डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सुरेखा पुणेकरचं मुंबईकरांनी स्वागत केलं त्यामागे धूर्तता आहे. 'ब्ल्यू-फिल्म' प्रकारांतला थेटपणा ज्यांच्या डोळ्यांना मानवत नाही, अशांसाठी ‘सॉफ्ट पोर्नो’ फिल्म असतात. तमाशा हा मराठी माणसाच्या लैंगिक मानसिकतेला मानवेल असा ‘सॉफ्ट पोर्नो’सारखाच एक प्रकार आहे की काय? लोककलांविषयीचे भाबडेपण बाजूला ठेवून अभ्यासकाच्या कठोर चष्म्यानं याची पाहणी करायला पाहिजे.

पुरुषांची शृंगारिक भूक भागवण्यासाठी स्त्रियांनी व्यासपीठावर कंबर उचकवत नाचायचं आणि अशा प्रकारचं कामुक नृत्य करण्यात नाचणाऱ्या स्त्री-वर्गाला कमीपणा वाटू नये म्हणून त्याला 'कला' वगैरे नाव द्यायचं हा सगळा पुरुषी धूर्तपणाचा भाग झाला असं मी म्हटलं की लोककलेविषयी अमाप प्रेम असलेले माझे मित्र खवळतात. तमाशा आणि लावणीनृत्य या परंपरागत ग्रामीण लोककलांचा मी अवमान करतो असं त्यांना वाटतं. मला कळत नाही की, पुरुषवर्गालाच या प्रकारचं समर्थन करावंसं का वाटतं? तमाशा या प्रकाराकडे कला म्हणून पाहणारी आणि त्याचं समर्थन करणारी एखादी स्त्री आपल्याला का सापडू नये ?

वर्षानुवर्षे समाजातल्या एका विशिष्ट जातीच्या आणि वर्गाच्या स्त्रियांनी 'पुरुषांसाठी नाचणं' हा आपला पिढीजात व्यवसाय समजावा आणि उर्वरित समाजानं ‘प्राचीन कला त्या जतन करताहेत,’ अशा थाटात त्यांचं कौतुक करीत राहावं, यात काहीतरी गफलत तर होत नाही ना, असे प्रश्न आता आपण आपल्याला विचारायला हवेत. सगळ्या कलाकारांसारखा हा एक कलाप्रकार असं मानून त्यातल्या लैंगिक पिळवणुकीकडे दुर्लक्ष करून आपण स्वतःची किती काळ फसवणूक करून घेणार आहोत? तमाशाला लोक गर्दी करतात ते केवळ श्रीकृष्ण-पेंद्याचे संवाद ऐकायला नाही.

घागरी कमरेवर घेऊन ठुमकत लचकत गवळणींची एन्ट्री झाली की प्रेक्षकांतून पहिली शिट्टी ऐकू येते. लावणीनृत्य सुरू झालं की शिट्टयांच्या आवाजानं थिएटर दुमदुमून जातं. 'सोळा हजारांत देखणी' नावाच्या लावणी नृत्यप्रधान कार्यक्रमाचे मुंबईत धडाक्यात प्रयोग सुरू आहेत. ‘सुरेखा पुणेकरनं मुंबईकरांना जिंकले,’ असे मथळे वृत्तपत्रांत झळकलेत. यात थोडा पत्रकारांच्या अतिउत्साहाचा आणि सनसनाटी वृत्तांताविषयी असलेल्या आकर्षणाचा भाग असेल. मागे एकदा मायकेल जॅक्सनला पाहायला विमानतळाजवळ लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती, तेव्हा वर्तमानपत्रांनी 'मायकेलला पाहायला मुंबई लोटली' असे मथळे दिले होते.

सुरेखा पुणेकर या लावणीनर्तिकेची पेशकश पाहायला लोक ‘सोळा हजारांत देखणी’च्या प्रयोगांना रांगा लावताहेत हे खरं आहे. ‘देखणी’ चा मी जो प्रयोग पाहिला त्याला पार्लेकर पांढरपेशानं तुफान गर्दी केली होती. प्रेक्षकांत संघाच्या शाखेवर जाणारे नवथर तरुण होते आणि मुला-नातवंडांना अमेरिकेत पाठवून निवांत झालेले समाजवादी ज्येष्ठ नागरिकही होते. ‘संपूर्ण फॅमिलीनं आस्वाद घ्यावा असा सोज्वळ तमाशा,’ अशी कार्यक्रमाची जाहिरात झाल्याने बरेच जण बायकांसह आले होते. या पांढरपेशी मध्यमवर्गाच्या संवेदनांना फार धका बसणार नाही अशा स्वरूपात ‘आयटेम्स’ सादर करण्याची संयोजकांची घडपड जाणवत होती. पुन्हा हे करत असताना एकूण प्रकाराला मिळमिळीतपणा येऊ नये ‘काहीतरी’ पाहिल्याचं-ऐकल्याचं समाधानही प्रेक्षकांना मिळावं; ज्या अपेक्षेनं सुरेखा पुणेकरला पाहायला पब्लिक जमलीय त्या पूर्ण व्हाव्यात, हेही निर्मात्याला पाहावं लागत होतं. सदोष ऑडिओ सिस्टम, काल्पनाशून्य नेपथ्य आणि सपक प्रकाशयोजना यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ‘सोळा हजारांत देखणी' प्रयोग चांगला होता. 

लावणीच्या काही महत्त्वाच्या जागी जिथे संयोजकांना प्रचंड प्रेक्षक प्रतिसाद अपेक्षित होता तो मात्र मिळत नव्हता. समोर जे चाललंय ते आवडत असूनही लोक उत्साहाने टाळ्या वाजवत नव्हते. स्त्रिया आणि कुटुंब बरोबर असल्यानं पुरुष अवघडल्यासारखे बसून होते. सुरेखा पुणेकर प्रेक्षकांच्या एकेक गटाकडे नजर लावत 'या भावजी, बसा रावजी' म्हणत होती तेव्हा पुरुष प्रेक्षकांची अवस्था पाहण्यासारखी होती. वातावरणातलं हे अवघडलेपण निवेदक समजून घेत होता आणि समजावूनही सांगत होता. ‘जरा मोकळेपणानं टाळ्या वाजवल्या तर बरं होईल,’ असं मधूनमधून सुचवत होता.

निवेदन अश्लीलतेकडे वळू लागल्याचं लक्षात आलं की स्वतःला आवर घालत होता. 'सुसंस्कृत रसिक' असा तो प्रेक्षकांचा उल्लेख करत असल्यामुळे पार्लेकरांनाही सुसंस्कृतपणाचं बेअरिंग सांभाळावं लागत होतं की काय कोण जाणे? एकूण प्रकार चमत्कारिक होता. पार्लेकर सोज्वळ असले तरी घरी एमटीव्ही पाहणारे होते. टीव्हीवरल्या 'टॉप टेन' कार्यक्रमाचे काही चाहतेही प्रेक्षकांत असणारच. तरीपण सोज्वळतेच्या साजूक तुपात तळलेला हा तमाशा पार्लेकरांना एकूण पसंत पडलेला दिसला. ‘असा असतो होय तमाशा,’ असा भाव भगिनीवर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होता. तमाशाची कला(!) सॉफिस्टिकेटेड समाजासमोर नेल्याचं समाधान संयोजकांच्या चेहऱ्यावर होतं. निवेदकानं आणि संयोजकांनी सगळा खेळ हुशारीनं सावरून धरला आणि तरी माया जाधव, सुरेखा पुणेकर आदी नर्तिकांना हातचं राखून नाचणं जमण्यासारखं नव्हतं.

पडद्यावर एमटीव्हीतल्या परदेशी बायका नाचताना पाहणं वेगळं आणि इयं थ्री डायमेन्शनमध्ये मराठी बायका नाचताना पाहणं यात ‘पार्लेकरांच्या संस्कृती’ची थोडीफार ओढाताण होत होतीच. सुरेखा पुणेकर बैठकीची लावणी गाणारी, पण ती आपल्या लावणीची सुरुवात आणि शेवट उभ्यानं नाचून करत होती. कमीतकमी हालचालीत अधिकाधिक शृंगारिक भाव प्रदर्शित करण्याचं कसब दाखवून तिनं वन्समोअरवर वन्समोअर घेतले. तिच्या अदाकारीची मिटक्या मारीत वर्णनं करणाऱ्या समीक्षकांनी तिच्या अंगच्या अभिनयगुणांकडे  दुर्लक्ष केलं होतं. चांगल्या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली तर ही गुणी नर्तिका अभिनेत्री म्हणून पुढं येईल. पण ‘चांगला मराठी सिनेमा’ हा प्रकार भविष्यात आकाराला येईल का, हाच तेवढा प्रश्न आहे. 

प्रयोग संपल्यावर मेकअपरूममध्ये जाऊन सुरेखा पुणेकरची भेट घेतली, तेव्हाची सुरेखा पुणेकर एकदम वेगळी होती. रंगमंचावर नाचता नाचता फुंक मारून डोळ्यांवरची केसाची बट उडवणारी; बैठकीची लावणी करताना प्रेक्षकांच्या नजरेला नजर भिडवून लाडिक संवाद साधणारी सुरेखा आता एक लाजरीबुजरी कन्या बनून गेली होती. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतानाही तिची नजर खाली झुकलेली राहिली. कोणता अभिनय खरा? आताचा की रंगमंचावरला? प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी किशोर काळेंचं 'कोल्हाट्याचं पोर' पुस्तक वाचायला हवं.

'सोळा हजारांत देखणी' पाहण्यापूर्वी प्रेक्षकांपैकी कुणी हे पुस्तक वाचलं तर तो प्रयोग 'एन्जॉय' करू शकणार नाही हे निश्चित. मराठीत हजार तमाशापट निघाले, पण एकाही चित्रपटात तमाशा कलावंताच्या जीवनाचं चित्रण नाही. हजार मराठी चित्रपटांना जे जमले नाही ते किशोर काळ्यांच्या एका पुस्तकानं केलं आहे. वेश्यांच्या पुनर्वसनासंबंधी आपण बोलतो, पण तमासगिरांच्या, लावणी-नर्तिकांच्या पुनर्वसनाबाबत आपण अवाक्षर काढत नाही. उलट 'लावणीशाळा' काढण्याचे प्रस्ताव मांडून त्यांच्या नवीन पिढ्‌याही याच व्यवसायात राहतील अशी तजवीज करतो, हे करुण आहे. कोणत्याही लावणी-नर्तिकेला विश्वासात घेऊन विचारलं तर ‘आपण पोट जाळण्यासाठी मजबुरीनं हा व्यवसाय करतो,’ असं ती सांगते.

लग्न, मूल या शब्दांचा उच्चार झाला तरी तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं. ज्या नर्तिकांना संतती आहे त्या नर्तिका आपल्या मुलींना या व्यवसायापासून दूर ठेवू इच्छितात. यातूनच आपण काय तो संदेश घेतला पाहिजे. तमाशा हा ग्रामीण लोककलेचा एक आविष्कार आहे असं मानणारे माझे परंपराप्रेमी मित्र हे वास्तव समजून घ्यायला तयार नाहीत. सुरेखा पुणेकरसारख्या तरुण मुली रंगमंचावर नाचतात तेव्हा त्यातून त्यांना उच्च कलानंद मिळत असतो, सबब त्यांनी पिढ्यान्‌पिढ्‌या नाचत राहावं आणि ही थोर कला जतन करावी, असा या सर्वांचा आग्रह आहे.

सुरेखा पुणेकरच्या नाजूक नर्तनानं आपल्या डोळ्यांचं पारणं फेडावं या इच्छेनं जमलेल्या मुंबईकरांचं काय ? विले-पार्ल्यातल्या प्रयोगात मुंबईतल्या अभिरुचिसंपन्न स्त्री-पुरुषांना लावणीनृत्यांना मनापासून दाद देताना मी पाहिलं. पण मला खात्री आहे, त्यांच्यापैकी एकही रसिक प्रेक्षक सुरेखा पुणेकरच्या जागी आपल्या घरातली स्त्री नाचते आहे, अशी कल्पनाही कुणी करू शकणार नाही. दुसऱ्या कुणाच्यातरी घरातल्या स्त्रीनं लचकत मुरडत मंचावर नाचावं आणि आपलं रंजन करावं असं सर्वांना वाटत होतं. समाज निरोगी राहण्यासाठी वेश्या-व्यवसाय हवाच असं प्रतिपादन केलं जातं तेव्हा ते करणाऱ्यांना आपल्या घरातल्या महिलावर्गानं ही 'समाजसेवा' करावी असं कधीच वाटत नाही.

समाजाचं आरोग्य सांभाळायचं, त्यांची कलात्मक भूक भागवायची ती इतर घरांतल्या स्त्रियांनी. सुरेखा पुणेकरचं मुंबईकरांनी स्वागत केलं त्यामागे हीच धूर्तता आहे. 'ब्ल्यू-फिल्म' प्रकारातला थेटपणा ज्यांच्या डोळ्यांना मानवत नाही अशांसाठी ‘सॉफ्ट पोर्नो’ फिल्म असतात. तमाशा हा मराठी माणसाच्या लैंगिक मानसिकतेला मानवेल असा ‘सॉफ्ट पोर्नो’सारखाच एक प्रकार आहे की काय? लोककलांविषयीचं भाबडेपण बाजूला ठेवून अभ्यासकाच्या कठोर चश्म्यानं याची पाहणी करायला पाहिजे. लावणीनर्तन ही इतर कलांप्रमाणे एक शास्त्रशुद्ध कला आहे हे एकवेळ मान्य केलं तरी उद्या लावणीशाळा निघाल्या तर त्यात आपट्‌यांची कविता, गोडबोल्यांची नंदिता जाणार नाही हे उघड आहे. तिथं विठा, रंगू, शेवंताच असणार. सुरेखा पुणेकर एक गुणी कलावंत आहे हे खरं असलं तरी तिच्या अदाकारीला मुंबईकरांनी दिलेली दाद वरील वास्तवातून तपासली पाहिजे. समाजातल्या एका वर्गातल्या मुलींनी भरतनाट्‌यम शिकायचे आणि दुसऱ्या वर्गातल्या मुलींनी लावणीनृत्य, हे आता कुठंतरी थांबवायला हवं....

Tags: पुरुषांची मानसिकता कला की सॉफ्ट पोर्नो? लावणी लावणी नृत्यांगणा वैचारिक male mentality art or soft porno? lavni 'lavni dancer' idiological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके