डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा-निर्मितीच्या सर्व तंत्रावर आश्चर्यकारक हुकूमत असलेला दिग्दर्शक जेव्हा आशयाला कमी लेखून कलाकृतीच्या सिनेमेंटिक परिणामाकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रेक्षकांच्या वाट्याला काय येतं हे कळण्यासाठी तरी 'डोंबिवली फास्ट' पाहायला पाहिजे. खुर्चीला खिळवून ठेवणारा हा अनुभव आहे हे निश्चित. पण खुर्चीला खिळवून ठेवणारा अनुभव तर रामगोपाल वर्माचे भूतपटही देतात. निशिकांत कामतांना चांगला सिनेमा काढायचा आहे की, चांगला थ्रीलर यांवर त्यांचा पुढील कलाप्रवास अवलंबून आहे. 'तोकडा आणि भाबडा' असं आमच्या एका समीक्षक मित्रानं या चित्रपटाचं वर्णन केलं होतं, ते पुरेसं मार्मिक आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे या मंडळींनी निर्माण केलेले दिव्य(!) मराठी सिनेमे पाहून मराठी सिनेमाविषयी मनात एक प्रकारची दहशत निर्माण झाली होती. संदीप सावंताचा 'श्वास' आला. त्यानं ही दहशत दूर केली आणि मराठी प्रेक्षकांत मराठी चित्रपटाविषयी आस्था निर्माण केली. मराठी कलावंतांना सिनेमा हे कलामाध्यम कळू लागल्याचा विश्वास श्वास नं मराठी माणसात निर्माण केला.

आज निशिकांत कामतांचा 'डोंबिवली फास्ट' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे; त्या मागे 'श्वास’ ची पुण्याई आहेच; पण चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या कारागिरीचाही त्यात सिंहाचा वाटा आहे.

चित्रपट चित्रपटाच्या भाषेत सादर करण्याची समज 'श्वास'च्या दिग्दर्शकापाशी आढळली होती तशी ती या तरुण दिग्दर्शकापाशी आढळली होती, तशी ती या तरुण दिग्दर्शकापाशीही आहे. किंबहुना 'श्वास'च्या दिग्दर्शकापेक्षा हा दिग्दर्शक सादरीकरणाच्या कलेत थोडा अधिक वाकबगार आहे. 'डोंबिलवी फास्ट' चित्रपट प्रेक्षकांना पहिल्या फ्रेमपासून भारावून टाकतो तो त्याच्या जबरदस्त पेशकशमुळे. माध्यमावरली अशा प्रकारची हुकूमत मराठी चित्रपटसृष्टीत दुर्मिळ असल्यानं बघणाऱ्याला या चित्रपटाचे जास्त कौतुक वाटतं.

‘डोंबिली फास्ट’ चा नायक माधव आपटे हा डोंबिवलीकर आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला वेळेशी शर्यत लावून चाललेले त्याचे दैनंदिन व्यवहार, लोकलमधला धकाधकीचा प्रवास इत्यादी क्षणचित्रं दाखवून त्याची 'मोन्ताज' तंत्रात पुनरावृत्ती करून दिग्दर्शकानं अपेक्षित परिणाम साधला आहे. मध्यमवर्गी घरातलं वास्तव उभारण्याच्या कामी छायाचित्रकार संजय जाधव यांनी निशिकांतला मोलाची साथ दिली आहे. खरं तर, हा चित्रपट निशिकांत कामत यांच्याइतकाच संजय जाधव यांचाही आहे.

नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या तंत्रात वरचढ असलेला हा चित्रपट आशयाच्या पातळीवर गडबडलेला आहे. या चित्रपटाद्वारे आपल्याला कोणतंच सामाजिक विधान करायचं नाही आहे तर केवळ एक गोष्ट चांगल्या प्रकारे पडद्यावर मांडायची आहे असं दिग्दर्शकाचे म्हणणं आहे. एरवी हे ठीक आहे. दिग्दर्शकाच्या प्रत्येक आविष्कारातून त्यानं स्टेटमेंट करावं अशी ही अपेक्षा करणं चूकच आहे. पण दिग्दर्शक कामत यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे आणि ही कथा मुळात सामाजिक विधान करणारी आहे. कथेचं पटकथेत रूपांतर कथालेखकानं केल्यामुळे तिचा गाभा पडद्यावर थेट उतरला आहे.

चित्रपटाचा नायक बँक अधिकारी आहे आणि त्याला भोवताली चाललेल्या भ्रष्टाचाराची, अन्याय-अत्याचाराची चीड आहे. जशी ती आपणा सर्वांना असते. जिथं पहावं तिथं आजकाल आपल्याला अन्याय-अत्याचार-पिळवणूक आणि भ्रष्टाचाराची दृश्यं दिसतात. जेव्हा आपल्याला त्याची झळ लागते तेव्हा आपलं रक्त सळसळतं. याला गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, त्याच्या डोक्यात रट्टा हाणला पाहिजे असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात आपण यातलं काही न करता सकाळी उठून लोकल पकडून निमूट कामावर जातो. 

डोंबिवली फास्ट चा नायक माधव आपटे बराचसा आपल्यासारखा आहे. अन्याय, दादागिरी, भ्रष्टाचार दिसला की तो आपल्यासारखाच खवळतो. ‘डोंबिवली फास्ट’ च्या सुरुवातीच्या भागात नायकाच्या रूपानं आपण स्वतःलाच पडद्यावर पाहात असतो. पण चित्रपट जसा पुढं सरकू लागतो तसा माधव आपटे भ्रष्टाचाराबद्दल समोरच्या व्यक्तीवर हल्ले चढवू लागतो. प्रत्यक्ष शारीरिक हाणामाऱ्या करू लागतो. मग पोलिसांचा ससेमिरा, पोलीस कस्टडीतील मुक्काम वगैरे आलंच. बघता बघता नायक आपल्यापासून वेगळा होऊन अंग्री यंग मॅन बनतो. कायदा हातात घेतला की तुरुंगात जावं लागतं हे आता माधव आपटे नावाच्या या बँक अधिकाऱ्याला हे ठाऊक नाही का? माधव नुकताच कॉलेजातून बाहेर पडलेला पोरसवदा तरुण नाही. बँकेत इतकी वर्षे काम करताना त्यानं आर्थिक गैरव्यवहार, बड्यांच्या दडपणाखाली होणारी आर्थिक देवघेव कधी पाहिलीच नाही काय? भ्रष्ट व्यवहार, व्यक्तिगत पातळीवर होत असला तरी त्याला बळ देणारी व्यवस्था आपल्या समाजात आहे. हल्ला करायचा तर तो या व्यवस्थेवर हवा हे माधव जाणत नसेल तर तो रोजचं वर्तमानपत्र वाचत नाही असं म्हणावं लागेल. बॅट घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेला निघालेल्या नायकाला वेडा म्हणायचं की भाबडा? हिंसेच्या मार्गानं एखाद-दुसऱ्याला संपवता येते. भ्रष्टाचाराला नाही संपवता येत हे समजण्याचे तारतम्य प्रत्येकापाशी हवंच. 

माधव आपटे हे तारतम्य गमावून बसतो, त्याचे मानसिक संतुलन बिघडतं तसं ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाचंही संतुलन बिघडतं.  अमिताभ बच्चनच्या चित्रपटात शोभाव्यात अशा अतार्किक घटना पडद्यावर दिसू लागतात.

गदेप्रमाणे बॅट फिरवून दुष्टांचे विर्दालन करायला निघालेला नायक मध्यरात्री हुतात्मा चौकात उभं राहून लेक्चर झोडतो. मागावर असलेल्या पोलिसांना मात्र तो दिसत नाही. ते शहरभर जीप घेऊन त्याच्या शोधात फिरताहेत.

चित्रपटाच्या नायकाला रूपकाप्रमाणे वापरायचं असेल तर चित्रपटाचं चित्रण फॅण्टसी सदृश्य हवं. समोर दिसतंय, घडतंय ते वास्तव नाही असं सूचीत करणारी दृश्यरचना करायला हवी. कामत यापैकी काहीच करत नाहीत. नको इतक्या वास्तवशैलीत ते हा विषय हाताळतात. पडद्यावर दिसताहेत ते सर्व नायकाच्या मनातले खेळ आहेत हे सूचीत करण्यासाठी कामतांनी एखादी युक्ती केली असती तरी हा चित्रपट आशयाच्या दृष्टीनं अफाट उंचीवर पोहोचला असता.

सामान्य माणसानं भ्रष्टाचाराविरुद्ध दिलेल्या एकाकी झुंजी आणि त्यांच्या जीवनाची झालेली शोकांतिक हे आपल्याकडच्या आई फिल्मवाल्याचं एके काळचं आवडतं कथासूत्र. व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्यानं नैराश्यापोटी एकट्यादुकट्या व्यक्तीनं केलेली हिंसा हा एन्.चंद्रांचाही आवडता विषय. याच कथासूत्राला सूडकथेची जोड देऊन कितीतरी अमिताभपट निघाले. 

‘डोंबिवली फास्ट’ मधून दिग्दर्शकांनी याहून वेगळे काय साधले असा प्रश्न पडतो; पण तो अर्थात चित्रपट संपल्यावर. चित्रपट पडद्यावर सुरू असताना आपण दिग्दर्शकांच्या बंदिस्त दृश्यआखणीला, अचूक कॅमेरा हालचाली, परिणामकारक संकलनाला दाद देत राहतो. दिग्दर्शकाची अचूक पात्रयोजना, कलाकारांचा अप्रतिम अभिनय या साऱ्या प्रशंसाव्यात अशा गोष्टी आहेत.. पण उत्तम छायाचित्रण, उत्तम दृश्यरचना, अप्रतिम नेपथ्य, प्रकाशयोजना आणि अभिनय म्हणजे उत्तम चित्रपट नव्हेत.

सिनेमा ही या सगळ्या तांत्रिक घटकांच्या संयोगानं तयार झालेली आणि तरीही त्या सगळ्यापासून वेगळी अशी कलावस्तू आहे. ‘तोकडा आणि भाबडा' असं आमच्या एका समीक्षक मित्रानं या चित्रपटाचं वर्णन केलं होतं, ते पुरेसं मार्मिक आहे. पण हा तोकडा-भाबडा प्रयत्न पाहण्याजोगा आहे.

सिनेमा-निर्मितीच्या सर्व तंत्रावर आश्चर्यकारक हुकूमत असलेला दिग्दर्शक जेव्हा आशयाला कमी लेखून कलाकृतीच्या सिनेमॅटिक परिणामाकडे लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रेक्षकांच्या वाट्याला काय येतं हे कळण्यासाठी तरी 'डोंबिवली फास्ट' पाहायला पाहिजे. खुर्चीला खिळवून ठेवणारा हा अनुभव आहे हे निश्चित, पण खुर्चीला खिळवून ठेवणारा अनुभव तर रामगोपाल वर्माचे भूतपटही देतात. निशिकांत कामतांना चांगला सिनेमा काढायचा आहे की, चांगला थ्रीलर यांवर त्यांचा पुढील कलाप्रवास अवलंबून आहे. महत्त्वाचा सामाजिक विषय हाती घेऊन त्याची वेधक परंतु भाबड़ी मांडणी करून मला एक साधी कथा सांगायची होती असं सांगून कुणाही दिग्दर्शकाला पळून जाता येणार नाही.

सामाजिक विषय पडद्यावर आणणं हे जबाबदारीचं काम आहे.

Tags: परीक्षण चित्रपट समीक्षा मराठी चित्रपट Criticism film critic Dombivali Fast Marathi Cinema weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके