डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अयोध्या आंदोलनकाळात तथाकथित हिंदू, साधुसंत, महंत यांचे टीव्हीच्या पडद्यावरले अजागळ वर्तन किळसवाणे होते. इतकी अडाणी माणसं ज्या धार्मिक समाजाचं नेतृत्व करतात त्या धार्मिक समाजातल्या कोणाला 'गर्व से कहो...' असं मान उँचावून ओरडावंसं वाटेल?

मागचा महिना वाईट गेला. हिंदू म्हणून जन्माला आल्याची लाज वाटावी अशा घटना देशात घडल्या. टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या की स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक मानणारे अर्धनंगे फकीर टीव्हीवर दिसू लागायचे. असे फकीर की ज्यांची ओंगळवाणी शरीरं आणि त्याहून ओंगळवाणी अशी त्यांची वक्तव्य ऐकून कुणाचंही मन विटून जावं.

अशी माणसं हिंदू-धर्माचे सर्वमान्य नेते असतील तर विवेकी माणसांनी लवकरात लवकर या धर्माचा त्याग करणं अधिक शहाणपणाचं ठरेल. त्यातील एका जटाधाऱ्याच्या स्वप्नात म्हणे प्रभू रामचंद्र आले, म्हणाले शिलान्यास वगैरेच्या भानगडीत पडू नका. मंदिराची शिळा शासकीय अधिकाऱ्याच्या स्वाधीन करा. सध्या इतकं पुरं आहे.

मग शिलादानाची कल्पना पुढं आली, स्वामीजी शिळा घेऊन वाजत-गाजत निघाले. आय.ए.एस. श्रेणीच्या शासकीय अधिकाऱ्यानं समारंभपूर्वक शिळेचा स्वीकार केला. आय.ए.एस. अधिकाऱ्यांची कर्तव्यं कोणती, अधिकार कोणते, धार्मिक समारंभात भाग घेणं त्यांच्या कार्यकक्षेत कसं बसतं? फार प्रश्न विचारायचे नाहीत. निदान प्रसारमाध्यमांचं तरी आज हेच धोरण आहे.

एकीकडे शिलादान समारंभाची आखणी चालू असता तिथं अहमदाबादचं बोस्नियात रूपांतर झालं होतं. नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या गुंड टोळक्यांनी संपूर्ण शहर ताब्यात घेतले होतं. रामाचे सेवकच रामाच्या नावानं खून पाडण्यात आघाडीवर होते. हिंदुधर्मीयांच्या सहिष्णुतेवर बोलणाऱ्या धर्मपंडितांची वाचा बसली होती. रस्त्यावर उतरणं सोडा पण घरी बसून हिंदुत्ववादी नेते हा सारा धुमाकूळ एन्जॉय करत असावेत, असा संशय येत होता. मुंबईत शिवाजीपार्कच्या कट्ट्यावरल्या जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरला आनंद लपून राहात नव्हता. परदेशस्थ मुला नातवंडांच्या मनीऑर्डरवर जगणारा हा सुशिक्षित समाज. मैदानात हवेत लाठ्याकाठ्या फिरवण्यात त्यांचे तारुण्य सरलं. धर्मासाठी प्रत्यक्ष लढाई खेळण्याची हिंमत यांच्यापैकी कुणाशीच नव्हती. अयोध्येला गेलेल्या रामसेवकांच्या तांड्यात यांच्या घरचं कुणीच नव्हतं. बेकार हिंदू तरुणांना मंदिरासाठी लाठ्या, गोळ्या झेलायला पाठवून सुस्थितीतले नेते अयोध्या, अहमदाबादमधल्या लढाईची दृश्ये पाहात रंगीत टीव्हीसमोर बसून होते.

आज एक बोलायचं, उद्या दुसरं, परवा तिसरंच; पडलो तरी म्हणायचं आपली टांग उपर. हिंदू नेतेमंडळींची वैचारिक दिवाळखोरी आणि भोंगळ नीती टीव्हीवाल्यांनी छान पेश केली. ‘आजतक’नं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची सुलतानशाही मार्मिकपणे समोर आणली आणि भाजपा शासनाचा अमानवी चेहरा जगाला दाखवला. ‘स्टार न्यूज’च्या राजदीप सरदेसाईनं अहमदाबादच्या गल्लोगल्ली हिंडून दगडविटांचा मारा सहन करत दंगलीचं चित्रण केलं.

प्रत्येक दंगलीची झळ लागते गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गी वस्त्यांना. शहरी उच्चभ्रू, मुल्लामौलवी, साधू, महंत यांची निवासस्थानं आगीत भस्मसात झालीत असं कधी होत नाही. सूडाच्या राजकारणातही या नियमाचं पालन कसोशीनं केलं जातं.

अफगाण युद्धानं अमेरिकेचा विकृत चेहरा जगासमोर आणला. अयोध्या प्रकरण जसजसं तापू लागलं तसतसा हिंदू प्रेषितांचा राक्षसी चेहरा जगासमोर येऊ लागला. कारसेवकांची फौज रामाचे मंदिर बांधायला निघालीय की रावणाचं, हे उघड झालं. शासनाची आणि पोलिस यंत्रणेची साथ मिळाली तर शहराला छळछावणीची अवकळा येऊ शकते हे दहा वर्षांपूर्वी मुंबईतल्या दंगलीनं सिद्ध केलं होतं. अहमदाबादेत त्याचा पुन्हा प्रत्यय आला. केन्द्र शासन आज ज्या पद्धतीनं दंगलखोरांना पाठीशी घालत आहे ती पाहिली की भविष्यात या देशाला आणखी किती दंगलींना तोंड द्यावं लागणार आहे ते कळत नाही. गरोदर स्त्रीचा गर्भाशय चिरण्याचे, संपूर्ण घर पाण्यानं भरून त्यात वीजप्रवाह सोडण्याचे, गॅस सिलिंडरच्या झडपा उघडून घर पेटवून देण्याचे प्रकार अहमदाबादेत घडले. 'अल कायदा' संघटनेशी नातं सांगणाऱ्या संघटना हिंदू समाजातही आहेत हे यातून दिसून आलं. अशा संघटनांवर बंदी घालायला नकार देणाऱ्या भाजपा सरकारची आणि सत्तेच्या हव्यासापोटी तिला पाठिंबा देणाऱ्या घटकपक्षांची तुलना तालिबान सरकारशी केली तर ते चूक ठरणार नाही.

शिलादानासारख्या विधीला उत्तेजन देऊन, त्या कामासाठी खास दूत पाठवून शासनानं आपण दंगलखोरांच्या धमक्यांपुढं मान तुकवतो हे दाखवून दिलं आहे. तालिबान सरकारनं मुस्लिम धर्माची विकृत प्रतिमा जगासमोर ठेवली. भाजपा आणि मित्रपक्ष हिंदुधर्माची विकृत प्रतिमा जगापुढं ठेवायच्या उद्योगाला लागली आहे.

अयोध्या आंदोलनकाळात तथाकथित हिंदू, साधुसंत, महंत यांचं टीव्हीच्या पडद्यावरलं अजागळ वर्तन किळसवाणं होतं. इतकी अडाणी माणसं ज्या धार्मिक समाजाचं नेतृत्व करतात त्या धार्मिक समाजातल्या कोणाला 'गर्व से कहो...' असं मान उंचावून ओरडावसं वाटेल? आपण हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटावी, अशा आणखी किती घटना अवतीभोवती घडताना आपल्याला पाहाव्या लागणार आहेत कोण जाणे!

Tags: महंत साधुसंत हिंदू राजदीप सरदेसाई अयोध्या आंदोलन अवधूत परळकर Rajdeep Sardesai Ayodhya Movement Avdhut Paralkar Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके