डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कुरुंदकरांचा दृष्टिकोन : एक टिपण

नरहर कुरुंदकर यांच्या निवडक लेखनाचा पहिला खंड (व्यक्तिवेध) ‘देशमुख आणि कंपनी’ने नुकताच प्रकाशित केला. या खंडाच्या निमित्ताने आणि खंडातील काही संदर्भ घेऊन ‘नरहर कुरुंदकर’ यांचा नक्की काय दृष्टिकोन आहे, याबद्दल एक लहानसा अंदाज बांधणारे हे टिपण मुळात ‘एक रेघ’ (ekregh.blogspot.in) या ब्लॉग-जर्नलवर नोंद म्हणून प्रसिद्ध केले होते, पण 17 जुलैच्या साधना अंकात, ‘व्यक्तिवेध’मधीलच गिरीश कुबेर यांचा ‘नव्या कुरुंदकरांची गरज’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे, म्हणून हे टिपणही साधना वाचकांसाठी पाठवत आहे.

आपल्याला जे म्हणायचंय ते- त्याबद्दल आधी पुरेशी माहिती करून घेऊन, सर्व बाजूंनी विचार करून, आपल्या मर्यादांसकट, संयमीपणे पण अतिशय स्पष्ट भाषेत मांडणं- हे नरहर कुरुंदकरांचं वैशिष्ट्य आहे, असं आपण सुरुवातीला म्हणून ठेवू. कुरुंदकरांचा स्पष्टपणा हा एका बाजूने शिक्षकी आहे. म्हणजे त्यांचं लिखाण त्यांच्यातल्या शिक्षकासकटचंच आहे. ते शिक्षकी पेशात होते त्यामुळे हे आहे का, माहीत नाही. किंवा, कदाचित ते व्याख्यानंही खूप द्यायचे, त्यामुळे हे असं असेल. नुसत्या लेखकाचं लिहिणं हे वेगळं पडतं. त्याला लिहिण्याशिवाय पर्याय नसल्यासारखं आणि समूहाशी बोलण्यापेक्षा एकेकाशी बोलल्यासारखं ते होत जातं. हे अर्थात आपलं आपल्यापुरतं मत आहे. आणि कुरुंदकर शिक्षक असले तरी ते मैत्रीच्या सुरात बोलतात, त्यामुळे त्यात दबाव नाही. आणि चांगल्या शिक्षकाच्या कामाचा भाग म्हणून असेल, पण वाचकाला स्वतःहून काही गोष्टी तपासाव्या वाटतील असं कुरुंदकर बोलतात. त्यामुळे कुरुंदकर वाचल्यावर तुम्हाला ‘कुराण’ वाचावंसं वाटू शकतं, किंवा कार्ल मार्क्स, किंवा आणखीही काही. ह्या प्रत्येक गोष्टीच्या पूर्ण खोलातला संदर्भ कुरुंदकर देत नाहीत. ते त्या गोष्टींचे ओझरते संदर्भ फक्त देतात आणि आपली मतं मुख्यत्वे मांडतात. त्यामुळेच कदाचित प्रत्येक ठिकाणी तळटिपा म्हणून किंवा दर प्रकरणाशेवटी यादी स्वरूपात संदर्भ देण्याऐवजी पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथांची एक सलग यादी देणं, ही कुरुंदकरांची पद्धत आहे. त्यांची मतं प्रत्येक वेळी आपल्या दृष्टीने ‘फुलप्रूफ’ आहेत की नाही, हे ज्यानं-त्यानं आपापलं ठरवावं.

आता आपण वरच्या परिच्छेदात जे म्हटलंय, त्याच्या खोलात जाऊ. कुरुंदकर आपल्या मर्यादांसकट बोलतात, असं आपण नोंदवलं. त्यासाठी एक दाखला म्हणजे, ‘मी आस्तिक का नाही?’ हा लेख. या लेखात सगळी मांडणी देव नावाच्या संकल्पनेबद्दल टीका नोंदवणारी आहे. तरीही एका ठिकाणी ‘...मी दुःखात आल्यानंतर देवाचे नाव घेईन, असा माझा अंदाज आहे’, असं कुरुंदकर बोलून जातात. अर्थात, ‘त्यामुळे देवाचं अस्तित्व सिद्ध होणार नाही’, असंही स्पष्ट करतात. म्हणजे बोलणारा एक माणूस आहे आणि त्याच्या कमतरता असू शकतात; पण म्हणून त्याचं मत खोटं ठरवू नका, असा त्यांचा रोख आहे. त्यामुळेच फुकाचे दावे कुरुंदकरांच्या लिखाणात नाहीत.

कुरुंदकरांच्या लिखाणातल्या शिक्षकपणाबद्दल आपण जे निरीक्षण नोंदवलं, त्यामागचं म्हणणं असंय की, कुरुंदकर उपलब्ध असलेल्याच माहितीचे संदर्भ घेऊन मतांची मांडणी करतात. कुरुंदकर माहितीच्या तथ्यतेबद्दलच शंका उपस्थित करताना शक्यतो दिसत नाहीत. ही त्यांची कमतरता आहे, असं आपल्याला म्हणायचं नाहीये. पण त्यांची भूमिका नक्की काय  असावी, याबद्दल आपण बोलतोय. उपलब्ध माहितीकडे कसं पाहता येईल, याचे अनेक रस्ते शोधणं- हे काम कुरुंदकरांना प्राधान्याने करावंसं वाटलं असावं. ह्या कामासाठी आवश्यक असलेली गोष्ट ‘तर्कसुसंगतपणा’ या नावाने ओळखली जात असे. याचंही एक उदाहरण नोंदवू या. ‘मी आस्तिक का नाही?’ याच लेखात कुरुंदकरांनी त्यांचा एक अनुभव दिलाय, तो असा :

एकदा माझे मामा डॉ. ना. गो. नांदापूरकर- यांचे गुरू चिं. नी. जोशी यांनी मला महाभारतातील आदिपर्वातील कश्यपाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, ‘‘मी तुला एक गोष्ट सांगतो, त्याचे तात्पर्य तू मला सांग.’’ मी म्हणालो, ‘‘सांगतो.’’ त्यांनी मग गोष्ट सांगितली : ‘कश्यपमुनींच्या दोन बायका होत्या. एकीचे नाव होते विनता, दुसरीचे नाव कद्रू. या दोघींनी एकदा सिद्ध करावयाचे ठरवले की, सूर्याच्या रथाच्या घोड्याची शेपटी पांढरी की काळी? दोघींनी प्रतिज्ञा केली की- जिचे म्हणणे खरे असेल, तिने मालकीण व्हायचे व जिचे म्हणणे खोटे ठरेल, तिने जन्मभर दासी व्हायचे. आणि नंतर कद्रूच्या लक्षात आले की, शेपूट पांढरेच आहे. तेव्हा तिने आपल्या मुलांना-सापांना सांगितले की, शेपटीला तुम्ही मिठी मारा. तेव्हा नंतर विनता झाली दासी व कद्रू झाली मालकीण. मग पुढे गरुडाने आपल्या आईची दास्यातून सुटका केली.’ अशी ही कहाणी सांगितल्यावर मला तात्पर्य विचारले. तेव्हा मी म्हणालो, ‘‘मला आधी हे सांगा पाहू की- ही कहाणी कलियुगातली आहे की त्रेतायुगातली, द्वापारयुगातली की सत्ययुगातली?’’ ते म्हणाले, ‘‘ही कहाणी सत्ययुगातली आहे.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘या कहाणीचे तात्पर्य असे की, कलियुगात माणसे द्वेष-मत्सर करणारी व लबाड-लुच्ची होती. जसा त्या वेळी लबाड-लुच्च्यांचा विजय होत होता, तसाच आताही लबाड- लुच्च्यांचा विजय होतो.’’ तेव्हा मामा मला म्हणाले, ‘‘आमचे गुरू म्हणाले की, तू नरकात जाशील. तर मी त्याला एन्डॉर्स करतो की, तू नक्की नरकात जाशील.’’

हे असं कुरुंदकर करतात. विविध युक्तिवाद, विविध दृष्टिकोन प्रकाशात आणत जाणं- हे त्यांनी त्यांचं काम मानलं असावं. आणि हीच कुरुंदकरांनी लोकशाहीच्या असण्यामध्ये घातलेली भर आहे. लोकशाहीमध्ये माहिती-ज्ञान या गोष्टींना जे स्थान हवं, ते टिकवण्यासाठी कुरुंदकरांसारखी माणसं अतिशय महत्त्वाची असावीत. आपलं तेच खरं, असं ते म्हणत नाहीत; पण आपलं जे म्हणणं अभ्यासातून तयार झालंय, ते स्पष्टपणे मांडतात. आणि त्यात दुरुस्तीची तयारी ठेवतात. आपलं मत स्पष्टपणे मांडणं म्हणजे दुसऱ्यांवर शेरेबाजी करणं, असंही ते मानत नाहीत. अजून एक याच लेखात पुढे त्यांनी असं म्हटलंय;

...माझ्या मनावर सगळ्या धर्मवाङ्‌मयाचे जे संस्कार झाले आहेत, ते असे आहेत. इथे जागोजागी असा उल्लेख आहे की, देवाने अमकी लबाडी केली व त्यांचा विजय झाला. देवांच्या विजयांच्या कहाण्या पुराणांमध्ये भरलेल्या आहेत, त्या सर्व कहाण्यांमध्ये लबाडीचे उल्लेख आहेत. राक्षसांच्या पराभवाच्या कहाण्या पुराणांमध्ये भरलेल्या आहेत. त्या राक्षसांच्या पराभवांच्या कहाण्यांमध्ये त्यांचा भोळेपणा हे कारण आहे. माणसे भोळी असल्यामुळे पराभूत झाली व माणसे लबाड असल्यामुळे विजयी झाली, एवढेच जर तुम्ही धर्मामधून सांगणार असाल - तर त्यातून लबाड असण्याची प्रेरणा मिळणार आहे, सज्जन असण्याची नाही.

इथे दृष्टिकोन म्हणून देव व राक्षस यांच्याबद्दल काही मत कुरुंदकरांनी दिलं. कदाचित इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आदिवासींवर राक्षस असल्याचा शिक्का मारला का, असा तपशील एखादा वाचक स्वतःच्या परीने शोधू शकतो/ तपासू शकतो/ नव्या माहितीच्या मागे लागू शकतो. म्हणजे, ती एक या व्यवस्थेची वेगळी बाजू आहे, आणि त्याचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. कुरुंदकर त्या मार्गावर नेण्याचं काम करत उभे असावेत. आणि त्या मार्गाबद्दलचं त्यांचं मत ते अतिशय स्पष्टपणे मांडून तिथे उभे आहेत. म्हणजे, त्यांच्या बाजूने त्यांनी तो रस्ता पाहिलेला असावा. बाकी, संशोधक वेगळा नि विश्लेषक वेगळा. यात वर-खाली असलं काही नाही; पण भूमिका वेगवेगळ्या आहेत, एवढंच आपल्याला नोंदवायचंय. कुरुंदकर स्वतःबद्दल असं काही म्हणत नाहीत, पण हे मुद्दाम नोंदवायचं कारण एवढंच की, एकूण शब्दांच्या बाबतीतली गफलत फारच होतेय हल्ली. वास्तविक, सगळं पूरक आहे एकमेकांना.

कुरुंदकरांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, मागच्यापुढच्या घडामोडींची समज ठेवून समकालीन घडामोडींमध्ये हस्तक्षेप करणं. ह्या वैशिष्ट्यामुळे खरं तर कुरुंदकरांची पुस्तकं पत्रकारांना वाचनासाठी कम्पल्सरी करायला हवीत. म्हणजे पत्रकार स्पष्टपणे बोलण्यात पुढाकार घेतील, कारण हातात सत्ता असते. पण त्यासाठी भूतकाळ नि भविष्यकाळाची समज असायला हवी याची जाण दिसत नाही. त्यामुळे फक्त पोकळ शेरेबाजी वाढणार आणि कुरुंदकरांच्या लिखाणात असलेला संयमी पण स्पष्ट मतमांडणीचा गुण संपणार, हे सगळं साहजिक आहे. शिवाय पत्रकारिता म्हणजे नक्की कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप असतो, तेही कुरुंदकरांमुळे कळू  शकलं असतं. आता माणूस माध्यमपिसाट झाला, माहितीचे प्रवाह वाढले, पण माहितीकडे पाहायचा ‘दृष्टिकोन’ नावाची काय तरी गोष्ट असते, हे समजून घ्यायला पत्रकारांना कुरुंदकर कदाचित उपयोगी पडू शकले असते.

‘रेघे’च्या परंपरेत वेडेपणा हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे, तोही कुरुंदकारांमध्ये सापडल्यामुळे आपण त्याचा दाखला देऊनच थांबणं बरं. सन 1952 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष / जनता आघाडी यांची धूळधाण उडाली नि देशाची सत्ता काँग्रेसकडेच राहिली. कुरुंदकर ज्या हैदराबाद संस्थानाचा भाग असलेल्या परिसरात राहत होते, तिथेही जनता आघाडीचे सगळे उमेदवार पडले. पक्षनेतृत्वाच्या निवडणुकीपूर्वीच्या बढाया मात्र सगळं आपल्या हातात येणार असल्याच्या होत्या, त्या पार्श्र्वभूमीवर विशीतले कुरुंदकर एकदम निराश झाले. स्वातंत्र्यानंतर राजकारणाचं काय होत चाललंय, ते कळून चुकल्यावर त्यांना नैराश्य आलं. त्याबद्दल त्यांनी ‘माळारानावरील कवडसे’ या लेखात लिहिलंय. या लेखाचा शेवट पाहा कसा केलाय त्यांनी :

पुन्हा इ.स. 1952चा मार्च आठवतोय. आपण वेडे त्या वेळी होतो की आज आहोत, अगर नेहमीच असे वेडे राहत आलो? व्यवहार आपल्याला कधी कळलाच नाही असे समजावे की, आता आपण पुरेसे शहाणे झालेले आहोत असे समजावे, हे मात्र मला आजही ठरवता येत नाही. बास! काहीही ठरवता न येण्याच्या या स्थितीची शक्यता गृहीत धरून कुरुंदकर बोलतात, त्यामुळेच त्यांना जे दृष्टिकोन मांडायला जमले ते जमले.

Tags: नरहर कुरुंदकर. अवधूत डोंगरे Narahar Kurundkar Avadhoot Dongare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अवधूत डोंगरे
dongareavadhoot@gmail.com

अवधूत डोंगरे हे लेखक- अनुवादक आहेत. ते एक रेघ नावाचा ब्लॉग लिहितात. त्यांना 2014चा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. एक आझाद इसम (अनुवादित, लेखक - अमन सेठी), नेहरू व बोस (अनुवादित, लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी), राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित), कहाणी माहिती अधिकाराची (अनुवादित, लेखक- अरुणा रॉय) पान, पाणी नि प्रवाह, एका लेखकाचे तीन संदर्भ, स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके