डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सत्य साहित्य रूपात उभं राहतं तेव्हा नेमकं काय घडत; साहित्यात बाहेरील वास्तवाची मांडणी करताना कोणते नियम आणि पथ्यं पाळावी लागतात; वास्तवातले कोणते तपशील गाळावे लागतात; हे सर्व नीट समजून न घेता लेखनाला हात घातल्यास गोंधळ शकतो, याची रंगमंचावर चर्चा घडवून आणणारं ‘फायनल ड्राफ्ट’ हे बहुधा पहिलं मराठी नाटक असावं. रंगमंच हे चर्चेचं व्यासपीठ नसून, नाट्यात्मक आविष्कार घडवून आणायचा तो एक मंच आहे याचं भान गिरीश जोशीनी आपल्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून आश्चर्य वाटावं इतक्या सहजतेनं बाळगलं आहे.

‘फायनल ड्राफ्ट’ नावाचं नाटक गेली तीन वर्षे मराठी रंगभूमीवर गाजते आहे. अवधी दोन पात्रं असलेल्या या नाटकाच्या आशय- विषयानं आणि रंगमंचावरल्या त्याच्या मांडणीनं भल्याभल्यांना चकित करून सोडलं आहे. बाहेरील वास्तव लेखनकृतीमध्ये उतरवण्याचे प्रयत्न होतात, तेव्हा नेमकं काय घडतं किंवा घडायला हवं याची नाट्यपूर्ण चर्चा त्या नाटकात आहे आणि नेमका हाच या सदराचा विषय आहे. म्हणून या नाटकाची दखल घेतल्याविना पुढे जाता येणार नाही.

नाटकात वास्तवाच्या साहित्यात होणाऱ्या रूपांतराची चर्चा असली तरी ‘फायनल ड्राफ्ट’ हे नाटक मात्र वास्तवाचं नाट्यवस्तूत रूपांतर करण्याच्या प्रयत्नाचा भाग नाही, नाटककारानं नाटकाच्या प्रस्तावनेत हे मुद्दाम नमूद केलं आहे. प्रस्तावनेतलं हे पहिलंवहिलं विधान बघा.

"या नाटकाच्या संदर्भात सांगायची आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातील पात्रे व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक असून वास्तवातील कशाशीही त्याचा थेट संबंध नाही."

आता हे कशासाठी ? लिहिलेले नाटक किंवा कथा, कादंबरी ही सत्य घटनेवर आधारलेली असेल किंवा नसेल. वाचकांना त्याच्याशी काय मतलब ? पण नाटककार गिरीश जोशींना हे अगदी सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट म्हणून वाचकांना सांगावंसं वाटलं. ‘ही साहित्यकृती संपूर्णपणे काल्पनिक असून त्यातल्या पात्रांचा कोणाही जिवंत पात्राशी संबंध नाही’ अशा ओळी आपल्याला अनेक पुस्तकांच्या पहिल्या पानावर आढळत आल्या आहेत. गिरीश जोशींनाही तसं नमूद करता आलं असतं, पण त्यांना प्रस्तावनेच्या पहिल्या ओळीत याकडे मुद्दाम लक्ष वेधून घ्यावंसं वाटलं.

नाटककाराची ओळ पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचा, त्यात ‘थेट’ असा शब्द आहे. नाटकाच्या संदर्भात आणि या सदराच्या संदर्भात हा शब्द महत्वाचा आहे. नाटकातील प्रसंग आणि पात्रांचा, वास्तवातील प्रसंग आणि पात्रांशी संबंध नाही असं नाटककार म्हणत नाही. तसं तो म्हणू शकत नाही. ‘फायनल ड्राफ्ट’ नाटकाचा नायक आणि नाटककार यांच्यात बऱ्यापैकी साम्य आहे. नाटककार मीडिया स्कूलमध्ये पटकथालेखनाचे तास घ्यायचा; नाटकाचा नायकही तत्सम व्यवसाय करतो आहे. नाटककारानं आपल्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणे काल्पनिक आणि स्वत:च्या आयुष्यात घडलेली अशा दोन कथा लिहायचा गृहपाठ एकदा दिला होता. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, की अनेकांनी काल्पनिक कथेत स्वत:च्या आयुष्यातले प्रसंग घुसडलेत आणि खऱ्या आयुष्यातील घटनांत काही काल्पनिक प्रसंग घुसडले आहेत. ‘फायनल ड्राफ्ट’ नाटकातलं नाट्यही या मुद्यातून आकाराला येतं. तिथं नायकानं आपल्या विद्यार्थिनीला याच स्वरूपाचा गृहपाठ दिला आहे आणि सदर विद्यार्थिनींनं हाच घोटाळा करून, आपली तथाकथित कल्पनिक कथा लिहून आणली आहे.

आता या विद्यार्थिनीला वास्तव म्हणजे काय, काल्पनिक म्हणजे काय; जीवनातले वास्तव प्रसंग कथेत आणायचे असतील तर थेटपणा कसा टाळायचा असतो याचे धडे देणं आलं. हे काम सोपं नाही. कारणही विद्यार्थीनी नायकाला सुरुवातीला भासली तशी बाळबोध आणि भाबडी नसून, चांगली खट आहे. नाटक पुढं प्रवास करू लागतं तसं नायकाच्या आणि आपल्याही हे लक्षात येऊ लागत.

नाटक पुढं कसं आकार घेतं, हे सांगणं हा या लेखाचा होऊ विषय नाही; पण नाटकभर वास्तव आणि त्याचं साहित्यातलं रूप यांवर अत्यंत श्रवणीय आणि रंजक चर्चा चालते हे सांगणं जरूरीचं आहे. नाटकाचा आकृतिबंध आणि नाट्यगुण सांभाळून नाटककारानं ही चर्चा घडवली असल्यानं, तिचं रूप अकादमिक चर्चेप्रमाणे नाही तर कमालीचं नाट्यपूर्ण आहे.

वास्तवाचं सर्जनशील साहित्यकृतीत रूपांतर कस करायचं, याचे घडे स्वत:च्या आयुष्यातील सत्य घटनांना नाटकाचं रूप देऊन नाटककारानं दिले आहेत. या साऱ्या खटाटोपात ‘थेट’ शब्द किती महत्त्वाचा आहे याचं प्रात्यक्षिक ‘फायनल ड्राफ्ट’ मध्ये आपल्यासमोर सादर होतं. थेटपणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी प्रास्ताविकात आपल्या नाट्यामागील प्रेरणा, नाटककारानं मोकळेपणानं वाचकांसमोर उघड केली आहे. नायकानं विद्यार्थिनीला दिलेल्या गृहपाठाप्रमाणे त्यानं एक गृहपाठ स्वत:च सोडवून आपल्यासमोर ठेवला आहे. आपल्या जीवनाच्या पार्श्वभूमीचा काही भाग आपण नाट्यलेखनासाठी वापरला म्हणून नाटककाराला अपराधी वाटायचं वास्तविक काही कारण नाही. कारण आपल्या जीवनाची पार्श्वभूमी वापरून अनेकांनी थोर कलाकृती निर्माण केल्या आहेत.

कथानिर्मितीच्या प्रक्रियेचा शोध घेत असता, विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला परिचय होत जातो आणि त्याचवेळी वेगळ्या पातळीवर विद्यार्थिनीला पटकथेचं प्रशिक्षण देणाऱ्या नायकाची व्यक्तिगत शोकांतिकाही आपल्यासमोर येऊ लागते.

कोणी म्हणेल हा सगळा व्यक्तिगत ड्रामा झाला; समाजाच्या कोणत्या अंगाचं दर्शन यातून घडतं? 'फायनल ड्राफ्ट'ची कहाणी बरकरणी व्यक्तिगत स्वभाव रेखाटनात गुंतलेली आणि भिन्न स्वभाव विशेषातून प्रकट झालेल्या संवादी संघर्षाची कहाणी आहे हे खरं, पण त्यामधल्या व्यक्तिगत तणावांच्या आणि शोकांतिकांच्या मुळाशी समाजव्यवस्था आहे. या व्यवस्थेचं ओझरतं दर्शन नाटकात अधनंमधनं घडत राहतं. 

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेकडे नीट लक्ष न पुरवणारी शिक्षणपद्धती, शिक्षणाचा रोखच निश्चित न कळल्यानं करिअरबाबत गोंधळलेली आजची तरुण पिढी, आपल्याच आवडीनिवडीबाबत साशंक असलेली नाटकातली विद्यार्थिनी आणि तिच्या आवडीचा शोध घेण्याची गरज न वाटणारी तिच्या घरची वडीलधारी माणसं, हे आजच्या समाजाचं प्रातिनिधीक चित्र नाही तर काय आहे ?

आपण पोकळ समाजव्यवस्थेचं दर्शन घडवतो आहोत, असा अभिनिवेश धारण न करता नाटककारानं अत्यंत सहजपणे या मुद्यांना स्पर्श केला आहे. नायकाची शोकांतिका त्यानं नाटकाच्या केंद्रस्थानी येऊ दिली नाही तरी ती कमी महत्त्वाची नाही. सर्जनशील लेखकाच्या एका गटाचं प्रतिनिधित्व नाटकाचा नायक करतो. त्यामुळे ती एका व्यक्तीची शोकांतिका उरत नाही. हा सर्जनशील आणि मनस्वी लेखक, लेखन क्षेत्रातल्या व्यापारी व्यवस्थेला शरण आला आहे. मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या तडजोडी, व्यावसायिक गरजेपोटी कुटुंबापासून दूर राहावं लागल्यानं होणारी फरफट आणि त्यातून अटळपणे होणारी दैनंदिन चरफड हे सगळे नाट्यात्मक ताणाचे धागे समाजव्यवस्थेशी निगडित असल्याचं दाखवून देतात.

एखादं नाटक स्त्री-पुरुषादरम्यानच्या संवादातून घडतं म्हणून ते स्त्री- पुरुष संबंधाचे किंवा त्यातून जन्माला येणाऱ्या संघर्षाचं नाटक ठरत नाही. माणसं एकेकटी राहात असली तरी अनेकदा त्यांचं एकटेपण समाजाच्या विशिष्ट रचनेतून, व्यवहारातून आकाराला आलेलं असतं. स्वत:च्या बौद्धिक हिंमतीवर, सर्जनशक्तीवर जगू पाहणाऱ्यांना आपला समाज त्यांच्या पद्धतीनं जगू देत नाही. समाजातल्या इतरांचे हितसंबंध या मनस्वी लोकांच्या कलात्मक निष्ठांच्या आणि आशा-आकांक्षांच्या आड येत राहतात. फार मोठा पैसा आणि अफाट कीर्ती या मंडळींना नको असते, पण स्वत:च्या लहानसहान मनीषा पूर्णत्वाला नेणंही त्यांना प्रचलित सामाजिक राजकीय समाजव्यवस्थेमुळे, संस्थांमधील प्रशासकीय राजकारणामुळे दुरापास्त होऊन बसतं.

‘फायनल ड्राफ्ट’ मधून शिक्षक आणि विद्यार्थिनी दरम्यानच्या शाब्दिक चकमकीचा खेळ, नाटककार गिरीश जोशींनी रंगमंचावर चांगल्याप्रकारे रंगवला आहे. पण हा रंजक आणि रंगतदार खेळ म्हणजे हे नाटक नाही. साहित्यकृतीचा अंतिम मसुदा तयार होतो तेव्हा पूर्णाशाने आपल्या हाती लेखक-दिग्दर्शक काय ठेवून जातो, हे नाट्य परिणामाच्या दृष्टीनं महत्त्वाचं. नाटक पाहून झाल्यावर प्रेक्षागृहाबाहेर पडताना उभय कलाकारांमधल्या संवादातले सूक्ष्म तपशील आठवत राहतात. त्यातील मार्मिक आशय स्पष्ट होत जातात. व्यक्तिगत खेळाच्या बाहेर पडून आपण नाटकाच्या आकृतिबंधाचा विचार करू लागतो. मग समाजव्यवस्थेतील कलानिष्ठ माणसांची घुसमट आपल्यापुढं येते; नव्या पिढीभोवती काय दर्जाचा शैक्षणिक माहोल आपण उभा करून ठेवला आहे हे जाणवू लागते. 

विद्यार्थिनींपेक्षा अधिक पावसाळे पाहिलेला नाटकातला लेखक- प्रशिक्षक, पण लहान गावातून शहरात आलेली साधीसुधी अर्धशिक्षित विद्यार्थिनी त्याला शब्दात पकडते; आपल्या भाबड्या सवालानं त्याच्यावर अनुत्तरित होण्याची पाळी आणते. सामान्यांमधलं असामान्य शहाणपण सूचित करणारे हे क्षण आहेत. समाजस्थितीचं साहित्यकृतीतून घडणारं दर्शन दरवेळी आर्थिक स्वरूपाचं असेल असं नाही. समाजातील तरुण पिढीच्या मानसिकतेचं, वैचारिक-भावनिक असमतोलाचं दर्शनही साहित्यकृती घडवू शकतात. सामाजिक सत्याचं हे महत्वाचे अंग ‘फायनल ड्राफ्ट’ मधून नाटककार गिरीश जोशींनी अत्यंत वेधकपणे पुढं आणलं आहे.

सत्य साहित्य रूपात उभं राहतं, तेव्हा नेमकं काय घडतं; साहित्यात बाहेरील वास्तवाची मांडणी करताना कोणते नियम आणि पथ्यं पाळावी लागतात; वास्तवातले कोणते तपशील गाळावे लागतात; हे सर्व नीट समजून न घेता लेखनाला हात घातल्यास काय गोंधळ होऊ शकतो याची रंगमंचावर चर्चा घडवून आणणारं ‘फायनल ड्राफ्ट’ हे बहुधा पहिलं मराठी नाटक असावं. रंगमंच हे चर्चेचं व्यासपीठ नसून, नाट्यात्मक आविष्कार घडवून आणायचा तो एक मंच आहे याचं भान गिरीश जोशींनी आपल्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून आश्चर्य वाटावं इतक्या सहजतेनं बाळगलं आहे. काही समीक्षकांच्या मते, चर्चात्मक नाटकं मराठी रंगमंचावर आणणाऱ्या चं.प्र.देशपांडे आणि गो.पु.देशपांडेनाही हे कौशल्य अद्याप पूर्णपणे साध्य झालेलं नाही.

‘फायनल ड्राफ्ट’ मधली चर्चा ही विद्वजनांमधली विशिष्ट विषयावरली चर्चा नाही. शैक्षणिक आणि वैचारिक दरी असलेल्या दोन भिन्न सामाजिक स्तरांमधील व्यक्तींमधला हा संवाद आहे. खरं तर संवादही नाही. नाटकभर नायक एका तरुणीला प्रशिक्षित करण्यासाठी तिच्याशी संवाद साधण्याची धडपड करतो आहे. या धडपडीत तो अनेकदा तोंडघशी पडतो आणि तिला शिकवण्याऐवजी आपल्यालाच तिच्याकडून नवे धडे मिळत आहेत असं वाटू लागण्याचे प्रसंग त्याच्यावर ओढवतात. 

सत्यातून साहित्याकडे प्रवास करण्याची तांत्रिक प्रक्रिया समजावून सांगताना प्रशिक्षकाला कधीकधी सत्याचे असे आगळेवेगळे साक्षात्कारही होत राहतात; नवा समाज दिसायला लागतो. लेखन प्रवासाचे बारकावे समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा अनुभव काही वेळा नवं समाजभान देणारा अनुभव ठरू शकतो.

Tags: चं.प्र.देशपांडे गो.पु.देशपांडे अवधूत परळकर गिरीश जोशी सत्यातून साहित्याकडे मराठी नाटक girish joshi natak marathi natak avdhut paralkar on final draft weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके