डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

चित्रपट : मी व मला दिसलेलें जग

1957 मध्ये प्रकाशित झालेल्या श्री.म.माटे यांच्या ‘चित्रपट : मी व मला दिसलेलें जग’ या वैचारिक आत्मकथनाची दुसरी आवृत्ती याच महिन्यात ‘देशमुख आणि कंपनी’ (पुणे) या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित होत आहे. उत्कृष्ट प्राध्यापक व वक्ते, संतसाहित्याचे अभ्यासक, शैलीदार निबंधकार आणि समाजसुधारक अशी ओळख असलेल्या माटेंच्या आत्मकथनातील काही उतारे प्रसिद्ध करीत आहोत. विसाव्या शतकातील पहिल्याच पाव शतकातील समाजजीवनाचे चित्रण व त्यावरील भाष्य या दृष्टीने हे आत्मकथन अपूर्व आहे, उद्‌बोधक आहे आणि आजचे समाजजीवन समजून घेण्यास उपयुक्त आहे.

नव्या माणसांचा उदय

पण मला नकळत, माझ्या जन्मापासूनच्या या काळांत केवढ्यातरी गोष्टी घडलेल्या होत्या ! लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरि देशमुख हे मरण पावले होते. ज्योतिबा फुले हेही दिवंगत झालेले होते. या सुधारकांच्या जीवित-हेतूंचा आणि आग्रहांचा वाङ्‌मयानें साप्ताहिक पुरस्कार करणारे आगरकर, आपलें काम अर्धवट टाकून इहलोक सोडून गेलेले होते. तसेंच माझ्या जन्माच्याही आधीं सहा वर्षें विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्या ‘पांच पांडवांपैकी’ दोघे अपमृत्यूची झडप पडून निघून गेले होते. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना झालेली होती; आणि काँग्रेस या संस्थेनें मूळ धरलेलें होतें. विचारवंतांचे अग्रणी न्यायमूर्ति रानडे यांच्या उदात्त विचारांच्या छायेंत सुशिक्षित समाज विसांवा पावत बसलेला होता; आणि वासुदेव बळवंताचें छोटें क्रान्तियुद्ध लयाला जाऊन महाराष्ट्रांतील लोक पुन्हां एकदां हताश बनलेले होते. विष्णुशास्त्र्यां- पासून स्फूर्ति घेतलेले राजवाडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, हरिभाऊ आपटे इत्यादि हळू हळू कर्तृत्वाच्या उमेदींत प्रविष्ट होत होते; आणि डॉ. धोंडो केशव कर्वे यांची स्त्रीजातीची सेवा साकार बनूं लागली होती. पण सर्वांच्या वर म्हणजे इंग्रज सरकारच्या सार्वभौम सत्तेलासुद्धां दरडावून आव्हान देणारे बाळ गंगाधर टिळक हे लोकांचें दैवत बनू लागलें होतें.

इंग्रजांचा उद्योग

तथापि, इकडे जरी स्वदेशाभिमानी लेखकांची आणि प्रचारकांची नवी पिढी जोरानें पुढें येत होती, तरी इंग्रजांचा अंमल अधिकाधिकच गच्च बसत चालला होता. लोकांचे डोळे दिपतील, अशीं लहान-मोठीं अनेक सार्वजनिक कामें सरकारनें ठिकठिकाणीं चालू केलीं होतीं. समुद्रकिनाऱ्यावर दीपगृहें बांधून कोंकणपट्टी प्रकाशित करावी; प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीं हायस्कूलसाठीं किल्ल्यासारख्या बळकट इमारती बांधून ‘तुमच्या देशांत आम्ही ज्ञानाचा फैलाव करीत आहों’ असें शिकाऊ जनतेला पटवावें; चोरा- चिलटांचा बंदोबस्त करून शेतावर आलेलें आणि खळ्यावर मळलेलें धन तुमच्या पदरांत खास पडत आहे, अशी शेतकऱ्यांची खात्री पटवावी; स्वस्त दरानें मिळणाऱ्या शेंकडों चिजांनीं बाजार भरून सोडून नव्या युगाच्या किमयेनें सामान्य लोकांना दिपवून सोडावें; कोठें कोठें नदीला बंधारे घालून कालव्यानें माळ जमिनीसुद्धां सुपीक करून सोडाव्या; आणि अशा रीतीनें प्रजांच्या मनांत वागत असलेलें परकीय अंमलाचें दुःख शीतळ बनवावें; असा इंग्रजांचा उद्योग चाललेलाच होता.

समाजांतील धंदे

व्यापारी वर्ग खुषीत होता. वैश्यांचें मुख्य काम जें धान्योत्पादन, तें पूर्वीपासून शेतकऱ्यांच्या हाती होतें. पण त्यांना वैश्य समजणें, हें समाज केव्हांच विसरलेला होता. जे वैश्य म्हणजे व्यापारी होते, ते परदेशांतून आणलेला माल स्वकीयांच्या पदरांत हंसतमुखानें बांधून स्वतः गबर होत चाललेले होते; आणि शाळा-कॉलेजांतून परीक्षा पास झालेली ब्राह्मणांचीं तरणीं मुलें भराभर सरकारी नोकऱ्यांत शिरत होती. वकिलीचा धंदा तर चांगलाच तेजींत आलेला होता; आणि महाराष्ट्रांत असा एक गांव उरलेला नसेल, कीं जेथें थोडीतरी न्यायाची व्यवस्था आहे, पण जेथें वकील नाहीं. वकिली हा एक नवाच किफायतीचा धंदा सुशिक्षितांना सांपडलेला होता. न्यायाचीं कोर्टें इंग्रजींत चालत असल्यामुळें, मुकादमे भांडणारी पण खर्चाखालीं रकमेस येणारी जनता केवळ भयचकित होऊन, या वकिलांकडे आणि न्यायाधीशांकडे बघत होती. शेतकऱ्यांचें धान्य जरी सुरक्षित राहिलें, तरी ठराविक मुदतीनंतर हटकून वाढणाऱ्या करांनीं शेतकरी कांहीसा रंजीस आलेला होता. पूर्वी एके काळी अशी म्हण रूढ असे कीं, ‘कनिष्ट नोकरी, मध्यम व्यापार आणि उत्तम शेती’; पण आतां हा क्रम बदलला; आणि ‘उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती’ अशी म्हण रूढ झाली. तथापि कानावर लेखणी ठेवून, मानेवर खडा घेऊन आणि पालथी मांडी घालून कारकुनी करणाऱ्या माणसाला, निकृष्ट धंदा करणारा, म्हणून चिडविण्याचीं ऊर्मि अडाणी लोकांतसुद्धा अजूनहि शिल्लक होतींच.

पांढरपेशांतील चलबिचल

आगरकरांच्या नव्या सुधारणा-विचारांनीं अनेक लोकांचीं मनें व्यग्र झालेली होती; पण आतां नवीन काळाचा उदय होत आहे; ‘बाबावाक्यं प्रमाणम्‌’ हा न्याय मागें पडत आहे; आणि अमुक गोष्ट खरी कां, किंवा खोटी कां, हें पोथींत पाहण्यापेक्षां स्वतःच्या विवेकबुद्धीला विचारून पाहिलें पाहिजे, हा भाव कांही लोकांच्या मनांत तरी उत्पन्न झालेला होता. सुशिक्षित वर्गापैकीं कांही वरिष्ठ लोकांच्या बेटांत प्रार्थनासमाजाची मंद कुजबूज चालू झालेली होती; आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं अमुक माणसाला बाटविलें, किंवा तमुक पांढरपेशानें ख्रिस्ती धर्म आपण होऊन पत्करला, अशा मधून मधून येणाऱ्या वार्तांनीं लोकांच्या मनाला उद्वेग उत्पन्न होई; मात्र नवा विचार, नवें मत, नवी चळवळ हा सारा प्रकार केवळ शहरांत आणि त्या शहरांत सुद्धां पांढरपेशा जातींतील सुशिक्षित लोकांत चालू असे. बाकीची तमाम जनता इंग्रज सरकारच्या अंमलाखालीं आपापले व्यवसाय निमूटपणें करून पोट भरीत राहिली होती.

 सामाजिक व्यग्रता

1800 सालपासून पुढें 50-60 वर्षें अवघ्या देशाला छळीत असलेलें अस्वास्थ्य नष्ट झाल्यामुळें लोकांना एक तऱ्हेची स्वास्थ्याची प्राप्त झालेली निशा अजूनहि टिकून राहिलेली होती. स्त्री-शिक्षण हा जवळजवळ थट्टेचा विषय होता; आणि बालविधवांच्या पुनर्विवाहाला सुद्धां संति देणारे पांढरपेशा समाजांतहि फार थोडे लोक सांपडत. हुंड्याची चाल धूमधडाका चालू होती; आणि शिकून परीक्षा पास झाली कीं चांगली नोकरी लागते, म्हणून आपल्या मुलाच्या हुंड्याचा भाव पांढरपेशे लोकसुद्धां वाढवून बसलेले होते. अस्पृष्ट समाजाच्या जीवितावर अजून फटफटलें सुद्धां नव्हतें. कांहीं ख्रिस्ती मिशनऱ्यांनीं बाटवून आपलेसे केलेले लोक मधून मधून या लोकांचा पुरस्कार करतांना दिसत. परदेश-गमन हें बहिष्कारांतून बाहेर पडलेलें असले, तरीं द्रव्याच्या अभावीं कठीणच होऊन बसलेलें होतं. ज्ञानाच्या नांवाखालीं इंग्रजानें मिल्टन, शेक्सपिअर यांचाच महिमा शिक्षणक्रमांत वाढवून ठेवलेला होता. भौतिक शास्त्रें अजूनहि लोकांच्या बुद्धीला पारखींच होतीं. नवे कारखाने काढण्याची लोकांना ऐपत नव्हती; आणि असली, तर त्यांच्या बुद्धीचा मगदूर इतका वाढलेला नव्हता; आणि ऐपत व मगदूर हीं जरी क्वचित्‌ कोठें दिसलीं, तरी सरकारी उत्तेजनाच्या अभावीं हीं उद्योगधंद्यांचीं नवीं रोपटीं कोमेजून जात असत. वृत्तपत्रांची पैदास वाढूं लागलेली होती; पण हीं पत्रें मर्यादा सोडून आपल्या अंमलाचीं बिंगें लोकांना समजावून सांगण्याचें साहस करतात कीं काय, याकडे इंग्रज अधिकारी डोळ्यांत तेल घालून पहात होते.

समाजाचें रूप

गांवचे पाटील-कुलकर्णी हे जवळ जवळ राजेच बनलेले असत. पाटील बहुधा अशिक्षित असल्यामुळें, लेखणीची कुरकुर करणाऱ्या कुलकर्ण्यांच्या तांवडींत तो सांपडलेला असे. ‘काय पाटील’ अशा उपहासाच्या आवाजानें सरकारी अधिकारी पाटलांना संबोधित असत; आणि गांवाला सरकारी अधिकाऱ्यांचा फेरा आला, म्हणजे त्यांची सरबराई करण्याच्या कामीं पाटील-कुलकर्णी घामाघूम  होत असत. सरकारी अधिकारी हा क्षुद्र रूपाचें कां होईना, पण राजेपण भोगीत असे. यःकश्चित्‌ पोलिस शिपाईसुद्धां गांवगन्ना भरणाऱ्या जत्रांतून आणि बाजारांतून आपली छोटीशी खंडणी वसूल केल्याशिवाय रहात नसे. तालुक्याच्या गांवची मामलेदार कचेरी म्हणजे एक मोठें दरद बाळगण्याचें ठिकाण, असें सर्वांनाच वाटत असें; आणि सरकारी कामासाठीं किंवा साक्षी-पुराव्यासाठीं आलेल्या अज्ञ लोकांचे थवेच्या थवे, कचेरीच्या पडलेल्या अर्धवट सांवलींत पेंगत बसलेले दिसत. रजिष्टर लोकांचा जांच तर विलक्षण असे. अनेक लोकांच्या नाड्या त्यांच्या हातीं असत; आणि गांव रजिस्टर सुद्धां चांगले गल्लाभरू बनत. ज्या जाती आणि जमाती संस्कृतीच्या कक्षेंत दाखलच झाल्या नव्हत्या, त्या अजून गुन्हेगारीकडे झुकलेल्या असत; आणि चार- दोन वर्षें गेलीं, म्हणजे अमुक रामोशाचें बंड, तमुक कोळ्याचें बंड, अशा वार्ता मधून मधून उठत. अशा लोकांचा निःपात करण्यासाठीं पोलिस खातें भेदनीतीचा अवलंब करी; आणि बंडें मोडल्यावर या खात्यांतील पुढाऱ्यांना इंग्रज अधिकाऱ्यांकडून शाबासकी आणि बक्षीसहि मिळे. गांवांतील मास्तर मंडळी हीं त्या त्या ठिकाणची नैतिक पुढारी मंडळी बनत; पण सरकारी नोकर असल्यामुळें हे मास्तर गांवच्या कूट मंडळांत कधीं सामील होत नसत. प्रवासाचीं आणि वाहतुकींचीं साधनें अत्यंत अल्प असल्यामुळें, उत्पन्न होणारा माल आसपासच्या टापूंतच जिरवावा लागत असे; व म्हणून बख्खळ स्वस्ताई असे. एक रुपायाला सहा पायली जोंधळे मिळत! एक पैशाला एक पावशेर दूध मिळे; आणि तेंहि असें कीं, त्यांत बोटे घालून भिंतीवर शिंपडलें, तर गंधासारखें दिसावें. उत्तम कढविलेलें सुगंधी तूप आठ-दहा आण्याला शेरभर सहज मिळत असे; आणि चार आण्याला मिळणारी लाकडाची मोळी छोट्याशा संसाराची मालकीण महिनाभर पुरवत असें. भाजीपाला, रताळें इत्यादि पदार्थ मोजून किंवा वजनानें द्यावे, हें कोणाच्या गांवीहि नसे; ते केवळ ‘उक्तेच’ मिळत; म्हणजे एवढ्या ढिगाला एक पैसा, तेवढ्या ढिगाला दोन पैसे, असें नुसतें ‘बोलूनच’ ठरवीत असत.

शिक्षणाचें नवें तंत्र

अलीकडे शिक्षण देण्याच्या कामांत मानसशास्त्र शिरलेलें असल्यामुळें शिक्षकाला अनेक तऱ्हेची नाचानाच करावी लागते; आणि आपल्या अंगीं नाना प्रकारचें हुन्नर आहे असें दाखवावें लागतें. त्याला टिपणें करावीं लागतात; तीं सांठवून ठेवावीं लागतात; एखाद्या वेळीं मुख्याधिकाऱ्यांच्या तपासणीला तीं सादर करावीं लागतात; वर्गावर जावयाच्या आधीं प्रश्नमालिका योजून ठेवावी लागते; विद्यार्थ्यांकडून अपेक्षित उत्तरें जर आलीं नाहींत, तर कांहीं प्रश्नांचे पर्याय तयार ठेवावे लागतात. फळ्याचा उपयोग अत्यावश्य असल्यामुळें त्याला आपलें हस्ताक्षर जमल्यास वळणदार ठेवावें लागतें. मुलांना बसावयाचीं बाकें दुंड्या पद्धतीचीं केलेली असल्यामुळें, आणि तीं एकामागें एक रांगेनें ठेवावयाची पद्धत असल्यामुळें, विद्यार्थी बसावयाच्या पद्धतीनेंच म्हणजे एक पाय आंत व एक पाय बाहेर ठेवून बसले आहेत कीं नाहीं, हें त्याला पहावें लागतें; वर्गांत ठेंगणीं मुलें कोणचीं आहेत हें पाहून ठेवून त्यांना पुढल्या पुढल्या जागा त्याला द्याव्या लागतात; डोळ्यानें अधू किंवा किंवडे विद्यार्थी कोण आहेत हें पाहून ठेवून त्यांना शक्य तितकें जवळ बसवावें लागतें; प्रश्नाचें उत्तर देण्यासाठीं विद्यार्थी उभा राहिला, तर बाकीच्या दोन रांगामध्यें त्याला पुरेशी जागा सांपडते ना, इकडे त्याचें अवधान असावें लागतें; एकच प्रश्न सर्व वर्गाला पडेल अशी तरतूद ठेवावी लागते; उत्तराची तयारी असल्यामुळें दर वेळी तींच तींच मुलें हात वरती करतात कीं काय, आणि कांहीं विद्यार्थी कधीच तयार नसतात कीं काय, याचें मानसिक टिपण त्याला नेहमीं ठेवावें लागतें; एखादा विद्यार्थी जर नेहमींच कुबड काढून बसत असला, तर त्याची ती संवय मोडण्यासाठीं त्याला पुन्हां पुन्हां हटकावें लागतें; वजन, दृष्टिदोष, बहिरेपणा, अनुपस्थिति आणि अवेळीं येणें, इत्यादि त्या त्या विद्यार्थ्याचे दोष मुख्याध्यापकांना व पालकांना कळवावे लागतात; आपलें शिकविण्याचें काम चालू असतांना मुख्याध्यापक किंवा देखरेखनवीस वाटेल तेव्हां पाठ पाहण्यासाठीं येऊन उभे राहतील, असा धाक त्याला नेहमीं वाटत असतो; यामुळें शिकवावयाच्या धड्याचा उत्तम परिचय त्याला आधींच करून ठेवावा लागतो; मुख्याध्यापक किंवा प्रसंगीं डेप्युटी हे वर्गांत आले, म्हणजे ते मुख्यतः आपलीच परीक्षा घ्यावयास येतात, हें त्याच्या मनांत चांगलें ठसलेलें असावें लागतें; वर्गांतील टारग्या मुलांना हें माहीत असल्यामुळें तीं मुद्दाम कोणचे प्रश्न उपस्थित करतील, हें त्याला हेरून ठेवावें लागतें. आमच्या त्या पुरातन काळीं शिक्षकांना यांपैकीं कोणाचाहि उपद्रव नव्हता.

जुनें पुणें

मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला मला अर्थातच पुण्याला यावें लागलें. सध्याचें पुणें शहर तेव्हांच्या मानानें कोणीकडच्या कोणीकडे वाढलेलें आहे व किती तरी संपन्न आणि दिमाखदार दिसतें. पण तेव्हांचें तें पुणें पाहून सुद्धां मी अगदी भांबावून गेलों. सध्यांचें पुणें   स्टेशनचें भव्य आवार, पुलापलिकडील फर्ग्युसन कॉलेजपर्यंतची व त्याच्याही पलिकडील सुशिक्षित आणि श्रीमंत लोकांची वस्ती, लकडीपुलाला आलेलें सुंदर आणि विशाल स्वरूप, लक्ष्मी रोडचे फुटपाथ, टिळक रस्ता, शनवारवाड्यापुढील नवा पूल, यांतलें त्यावेळीं कांहींहीं नव्हतें! स्टेशनचें आवार कांहीसें किचकटच होतें. वीस-पंचवीस फूट रुंदीचा लकडी पूल संपला कीं, डाव्या हाताला गवताच्या गंजी सुरू होत आणि उजव्या हाताला बाजरीच्या पिकांची थाप लागलेली असे. सध्यां ज्याला कर्वे रोड म्हणून म्हणतात, तो एखाद्या बोळकंडासारखा दिसे; आणि पेरूच्या पाट्या वाहणाऱ्या बायका व प्रो. धोंडोपंत कर्वे हे तिकडून जात-येत असल्यामुळें त्या वाटेकडे क्वचित्‌ कोणाचें लक्ष जाई. डेक्कन जिमखाना, प्रभात रोड, कर्व्यांचें कॉलेज, लॉ कॉलेज, भांडारकर इन्स्टिट्यूट यांतलें तेव्हां कांहीही नव्हतें. जिकडे तिकडे पेरूच्या किंवा पोपईच्या बागा पसरलेल्या असत. शनिवार वाड्यापुढचा सध्यांचा विस्तीर्ण देखावा अगदीं अलीकडे झालेला आहे. तेव्हां वाड्याच्या दरवाजापुढून, दोन्ही अंगांच्या मैदानामधून एक लहानशी वाट नदीच्या कांठापर्यंत जाई. डाव्या हातच्या कोपऱ्याला नदीकांठीं कोनकरांचा वाडा होता. तेथें ‘काळ’कर्ते शिवरामपंत परांजपे रहात असत. सध्यांचा अप्पा बळवंताचा चौक हा सुमारें वीस फूट तरी रुंद होता कीं नाहीं याविषयी शंका आहे! असल्या या शहराचें सुद्धां आम्हां खेडेगांवच्या मुलांना बरेंचसें कौतुक आणि थोडेसें भयच वाटलें!

देखरेख हवी होती

पुण्याला क्रिकेटचें वेड फार. तें अजूनहि कायमच आहे. नूतन मराठी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, भावे स्कूल यांच्यांत विलक्षण चुरस असे. आणि एकदां क्रिकेटचा हंगाम आला, म्हणजे अर्थातच कॉलेज सकाळीं होई. कॉलेजच्या मॅचेस्‌ नसल्या, तर कॉलेज सुटल्याबरोबर शाळांच्या मॅचेस्‌ पहायच्या. मॅचेस्‌ पाहणें आणि एरवींच्या वेळीं त्यांच्या संबंधींची चर्चा करणें यांत बहुतेक वेळ खर्च होत असे. दमून आल्यानंतर लवकर झोंप येणें, हेंहि स्वाभाविकच होतें. अशी ही कांहीशी मोकाट सुटलेली उमेदवार प्रजा येथल्या राहणीनें चांगली तजेलदार बनून सुट्टीला आपल्या घरीं जाई. येथें दुसरेंहि एक वेड होतें. राजकीय चळवळ फोंफावत चाललेली होती. आपापल्या गांवीं केसरी, काळ, भाला इत्यादि पत्रें आम्हीं विद्यार्थी वाचतच असूं; पण पुण्यास आल्यानंतर तीं संपादक मंडळें आम्हांला येथें प्रत्यक्षच दिसूं लागलीं. त्यांतहि टिळक, परांजपे हीं नांवें महाराष्ट्रात आधींच गाजत असलेलीं. त्यांचीं व्याख्यानें ऐकावयास संध्याकाळीं झुंडीच्या झुंडी जमत. क्रिकेट काय किंवा व्याख्यानें काय, पाहिलें, ऐकलें आणि सोडून दिलें, असें होत नसे. मागून त्याची चर्चा करण्यांत आणि आपआपसांत वाद करण्यांत आमचा किती तरी वेळ जाई. मॅट्रिक झाल्यावर मुलें मोठी होतात, त्यांचें हिताहित त्यांना कळूं लागतें, असें वडील माणसें समजतात. पण तें सारें चूक आहे. या पोरांच्यावर पुढेंसुद्धां देखरेखच पाहिजे. पालकांनीं त्यांच्या डोक्याभोवतीं किरकिर करीत राहूं नये हें खरें; पण आपल्यावर कोणी तरी अडपता-दडपता आहे, जाब विचारणारा आहे, असा धाक विद्यार्थ्याला असलाच पाहिजे. घर आणि शाळा सुटून शहराच्या वातावरणांत आल्यावर यांतलें कांही शिल्लक रहात नाहीं. वास्तविक पाहतां, या वयांत मनाचा बनाव चालू असल्यामुळें ही देखरेख अवश्यच हवी. पण प्रश्न हा पडतो, की ही देखरेख कोणी आणि कशी करायची! आपण वसति-गृहाविषयीं बोलतों; पण तेथें तर मुलें जास्तच पुंड बनतात. प्रोफेसरांपैकीं कोणी तरी एक पहारा करतो; पण तो चुकवून फटिंगपणानें वागणारे शेंकडो विद्यार्थी असतात. सधन पालकांचीं मुलें म्हणून हातांत पैका बरा येतो. खानावळीच्या मानानें क्लबांतलें जेवण अर्थातच उंच दर्जाचें असतें. येऊन जाऊन रात्रींच्या वेळीं सर्व मुलें वस्तीला आहेत ना, एवढेंच काय तें रेक्टरला हजेरी घेऊन पाहतां येतें. तात्पर्य, मोकाटपणा हा आम्हां विद्यार्थ्यांचा तेव्हां वैरी ठरत असे; पण आम्हांला मात्र त्याची जाणीव नव्हती.

चळवळीचे परिणाम

एक गोष्टी सांगितली पाहिजे कीं, टिळकांची राजकीय चळवळ जोर धरूं लागली असल्यानें, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्तींत थोडासा प्रखरपणा, थोडा कडवेपणा, मिजासीची उपेक्षा, साध्या राहणीची आवड, व्यसनांचा तिरस्कार हीं सर्वत्र दिसून येत. तेव्हां जर कोणी एखाद्या विद्यार्थ्यानें विडी किंवा सिगरेट ओढली असती, तर त्याच्या मित्रांनीं त्याला आपल्या संगतींतून पिटाळूनच दिलें असतें. सकाळस संध्याकाळ हॉटेलांत जाऊन जर कोणी गप्पा-गोष्टी करतो असें कळलें असतें, तर त्याला मित्रांनीं बहिष्कृतच केलें असतें. सिनेमा ही संस्था तेव्हां मुळींच नव्हती; आणि महिन्यांतून एखादें नाटक पाहणें म्हणजेसुद्धां घरून येणाऱ्या पैशाचा दुरुपयोग आहे, असें सामान्यपणें सर्वांसच वाटे; आणि जे कोणी या प्रघाताचें उल्लंघन करीत, ते ‘श्रीमंत बापाचे बेटे’ आहेत, असें म्हणून बाकीचे विद्यार्थी त्यांचा उपहास करीत. स्वदेशी चळवळ जोरांत असल्यामुळें अंगांत एक सदरा आणि वर कोट याच्या पलिकडे विद्यार्थ्यांचा पोषाख फारसा कधीं गेलाच नाहीं. नटणें-मुरडणें आणि पोषाकांत जनानीं ऐट आणणें उपहास्य बनत असे. तात्पर्य, राजकीय मताचें कांही असो, फाजिलपणानें खात सुटणें, नाटकांची अनिवार आवड बाळगणें, हॉटेलाची संवय लागणें, किंवा विड्या वगैरे ओढणें, यासंबंधानें मनांत नुसती उपेक्षा नव्हे, तर तिरस्कार उत्पन्न होण्याला या चळवळीचा फार उपयोग होत असे. महात्मा गांधींच्या चळवळीच्या वेळीं विद्यार्थ्यांच्या मनावर जो एक फार अनुकूल परिणाम झाला, तोच त्या वेळी आमच्या पिढीवर झालेला होता.

स्वदेशीची लाट

कॉलेजांत गेलों त्या वेळीं मी मुंडेछाट सदरा घालीत असे; आणि तोंपर्यंत स्वदेशीची चळवळ सुरू झालेली असल्यामुळें सदऱ्यावर सोलापुरी चेकचा कोट घालीत असे. मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला मी येथें पुण्यास आलों असतांना, गणपति बापटानें माझ्या डोक्यावरची इटॅलियन कॅप बुधवारच्या चौकांत फेकून दिली; आणि  मग तेव्हांपासून बालाजीच्या देवळापाशीं असलेल्या छबिलदासाच्या दुकानांत देशी टोपी घेण्याचा परिपाठ आम्ही ठेवला; तो परवां परवांपर्यंत चालूं होता. स्वदेशीची लाट सुरू झाली, तरी कॉलेजवर विद्यार्थ्यांत ती अजून इतकीशी भिनली नव्हती. काहीं विद्यार्थीं अगदीं मोरासारखे नटून वर्गांत येत. रंगीबेरंगी रेशमी वेल काढलेल्या मखमलीच्या टोप्या सर्वांच्या डोक्याला असत. आतां तसली टोपी कोणी घातली, तर लोक त्याला हसूं लागतील; पण तेव्हां ती उंची दर्जाची फॅशन होती. ज्या ज्या मानानें बापाचा आदा जास्त, त्या त्या मानानें कॉलेजवर विद्यार्थ्यांचा डौल जास्त. पण या मोरांच्यावर लवकरच स्वदेशीची संक्रान्त आली; आणि ती एवढ्या वेगानें आलीं कीं, त्यांचा सारा डामडौल आणि त्यांची फॅशन कोणीकडच्या कोणीकडे वाहून गेली. डेक्कन कॉलेजला मात्र या लाटेची फारशी बाधा झाली नाहीं. कारण तेथे श्रीमंतांची, जहागिरदारांचीं व बड्या सरकारी अधिकाऱ्यांचीं मुलें असत; आणि स्वदेशी म्हणजे राजद्रोह असा सरकारी अर्थ असल्यामुळें हीं मंडळीं स्वदेशीपासून होतां होईतों अलिप्त रहात. विजार घालणें हें सुद्धां तेव्हां डेक्कन कॉलेजांत रूढ होतें. फर्ग्युसन कॉलेजांत विजारीची फॅशन अगदीं अलिकडे आलेली आहे. क्रिकेटच्या टीममधले खेळाडूसुद्धां तेव्हां धोतरें नेसूनच खेळत! म्हणून तर मुंबईला गेलेल्या आमच्या टीमची थट्टा करण्याकरतां ‘धोतरवाले भटजी’ आले आहेत, असें मुंबईचीं पोरें म्हणत. पण त्याच वर्षी या धोतरवाल्या भटजींनी क्रिकेटचें शील्ड मात्र मिळवून आणलें. धोतर धोतर म्हणून कोणी चिडवलें, तरी पुणेरी विद्यार्थ्यांच्या धोतराचा काचा कलेच्या दृष्टीनें पाहतां अत्यंत शोभिवंत दिसे. अजूनहि तो कोठें कोठें पहावयास सांपडतो; आणि वाटतें कीं, जर माणसांना पोशाखांतील कलेची खरी आवड असेल, तर तलम धोतराचा सुंदर काचा त्यांनीं पुन्हां रूढ करावा.

राजकीय आखाड्यांतील मल्ल

1908 हे वर्ष हिंदुस्थानांतील, विशेषतः महाराष्ट्रांतील राजकीय चळवळीच्या दृष्टीनें मोठें उत्पाताचें गेलें. टिळकांची चळवळ प्रखर बनत चाललेली होतीं. सुरतेची काँग्रेस मोडल्यामुळें तेव्हांच्या नेस्त पक्षाच्या पत्रांकडून टिळकांच्या डोक्यावर शिव्या-शापांचा भडिमार चाललेला होता. परंतु जों जों संकट जास्त, जों जों विरोध प्रखर, तों तों टिळकांची उमेद आणि धमक अधिक अधिक उंचावत जात असे. त्यांच्या मनाचा हा मोठा प्रबळ धर्म होता. खचणें त्यांना माहीतच नव्हतें. लंगोट चढवून आणि दंड ठोकून जसा एखादा मल्ल कुस्त्यांच्या फडांत उतरतो, तसे टिळक हे इंग्रजांशीं जणूं कांहीं कुस्ती खेळण्यासाठीं आखाड्यांत उतरलेले होते. भिंतीवर डोकें आपटून घेण्यांत काय अर्थ आहे, असा व्यवहारज्ञानाचा सल्ला त्यांना पुष्कळ लोक देत असत; आणि मवाळ पक्षांतील पुढारी तर ‘तुमचें राजकीय धोरणच मुळांत चुकींचें आहे.’ असें त्यांना बजावीत; आणि त्यांच्या दृष्टीनें टिळकांच्या धोरणांत ज्या त्यांना चुका वाटत, त्यांवर अतिशय कडक आणि केव्हां केव्हां तर विषारी टीका ते करीत. टिळकांचीं प्रत्युत्तरेंहि तितकीच भयंकर असत. शिवाय राजकीय भावनेच्या वाढीला बाधक असें जें कृत्य प्रतिपक्षाच्या हातून घडे, तें दरदरां बाहेर ओढून त्यावर जोराचा हल्ला करणें, हें टिळकांच्या ‘केसरी’चें धोरणच होतें. अशा प्रकारें दोन जबरदस्त शत्रूंशीं टिळकांची झुंज सुरू झालेली होती. एक इंग्रज सरकार आणि दुसरा तेव्हांचा नेमस्त पक्ष.

सदुपदेश!

विद्यार्थ्यांनीं इकडे तिकडे पाहूं नये, आपला अभ्यास बरा कीं आपण बरें, असें त्यांचें वर्तन असावें, असा सदुपदेश पुष्कळ लोक करतात. पण तो केवळ जेव्हां त्यांच्या सोयीचा असतों, तेव्हां तो ते करतात, त्यांची स्वतःची जर का एखादी चळवळ असली, आणि त्या चळवळींत विद्यार्थ्यांचा उपयोग असला, तर त्यांना तींत ओढल्याशिवाय ते राहत नाहीत. आपले सध्याचे राज्यकर्तेसुद्धां मोठा सोज्ज्वल आवाज काढून कॉलेजांतील मुलांना सांगत असतात कीं, ‘‘बापहो, ज्ञानाचा महिमा फार मोठा आहे, तुमचें हें वय ज्ञान संपादनाचें आहे, म्हणून चळवळ्या लोकांच्या नादीं न लागतां तुम्ही आपल्या पुस्तकांत गढून रहा!’’ पण हेच राज्यकर्ते जेव्हां स्वतःची एक चळवळ चालवीत होते, तेव्हां तरुण विद्यार्थ्यांना ते नागरिकत्वाचे हक्क बहाल करीत होते; आणि इंग्रजांचा राज्यकारभार खिळखिळा करण्याच्या कामीं त्यांनीं त्यांचा वाटेल तसा उपयोग करून घेतला, हें आपल्याला माहीत आहे. असल्या सदुपदेशाचा जाच टिळकांनाहि होत असे, म्हणून एकदां एका सभेंत ते रागानें म्हणाले, ‘‘लहानपणीं विद्यार्थी म्हणून, तरुणपणीं नोकर म्हणून, आणि म्हातारपणीं पेन्शनर म्हणून, चळवळींत पडावयाचें नाहीं, तर मग चळवळ करावयाची कोणीं?’’ हा सदुपदेशाचा मारा पाठीवर घेत घेतच विद्यार्थी आजपर्यंत अनेक चळवळींत पडत आलेले आहेत. 

विद्यार्थ्यांची ओढाओढ

या कामीं एक गोष्ट ध्यानांत हवी. पूर्वीच्या काळीं संपादावयाचें ज्ञान फारच थोडें असे; आणि अठरा-एकोणीस वर्षांच्या वयाला मनुष्य कर्ता बनून प्रपंचालाहि लागत असे. सध्या त्या वयाची मुलें मॅट्रिक होऊन कॉलेजमध्यें प्रविष्ट झालेलीं असतात; आणि संपादावयाच्या खऱ्या ज्ञानाचा सारा पल्ला अजून याच्या पुढेंच असतो. तो पल्ला हस्तगत करावयास त्यांना आणखी सात-आठ वर्षे लागतात; म्हणजे त्यांची   पंचविशी जवळ जवळ उलटून जाते. विद्यार्जनाचें काम चालूं असल्या- मुळें त्यांना विद्यार्थीच म्हणण्याची चाल असते; पण खरें म्हटलें म्हणजे तें चांगले प्रौढ बनलेले असतात; त्यांना बरें-वाईट कळूं लागलेलें असतें, समाजकारण, राजकारण इत्यादि विषय त्यांच्या अभ्यासांतहि आलेले असतात; आणि प्रत्यक्ष समाजांत आणि देशाच्या कारभारांत या विषयांचा व्यापार त्यांना दिसत असतो. अर्थात्‌ असे प्रबुद्ध लोक, केवळ ते एका बाजूला विद्यार्जनाचें काम करीत आहेत म्हणून, सार्वजनिक कामांत लक्ष घालण्याला किंवा प्रसंगविशेषीं त्यांत प्रत्यक्ष पडण्याला अपात्र आहेत, असें समजणें हें अगदीं चूक आहे. त्यांच्या वयाचीं गांवांत जी इतर माणसें असतात, तीं विद्या शिकत नाहींत या मुद्द्यावरच गृहस्थ बनून सार्वजनिक चळवळीला पात्र बनतात! थोडासा मुद्दा एवढाच खरा आहे कीं, सार्वजनिक चळवळीमुळें विद्याभ्यासाची हयगय होऊं नये. टिळकहि स्वच्छ सांगत असत कीं, ‘‘तुम्ही शाळा-कॉलेजें सोडूं नका. तें तुमचें काम चालूं द्या. फक्त संध्याकाळीं माझ्या व्याख्यानाला येत जा; म्हणजे झालें!’’

ओंगळ रूप

असा जुना जमाना होता म्हणून जो ओरडून बोलेल त्यालासुद्धां वाटे कीं, आपण वक्ते आहों. कै.विनायकराव भावे यांनीं आपल्या नेपोलियनच्या चरित्रांत एक मोठें मार्मिक टीकावाक्य लिहिलें आहे; आणि तें लिहितांना त्यांच्या डोळ्यांपुढें महाराष्ट्राची तेव्हांची स्थिति असली पाहिजे. ‘ओरडून बोलेल तो वक्ता’ व ‘पुष्कळ बोलेल तो पुढारी’ अशा व्याख्या त्यांनीं केल्या आहेत; पण असें वाटतें कीं, कोणतीहि चळवळ फोफावूं लागली, म्हणजे हाच प्रकार घडून येतो. पहिल्या श्रेणीचे वक्ते, कीं ज्यांच्या मनांत चळवळीचा बीजमंत्र वाढीस लागलेला असतो, ते कोठें कोठें जाणार आणि किती किती बोलणार? अर्थात्‌ दुय्यम दर्जाची, तिय्यम दर्जाची, माणसें सुद्धां त्यांना हाताशीं धरावीं लागतात. त्याच्याशिवाय मतप्रचार होत नाही. मात्र मुख्य बुद्धिवाद पुढाऱ्यापाशीं राहून, त्या पुढाऱ्याच्या प्रतिपादनांतील भावनेचा अंश या मंडळींच्या मुखांत अधिक प्रज्वलित होत जातो. कदाचित्‌ पुढाऱ्याला पसंत नसलेलीं प्रमेयेंसुद्धा हे दुय्यम लोक बोलून जातात, आणि ते पुढाऱ्यांच्याहि कह्यांत रहात नाहींत. या सर्व वैचारिक पातकाचा जबाब पुढाऱ्यांना द्यावा लागतो. घरांतील अवखळ पोरांना वडील माणसें जशीं कधीं टाकत नाहींत, तसेंच या दुय्यम-तिय्यम पुढाऱ्यांना मुख्य पुढारी कधीं टाकत नाहींत. हे खालच्या प्रतीचे लोक जर त्यांच्यापाशीं नसले, तर त्यांचेंहि कधी चालायचें नाहीं. एक गोष्ट खरी कीं, या कनिष्ठ पुढाऱ्यांचा मगदूर अगदींच सामान्य प्रकारचा असल्यामुळें चळवळीला पुष्कळदां ओंगळ स्वरूप प्राप्त होई. पुढाऱ्यांचें म्हणणें जसेंच्या तसें नव्हे, तर यांना जसें उमगलें असेल तसें ते लोकांपुढें सांगत असत; आणि टाळ्या ठोकणाऱ्यांच्या कह्यांत आपण चाललों आहोंत, हेंहि या दुय्यमांच्या ध्यानांत येत नसे.

टिळक- गोखल्यांचे वैर

मेळ्यांची स्थिति अशीच झाली. दारुबंदी, इंग्रजांच्या संबंधींची अप्रीति, शिवाजी महाराज इत्यादि वीर पुरुषांच्या उत्तेजक कथा, पद्यांतून गाणारे अनेक मेळेवाले असत; आणि या प्रचाराचा उपयोग खरोखरच फार होत असें. लाल देवधर नांवाचा एक मोठा पहाडी आवाजाचा पदें म्हणणारा जवान तेव्हां प्रसिद्धीस आलेला होता. वीस वीस हजार श्रोते आपल्या खड्या आणि सुरेल आवाजानें आणि पद्यांतील मतलबानें तो केवळ मंत्रमुग्ध करून ठेवीत असे. पण मेळ्यांची ही संस्था पुष्कळदां व्यक्तींवर घसरल्यामुळें ती स्वतःची हानि करून घेत असें. ना. गोखले आणि लोकमान्य टिळक यांचें राजकारणांत कधीं जमलेंच नाहीं. इतक्या वर्षांनंतर आतां हिशेबानें सुद्धां असें सांगतां येतें कीं, एका गावांत राहणारे हे दोघे पुढारी जर मधून मधून एकत्र बसले असते, आणि त्यांच्या कांहीं सामुदायिक वाटाघाटी झाल्या असत्या, तर द्वेषाचें आणि अवहेलनेचें एवढें प्रदर्शन मेळ्यांतून झालें नसतें. पण गोखले हे मवाळ आणि इंग्रजांच्या कच्छपीं लागलेले, असें टिळक-पक्षाच्या लोकांना वाटे; आणि टिळक हे जुन्या बुरसटलेल्या कल्पना घेऊन उठलेले, नव्या कालाचें आकलन न झालेले एक ‘तेल्या तांबोळ्यां’चें पुढारी आहेत, असें गोखल्यांच्या पक्षाला वाटे. या मतांचा आणि भावनांचा ठणठणीत ध्वनि गणपतीच्या दिवसांतले मेळेवाले काढीत असत. मवाळ पक्षाचे लोक गणपति उत्सवांत कधींच सामील होत नसत. मुसलमानांच्या डोल्यांवर टिळकांनीं हा एक आपला तोडगा काढलेला आहे. आणि देशांत एक नवा धुल्ला सुरू केलेला आहे, असें त्यांचें मत असें. बरें, गणेशोत्सवांतील धुल्ला जरी सोडला, तरी शिवाजी उत्सवांत सामील व्हायला त्यांना काय हरकत होती? पण तो उत्सव तरी टिळकांनीच काढलेला, आणि मुसलमानांच्या वैरामुळे त्यांनीं हा उपक्रम केलेला, असें आणखी एक मत त्यांनीं धारण केलेलें होतें! स्वाभाविकपणेंच हीं सारीं मंडळीं समाजापासून तुटून वागत असत; आणि म्हणून मेळेवाले त्यांचें आणि त्यांच्या पुढाऱ्यांचें केव्हां केव्हां अगदीं विचित्र विडंबन करीत.

विपरीत झुंज

आम्ही विद्यार्थी तर त्या मानानें वयानें लहानच होतो; पण आम्हांला सुद्धां कित्येक वेळां असें वाटे कीं, या मेळ्यांच्या प्रचारांत निरर्गलपणा फार येत आहे. हाच दुर्गुण पुढें वाढत गेला; आणि पुढें जेव्हां गोपाळराव गोखले यांनीं बेअब्रूची फिर्याद कोर्टांत गुदरली, तेव्हां या अतिरेकवाल्यांचें कंबरडेंच मोडलें, आणि मेळा संस्थेची जवळजवळ दाणादाण झाली. या प्रकरणीं एक गोष्ट ध्यानांत ठेवावयास हवी. मवाळ पक्षांतील सर्वच लोक अव्वल दर्जाचे संभावित होते, असें समजणें सुद्धां अगदीं चूक आहे. त्यांना मेळा काढतां येत नव्हता, इतकेंच काय तें. काढतां आला असता, तर त्यांनीं टिळकपक्षाची अशीच पूजा बांधली असती. ज्ञानप्रकाश पत्र कित्येक वेळां इतकी कुत्सित, जालिम आणि विषारी वैयक्तिक टीका करीत असे कीं, या टीकेला तसलेंच उत्तर देऊन या पक्षाची जनतेंत फटफजिती उडविणें हें आपलें कामच आहे, असें मेळेवाल्यांना वाटे. टिळक हे मेळेवाल्यांना आवरून धरीत नाहींत, असा आरोप  त्यांच्यावर वारंवार होत असे; पण हातांत असूनहि गोखले यांनीं ज्ञानप्रकाश पत्रांतील टीका कधीहि ढिली पडूं दिली नाहीं; हेंहि तितकेंच खरें होतें. करणें, करविणें, आणि अनुमोदणें असे तीन प्रकार चळवळींत असतात. आणि गोखले हे ‘करणें’ या सदरांत सांपडत नसले, तरी ‘करविणें’ आणि ‘अनुमोदणें’ यांत ते खचितच सांपडत असत. अशा प्रकारें पक्षा-पक्षांचें मोठें विपरीत झुंज गणेशोत्सवाच्या काळांत सर्व महाराष्ट्रभर चालू असें.

 टिळकांचे धोरण

पण ह्या सुमाराला महाराष्ट्रांत एका सामाजिक विचाराची मोठी उचल झालेली होती. सगळा देश राजकारणाच्या आखाड्यांत उतरलेला होता; आणि इंग्रजांशीं टिळकांचें झुंज पुन्हां जोरानें सुरू झालेलें होतें. पण अस्पृश्य लोकांचा प्रश्न सोडविणें आवश्यक आहे, हें ज्याच्या त्याच्या तोंडीं झालेलें होतें. भारतांतील मोठमोठे पुढारी, विशेषतः स्वामी श्रद्धानंद ह्यांनीं तरी ह्या प्रश्नाचा धोशाच घेतलेला होता. खुद्द टिळकांचे अनुयायी जरी बहुतेक सारे सनातनी मताचे असले, तरी टिळकांना स्वतःला ह्या प्रश्नाचें महत्त्व चांगलेंच पटलेलें होतें. एकोणीसशें सहा सालापासून ह्या प्रश्नावरील त्यांचीं मतें लोकांना कळून चुकलीं होतीं. त्यांचा सारा ओढा राजकारणाकडेच होता. आणि त्यांना असें स्पष्ट वाटे कीं, एकदां राजकारणाचा डाव उलगडला, म्हणजे सारे सामाजिक प्रश्न आपण आपल्या मताप्रमाणें सोडवून घेऊं. आपल्या सामाजिक किंवा धार्मिक प्रश्नांसंबंधानें परदेशी आणि परधर्मीय राज्यकर्ते जे कायदे करतील, ते आपल्याला हवे आहेत असेच करतील, असें नाहीं. इतकेंच नव्हें तर ह्या कामांत आपण त्यांना आपले गुरु मानणें हें सुद्धां चूक आहे; सुईच्या मागून जसा दोरा येतो, तसें स्वराज्याच्या मागोमाग सामाजिक व धार्मिकही प्रश्न सुटत येतील, असें त्यांचें ठाम मत होतें.

त्यांचा दुसरा एक कयास

दुसराहि एक टिळकांचा कयास असा होता कीं, असे प्रश्न जरी सोडवावयास हवे असले, तरी इंग्रजांशीं झुंज जो कोणी सुरू करील, त्याच्या साहाय्याला भारतीय जनता येईलच येईल; आपण आपलें देशाभिमानाचें सामर्थ्य व चळवळीचें तेज ऐतिहासिक जाणिवेनें प्रबळ केलें पाहिजे; जागतिक राजकारणांत ज्या घडामोडी होतात, त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा उपयोग आपल्या चळवळीला करून घेतला पाहिजे, आणि ह्या चळवळींत जे ईर्षेनें पडत असतील, त्यांच्या मनांत अन्य चळवळींनीं बेदिली उत्पन्न होऊं देतां कामा नये; अर्थात्‌ ज्या कोणाला सामाजिक व धार्मिक प्रश्न सोडवावयाचे असतील, त्यांनीं त्यासाठीं स्वतंत्रतेनें खटपट करावी; राजकारणाची चळवळ त्यांच्या आड येऊं नये; आणि त्यांची खटपट राजकीय चळवळीच्या आड येऊं नये. टिळकांची मतश्रेणि अशा तऱ्हेची होती.

गंडान्तराचा निचरा झाला पाहिजे!

ह्या ठिकाणीं आणखी एका गोष्टीचा थोडासा विस्तार केला पाहिजे. आपण पुढें पुढें गेल्यावर मागल्या मागल्या मतश्रेणींचा अर्थ आपल्याला चांगला कळूं लागतो, असें नुकतेंच म्हटलें आहे. धार्मिक व सामाजिक प्रश्न पूर्णपणें समाधानकारक रीतीनें सुटल्याशिवाय, समाजांतील शास्त्रविहित विषमता समूळ गेल्याशिवाय, मनुष्यमात्राला आपलें नशीब काढण्याची संधि, कसल्याही तऱ्हेची धार्मिक आणि सामाजिक हरकत न येतां, मिळाल्याशिवाय ह्या देशांत लोकशाही पूर्णपणें अवतरावयाची नाहीं, हें अगदीं खरें आहे. इंग्रज आम्हांला हेंच सांगत होते; पण हें व्हावयाचें, म्हणजे आम्हांला आणखी ‘दोनशे वर्षे’ वाट पहावी लागली असती. लोकहितवादी, ज्योतिबा फुले, भांडारकर, रानडे इतकेच काय कांहीं अंशीं आगरकर सुद्धा, ह्यांचीं मतें व त्या मतांबद्दलचा त्यांचा आग्रह हीं निरखून पाहिलीं, म्हणजे आम्हीं धार्मिक व सामाजिक चळवळी करीत बसलों असतों, तर ह्या सुधारकांच्या मताप्रमाणें सुद्धा इंग्रज येथून दोनशें वर्षे गेला नसता. आणि तेवढ्या काळांत आमच्या राष्ट्राचें पुरतें मुंडण झालें असतें. म्हणून आवश्यक तेवढें सामर्थ्य हाताशीं घेऊन इंग्रजांची सत्ता हें जें एक गंडांतररूप राजकारण उद्‌भवलें आहे, तें निकालांत काढावें आणि मग लोकशाहीला शोशतचें रूप यावें, म्हणून जे प्रश्न सोडवावयास हवेत त्यांकडे आपण वळावें, हा विचार विष्णुशास्त्री ह्यांनीं जोरानें सांगितला. आणि त्याचा अवलंब व उठाव आपल्या पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत टिळकांनीं अखिल भारतांत केवळ प्रसृतच केला असें नव्हे तर दुमदुमून सोडला.

गांधी त्याच क्रियेचे!

राजकीय चळवळीचें काम हातीं घेतलें खरें; पण गांधी हे धर्मसुधारणेचे आणि सामाजिक सुधारणेचे खास मित्र होते; आणि टिळकांच्या ह्या बाबतींतील धोरणांत त्यांनीं अशी सुधारणा केली कीं, आपण हे प्रश्न आधी सोडविले पाहिजेत, व ह्याच्यासाठीं स्वराज्य नाहीं व देशभर भ्रंमती करून हा विचार लोकांना समजवावा. पण त्यांनीं अशा रीतीनें ह्या प्रश्नांच्या संबंधानें सहानुभूतीचें वातावरण जरी उत्पन्न केलें, तरी त्यांनीं आपलें सर्व सामर्थ्य राजकारणाकडे वळविलें; आणि त्यांत जागतिक घडामोडींचा तात्काळ उपयोग करून घेऊन, राजकारण यशस्वी करून दाखविलें. वास्तविक पाहतां धार्मिक व सामाजिक प्रश्न तसेच लोंबत राहिले होते; सहानुभूतीच्या आग्रहापलिकडे महात्मा गांधींनीं त्यांतहि लक्ष घातले नाहीं; इतकेंच काय, हे प्रश्न सुटल्याशिवाय स्वराज्य नाहीं, हा आपला दावाहि त्यांनीं केवळ अलंकाररूप ठरविला. त्यांना राजकारणाची अटकळ बरोबर आलेली होती. टिळकांचें राजकीय तत्त्वज्ञान बरोबर आहे, हें त्यांनीं हेरलेलें होतें; पण धार्मिक व सामाजिक प्रश्नांसंबंधानें प्रकट व सक्रिय सहानुभूति दाखविल्याशिवाय राजकारणाला पुरती भरती यावयाची नाहीं, हेंहि त्यांनीं कालक्रमानुसार ओळखले होतें. रशियांतील क्रांतीची नौबत जोरानें झडूं लागली होती; आणि त्या क्रांतीचे सामाजिक उत्थानाचें मर्म महात्मा गांधींना उत्तरोत्तर पटूं लागलें होतें. टिळकांच्या हयातींत हें कांहींच घडलें नव्हतें. म्हणून ह्या दोन पुढाऱ्यांच्या चळवळीच्या धोरणांत पुष्कळ फरक पडलेला दिसला.  

विरोधकांना हें उमगलें नाहीं!

महाराष्ट्रांतील त्यांच्या विरोधकांना गंडांतररूप राजकारणाचा हा प्रश्न उमगला होता, असें मला वाटत नाहीं; आणि म्हणून ते टिळकांना जेथें तेथें विरोध करीत. ज्यांना असें वाटत होतें कीं, हे प्रश्न सुटल्याशिवाय स्वराज्य नको किंवा येणारहि नाहीं, त्यांनीं एकोणीसशें वीस सालीं प्राप्त झालेल्या प्रांतिक स्वायत्ततेच्या वेळींच ह्या स्वराज्याचा आपला इन्कार मॅक्डोनल्ड ह्याला कळवावयास हवा होता. आणि हें भलतेंच देणें आम्हांला अकाली देऊं नका असें सांगावयास हवें होतें! इतकेंच काय पण प्रत्यक्ष भारतीय स्वराज्य मिळालें, तेव्हां सुद्धा ह्या सर्वांनीं इंग्रजांना असेंच कळवावयास हवें होतें की, आमचे धार्मिक व सामाजिक प्रश्न सुटलेले नाहीत, आम्हीं लोकशाहीला अपात्र आहोंत; व म्हणून आपण देऊं केलेलें हें स्वराज्य आम्हांला नको. पण त्या वेळीं असें कोणींहि म्हणाले नाही! वीस सालच्या प्रांतिक स्वायत्ततेचा आणि सत्तेचाळीस सालच्या स्वातंत्र्याचा सर्वांनी जयजयकारपूर्वक स्वीकार केला. इतकेंच काय पण धार्मिक व सामाजिक चळवळीचा आग्रह धरणारे अनेक लोक, ते प्रश्न तसेच लोंबत पडले असतांना, प्राप्त झालेल्या अधिकारांच्या जागेवर भराभर घुसले; आणि अशा रीतीनें विष्णुशास्त्री ह्यांनीं सुरू केलेलें, टिळकांनीं गाजविलेलें, आणि गांधींनीं यशोदुंदुभीनें दुमदुमून सोडलेलें राजकारण बरोबर होतें, असें आपणहून सिद्ध केलें! अस्पृश्यता-निवारण, जाति-विषमता, स्त्रियांचे प्रश्न, शेतकऱ्यांची स्थिति इत्यादि साऱ्या प्रश्नांच्या संबंधानें आतां आपण भराभर कायदे करीत आहोंत, सक्ति करीत आहोंत. ह्याचा अर्थच असा आहे कीं, स्वातंत्र्यसंपादनाच्या पूर्वी हे प्रश्न सुटलेले नव्हते. आपल्या पुढाऱ्यांनीं ते तसेच ताटकळत ठेवलेले होते.

शेतकरी व सावकार

ह्या काळांत शेतकरी समाज हळू हळू खालावत चालला होता. पूर्वीं समाजांत अशी एक म्हण असे कीं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी; पण आतां अशी म्हण रूढ झाली कीं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, आणि कनिष्ठ शेती. येथें थोडें सिंहावलोकन करावयास हवें. जे इतिहास सचोटीनें वाचतील, त्यांना इंग्रज इतिहासकारांच्या जबानीनें कळून येईल कीं, नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीपासून नाना फडणीसांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्रांतील शेतकरी वर्ग अत्यंत सुखी होता. पुढें अठरा वर्षें धुंद किंवा भ्रांत झालेल्या स्वकीयांनीं महाराष्ट्रांतील शेतवाडीची केवळ पायमल्ली केली. इंग्रजांचें राज्य प्रस्थापित झाल्यावर गांवोगांवचे पाटील शिरजोर बनले. आणि स्वतः शेर बनून त्यांनीं शेतकऱ्यांना मनस्वी उपद्रव दिला. महाराष्ट्रांत मद्रासी मामलेदारांची आवक झाली; आणि शेतकऱ्यांना कोणी त्राता उरला नाहीं. प्रिंगलसाहेबानें घातलेल्या जमिनीच्या प्रतवारीच्या कल्पना प्रयोगानें फसल्या. पण इंग्रजानें धीर करून पुन्हां पाहणी करून कायमची प्रतवारी केली. आणि चोरा-चिलटांचें भय साफ केलें. हें सारें गॅझिटियर्सध्यें दिलें आहे. मात्र दर तीस वर्षांनीं कर वाढत चालले. आणि ह्या देशांत नवे उद्योगधंदे उभे करण्याचें इंग्रजानें सर्वथा टाळल्यामुळें खजिन्यांत गल्ला जमा व्हावयाचा, तो शेतींतून झाला पाहिजे, असें त्याला वाटूं लागलें. अर्थातच शेतीची हलाखी झाली. गांवोगांवचे वरिष्ठ दर्जाचे मराठे आणि पाटील, मोकाशी, कुलकर्णी इत्यादि मंडळी त्या मानानें सुखी राहिलीं; पण प्रत्यक्ष जमीन कसणारे लोक टेकीला येऊं लागले. देशांत सावकारीला भर आला; आणि नवलाची गोष्ट ही कीं, गुजर, मारवाडी, आणि वरिष्ठ दर्जाचे मराठे ह्यांनीं ज्याप्रमाणें सावकारी केली, त्याप्रमाणेंच ज्या यजुर्वेदी ब्राह्मणांच्या कुळांत विद्येचा आखाडा शतकानुशतक चालूं होता, आणि ज्यांतून महाराष्ट्राचे बहुतेक ग्रंथकर्ते उत्पन्न झाले, तीं यजुर्वेदी कुळें केवळ सावकारीवर जगूं लागलीं.

असूया व अवहेलना

मुंबईला इंग्रज जवळ, म्हणून पार्शी पहिल्यानें शहाणा झाला; येतां येतां इंग्रजांची विद्या पुण्याला आली; आणि तेथें तिची आणि चित्तपावन व कऱ्हाडे ब्राह्मण ह्यांची गांठ पडली. पेशव्यांच्या फडावर जे सहस्रावधि कारकून असत, त्यांचीं मुलें व नातू इंग्रजी शिकून इंग्रजांच्या फडावर जाऊन बसले; आणि इंग्रजांच्या राज्यकारभारांत शिरून सुखानें प्रपंच करूं लागले. ह्यांतच एक वकिलांचा वर्ग निर्माण झाला; आणि तो कोंकणच्या किनाऱ्यापासून नागपूर-जबलपूरपर्यंत धंद्याचीं ठिकाणें शोधत गेला; व तो गबरहि बनला. इंजिनियरिंग खात्यांत लहान-मोठ्या जागांवर ह्या जातींतील बरेच लोक गेले व तेही सुखी झाले. देशावरचा देशस्थ ब्राह्मण हा आपल्या शेतीच्या उत्पन्नावर, कुलकर्णाच्या वतनावर, आणि सावकारीच्या पेशावर त्यांतल्या त्यांत सुखी राहून गांवांत येणाऱ्या ह्या नव्या कारकुनांकडे आणि वकिलांकडे कांहींसा असूयेच्या दृष्टीनें पाहूं लागला; आणि तो व गांवांतील इतर मराठे उत्पन्नदार हे आपल्या परंपरागत खानदानीच्या उंचीवरून त्याच्याकडे कांहींशा अवहेलनेनेंहि पहात. मानेवर खडा घेऊन आणि पालथी मांडी घालून कचेरींत लेखणीची कुरकूर करणाऱ्यांच्या संबंधानें ह्या दोन्हीं समाजांत थट्टा चाललेली असें, हें मला प्रत्यक्ष माहीत आहे.

शेतकऱ्याचा पक्षपात

मात्र वर सांगितल्याप्रमाणें मराठा समाजांतील खालचा वर्ग खरोखरच टेकीला येऊं लागला होता. जातीच्या एकपणामुळें ह्या वर्गाला आपणांत घुसमटून घेऊन किंवा अवश्य तेव्हां त्यांच्यांत मिसळून जाऊन मराठा वर्गानें बराच काळ निभावून नेला. पण जे पहात होते त्यांना दिसूं लागलें कीं, प्रत्यक्ष शेती कसणारा कुणबी मराठा निराळा, आणि इतिहासकालीन सरदारक्या, पाटीलक्या व उत्पन्नदाऱ्या अजूनहि भोगणारा मराठा वर्ग निराळा, पुढें इंग्रजी वाङ्‌मयांतून आपल्याकडील कम्युनिस्टांनीं जो फ्यूडॅलिस्ट हा शब्द उचलला, तो ह्यांनाच लागूं पडतो. पण पुष्कळदां सामाजिक जाती आणि सांपत्तिक वर्ग ह्यांच्यातील विवेक क्रांतिकारकांनासुद्धां नीट करतां येत नाहीं; आणि आपलीं हितें जपणारे लोक, ह्या दोहोंचा संकर करून हा विवेक होऊंहि देत नाहींत. देशांतील राजकीय चळवळ  करणारे जे बाळ गंगाधर टिळक त्यांची बहाद्दुरी ही कीं, ‘केसरीं’तील कित्येक अग्रलेखांत त्यांनीं ह्या शेतकऱ्यांची बाजू पुन्हां पुन्हां आग्रहानें मांडली. ज्योतिबा फुले ह्यांनीं तर खऱ्या शेतकऱ्याचा पक्ष घेऊन काँग्रेसमध्यें शेतकरी प्रभावी ठरला पाहिजे, असें प्रतिपादन चालविलें होतें. अशा ह्या काळांत दुसरी एक मोठी स्वार्थत्यागाची उचल झाली.

संस्कृत ज्ञानाचा पल्ला

सरकारी शाळा-कॉलेजांतून संस्कृत भाषेचा अभ्यास सरसहा सुरू झाल्यामुळें विद्या संपादन करणाऱ्या समाजांत तरी पूर्वीपेक्षां संस्कृतचा परिचय जास्त वाढला. आपण असें समजतों कीं, इंग्रजी राज्य येण्यापूर्वी ब्राह्मण समाजांत संस्कृतच्या ज्ञानाचा प्रसार अधिक असला पाहिजे. पण हा समज चुकीचा आहे. ह्या समाजांतसुद्धां तेव्हांचे ज्ञानाचे परिमाण अगदीं लहान होतें. लिहितां-वाचतां येणें, मोडी अक्षर सुंदर काढणें, हिशेब-ठिशेबाची माहिती असणें, बखरी वाचतां येणें, संध्या, पुरुषसूक्त, महिम्न, खंड, रुद्र इत्यादींचें अध्ययन करणें आणि रूपावलि, समासचक्र ह्यांची ओळख करून घेणें येथपर्यंतच ज्ञानाचा पल्ला जात असें. ह्याच्या पुढें जाऊन जे व्याकरण पढत, आणि रघुवंशाच्या द्वारां संस्कृत वाङ्‌यांत प्रवेश करून पंचमहाकाव्यें आणि रामायण-महाभारतादि ग्रंथ ह्यांचा अभ्यास करीत, किंवा सार्थ वेदविद्या पढूं लागत, त्यांना शास्त्री ही पदवी लाभत असे. जे नुसतेंच वेदपठण करीत, त्यांना केवळ वैदिक ही पदवी मिळे. हा वैदिकांचा वर्ग समाजांत मोठा होता. कारण प्राचीन काळापासून अलिखित असे जे वेदग्रंथ, ते कंठगत करून, त्यांत अल्पांशानेंहि फरक पडूं न देण्याचें भारी जोखमीचें काम ह्या वर्गाकडे आलेलें असे. शास्त्री मंडळी पुराण सांगत किंवा धर्मग्रंथाचा निर्णय करीत, पण अशा शास्त्र्यांची संख्या समाजांत फार लहान असे. एरव्हीं सरसकट सुशिक्षित समाजाच्या ज्ञानाचा पल्ला आतां सांगितल्याप्रमाणें अगदीं बेताचा होता.

बाळू विलायतेला गेला

ह्याच काळांत इंग्रजी खेळांचा आपल्याला परिचय झाला. आणि क्रिकेटची आवड मुंबर्इंतून पुण्याला आली. पुण्यांतून हळू हळू हायस्कूलें असलेल्या जिल्ह्यांच्या मुख्य ठिकाणीं ती पसरली. पुण्यांतील विद्यार्थ्यांना तर क्रिकेटचें वेडच लागलें. इतका उमदा, बुद्धीनें खेळावयाचा, शरीरबलाची आणि युक्तीची आवश्यकता असलेला आणि मनाच्या संस्कृतीचा आविष्कार करणारा दुसरा मर्दानी खेळ नाहीं! हा हजारों लोकांना सहज दिसूं शकतो. ह्या खेळाचें वेड कॉलेजांतील आणि हायस्कुलांतील विद्यार्थ्यांना सारखेंच लागलें. मुंबईच्या पारशी समाजांतून व सारस्वत ब्राह्मण समाजांतून चांगले चांगले खेळाडू पुढें आले. कांगा, कपाडिया, पै अशीं कितीतरी नांवें तेव्हां सर्वांच्या परिचयाचीं झालेलीं होतीं. साहेब लोकांत तर हा खेळ अर्थातच चालूं होता. त्यांना कोणी तरी चेंडूफेक- बोलिंग- करणारीं मुलें हवी असत. जिमखान्यावर काम करणाऱ्या मुलांतून पी. बाळू ह्या चर्मकार मुलाकडे हें काम आलें; आणि नवलाची गोष्ट ही कीं, ह्या  चेंडूफेकीच्या कामांत बाळूनें एवढें अजब कौशल्य दाखविलें कीं, त्याची कीर्ति अखिल भारतांत व विलायतेंत झाली. बाळू, गणपत, शिवराम, विठ्ठल हे चौघेही भाऊ या खेळांत विलक्षण निष्णात बनले.

टिळक सुटले!

एकोणीसशें चौदा सालीं लोकमान्य टिळक मंडालेहून परत आले. मी सकाळीं शाळेंत चाललों होतों, तों एका गवळ्यानें मला आनंदानें सांगितलें कीं, टिळक महाराज पहांटे परत आले. पुण्यनगरीवर आणि साऱ्या देशावर आनंदाचा वर्षाव झाला. महाराष्ट्राचें भाग्य परत आलें; पराक्रम पुन्हां जागा झाला; तेजाला नवी दीप्ति प्राप्त झाली; बुद्धीला नवें स्फुरण मिळालें; आणि अखिल भारतांत राष्ट्रीय चळवळीचें पुरस्कर्ते लोकमान्यांकडे नव्या आशेने पाहूं लागले.

पुरुषसिंह

गायकवाडवाड्याकडे माणसांची रीघ लागली. अर्थात्‌ मीहि गेलो होतों. सध्यां वाड्याच्या अंगणांत उजव्या हाताला ज्या मोठाल्या इमारती दिसतात, त्या अलिकडे बांधलेल्या आहेत. पूर्वीं सारें मैदान मोकळेंच होतें. टिळक एका मंचकावर उघडेच बसलेले होते. सहस्रावधि लोक येऊन नमस्कार करून जात होते. शिक्षेच्या काळांत टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई निवर्तल्या होत्या आणि त्यांचे मुलगे लहानच होते. राजकारण कुचंबलेलें होतें; आणि नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनीं खांद्यावर घेतलेली केसरीची धुरा त्यांना खरोखर अवजड झालेली होती. त्यांची मान काचली होती, कारण इंग्रज सरकारचा छळ सारखा चालू होता. ‘‘हें कां लिहिलेंत? तें कां लिहिलेंत?’’ अशा धमक्या सारख्या येत असत आणि कचेरींत बोलावून नेऊन अधिकारी जबाब विचारीत असत. केळकरांचे जोडे पुसण्याची ज्या इंग्रज अधिकाऱ्यांची किंमत नव्हती, ते त्यांना धमकावीत असत; असा हा मधला काळ गेला आणि आतां टिळक परत आल्यावर पुन्हां राष्ट्रीय चळवळ सुरू होईल, अशा धाकानें इंग्रजांनीं ह्या महापुरुषाच्या जीवितावर जणूं कांही बहिष्कार घातला. गायकवाडवाड्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांनीं आपलीं नाकीं बसविलीं होतीं. टिळकांकडे कोण कोण येतात, त्यांत शाळेचे अधिकारी कोण, सरकारी नोकर कोण, इतर ठळक लोक कोण, ह्याच्या याद्या सरकारांत रवाना होऊं लागल्या. पण ह्या क्वारंटाइनला न भितां लोकांच्या झुंडींच्या झुंडीं गायकवाडवाड्यांत येऊन जात होत्या. प्रांतोप्रांतीचे पुढारीही आले; आणि त्यांना चक्क दिसून आलें कीं, टिळकांचा धीर बिलकुल खचलेला नाहीं. खरोखर, पुरुषव्याघ्र, पुरुषसिंह अशांसारख्या ज्या पराक्रमवाचक शब्दसंहति आपण वाचतों, त्या ह्या महापुरुषाला यथार्थपणें शोभत होत्या. तात्या होते म्हणून तात्या होते म्हणून, म्हणजे केळकर होते म्हणून, परत आल्यावर आपल्याला उभे राहायला तरी जागा शिल्लक राहिली, असे त्यांच्यासंबंधींचे गौरवाचे उद्‌गार टिळकांनीं सर्वांदेखत काढले आणि मग ते राजकारणाच्या विचाराला लागले. काँग्रेस सोडतां कामा नये, आणि राजकीय हालचाल तर चालूं केली पाहिजे, हें ओळखून टिळकांनीं एक तडजोडीचें पत्रक काढलें. शिवरामपंत इत्यादि त्यांच्या जहाल अनुयायांना तें बिलकुल आवडलें नाहीं. त्यांना वाटलें टिळक मवाळ झाले. टिळकांनीं स्वच्छ सांगितलें कीं, ‘सहा वर्षांत तुम्ही कांहीहि केलेलें नाहीं; मला पहिल्यापासून पुन्हां आरंभ करावयास हवा.’ ह्या शेऱ्यांत सर्व कांहीं आलें! इतक्यांत पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली; आणि इंग्रज सरकारनें आपलें धोरण अचानक बदललें.

अटींवर सहकार्य

पहिल्यानें टिळकांना जितकें आपलेसें करून घेतां येईल, तितकें करून घेण्याचा औरस चौरस यत्न सरकारनें चालू केला; आणि टिळकांच्या वरची बंदी उठवली. टिळकांनींहि ओळखलें कीं, बदलत्या काळाचा फायदा घेतलाच पाहिजे. बाहेरून अवयव तोडून टाकणें हें जसें अवश्य असतें. तसें पोटांत शिरून पोट फाडून बाहेर पडणें हेंहि एक शत्रुनाशाचें साधन ठरतें. हें ह्या पुरुषाला चांगले माहीत झालेलें होतें. हिंमत आणि हिकमत या दोन्ही टिळकांच्या दासी होत्या. टिळकांनीं इंग्रजांना सहकार्य देऊं केलें. पण हें घ्यावें कीं नाहीं आणि किती घ्यावें असा धाक मात्र इंग्रज सरकारच्या पोटांत उत्पन्न झाला! तमाम लोकांनीं लष्करांत दाखल व्हावें आणि ‘मराठा तितुका मिळवावा’ अशा जाहिराती इंग्रजांनीं भिंतीभिंतींवर लाविल्या. पण टिळकांनीं सहकार्याची अट ही घातली कीं, आम्हीं केवळ शिपुरड्याच्या नोकरीवर संतुष्ट नाहीं. आम्हांला तुमच्या बरोबरीनें वागवा. मग तुम्हीं म्हणाल तितके शिपाई मी महाराष्ट्रांतून पुरवितों. असें राजकीय धोरण जरी टिळकांनी घोषित केलें, तरी खांद्यावर बंदुका टाका अशी ललकारी ‘केसरी’ने केलीच, कारण कधीं नव्हत लष्करचें शिक्षण आणि रणमैदानाची हवा महाराष्ट्रांतील लोकांना पहावयास मिळणार होती. टिळकांचें सहकार्य अंगाचे वाभाडे काढील, हे लॉर्ड वेलिंग्डन जाणून होते; आणि जेव्हां सर्व पक्षांच्या सहकारांची अपेक्षा बाळगून त्यांनीं एक परिषद भरविली, तेव्हां टिळकांनीं आपलें सहकार्य काहीं शर्तींवर आहे, असें स्पष्ट करूं लागतांच वेलिंग्डननीं त्यांच्या भाषणाला प्रतिबंध केला. केळकरांच्या भाषणालाहि तसाच प्रतिबंध झाला; आणि आम्ही सहकार्य करावयास तयार असतांना त्याचा स्वीकार करण्याला इंग्रज सरकार तयार नाहीं, असें देशभर सांगावयास टिळक मोकळे झाले.

गीतारहस्य

मंडालेच्या तुरुंगांत टिळकांनीं आपला सुप्रसिद्ध ग्रंथ गीतारहस्य हा लिहिला; आणि तुरुंगांतून सुटल्यावर सरकारनें जेव्हां ह्या ग्रंथाचें हस्तलिखित परत केलें, तेव्हां गीतारहस्य प्रसिद्ध झालें. मला वाटतें त्याच्या आधीं गायकवाडवाड्यांत गीतारहस्यावर टिळकांचीं दोन भाषणें झालीं. पैकीं एकाचें स्मरण मला चांगलें आहे. भाषण ऐकतांना मला वाटलें कीं, ह्या ब्राह्मणाच्या वृत्तीवर आणि हिंमतीवर सहा  वर्षांच्या एकांतवासाचा कसलाहि परिणाम झालेला नाहीं. दीड तासपर्यंत काड्‌ काड्‌ वक्तृत्व करून टिळकांनीं प्रतिपक्षाची जालीम हजेरी घेतली. जे शंकराचार्यांनाहि गुंडाळून ठेवावयास तयार झाले, ते भानू इत्यादि नवशिक्षितांना आणि शास्त्री मंडळींना कितीसें मोजून बोलणार! मग वादाची धुमश्चक्री सुरू झाली. प्रथम प्रथम वाईचें काशीनाथशास्त्री लेले हे टिळकांना अनुकूल होते. पण पुढें त्यांनीं आपली भूमिका बदलली; आणि महाराष्ट्रांतील बहुतेक शास्त्री मंडळी टिळकांच्यावर जवळ जवळ तुटूनच पडलीं. नवशिक्षितांनीं मात्र ह्या ग्रंथाचें स्वागत बाहू उभारून केलें. ज्ञानेश्वरीनंतर कोणत्याहि ग्रंथाला समाजातून एवढी मान्यता आजपर्यंत मिळाली असेल, असें वाटत नाहीं. ओरायन, आर्क्टिक हो इन्‌ दि वेदाज्‌ ह्या त्यांच्या ग्रंथांनीं त्यांचें नांव पाश्चात्त्य पंडितांत सुपरिचित झालेलें होतें. त्या ग्रंथांची महति महाराष्ट्रांतील सरसकट जनतेला बहुधा कळली नव्हती; गीतारहस्य तरी किती सहस्रांनीं वाचलें, कितींना खरोखरी कळलें, आणि कितींनी केवळ त्याची पूजा केली, ह्याचा अंदाज मला करवत नाहीं. पण टिळकांच्या विद्वत्तेची कीर्ति भरतखंडांत एकदम फैलावली; आणि भारतांतील एकही सुप्रतिष्ठित भाषा अशी नसेल कीं, जिच्यांत ह्या ग्रंथाचें भाषांतर झालें नाही. पुढें इंग्रजींतहि झालें. आणि कांहीं कांहीं भाषांतरांच्या आजपर्यंत कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. मला तेव्हां हा ग्रंथ नीट कळला नाहीं; कांहीं प्रकरणें चांगलीं कळलीं. पण विषयाचा मूळ गाभा ध्यानांत आला नाहीं. कोणाचा उद्धार? अशींच विद्यार्थ्यांचीं पथकें बरोबर घेऊन पुणें शहरांतील अस्पृश्य वस्त्या पहात मी हिंडूं लागलों. मीं विद्यार्थ्यांना सांगितलें, ‘‘तुम्हीं सुकुमार विचाराच्या सुंदर कविता पुस्तकांत वाचतां आणि मी तुम्हांला समजावूनहि सांगतों. पण तुम्हांला जिवंत आणि चालतें-बोलतें काव्य जर कोठें प्रत्यक्ष पहावयास हवें असेल, तर माझ्याबरोबर अस्पृश्य वस्त्या-वस्त्यांत चला. हाल, विपत्ति, दैन्य आणि निराशा ह्यांचें मूर्तिमंत अवतार तुम्हांला तेथें पहावयास सांपडतील.’’ अशा प्रोत्साहनानें मीं अनेक विद्यार्थ्यांना पुण्यांतील अनेक अस्पृश्य वस्त्यादाखविल्या. आणि हा प्रकार चालू असतांना विद्यार्थ्यांच्या मनावर जो काय संस्कार झाला असेल, तो असो; पण आपलें मात्र धार्मिक शिक्षण चालूं आहे असें मला वाटत होतें. कै. विठ्ठलराव शिंदे हे एकदां मला म्हणाले, ‘‘ह्या कामानें अस्पृश्यांचा उद्धार किती होईल हें आपल्याला सांगतां येत नाहीं. पण तें करीत राहिल्यानें आपला मात्र उद्धार होत असतो.’’ शिंदे ह्यांच्या उद्‌गारांचें मर्म मला खरोखरच पटूं लागलें.

कोणीं काय केलें?

टिळकांनीं राजकारणाचा डंका आपल्या कर्तृत्वाच्या बळावर विलायतेंतल्या लोकांनाहि ऐकूं जावा, असा वाजविला हें खरें; पण एवढ्यानें समाजाची खरी प्रगति झाली नसती. हरिभाऊंनीं कांदबऱ्या लिहून आगरकरांचें कडकडीत विचार समाजाच्या गळींच बांधले. स्त्रियांच्या बाबतींत होणारे अन्याय समाजाच्या चित्ताचीं कवाडें खोलखोलून त्यांनीं आंत घुसविले. राजवाडे, पारसनीस, शंकरराव देव (धुळें) ह्यांनीं शिवाजी आणि रामदास ह्यांच्या संबंधीचे अभिमान संशोधनानें जागृत करून वाङ्‌यमय, व्युत्पत्ति, चिकित्सा, ह्यांचे नवे पायंडे समाजाला घालून दिले. इतकेंच नव्हे तर इंग्रजांशीं भांडावयास आपण ऐतिहासिक भूमीचा आश्रय केला पाहिजे, हा चिपळूणकरांच्या पासून सुरू झालेला आणि रानडे ह्यांनीं आपल्या  'Rise of the Maratha Power’ ह्या ग्रंथानें न्याय्य ठरविलेला, समाजाचा ओढा राजवाडे ह्यांनीं आपल्या संशोधनानें यथार्थ आहे हें पटवून दिलें. किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर ह्यांनीं नाटकांचें मैदान खूप शर्थीनें संभाळलें होतें. आणि केशवसुतांनीं नव्या काव्याचा स्वच्छ निराळा प्रकाश महाराष्ट्रांत पाडलेला होता. विठ्ठलराव शिंदे ह्यांनी ‘निराश्रित सहाय्यकारी मंडळ’ काढून निकृष्ट समाजाच्या हीनदीन स्थितीकडे समाजाचें लक्ष वेधविलें होतें. आणि ह्या सर्वांविषयीं मी आतांपर्यंत थोडें थोडें लिहिलेलेंहि आहे. पण एका गृहस्थाच्या अस्सल महाराष्ट्रीय कामगिरीसंबंधानें उदासीनता दाखविण्याची किंवा तिच्यासंबंधानें अवहेलनापूर्वक बोलण्याची एक प्रथा तरुण वर्गांत पडलेली आहे. तिचा बिमोड मला ह्या ठिकाणीं केला पाहिजे.  

उपेक्षा झाली नाही!

या काळांतील आणखी कांहीं व्यक्तींचा व घटनांचा उल्लेख केल्यानेंच आपल्या कामाला पूर्तता येणार आहे. डॉ. केतकर या विख्यात विद्वानाच्या कोशयुगाचा आरंभ याच कालांत झाला. लोकमान्य टिळकांना त्यांनीं आपल्या ज्ञानकोशाची कल्पना सांगितली; तेव्हां ते म्हणाले कीं, ‘एवढीं कामें राजाश्रयावांचून होणार नाहींत.’ परंतु राजकारणाच्या बाबतींत ज्याप्रमाणें लोकमान्यांचा महाराष्ट्रांतील जनतेवर गाढ विश्वास होता, तसा केतकरांचा विद्येच्या बाबतींत महाराष्ट्रीय सुशिक्षित वर्गावर होता; आणि तो यथायोग्य होता, हें परिणामावरून दिसून आलें. केतकरांनीं महाराष्ट्रांतील सुशिक्षित वर्गाचेंच आवाहन केलें; आणि नवलाची गोष्ट ही कीं, या वर्गानें त्यांच्या प्रचंड प्रयत्नाला यश मिळवून दिलें. महाराष्ट्रांतील जनतेनें केतकरांची उपेक्षा केली, असा एक प्रवाद कोठें कोठें ऐकूं येतो. पण तो साफ साफ चुकीचा आहे. ज्ञानकोश-रचना हें जें केतकरांचें मुख्य काम, त्यांत महाराष्ट्रानें त्यांची कसलीहि उपेक्षा केली नाहीं. केतकर ज्या ज्या कल्पना काढतील, आणि जे जे मांड मांडतील, त्या सर्वांत त्यांना महाराष्ट्रानें पैशाचें साहाय्य करावयास हवें होतें, अशी अपेक्षा बाळगणें चुकीचें होतें. खुद्द केतकरांनीं अशी तक्रार केल्याचें मला आठवत नाहीं, उलट महाराष्ट्रांतील सुशिक्षित वर्गानें आपल्याला कसकसें साहाय्य केलें. याची जी नोंद त्यांनीं करून ठेवली आहे, तीवरून पाहतां, केतकरांनीं सुरू केलेलें नवें कोशयुग त्यांचे दोन पट्टशिष्य श्री.यशवंतराव दाते व श्री.चिंतामणराव कर्वे यांनीं मोठ्या हिंमतीनें चालूं ठेवलें आहे.

मी कामाला कां लागलों

अर्थात्‌ सर्व जनता जर राजकारणाच्या मागें जोरानें लागली आहे, तर या अस्पृष्टांच्या प्रश्नांकडे कोणीतरी लक्ष पुरविलें पाहिजे, असें वाटणें स्वाभाविक होतें. त्यांतहि राजकीय पुढारी टिळकसुद्धां ‘‘अस्पृश्यांचा प्रश्न सुटलाच पाहिजे; परमेश्वराला जर अस्पृश्यांचा विटाळ होत असेल, तर तो परमेश्वरच नव्हे असें मी म्हणेन’’ अशी निकराचीं वचनें बोलत असल्यानें, त्यांना राजकारणाची ओढ असली, तरी हा प्रश्न निकालांत निघावयास हवा, अशी त्यांची इच्छा खास आहें, असें मनावर वरचेंवर ठसत असे. शेवटीं हा प्रश्न जर सुटावयास हवा, व देशांतील मोठे लोक हे जर दुसरीकडे व्यापृत आहेत, तर आपल्याला कांहीं जमतें कां पहावें, या इच्छेनें मी या अस्पृश्यता- निवारणाच्या कामाकडे वळलों.

पतितपावनाचें मंदिर

अस्पृश्यांचा प्रश्न सध्यां मला जितक्या विविध तऱ्हांनी कळतो असें वाटतें, तितका 1917 सालीं कळत नव्हता. अगदीं प्रथम देवालय प्रवेशाची बाब माझ्या मनांत उत्पन्न झाली. आपण जर त्यांना हिंदु म्हणतों, तर आपल्या देवाचें दर्शन त्यांना कां घेऊं देऊं नये, ही या प्रश्नाची अगदीं पहिली बोंच माझ्या मनाला लागली. रा.हरिभाऊ फाटक हे याच्या आधींच कांही बारिक बारिक चळवळींच्या निमित्तानें माझ्या ओळखीचे झालेले होते; व पुष्कळ काम करण्याची आम्हां दोघांनाहि हौस असल्यामुळें, विचारांत बहुधा एकरूपता असल्यानें, व कसल्याही दगदगीच्या कामांत असतांना मनाला श्रमाचा विसर पाडणारी जी विनोदबुद्धि, ती थोडी फार दोघांतहि असल्यामुळें, हरिभाऊंचें व माझें चांगलें जमलें. त्यांनाहि ही देवळाची बाब माझ्यासारखींच पटली असल्यानें, पतितपावन मंदिर या नांवाचें एक विठ्ठलाचें देवालय बांधावें व तेथें सर्व हिंदूंना प्रवेश ठेवावा, असें आम्हीं ठरविलें.

सामाजिक मताची चांचपणी

जों जों खास समाजाच्या पोटांत शिरून आम्हीं खटपट करूं लागलों, तों तों समाजाचें खरें मत काय आहे हें आमच्या ध्यानांत उतरूं लागलें. बॅ. जयकर, श्रीनिवासराव कौजलगी, डॉ.के.के.जोशी या मंडळींनीं मदतीचें आश्वासन दिलें. परंतु बांधावयाच्या देवळांत स्पृश्य लोक किती येतील, याचा हिशेब आम्हीं मनांत बांधीत होतों. सरदार, जहागिरदार, नोकरवर्ग, सुशिक्षित लोक, शास्त्री पंडित, स्त्रिया, पुढारलेले, मागासलेले इत्यादि समाजाच्या सर्व थरांत आम्हीं भ्रंमती ठेवली; अशासाठीं कीं समाजाचें मनोगत बरोबर कळावें; व देवालय बांधलें, तर त्याची स्थिति काय होईल, हें नीट समजावें. यांत दोन प्रश्न होते. कदाचित्‌ पैसा जमविणें ही गोष्ट आम्हांस जड गेली असती, असें वाटत नाहीं. पण खरी गोष्ट म्हणजे ह्या देवाला देवपणा यावयास वैदिक मंत्रांनीं जी प्रतिष्ठापना व्हावयास हवी, ती मान्य व प्रतिष्ठित अशा वैदिकांकडून होईल काय, व देऊळ झाल्यावर अस्पृष्ट आपल्या संगतींत आले, तरी त्याचें कांहीं एक न मानतां स्पृश्य हिंदू त्या देवळांत येण्याचा राबता पाडतील काय? या दोन बाबी फार महत्त्वाच्या होत्या. पैकीं दुसऱ्या बाबीविषयीं आम्हीं कांहीं ठळक माणसांना पत्रें धाडून त्यांच्या मताची चांचणी केली; व खुद्द पुणें शहरांत पांचपन्नास प्रतिनिधिभूत अशा माणसांना भेटून, त्यांच्याशीं चर्चा करून त्यांचें मत अजमावलें. हें झाल्यावर समाजाच्या व आपल्या विचारांत जमीन-अस्मानाचा फरक आहे; व जर देऊळ बांधलें, तर तें महारांचें देऊळ होऊन बसेल, हें आमच्या मनांत चांगलें उतरलें.

देवालयाची कल्पना टाकली!

तेथें विष्णुबुवा वाटच पहात होते. उगाच कोलाहल नको म्हणून दार दपटलें, व उभयतांस विनविलें कीं, आपलें काय म्हणणें असेल, तें मला स्वच्छ सांगा. आपलें खाजगी मत मला नको. जें वर्तानपत्रांत आलें असतां आपणांस चालेल तें आपलें मत मला सांगा. विष्णुबुवा म्हणाले, ‘‘तुम्हीं म्हणतां तसें व्हावयास हवें, असें माझें मत आहे! पण मी आतां थकलों आहे; तुच्या म्हणण्याचा मीं पुरस्कार केला, तर आमच्या पंथात मीं फाटाफूट आरंभिलीं असें होईल! वयाच्या मानानें मला तें उचलावयाचें नाहीं.’’ रा.गिंडी म्हणाले, ‘‘माझें स्वच्छ मत असें आहें कीं तुम्हीं करीत आहां हा अधर्म आहे; पण त्यांतूनहि इतकेंच सांगतों कीं तुम्हीं देवालय बांधलेंच, तर तुच्या मार्गांत मी  आडवा पडणार नाहीं.’’ हें बोलणें ऐकून मला खरोखरच अतिशय वाईट वाटलें. पुण्यास जावयाच्या आधीं भक्तिमार्गांतील ह्या अधिकारी माणसांचें अनुकूल, प्रतिकूल, कसें कां होईना पण निकालाचें मत मला घ्यावयाचें होतें तें घेतलें. पण तें ऐकत असतांना देवालय बांधण्याची आमची कल्पना व्यवहार्य नाहीं, या गोष्टीची दुःखप्रद जाणीव मला झाली. सामान्य जनता विरुद्ध; वैदिक व शास्त्री-पंडित हे विरुद्ध व बहुजन समाजाचा धर्म जो वारकरी संप्रदाय त्याचे पुढारी विरुद्ध, असें असतांना कांहीं तरी जमवाजमव करून देऊळ बांधावयाचें, म्हणजे शेवटीं तें ‘महाराचा विठोबा’ या नांवानेंच ओळखलें जावयाचें, असें खास वाटूं लागून हरिभाऊंनीं व मीं देवालय बांधण्याची कल्पना तहकूब केली.

छळ झाला नाहीं!

कांहीं मुलखानिराळें करूं लागलेल्या माणसाचा समाज छळ करतो, असें आपण नेहमी ऐकतों. मीं करीत असलेलें काम मुलखानिराळें होतेंच होतें; आणि मी तें स्पृश्य समाजाच्या आणि त्यांतहि ब्राह्मण समाजाच्या वस्तींत राहून करीत होतों. पण मला हें आनंदानें सांगावेसें वाटतें कीं, ज्याला ‘छळ’ हें नांव शोभेल, असा कोणचाहि प्रकार समाजानें माझ्या बाबतींत केला नाही. माझी थोडी गैरसोय होत असे, माझ्या पश्चात्‌ चांगली सुशिक्षितांचीं टावकीं सुद्धां माझी कुचाळकीं करीत असत, कडवे सनातनी केव्हां केव्हां माझ्या तोंडावर किंवा पश्चात्‌ माझ्यासंबंधानें अभद्र शब्द उच्चारीत, ‘एक वायां गेलेला माणूस’ असें कांहीं कांहीं राजकारणांतले पण सनातनी वृत्तीचे पुढारी माझें वर्णन करीत असत. हव्यकव्याच्या बाबतींत माझी थोडीशी गैरसोयहि झाली; आणि बिऱ्हाड बदलणें तर जड जाईल असें मला दिसूं लागलें. पण या सर्वांचा बाऊ करणें हें अगदीं अप्रशस्त होय. आपल्यांतच राहून आपल्याला सर्वथा नको असलेली गोष्ट करणाऱ्या माणसासंबंधानें एवढी आपल्या रागाची वाच्यता कोणताहि समाज करणारच. मी समाजाच्या पोटांत आणि वस्तींत राहिलोंच नसतों, तर समाजाला माझें कसलेंच सोयरसुतक नव्हतें. पण आमचा बाणा असा होता कीं, ऐन हिंदु समाजाच्या पोटांतूनच हा अस्पृश्यांचा प्रश्न सुटावयास हवा; आणि म्हणून त्यासाठीं थोडीशी किंमत देणें प्राप्तच होतें.

 दृष्टि सामाजिक बनली!

मात्र, माझ्या मनाला अजूनहि असा एक आनंद वाटतो कीं, आपल्या हयातींतील ऐन कर्तृत्वाच्या वर्षांपैकीं वीस वर्षें आपल्या आपद्‌ग्रस्त बांधवांचें थोडें तरी बरें व्हावें, म्हणून आपण शरीर कष्टविलें, वाणी व लेखणी शिणविली, आणि शिक्षकाच्या धंद्याला न झेपेसा स्वार्थत्यागहि केला. मला केवळ हें समाधानच लाभलें आहे, असें नव्हे, तर या समाजांत फार जवळून राबत राहिल्यानें एखाद्या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीनें पाहणें म्हणजे काय, याचें मला बरें ज्ञान झालें; दृष्टि कांहींशीं सामाजिक बनली; आणि याचा उपयोग वाङ्‌मयाच्या अभ्यासांत व कॉलेजांतील व सार्वजनिक क्षेत्रांतील व्याख्यानांत मला फार होऊं लागला. त्या वेळीं लहान असलेले व पुढें शाळा-कॉलेजांत माझे विद्यार्थी झालेले अनेक अस्पृष्ट विद्यार्थी मात्र प्रौढपणीं या माझ्या सेवेची किंमत बरोबर ओळखूं लागले; आणि त्यांच्यासाठीं मीं जें वाङ्‌यमय लिहिलें आहे, व लिहीत आहें, तें वाचून तर अजूनहि, त्यांतलें कित्येक आपली कृतज्ञता व्यक्त करतात. आंतरिक समाधानाच्या जोडीला हेहि दोन मोठे लाभ मला झाले. असो. हें काम सोडल्यानंतर मात्र मी तिकडे पुन्हां वळलों नाही. प्रसंगविशेषीं जुन्या वगीच्या माणसांनीं आणि विद्यार्थ्यांनीं आग्रहच धरला, तर डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीच्या सभांसारख्या प्रसंगीं मी एखादे वेळीं जातों. पण तसे अनेक लोक जातात. या पलिकडे गेल्या वीस वर्षांत माझा या कामाशीं कसलाहि संबंध उरलेला नाही.

मुळशीचें धरण

टाटा कंपनीनें मुळशीच्या धरणाची योजना आंखली; आणि शेंकडों शेतकऱ्यांच्या जमिनी त्या धरणाखालीं जाऊं लागल्या. या शेतकऱ्यांचा पक्ष आपण घेतला पाहिजे, आणि धरणयोजना हाणून पाडली पाहिजे; व हें काम सत्याग्रहाच्या बळावर आपण करूंच करूं, अशी ईर्षा तरुण लोकांच्या ठिकाणीं निर्माण झाली. इंग्रजांच्या राज्याला जेणें करून हाय पोंचेल, तें कोणचेंहि प्रकरण आपल्या राजकीय चळवळींत सरपणासारखें उपयोगांत आणलें पाहिजे, असें टिळकांच्या पक्षांतील शिवरामपंत परांजपे इत्यादिकांचें मत झालें. सत्याग्रहाच्या कल्पनेंनें भारलेले तरुण लोक शेतकऱ्यांचें बरें करण्यासाठीं तत्पर झाले होते; आणि परांजपे इत्यादिकांच्यासारखीं मंडळी क्रांतीच्या वाटचालींतील ही एक पायरी ठरेल, या कल्पनेनें या प्रकरणाकडे पाहूं लागलीं व या प्रकरणापासूनच टिळकांच्या पक्षांत फूट पडत चालली. हें मुळशीचें प्रकरण हातघाईवर आलें. केळकर यांच्या म्हणण्याचा रोख असा कीं, ऐन स्वराज्यांतसुद्धां तुम्हाला धरणें बांधावींच लागतील; आणि लोकांच्या जमिनी त्यांत जातीलच. नुकसानीबद्दल भरपाई केली, किंवा दुसऱ्या जमिनी दिल्या म्हणजे धरणें बांधावयास हरकत असूं नये. पण हें मत सत्याग्रहाचे नवे अभिमानी मान्य करीनात. खुद्द केसरी कचेरींतसुद्धां फाटाफूट झाली; आणि मुळशीचें धरण ही एक मोठी जंगी चळवळ महाराष्ट्रांत चालूं झाली. ‘‘सत्याग्रहाचें नवें शस्त्र जीव देऊनसुद्धां वापरण्याला आपण तयार आहों-’’ हें तरुण लोकांनीं दाखवून दिलें; आणि खडक फोडणाऱ्या पठाणांच्या पहारा समोर दिसत असूनसुद्धां त्यांनीं आपलीं अंगें, ‘‘घाला पहारी, घाला पहारी’’ असें म्हणून पुढें फेकलीं. येथें स्वार्थत्यागाची कमाल झाली. शिवरामपंत परांजपे, डॉ. फाटक, पुढें सेनापतिपद पावलेले बापट, बाळूकाका कानिटकर, शंकररराव देव, विनायकराव भुस्कुटे, वासुकाका जोशी- एक ना दोन किती नांवें सांगावीं? सध्यां काँग्रेसच्या पक्षांत महाराष्ट्रांत नांवारूपाला आलेले जे वयस्कर लोक दिसत आहेत, त्यांतील किती तरी लोक या धरणाच्या चळवळींत उदयाला आले. हे सारे तरुण लोक म. गांधींचे अनुयायी होते.    

Tags: धार्मिक सामाजिक स्वराज्य महात्मा फुले ब्राह्मण मराठा इंग्रज स्वातंत्र्य आगरकर न्या. रानडे गोखले मुळशी धरण सत्यागृह मंडाले गीतारहस्य लोकमान्य टिळक महात्मा गांधी चित्रपट मी व मला दिसलेले जग श्री.म. माटे newspaper kesari Marathi mandale Maratha brhaman indipendance ranade aagarkar india british gitarahastya lokmanya tilak mahatma Gandhi movie mi v mala dislele jag shri.m. mate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्री. म. माटे

(1886 - 1957) लेखक, संपादक, समाजसुधारक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके