डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लोकमान्य टिळक जन्मशताब्दी वर्षात म्हणजे 1956 मध्ये, अ.के. भागवत आणि ग. प्र. प्रधान या इंग्रजीच्या दोन प्राध्यापकांनी Lokmanya Tilak : A Biography हे पुस्तक लिहिले. जयको पब्लिशिंग हाऊस, दिल्ली यांनी ते प्रकाशित केले. त्याला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांनी छोटी प्रस्तावनाही लिहिली. मात्र हे पुस्तक मराठीत गेली 65 वर्षे आले नव्हते. लोकमान्य टिळक यांचे मृत्यूशताब्दी वर्ष 1 ऑगस्ट 2020 रोजी संपले, तेव्हा त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम अवधूत डोंगरे यांनी दहा महिन्यांत पूर्ण केले आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी अनुवादित पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले. या पुस्तकाचा अनुवाद करून झाल्यावर अवधूत डोंगरे यांनी ‘एका शब्दाचा पेच’ एका भाषांतरकाराचे टीपण ही पुस्तिका (40 पानी) लिहिली. ही पुस्तिका या आठवड्यात छापून आली आहे. त्यातील सुरुवातीचा हा काही भाग आहे.
 

सुरुवात

एखाद्या भाषेतला आशय दुसऱ्या भाषेत वाहून नेणं, हे भाषांतरकाराचं दिसणारं काम असतं. पण लगेच न दिसणाऱ्याही अनेक गोष्टी असतात. अनेकदा शब्दकोशांमध्ये किंवा इतर ठिकाणी सहज दिसणारे शब्दांचे अर्थ पटत नाहीत, मग दिसतंय त्याहून अधिक काही असेल का, असं तपासावंसं वाटतं. भाषांतरकार, विशेषतः व्यावसायिक भाषांतरकार विविध कामं करत असतो, या सर्व कामांबाबतीत त्याचा अभ्यास असण्याची शक्यता जवळपास नाहीच, तशी गरजही असतेच असं नाही. पण एक वाचक म्हणून आपल्याला काही तपास करता येतात, किंबहुना वाचनाच्या प्रक्रियेत आपण तसं करतही असतो, असं वाटतं. हा तपास मग फक्त एखाद्या विशिष्ट शब्दापुरता राहत नाही, तो शब्द ज्या आशयासंदर्भात वापरलाय, त्या आशयाचाही काहीएक तपास केला जातो. असा वाचक-भाषांतरकार म्हणून केलेला इथला तपास ‘कन्झर्वेटिव्ह’ या शब्दापासून सुरू झाला.

‘कन्झर्वेटिव्ह’

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासंदर्भात ‘कन्झर्वेटिव्ह’ (conservative) हा शब्द भागवत-प्रधान यांनी काही वेळा वापरला आहे. शब्दकोशांमध्ये या शब्दाचा अर्थ ‘पुराणमतवादी’, ‘एकदम नवीन सुधारणा घडवून आणण्यास विरोध करणारा’ असा (1) आणि ‘रूढिप्रिय’ (2) असा दिलेला आहे. मराठी विश्वकोशात ‘रूढिवाद’ (कॉन्झर्व्हेटिझम) अशी नोंद (3) सापडते. या शब्दाचं मराठी भाषांतर करणं तसं अवघड नसलं, तरी खोलात गेलं तर मात्र ते अधिकाधिक गुंतागुंतीचं वाटत जातं. विशेषतः टिळकांच्या बाबतीत किंवा त्यांच्या राजकीय-सामाजिक व्यवहाराच्या निमित्ताने ही गुंतागुंत जास्त जाणवणं शक्य आहे. य. दि. फडके यांच्यासारख्या अस्सल साधनं शोधून आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचं प्रचंड खोदकाम केलेल्या इतिहासकारानेही टिळकांसंदर्भात हाच इंग्रजी शब्द वारंवार वापरलेला आहे. फडक्यांचं या संदर्भातलं काम तथ्यसंकलनाच्या दृष्टीने पाहिलं, तर एखाद्या कोशासारखंच विस्तृत असल्यामुळे त्यांचा दाखला इथे घेऊ या. फडके प्राधान्याने (किंबहुना आग्रहाने) मराठीत लिहून गेले. त्यामुळेच बहुधा इंग्रजी शब्दांना शक्यतो काटेकोरपणे (दुराग्रहाने नव्हे) मराठी प्रतिशब्द वापरण्याकडेही त्यांचा कल दिसतो. पण ‘कन्झर्वेटिव्ह’च्या बाबतीत मात्र त्यांनी वेळोवेळी, वेगवेगळ्या पुस्तकांमध्येे हा इंग्रजी शब्द ठेवलेला दिसतो. टिळकांची ‘कन्झर्वेटिव्ह किंवा परंपरावादी’ भूमिका आणि ‘टिळकांची मूलतः परंपरा जतन करू पाहणारी कन्झर्वेटिव्ह विचारसरणी’, असे उल्लेख (4) ते करतात. तसंच वेदोक्त प्रकरणाबाबत लिहिताना फडके म्हणतात, ‘‘(...) वेदोक्ताबाबतची टिळकांची ‘कन्झर्वेटिव्ह’ भूमिका सनातनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरणारी असली, तरी ती वाईचे धर्ममार्तंड काशीनाथ वामन ऊर्फ भाऊशास्त्री लेले किंवा अप्पाशास्त्री राशिवडेकर यांच्यासारख्या सनातनी ब्राह्मणांच्या दृष्टिकोनापेक्षा काहीशी वेगळी होती, याचे भान ठेवावयास हवे. समाजाच्या स्थितीत कसलाही बदल होऊ द्यावयाचा नाही अशी त्यांची भूमिका नव्हती. ‘समाजाच्या स्थितीत जी काही कोणास पालट करावयाची असेल ती व्यवस्थेने व बेताबातानेच केली पाहिजे व जी पालट करावयाची तीही अशी असली पाहिजे की तिची उपयुक्तता चटकन लोकांच्या लक्षात येईल’. कोणतीही सामाजिक सुधारणा करावयाची असल्यास अगर वहिवाट मोडावयाची असल्यास तिचा विचार पूर्वपरंपरा, इतिहास, ज्ञातिसंप्रदाय पद्धती, व्यवहार वगैरे गोष्टी लक्षात घेऊन करावा, असे टिळक म्हणत.’’ (5) तर, टोकाची आग्रही पोथिनिष्ठा असणारा ‘सनातनी’ दृष्टिकोन आणि समाजाची, धर्माची मूळ चौकट लक्षात घेऊन शक्यतो ‘परंपरा जतन करणारा कन्झर्वेटिव्ह दृष्टिकोन’ यांच्यातला भेदही ओझरता नोंदवलेला दिसतो. यात ‘जतन करणं’ हा ‘टु कन्झर्व्ह’ या इंग्रजी क्रियापदाशी जुळणारा शब्दही आलेला आहे, हे लक्षात घेऊन पुढे जाऊ.

वरचे संदर्भ लक्षात ठेवून एकंदरीत आढावा घेतला, तर ‘कन्झर्वेटिव्ह’साठी पुराणमतवादी, परंपरावादी, स्थितिवादी, सनातनी, प्रतिगामी, रूढिवादी, जतनवादी इत्यादी शब्दप्रयोग मराठीत होताना दिसतात. मूळ इंग्रजी शब्दाला अर्थातच पाश्चात्त्य राजकीय-सामाजिक संदर्भ आहेत. परंपरानिष्ठेसोबतच मुक्त बाजारपेठ, खासगी मालमत्ता यांचा कैवार घेणारी विचारसरणी म्हणून ‘कन्झर्वेटिझम’कडे पाहिलं जातं. अमेरिका किंवा युरोपातले ‘कन्झर्वेटिव्ह’ मानले जाणारे पक्षही मुख्यत्वे अशा धोरणासाठी ओळखले जातात. पण आपण भारत या पूर्वेकडच्या देशातल्या घडामोडींबद्दल, तिथे कार्यरत राहून गेलेल्या बाळ गंगाधर टिळक या मराठी व्यक्तीबाबत बोलतो आहोत. तर, या पुस्तकात टिळकांबाबत मूळ लेखकांनी जिथे जिथे ‘कन्झर्वेटिव्ह’ शब्द वापरलाय, तिथे सदर मराठी भाषांतरामध्ये ‘रूढिवादी’ असा शब्दप्रयोग केला. असं का केलं हे बोलूच, पण मुळात या शब्दाबद्दल एवढा काथ्याकूट आपण कशाला करतोय किंवा हे फक्त शब्दांचे खेळ आहेत का? तर, तसं नाही.

समुदाय, समूह, घोळका, गर्दी, टोळी, जमाव, झुंड- हे शब्द पाहा. या शब्दांमधून ‘काहीएका संख्येने जमलेले किंवा असलेले लोक’ सूचित होतात, पण अमुक इतकी संख्या म्हणजे यातला अमुक शब्द, असं काही सांगता येत नाही. शिवाय, या शब्दांशी निगडित सकारात्मक-नकारात्मक आणि अधल्या-मधल्या भावभावनाही सर्व वाचकांना जाणवतीलच. तरीही, लोकांच्या संख्येकडे बोट दाखवणारे हे शब्द आपण त्या-त्या संदर्भांनुसार, त्यातला अर्थफरक समजून घेऊन वापरतो. ‘कन्झर्वेटिव्ह’साठी वर नोंदवलेल्या शब्दांमध्येही असेच अर्थफरक आहेत. त्यात परंपरेविषयीची काहीएक भूमिका असली, तरी त्यातल्याही सकारात्मक-नकारात्मक आणि अधल्या-मधल्या भावभावना निरनिराळ्या आहेत. असा अर्थफरक लक्षात घेतला, तर ‘कन्झर्वेटिव्ह’चं मराठी भाषांतर हाही गुंतागुंतीचा मुद्दा होतो. या पुस्तकापुरता आपण हा गुंता ‘रूढिवाद’ या शब्दाच्या निवडीने सोडवला. ही निवड टिळकांच्या विशिष्ट राजकीय-सामाजिक व्यवहाराच्या संदर्भात आणि त्यातही या पुस्तकात जे उल्लेख आले, त्या संदर्भातच केलेली आहे. त्यामुळे आता त्या दिशेने थोडं बोलू. आपण ‘कन्झर्वेटिव्ह’ या इंग्रजी शब्दाचा हात सोडून या सगळ्यांकडे पाहू शकतो का, किंबहुना असं पाहणं का गरजेचं आहे, हेही नोंदवण्याचा प्रयत्न करू. किमान सुरुवातीला तरी या शब्दाविषयीचे सकारात्मक-नकारात्मक भाव बाजूला ठेवून तथ्यांपुरतं बोलू आणि शेवटी मग अर्थांची तुलना करू.

रूढिवाद

टिळक रूढिवादी होते, म्हणजे काय?

बाळ गंगाधर टिळक या व्यक्तीचा जन्म हिंदू धर्मात चित्पावन ब्राह्मण या जातीत पुरुष म्हणून झाला. जन्माला येता-येताच चिकटलेल्या या ओळखीसोबत ज्या काही रूढी पाळाव्या लागत असतील, त्या ते बहुतांशाने पाळताना दिसतात. सोवळ्याने जेवण्यापासून इतर पूजा इत्यादींसोबतच प्रचलित धर्मश्रद्धांना न पटणारी कृती केल्यानंतर प्रायश्चित्त घेण्यापर्यंत विविध गोष्टी यात आल्या. अशा रूढी पाळताना त्यांची चिडचिड होतेय, किंवा त्याचा काही जाच वाटतोय, असंही त्यांनी कुठे नमूद केल्याचं दिसत नाही. यात व्यक्ती म्हणून टिळकांनी केलेला रूढींचा स्वीकार दिसतो. त्याचप्रमाणे सामाजिक स्तरावर रूढींचे प्रश्न निर्माण झाले, तेव्हा त्यांनी रूढींचा किंवा रूढ व्यवहारांचा कैवार घेतला, असं बऱ्याच अंशी म्हणता येईल.

उदाहरणार्थ, 1888 मध्ये ‘स्त्रीशिक्षणाची दिशा’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात टिळक म्हणतात, ‘‘विवाहितावस्था व गृहकृत्ये ही स्त्रियांची दोन प्रधान कर्तव्ये असल्यामुळे स्त्रियांच्या व पुरुषांच्या शिक्षणाची दिशा लवकर भिन्न भिन्न करावी.’’ (6) यात उल्लेख आलेली ‘प्रधान कर्तव्ये’ त्या-त्या व्यक्तीने ठरवलेली नाहीत, आधीपासून रूढ झालेली कर्तव्यं आहेत. ‘आधीपासून’ असं म्हटलं की, इतिहास आला आणि त्यात खूप आधी-आधी असं शोधत जाणं, हा या भाषांतरकाराचा प्रांत नाही. त्याहीपेक्षा आपण इथे शक्यतो टिळकांच्या काळात प्रचलित असलेल्या धारणांना व मतांना धरून बोलण्याचा प्रयत्न करत राहू. त्यामुळे परंपरेच्या आणि रूढींच्या बाबतीत ‘आधीपासून’ काय कसं-कसं होतं, हे ठरवणार कोण- हा मुद्दा टिळकांच्या काळात कसा पाहिला जात होता, हे स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. त्यासाठी, दुसरं उदाहरण : वेदोक्त प्रकरण हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पुरेसा गाजलेला भाग आहे. कोल्हापुरातील छत्रपती शाहूमहाराज 1899 मध्ये पंचगंगा नदीवर पवित्र अंघोळीसाठी गेले, त्या वेळी मंत्र इत्यादी म्हणण्यासाठी नियुक्त केलेला भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता, शिवाय तो स्वतः अंघोळ करून आलेला नव्हता, बाहेरख्याली होता, इत्यादी. तिथे उपस्थित असलेल्या राजारामशास्त्री भागवतांनी शाहूमहाराजांचं याकडे लक्ष वेधलं. त्यावर भटजी म्हणाला, ‘‘शूद्राला पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात. वैदिक मंत्र म्हणते वेळी स्नानाची आवश्यकता असते; परंतु इथे शूद्रांना पुराणोक्त पद्धतीचा अनुग्रह करावयाचा असल्याने मला स्नान करण्याची आवश्यकता नाही.’’ (7) यावर शाहूमहाराज संतापले. इथून पुढच्या घडामोडींमध्ये टिळकांनी सनातनी मंडळींची बाजू घेतली. शिवाजी महाराजांपासून शाहूमहाराजांपर्यंत घराण्यांचं, दत्तक आलेल्यांचं क्षत्रियत्व किंवा शूद्रत्व या प्रकरणाच्या निमित्ताने काढण्यात आलं. विविध बाजूंनी टीका-प्रतिटीका होत राहिल्या. शाहूमहाराज आणि टिळक अखेरपर्यंत वेगवेगळ्या संदर्भांमध्ये परस्परांविरोधीच उभे ठाकले, हा इतिहास सविस्तरपणे नोंदवला गेलेला आहे. आपला आत्ताचा मुद्दा एवढाच आहे की, शाहू महाराजांचा वैदिक धर्मावर विश्वास होता, त्या श्रद्धेनुसार आपला काही रूढींवर हक्कआहे, अशी त्यांची श्रद्धा होती. पण ते शूद्र असल्यामुळे त्या रूढी त्यांना पाळता येणार नाहीत, असं त्यांना ब्राह्मण भटजीने आणि नंतर विविध ब्राह्मणांनी सांगितलं. आता इथे शाहू महाराजांना ‘आधीपासून’ त्यांच्या क्षत्रियत्वाची खात्री होती, पण सनातनी ब्राह्मणांनी ‘आधीपासून’चे दाखले देत त्यांना शूद्र ठरवलं. हे सगळं ठरवण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? ‘‘एखादा मुसलमान राजा झाला व तो स्वतःस छत्रपती म्हणू लागला तर त्याला तुम्ही वेदोक्ताचा अधिकार द्याल काय?’’ असं शाहूमहाराजांनी टिळकांना कालांतराने विचारलं. त्यावर टिळक म्हणाले, ‘‘त्या काळचे ब्राह्मण तो प्रश्न सोडवतील!’’ हे शाहूमहाराजांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं.(8)

रूढींच्या बाबतीत निर्णय घेण्याचे, ‘आधीपासून’ कसं काय होत आलंय हे ठरवण्याचे अधिकार ब्राह्मणांकडे असतील, तर ब्राह्मण जातीत जन्मलेल्या आणि त्या धारणा स्वीकारलेल्या व्यक्तीला या बाबतीत फारसे आक्षेप नसणं आपोआपच येतं. त्यामुळे या जातसमूहातून आलेल्या टिळकांना रूढींविषयी आक्षेप नसणं ओघाने आलं. ओघाविरोधात जाण्यासाठी रूढींबाबत सतत चिकित्सक राहावं लागलं असतं. ते इथे झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे ‘राजकीय सुधारणा आधी, सामाजिक सुधारणा नंतर’, अशी टिळकांची भूमिका होती, असं सुलभीकरण करणारं म्हणणं मान्य करून हा मुद्दा सोडवता येणार नाही. हा एकंदर जीवनदृष्टीचा प्रश्न असल्याचं दिसतं आणि टिळकांची जीवनदृष्टी रूढिवादी असल्याचं वरच्या प्रातिनिधिक उदाहरणांवरून दिसतं. याबाबत त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत उदाहरणं देता येतील. त्यातील टिळकांच्या वर्तनाची धाटणी अर्थातच बदललेली दिसते, पण त्यातला रूढींना प्राधान्य देण्याचा भाग ठळकपणे जाणवतो.

पण रूढिवाद हा परंपरेकडे जास्त झुकणारा असला, तरी तो परंपरेबद्दलच्या सनातनी व स्थितिवादी मतप्रवाहांपेक्षा वेगळा असतो आणि रूढिवादाची पुढील दिशाही वेगळी राहू शकते, याचा उल्लेख आधी आला आहेच. आणि त्याचं एक उदाहरण म्हणूनही आपल्याला टिळकचरित्राचा विचार करता येतो.

सनातनी / प्रतिगामी / स्थितिवादी

सनातनीपणामध्ये काहीएक अनाहत काळापासून चालत आलंय. त्यात अजिबात फेरफार अपेक्षित नाही, तर पोथिनिष्ठा अभिप्रेत असते. प्रतिगामीपणामध्येही मागे बघणारी दृष्टी ठळक आहे. स्थितिवादामधला आहे तिथेच थांबण्याचा अर्थही स्पष्ट कळतो. टिळकांच्या वर्तनव्यवहारात आणि विचारांत अशी पोथिनिष्ठा दिसत नाही. मनुस्मृतीपासून स्मृतिग्रंथांपर्यंत विविध पुराणग्रंथांचे दाखले ते देतात, हे खरंच. रखमाबाई राऊत प्रकरणात 1887 मध्ये (याबद्दल पुढच्या छेदकात आपण स्वतंत्रपणे बोलणार आहोत.) महादेव गोविंद रानडे यांनी स्मृतिग्रंथांमधील स्त्रियांच्या मोकळिकीचे दाखले दाखवत काही मुद्दे पुढे केले. त्यावर टीका करताना टिळकांनी दोन लेख (9) लिहून, ‘प्रमाणग्रंथां’मधली विविध वचनं उद्‌धृत करून बराच काथ्याकूट केलेला आहे. त्यात स्त्रियांच्या स्थितीबद्दल आता आणि तेव्हाही असंवेदनशील वाटतील अशी बरीच वाक्यं आहेत. पण आपण केवळ त्या जुन्या ग्रंथांमधील शब्दांचा अचूक अर्थ नोंदवतोय, अशा भूमिकेतून टिळक हा लेख लिहिताना दिसतात. आणि लेखांचा समारोप करताना लिहितात, ‘‘हिंदुधर्मशास्त्राचे इतक्या विस्ताराने प्रतिपादन करण्याची आमची इच्छा नव्हती. पण रावबहादूर माधवरावजींसारख्या शोधक व लोकमान्य विद्वानाने वक्तृत्वसमारंभात आम्हांस उद्देशून भाषण केल्यावर त्यांनी केलेले विवेचन अन्यथा आहे असे दाखवणे आम्हांस भाग पडले. (...) वस्तुतः रावबहादूरांस धर्मशास्त्राच्या भानगडीत पडण्याची मुळीच जरुरी नव्हती. आजकाल कोणतीही सुधारणा करणे असल्यास, डॉ. कीर्तिकर म्हणतात त्याप्रमाणे, ती सयुक्तिक, आवश्यक व सुकर आहे की नाही एवढाच खरोखर विचाराचा भाग असतो. असा विचार करण्यास आमचेकडून कोणतीही हरकत नाही.’’ हिंदू संस्कृतीतल्या आधीपासून चालत आलेल्या मूल्यांना टिळक श्रेष्ठ मानतात, त्यांची तळी उचलून धरतात, प्रसंगी त्या विरोधात जाणाऱ्यांवर भयंकर टीकाही करतात, पण बदलाची गरजही जाता-जाता नोंदवून ठेवतात. उदाहरणार्थ, 1881 मधील केसरीमधल्या एका लेखात (10) टिळक लिहितात, ‘‘कित्येक गोष्टी अशा आहेत की, त्या सर्वांस माहीत असता व त्यांची आवश्यकता प्रत्येक दिवशी सर्वांच्या अनुभवास येत असता, त्याबद्दल कोणी कोणाशी बोलत नाही. याचे कारण असे आहे की, त्या गोष्टी पुरातन जनरूढीविरुद्ध आहेत. सर्व भयांमध्ये लोकापवादाचे भय मोठे प्रबल. यापुढे सुधारणेचा झेंडा लावणाऱ्या महावीरांच्या कंबरा बसतात. असे जरी आहे, तरी ज्या गोष्टींपासून सतत नुकसान होत आहे असे वाटते, अशा कोणी तरी (भीत-भीत का होईना) लोकांच्या विचारापुढे आणल्याच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण फार पुरातन आहेत, याबद्दल कोणासही संशय येणार नाही. या चार वर्णांचा परस्परांशी अन्नोदकव्यवहार होत असे; इतकेच नाही, तर ब्राह्मणांनी क्षत्रिय कुलांतील मुली करणे सशास्त्र असल्याबद्दल ग्रंथांतही अनेक आधार सापडतील. तथापि, प्रस्तुत प्रसंगी या प्रश्नाशी आम्हांस काहीएक करावयाचे नाही. याचा येथे स्फुट उल्लेख केला, याचे कारण इतकेच की, ज्या वर्णांचा अलीकडे अन्नव्यवहार देखील बंद झाला, त्या वर्णांमध्ये पूर्वी परस्पर विवाहसुद्धा होत असत. पण कालगत्या अनेक कारणांनी या चार वर्णांचा हरएक प्रकारचा संबंध अलीकडे तुटला, व तो न होण्याविषयी निषेधपर वाक्ये धर्मशास्त्रांत किंवा इतर ठिकाणी सापडतील. असो; झाले ते झाले. याबद्दल आमचे काही म्हणणे नाही.’’ कोकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे या ब्राह्मण उपजातींमध्ये विवाहसंबंध व्हावेत, असं सुचवणारा हा लेख आहे. यातला आंतरजातीय विवाहाचा विचार उघडपणेच अत्यंत मर्यादित आहे. पण या लेखात आणि त्याआधी उल्लेख केलेल्या लेखातही परंपरेचे ठळक संदर्भ दिलेले असले, तरी वर्तमानात वेगळा विचार करण्याची शक्यताही टिळक स्वीकारताना दिसतात. किमान त्यांचा दृष्टिकोन तसा असल्याचं दिसतं. 1896 च्या एका लेखात (11) ते असं लिहितात : ‘‘समाजरचनेपेक्षा लोकांमध्ये एक प्रकारचा आपल्या संस्थांबद्दल व देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्याची प्रत्येक देशकल्याणाकरिता झटणाऱ्या माणसाने आधी तजवीज ठेवली पाहिजे. जुन्यास सोडून जाता कामा नये, असे नुसते शब्द वापरल्याने हा कार्यभाग होत नाही. तो होण्याबद्दल जुन्या संस्थांबद्दल खरोखरच योग्य अभिमान वाटावयास पाहिजे. ‘योग्य’ म्हणण्याचे कारण एवढेच की, हल्लीच्या काळात सर्वांशी अगर सर्वतोपरी जुन्या संस्था चालणे दुर्घट आहे, हे आम्हांसही मान्य आहे. पाश्चात्त्य राष्ट्राची व आमची कर्मधर्मसंयोगाने जी सांगड पडली आहे, तिचा साखळीच्या दोन्ही दुव्यांवर परिणाम झाल्याखेरीज राहावयाचा नाही. तथापि तेवढ्यामुळेच आमच्या समाजरचनेचा पाया खणून काढून पुनः नवा पाया घातल्याखेरीज चालायचे नाही, असे मात्र आम्हांस वाटत नाही.’’ इथेही पुन्हा परंपरेबद्दलचा अभिमान अधोरेखित करताना वर्तमानातला संदर्भही त्यांनी दिलेला आहे.

पण माणसाचं वागणं काही एकरेषीय किंवा एका दिशेनेच जाणारं असतं असं नाही. विशेषतः टिळकांनी सार्वजनिक राजकारण केलेलं असल्यामुळे त्यांच्यात अनेक अंतर्विरोध आहेतच. पण सनातनीपणात जी एकरेषीयता आहे, ती टिळकांच्या राजकीय-सामाजिक व्यवहारात नसणं, हे या अंतर्विरोधांचं एक महत्त्वाचं कारण वाटतं. काही वेळा बोलणं एक, वागणं दुसरं- असाही प्रकार दिसतो. पण हा अंतर्विरोध फक्त ढोंगीपणा म्हणून सोडून देण्यासारखा नाही. पाश्चात्त्य आधुनिकता तर नकोय, परंपरा पूर्ण नाकारू पाहणारे ‘सुधारक’ निव्वळ बाह्य (आधिभौतिक) विचारांवर भर देतात असं वाटत असल्यामुळे तेही पटत नाही, पण आपल्या परंपरेला आधुनिक (‘आजचं’ अशा अर्थी) कसं ठेवायचं, याबद्दल आपल्यालाही काही ठोस उत्तर देता येत नाही- या गुंत्यातून त्यांचे हे अंतर्विरोध आलेले दिसतात. त्यांच्या आयुष्यातल्या इतरही अनेक घटनांमध्ये हे सूत्र लावून आपल्याला उलगडा होऊ शकतो.

ग्रामण्य प्रकरणात ख्रिस्ती लोकांसोबत चहा-बिस्किटं खाल्लेल्यांमध्ये टिळक होते, पण यातून वाद उसळल्यावर आपण काशीला जाऊन प्रायश्चित्त घेऊन आल्याचं त्यांनी सांगून टाकलं आणि बऱ्याच चढ-उतारांनंतर त्यांनी यात रूढीबाहेर जाऊन पुन्हा रूढिबद्ध वागणं ठेवायचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्याच्या उतारकाळातही हे दिसून येतं. त्यांचं वर्तन अधिकाधिक बदलत गेलं, पण विविध कारणांमुळे रूढींबाबतची काही निश्चित भूमिका घेणं त्यांना शक्य झालं नाही. य. दि. फडके नोंदवतात त्यानुसार, ‘‘विलायतेतून परतल्यानंतर टिळकांचे वागणेही बदलल्याचे तत्कालीन वृत्तपत्रांनी नोंदवलेले आहे. सिंधच्या दौऱ्यात टिळकांना सर्व जातींच्या लोकांबरोबर पंक्तीत बसून जेवताना अनेकांनी पाहिले. मुसलमानाने बनवलेला चहा मुसलमान स्वयंसेवकाने आणून दिला, तरी चारचौघांदेखत टिळक तो चहा बेलाशक पीत असत. हे पाहून टिळक आता जातीपातींची बंधने बिनदिक्कत झुगारून देत असल्याची बातमी न्यू टाइम्स या वृत्तपत्राने 3 एप्रिल 1920च्या अंकात दिलेली आहे. मात्र आपल्या अशा वागण्यामुळे लग्न-मुंजीसारख्या धार्मिक कार्यात अडथळा येईल असे दिसू लागले की, ते चक्क प्रायश्चित्त घेऊन मोकळे होत असत.’’ (12)

त्यामुळेच निःसंदिग्धपणे कट्टर ब्राह्मण्यवादी भूमिका असलेले आणि रँडची हत्या करून फाशी गेलेले दामोदर हरी चापेकर हे टिळकांचं वर्णन ‘धड सुधारकही नाही आणि धड स्वधर्मनिष्ठही नाही’ असं करतात. चापेकर त्यांच्या आत्मृवत्तात टिळकांविषयी लिहितात, ‘‘याला स्वधर्मनिष्ठ म्हणावा तर विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळीचा हा सभासद आहे. गोमांस खाणारा जो दाजी आबाजी खरे (गाढव) त्याचा हा प्रिय मित्र. समयपरत्वे जाऊन धर्मनिष्ठ बोंबा-फुशारक्या मारतात. बिस्कुटे खाल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्यास या राजश्रींना शरम वाटली; पण चहा पिताना शरम वाटली नाही. समाजाकरिता मिशा भादरल्या असत्या तर यांच्या चाळीस पिढ्या नरकात गेल्या असत्या काय? लग्नकृत्यात तृतीय पंथ काढून स्मृतिकारांच्या पद्धतीत हे बसू पहात होते. यांना कधी कोणी कीर्तन-पुराण श्रवण अगर देवदर्शन इत्यादी धार्मिक कृत्यांत पाहिले होते काय? मला नाही वाटत कोणी पाहिले असेल. इत्यादी पुष्कळ गोष्टी ज्या धर्मनिष्ठ म्हणविणाऱ्याला लांच्छनप्रद होत्या अशा गोष्टी टिळकांचे ठिकाणी वास करीत होत्या. त्यांपैकी काही वर दाखवल्याच आहेत. तेणेकरून टिळकांविषयी आमचे मत चांगले नाही. पण सुधारकांपेक्षा पुष्कळ पटीने बरा, असे आमचे मत आहे.’’ (13)

तर, टिळकांच्या या रूढिवादी भूमिकेसंबंधीचे पेच यावरून स्पष्ट व्हावेत. यात सनातनी मंडळींच्या लेखी ते ‘सुधारकांपेक्षा पुष्कळ पटीने बरे’ ठरत असले, तरी ‘धर्मनिष्ठ’ ठरत नाहीत, म्हणजेच स्थितिवादी आणि पोथिनिष्ठ ठरत नाहीत.

टिळकांनी मंडालेला असताना लिहिलेल्या (1908-1914) ‘गीतारहस्य’ या ग्रंथाबाबतही हे झालेलं दिसतं. यात टिळक चातुर्वर्ण्यापासून विविध पारंपरिक गोष्टींचा गुणगौरव करत असले आणि त्या मांडणीचं वेगळं मूल्यमापन करणं शक्य असलं, तरी ते त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगतच होतं. पण हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगताना ते म्हणतात, ‘‘कोहिनूर हिऱ्याची अशी गोष्ट सांगतात की, तो हिंदुस्थानांतून विलायतेत नेल्यावर तेथे त्याचे पुनः नवे पैलू पाडण्यात आले; व त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसू लागला. हिऱ्यास लागू पडणारा न्याय सत्यरूपी रत्नासही लागू पडतो. गीतेतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काली ज्या स्वरूपाने सांगण्यात आला, त्या देशकालादी परिस्थितीत पुष्कळ फरक पडल्यामुळे, कित्येकांच्या डोळ्यांत त्याचे तेज आता पूर्वीप्रमाणे भरत नाहीसे झाले आहे.’’(14) आपण गीतेचा मुळाबरहुकूम अर्थ सांगतो आहोत, असं टिळक म्हणत असले, तरी ‘आधीपासून’ चालत आलेल्या अर्थाहून वेगळं तात्पर्य काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न पोथिनिष्ठांना रुचला नाही. ‘गीतारहस्य हा आसुरी ग्रंथ असून, टिळक हे राजस गृहस्थ कलियुगात ब्राह्मणयोनीत राष्ट्रभक्तीच्या मिषाने धर्म बुडवण्याकरता उत्पन्न झाले आहेत,’ इथपर्यंतची टीकाही त्यांच्यावर झाली.(15)

टिपा :

1)         शं. वि. सोहनी यांचा इंग्रजी-इंग्रजी-मराठी शब्दकोश.

2)        दळवी-प्रभुदेसाई यांनी ‘नवनीत’साठी केलेला इंग्रजी-इंग्रजी-मराठी शब्दकोश.

3)        सदाशिव आठवले, https://vishwakosh.marathi.gov.in/31426/

4)        य. दि. फडके,  ‘केसरी’ विरुद्ध ‘सुधारक’ , शोध बाळ-गोपाळांचा, श्रीविद्या प्रकाशन, 2000 : पान नं. 58-59.

5)        य. दि. फडके, ‘समांतर राजकीय चळवळी’, विसाव्या शतकातील महाराष्ट्र- खंड पहिला, के’सागर पब्लिकेशन्स, 2005 : पान 188. य. दि. फडके, ‘वेदोक्त प्रकरणातील विविध मतप्रवाह’, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, श्रीविद्या प्रकाशन, 2018 : पान 62.

6)        य. दि. फडके, ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र’, विसाव्या शतकातील महाराष्ट्र- खंड पहिला, के’सागर पब्लिकेशन्स, 2005 : पान 43.

7)        धनंजय कीर, ‘सामाजिक संघर्ष’, राजर्षी शाहू महाराज, पॉप्युलर प्रकाशन, 2020: पान नं. 87-88.

8)        उपरोक्त : पान 166.

9)        ‘रावबहादूर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य’ (7 व 14 जून 1887), लो. टिळकांचे केसरीतील लेख- भाग 4, न. चिं. केळकर, 1930: पानं 43-67. 

10)      ‘कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे’ (1881), लो. टिळकांचे केसरीतील लेख- भाग 4, न. चिं. केळकर, 1930: पान 1.

11)       ‘सामाजिक सुधारणेचे मार्ग’ (28 जानेवारी 1896), लोकमान्य टिळक लेखसंग्रह, संपादक- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, साहित्य अकादमी, 2013 : पान 15.

12)       य. दि. फडके, ‘ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर’, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, श्रीविद्या प्रकाशन, 2018 : पानं 315-316.

13)       हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांचे आत्मवृत्त, संपादक- वि. गो. खोबरेकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, 1974 : पान 55.

14)       बाळ गंगाधर टिळक, ‘प्रस्तावना’, श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, टिळक-बंधू, 1950 : पान 14.

15)       सदानंद मोरे, ‘गीता’ आणि ‘गीतारहस्य’, लोकमान्य ते महात्मा- खंड पहिला, राजहंस प्रकाशन, 2018 : पान 221

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अवधूत डोंगरे
dongareavadhoot@gmail.com

अवधूत डोंगरे हे लेखक- अनुवादक आहेत. ते एक रेघ नावाचा ब्लॉग लिहितात. त्यांना 2014चा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे. एक आझाद इसम (अनुवादित, लेखक - अमन सेठी), नेहरू व बोस (अनुवादित, लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी), राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित), कहाणी माहिती अधिकाराची (अनुवादित, लेखक- अरुणा रॉय) पान, पाणी नि प्रवाह, एका लेखकाचे तीन संदर्भ, स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके