डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

वैशाली या शापाची बळी आहे. प्रतिकूल वातावरणात लढताना प्रत्येक पातळीवर तिला होणारा मनस्ताप लेखिका आपल्यापर्यंत आणते. रस्त्यावरले लढे तिला स्वत:वरला अन्याय दूर करायला उपयोगी पडत नाहीत. खासदाराच्या हस्तक्षेपानं त्यांच्यावरला अन्याय चुटकीसरशी दूर होतो हे तर खूप छान मांडलं आहे. सामाजिक सत्य मांडताना प्रज्ञाबाई समाज चळवळींकडे रोमँटिक दृष्टिकोनातून पाहात नाहीत. त्यांचा कल वास्तवाचं यथार्थ दर्शन घडवण्याचा आहे. वास्तवाचं साहित्यकृतीत भाषांतर करताना आपल्या पहिल्यावहिल्या नाटकात त्यांनी दाखवलेली परिपक्वता प्रशंसनीय आहे. आजूबाजूला दिसतात अशा हाडामासाच्या व्यक्तिरेखा प्रज्ञाबाईंनी नाटकात उभ्या केल्या आहेत. नाट्यात्मक परिणाम साधण्यासाठी व्यक्तिरेखांना मुद्दाम धार लावण्याचा प्रयत्न इथं आढळत नाही.

‘धादांत खैरलांजी’ हे प्रज्ञा पवारांनी लिहिलेल्या नाटकाचं पुस्तक हातात आलं तेव्हा वाटलं, आता काय हे वाचायचं? खैरलांजीला घडलेल्या करुण घटनेवर आजवर वृत्तपत्रात आणि इतरत्र इतकं काही लिहिलं-बोललं आहे, आता पुन्हा नाटकात त्यावर कोण काय वेगळं बोलणार? खैरलांजीसारख्या भयंकर घटनेची कलात्मक रूपं सादर केली जाऊ नयेत असंही मनात कुठेतरी वाटत राहिलं.

मराठी साहित्यविश्वात कविता हे माध्यम प्रगल्भतेनं हाताळण्याऱ्या मोजक्या कवयित्री आहेत. प्रज्ञा पवार हे यापैकी एक महत्त्वाचं नाव. त्यामुळे एकीकडे नाटकाबद्दल असा उदास दृष्टिकोन असला, तरी दुसरीकडे चांगली कवयित्री जेव्हा नाटकासारखं माध्यम हाताळते तेव्हा ते ती कसं हाताळते हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. 

‘धादांत खैरलांजी’ म्हणजे खैरलांजी प्रकरणाची पुनर्भेट नव्हे. खैरलांजीतल्या घटनेचं हे रंगमंचावरलं सादरीकरण नाही. नाटकाच्या सुरुवातीच्या पानातच याचा अंदाज आला आणि बरं वाटलं. घटनेचं सादरीकरण नसलं तरी नाटकाला खैरलांजीमध्ये घडलेल्या त्या भीषण प्रकाराचा संदर्भ अर्थातच आहे. 

वैशाली आणि अमिताभ या पुरोगामी दांपत्याच्या जीवनात घडलेल्या लहानशा वादळाची ही गोष्ट आहे. खैरलांजी प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेले वैचारिक, राजकीय वातावरण याच्याशी या कथेचा काही प्रमाणात संबंध आहे किंबहुना संपूर्ण नाटकावर त्या अन्यायकारक घटनेची आणि प्रशासनानं ज्या निर्दयपणे या घटनेची हाताळणी केली त्या गैरव्यवहाराची छाया आहे... खैरलांजी प्रकरणावर सिनेमा काढण्याच्या उद्देशाने एक निर्माता दांपत्याच्या घरात प्रवेश करतो आणि त्यातून ‘धादांत खैरलाजी’ मधलं नाट्य आकार घेऊ लागतं. सिनेमावाले नेहमी ताज्या विषयाच्या शोधात असतात. जनमानसात बोलबाला असलेल्या घटनांवर त्यांना सिनेमा बनवायचा असतो. तो त्या घटनांविषयी त्यांना विशेष आस्था, कळकळ असते म्हणून नाही. आपण सदर प्रकरणाकडे एक कमर्शियल वस्तू म्हणून पाहात नसून सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून आपल्याला हे प्रकरण पडद्यावर आणायचं आहे असं हे सिनेमावाले खुशाल सांगू द्यात; त्यांचा मूळ हेतू घटनेविषयी जनमानसात असलेल्या कुतूहलाचं, भाव-भावनांचं, वेदना-संवेदनांचे भांडवल करणं हा असतो. 

अर्थात हे सर्वसाधारण निरीक्षण झालं. वास्तवाचं कलाकृतीत रूपांतर करू पाहणारे सर्व अप्रामाणिक असतात असं म्हणता येणार नाही. ‘धादांत खैरलांजी’ मधला खैरलांजीवर सिनेमा बनवायला निघालो इसम मात्र तद्दन व्यावसायिक नजरेतून या घटनेकडे पाहतोय हे त्याच्या संवादातून स्पष्ट होतं. 

निर्मात्याला सिनेमाची पटकथा अमिताभ बनसोडेंकडून लिहून हवी आहे. मात्र हे काम देण्यापूर्वी त्यानं स्वत: मनातल्या मनात सिनेमाची रूपरेषा तयार केली आहे. ती तो अमिताभना ऐकवतो. खैरलांजीवर सिनेमा काढू पाहणाऱ्यांचं खरं रूप त्याच्या या निवेदनातून आपल्यासमोर येतं. पटकथेत एक प्रेमप्रकरण असावं असा त्याचा आग्रह आहे. अमिताभ त्याची ही अफलातून कल्पना ऐकून घेतात. पत्नी वैशालीला मात्र राहावत नाही, ती त्यांच्या या कल्पनेला विरोध करते-खैरलांजीसारख्या गोष्टीवर सिनेमा बनवताना अशा गोष्टींची गरजच काय असं तिचं म्हणणं. कोणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावं अशीच वैशालीची ही भूमिका असते.

या निर्मात्याला हात जोडून दाराचा रस्ता दाखवला असता तर नाटक इथंच संपुष्टात आलं असतं. पण तसं घडत नाही. अमिताभ सुबुद्ध नसतो असं नाही पण वैशालीच्या तुलनेनं तो अधिक सोशिक, अधिक सहिष्णू आणि शांत स्वभावाचा असतो.

अमिताभ शांतपणे निर्मात्याचं म्हणणं ऐकून घेतो. कथानकात प्रेम प्रकरण आणण्याची सूचना तो वरकरणी मान्य करतो तेव्हा त्याच्यासमोर वेगळे हिशेब असतात. कथेत प्रेमप्रकरण आणायचं पण त्याचा वापर सवंगपणे न करता खैरलांजी प्रकरणातून पुढं आलेले मुद्दे अधिक भेदकपणे मांडण्यासाठी करायचा असं अमिताभ मनाशी योजतो.

हे सर्व चालू असताना वैशालीच्या महाविद्यालयातल्या घडामोडींमुळे एक वेगळं तणावपूर्ण नाट्य वैशालीच्या आयुष्यात आकाराला येत असल्याचं सूचित होत राहातं. हळूहळू ते नाटकाचा मुख्य भाग बनून जातं. या नाट्याचा संबंध दूरान्वये खैरलांजी प्रकरणाशी आहे. वैशालीनं खैरलांजी घटनेसंदर्भातल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यानं महाविद्यालयाचं व्यवस्थापन तिच्यावर नाराज असतं; कोणत्या तरी किरकोळ मुद्याचं निमित्त करून व्यवस्थापन वैशालीची कोंडी करायचे प्रयत्न सुरू करतं. 

मानवी समस्या एकात एक गुंतलेल्या असतात. सामाजिक घटना कौटुंबिक वातावरणात खळबळ निर्माण करू शकतात आणि कार्यकर्त्यांच्या घरातील कौटुंबिक ताण-तणाव त्याच्या सामाजिक कार्यावर परिणाम घडवून आणू शकतात. ‘धांदांत खैरलांजी’ नाटकात या दोन भिन्न वास्तवांची सरमिसळ आहे आणि ती वरकरणी भिन्न असली तरी व्यक्तिगत पातळीवर एकात एक मिसळलेली आढळते. माणसाचं कौटुंबिक विश्व आणि व्यावसायिक विश्व या दोन स्वतंत्र गोष्टी नसतातच.

नाट्यवस्तूंची बैठक केवळ इथं मांडली आहे; त्यातला तपशील टाळला आहे. प्रज्ञा पवारांच्या या नाटकाची समीक्षा यथावकाश नाट्यसमीक्षक करतीलच. खैरलांजीसारख्या वास्तव घटनेला कारणीभूत ठरलेलं जातीय पर्यावरण खेडोपाडी अजूनही आहे. निरनिराळ्या स्वरूपात त्याचे उद्रेक होत राहतात. शहरातल्या समाजाला व्यक्तिगत पातळीवर जातीय मानसिकतेच्या झळा लागत असतात. या वास्तवाच्या नाट्य- रूपांतराचं हे केवळ अवलोकन आहे. वास्तविक या नाटकात रूढ अर्थानं खैरलांजी नाहीच, त्या घटनेचं भांडवल करून आपली तुंबडी भरू पाहणारे लोक आहेत; खैरलांजीचं निमित्त करून आपल्या अवतीभोवती चाललेल्या अन्यायाचं, शिक्षणसंस्थेतल्या दहशतवादाचं जे चित्रण प्रज्ञा पवार यांनी या नाटकात केलं आहे ते महत्त्वाचं आहे.

प्रामाणिक माणसांना संपवून टाकणारा हा दहशतवाद निष्पाप माणसाला जिवंत जाळण्याइतकाच भयानक आहे. स्पष्टवक्तेपणाची जबर किंमत आज संस्थांत काम करणाऱ्या प्रत्येक सुजाण, सत्प्रवृत्त नागरिकाला चुकवावी लागते आहे.

आर्थिक गरज साऱ्यांची कोंडी करते; आणि त्या गरजेपोटी कितीतरी जणांना नोकरीच्या ठिकाणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. वैशाली या मनस्वी प्राध्यापिकेचा वरिष्ठांनी केलेला मानसिक छळ मांडून आजचं सामाजिक वास्तव रंगभूमीवर आणायचा प्रयत्न प्रज्ञा पवारांनी केला आहे. वरिष्ठांच्या कृष्ण कारवाया एकीकडे आणि दुसरीकडे सहकारी प्राध्यापकांनी त्यांना दिलेली साथ यामुळे वैशालीची जी घुसमट होते ती वैशालीइतकीच आपल्याला अस्वस्थ करून सोडते.

नाटककारानं रंगवलेलं वैशालीचं व्यक्तिमत्त्व लढाऊ आहे. सामाजिक चळवळीत तिनं सक्रिय भाग घेतला आहे. सामाजिक अन्याय दूर करण्यासाठी झटणारी वैशाली; तिच्यावर व्यक्तिगत अन्याय होतो; नोकरी गमावण्याची पाळी येते तेव्हा असहाय बनून गेलेली दिसते. आपली सर्व बाजूने कोंडी करण्याचं सामर्थ्य व्यवस्थेत आहे हे तिच्या लक्षात येतं. थेट भाष्य किंवा निष्कर्षसूचक विधान न करता नाटककारानं, नाट्यतंत्राचा बऱ्यापैकी वापर करून हे वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. त्यासाठी नाटककाराला कुठेही मेलोड्रामाची मदत घ्यायची गरज भासली नाही. व्यक्तिरेखांची अतिवास्तव ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा निर्माण करायची गरज भासली नाही. 

नाटकातल्या सगळ्या घटनांना जातीय परिमाण आहे. पण नाट्यगत विधान करताना लेखिकेनं जात-वास्तवावर भर दिलेला नाही. इथली झुंज प्रामुख्यानं राजकीय ताकद लाभलेली मूल्यहीन व्यवस्था आणि मानवी मूल्यांचा आग्रह धरणारा बुद्धिवादी नागरिक यांच्यात आहे.

संवेदनशील असूनही समरप्रसंगी ठाम बाजू घेऊन व्यवस्थेविरुद्ध उभं राहायला कचरणारा नाटकातला आकाश हा तरुण आजच्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणता येईल. त्याला वाटणारी असुरक्षितता ही समाजातल्या विघातक शक्तींचं खरंखुरं भांडवल आहे. ठाम भूमिका घ्यायला डगमगणारे आकाशसारखे तरुण अप्रत्यक्षरित्या भ्रष्ट समाजव्यवस्थेचे हितसंबंध सांभाळत असतात, हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही. लढाऊ वैशाली आणि तिचा मित्र यांच्यातल्या स्नेहसंबंधाची कारणं नाटकात हाताशी लागत नाहीत. कोणत्या समान तत्त्वांवर या दोघांमधली मैत्री आधारित आहे हे कळत नाही. आपल्याला कोड्यात टाकणारी मित्रत्वाची अनेक नाती आपण समाजात पाहतो, त्यामागे ना लैंगिक जाणीवेचं परिमाण ना वैचारिक समानतेचं अवधान. वैशाली-आकाश यांची मैत्री हा यापैकीच एक प्रकार मानला तर समाज वास्तवातील हाही बारकावा नाटककारानं चांगला टिपला आहे असं म्हणता येईल.

लढाऊ बाण्याची वैशाली आणि चळवळीच्या सहवासात वाढलेला तिचा जोडीदार अमिताभ ही तशी अपवादात्मक माणसं आहेत. वैशालीला महाविद्यालयात ज्या अपमानास्पद प्रसंगांना तोंड द्यावं लागलं तसे प्रसंग इतरांवर ओढवत नसतील असं नाही. पण त्यांची प्रतिक्रिया वैशालीप्रमाणे होत नाही. बोटचेपे धोरण स्वीकारून, वरिष्ठांकडून केले जाणारे अपमान गिळून जगणारी माणसं समाजात विपुल आहेत. संवेदनशील असणं, अन्यायानं उसळून उठणं हा माणसाला मिळालेला शाप आहे की काय असं अशावेळी वाटू लागतं.

वैशाली या शापाची बळी आहे. प्रतिकूल वातावरणात लढताना प्रत्येक पातळीवर तिला होणारा मनस्ताप लेखिका आपल्यापर्यंत आणते. रस्त्यावरले लढे तिला स्वतःवरला अन्याय दूर करायला उपयोगी पडत नाहीत. खासदाराच्या हस्तक्षेपानं त्यांच्यावरला अन्याय चुटकीसरशी दूर होतो हे तर खूप छान मांडलं आहे. सामाजिक सत्य मांडताना प्रज्ञाबाई समाज चळवळींकडे रोमँटिक दृष्टिकोनातून पाहात नाहीत. त्यांचा कल वास्तवाचं यथार्थ दर्शन घडवण्याचा आहे.

वास्तवाचं साहित्यकृतीत भाषांतर करताना आपल्या पहिल्यावहिल्या नाटकात त्यांनी दाखवलेली परिपक्वता प्रशंसनीय आहे. आजूबाजूला दिसतात अशाच हाडामासाच्या व्यक्तिरेखा प्रज्ञाबाईंनी नाटकात उभ्या केल्या आहेत. नाट्यात्मक परिणाम साधण्यासाठी व्यक्तिरेखांना मुद्दाम धार लावण्याचा प्रयत्न इथं आढळत नाही. संवादात कुठेही भाषिते पेरणं नाही, माणसं माणसासारखी बोलतात. यात विशेष काय असं ज्यांना वाटत असेल त्यांनी मुख्य प्रवाहातली मराठी नाटकं किंवा टीव्ही सिरियल पाहाव्यात. महाविद्यालयात जे घडलं त्याचं निवेदन ऐकवण्यापेक्षा तिथली प्रत्यक्ष चर्चा रंगमंचावर आणता आली असती तर ती अधिक परिणामकारक ठरली असती, अंगावर येणारी ठरली असती; वैशालीच्या भूमिकेतून लेखिका आपल्याशी बोलते असे वाटणे हे ठीक आहे, पण घरगुती गप्पांमध्ये वैशाली-अमिताभ दरम्यानचे काही संवाद भाषणं दिल्याप्रमाणे लांबलचक झाले आहेत ते खटकतात. अशा स्वरूपाचे किरकोळ दोष नाटकात काढता येतील; पण हे दोष म्हणायचे, की नाटककाराकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा?

सामाजिक वास्तवाचे निरनिराळे तुकडे ‘धादांत खैरलांजी’ मध्ये पहायला मिळतात. यातून नाटककारानं समाजाचं जे फाटकं वस्त्र आपल्यापुढे धरलं आहे ते नाटकाला खैरलांजी प्रकरणापलीकडे घेऊन जातं. वास्तवाची समग्रता पकडण्याचा धीट आणि प्रांजळ प्रयत्न म्हणून प्रज्ञा पवारांच्या ‘धादांत खैरलांजी’ या नाटकाकडे पाहता येईल.

Tags: नाटक सामाजिक वास्तव पुस्तके वाचन संस्कृती साहित्य अवधूत परळकर निमित्त खैरलांजी प्रकरण weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके