डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'अमेरिकन गुडन्यूज' वृत्तपत्राचा आपल्याकडील प्रयोग आज स्वप्नवत वाटत असेल पण नजीकच्या भविष्यात तो निश्चित आकाराला येईल. प्रश्न इतकाच आहे की अशा प्रकारचं वृत्तपत्र विकत कोण घेईल?

दयनीय आयुष्य आपल्या वाटणीला आले आहे. खून, खंडण्या, अपहरण, बॉम्बस्फोट, चकमकी, अपघात, भ्रष्टाचार यांसारख्या वार्तांच्या सोबतीनंच आपला रोजचा दिवस सुरू होतो. चहाचे घुटके घेत वर्तमानपत्र वाचणाऱ्यांचा चहा रोज या बातम्यांवरून कडवट बनून जात आहे.

एका अमेरिकन माणसानं यावर इलाज इलाज शोधून काढला आहे.  केवळ चांगल्या बातम्या छापणारं एक वर्तमानपत्र त्यानं सुरू केलंय. जगात खूप वाईटसाईट घडत आहे, फालतू कारणावरून राष्ट्रे एकमेकांशी युद्ध खेळत आहेत.  ज्या देशात लोकाना दोन वेळेचं जेवण मिळत नाही. ज्यांना पावलोपावली. जागतिक बँकेकडे मदतीसाठी याचना करावी लागते अशी राष्ट्रे अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहेत. खून, दरोडे, जाळपोळ, लुटमार सर्वच देशांत कमीअधिक प्रमाणात चालू आहे. पण तरीही या काळ्याकुट्ट जगात चांगली बाजू आहे; असे या संपादकाचं म्हणणं आहे. 

जगाचा हा चांगला चेहरा वाचकांसमोर आणायचा निश्चय या कल्पक संपादकानं केला. आणि 'गुडन्यूज ट्रिब्यून' हे वर्तमानपत्र आकाराला आलं. मराठीत आपण या वर्तमानपत्राला 'शुभ- वर्तमान' म्हणू या का? या शुभवर्तमानच्या पहिल्याच अंकात एका बोटीला जलसमाधी मिळाल्याची घटना छापून आली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पुढे संपादकसाहेबांनी त्याचा खुलासा केला. त्यांच्या मते जहाज सागरतळाला गेलं ही वाईट घटना असली तरी त्यावरच्या सर्वच्या सर्व प्रवाशांचे प्राण वाचण्यात मदत पथकाला यश आलंय, ही 'गूड़न्यूज' नाही का? वृत्तपत्रात याच गोष्टीवर भर आहे. वाचलेल्या प्रवाश्यांच्या दृष्टीनं हा किती मोठा आनंदाचा क्षण! अशाप्रकारे वाईटातून चांगलं शोधायचं ठरवले तर 'गूडन्यूज़' या वर्तमानपत्राला बातम्यांचं दुर्भिक्ष्य जाणवणार नाही.

सहज मनात विचार आला या धर्तीचं एक तरी वर्तमानपत्र आपल्याकडे चालू शकेल काय ? बघा डोकं चालवून, मी डोके लढवून पाहिलं तर एक करुण चित्र माझ्या नजरेसमोर आले. आपल्या 'शुभवर्तमान'चे संपादक कपाळाला हात लावून बसलेत. 'शुभ बोल रे नाऱ्या' म्हणून टेलिप्रिंटरला हजारदा बजावून झालं पण तो बातम्या काय देतोय तर सरकारी जमीन एस्सेलवर्ल्डच्या घशात घालण्याऱ्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्रीही सामील. 

बांगलादेशी नागरिक म्हणून गरीब आंध्र महिलेचा पोलिसांकडून छळ. वृद्ध दांपत्यांचा गळा आवळून खून. अमुक बँकेत पैशाची अफरातफर, तर तमुक बँकेवर भर दिवसा दरोडा, रेल्वेमार्गातील दगडफेकीने महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा, कोकण रेल्वे रुळावरून घसरल्याने प्रवाशांचा आठ तास खोळंबा. इत्यादी इत्यादी... 

मॅंनेजरसाहेवांना एअर कंडिशन्ड केबिनमध्येही घाम फुटलाय. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वार्ताहरांची पथकं पाठवली आहेत, चांगल्या बातम्या गोळा करण्यासाठी. त्यांपैकी एकाचाही पत्ता नाही. काय करावं?

संपादकसाहेब हताश होऊन हाताची बोटं एकमेकांत गुंतवून बसलेले असताना ऑफीसमधला शिपाई येतो. हातातला कागद संपादकसाहेबांच्या डोळ्यांसमोर करून म्हणतो, छान छान बातम्या हव्यात म्हणता ना. ही घ्या चांगली बातमी ... 

'आज विधानसभेचं कामकाज कोणताही गोंधळ गड्बड न होता शांतपणे पार पडलं.' संपादक महाशयांचा चेहरा आनंदानं फुलतो. 'व्वा! दैट्स् इट!' 

'लेका तुला तर नोबेल द्यायला हवं.' संपादक शिपायाच्या पाठीवर थाप मारत म्हणतात.

'नोबेल नंतर द्या सवडीनं. सध्या टेबल दिलं तरी खूप आहे. मी तुम्हाला चांगल्या बातम्या निवडून देईन.' हुशार शिपाई म्हणतो.

संपादक महाशय त्याच्या टेबलखुर्चीची सोय करतात.खुर्चीवर रुबाबात बसून शिपाई समोरच्याबा तमीपत्राच्या ढिगाऱ्यातून चांगल्या चांगल्या बातम्या हुडकून संपादकांना सादर करतो. 

'मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत विपुल पाऊस.'

'झिम्बाब्वेला हरवून भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत.'

'प्लाझात एका मराठी चित्रपटाचा शंभर दिवस मुक्काम..'

'मराठी नाट्यइतिहासात प्रथमच निर्मातासंघ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ एकजुटीनं उभा.'

'न्यायालयाचे कामकाज आता मराठीतून... अधिसूचना जारी.'

'शिवाजी मंदिर प्रतिष्ठाननं 'गोलपीठा' नाटकावरली बंदी उठवली.'

'मोटारमनचा नियोजित संप मागे.' 

'बिल्डरकडे 20 लाखाची खंडणी मागणारा अटकेत' 

'अमिताभ बच्चन चित्रपटसंन्यास घेण्याच्या विचारात.'

मनात उमटलेल्या चित्रातला साधा शिपाई जर इतक्या छान बातम्या मिळवू शकतो तर तुम्हां-आम्हाला ते का शक्य होऊ नये? केव्हातरी आपण सारे मिळून असे वर्तमानपत्र काढूया. जमेल तितके दिवस चालवू या. प्रयत्न करायला काय हरकत आहे ? 

खबरदारी

'शुभ वर्तमान'च्या देशी आवृत्तीला काही बंधनं कटाक्षानं पाळावी लागतील. संसदेचं कामकाज अजिबात छापता येणार नाही. विविध शासकीय-अशासकीय सेवांमधल्या कर्मचाऱ्यांच्या संपाच्या घोषणा या जनसामान्यांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या असतात, त्यांना प्रसिद्धी देता येणार नाही. पण कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली वेतनवाढ, बोनस इत्यादी घोषणा छापता येतील. लाखो लोकांना क्षणार्धात यमसदनी पाठवणाऱ्या अस्त्रांच्या चाचण्यावर आधारित घटना छापता येणार नाहीत. पण एखादा राष्ट्रप्रमुख आपण अशा चाचण्या थांबवत असल्याचे आश्वासन देत असेल तर त्याला प्रसिद्धी द्यावी लागेल. नागपंचमी, बकरी ईद यांसारख्या क्रौर्याला उत्तेजन देणाऱ्या सणांबद्दल या वृत्तपत्रात अवाक्षर छापून येणार नाही.

बैलपोळ्यासारख्या सणांना मात्र विशेष प्रसिद्धी दिली जाईल. शुभ वर्तनमान मधला वाचक पत्रव्यवहारही दक्षतेनं हाताळावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रांतील सेवासुविधांबाबतच्या तक्रारखोर पत्रांना या सदरात स्थान देऊन चालणार नाही. टॅक्सी ड्रायव्हर, बसकंडक्टरांचा प्रामाणिकपणा, वाहतूक पोलिसांची सौजन्यशील वागणूक या संदर्भातल्या आभार प्रदर्शक पत्रांना महत्त्वाचं स्थान यावं लागेल.

देशी शुभ वर्तमानची रविवार पुरवणी वैशिष्ट्यपूर्ण असेल. पुरवणीत वसंत आबाजी डहाके, विजय तेंडुलकर , अनिल अवचट, भाऊ पाध्ये यांसारख्यांच्या कठोर लिखाणाला थारा नसेल. त्याऐवजी मंगला खाडिलकर, रवींद्र पिंगे. गिरिजा कीर यांसारख्या प्रसन्न शैलीत लिहिणाऱ्या लेखकांचं स्वागत असेल. कधीमधी वि. स. खांडेकर, साने गुरुजींचे उत्तमोत्तम लिखाण पुनर्मुद्रित केले जाईल.

'अमेरिकन गुडन्यूज' वृत्तपत्राचा आपल्याकडील प्रयोग आज स्वप्नवत वाटत असेल पण नजीकच्या भविष्यात तो निश्चित आकाराला येईल. प्रश्न इतकाच आहे की अशा प्रकारचं वृत्तपत्र विकत कोण घेईल?

राजकीय जुगलबंद्या, मोर्चे, निदर्शनं, हरताळ, गोळीबार, संसद सदनातील धक्काबुक्की, विधानसभेतील मायक्रोफोनची फेकाफेक, गैंगवार, पोलीस- गुंड, चकमकी इत्यादी थरारक घटनांवर आधारलेल्या चटकदार बातम्या वाचायची सवय झालेल्या वाचकांना ते रुचेल आणि मनावेल का? त्याचीदेखील आर्टफिल्मसारखी चळवळ बनून जाईल. मूठभरांनी मूठमरांसाठी चालवलेली ? आपली करमणुकीची मूल्यं आणि साधनंच बदलून गेली आहेत की काय?

(हे सदर यापुढे प्रत्येक पंधरवड्यासप्रसिद्ध होईल-सं.)

Tags: अवधूत परळकर बातमीदारी चांगल्या बातम्या शुभ वर्तमान avdhoot paralkar news paper news positive reporting GOOD NEWS weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके