डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आंग सान स्यू की यांचे भाषण (नोबेल पुरस्कार स्वीकाराचे)

14 ऑक्टोबर 1991 रोजी म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. पण म्यानमारच्या लष्करी राजवटीने स्थानबद्ध केलेले असल्याने त्या पारितोषिक स्वीकारण्यासाठी जाऊ शकल्या नाहीत. ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांची मुक्तता झाली आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाने सर्व जागा जिंकल्या. या आठवड्यात त्यांचे पहिले भाषण म्यानमारच्या संसदेत होणार आहे. या पार्श्वभूमीवर 16 जून 2012 रोजी म्हणजे तब्बल 21 वर्षांनंतर त्यांचे नोबेल पारितोषिक स्वीकाराचे भाषण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झाले. त्या संपूर्ण भाषणाचा अनुवाद प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

उपस्थित सन्मान्य मंडळी, नॉर्वेजियन नोबेल समितीचे सन्माननीय सभासद आणि प्रिय मित्रजन हो,

कैक वर्षांपूर्वी, जणू काही अनेक जन्मांपूर्वी मी ऑक्सफोर्डमध्ये होते; माझा मुलगा अलेक्झँडर याच्याबरोबर ‘डेझर्ट आयलंड डिस्क’ हा रेडिओवरचा कार्यक्रम ऐकत होते. या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपले विचार मांडायला बोलावण्यात येत असे. विषय असे ‘आठ डिस्क्स, बायबल सोडून एखादे पुस्तक, शेक्सपिअरचे संपूर्ण साहित्य आणि ते एखाद्या निर्जन बेटावर सापडले तर त्या वेळी त्यांना हवीशी वाटणारी एखादी चैनीची गोष्ट’.

आम्हांला दोघांनाही आवडणारा हा प्रोग्रॅम संपल्यावर मला अलेक्झँडर विचारायचा, ‘आई तुला ह्या कार्यक्रमामध्ये बोलायला मिळेल का ग?’

मी सहजपणे त्याला सांगत असे, ‘हो तर, मलाही बोलायला का नाही मिळणार?’ त्याला माहीत होतं की हा मान केवळ सुप्रसिद्ध लोकांनाच मिळत असतो.

तो मला पुन्हा विचारत असे, ‘पण तुला कशासाठी बोलावतील?’

थोडा विचार करून मी उत्तर द्यायचे, ‘कदाचित मला साहित्यातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं असेल म्हणून.’ आणि मग आम्ही दोघंही हसत असू.

कल्पना मोठी छान वाटायची पण असं घडणं मात्र अशक्य वाटे. (मी त्याला असं उत्तर का देत असे हे आज आठवत नाही. कदाचित मी त्यावेळी नुकतंच एका नोबेल विजेत्या लेखकाचं पुस्तक वाचलं होतं म्हणून असेल किंवा त्या दिवशीचा वक्ता एक सुप्रसिद्ध लेखक होता म्हणून असेल.)

1989 मध्ये स्थानबद्धतेच्या माझ्या पहिल्या सत्रामध्ये माझे पती मायकेल एरिस मला भेटायला आले असताना त्यांनी मला सांगितलं होतं की, आमचे एक मित्र जॉन फिनिस यांनी नोबेल पारितोषिकासाठी माझं नाव सुचविलं आहे. त्या वेळीही मी अशीच हसले होते. मायकेलला आश्चर्य वाटलं पण मी का हसले ते नंतर त्याच्या लक्षात आलं.

शांततेसाठी नोबेल पारितोषिक! ऐकायला छान आहे पण अशक्य कोटीतलं. पण, मला प्रत्यक्षात हे पारितोषिक मिळाल्यावर काय वाटलं? हा प्रश्न मला अनेकदा विचारण्यात आला. आणि माझ्यासाठी नोबेल पारितोषिकाचं आणि शांततेचं महत्त्व काय आहे याचा विचार करण्याची हीच खरी वेळ आहे.

अनेक मुलाखतींमध्ये मी वारंवार सांगत आले आहे की मला नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी मी एका संध्याकाळी ऐकली. यामध्ये फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण माझं नाव ह्या पारितोषिकासाठी सुचविलं गेलं आहे हे मी अनेक वेळा ऐकलं होतं. ह्या भाषणाचा मसुदा लिहीत असताना पारितोषिक जाहीर झाल्याचं ऐकून मला काय वाटलं ते आठवण्याचा मी खूप प्रयत्न केला. मला नक्की सांगता नाही येणार, पण बहुधा असं वाटलं असावं की, ‘अच्छा, त्यांनी मला द्यायचं ठरवलं वाटतं!’

हे सगळं खरंच असेल असं वाटत नव्हतं कारण एका अर्थाने तेव्हा मीच खरी आहे की नाही असा संभ्रम मला पडलेला होता. मी स्थानबद्ध असतांना मला अनेक वेळा असं वाटायचं की मी या वास्तव जगाचा एक भाग उरलेलीच नाही. मला जिथे बंदी केलं होतं ते घर, माझं विश्व होतं. त्याच्या बाहेर दुसऱ्या माणसांचं जग होतं; पण ही माणसं सुद्धा स्वतंत्र नव्हती. तीही एका मोठ्या तुरुंगामध्ये एका समाजात एकत्र राहत होती. आणि त्याबाहेर एक स्वतंत्र लोकांचं जग होतं.  ही तीन वेगवेगळ्या ग्रहांवरची तीन जगं होती, आपापल्या मार्गाने जात होती परंतु अखिल विश्वाला त्यांच्या मार्गक्रमणाचं काहीच सोयरसुतक नव्हतं.

नोबेल पारितोषिकाने मला पुन्हा एकदा त्या बंदिवासाच्या घरातून बाहेर इतर माणसांच्या दुनियेत आणलं; माझ्यामध्ये पुन्हा एकदा वास्तवाचं भान आणलं. अर्थात हे सारं काही एका क्षणात झालं नाही. परंतु जसजसा काळ लोटला, दिवस लोटले, महिने लोटले आणि रेडिओवर त्याविषयी बातम्या ऐकू येऊ लागल्या तसं मला नोबेल पारितोषिकाचे महत्त्व उमगू लागलं.

पुन्हा एकदा मला मी खरी आहे, माणसांच्या व्यापक समाजामध्ये आले आहे हे जाणवू लागलं. आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मदेशातील लोकशाही आणि मानवी अधिकारांसाठी होत असलेल्या संघर्षाकडे साऱ्या जगाचं लक्ष या पारितोषिकानं वेधलं. याचा अर्थ यापुढे आम्ही विस्मृतीत जाणार नव्हतो.

फ्रेंच लोक म्हणतात ‘सोडून जाणं (विभक्त होणं) म्हणजे किंचितसं मरण’-तसंच विस्मृतीत जाणं म्हणजेही थोडं मरणच. इतर मानवतेशी जोडणारा आमचा दुवा काहीसा ढिला होणं.

ब्रह्मदेशातून दुसऱ्या देशामध्ये गेलेल्या कामगारांना- विस्थापितांना मी थायलंडमध्ये जेव्हा भेटले तेव्हा ते आक्रोश करीत होते, ‘आम्हाला विसरू नका!’ ते सांगत होते आमची दुरावस्था विसरू नका; आमच्यासाठी जे करता येईल ते सर्व करा; आम्हीसुद्धा तुमच्याच जगातली माणसं आहोत.’

जेव्हा नोबेल समितीने मला शांततेसाठी पारितोषिक दिलं तेव्हा त्यांना हेच सांगायचं होतं की ब्रह्मदेशातील शोषणग्रस्त आणि एकाकी पडलेली माणसं म्हणजे या आपल्याच जगाचा एक हिस्सा आहेत; सर्व मानवजात एकच आहे.

माझ्यासाठी हे पारितोषिक म्हणजे लोकशाही आणि मानवी अधिकारांबाबतची कळकळ आणि प्रयत्न राष्ट्रांच्या सरहद्दीपलीकडे पोहोचवणं होतं. ह्या पारितोषिकानं माझ्या मनाची कवाडे खुली केली. ब्रह्मदेशाच्या नागरिकांना शांतता म्हणजे सुसंगतीच्या आणि पूर्णत्वाकडे जाण्याच्या आड जे काही येईल त्याला विरोध करण्यातून मिळणारं सुख, चैन न्येईन या शब्दाचा अर्थच असा आहे. ‘ती सुखकारक शीतलता जी आग विझविल्यानंतर जाणवते.’

जगभर यातना आणि संघर्षांच्या आगींचे डोंब उसळत आहेत. माझ्या स्वतःच्याच देशामध्ये अतिउत्तरेकडील प्रदेशातील संघर्ष थांबलेले नाहीत; पश्चिमेकडे आतापर्यंत- म्हणजे मी इकडे यायला निघण्याआधी काही दिवसांपर्यंत- जातीय दंगलींमुळे लूटमार आणि खुनाखुनी चालू होती; जगाच्या इतर भागांतूनही अशाच बातम्या सतत ऐकू येत असतात.

भूकबळी, रोगराई, विस्थापन, बेकारी, दारिद्रय, अन्याय, विषमता, भेदभाव, दांभिकपणा यांच्या बातम्या तर रोजच्याच झाल्या आहेत. जिकडेतिकडे नकारात्मक शक्ती शांततेचा पायाच कुरतडत आहेत.

सर्वत्र शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक आणि मानवी साधनं अविचारीपणाने संपवण्यात येत आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये तरुण पिढी आणि त्यांची सकारात्मक क्षमता क्रूरपणे उधळण्यात आली. त्या काळातील कवितेशी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. कारण मी ती प्रथम वाचली त्या काळामध्ये माझ्याच वयाच्या अनेक तरुणांना फुलण्याआधीच कोमेजून जावं लागलं होतं.

1916 मध्ये फ्रेंच फॉरिन लीजनसोबत लढणाऱ्या एका अमेरिकन तरुणाने मरण्यापूर्वी लिहिलेल्या कवितेत म्हटलं होतं, ‘त्याला मरण येईल ते एखाद्या वादग्रस्त जागी; ठिकठिकाणी लढाईच्या खुणा असलेल्या टेकडीच्या उतारावर; एका मध्यरात्री आगीचे डोंब उसळत असलेल्या शहरात.’ कोणतातरी विस्मृतीत गेलेला एखादा टापू हस्तगत करण्याच्या मूर्ख प्रयत्नामध्ये किती तरुणांचं जीवन आणि प्रेम नष्ट केलं गेलं!

आणि हा सगळा खटाटोप कशासाठी? आता एक शतक उलटून गेल्यावरही या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आपण शोधू शकलेलो नाही. आजही आपण कदाचित थोडे कमी हिंसक असू, पण मानवता आणि आपलं भविष्य यांच्याबाबत अजूनही बेदरकार आणि बेफिकीर आहोतच ना?

शांतीचा खून केवळ रणांगणावरच होतो असं नाही. जिथे जिथे यातनांकडे दुर्लक्ष केलं जातं तिथे तिथे संघर्षाची बीजं पडतात. कारण यातनांमुळे कडवटपणा येतो, द्वेष, तिरस्कार वाढतो.

स्थानबद्धतेतील एकाकीपणामध्ये एक सकारात्मक पैलू होता. तो म्हणजे मी आयुष्यात स्वीकारलेले शब्द आणि नीतितत्त्वांच्या अर्थाचा विचार करायला मला भरपूर वेळ मिळत असे. बौद्ध असल्याने लहानपणीच मी दुःखाबद्दल यातना या अर्थाने ऐकलं होतं. रोज माझ्या आजूबाजूस असलेली वयस्क आणि कमी वयस्क असलेली मंडळीही जेव्हा जेव्हा त्यांना काही शारीरिक यातना होत किंवा काही दुःखद प्रसंग ओढवत तेव्हा ‘दुःख दुःख’ असं पुटपुटत असत.

परंतु स्थाबद्धतेच्या वर्षांमध्येच सहा महान दुःखांच्या स्वरूपाविषयी मी विचार करू लागले. ही सहा दुःखं अशी मानली आहेत. जन्मास घातलं जाणं, आजारी पडणं, मृत्युमुखी पडणं, आवडत्या माणसांचा विरह, नावडत्यांचा सहवास.

या सहाही महान दुःखांचं मी परीक्षण केलं. ते धार्मिकतेच्या अनुषंगाने नव्हतं. परंतु आपल्या रोजच्या सामान्य आयुष्याच्या संदर्भामध्ये केलेलं परीक्षण होतं.

या दृष्टीने यातना हा जर आपल्या अस्तित्वाचाच अपरिहार्य भाग असेल तर आपण त्यांना थोडं सुसह्य करण्याचा आपल्याला जमेल तेवढा प्रयत्न करायला हवा. माता आणि बालकांची गर्भारपणी आणि बाळंत झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी कोणते परिणामकारक उपाय योजावेत, उतारवयातील लोकांसाठी काय सोयीसुविधा उपलब्ध करायला हव्यात; सर्वंकष आरोग्यसेवा,  सहृदय रुग्णसेवा, धर्मादाय रुग्णालयं इत्यादींबाबत मी बराच विचार केला.

वर दिलेल्या सहा दुःखांपैकी शेवटच्या दोन दुःखांबाबत- जिवलगांचा विरह आणि नावडत्या व्यक्तींचा अपरिहार्य सहवास- मी बुचकळ्यात पडले. त्याबाबत काही सुचेना. भगवान बुद्धांना असा काय अनुभव आला असेल की ज्यामुळे त्यांना ही दोन दुःखं महान दुःखांमध्ये समाविष्ट करावीशी वाटली?

तेव्हा माझ्या नजरेसमोर आले ते बंदिवान, विस्थापित, परदेशी काम शोधायला जाणारे मजूर, शरीरविक्रयासाठी पळविण्यात आलेली मुलं-मुली, आणि काही ना काही कारणामुळे आपल्या भूमीपासून आणि घरदारापासून उखडली गेलेली असंख्य माणसं!

कुटुंब आणि जिवलग मित्रांपासून तोडल्या गेलेल्या माणसांना अपरिचित लोकांमध्ये राहणं भाग असतं; शिवाय तिथे कोणी त्यांचं स्वागत करीत नसतं. सुदैवाने आपण राहत असलेल्या काळामध्ये समाजकल्याण आणि मानवतेच्या भावनेने मदत करणं हे नुसतं मान्यता पावलेलंच नव्हे तर स्पृहणीय आणि आवश्यक मानलं गेलेलं आहे.

ज्या युगामध्ये कुठेही सदसद्‌विवेकबुद्धीवादींना बंदिवान करण्यात आलं तर तो स्थानीय प्रश्न न राहता संपूर्ण जगासमोरचा प्रश्न बनतो आणि लोकशाही आणि मानवी अधिकार हे प्रत्येक मानवाचे मूलभूत अधिकार मानले जातात त्या युगामध्ये मी जगते आहे हे माझं भाग्य आहे.

स्थानबद्ध असताना कैक वेळा मला संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याच्या प्रस्तावनेतील उताऱ्यांमधून बळ मिळालं आहे! तो उतारा असा: मानवी हक्कांना दुर्लक्षित करण्याची आणि त्यांची पायमल्ली करण्याची परिणती अशा हिंसक कृतीमध्ये होते की त्यामुळे मानवी सदसद्‌विवेकबुद्धी आणि मन संतप्त होतात. जिथे अभिव्यक्तीचं आणि विचारांचं स्वातंत्र्य असेल, दारिद्य्र, अभाव आणि भीती यापासून सुटका मिळेल अशा जगाची निर्मिती ही सामान्य मानवाची आकांक्षा मान्य झाली आहे. जर माणसांना दमन करणाऱ्या क्रूर शासनाविरुद्ध बंड पुकारण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर मानवी हक्कांना कायद्याने संरक्षण मिळायला हवं...

ब्रह्मदेशामध्ये मानवी हक्कांसाठी मी का लढत आहे असा प्रश्न कोणाला विचारावासा वाटला तर वर दिलेला उतारा हे त्याचं उत्तर असेल. कोणी मला ब्रह्मदेशामध्ये मी लोकशाहीसाठी का लढते असं विचारेल तर माझं उत्तर असेल, ‘कारण माझा असा विश्वास आहे की मानवी हक्कांच्या संरक्षणाची खात्री मिळण्यासाठी लोकशाहीवादी संस्था आणि कृती आवश्यक आहेत.’

लोकशाही आणि मानवी हक्कांवर ज्यांचा विश्वास आहे अशा ब्रह्मदेशातील लोकांना त्यांच्या प्रयत्नांचं फळ मिळेल अशी चिन्हं मागील काही वर्षांत दिसू लागली आहेत. सकारात्मक बदल घडून येत आहेत. लोकशाही आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. कारण माझा आशावाद फार सावध स्वरूपाचा आहे. माझा भविष्यावर पूर्ण भरवसा असला तरी मला लोकांना आंधळा दिलासा द्यायचा नाही. भविष्यावर विश्वास नसता, लोकशाही मूल्यं आणि मूलभूत मानवी हक्क हे केवळ आवश्यकच नव्हेत तर साध्य करणं शक्य आहेत असा आम्हांला दृढविश्वास नसता तर आमच्या चळवळीला या विनाशकारी काळामध्ये तग धरून राहताच आलं नसतं.

आमच्या काही लढवय्यांना आपापल्या जागी हौतात्म्य आलं. काही चळवळ सोडून गेले, पण अनेक समर्पित कार्यकर्ते कणखरपणे चळवळीशी प्रतिबद्ध राहिले. जेव्हा मी या गतकाळाचा विचार करते तेव्हा इतक्या बिकट परिस्थितीतसुद्धा इतके कार्यकर्ते कणखरपणे आमच्या सोबत कसे राहिले याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. आमच्या कार्यावरचा त्यांचा विश्वास आंधळा नाही. स्वतःतील ताकद, चिकाटी आणि आपल्या देशबांधवांच्या रास्त आकांक्षांबाबतचा आदर याचा त्यांनी डोळसपणे अंदाज केलेला आहे.

माझ्या देशामध्येही नुकतेच काही बदल होत आहेत. त्यामुळेच आज मी इथे तुमच्या समोर उभी राहू शकले आहे आणि हे बदल घडून आले ते तुमच्यामुळे- ज्यांनी जगाला आमच्या परिस्थितीची जाणीव करून दिली, त्या स्वातंत्र्यप्रेमी व न्यायप्रिय लोकांमुळे.

माझ्या देशाकडे वळण्याआधी आपल्या सदसद्‌विवेकनिष्ठेमुळे तुरुंगात असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. ब्रह्मदेशात असे अनेक बंदिवान तुरुंगात खितपत पडलेले आहेत आणि आता तर अशी भीती उत्पन्न झाली आहे की काही मूठभर प्रख्यात लोकांना सोडून दिल्यावर या उरलेल्या अप्रसिद्ध बंदिवानांचं विस्मरण तर होणार नाही!

आज मी इथे उभी आहे पण मीही काही दिवसांपूर्वी अशीच तुरुंगात होते. माझं बोलणं ऐकत असताना आपण एकमेकांना नेहमी सांगत असलेल्या सत्याची, स्वतःच्या सदसद्‌विवेकाशी एकनिष्ठ राहण्यामुळे तुरुंगवास पत्करावा लागलेला एक बंदिवान म्हणजे कैक बंदी झाल्यासारखं असतं- या सत्याची आठवण ठेवा. त्यांची आठवण असू द्या आणि त्यांची लवकरात लवकर विनाअट सुटका व्हावी म्हणून जे जे शक्य आहेत ते सारे प्रयत्न करा.

ब्रह्मदेशामध्ये अनेक वांशिक राष्ट्रीयता नांदत आहेत आणि या सर्वांच्यामध्ये निखळ ऐक्यभाव असेल तरच भविष्याबाबत विश्वास निर्माण होऊ शकेल.

1948 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो तेव्हापासून आजपावेतो संपूर्ण देशात शांतता नांदते आहे असं कधीच झालं नाही. संघर्षाची कारणं नाहीशी करण्यासाठी लोकांमध्ये विश्वास आणि सामंजस्य असायला हवं; पण आम्ही ते करू शकलो नाही.

1990 च्या दशकाच्या सुरुवातीस युद्धबंदी झाल्याने शांततेच्या आशा पालवल्या होत्या. परंतु 2010 मध्ये काही महिन्यांतच त्यावर विरजण पडलं. केवळ एक अविचारी कृती दीर्घकाळ टिकलेली युद्धबंदी नाहीशी करू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये शासन आणि काही राष्ट्रीय-वांशिक आघाड्यांमध्ये चालू असलेल्या वाटघाटींमध्ये प्रगती होताना दिसून येत आहे.

या युद्धविरामाच्या सहमतीमुळे लोकांच्या वाढणाऱ्या आकांक्षा आणि ऐक्यभाव यातून राजकीय समझोतासुद्धा होईल अशी आशा आता वाटू लागली आहे.

मी आणि माझा ‘नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी’ पक्ष राष्ट्रीय सलोख्याच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये जी कोणती भूमिका पार पाडायची गरज असेल ती घ्यायला तत्पर आहोत. राष्ट्राध्यक्ष यू थिन सेन यांचं शासन सर्व देशांतर्गत शक्ती-सेना, विविध वांशिक राष्ट्रीयता, राजकीय पक्ष, माध्यमं, नागरी समाज संघटना, व्यापारी वर्ग आणि सर्वांत महत्त्वाचा सामान्य नागरिक या सर्वांनी विवेकपूर्ण सामंजस्याने सहकार्य दिल्याशिवाय टिकू शकणार नाही. कोणतीही सुधारणा लोकांचं जीवन उंचावू शकली तरच परिणामकारक ठरते आणि या बाबतीत आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका फार महत्त्वाची आहे.

विकास आणि मानवी साहाय्य, द्विपक्षीय सहमती आणि गुंतवणूक या सर्वांमध्ये समन्वय आणि (संतुलन) साधायला हवं; तरच सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकास संतुलित आणि शाश्वत होऊ शकेल.

आमच्या देशात प्रचंड क्षमता आहे. तिला प्रोत्साहन देऊन केवळ अधिक संपन्नच नव्हे तर एक जास्त समंजस, लोकशाहीवादी समाज निर्माण व्हायला हवा, जिथे जनता शांतता, सुरक्षितता आणि स्वातंत्र्य उपभोगू शकेल.

आपल्या जगामध्ये अखंड शांतता असायला हवी. जगात जोपर्यंत विघातक शक्ती विधायक शक्तींचा पराभव करीत आहेत, तोपर्यंत आपणा सर्वांनाच त्यापासून धोका उद्भवतो. अर्थात साऱ्या विघातक शक्ती नाहीशा करता येणे, शक्य आहे का हा प्रश्न आहेच. आणि ते शक्य नाही. कारण विघातक आणि विधायक अशा दोन्ही वृत्ती मनुष्यस्वभावात निसर्गतःच असतात. पण माणसांमध्ये आपल्या स्वभावातील विघातक शक्तींना काबूत ठेवून विधायक शक्तींना बळकटी देण्याचीही उपजत वृत्ती असते.

जगामध्ये पूर्ण शांतता राखणं अशक्यप्राय आहे. पण आपल्याला अशा शांतीच्या दिशेनेच प्रगती करायची आहे. वाळवंटातला प्रवासी जसा एकच मार्गदर्शक तारा समोर ठेवून वाटचाल करतो तसंच आपल्या समोर हेच लक्ष्य असायला हवं. आपण जरी पृथ्वीवर संपूर्ण शांती प्रस्थापित करू शकलो नाही- कारण या पृथ्वीतलावर ते अशक्य आहे- तरी व्यक्ती आणि देश यांनी परस्पर विश्वास दाखवून आणि मैत्री करून ऐक्य साधलं तर मानवी समाज जास्त सुरक्षित आणि जास्त संवेदनशील होईल.

मी जास्त संवेदनशील हा शब्द फार विचारपूर्वक वापरला आहे, अनेक वर्षं करीत असलेल्या माझ्या विचारांती. आपत्तीतून सुद्धा फार नाही पण थोडंसं चांगलं निघतं. माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास मला एक मूल्यवान गोष्ट मिळाली. ती म्हणजे संवेदनशीलतेचं-ममतेचं मूल्य मी शिकले. माझ्यासाठी जी संवेदनशीलता लोकांनी दाखविली त्यावरून माझी खात्री झाली की जगामध्ये संवेदनशीलतेला कुठेही तोटा नाही. संवेदनशील असणं म्हणजे इतरांच्या गरजा आणि आशाआकांक्षांबाबत आपलेपणा बाळगणं आणि ममतेने प्रतिसाद देणं. साधा मायेचा स्पर्शसुद्धा  खचलेल्या मनाला उभारी देतो. मायाममता लोकांचं जीवन बदलू शकते.

नॉर्वे या देशाने दाखविलेलं ममत्व खरोखर अनुकरणीय आहे. मायदेशाचा आधार तुटल्यामुळे असुरक्षित, बेघर झालेल्या लोकांना त्यांनी आसरा दिला, अभय दिलं. जगात जिथे जावं तिथे विस्थापित आहेतच. थायलंडमधल्या माएला येथील विस्थापितांच्या कँपमध्ये मी नुकतीच गेले होते. तिथल्या लोकांचं दुःख हलकं करावं आणि जगणं थोडं सुकर व्हावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अनेक निष्ठावान स्वयंसेवक मला भेटले. ते दात्यांच्या थकव्याबद्दल बोलत होते. दात्यांचा थकवा म्हणजे सहानुभूतीतही घट होणारच.

ह्यामध्ये एक गोष्ट दुसरीस कारणीभूत होत असते. करुणा आटू देणं आपल्याला परवडेल का? विस्थापितांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करण्याने जी काही किंमत मोजावी लागेल त्यापेक्षा त्यांची दखल घेण्यामध्ये जास्त खर्च येणार आहे का? दान करणाऱ्या जगातील सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आसरा शोधत फिरणाऱ्या या निराशाग्रस्त विस्थापितांच्या गरजा भागविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.

माएलामध्ये- म्हणजे जिथे हा आणि इतर अनेक कँम्प होते तिथे- ताक प्रान्ताच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली. विस्थापितांच्या कँम्पशी संबंधित त्यांच्या अनेक समस्या त्यांनी मला सांगितल्या-वनसंरक्षण कायद्याचं उल्लंघन, अमली पदार्थांचं सेवन, गावठी दारू पिणं, मलेरिया, क्षय, डेंगू, कॉलरा अशा साथींचं नियंत्रण इत्यादी.

निर्वासितांच्या समस्या सोडवणं जेवढं अत्यावश्यक आहे तेवढंच या आसरा देणाऱ्या देशांच्या समस्याही सोडविणं अत्यावश्यक आहे. आपली जबाबदारी निभावत असलेल्या या देशांना मदत करणंही आवश्यक आहे.

अखेरीस आपलं उद्दिष्ट हे बेघर आणि निराश होणारे विस्थापित निर्माणच होणार नाहीत असं जग निर्माण करणं असायला हवं. असं जग ज्याचा कानाकोपरा अभय देणारा असेल; जेथील रहिवासी स्वतंत्र असतील आणि शांततेत जगतील.

प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती जिच्यामुळे विधायकता, सकारात्मकता वाढते ती जगाच्या शांततेत भर टाकते. आपल्यापैकी प्रत्येकजण असं छोटं छोटं योगदान करण्यास समर्थ असतो. चला आपण सगळे हातात हात घालून असं शांततापूर्ण जग निर्माण करू या, जिथे प्रत्येकाला रात्री स्वस्थ झोप येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहाने उठता येईल.

14 ऑक्टोबर 1991 ला नोबेल कमिटीने केलेल्या आपल्या विधानामध्ये शेवटी असं म्हटलं होतं, ‘आंग सांग स्यू की यांना हे पारितोषिक देण्यामध्ये नॉर्वेजिअन नोबेल समिती या महिलेचा तिच्या अथक आणि निरंतर प्रयत्नांसाठी आणि जगातील लोकशाही आणि मानवी अधिकार व वांशिक सामंजस्य शांततेच्या मार्गाने साधू पाहणाऱ्या सर्व लोकांचा सन्मान करीत आहे.’

मी जेव्हा ब्रह्मदेशातील चळवळीत सामील झाले तेव्हा मला नोबेलच काय पण असं काहीही पारितोषिक वगैरे मिळेल असं माझ्या मनातसुद्धा आलं नव्हतं. ज्या पारितोषिकासाठी आम्ही एवढी धडपड करीत होतो ते म्हणजे जिथे प्रत्येकाच्या क्षमतेला फुलायला पूर्ण वाव मिळेल अशा स्वतंत्र सुरक्षित आणि न्याय्य समाजाची निर्मिती.

आमच्या प्रयत्नांतच आमचा मानसम्मान सामावलेला होता. इतिहासाने एका महान कार्यासाठी आमच्यामध्ये जे काही उत्कृष्ट आहे ते समाजाला अर्पण करण्याची संधी आम्हांला दिली.

नोबेल समितीने जेव्हा पारितोषिकासाठी माझी निवड केली तेव्हा, मी जो मार्ग स्वेच्छेने निवडला होता त्या मार्गातील एकाकीपणाची जाणीव विरून गेली. त्यासाठी मी समितीला, नॉर्वेच्या रहिवाशांना आणि शांततेवरील माझा विश्वास जास्त दृढ करणाऱ्या जगातील सर्व लोकांना धन्यवाद देते.

(अनुवाद : सुमन ओक)

Tags: सुमन ओक  नोबेल ब्रह्मदेश आंग सांग स्यू की  बुद्ध Suman Oak Nobel Burma Aung San Suu Kyi Buddha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आँग सान सू क्यी

म्यानमार देशाच्या निर्वाचित पंतप्रधान,नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी;पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके