डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजात झपाट्याने पसरत चाललेला दहशतवाद आज आपल्या अंगणात येऊन पोचला आहे. उद्या तो घरात शिरेल तेव्हा साहित्यिकांची घरे टाळून पुढे सरकणार नाही. पण साहित्यिकांनाच निर्भय बोलण्या वागण्याने भय वाटू लागले आहे तिथे इतरांचे काय?.... चांगल्या शक्तींनी एकत्र येऊन वाईट शक्तींविरुद्ध झुंज द्यावयाची आज कधी नव्हे एवढी गरज आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे, त्यांचा नियमित पुरवठा करणे राज्यातल्या जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे, प्रवासी आणि मालवाहतुकीच्या सोयी निर्माण करणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे या अशा खूप कठीण आणि किचकट गोष्टी आहेत. थिएटरवर दगड मारून सिनेमा बंद पाडणे त्या मानाने खूप सोपी गोष्ट आहे. सिनेमा बंद पाडायला आजकाल फार माणसंही लागत नाहीत, पंधरावीस तरुण टाळकी आणि तितकेच दगड या कार्यासाठी पुरे असतात. चार-पाच काचा फुटल्या, एक दोन पोस्टर टरकावली की थीएटरचा मालक घाबरून जातो . तो गुंडांच्या हातापाया पडू लागतो. किल्ला सर करावा तसं थिएटर सर करत गुंडांचे टोळके दुसऱ्या थीएटरच्या मोहिमेवर निघते. 

सगळीकडे दगड मारावे लागत नाहीत. काही थिएटरमालक समंजस असतात. जाळपोळीच्या शाब्दिक धमक्यांनीदेखील काम भागतं. हे सगळे राजरोसपणे लोकशाहीच्या नाकावर टिच्चून चालतं याचं कारण गुंडांना राजकीय आश्रम असतो. मामला संसदेत गेला तरी घाबरून जायचं कारण नसते कारण संसदेतही गुंडांचे प्रतिनिधी असतात. मूठभर समाजकंटकांनी हिंसक मार्गाने सिनेमा बंद पाडण्याचा हा प्रकार ‘स्थानिक जनतेच्या संतप्त भावनांचा आविष्कार’ म्हणून पेश केला जातो. कोण हे स्थानिक लोक त्यांची संख्या किती ; सिनेमा पाहण्याची इच्छा असलेल्यांची संख्या किती असे प्रश्न विचारले जात नाहीत. मंत्रिमहोदयांच्या मनातही असे सवाल येत नाहीत.

चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी संरक्षण पुरवायचे सोडून मूठभर गुंडांची झुंडशाही म्हणजेच देशवासियांची प्रतिक्रिया असल्याच्या थाटात चित्रपट सेन्सॉरकडे पुनर्विचारासाठी पाठवण्यात येतो. गृहखाते आणि पोलीस नावाची संस्था या देशात आहे की नाही असा संशय यावा असे हे प्रकार. पोलीसखात्यातला भ्रष्टाचार पोलिस कारभारातला राजकीय हस्तक्षेप जगजाहीर आहे. त्यावर स्वतंत्रपणे विचार व्हायला हवा. आश्चर्य वाटते ते देशात मोठ्या संख्येने असलेल्या सामान्य नागरिकांचे. शहरातल्या सुशिक्षित समाज कार्यकर्त्यांचे, चर्चा-परिसंवादात हिरिरीने मत मांडणाऱ्या बुद्धिमतांचे आणि ‘गर्जा जयजयकार’ म्हणणाऱ्या साहित्यिकांचे. अशा वेळी ते नेमके कोणत्या गुहेत दडलेले असतात? 

मूठभर गुंडांनी थिएटरवर हल्ला करून सेन्सॉरसंमत झालेला चित्रपट बंद करायला लावणे ही घटना म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमणाचे ठळक उदाहरण आहे असे त्यांना वाटत नाही का? मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल कंठ दाटून बोलणारे आमचे साहित्यिक ‘मराठी’ सिनेमा बंद पाडण्यात आला तरच सात्विक संतापाने पेटून उठणार की काय? अर्थात केवळ साहित्यिकांना वेगळे काढून त्यांच्यावर दोषारोप करण्यात मतलब नाही. स्वातंत्र्याची ही लढाई त्यांची एकट्याची नाही. चित्रकार, चित्रपटनिर्माते, वादक, गायक, नर्तक नाट्यकलावंत, नाट्यनिर्माते अशा सर्वांनी एकत्रितपणे ती लढायला हवे, कलेशी सोयरसुतक नसलेल्या माथेफिरुंची टोळी ही आपल्या शत्रूस्थानी आहे हे नीट उमजून त्या घटनेनंतर सर्व कलावंतांची फौज रस्त्यावर उतरली असती तर सरकार इतक्या बेपर्वाईने वागले नसते. सदर चित्रपट पुन्हा सेन्सॉरकडे पुनर्विचारार्थ पाठवायचा गाढवपणा मंत्र्यांनी केला नसता. नेतेमंडळींनाही लोकांना भारतीय संस्कृतीचे धडे देण्याची हिंमत झाली नसती.

साहित्यिकांना राजकारणाविषयी असलेली अनास्था समजू शकते. पण अनेकदा मानवतावादी भूमिकेला राजकीय भूमिका मानायची गल्लत साहित्यिक का करतात समजत नाही. गुंडगिरीचा शाब्दिक निषेध करणे ही राजकीय कृती कशी म्हणता येईल. राजकारणाशी अशा गोष्टींचा संबंध काय? राजकीय आश्रयामुळे कलाक्षेत्रातील गुंडगिरी फोफावते आहे हे खरे आहे. पण म्हणून गुंडगिरीशी केलेला सामना हा सत्ताधाऱ्यांशी दिलेला लढा ठरत नाही. 

नैतिक भूमिका जाहीर करायची आणि त्यानुसार कृती करायची वेळ आली की आपल्याकडील लेखक, कवी इतके का बुजावेत हे कळत नाही. अशा कृतीमुळे लगेच सरकारी सोयी-सवलती बंद होतात असेही काही नाही. पंचाईत झाली तर ती शासनाचीच होते. साहित्यिक समाजातले मानदंड समजले जातात. शासनाला त्यांच्याविरुद्ध अशिष्ट भूमिका घेता येत नाही . जेव्हा जेव्हा शासनाने हे धाडस केले तेव्हा शासनाची नाचक्की झाली आहे. तेव्हा साहित्यिक सरकारशी वैर करू शकतात, शासन मात्र साहित्यिकांशी वैर धरून कारभार करू शकत नाही. अशी वास्तविक परिस्थिती आहे. कधीकधी वाटते समाजात झपाट्याने पसरत चाललेल्या दहशतवादाकडे साहित्यिकांनी पुरेशा गांभीर्याने पाहिलेले नाही. कालपरवापर्यंत दूर रस्त्यावर असलेला दहशतवाद आज आपल्या अंगणात येऊन पोचला आहे. उद्या तो घरात शिरेल तेव्हा साहित्यिकांची घरे टाळून पुढे सरकेल असे आमच्या प्रतिभावंतांना वाटते की काय ?

सामाजिक समस्या म्हणून नव्हे तर स्वतःची कातडी बचावण्याच्या स्वार्थी भावनेतून तरी साहित्यिकांनी याचा विचार करायला पाहिजे. दुसऱ्याच्या घरावरील किंवा मालमत्ते वरील दगडफेक हे दहशतवादाचे प्राथमिक रूप आहे. साहित्यिकांनी केवळ वाङ्ममयीन क्षेत्रातील दहशतवादाविरुद्ध आवाज उठवावा हेही ठीक नाही. हुसेनच्या कलाकृतींवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद साहित्यक्षेत्रात उमटायला हवे होते; गायन क्षेत्रातल्या कलावंतांनीही त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. सिनेक्षेत्रातल्या आजच्या झुंडशाहीविरुद्ध चित्रकारांनीही उभे राहायला हवे. याही पुढे जाऊन कलावंतांनी लोकशाही मूल्यांच्या बाजूने वेळोवेळी उभे राहून आपण विचारस्वातंत्र्य मोलाचे मानतो हे दाखवून द्यायला हवे. उदाहरणार्थ एकट्या दुकट्या नोकरशहावर किंवा समाजकार्यकर्त्यांवर जेव्हा गुंडाचे हल्ले होतात, तोंडाला काळे फासणे, उठाबशा काढायला लावणे यांसारखे प्रकार होतात तेव्हा सर्वच कलावंत, साहित्यिक आणि विचारवंतांनी एकजुटीने त्या असहाय्य व्यक्तीच्या बाजूने उभं राहून ती व्यक्ती ‘एकटी’ नाही हे समाजकंटकांना दाखवून दिले पाहिजे.

चांगल्या विचारांची, मूल्यांची एक प्रकारची दहशत समाजात निर्माण व्हायला हवी. चांगल्या शक्तींनी एकत्र येऊन वाईट शक्तींविरुद्ध झुंज द्यायला हवी या अर्थाचे विचार नाट्यसंमेलनाध्यक्ष भक्ती बर्वे यांनी अलीकडे ‘चतुरंग’ सोहळ्यात मांडले. सद्य परिस्थितीत आत्यंतिक महत्त्वाचे असे हे विचार आहेत. प्रतिष्ठित पदांवरल्या व्यक्तींनी वैचारिक अस्पष्टता आणि बुजरेपणाचा त्याग करून धिटाईने, रामशास्त्री वाण्याने आपले विचार मांडले तर भयभयीत समाजाला मोठा दिलासा मिळेल, सकस साहित्यनिर्मितीला, आणि विचार प्रकटीकरणाला निर्भय वातावरणाची किती गरज आहे हे ज्येष्ठ भाषाप्रमुखांना सांगायची गरज नाही. नवी पिढी आपले विचार मराठीतून मांडेल की इंग्रजीमधून याची काळजी करण्यापेक्षा ती विचार मांडू शकेल की नाही याची काळजी वाटावी असे वातावरण अवतीभोवती आहे. हे मात्र कुणीतरी त्यांच्या निदर्शनाला आणण्याची गरज आहे. साहित्यिकांना निर्भयपणे बोलण्या-वागण्याचे भय वाटू लागले आहे तिथे इतरांचे काय?

Tags: थिएटर साहित्यिक भक्ती बर्वे अवधूत परळकर Theatre Belletrist Bhakti Barve Avadhut Paralkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके