डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्तमरावांच्या अध्यक्षीय भाषणाच्या निमित्ताने...

बोलत राहू या; काही करत राहू या.... असा संदेश उत्तमरावांनी जाताजाता दिला आहे. हे मात्र खूप व्यवहारी वाटलं. दुसरं काय करू शकतो आपण? संमेलनानंतरही उत्तम कांबळे आपल्याशी नियतकालिकांतून, व्यासपीठावरून बोलणारच आहेत. आजच्या भयावह वातावरणात निर्भयपणे कसं बोलायचं आणि नेमकं काय करायचं याबद्दल त्या वेळी ते मार्गदर्शन करतील अशी आशा बाळगू या. उत्तमराव, हाताची घडी घालून, तोंडाला पट्टी बांधून जे काही घडतं आहे ते मुकाट बघत राहणारी एखादी ब्रिगेड उभारायची काय? बोला, आम्ही सारे लहानथोर लेखक लोक शेपूट पायात घालून आपल्यामागे चूपचाप उभे राहू; हे छान जमतं आम्हांला.   

दर वर्षी नित्यनियमानं पाऊस यावा तसं शहरात मराठी साहित्य संमेलन येतं. पावसाळा सुरू झाला की नाले सफाई, रस्त्यातले खड्डे याबद्दलच्या रूटीन तक्रारी सुरू होतात. तसं संमेलन आलं की रूटीन वाद सुरू होतात; ते चव्हाट्यावर आणणारी पत्रं वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागतात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून वादाला प्रारंभ होतो. संमेलनाचं अध्यक्षपद आणि त्यासाठी होणारी निवडणूक यासंबंधीचे इतके फार्स होऊनही आमचे साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष व्हायला इतकं का धडपडतात हे एक कोडंच आहे.

चांगली साहित्यकृती निर्माण करण्यापेक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभणं हा अनेक साहित्यिकांना आपला ‘जीवनगौरव’ वाटतो हे मात्र खरं आहे. मग त्यासाठी आटापिटा सुरू होतो. तीन-चार जण अध्यक्षपदाच्या निवडणूक आखाड्यात असतात. या अध्यक्षेच्छु मंडळींतला जो तो आपणच या पदाला लायक कसे आहोत हे हात उंचावून सांगत असतो. आपण श्रेष्ठ आहोत हे ठरवण्यासाठी दुसरे कसे कनिष्ठ आहेत हे सांगणं क्रमप्राप्तच असतं. तेही खुबीनं केलं जातं. विशिष्ट समाजाचं लांगूनचालन केलं जातं. विरुद्ध गटाच्या मंडळींनाही सांभाळून घ्यावं लागतं.

एकूण संमेलन काळात साहित्यिकांविषयीच्या आदरभावनेला तडा जावा असं बरंच काही घडत असतं. साहित्यिकांची आणि पत्रकारांची दुसरी एक फळी संमेलनातल्या या खेळांना हसत, त्याची टिंगलटवाळी करीत बाहेर उभी असते. तसा संमेलन या प्रकाराला त्यांचा विरोध नसतो. नंतर संमेलनाच्या मांडवात व्यासपीठावर परिसंवादाला, काव्यमैफिलीला त्यांच्यापैकी बरेच हजेरी लावतात.

तर मराठी साहित्य संमेलन हा असा एकूण करमणुकीचा, विनोदी लेखक, व्यंगचित्रकारांच्या आवडीचा विषय बनून गेला आहे आणि थोडं आणखी स्पष्ट बोलायचं तर अध्यक्षांची तथाकथित प्रबोधनात्मक भाषणंदेखील आता फार्सिकल बनत चालली आहेत. संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण कसं असावं, त्यात काय असावं, काय नसावं याचे आता ठोकताळे ठरून गेले आहेत. ‘मजेत कसे जगावे’ या पुस्तकाच्या धर्तीवर मराठी साहित्य संमेलनासाठीचं अध्यक्षीय भाषण कसं लिहावं याचं तांत्रिक शिक्षण देणाऱ्या पुस्तिकाही काढता येतील.

यंदाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांचं पूर्वायुष्य आणि पत्रकारीय अनुभव पाहता त्यांच्याविषयी वेगळ्या अपेक्षा होत्या. ते अध्यक्षांच्या आजवरच्या वाचाळपणाला छेद देतील; व्यासपीठावरून अपारंपरिक भाषण करतील असं वाटलं होतं, पण उत्तमरावांनी घोर निराशा केली.

सुरुवातीच्या काळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात वाङ्‌मयीन आढावा घेतला जायचा; मराठी वाङ्‌यमयात आजवर काय घडलं; सद्य:स्थितीला काय घडतं आहे यावर स्वत:ची निरीक्षणं सादर केली जायची; प्रचलित वाङ्‌मयीन वादावर टीकाटिप्पणी व्हायची. आणीबाणीनंतर अध्यक्षीय भाषणात सामाजिक बांधिलकीचा राग आळवला जाऊ लागला. सत्तरीच्या सुमारास दलित वाङ्‌यमयाने मराठी साहित्यविश्वात चांगलीच खळबळ माजवली. खाजगीत कितीही कुत्सित बोललं तरी अध्यक्षीय व्यासपीठावरून दलित वाङ्‌यमयाबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलणं हा रिवाज बनून गेला. हळूहळू संमेलनात अध्यक्षपदावरून काय बोलायचं याचा फॉर्म्युला बनत गेला. आज या फॉर्म्युल्याला परिपूर्ण कारागिरीचं रूप आलं आहे.

मराठी भाषेच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका, बहुजनांची भाषा, अभिजनांची भाषा, प्रमाणभाषा, मराठीच्या विविध बोली यांच्यामधला संघर्ष, वर्षानुवर्षे भिजत पडलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, मराठी ग्रंथालयांच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, टीव्हीच्या आक्रमणामुळे वाचनसंस्कृतीला लागलेली ओहोटी, शैक्षणिक पातळीवरील मराठी भाषेची दुरवस्था, महाराष्ट्राच्या बाहेरील प्रांतात मराठी टिकवून धरण्याच्या कामातील अडथळे, प्रसारमाध्यमांतील मराठीचा सदोष वापर, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मराठी भाषेपुढं उभं राहिलेलं संकट, भाषासंवर्धन कामात शासन दाखवत असलेली बेपर्वाई असे काही ठरीव मुद्दे आहेत; प्रत्येक मुद्‌द्यावर आवंढा गिळून आठ-दहा वाक्यं बोलली की झालं अध्यक्षीय भाषण तयार. यातला एखादा मुद्दा अनवधानानं उल्लेखायचा राहून गेला तरी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात हेडलाईन तयार... अध्यक्ष भाषणात अमुक प्रश्नाला स्पर्श करायला विसरले; किंवा अमुक मुद्‌द्याला अध्यक्षांची बगल.

गेल्या दोनेक वर्षांत या अध्यक्षीय भेळपुरीत आणखी दोन-तीन जिन्नस येऊन दाखल झाले आहेत. शासकीय प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या ग्रामीण संस्कृतीचा प्रश्न आणि मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवण्याच्या पालकांच्या वृत्तीमुळे मराठी शाळांच्या अस्तित्वाला आणि मराठी भाषेच्या एकूण भवितव्याला निर्माण झालेला धोका. हा सर्व मराठी भाषिकांच्या भल्याबुऱ्याशी निगडित असलेला सांस्कृतिक माहोल आहे, यात शंका नाही. त्याची नीटपणे दखल घेण्याचं चातुर्य दाखवलं की अध्यक्षांना सामाजिक पर्यावरणाविषयी आस्था आहे हे सिद्ध होऊन जातं.

एखाद्या कर्मकांडाप्रमाणे प्रत्येक अध्यक्षाच्या भाषणात या सर्व प्रश्नांचे उल्लेख येत राहतात; त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली जाते; पण त्यातला एकही प्रश्न सुटत नाही. तो सोडवण्याच्या दिशेनं तसूभरही पाऊल पुढं पडत नाही हा यातला खरा अस्वस्थ करणारा भाग आहे. हे प्रश्न वर्षानुवर्षे अधिक बिकट आणि न सुटणारे प्रश्न बनत चालले आहेत याची दखल कोणी घेताना दिसत नाही. प्रत्येक अध्यक्षाकडून न चुकता काळजी घेतली जाते ती त्या प्रश्नांचा रीतसर उच्चार करण्याची. कादंबरीच्या आशयापेक्षा तिच्या शीर्षकावर बोलत राहावं आणि कादंबरीची योग्य दखल घेतल्याचा आव आणावा असं गेली दोन-तीन दशकं चालू आहे. प्रत्येक नवा अध्यक्ष आपण नव्यानेच हा प्रश्न मांडतो आहोत अशा थाटात उत्साहाने त्यावर बोलत असतो, ही गंमत काही और आहे. ठरीव मुद्‌द्यांच्या पुनरावृत्तीनं आपल्या विवेचनाला हास्यास्पद रूप प्राप्त होत आहे हे कोणाच्या गावी नसतं.

उत्तम कांबळे तुलनेनं तरुण अध्यक्ष. ते या फार्सध्ये सामील होणार नाहीत; शैली आणि आशय यांबाबत काहीतरी वेगळे प्रयोग सादर करतील; निदान जुन्यांची री ओढत राहणार नाहीत असं उगाचंच वाटत होतं. नियमानं संमेलनाला हजेरी लावणाऱ्या माझ्या कविमित्राने  संमेलनाला जाण्यापूर्वी अध्यक्ष भाषणात काय बोलतील हे मला कागदावर लिहून दिलं होतं, त्याचं भाकीत खरं ठरलं. काही अपवादात्मक भाग वगळता उत्तमराव तेच आणि तसंच बोलले.

राम जगताप या माझ्या पत्रकार मित्रानं ‘साधना’ आणि ‘सकाळ’ नियतकालिकांत आलेल्या उत्तमरावांच्या संमेलनपूर्व मुलाखतीवर गमतीदार भाष्य केलं आहे. तो म्हणतो.... ‘साधना’तील मुलाखत पूर्वायुष्याबद्दल असल्यानं ती उत्तम आहे, आणि ‘सकाळ’मधली मुलाखत आजच्या प्रश्नांबद्दल असल्यानं ती वाचवतसुद्धा नाही इतकी निरस आणि अपेक्षाभंग करणारी आहे. जगतापनं असं का म्हणावं? आजच्या प्रश्नावर बोलणं हे निरस कसं?

याचं कारण स्पष्ट आहे. एकतर आजचे प्रश्न हे मुळात आजचे नाहीत तर कालचे-परवाचे आहेत. त्यावर काल जे बोललं गेलं तेच आज बोललं जाणार असेल तर ते ऐकण्यात कोणाला काय स्वारस्य असणार? सगळेच संमेलनाध्यक्ष भाषणात आपल्यासमोरील पारंपरिक मुद्‌द्यांचे उल्लेख पारंपरिक पोटतिडिकीनं करतात. त्यात प्रश्न सोडवण्याच्या कळकळीपेक्षा कर्तव्यभावनेचा भाग अधिक जाणवतो. जे असतं त्यात भाष्यापेक्षा दुरवस्थेचं वर्णन असतं. नियमानं वर्तमानपत्र वाचणाऱ्यांना वर्तमानपत्रातल्या बातम्या व्यासपीठावरून वाचून दाखवण्यात काय अर्थ आहे? देशात भ्रष्टाचारानं थैमान घातलं आहे. वेळीच याला आळा घातला नाही तर देश रसातळाला जाईल असं आपण लग्न-समारंभात बुफेचा आस्वाद घेताना एकमेकांना सांगत असतो; तसाच हा प्रकार झाला.

उदाहरणादाखल नव्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश पाहू...

जागतिकीकरण अणि त्याचे समाजावर होऊ घातलेले तथाकथित भयावह परिणाम हा सर्व वक्त्यांचा लाडका विषय आहे. उत्तम कांबळे म्हणतात, ‘जागतिकीकरणाला आपला विरोध म्हणजे यंत्राला किंवा आधुनिकतेला विरोध नाही. नवे गुलाम जन्माला घालायला आणि यंत्राच्या मदतीनं नवा वसाहतवाद तयार करण्याला आपला विरोध असायला हवा.’ वरकरणी हे ठीक आहे, पण जागतिकीकरण ही संकल्पना उच्चारली जाण्याआधी समाजात गुलाम जन्माला येतच होते. आय.टी. असू द्या नाहीतर अणुसंशोधन संस्था, आजतागायत संपूर्ण समाजाची रचना मालक आणि गुलाम अशीच राहिलेली आहे. ज्या संस्थेत उत्तमराव काम करतात तिथंही मालक आणि गुलाम ही रचना आहेच. मालकाच्या हुकूमाचं पालन करायचं हा संकेत सर्व क्षेत्रांत पूर्वापार चालत आलेला आहे. गुलामांना मानवतेनं वागवलं जातं आहे की नाही, त्यांना जगण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जातात की नाही याचीच आपण काळजी वाहू शकतो. आता हे गुलाम यंत्रानं, जागतिकीकरणानं बनवले काय किंवा सनातन व्यवस्थेनं बनवले काय, फरक काय पडतो? खोच अशी की या गुलामांतले काही आपल्या अक्कलहुशारीनं किंवा चापलुसीनं स्वत:च मालक बनून जातात; इतरांना गुलाम बनवून आपल्या पदरी ठेवतात आणि गुलामीची परंपरा चालू ठेवतात. उत्तम कांबळेंनी या तपशिलात शिरावं अशी अपेक्षा नाही. आपलं साहित्य हे सारं त्रयस्थपणे पाहत राहणार की हालचाल करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याचं उत्तर आहे, त्रयस्थपणे पाहत राहणार. साहित्यिक मंडळी आजवर हेच करीत आली आहेत. समाजचित्र साहित्यकृतीतून मांडतानाही त्यांच्याकडून तटस्थ लेखनाचीच अपेक्षा असते.

माणसाच्या जगण्याला जसं प्रयोजन असावं लागतं तसं साहित्यालाही एक प्रयोजन असावं लागतं असं कांबळे आग्रहपूर्वक सांगतात. जगात सर्वत्र अर्थार्जन हे एकमेव प्रयोजन घेऊन आज माणसं जगताहेत. साहित्य लेखनामागचं हेच प्रयोजन असू शकतं. खास करून आज ज्या साहित्य प्रकाराला मार्केट आहे ते साहित्य निर्माण करण्यामागे लेखकांची, प्रकाशकांची भूमिका हीच आहे हे स्पष्ट आहे. हे नैतिक की अनैतिक हा मुद्दा अलाहिदा. पण या साहित्य विश्वात विकाऊ साहित्याचं पीक उदंड आहे हे वास्तव दुर्लक्षिता कसं येईल?

कणा असलेलं साहित्य खूप प्रभावी ठरतं असं अध्यक्ष म्हणतात. पण आपल्या समाजात कणा असलेले साहित्यिक किती याचा आकडा ते देत नाहीत आणि अशा साहित्यिकांना आज साहित्याच्या दरबारी काय स्थान आहे हे सांगायचंही ते टाळतात. साहित्यिकांनी जागल्याची भूमिका करावी म्हणजे काय करावं हेही ते स्पष्टपणे सांगत नाहीत. फॅशन म्हणून व्यासपीठावरून अशी विधानं फेकली जातात की काय असं वाटत राहतं. साहित्यिकांचं ठाऊक नाही, पण ज्यांचा साहित्यविश्वाशी वाचक म्हणूनही काही संबंध नाही अशा काही दांडगट संघटना आज समाजात जागल्याची भूमिका बजावत आहेत. त्यांची दखल खरं तर संमेलनाध्यक्षांनी घ्यायला पाहिजे. पुतळे हटवणारे, पालिका आणि विधानसभागृहात हैदोस घालणारे, खुर्च्या टेबलांची नासधूस करणारे, बसगाड्या जाळणारे, पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी करून लेखन स्वातंत्र्यावर हल्ला करणारे हे सर्व जागले लोक आज अध्यक्षांच्या अवतीभोवती फिरताहेत. अशा वेळी अध्यक्ष दूरवर दुर्बिणी रोखून कोणतं समाजवास्तव न्याहाळताहेत?

वारकऱ्यांच्या दहशतवादामुळे दोन वर्षांपूर्वीचं साहित्य संमेलन अध्यक्षाविना पार पडलं. सेनेवर टीका आहे म्हणून ठाकरे घराण्यातल्या एका तरुणानं दादागिरी करून बी.ए.च्या अभ्यासक्रमातल्या एका साहित्यकृतीवर बंदी आणली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात अशा गंभीर घटनांवर टीकाटिप्पणी सोडा, पण त्यांचा साधा उल्लेखही नाही. कणा असलेलं साहित्य सोडा, पण कणा असलेलं, विचारशत्रूंचा सडेतोड समाचार घेणारं अध्यक्षीय भाषणही संमेलनात आता दुर्मिळ होऊन गेलं आहे. जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक परिणामाची चिंता वाहणाऱ्या आमच्या अध्यक्षांना या अगतिकीकरणाची दखल घ्यावीशी वाटू नये? की साहित्यिकांनीच तेवढं नव्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्या माणसाच्या बाजूनं लिहावं?

‘जागल्या’ची कसली, मराठी साहित्य आज ‘झोपल्या’ची भूमिका छान पार पाडते आहे. आपल्या मूलतत्त्ववादाला विरोध करण्यासाठी आपली लेखणी सरसावून पुढं आली पाहिजे असं उत्तमरावांनी निक्षून सांगितलं खरं, पण हे सांगत असतानाच मंडपाबाहेर एका गुंड संघटनेकडून धमक्या  देणं चालू होतं... ‘संमेलनस्थळाचं नाव बदललं नाही तर संमेलन उधळून लावू’ अशा भाषेत दरडावणं चालू... लेखण्या नव्हे तर बंदुका सरसावून पोलिसांना या धमकीबहाद्दरांशी मुकाबला करावा लागला. काही वर्षांपूर्वी, ‘लेखण्या मोडा, बंदुका हाती घ्या’ असा आदेश सावरकरांनी साहित्य संमेलनात दिला होता; त्यामागे हा दूरदर्शीपणा होता की काय?’

अध्यक्षांच्या आसनावर आरूढ झालं की अनेक गोष्टींच्या अभावाची चिंता वाहण्याची जबाबदारी अध्यक्षांवर येऊन पडते. तिचाच एक भाग म्हणून अध्यक्षांनी वैचारिक लेखनाच्या दुष्काळाबद्दल चिंता व्यक्त केली. जातीय, धार्मिक, सांस्कृतिक दहशतवादाच्या नव्या प्रवाहात संपूर्ण पिढी वाहून चालली आहे. विचारस्वातंत्र्याची उघड गळचेपी होते आहे. अशा वातावरणात वैचारिक लेखन फुलणार कसं? वैचारिक साहित्याच्या दुष्काळातून ही स्थिती निर्माण झाली की ही स्थिती निर्माण झाल्यामुळे वैचारिक लेखनाचा दुष्काळ पडला, यावर अध्यक्षांसकट आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या वैचारिक लेखनाच्या ऱ्हासाबद्दल अध्यक्ष चिंता करताहेत ते वैचारिक लेखन हवंय कुणाला? वैचारिक लेखनातून जे सत्य बाहेर येईल ते आजच्या गुंड टोळ्यांना मानवणारं असेल का? लोकभावनांचा उद्रेक होईल या भीतीनं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा मंजूर होणं जिथं मुश्किल होऊन बसलंय अशा प्रांतात अध्यक्ष कोणत्या वैचारिक लेखनाचा आग्रह धरताहेत? इथल्या मध्ययमार्गीय समाजाला तरी वैचारिक वाङ्‌याविषयी काही आस्था आहे काय?

‘आजचा सुधारक’ नावाचं सुरेख वैचारिक नियतकालिक गेली कित्येक वर्षांत नागपूरहून प्रकाशित होतं. मराठी वाचकविश्वाला त्याची खबरबात नाही. पुतळे संस्कृतीत रमणाऱ्या, सुधारकांच्या घरांवर दगडफेक करणाऱ्या, ग्रंथालयांवर हल्ला करणाऱ्या, संतांच्या केवळ पालख्या मिरवण्यात धन्यता मानणाऱ्या आपल्या समाजाला वैचारिक भूक आहे अशा भ्रमात आपण किती काळ राहायचं हेही आता ठरवायला हवं.

मराठी भाषेच्या अस्तित्वावर ओढवलेल्या संकटाचा उल्लेख केल्याशिवाय कोणतंही अध्यक्षीय भाषण पूर्ण होत नाही. आता थोडं मराठविषयी बोलू या... अशी सुरुवात करून उत्तमरावांनी या संदर्भात जे विचार मांडलेत त्यांच्याशी कोणीही सहमत होईल, मात्र त्यांनी केलेल्या सूचना आणि उपायांची अंलबजावणी करायला आता उशीर झाला आहे. पुलाखालून पाणी नव्हे तर पूलही वाहून गेला आहे. मातृभाषेविषयी प्रेम निर्माण होईल अशा शाळा असायला हव्यात असं त्यांनी म्हटलं आहे. आज शहरात मध्यमवर्गीयांच्या घरांत इंग्रजी हीच मातृभाषा झाली आहे याचं भान अध्यक्षांना आहे का? सारा समाज भाषेबद्दल जागृत झाला पाहिजे असं जेव्हा अध्यक्ष म्हणतात तेव्हा त्यामागील पोटतिडीक समजू शकते. पण आज समाज जागृत झाला आहे तो इंग्रजी भाषेबद्दल हे वास्तव त्यांनी लक्षात घेतलेलं दिसत नाही. मराठी शाळेच्या अस्तित्वाची चळवळ करणाऱ्यांनी आपली मुलं, नातवंडं मात्र इंग्रजी शाळेत घालायची हा या नेत्यांचा धूर्तपणा मराठी समाज फार काळ चालू देईल असं अध्यक्षांना प्रामाणिकपणे वाटतं काय?

हृदयसम्राट म्हणून ज्या नेत्यांना मराठी समाजानं जवळ केलंय तो त्या नेत्यांचा आदर्श ठेवणार की मराठी संमेलनाच्या अध्यक्षांचा? आईप्रमाणे मराठी समाजही उत्तमरावांना आता समजून घ्यावा लागणार. त्याची बदलती मानसिकता अभ्यासावी लागणार. तगून राहण्यासाठी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेण्याची वृत्ती सर्व प्राणिमात्रांत आढळते; आणि माणूस हा सर्वांत हुशार प्राणी आहे. उत्क्रांतीचं हे मूलतत्त्व उत्तमरावांना कोणी समजावून सांगायची गरज नाही, पण अध्यक्षपदावरून बोलताना काही टाळीची वाक्यं बोलावी लागतात; काही बाबींबाबत गहिवरून बोलावं लागतं. सीमाप्रश्न ही अशीच एक बाब, सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी मागणी संमेलनाच्या व्यासपीठावरून गेली साठ वर्षं होते आहे हे अध्यक्षांनी सांगून टाकलं हे मात्र बरं केलं.

एकसाष्टाव्या वर्षी एखाद्या अध्यक्षानं बेळगाव-कारवारचा आग्रह मराठी जनतेनं आता सोडून द्यावा असं म्हटलं तर तो सहीसलामत व्यासपीठावरून खाली उतरण्याची शक्यता कमीच आहे. तेव्हा कोणा अध्यक्षांकडून तसली काही अपेक्षा नाहीच. ज्या प्रांतात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक दहशतवाद आहे, ज्या प्रांतात मायबोली मरू घातलेली आहे; त्या प्रांतात सामील होण्याचा आग्रह बेळगाववासी मराठी जनतेनं तरी का धरावा हे समजत नाही. या प्रश्नाबाबतची लोकेच्छा आणि राजकीय इच्छा कमी होते आहे हे जाहीरपणे सांगायचं धाडस उत्तमरावांनी दाखवलं त्याबद्दल मात्र त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.

व्यासपीठावरून राज्यातली करुण सद्य:स्थिती मांडणं आणि मराठी भाषेच्या हताश अवस्थेबद्दल चार उसासे सोडणं, सांस्कृतिक गोंधळ घालणाऱ्या काही अपप्रवृत्तींचा हळुवार शब्दांत निषेध करणं, वर्तमान भीषण असल्यानं भवितव्याबद्दल आशा बाळगणं एवढंच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करू शकतो. उत्तमरावांनी हे काम चोख पार पाडलं असं आपण म्हणायचं काय? पण मग... माझ्यात एक समाज तयार झाला आहे; मी स्वत:च एक युग आहे... हे सर्व काय आहे? उत्तम कांबळे स्वत:ला मराठी साहित्य क्षेत्रातील रजनीकांत वगैरे समजतात की काय?

बोलत राहू या; काही करत राहू या.... असा संदेश उत्तमरावांनी जाताजाता दिला आहे. हे मात्र खूप व्यवहारी वाटलं. दुसरं काय करू शकतो आपण? संमेलनानंतरही उत्तम कांबळे आपल्याशी नियतकालिकांतून, व्यासपीठावरून बोलणारच आहेत. आजच्या भयावह वातावरणात निर्भयपणे कसं बोलायचं आणि नेमकं काय करायचं याबद्दल त्या वेळी ते मार्गदर्शन करतील अशी आशा बाळगू या. उत्तमराव, हाताची घडी घालून, तोंडाला पट्टी बांधून जे काही घडतं आहे ते मुकाट बघत राहणारी एखादी ब्रिगेड उभारायची काय? बोला, आम्ही सारे लहानथोर लेखक लोक शेपूट पायात घालून आपल्यामागे चूपचाप उभे राहू; हे छान जमतं आम्हांला.

Tags: साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण अखिल भारतीय साहित्य संमेलन अवधूत परळकर उत्तम कांबळे sahitya sammelan president's speech akhil bharatiy sahitya sammelan uttam kambale avdhoot paralkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके