डिजिटल अर्काईव्ह

ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या सू की यांना, तब्बल वीस वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर म्यानमारमधून बाहेर पडून ब्रिटनला जाता आले, तेव्हा (2013) त्यांनी ऑक्सफर्डमध्ये केलेले भाषण. 

आयुष्यात काही दिवस असे असतात की, जेव्हा अनेक घटक जुळून येतात. आजचा दिवस त्यापैकी एक आहे. मी ऑक्सफर्ड विद्यापीठातील सेण्ट ह्युजेस कॉलेजमध्ये शिकले. त्यानंतर ऑक्सफर्ड शहराच्या पार्क टाऊन या एका उपनगरात माझ्या ब्रिटिश नवऱ्यासोबत आणि आमच्या दोन मुलांसमवेत राहिले. त्यानंतर जेव्हा मला म्यानमारमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले, तेव्हा हीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (जिथे मी शिकले आणि राहिले ती) माझ्या बाजूने उभी राहिली. म्यानमारच्या शासनाने जेव्हा मला नजरकैदेत ठेवले, तेव्हा आयुष्याच्या त्या सर्वांत कठीण अशा काळात ऑक्सफर्डमधील आठवणींच्या बळावर मी टिकून राहिले. माझ्यासमोरील अतिशय खडतर अशा आव्हानांचा मुकाबला करताना त्या आठवणींनी मला जगण्याची ऊर्जा दिली.

खरे तर माझ्या या आठवणी अतिशय साध्याच होत्या. उदाहरणार्थ, आजचा जसा दिवस आहे तशाच एखाद्या दिवशी मी उघड्या गाडीत बसून चेरवेल परिसरामध्ये फिरायला गेले असेन. किंवा सेण्ट ह्युजेस कॉलेजच्या हिरवळीवर बसून वाचत बसलेली असेन. किंवा लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तके न वाचता, खिडकीतून बाहेर पाहत असेन. अशाच साध्या-साध्या वाटणाऱ्या क्षणांच्या अनेक आठवणी. मागे वळून पाहताना या आठवणी फारच साध्या वाटत असल्या, तरी माझ्या आयुष्यात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कारण ज्या काळातल्या या आठवणी आहेत, तो काळ माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा काळ होता. माझ्या त्या आनंदी दिवसांकडे मागे वळून पाहताना मला लक्षात आले की, बर्मातील माझ्या देशातील तरुणाईला आनंदी जीवन जगण्याची इच्छा होती. मात्र (लष्करी शासनाच्या दडपशाहीमुळे) तशी संधी त्यांना कधी मिळाली नाही. काल मी सेण्ट ह्युजेस कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांना भेटले आणि आज मी ऑक्सफर्ड विद्यापीठ, येथील विद्यार्थ्यांच्याकडे पाहते; तेव्हा मला पुन्हा असे वाटले की, मी तरुण होत आहे. 

मी स्वतः इथे शिकत होते, त्या काळाकडे परत जात आहे. ते असे दिवस होते की,  जेव्हा आम्हाला कशाचीही चिंता नव्हती, आम्ही अतिशय आनंदी होतो आणि आमच्या मनात एक प्रकारचा गोडवा होता. आम्ही तेव्हा जसे होतो, तसेच आताचे विद्यार्थीसुद्धा आहेत. या सर्व मुलांना त्यांच्या मनातला गोडवा, निरागसपणा जपण्याची संधी मिळाली आहे. ही गोष्ट साधीच वाटली तरी फार महत्त्वाची आहे, असे मला वाटते. जेव्हा तुम्ही या तरुण मुला-मुलींकडे पाहता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही छुपा अजेंडा दिसत नाही. तेव्हा आमची मने कशालाही बांधलेली नव्हती, खुली होती तसेच आताच्या या विद्यार्थ्यांचेही आहे. तेव्हा आम्ही मोकळ्या-निर्विष मनाचे होतो, कारण आम्हाला तसे राहण्याची संधी दिली गेली होती. आम्हाला तेव्हा कशाचीही भीती वाटत नसे. कशाची भीती वाटावी असे इथले वातावरणसुद्धा नव्हते. त्यामुळे आम्हाला जगाकडे मोकळ्या मनाने, खुलेपणाने बघणे शक्य झाले.

मला साध्या-साध्या अनेक गोष्टींची आता इथे आठवण येत आहे. ॲन पास्तरनाक-स्लेटर या अतिशय जीवाभावाच्या मैत्रिणीबरोबर मी बसमधून प्रवास करीत असे. आम्ही दोघीही एकमेकींच्या बाजूला बसत असू. आम्ही तेव्हा जीन्स पँट घालत असू. आमच्या दोघींच्या मिळून प्रत्येकी दोन अशा चार गुडघ्यांकडे पाहत ॲन म्हणत असे- ‘आपले गुडघे जीन्समध्येसुद्धा वेगवेगळे दिसतात, हे काही बरोबर नाही.’ तिचे म्हणणे खरे होते. मला आता नेमके आठवत नाही, पण चारपैकी दोन गुडघ्यांचा आकार हा वर्तुळाकार होता आणि दोन गुडघे जरा टोकदार होते. आम्ही विद्यार्थी असताना अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत असू, त्यावर चर्चा करत असू. छोट्या-छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आमचे स्वतःचे असे एक विश्व तयार करत असू. तेव्हाचे जगसुद्धा वेगळे होते, परंतु आम्हाला त्याची भीती वाटत नसे. आमच्यात अनेक प्रकारचे फरक होते, वैविध्य होते. याचाच अर्थ असा की, आम्ही (त्यामुळे) जास्त शिकण्याची संधी होती. त्यातून आमची मने खंबीर होत होती. कारण समोर येणाऱ्या प्रश्नांना कसे सामोरे जावे, याचे धडे आम्ही तिथे शिकलो.

त्या काळातील माझ्याबरोबरच्या एका व्यक्तीचा उल्लेख इथे करायला हवा. जॉन ल-कॅरे हे इंग्रजी गुप्तहेरविषयक कादंबऱ्या लिहिणारे प्रथितयश लेखक माझ्यासोबत ऑक्सफर्डमध्ये शिकत होते. नंतर मी बर्मात नजरकैदेत होते, तेव्हा त्यांच्या पुस्तकांची मला फारच मदत झाली. त्या पुस्तकांमुळे मला रोजच्या प्रश्नांमधून बाजूला होता यायचे. खरे तर तसेही नाही. त्या पुस्तकांनी मला एक नवे विश्व खुले केले. ती पुस्तके वाचणे हा एक प्रकारचा प्रवास होता. असा प्रवास ज्यामुळे केवळ इतर देश व जगातील इतर प्रदेशच नव्हे, तर विविध प्रकारच्या कल्पना आणि विचार यांच्यात वावरण्याची संधी मला मिळाली. ल-कॅरे यांची पुस्तके वाचताना घडत असलेल्या वैचारिक प्रवासामुळे मला असे नेहमी वाटत असे की, जरी मी बर्मात नजरकैदेत असले तरी उर्वरित जगापासून अजून तुटून पडलेले नाही. म्हणजे माझ्या घरापासून फार दूरवरच्या जगाशी मी जोडली गेली आहे, असा फील मला ती पुस्तके वाचताना येत राहिला. त्यामुळे नजरकैदेत राहूनसुद्धा मला एकटेपणा कधीच जाणवला नाही. हे मी करू शकले, कारण मी तरुणपणी ऑक्सफर्डमध्ये शिकले होते. मला त्या काळात विविध देशांतील मित्र मिळाले होते. ऑक्सफर्डमध्ये राहून मी नेमलेली पुस्तके आणि तयार केलेला अभ्यासक्रम यापासून तर खूप काही शिकलेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, मी ऑक्सफर्डमध्ये राहून मानवी संस्कृतीतील सर्वोत्तम घटकांबाबत आदर बाळगायला शिकले. 

मानवी संस्कृतीतले हे सर्वोत्तम घटक जगभरात सर्वत्र विखुरलेले आहेत. आणि मानवी संस्कृतीतील सर्वोत्तम गोष्टींचा आदर करायला शिकल्याने, मानवी संस्कृतीत जे सर्वोत्तम नाही, त्याच्याशी जुळवून घेणे मला सोपे झाले. आता जे सर्वोत्तम नाही ते पुढे कधी तरी सर्वोत्तम होईल, त्यामध्ये सुधारणा करता येतील, असा विश्वास ऑक्सफर्डमधील वास्तव्याने मला एकूण मानवजातीविषयी वाटायला लागला. माणसात असलेल्या उपजत शहाणपणावर माझा विश्वास बसला. हे शहाणपण जरी प्रत्येकाकडे नसले तरी जगाला पुरेल व स्वतःशिवाय इतरांचे हित साधू शकेल इतक्या लोकांकडे ते नक्कीच आहे. मला नेहमीच असे वाटत आले आहे की, बर्मातील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कँपस लाइफ’ जगता आले नाही, ही गेल्या काही दशकांतील आमच्या देशाच्या दृष्टीने सर्वांत वाईट गोष्ट आहे. कॅम्पस लाइफ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते. कॅम्पस लाइफ जगण्याने मुले आपल्या सर्जनशील ऊर्जेचा वापर करून स्वतःचे विश्व उभे करू शकतात, किंवा आहे त्या जगावर आपला ठसा उमटवू शकतात. पण विद्यार्थांना शिस्त लावायला हवी, या तथाकथित गरजेमुळे आमच्या देशात विद्यापीठांमधील विद्यार्थिजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे.

बर्मातील विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कॅम्पस लाइफ जगण्याची पूर्ण संधी मिळालेली पाहायला मला आवडेल. आणि या कामात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काही मदत केली तर मी ऑक्सफर्डची कायमची ऋणी राहीन. जगाने आपली दखल घेणे आणि आपण जगाची दखल घेणे म्हणजे नेमके काय, याचा अनुभव बर्मातील विद्यार्थ्यांना यायला हवा, असे मला वाटते. प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर उभे राहून, पूर्ण आत्मविश्वासाने आपल्यातील सर्वोत्तम क्षमतांचा वापर जगासाठी करायला हवा आणि जगालासुद्धा आपल्यातील सर्वोत्तमतेची आस आहे, या जाणिवेचा अनुभव त्यांनी घ्यायला हवा. मी ऑक्सफर्डमध्ये असताना मानवी संस्कृतीची कदर करायला शिकले. कारण तेव्हा ऑक्सफर्डमधील विद्यार्थ्यांमध्ये बर्माहून आलेली मी एकटीच होते. पहिली दोन वर्षे तर ऑक्सफर्डमध्ये राहणारीसुद्धा मी एकटीच बर्मीज विद्यार्थिनी होते. माझे सर्व मित्र-मैत्रिणी इतर देशांतून आलेले होते. त्यामध्ये ब्रिटिश विद्यार्थी होते तसेच घाना, भारत, थायलंड, श्रीलंका या देशांतून व जगाच्या इतर भागांतून आलेले विद्यार्थीसुद्धा होते. तेव्हा मला असे कधीही वाटले नाही की, ते माझ्याहून वेगळे आहेत. कारण आम्ही सर्वजण एकमेकांसारखेच होतो. आम्ही एका अशा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होतो, जिथे आमच्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद गळून पाडण्याची जादू होत होती. धर्म, वंश, राष्ट्रीयत्व, अभ्यासातील मार्क्स अशा कोणत्याही गोष्टीमुळे आम्ही एकमेकांपासून तुटत नसू.

ऑक्सफर्ड ही अतिशय विशाल, खुली, मुक्त अशी जागा आहे. कोणीही इतरांपेक्षा काही कारणाने वेगळे आहे किंवा इतरांइतके कर्तबगार नाही, अशा कारणामुळे कोणीही इथे भेदाभेद करत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे एक मूल्य आहे, प्रत्येकाला स्वतःची अशी एक प्रतिष्ठा आहे. त्यामुळेच अनेक वर्षे बर्मामध्ये मानवी हक्कांसाठी लढा देत असताना मला कायम असे वाटत राहिले की, मी जे काम इथे करत आहे ते माझ्या युनिव्हर्सिटीला पसंत पडले असते असे काम आहे. आपल्या कामाला आपल्या युनिव्हर्सिटीची मान्यता आहे, या भावनेचा मला संघर्षाच्या काळात खूपच आधार मिळाला आहे. बर्मा आता एका नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ब्रिटनमध्ये असतात तशा प्रकारचा हा रस्ता नाहीये. या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अजिबात सोपे नाही. या रस्त्याची डागडुजी अजिबातच केलेली नाही. खरे तर अजून हा रस्ता तयारच झालेला नाही. आम्हाला स्वत:लाच हा रस्ता आमच्या श्रमांतून उभारावा लागेल. आम्ही जसजसे पुढे जाऊ, तसतसा हा रस्ता बनत जाईल. अनेक लोकांना बर्माकडून खूपच जास्त अपेक्षा आहेत. पण मी ज्या रस्त्यावरून नेहमी प्रवास करत असे (तो लंडनहून ऑक्सफर्डला येतो) तसा आमचा रस्ता गुळगुळीत नाही.

ऑक्सफर्डमधील रस्ता इतका सरळसोट आणि गुळगुळीत होता की, मला त्यामुळे वेगाविषयी अक्षरशः भीती वाटायला लागली होती. कदाचित तो रस्ता जरा जास्तच सरळ आणि गुळगुळीत होता. मला बर्मामध्ये इतक्या सुंदर रस्त्यांची सवय नव्हती. बर्मामधील परिस्थिती वेगळी आहे. तिथे आम्हालाच आमचा रस्ता अतिशय कठीण परिस्थितीत बांधायचा आहे. आणि मला आशा आहे की, या कठीण प्रवासात तुम्ही सर्वजण आमच्या बरोबर असाल. मला आशा आहे की तुम्ही हे समजून घ्याल की, हा रस्ता अद्याप आमच्या मनात आणि मेंदूत आहे; अजून तो प्रत्यक्षात आलेला नाही. आम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी आमचा रस्ता तयार व्हावा, यासाठी आम्हाला तुमची आणि जगभरातील इतर असंख्य लोकांची मदत लागणार आहे. मला माझ्या देशाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे? मी 24 वर्षांनंतर (नजरकैदेतून सुटल्यावर) माझ्या देशाच्या बाहेर प्रवास केला आहे. त्या प्रवासासाठी युरोपातील कोणत्या एखाद्या देशात न जाता मी थायलंडला गेले होते. मे महिन्याच्या अखेरच्या काळात तो प्रवास मी केला होता. थायलंडमध्ये असताना शांग्रिला नावाच्या हॉटेलात राहिले होते. मला वाटते, ऑक्सफर्डमधील प्रत्येक किंवा बहुतांश विद्यार्थ्यांना हे माहीत असते की, जेम्स हिल्टनने 1990 च्या दशकात लिहिलेल्या ‘लॉस्ट होरायझन’ या कादंबरीत शांग्रिला हॉटेलचा उल्लेख आला आहे. तिथे त्या हॉटेलचे वर्णन ‘काहीशी ऑक्सफर्डसारखी वाटणारी जागा’ असे केले आहे. त्यामुळे आम्हाला बर्माच्या लोकांना कुठे जायचे आहे? तर, मला त्यांना अशा दिशेने घेऊन जायचे आहे, जिथे लोकांना कळेल की हे जग किती मुक्त असू शकते. अशा मुक्त जगात आपले स्थान कसे निर्माण करावे, हे तिथे त्यांना कळू शकेल. प्रत्येकाला स्थान असू शकते, अशा खुल्या जगात त्यांना घेऊन जायचे आहे.

मला ऑक्सफर्डची आठवण करून देणाऱ्या हॉटेल शांग्रिलासारखी परिस्थिती बर्मात निर्माण करायची आहे. मला वाटते, ही दिशा अतिशय प्रॅक्टिकल अशी आहे. कारण ती अशी दिशा आहे जी मेहनत, ज्ञान, आधुनिक संशोधन आणि अर्थातच आर्थिक पाठबळावर आधारित असेल. कोणत्याही संस्थात्मक कामाची यशस्वीरीत्या उभारणी करायची असेल तर आजच्या जगात आर्थिक मदत लागते, हे आपण विसरता कामा नये. मी अशा हेतूने इथे सांगत आहे की जे कोणी आमचे मित्र, हितचिंतक असतील, त्यांनी बर्मात आर्थिक गुंतवणूक करताना एका जबाबदारीचे भान ठेवावे. बर्मातील नव्या संधींचा उपयोग करून घेणारे जे कोणी असतील, त्यांना याची आठवण करून देणे गरजेचे आहे की, त्यांच्या गुंतवणुकीमुळे जसा गुंतवणूकदारांचा फायदा होईल तसाच बर्मातील जनतेचाही फायदा होईल याची त्यांनी काळजी घ्यावी. बर्मात केली जाणारी उद्योगविषयक, विकासविषयक, मानवतावादी अशी सर्व प्रकारची गुंतवणूक लोकशाही आणि मानवी हक्क यांच्या दृष्टीने उपयोगी पडावी, यासाठी आम्हाला मदत करा. तुम्ही जी मूल्ये तुमच्या देशात मानता, जी मूल्ये तुम्ही मला शिकवलीत तीच मूल्ये आमच्या देशात यावीत यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. आज माझे अंत:करण भरून आले आहे. मला इथे असताना याची जाणीव होत आहे की, आपला भूतकाळ कधीच आपल्याला सोडून जात नाही, तो कायम आपल्यासोबत असतो. पण भविष्यातील वाटचालीला काय उपयोगी पडेल, अशा गोष्टी आपण भूतकाळातून निवडू शकतो. सेण्ट ह्युजेस या माझ्या कॉलेजात गेल्यावर मला असे लक्षात आले की, तिथली प्रत्येक गोष्ट मी आजही नीट ओळखू शकते. जरी अनेक नव्या इमारती तिथे बांधल्या गेल्या असल्या, तरी त्या जुन्याबरोबर अगदी बेमालूमपणे मिसळून गेल्या आहेत. 

नवे आणि जुने एकसंधपणे उभे असल्याचे ते सुसंवादी आणि भविष्यवेधी असे चित्र आहे. माझ्या जुन्या कॉलेजात परत आल्याचा मला फारच अभिमान आहे. तसेच मला आणि माझ्या सहकाऱ्यांना प्राध्यापक, प्राचार्य, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी यांच्याकडून मिळालेल्या प्रेमळ वागणुकीमुळे खूप बरे वाटले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रेम ही आमच्यासाठी फारच सुरेख गोष्ट आहे. मला असे वाटत राहिले की, मी पुन्हा तरुण झाले आहे. मला अजिबातच परकेपणा किंवा पिढीतील फरक जाणवला नाही. एका अर्थाने ऑक्सफर्डमध्ये खूप वर्षांपूर्वी आलेली मी आणि आता येणारे नवे विद्यार्थी यांच्यात फारसा फरक नाही. परंतु तरीही मी या मुलांपेक्षा वेगळी आहे, कारण मला आयुष्यात वेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावे लागले. मी माझे ते सर्व अनुभव घेऊन इथे ऑक्सफर्डमध्ये आले आणि मला याची खात्री आहे की, माझे हे अनुभव सामावून घेईल इतके खुले आणि मोठ्या मनाचे ऑक्सफर्ड नक्कीच आहे. माझ्या देशासाठी इथून पुढील मार्ग सोपा असणार नाही. परंतु ऑक्सफर्डला आपल्या विद्यार्थ्याकडून कायम सर्वोत्तम आउटपुट हवे असते. आज मला ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्वतःचे मानले, यामुळे माझा हुरूप वाढला आहे. आमच्या मार्गावरील नवनव्या आव्हानांचा सामना करायला मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करावेत यासाठीचे बळ, मला आजच्या या कार्यक्रमातून नक्कीच मिळाले आहे.

(अनुवाद : संकल्प गुर्जर)

Tags: ऑक्सफर्ड विद्यापीठ जॉन ल-कॅरे आँग सान सू की संकल्प गुर्जर sankalp gurjar स्थानबद्धता विद्यार्थी बर्मा म्यानमार house arrest imprisonment najarkaid thialand burma Myanmar oxford john l-care aung san suu kyi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आँग सान सू क्यी ( 2 लेख )

म्यानमार देशाच्या निर्वाचित पंतप्रधान,नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी;पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत.


Comments

  1. Shoeb- 03 Feb 2021

    Thanks for artical

    save

  1. Gajanan Waykule- 03 Feb 2021

    आंग सान स्यू की यांचे विचार आवडले त्यांनी केलेल्या आणि पुढे ही करत असलेल्या मानवते च्या सेवेचे कार्य प्रशंसनीय आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो व मानवतेची सेवा त्यांच्या हातून होवो हीच सदिच्छा

    save

  1. Suresh Topkar- 03 Feb 2021

    आपल्या देशाचा त्यांना कधीच आणि कुठेही असल्या तरी विसर पडत नाही. Great.

    save

  1. Shrikant Vaidya- 03 Feb 2021

    Excellent narrative!

    save

  1. Suhas Patil- 03 Feb 2021

    ऑंग सान स्यू की या बर्मा नेतृत्वाचे प्रेरणादायी व आश्वासक निवेदन आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल 'साधने' ला मन:पूर्वक धन्यवाद!

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी