डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मला स्वत:ला असा लेखक कायमचा बरोबर असणे महत्त्वाचे वाटते. समकालीन संवेदना ज्याच्याबरोबर ‘शेअर’ करता येतात, असा लेखक सतत संगतीला असणे गरजेचेच असते. मकरंदचे लेखन मला महत्त्वाचे वाटत आले त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातले तत्त्वज्ञान हे आहे. मकरंदची नाटके नेहमीच्या माहिती असणाऱ्या पठडीतली नाटकीय नाहीत. त्याच्या नाटकांतले प्रश्न बहुस्तरीय, व्यामिश्र आणि अनेक घटकांना छेद देणारे आहेत. त्याच्या नाटकांची भाषा परिचित नाट्यमय नाही. ती अनलंकृत आहे. त्याची नाटके ही फक्त अनुभवावर अवलंबून नाहीत तर ती वैचारिक मांडणी करणारी आहेत. ती मांडणी एकांगी नाही किंवा कोणाचीही सहज-सोपी टरउडवी नाही. सुरुवातीची त्याची नाटके जर ‘आयडियांची’ असतील तर नंतरची ‘आयडिऑलॉजी’बाबत आहेत, असे मला वाटते. त्याची नाटके करीत असताना मला दृष्टी आली आणि दृष्टिकोनही मिळाला. 

मकरंद साठे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ पुरस्कार दुसऱ्यांदा मिळत आहे. ‘ते पुढे गेले’ नाटकाकरिता पहिला होता आणि हा ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या नाट्यविषयक लेखनाकरिता आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता येथून पुढे मी मकरंद साठे यांना आमच्या प्रदीर्घ मैत्रीच्या आणि प्रेमाच्या हक्काने मकरंद असे एकेरी नावाने संबोधेन, कारण ते जास्त सहज होईल.

आज पुरस्कार मिळत असलेल्या ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या ग्रंथावर मी लोकसत्तेत तीन प्रदीर्घ लेख गेल्या वर्षी लिहिलेले होते. तेव्हा ती पुनरुक्ती टाळावी, म्हणून मकरंदबद्दल या निमित्ताने मी लिहिणार आहे. माझ्याकरिता म्हटले तर हे काम अवघड आणि म्हटले तर सोपे आहे. अवघड अशासाठी की- त्याच्या लेखनातील वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि जागतिक अर्थ उकलून दाखविण्याची माझी बौद्धिक कुवत नाही. पण त्याच्याविषयी लिहिणे सोपे अशासाठी की- मी त्याच्यासह अनेक वर्षे काम करीत आहे. ते काम करताना त्याचे साहित्य मला कसे उलगडले, हे सांगणे अवघड नाही. माणूस आणि साहित्य उमगले, तरच कोणाही दिग्दर्शकाला लेखकाचे लेखन रंगमंचावर उलगडून दाखविता येते. आता ज्या अर्थी त्याने त्याचे बरेचसे काम माझ्या हाती सुपूर्त केले, त्या अर्थी कदाचित त्याला अपेक्षित असलेला अर्थ त्यातून बाहेर येत असणार. थोडक्यात, त्याच्या लेखनाला मी माझ्या परीने न्याय आणि काहीसा अर्थ निश्चित दिलेला असणार. या खात्रीवर मी त्याच्याविषयी माझ्या पद्धतीने लिहू पाहतो.

सुरुवातीलाच मी आणि त्याने केलेल्या कामांची यादी देतो. ती यादी अशासाठी की, महाराष्ट्रात मराठी रंगभूमीवर क्वचितच दुसऱ्या एखाद्या जोडीने इतके विविध अंगी प्रयोगशील काम केलेले असेल. मकरंदच्या नाटकातील अभिनेता म्हणून मी ‘सापत्नेकराचे मूल’, ‘ठोंब्या’, ‘गोळायुग’, ‘चौक’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ यांत काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून मी त्याची ‘ऐसपैस सोयीने बैस’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘चौक’, ‘गोळायुग’ ‘दलपतसिंग येती गावा’ ही नाटके दिग्दर्शित केली. मकरंदने नेपथ्यकार म्हणून माझ्या ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘चौक’, ‘उजळल्या दिशा’, ‘आनंदओवरी’ नाटकांचे काम केले. विजय तेंडुलकरांवर ‘तेंडुलकर आणि हिंसा (काल आणि आज)’ हा माहितीपट मी केला. त्याच्या पटकथेचे सहलेखन आणि मुलाखतीचे काम त्याने केले. त्याने ‘समाधान आणि इत्यादी’ नावाचा माहितीपट केला, त्याचे छायाचित्रण मी केले. त्याच्या ‘सापत्नेकराचे मूल’ नाटकावर सौमित्र रानडेंनी चित्रपट बनविला. त्यात मी एका मुख्य भूमिकेत होतो. याव्यतिरिक्त आम्ही दोघांनी एकमेकांच्या सर्व कामांमध्ये रस घेऊन एकमेकांना सर्जनशील मदत केलेली आहे.

आम्ही जवळजवळ गेली पंचवीस वर्षे एकत्र काम करीत आहोत. या साऱ्या प्रवासात अनेक चढ-उतार आणि ताण-तणाव आम्ही अनुभवले आहेत. कौतुक, प्रेम, आनंद, राग, तीव्र मतभेद, सहमती ते अबोला- असे अनेक पदर त्यांत आहेत. मात्र या साऱ्यांत जगण्याविषयी आणि करीत असलेल्या कामाविषयी उत्कट, प्रखर संवेदना मात्र केंद्रस्थानी आहेत. सुरुवातीची अनेक वर्षे कमालीची हेटाळणी आणि पुणेरी टिंगलटवाळी आम्ही पचवली आहे. अर्थात ही परिस्थिती आता गेल्या काही वर्षांत पालटली आहे. मकरंदच्या माझ्या या वैयक्तिक मैत्रीबरोबर त्याच्या आई-वडिलांशी माझे वेगळे नाते आहे. डॉ. अनंत साठे आणि शांता साठे या दांपत्याशी मी आरोग्यशिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून जोडला गेलेलो आहे.

मकरंदला मी प्रथम पाहिले ते थिएटर अकादमीने फोर्ड फाउंडेशनच्या अर्थसाह्याने घेतलेल्या लेखन कार्यशाळेत. त्या लेखन कार्यशाळेत मीही लेखक म्हणून सामील होतो. तिथे त्याचे ‘चारशे कोटी विसरभोळे’ हे नाटक प्रथम वेळी जमलेल्या लोकांनी त्या नाटकावर विविध मते मांडली. प्रा. राम बापट यांनी त्यातील अर्थ उलगडवून दाखवले. माझ्याकरिता ते सारेच त्या वेळी नवे होते. मला त्या नाटकातील एक गोष्ट उमजली होती की, हे आमच्या काळाचे नाटक आहे. आजच्या समाजाच्या गोचीचे नाटक आहे. ते नव्वदचे दशक होते. जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाची सुरुवात होती. नवे बदल झपाट्याने येऊ घातले होते. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटाचे महाद्वार त्या वेळेस उघडे होऊ पाहत होते. त्या पार्श्वभूमीवर हे नाटक आम्हा साऱ्यांच्या संवेदनेचे होते. तर, ही आमच्या ओळखीची सुरुवात.

एक दिवस मला समर नखातेंनी मकरंदच्या नव्या नाटकात अभिनेता म्हणून घेतले. नाटकाचे नाव ‘सापत्नेकराचे मूल’. हे नाटकही अजब होते. वास्तव जगणे आणि स्वप्नवत्‌ जगणे याच्या सीमारेषेवर ते नाटक फेर धरीत होते. या नाटकाच्या आठ-दहा महिने तालमी झाल्या आणि प्रयोग तीन. पण या नाटकाचे फार सुरेख मंचन केले गेले होते. मला ते नाटक आतूनच कळले होते. माणसाच्या आत-बाहेरच्या जगाविषयी चाललेल्या मनोव्यापारांचे दर्शन त्या नाटकात होते. त्यातील विदूषक आणि देव या अचाट पात्रांनी इथल्या मर्त्य मानवांचे जग व्यापलेले होते. मकरंदच्या सुरुवातीच्या नाटकांत ही अशी ‘रिअल-सररिअल’ सरमिसळ आपल्याला दिसते. आपल्या अस्तित्वाचे अर्थ काय, या प्रश्नाची त्याची ही सुरुवातीची नाटके होती. मात्र नंतरची नाटके आपल्या अस्तित्वाचे अर्थ काय, या प्रश्नाच्या उत्तरांची होती, असे मला वाटते. या नाटकाच्या तालमींमध्ये माझ्या कानांवर अनेक संदर्भ येत होते. नखातेंनी मला त्या वेळेस साल्वादोर दाली, फेलिनी आणि तारकोव्हस्कीचे चित्रपट दाखवले होते. या साऱ्यांशी ते या नाटकाचा संबंध जोडायचे. ते मला उपयोगी निश्चित पडले. पण तरीही मला मकरंदचे लेखन समजावून घ्यायला माझे आयुष्य कामी यायचे. मध्यमवर्गीय समाज, त्याच्या आशा-आकांक्षा, त्याची घोर निराशा, त्यांच्यातील कंटाळवाणेपण आणि नकोसेपण, त्यांच्यातील संवेदन आणि असंवेदनशीलता, व्यक्तींची व्याकुळता आणि मुख्य म्हणजे निरर्थकता-सार्थकता मला त्या नाटकात ठायी-ठायी जाणवे. एका अर्थाने मकरंदचे सुरुवातीचे हे लेखन सतीश आळेकर, श्याम मनोहर आणि बा. सी. मर्ढेकरांच्या शैलीशी नाते सांगणारे आहे, मला वाटायचे. वास्तव आणि स्वप्नवास्तव यांच्या गोंधळातून त्याची नाटके आकाराला आली होती. 

मी नाशिकला ‘प्रयोग परिवार’तर्फे त्याचे ‘ऐसपैस सोयीने बैस’ हे नाटक केले. हे नाटक म्हणजे गमतीदार होते. त्याच्या आधीच्या नाटकांहून वेगळे. यात एका लग्नाळू मुला-मुलीचा वरवरचा बंडखोरपणा आणि अर्थ गमावलेली हातमिळवणी याबद्दल गंमत उडवलेली होती. पुण्यातील उच्च मध्यमवर्ग आणि त्यांचा कमालीचा भोंदूपणा यात दाखविला होता. ‘ठोंब्या’ हे नाटक त्यानेच दिग्दर्शित केलेले होते. हे नाटक कळायला मला तरी त्या वेळी जड गेले होते. मात्र जसजशा तालमी होऊ लागल्या तसतशी त्याची उकल मला झाली आणि माझा त्यातला सहभाग वाढत गेला. आज विचार करताना मला त्याचे हे नाटक उत्कृष्ट वाटते. आशय आणि रचनेच्या दोन्ही अंगांनी या नाटकात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग होते. माणसाचे आयुष्य आणि संगणकीय तंत्रज्ञान यांचे नाते त्याने इथे जास्त वेगळ्या रीतीने दाखवले होते. तुकडे होत चाललेले जग आणि मानवीय भावभावनांचे होत असलेले विखंडीतीकरण इथे प्रखरपणे दर्शविले गेलेले होते. मुळात संगणकाला ‘ठोंब्या’ इतके सार्थ नाव त्याने देऊन आपले आजचे जगणे हे निरर्थक, रटाळ, कमअस्सल, बोथट, रोगट आणि सुजलेले झालेले आहे, हे सुचवले होते. याच धर्तीचे त्याचे नाटक ‘गोळायुग’ होते. सप्तचिरंजीव, त्यांचे अमरत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेक - याभोवती ते नाटक होते. त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग तसे हे ‘गोळायुग’ - आजचे युग! लिबलिबित, आकारविहीन आणि अर्थहीन असे आजचे युग!! ‘गोळायुग’ हे नाटक त्याने दिग्दर्शित केले होते आणि मी त्यात एक मुख्य भूमिका केली होती. पुढे हे नाटक मी ललित केंद्रातील विद्यार्थ्यांकरिता केले होते. त्या वेळी आम्ही परत ते नव्याने लिहिलेही. त्याचा प्रयोग माझ्या मते, सर्वार्थाने अद्‌भुत होता. ही सारी नाटके कळायला आणि पचायला निश्चितच जड होती. नेहमीच्या पठडीतली नव्हती. लोकांच्या शिव्याशाप पचवून आम्ही ती केलेली होती. आमच्याकरितासुद्धा आशयाने आणि शैलीने आम्ही किती तग धरून राहू शकतो याची ती पराकोटीची परीक्षाच हाते. या टप्प्यावरच आम्ही ‘सूर्य पाहिलेला माणूस’ केले.

डॉ. श्रीराम लागू यांच्या सांगण्यावरून मी वसंत पळशीकरांच्या ‘सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण’ हे पुस्तक वाचले आणि ते मकरंदला वाचायला दिले. मकरंदने स्वतंत्रपणे मग ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक लिहिले. आजच्या काळाच्या परिप्रेक्ष्यातून सॉक्रेटिसचा अर्थ लावण्याचे काम मकरंदने त्यात केलेले होते. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘जगण्याचा अर्थ काय?’ या प्रश्नाला उत्तर शोधायचा तिथे प्रयत्न होता. ‘जगण्याचा अर्थ काय’ याचा मथितार्थ ‘मी माझ्या जगण्याला कसा अर्थ देऊ’ हा तिथे होता. माझी कुठली कृती आजच्या काळात अर्थपूर्ण, जबाबदारीची आणि नैतिक ठरेल याचा तो शोध होता. हे नाटक त्याचे शंभर प्रयोग करून आम्ही सन्मानपूर्वक थांबविले. आज मराठी रंगभूमीवरील डॉक्टर लागू यांनी उभी केलेली ‘सॉक्रेटिस’ ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, तर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे मराठी लोकांनी विविध अर्थांनी वेळोवेळी वापरलेले सुभाषित वाक्य बनले आहे.

‘चौक’ हे नाटक आम्ही एकत्रित दिग्दर्शित केलेले, असेच कमालीचे वेगळे होते. अभिनेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यातून मंथन करून आणि ‘अच्युत आठवले आणि आठवण’ ही त्याची कादंबरी हा त्याचा पाया धरून हे नाटक रचले गेले होते. एका चौकात ‘ट्रॅफिक जॅम’ आहे आणि तिथे विविध आर्थिक, सामाजिक, राजकीय स्तरांतली मंडळी एकत्र अडकून पडली आहेत. नाटकातील हा काळ दोन दंग्यांच्या मधला काळ आहे. कमालीची बोथट आणि कमालीची तीव्र भावनिक मंडळी या साऱ्या घटनेकडे कशी पाहतात, याविषयी हे नाटक होते. 

या नाटकानंतर मी त्याच्या त्याने लिहिलेल्या पण न झालेल्या चित्रपटाच्या पटकथेचे नाट्यरूपांतर करून ‘दलपतसिंग येती गावा’ सादर केले. या लेखनात राजकुमार तांगडेही सहभागी झाला होता. नाटकाचा विषय होता अरुणा रॉय यांनी दिलेला माहितीच्या अधिकाराचा लढा. असा ज्वलंत विषय जालन्यातील आमच्या शेतकरी कलाकार मित्रांनी सादर केला होता. हे नाटक आम्हा साऱ्यांकरिता नवा प्रयोग होता. यानंतर त्याने ‘ते पुढे गेले’ हे नाटक लिहून सादर केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वेगळे विश्लेषण करणारे ते नाटक होते. तेही अर्थातच महत्त्वाचे ठरले. यानिमित्ताने एक नोंद इथेच करून ठेवतो. ती म्हणजे, आम्हा दोघांच्या कामात गजानन परांजपे या गुणी अभिनेत्याचा असलेला मुख्य सहभाग. काही मुले तर आम्हाला मजेने ‘थ्री इडियट्‌स’ म्हणत.

मला स्वत:ला असा लेखक कायमचा बरोबर असणे महत्त्वाचे वाटते. समकालीन संवेदना ज्याच्याबरोबर ‘शेअर’ करता येतात, असा लेखक सतत संगतीला असणे गरजेचेच असते. मकरंदचे लेखन मला महत्त्वाचे वाटत आले त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातले तत्त्वज्ञान हे आहे. मकरंदची नाटके नेहमीच्या माहिती असणाऱ्या पठडीतली नाटकीय नाहीत. त्याच्या नाटकांतले प्रश्न बहुस्तरीय, व्यामिश्र आणि अनेक घटकांना छेद देणारे आहेत. त्याच्या नाटकांची भाषा परिचित नाट्यमय नाही. ती अनलंकृत आहे. त्याची नाटके ही फक्त अनुभवावर अवलंबून नाहीत तर ती वैचारिक मांडणी करणारी आहेत. ती मांडणी एकांगी नाही किंवा कोणाचीही सहज-सोपी टरउडवी नाही. सुरुवातीची त्याची नाटके जर ‘आयडियांची’ असतील तर नंतरची ‘आयडिऑलॉजी’बाबत आहेत, असे मला वाटते. त्याची नाटके करीत असताना मला दृष्टी आली आणि दृष्टिकोनही मिळाला.

तर असा हा आजपर्यंतचा प्रवास. कमालीच्या उत्साहाने, भयानक त्रासाने, जबर हट्टाने, तीव्र आग्रहाने, उत्कट व्याकुळतेने भरलेला आणि भारलेला. मला समाजाचे आणि मराठी रंगभूमीचे ठाऊक नाही; पण आमच्या या प्रवासाने माझ्या आयुष्याला अर्थपूर्ण केले. मकरंदने ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ हे तीन खंड लिहून मराठी रंगभूमीचा राजकीय व सामाजिक इतिहास लिहिला आणि समीक्षात्मक नवा आयाम रचला, असे मला वाटते. विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला हा माझा मित्र मराठी रंगभूमीच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातले एक पान निश्चित होऊन गेला आहे, याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. नव्या पिढीला मकरंदची नाटके वाचताना नवे प्रयोग करायला धीर येईल आणि अशा वेळी त्यांना ‘ते पुढे आहेत’ असा विश्वास त्यातून निश्चित मिळेल, यात शंका नाही.

Tags: श्याम मनोहर सतीश आळेकर ते पुढे गेले मराठी रंगभूमीच्या तीस रात्री शांता साठे राम बापट श्रीराम लागू नाटक रंगभूमी समर नखाते अतुल पेठे मकरंद साठे Shyam Manohar Satish Alekar Te Pudhe Gele Marathi Rangbumichya Tees Ratri Shanta Sathe Ram Bapat Shriram Lagu Natak Rangbhumi Samar Nakhate Atul Pethe Makarand Sathe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल पेठे
atul_pethe@hotmail.com

नाटककार, दिग्दर्शक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके