डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थ्यांनी केलेल्या एका विज्ञान- प्रकल्पाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. प्रकल्प थेटपणे जलप्रदुषणाशी भिडत होता. तो होता गणपती विसर्जनाने पाण्याच्या शुद्धतेला पोचणाऱ्या हानिबाबत. निष्कर्ष स्पष्ट आहेत पण आपल्या समाजाचे श्रद्धावान (!)  मन ते स्वीकारणार का?  हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.

परळच्या कारदार स्टुडिओत पुर्वी एक विहीर होती. परळमधल्या घरगुती गणपतीचं विसर्जन या विहिरीत व्हायचं दर वर्षी शेकड्यानं गणपती बुडवले जायचे. मला प्रश्न पडायचे गणपती बुडवल्यानं विहिरीच्या तळाशी किती गणपतींची माती साचली असेल? या मातीमुळे विहिरीतल्या पाण्याचे झरे बंद तर होणार नाहीत?

गणपती, माती आणि प्लॅस्टर

निरंजन करंदीकर, वरुण चौबळ, अमोघ वैशंपायन, देवदत्त जोशी या ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच एक विज्ञानप्रकल्प सादर केला. प्रकल्पाला राज्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आता हा प्रकल्प चेन्नईच्या बालविज्ञान मेळाव्यात पाठवण्यात आला आहे. म्हणाल या सगळ्याचा गणेश विसर्जनाशी संबंध काय? तर आहे. नवव्या इयत्तेतल्या या मुलांनी तलावात गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाचा पद्धतशीर अभ्यास केला आणि काही खळबळजनक अनुमानं काढली. ठाण्यातला मासुंदा तलावाचा निसर्गरम्य परिसर यासाठी निवडला. काय आढळलं त्यांना या अभ्यासात? गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जनानंतर या तलावात 21,600  किलोग्रॅम गणपतीची माती सापडली. (20,500 किलोग्रॅम प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि 1,150 किलोग्रॅम रंगद्रव्य) पोलीस खाते आणि गणेशमूर्तिकार यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांनी ही आकडेवारी गोळा केली. मातीच्या थराचे आणि रंगांतील विषारी द्रव्याचे प्रमाण तपासले तेव्हा परिस्थिती भीषण असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. 

विज्ञान हे श्रद्धेच्या विरोधात नाही किंवा विज्ञानाशी श्रद्धेचं भांडण नाही असा विचार काही लोक मांडत असतात. सरस्वती हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा ‘मासुंदा तलाव विज्ञान प्रकल्प' त्यांना आपल्या मतांचा फेरविचार करायला लावणारा आहे.

श्रद्धाळू लोकांची आक्रमणे

आपला देश श्रद्धावान आणि अश्रद्ध अशा दोन समाजगटात विभागला गेला आहे. सामाजिक आरोग्याला बाधा आणणाऱ्या अनेक गोष्टी श्रद्धाळू समाज कळत नकळतपणे करत असतो. श्रद्धावान मंडळींच्या भावनांची कदर करून अश्रद्ध समाज त्या सहन करत असतो. 

ईश्वरी श्रद्धांचं सामूहिकरूप निश्चितपणे समाजस्वाथ्य बिघडवणारं आहे. शहरापुरता विचार केला तर हिंदूंच्या महाआरत्या, सत्यनारायणाच्या महापुजा, गणेश मिरवणुकीत वाजवला जाणारा ताशा, ढोल, पिपाण्या, गणेश मिरवणुकीतले मोठ्या आवाजाचे फटाके, मुस्लिमांच्या ताबूताची मिरवणूक, पहाटेच्या वेळी लाऊड स्पीकरवरून केल्या जाणाऱ्या प्रार्थना हे सर्व काय आहे?

तर श्रद्धाळू लोकांपेक्षा नास्तिक आणि अश्रद्ध लोक अधिक सहिष्णू आणि सहनशील असतात असा अनुभव आहे. मासुंदा तलाव संदर्भातल्या वैज्ञानिक पाहणीचं उदाहरण घ्या. एका धार्मिक सोहळ्यामुळे एक सुंदर तलाव गढूळ आणि मलिन होतो है वैज्ञानिक सत्य आहे. ते जाहीरपणे मांडलं तर धर्मवादी चवताळणार. सर्वधर्म शांतता, संयम आणि अहिंसेचा पुरस्कार करतात. धर्मप्रेमी लोकांचं वर्तन मात्र संयम बिसरणारं आणि अहिंसक कृत्यांची मागणी करणारं. 

शांतताप्रेमी नास्तिक समाज संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली चालणारा असंस्कृत गोंगाट सहन करीत आला आहे. आस्तिकांच्या धार्मिक सोहळ्यांमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणारे अडथळे नास्तिक लोक सहजीवनाच्या भावनेतून दुर्लक्षितात. आस्तिकांना मात्र नास्तिकांची बरीवाईट टीका सहन होत नाही. लगेच चोप देण्याची, तोंडाला काळे फासण्याची दमबाजी सुरू होते. या उलट अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या बहुतेक चळवळी शांततामय आहेत; हे मुद्दामहून सांगायला हवं.

विद्यार्थ्यांचे पर्याय

पुन्हा मासुंदा तलावाकडे वळूया. अंधश्रद्धेमुळे या तलावाची नासाडी होत असल्याचा स्पष्ट निष्कर्ष विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन अहवालात नोंदवला आहे. नासधूस थांबवायचे उपायही या विद्यार्थ्यांनी सुचवले आहेत. 

उदाहरणार्थ, मूर्ति विसर्जन वाहत्या पाण्यात केले जावे; स्थिर जलाशयातील मूर्तिविसर्जन थांबवावे; कायमस्वरूपी मूर्ती घरात बाळगावी; गणेश चतुर्थीला तिची प्राणप्रतिष्ठा करावी; मूर्ती मातीच्या असल्यास त्यांचा आकार कमी ठेवावा, रंगकामासाठी वनस्पतिजन्य रंगद्रव्य वापरावीत इत्यादी. 

कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती तयार करता येते का हे अजमावून पाहायचं काम विद्यार्थी सध्या करीत आहेत. म्हणजे त्यांचा एकूण प्रयत्न समतोल साधण्याचा आहे हे यावरून लक्षात येईलच.

धार्मिक श्रद्धांचा पुनर्विचार हवाच

पण दगडाला शेंदूर फासून देव बनवणाऱ्या संस्कृतीला विद्यार्थ्यांच्या सूचना मानवण्या- सारख्या नाहीत. धर्मतत्वापेक्षा कर्मकांडाला महत्त्व देणारा आजचा समाज या सूचनांकडे समंजसपणे पाहील हे संभवत नाही. भक्तानं मनापासून झाडाचं पान अर्पण केलं तरी मी त्याचा स्वीकार करतो असे गीतेत श्रीकृष्णाने कितीही म्हटले तरी बाहेर ईश्वराला सोन-चांदी, भरजरी वस्रालंकार अर्पण करण्यासाठी रांगा लागतात. नवसाच्या नावाखाली देवाला लाच, बक्षिसी देण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. धर्माचा विपरीत अर्थ लावून राजकीय शक्ती म्हणून त्याचा वापर करणाऱ्यांबद्दल तर बोलायची सोय नाही. गणेशोत्सवात मिरवणुकांतून बीभत्स नृत्य करणाऱ्यांना धार्मिक पावित्र्याशी काय देणंघेणं असणार? 

थोडक्यात, आरोग्यदायी जीवन जगावंसं वाटत असेल तर श्रद्धा, धार्मिक रीतीरिवाज इत्यादींचा फेरविचार करावा लागेल असा संदेश नवव्या इयत्तेतील मुलांनी आपल्याला दिलेला आहे. प्रश्न असा की आजचा धर्मवेडा समाज हे ऐकणार आहे का? घरातल्या गणेश प्रतिमांचं पूजन करून गणेश चतुर्थीला त्यांची प्राणप्रतिष्ठा करता येईल. गणपती हे अखेरीस विद्येचं दैवत मानले जाते. बौद्धिक दृष्टिकोन समजून घ्यायला त्याला अडचण येऊ नये. याहून पुढं जाऊन बोलायचं तर मोठाल्या मूर्ती, भव्य विसर्जन सोहळे, ढोल-ताशे-झांजा हे सर्व कशासाठी? खऱ्या गणेशभक्ताला यांपैकी कशाचीही गरज नाही. खरं तर वर्षभरात दहा निरक्षरांना साक्षर केलं तर ती विद्येच्या देवतेची खरीखुरी पूजा ठरेल.

Tags: विद्यार्थी नास्तिक आस्तिक गणपती महोत्सव प्रदूषण Students Atheist Theist Ganesh Festival Pollution weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके