डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सांस्कृतिक सोहळे आणि सोहळे-संस्कृती

हिंदी चित्रपटातील मोलकरीण, घरगडी, पोलीस हवालदार या व्यक्ती पडद्यावर मराठी भाषेतून बोलतात. त्यातून भाषा आणि समाजाचा आर्थिक स्तर यांचं नातं हिंदी सिनेमावाले खोडसाळपणे आपल्याला दाखवत राहतात. रेल्वेस्टेशनला, विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं की मराठी समाजाविषयीचं आपलं सांस्कृतिक कर्तव्य पार पड़लं अशी खुळचट समजूत असणाऱ्यांना या गोष्टी समजत नसतील तर कुणीतरी त्या त्यांच्या निदर्शनाला आणून यायला पाहिजेत.

त्यांच्याकडला 'ऑस्कर' पुरस्कार वितरण सोहळा आणि आपल्याकडला 'फिल्मफेअर’ पुरस्कार वितरण सोहळा यांच्यातलं एकमेव साम्य म्हणजे दोन्ही सोहळे इंग्रजी भाषेतून चालतात.

इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं 

फिल्मफेअरसारख्या हिंदी भाषक चित्रपटांचा पुरस्कार वितरण सोहळा इंग्रजी भाषेतून चालावा हा प्रचंड विनोद आहे. आपल्याच देशात असे विनोद घडू शकतात. समारंभाचे निवेदन करणाऱ्याला, पारितोषिक स्वीकारणाऱ्या कलावंताला हिंदी भाषा अवगत नसते अशातला भाग नाही. पण इंग्रजी भाषा बोलणं हे आपल्याकडे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. साहजिकच व्यासपीठावरल्या व्यक्तींना आपले विचार हिंदीतून व्यक्त करायची लाज वाटते.

हिंदी चित्रसृष्टीत मोलकरीण, घरगडी, पोलीस हवालदार या व्यक्ती पडद्यावर मराठी भाषेतून बोलतात. त्यातूनही भाषा आणि समाजाचा आर्थिक स्तर यांचं नातं हिंदी सिनेमावाले खोडसाळपणे आपल्याला दाखवत राहतात. अर्थात त्यांना अभिप्रेत असलेलं नातं रेल्वेस्टेशनला, विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं की मराठी समाजाविषयीचं आपलं सांस्कृतिक कर्तव्य पार पडलं, अशी खुळचट समजूत असणाऱ्यांना या गोष्टी समजत नसतील, तर कुणीतरी त्या त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायला पाहिजेत. 

हिंदी चित्रपट निर्मात्यांचं हे भाषिक धोरण वास्तवाला धरून नाही हे कुणीतरी सांगायला हवं. फार मोठा मराठी समाज अमराठी समाजाच्या घरी भांडी घासतोय अशी परिस्थिती अजून उद्भवलेली नाही. असो. पुन्हा ऑस्कर सोहळ्याकडे वळू या. फिल्मफेअर आणि ऑस्कर सोहळ्यातलं साधर्म्य फक्त भाषेपुरतं मर्यादित नसतं तर बरं झालं असतं. ऑस्कर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा कमालीचा शिस्तबद्ध, देखणा आणि नेटका समारंभ आहे.

तुलनेनं फिल्मफेअर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम भोंगळ आणि बेशिस्त समारंभ आहे. अलीकडे दोन्ही समारंभाचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर पाहायला मिळत असल्यानं अशा गोष्टी सर्वसामान्यांसमोर येऊ लागल्या आहेत. परवाच्या ऑस्कर सोहळ्याचं सूत्रसंचालन व्हूपी गोलबर्ग या निग्रो अभिनेत्रीनं केलं. व्हूपीचे व्यासपीठावरले प्रवेश, सहजसुंदर विनोदी भाष्ये करण्याची क्षमता, शब्दफेक सर्व इतकं विलक्षण होतं की आपल्याकडल्या सर्व सूत्रसंचालकांनी बाकावर बसून व्हूपीकडून धडे घ्यावेत.

सौंदर्याच्या रूढ संकल्पनेत बसावं असं सौंदर्य या नटीपाशी नाही. पण ती जसजशी बोलत गेली तसतशी अधिकाधिक सुंदर दिसत गेली. किती कमी लोकांना ही कला अवगत आहे ? ऑस्कर सोहळ्यातील भव्यता, दिव्यता आणि तांत्रिक करामती दीपवून टाकणाऱ्या होत्या. तशा त्या नेहमीच असतात. पण संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनातला आखीव-रेखीवपणा अधिक नेत्रदीपक होता. प्रेक्षकांत बहुसंख्येनं चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते होते आणि प्रत्येक जण नेमून दिलेल्या जागी आसनस्थ होता. फिल्मफेअर सोहळ्यात पहिल्या रांगा प्रायोजकांच्या नातेवाइकांनी, मंत्री, आमदार-खासदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अडवलेल्या आढळतात. विजेत्याचं नाव घोषित होताच कॅमेरा अंधारात प्रेक्षकांच्या गर्दीत त्याचा शोध घेत भटकतो.

सुनियोजित व्यवस्थापनाच्या अभावी इथं कॅमेरामन, निवेदकापासून सर्व जण गोंधळलेले. व्यवस्थापकांची सर्व शक्ती व्हीआयपी मंडळींचं आदरातिथ्य करण्यात खर्च झाल्यानं हे सगळं अपरिहार्य असतं. शासकीय अधिकाऱ्याला जागा देण्यासाठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांना पहिल्या रांगेतून उठवून मागच्या रांगेत बसवण्याचा प्रकार अलीकडे वृत्तपत्रांत वाचायला मिळाला. विशेष म्हणजे या बातमीनं कुणाला फारसा धक्का बसल्याचं जाणवलं नाही. ‘चालायचंच’, अशा उद्गारानं वाचकांनी हे कृत्य स्वीकारल्याचं दिसलं. तेव्हा हे असंच चालणार. 

समारंभातला भोंगळपणा 

सार्वजनिक सभासमारंभांतला भोंगळपणा, बेशिस्त यांचं लोकांना काही वाटेनासंच झालं आहे. वक्तशीर पाहुणे आणि वक्तशीरपणा हा आता चेष्टेचा विषय होऊन गेला आहे. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना हार घालणं, व्यासपीठावर आसनस्थ होणाऱ्या माणसांना फेटे बांधणं यांसारख्या निरर्थक रिवाजांत समारंभाचा मोलाचा वेळ वाया जातो. अहवालवाचन, वक्त्यांचा परिचय, आभार प्रदर्शन यांतही नेमकेपणा आणि नेटकेपणाचा अभाव. त्यामुळे सर्व समारंभ अघळपघळ शैलीत चालतो.

अघळपघळपणा हे आपल्या एकूणच जीवनशैलीचं वैशिष्ट्य बनत चाललं आहे. पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदावर असलेली आणि अमोघ वक्तृत्वशैलीबद्दल बोलबाला असलेली व्यक्तीदेखील दोन वाक्ये उच्चारायला दोन मिनिटे घेते. भाषणासाठी नेमून दिलेल्या वेळेत भाषण पूर्ण करणारा वक्ता अजून जन्माला यायचा आहे. अध्यक्षांनी घंटी वाजवल्यावर आवरतं घेण्याचं सौजन्यही अनेकांपाशी नसतं. या पार्श्वभूमीवर पुन्हा पुन्हा ऑस्कर वितरण सोहळ्यातील विजेत्या कलावंतांच्या उत्स्फूर्त आणि नेमक्या शब्दांतल्या प्रतिक्रिया आठवत राहतात. 

अभिनय हा व्यवसाय असणाऱ्या या कलाकारांनी ही वक्तृत्वकला कधी आत्मसात केली असा प्रश्न पडतो. फिल्मफेअर आणि ऑस्कर सोहळ्यांतला भेद सांगताना बेहराम कॉन्ट्रॅक्टरनी आपल्या स्तंभात म्हटलं होतं, ‘‘त्यांच्याकडले सिनेकलावंत हे 'अ‍ॅक्टर' असतात तर आपल्याकडले कलावंत 'डान्सर' असतात.’’ काही अपवाद नजरेआड केले तर बेहराम यांचं हे भाष्य वस्तुस्थितीचं चपखल वर्णन आहे. उथळपणा हे सिनेसमारंभांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य बनून गेलं आहे. दिवसेंदिवस पुरस्कार वितरण सोहळे जसे वाढताहेत तसा हा उथळपणाही वाढत चालला आहे. प्रत्येक दूरचित्रवाणी वाहिनीला, सांस्कृतिक संस्थेला सिनेकलेला उत्तेजन देण्याची तळमळ लागून राहिली आहे.

सिनेकलावंतांवर पारितोषिकांची खैरात करण्यासाठी आणि संपूर्ण समारंभाचं दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यासाठी अमाप पैसा उधळला जातो आहे. मद्य, पानमसाला, सिगारेट बनवणाऱ्या कंपन्यांची मदत घेऊन हे श्रीमंत सोहळे चालू आहेत. उत्पादनांच्या किमतीत वाढ करून कंपन्या या सवंग उपक्रमासाठी लागणारा पैसा आपल्याच खिशातून काढतात. म्हणजे आपल्याच पिळवणुकीला आपण टाळ्या वाजवून उत्तेजन देत आहोत. पुरस्कारांचं हे पीक सिनेक्षेत्रापुरतं मर्यादित आहे अशातला भाग नाही. गेल्या वीस वर्षांत साहित्यनिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढली आहे. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ आणि वयोवृद्ध साहित्यिकांना हे पुरस्कार दिले जातात. बहुतेक वेळा या व्यक्ती नाना प्रकारे सन्मानित झाल्या असल्यानं त्यांच्या घरी पारितोषिकांची, शाली आणि मानपत्रांची गर्दी झालेली असते.

हास्यास्पद उपक्रम

नोबेल पुरस्कार मिळाल्यावर भारतरत्न देणे, ज्ञानपीठ मिळालेल्या व्यक्तीचा नागरी सन्मान करणे, नगरपालिकेकडून सन्मान झालेल्या व्यक्तीचा तिच्या ज्ञातिबांधवांनी सत्कार करणे असे हास्यास्पद उपक्रम आपल्या देशात सरसकट सुरू असतात. प्रत्येक समारंभातील फुलांची नासाडी, वेळेचा अपव्यय चीड आणणारा असतो. फुलांचे गळे आवळून त्यांना प्लॅस्टिकच्या आवरणात कोंडून संयोजक काय साधतात कळत नाही. अगदी पर्यावरण प्रेमिकांचे स्वागतही अशा क्रूर पद्धतीनं करण्यात येतं.

सभा-समारंभांतील या औपचारिक रिवाजांविरुद्ध आणि एकूणच पुरस्कार सोहळ्यातील सवंगतेविरुद्ध कुणीतरी बंड पुकारण्याची गरज आहे. पण अशा प्रकारचं बंड यशस्वी होऊन समारंभातील दांभिकता आणि गलथानपणा नष्ट झाला तर उद्या या बंडखोर व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी एखादी संस्था पुढे यायची आणि साग्रसंगीत सत्कार समारंभ आयोजित करायची! सोहळे आणि समारंभाला सोकावलेल्या सामाजिक संस्थांकडून दुसरं काय अपेक्षित आहे ? थोर व्यक्तींचा गौरव करण्याची दुसरी पद्धतच त्यांना सुचत नाही. संपूर्ण देश प्रत्यक्ष कार्यापेक्षा सभा-समारंभांतूनच पुढे सरकतो आहे.

Tags: राजकीय सोहळे नियोजनशून्य फिल्मफेअर ऑस्कर - नियोजनयुक्त सोहळे संस्कृती वैचारिक political ceremony fimfare - unplanned oscar - wellplanned ceremony culture idiological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके