर्षी अंदाजे 10 टन माती सुपीक करून देण्याचं कार्य करणारे गांडूळ खडकांचं विघटन करतात. वनस्पतींसाठी पोषक असलेली माती तयार करून देतात. त्यांची संवेदन इंद्रिये अतिशय अविकसित आहेत. त्यांना बाह्य जगाची अजिबात जाणीव नसते. तरीही ते जमिनीची उत्कृष्ट नांगरणी करून वनस्पती व मानवजातीसाठी अमूल्य कार्य करीत असतात. निसर्गाच्या निवडीत गांडुळांसारख्या साध्या जीवांना विशेष स्थान मिळालं नसलं तरी ते अनेक पिढ्यांच्या भल्याकरिता सभोवताल बदलून टाकण्याचं विलक्षण कार्य करीत असतात. जीवसृष्टीतील प्रत्येक जीव तेवढाच महत्त्वाचा असून त्याला आटोकाट जपलं पाहिजे, हे सांगताना नामदेव म्हणतात,  

दया तिचे नाव भूतांचे पाळण, आणिक निर्दाळण कंटकांचे।

Tags: पर्यावरण निसर्ग विज्ञान जेसॉन बॉक्स अतुल देऊळगावकर वनस्पती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल देऊळगावकर,  लातूर
atul.deulgaonkar@gmail.com

मुक्त पत्रकार अशी ओळख असलेल्या अतुल देऊळगावकर यांनी ग्रामीण विकास व पर्यावरण या विषयांवर प्रामुख्याने लेखन केले असून त्यातून आलेली अर्धा डझन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके