डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

(नाशिक येथे झालेल्या ‘नाटक’  या विषयावरील साधना साहित्य संमेलनात 11 डिसेंबर 2011 रोजी केलेले भाषण.) 

मकरंद साठे हा मला महत्त्वाचा  नाटककार वाटतो. त्याच्याबरोबर मी  सर्वांत जास्त नाटकं केली. तो जागतिक प्रश्नांना भिडू पाहतोय. ‘ठोंब्या’ हे  नाटक त्याने लिहिलं होतं, आपला समाज ठोंब्याच राहिला  आहे. ‘गोळायुग’ हे एक नाटक केलं  होतं, अंधायुग,  ताम्रयुग असं म्हटलं  नव्हतं. असा गोळा ज्याला कसला आकारच नाही,  थुलथुलीत, लिबलिबीत असं आजचं जग आहे. या जगाचे अर्थ लावणं फार कठीण  आहे. ते ‘सिसिफस’ सारखं वर  जायचं आणि खाली यायचं इतकं  सोपं जग नाही. आजच्या जगाची निरर्थकता वेगळी आहे. ती गोदोपेक्षा  वेगळी आहे. तेंडुलकर,  आळेकर,  एलकुंचवार आणि गो. पु. देशपांडे  यांच्यापेक्षा वेगळी आहे. या साऱ्या  महत्त्वाच्या लेखकांनी त्या त्या वेळची परिस्थिती अचूक टिपली,  पण आपण त्याच नजरेतून नाटक  करू शकत नाही. आपले जग वेगळे  झाले तर नाटक आणि कलाही  वेगळीच होणार.

नमस्कार,

साधना साप्ताहिक आणि एसएमआरके महिला महाविद्यालय यांनी येथे  बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. बऱ्याच  काळानंतर आम्ही नाटकवाले एकत्र जमून बोलणं,  चर्चा करणं,  आदानप्रदान होत  आहे. खरं तर या काळाचं व्यवच्छेदक लक्षण सांगायचं तर संवादच करावासा  वाटत नाही किंवा संवाद थांबलाय. म्हणून मी आभार मानतोय.

नाशिक म्हटलं की माझ्या मनाच्या तारा छेडल्या जातात आणि मला अजूनही ‘तुम्ही पेठे म्हणजे नाशिकचे ना?’  असं विचारलं जातं. त्यांना मी आनंदाने ‘हो’  असं उत्तर देतो. नाशिकशी माझी नाळ जुळली होती. मी नाशिकमध्ये चार-साडेचार वर्षं राहिलो  तो 1990 चा काळ होता. आणि आजच्या या सत्राचा,  माझ्या बोलण्याचा विषय  आहे नव्वदोत्तरी रंगभूी. खरं सांगायचं तर मी माझ्यासाठी असा विषय ठरवून  घेतला आहे की,  माझी घुसमट काय झाली?  नव्वदच्या आधी मी काय होतो  आणि नव्वदच्या नंतर मी काय झालो आणि आता काय आहे!

कारण मी काही  विचारवंत नाही,  समाजशास्त्राचा अभ्यासक नव्हे,  समीक्षक तर नव्हेच नव्हे. पण एक छोटासा सृजनशील माणूस आहे,  त्यातून दिग्दर्शक. दिग्दर्शकांपुढे फार प्रश्न  आहेत,  लेखकांइतकेच प्रश्न आहेत. (नटांना काही प्रश्न आहेत की नाही या  संदर्भात त्यांच्याशी बोलावं लागेल.) त्यामुळे लेखक आणि दिग्दर्शक यांना प्रयोगशील नाटकाकरिता आट्यापाट्याचा खेळ खेळावा लागतो.  मी नाशिकमध्ये होतो तेव्हा आम्ही ‘प्रयोग परिवार’  सुरू केला होता. तेव्हा मी  नाशिकच्या मुक्त विद्यापीठात होतो. आणि श्री. अ. दाभोलकर हे प्रयोग  परिवाराच्या माध्यमातून शेतीतील प्रयोग करायचे. तेव्हा मी थिएटर ॲकॅडीतून  बाहेर आलो होतो,  ती पुण्यातली संस्था होती आणि तिचं भारतीय पातळीवर  काम होतं. त्या संस्थेत बरीच वर्षं राहिल्यानंतर मला असं वाटलं होतं की,  मला  यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. काय करायचंय हे मला माहीत नव्हतं,  कारण  आधीच्या लोकांनी इतकं चांगलं करून ठेवलं होतं.

सतीश आळेकर आणि  जब्बार पटेल यांच्या पुढे जाऊन पाऊल टाकणं ही फार लांबची गोष्ट आहे,  असं  मला वाटत होतं. पण मला असंही वाटत होतं की,  ते जे काही करताहेत त्यापेक्षा  मला काहीतरी वेगळं जाणवतंय. वेगळं काय जाणवतंय हे मात्र त्या वेळी सांगता  येत नव्हतं. कारण आपण जगत असतो तेव्हा त्या जगण्याचं,  त्या काळाचं लगेच  परिशीलन करू शकत नसतो,  त्यावर भाष्य करू शकत नसतो, कारण तो  आपल्या धडपडीचा काळ असतो. त्यामुळे 1990 मध्ये मी नाशिकमध्ये आलो तेव्हा माझ्यासाठी तो बदलाचा काळ होता. माझ्या विश्वामध्ये कमालीची  उलाघाल चालली होती,  अस्वस्थता होती,  व्याकुळता आली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ  स्टिफन हॉकिंग म्हणाले होते,  प्रत्येकाचं- ‘बेबी युनिव्हर्स-’ एक छोटं अवकाश  असतं आणि त्या अवकाशात माझं जग,  माझा समाज,  माझी संस्कृती प्रत्येकाला  समजून घ्यायची असते. म्हणजे  त्यांना असं म्हणायचंय की जग आता  इतकं मोठं झालंय किंवा इतक्या तुकड्या-तुकड्यांत विखुरलं गेलंय  की,  अख्खं जग कवेत घेता येणं  जवळजवळ अशक्य झालंय.

आता  हाच प्रश्न महानुभव पंथाच्या चक्रधर  स्वामींना पडला नव्हता काय?  त्यातून आलेली हत्ती आणि सहा  आंधळे ही गोष्ट आपल्याला माहीत  आहे. आपण हत्ती समजून घेण्यासाठी कायमच कमी पडत  आहोत. आपण तेच आजच्या  काळातही म्हणतोय. त्यात आज जग  खूप बदलतंय. म्हणजे आपण आंधळे,  बहिरे,  मुके झालो आहोत आणि ज्याला हात लावतोय तो हत्ती  तरी आहे का असा प्रश्न पडतोय. ही  व्यामिश्रता नव्वद नंतरची आहे.  आणि हेच कारण असावं आयोजकांनी हा विषय निवडण्याचं.  

नव्वद नंतर उद्‌भवलेली परिस्थिती मानवी इतिहासात कधी  उद्‌भवलेली नव्हती. खाजगीकरण असेल,  उदारीकरण असेल,  मुक्त अर्थव्यवस्था असेल,  दहशतवाद असेल, व्हर्च्युअल  रिॲलिटी असेल. मोबाईल नावाची संकल्पना 1990 नंतर आली  आणि तिच्यामुळे  ‘काल’  आणि ‘अवकाश’  यांची व्याख्याच बदलली. आज मी इथे असताना कोणाशी तरी सतत कनेक्टेड आहे  आणि ‘कनेक्टेड’  असून ‘डिसकनेक्टेड’ आहे. म्हणजे आपल्याला  वाटतं संवादाची माध्यमं वाढली,  पण तसं झालेलं नाही. आपण अधिकाधिक एकाकी पडलो.

मला 1990 नंतर जी घुसमट जाणवू  लागली होती त्यात एकाकीपणाची,  व्याकुळपणाची जाणीव प्रमुख  होती. एकटेपणा वेगळा आणि एकाकीपणा वेगळा. म्हणजे एकटेपणा तर जाणवू लागलाच होता, पण एकाकीपणाही जाणवू  लागला होता. तो एकाकीपणा ‘वेटिंग फॉर गोदो’  लिहिणाऱ्या  सॅम्युअल बेकेटला जीवनातला जो ‘नथिंगनेस’ जाणवत होता,  त्यापेक्षा काहीतरी वेगळा होता. घुसमट होत होती,  पण तिचे अर्थ  लागत नव्हते. तेव्हा ‘पोस्टॉडर्निझम’  वगैरे शब्द मला माहीत  नव्हते. आज मागे वळून बघताना, सिंहावलोकन करत असताना  आज त्याचे काही अर्थ लागतात. हे फक्त त्यावेळेस नाटकापुरतं  घडत होतं असं मला वाटत नाही. हे सर्व क्षेत्रांत घडत होतं. चित्रकला,  संगीत,  चित्रपट,  वास्तुशिल्पकला अशा सर्व क्षेत्रांत.  

गेल्या महिन्यात मी वीस दिवस मुंबईत होतो. त्या काळात मी  600 फिल्मस्‌ पाहिल्या. मुंबईतील एका फिल्म फेस्टिव्हलचा परीक्षक म्हणून त्या फिल्मस्‌ पाहण्याचा योग आला. त्या डॉक्युमेंटरी फिल्मस्‌  आसेतुहिमाचल भारतातून आलेल्या  होत्या. प्रत्येक प्रांताचे,  तिथल्या लोकांचे काय प्रश्न होते, काय घुसमटी  होत्या आणि आहेत हे त्या निमित्तानं  मला पाहता आलं. ‘डॉक्युमेंटरी’  हे आज फिल्मपेक्षा जास्त प्रखर व  प्रभावीपणे समस्या मांडू पाहणारं साधन  आहे असं मला वाटतं. त्या 600  डॉक्युमेंटरीज पाहिल्यावर मी हादरून  गेलो. ‘माझीया जातीचे मज भेटो  कोणी,  आवडीचे धणी फेडावया,’  अशी भारतभर कुठे कुठे अस्वस्थ  माणसं आहेत,  असं वाटलं. ही माणसं नागालँड,  मणिपूर,  बिहार अशा  भागातही आहेत. अतिशय धक्कादायक,  विस्मयचकित करणारा अनुभव मला  आला. त्यामुळे मी विचार करायला लागलो,  1990 ही नेमकी काय भानगड आहे?

काल आणि अवकाश यांना तडे गेलेलं संपूर्ण नवं जग  अस्तित्वात आलंय. कॉम्प्युटर आला, मोबाईल आला,  यांनी  संपूर्ण विभाजन केलं. अंबानींची एक कॅप्शन होती, ‘कर लो दुनिया  मुठ्ठी में’ आणि पेप्सीची कॅप्शन होती ‘ये दिल मांगे मोअर‘.  मला  वाटतं 1990 ते 2000 या दशकाची ही दोन व्यवच्छेदक लक्षणं  आहेत. मध्यमवर्ग वाढत तर गेलाच,  पण या नवमध्यमवर्गाच्या  ज्या जाणीवा होत्या, त्याला विकासाच्या नवनव्या वाटा फुटल्या.  आणि बाजारपेठेनं आपला कब्जा घेतला. माणसांच्या वखवखणीला धुमारे फुटले. हे सगळं होतं कशातून?

आज हे  नाही- ते नाही असं होतं,  त्याची कारणं काय?  त्यांच्या मुळाशी  जाता येईल काय?  जेव्हा आपलं ठणकतं तेव्हा ते का ठणकतं याचं  शास्त्रीय कारण आपल्याला शोधावं लागतं. डॉ. राजीव शारंगपाणी  यांच्या हाताखाली मी वीस-पंचवीस वर्षं काम करत आहे,  तेव्हा असं लक्षात आलं की मानसिक रुग्णता वेगवेगळ्या पद्धतीनं येते.  माझं काही तरी ठणकतंय,  पण काय आणि कुठे हे माझं मलाच कळत नाहीये. अशी आजची साऱ्यांची अवस्था आहे. त्यांचं  ‘शरीर-संवादशास्त्र’  हे पुस्तक अलीकडेच आलंय. तेव्हा असं  जाणवलं,  आपला आपल्याशी संवादच थांबला आहे. केवळ  बाहेरच्यांशी संवाद थांबलाय असं नाही तर स्वसंवादही थांबलाय.  ‘मास कम्युनिकेशन’ असं आपण म्हणतो,  पण कोण कोणाशी काय  बोलतोय हे कळतच नाही,  अशी आज अवस्था आहे. ती पदोपदी  जाणवते. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ असं म्हणत असताना आपल्या  मुठीतून काहीतरी सत्वयुक्त निसटलंय ही जाणीव सर्वांना आहे.

मी  पाहिलेल्या भारतभरातल्या माहितीपटात हीच हरवल्याची जाणीव  होती. कुठे भाषा तर कुठे संगीत तर कुठे संस्कृती. काहीतरी  हरवलंय हीच भावना आहे. पण हा गोंधळ आहे असं म्हणून मला बाजूला जाता येत नाही. कारण या समाजाचा मी एक आंतरबाह्य  घटक आहे. मग याचे अर्थ समजून कसे घ्यायचे?  मला असं वाटलं  की, ज्याच्याशी आपण तुलना करतो अशी नव्वदच्या आधीची  रंगभूी पाहिली तर... तेंडुलकरांचं नाटक समाजाला गदगदून  हलवणारं आहे. सतीश आळेकरांचं ‘महानिर्वाण’ आलं तेव्हा बाँब  पडावा असं झालं होतं. आमचं नाटक तसं होऊ शकत नाही. इथून पुढे असं होणार नाही. आपलं व्यक्तिगत आयुष्य एकरेषीय राहिलेलं  नाही,  ते अनेकरेषीय झालं आहे. ‘गॅट करार’  आला ही एक महत्त्वाची घटना होती. जागतिकीकरण हे इथे दोन-चार मॉल्स येणं  एवढ्यापुरतं सीमित नाही.

1990 मध्ये मी नाशिकमध्ये आलो  आणि त्यानंतर दर दोन वर्षांनी मी नाशिकमध्ये येतो तेव्हा मला नाशिकचा चेहरा बदललेला दिसतो. नुसता चेहरा नाही तर  अंतर्मनही बदललेलं दिसतं. मॉल्स आणि फ्लाय ओव्हर्स  पाहिल्यावर आपण पुण्यात आहोत की नाशिकमध्ये की मुंबईत  असा प्रश्न पडतो,  इतकं सपाटीकरण झालंय. आता इतकं एका  बाजूला नव्वदनंतर घडताना आश्चर्यकारकपणे तुरळक का होईना, पण अद्‌भुतही पहायला मिळतं. ते अद्‌भुत नव्वदपूर्व  कालखंडापेक्षा वेगळं आहे.

मी आता बिहारमधील एक अप्रतिम फिल्म पाहिली. फिल्मची  सुरुवात होते तेव्हा एक माणूस होता म्हातारा,  त्याचं नाव  दशरथबाबा. त्याची मुलाखत चालू होती तेव्हा तो कुठेतरी दगड  खोदताना दिसतो. ‘गया’  या साठ-सत्तर घरांच्या छोट्याशा गावात  राहत होता. त्या गावाला डोंगराच्या पलीकडून पाणी आणावं  लागायचं. त्यात बायकांचे हाल व्हायचे. ते पाहून दशरथबुवाला  आत खोलवर जखम झाली. या गृहस्थाने पहार घेतली,  छिन्नी  हातोडा घेतला आणि डोंगर फोडायला सुरुवात केली. त्या एकट्या माणसाने वीस वर्षं डोंगर फोडून वाट काढली.

80 किलोमिटरचा रस्ता त्या माणसाने वाचवला आणि आता त्या गावातली माणसं सरळ डोंगर फोडून तयार केलेल्या वाटेने जातात. त्यानंतर मग तिथे  पत्रकार आले, डॉक्युमेंटरी करणारे आले. त्याने सांगितले- मला घर देऊ नका,  या चाळीस लोकांना द्या आणि  आधी प्राथमिक आरोग्य केंद्र द्या. अशा वेळी मला आजचा  कालखंड काळा वाटत नाही तर आव्हानात्मक वाटतो. या काळाचं  आव्हान पेलवायचं तर जी आयुधं परजावी लागतील ती आयुधं  पूर्वीची असून चालणार नाही. आता आधुनिक आयुधं असावी लागतील. आज समाजाला मी नीट समजून घेतोय की नाही,  आव्हानांना भिडतोय की नाही,  त्यासाठी नवी आयुधं शोधतोय की  नाही हे खरे प्रश्न आहेत. हा मूल्यात्मक फरक आहे. ती आयुधां मला बौद्धिक दृष्ट्याच तपासून घ्यावी लागतील. त्यासाठी मला  शारीरिक व बौद्धिक कुवत वाढवावी लागेल. त्यामुळे मला  बिहारमधील त्या माणसाचं उदाहरण महत्त्वाचं वाटतं.

हा समाज  कसा वाईट आहे,  ही माणसं कशी वाईट आहेत,  या संस्था किती  वाईट आहेत असं म्हणणं काही खरं नाही. मी काय करू शकतो हे  महत्त्वाचं आहे. म्हणूनच आम्ही ‘सूर्य पाहिलेला माणूस’  हे  सॉक्रेटिसवरचं नाटक केलं. एक व्यक्ती म्हणजे संस्था असते. आता  संस्थांकडून काही होणं शक्य नाही. आता नवनव्या संस्था वाढत राहणं हे समाजाच्या बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. घरात  म्हाताऱ्यांचा प्रश्न आला,  संस्था काढा,  मानसिक रुग्णांचा प्रश्न  यायचा अवकाश की संस्था तयार! अशा संस्था काढून प्रश्न सुटत  नसतात,  समाजाने जबाबदारी घ्यायची असते,  म्हणजे व्यक्तीने  जबाबदारी घ्यायची असते. हे सॉक्रेटिसने,  गांधीजींनी शिकवलेलं  तत्त्व आहे. अशावेळी प्रश्न असा आहे की आमची मूल्यं,  मुळं  कशी शोधू?

1990 नंतरचे जग हे विस्कटलेले आहे,  विभक्त  आहे,  विखंडित आहे. खंड तुटावेत तसे जगाचे दोन वेगळे भाग  झालेत. आता प्रश्न असा आहे की,  त्या तिठ्यावर माझी पिढी  आहे. मी यातून माझ्यापुरता मार्ग काढला तो असा की,  वेगवेगळ्या  संवेदनशील आणि समविचारी लोकांबरोबर जायचं आणि त्यांचं  काय चाललंय ते पाहायचं. मी नंदुरबारला गेलो होतो,  तिथे माझ्या  आदिवासींविषयीच्या कल्पना कोलमडून पडल्या. आपल्या मनात  आदिवासी म्हटलं की,  गाणी,  नृत्य,  वाद्य असं चित्र समोर येतं. पण काही येत नव्हतं त्यांना. जात्यावरच्या ओव्या येत नव्हत्या.  जात्यावरच्या ओव्यात बाईच्या दु:खाचं प्रतिबिंब असतं. जातं हेच  मुळात शोषणाचं एक प्रतीक आहे. आता मिक्सर आलाय. आता  प्रश्न असा आहे की,  मिक्सरवरची गाणी कशी रचायची?  नंदुरबारला जा तुम्ही,  तिथल्या मुली पहा,  त्या वेगळ्या आहेत,  त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. एका बाजूला विकास झालेला  आहे- होतो आहे,  यात काही शंकाच नाही,  पण तो विकास कसला  आहे हा खरा प्रश्न आहे.

तो सांस्कृतिक विकास आहे का?  बौद्धिक विकास आहे का?  तो सामाजिक विकास आहे का,  तो राजकीय विकास आहे का?  तो किती टक्क्यांपर्यंत पोहोचतो? म्हणजे ‘विकास’ची व्याख्या करायची झाली तर विवेकाची कास धरलेली  समृद्धी अशी करावी लागेल. आहे का विवेकाची कास?  किती लोकांना प्रश्न पडतात?  98 टक्के लोकांचे प्रश्न भलतेच आहेत.  मला एका टप्प्यावर असं वाटायला लागलं की, आम्हा नाटकवाल्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. थिएटरच नाही,  नटच नाहीत,  प्रेक्षकच नाहीत,  वगैरे प्रश्न फालतू आहेत.

बहिणाबार्इंच्यावर मी  फिल्म केली तेव्हा खानदेशात हिंडत होतो,  महानोरांच्या गावांत गेलो होतो. त्या आजूबाजूच्या गावाला गेलो होतो तेव्हा पाहिलं,  जी परिस्थिती बहिणाबार्इंच्या वेळी म्हणजे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी  होती,  तशीच परिस्थिती आजही आहे. ती अधिक बकाल झाली  आहे,  कारण एका बाजूला शहरीकरण झालंय आणि दुसऱ्या  बाजूला खेडी पूर्वीसारखी राहिली नाहीत. प्लॅस्टिकच्या पिशव्या,  घाण, डास असं सर्व आलंय त्या खेड्यांत. पूर्वी डास नव्हते  खेड्यात. बहिणाबार्इंच्या कवितेत डासांचं वर्णन नाही, तुकारामाच्या अभंगात डासांचं वर्णन नाही. असते तर त्यांनी  लिहिलं असतं ना,  अभंग लिहायला बसलो आणि डास आले. या  सर्वांचे परिणाम माझ्यावर होतच असतात.

बाबरी मशिदीचा प्रश्न  असो,  गुजरातची दंगल असो,  किंवा शेतीचे प्रश्न असोत. मी  नाशिकच्या मुक्त विद्यापीठात असताना,  तिथल्या शिक्षकांबरोबर  गावोगावी फिरत होतो, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहत होतो.  तुम्हाला सांगतो,  शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नाटकवाल्यांचे प्रश्न यात  काही फरक नाही. पण मग यावर उपाय काय?  तर श्री.  अ. दाभोलकर या माणसाने प्रयोग परिवाराच्या माध्यमातून  संकल्पना मांडली होती,  तुम्ही तुमच्या शेतात जे पिकवता त्यातूनच  खत तयार करा. आंतरपीक पालट करा,  दहा गुंठ्यात विविध झाडं  लावा,  त्यावर गुजराण करा,  आपलं नातं सेंद्रिय करा. आपलं ‘बेबी  युनिव्हर्स’  सकस करा. पूरक करा. कचऱ्याचं रूपांतर पिकात करा.  एकदा अशोक शहाणे म्हणाले होते,  दु:खाचं सेलिब्रेशन का नाही  करत?  खरं आहे त्यांचं म्हणणं,  दु:ख किती उगाळत बसायचं?  अशी कितीतरी माणसं 2000 पर्यंत होती,  आज नाहीत. त्यामुळे  मला वाटतं,  हा आव्हानात्मक कालखंड आहे. त्याला भिडण्याचे  मार्ग आपले आपण काढले पाहिजेत.

लोकांपर्यंत पोहोचता येतं,  त्यासाठी कोणत्याही प्रोड्यूसर्सची गरज नाही- काडीची गरज  नाही. अतिशय ताण येतो,  त्रास होतो,  शरीराची झीज होते.  खेडेगावात जाऊन राहायचं तर माझा संपूर्ण अहंकार गळून पडतो.  आपण कुठल्या थिएटरविषयी बोलतोय?  आपण ज्या थिएटरविषयी  बोलतोय जिथे बाजारकेंद्री व्यवस्था आहे. जिथे माणूस विकला  जातोय,  प्रत्येक गोष्ट विकली जातेय आणि इथे माणसांचे प्रश्न  भयानक आहेत.  पुढच्या दहा वर्षांत ही आव्हानं अधिक भीषण असणार आहेत.  ती आव्हानं ओळखणं आणि त्यांना भिडणं हा सर्वांत महत्त्वाचा  प्रश्न असणार आहे. म्हणजे नव्वदनंतरची जी रंगभूी आहे  तिच्याकडे आम्ही आताशी बघायला लागलोय. अजून सुरुवात व्हायची आहे. आणखी 25 वर्षांनंतर इथे असाच परिसंवाद होईल  तेव्हा त्यात लेखाजोखा मांडला जाईल.  आता जयंत पवारांनी जी नावं घेतली; त्यांनी खरंच महत्त्वाचं  काम केलंय. त्यांची नावं आता मी परत घेत नाही,  पण माझ्यात  बदल झालाय, त्यांच्यातही बदल झालाय.

अलीकडे माझ्यावर  असा आरोप केला जातो की,  तुम्ही कार्यकर्ते आहात की कलावंत?  म्हणजे काय?  मी कार्यकर्ता पण आहे आणि कलावंत पण आहे.  आणि यापुढे तर असं विभाजन करताच येणार नाही.  मकरंद साठे हा मला महत्त्वाचा नाटककार वाटतो.  त्याच्याबरोबर मी सर्वांत जास्त नाटकं केली. तो जागतिक प्रश्नांना  भिडू पाहतोय. ‘ठोंब्या’  हे नाटक त्याने लिहिलं होतं,  आपला  समाज ठोंब्याच राहिला आहे.  ‘गोळायुग’ हे एक नाटक केलं होतं,  अंधायुग,  ताम्रयुग असं म्हटलं नव्हतं. असा गोळा ज्याला कसला  आकारच नाही,  थुलथुलीत,  लिबलिबीत असं आजचं जग आहे.  या जगाचे अर्थ लावणं फार कठीण आहे. ते ‘सिसिफस’सारखं वर  जायचं आणि खाली यायचं इतकं सोपं जग नाही.

आजच्या जगाची निरर्थकता वेगळी आहे. ती गोदोपेक्षा वेगळी आहे. तेंडुलकर,  आळेकर,  एलकुंचवार आणि गो. पु. देशपांडे यांच्यापेक्षा वेगळी  आहे. या साऱ्या महत्त्वाच्या लेखकांनी त्या त्या वेळची परिस्थिती अचूक टिपली,  पण आपण त्याच नजरेतून नाटक करू शकत नाही.  आपले जग वेगळे झाले तर नाटक आणि कलाही वेगळीच होणार.  तिचा शोध घेणे महत्त्वाचे. मकरंद साठेंच्या लेखनात मला ही दिशा  दिसते. आजचे वेगळे आहे.  नव्वदी आधीच्या जगाशी नाळ जोडून घेऊन आजच्या जगाला  आपल्याला सामोरं जायचं आहे. व्यामिश्र असले,  गुंतागुंतीचे  असले तरीही ही वाटचाल आपल्या सर्वांना करायची आहे. विविध क्षेत्रांत मोठे नाही तरीही छोटे छोटे ‘उठाव’  व्हायला हवे आहेत.  एकमेकांना न खचवता धीर द्यायला हवाय.

ग्लोरिफिकेशनचे,  मिस्टीफिकेशनचे दिवस गेलेत. डिग्लोरिफिकेशनचे,  डि- मिस्टीफिकेशनचे हे युग आहे. अधिक जबाबदारीचे,  अधिक  व्यापक होण्याचे भान न हरवण्याची शक्ती अंगी ठेवण्याचे हे युग  आहे, त्यावर भाबडेपणाने नाही तर सजगतेने विश्वास ठेवण्याचे हे  युग आहे. नव्वद नंतरच्या उलथापालथीत मला चक्रावून जायला झालं होतं. पण माझ्या कुवतीनुसार काही करीत राहिलो,  हिंडलो,  फिरलो,  कार्यशाळा घेतल्या,  माहितीपटही केले. समाजातले  विविध स्तर अनुभवले. त्यातून माझ्यापुरती मला दिशा गवसली.  छोटीशी. नव्वदनंरच्या रंगभूीचा एक प्रतिनिधी म्हणून मला  इतिहासाचे विच्छेदन,  विश्लेषण आणि आकलन या दृष्टीने  महत्त्वाचे वाटते.  

असो,  तर एकूण परिस्थिती वेगळी कशी आहे,  बिकट कशी आहे ह्याचे मला जाणवलेले वर्णन मी केले. या ‘पावभाजी कल्चर’ मध्येही काही विलक्षण आज घडते आहे. या गोंगाटातही आपला सूर शोधणारी माणसं आजूबाजूला आहेत. त्यांच्याशी नाळ  जोडणं गरजेचं आहे. काही नवीन करायचे असेल तर कलावंतांना  अधिक प्रखर व्हावे लागेल. पणाला लावावे लागेल.

Tags: साधना साहित्य संमेलन नाशिक कला नाटक अतुल पेठे Nashik Kala Natak Atul pethe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अतुल पेठे
atul_pethe@hotmail.com

नाटककार, दिग्दर्शक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके