डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मागील पिढीतील दोन दिग्गज लेखक - वि. स. खांडेकर आणि आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विशेष लेख.

नामवंत साहित्यिकांच्या जन्मशताब्दी वर्षांचे सध्या वातावरण आहे. पद्मभूषण वि.स.खांडेकरांच्या जन्मशताब्दीची यंदा सांगता होत आहे, तर 13 ऑगस्ट 1997 पासून आचार्य अत्रे जन्मशताब्दीला सुरुवात होत आहे. पाणकळा कार र. वा. दिघे यांची जन्मशताब्दीही यंदाच येत आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 1994 मध्ये मराठी कादंबरीसृष्टीचे ‘जादुगार' समजल्या जाणाऱ्या प्राध्यापक ना. सी. फडके यांचेही जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. काही वर्षामागे खांडेकर-फडके हा कादंबरीच्या क्षेत्रात बंद समास समजला जात होता. 'मराठी कादंबरीचे पहिले शतक' लिहिणाऱ्या कुसुमावती देशपांडे यांनी. प्रा. फडके हे एकच कादंबरी वारंवार लिहीत राहिले. त्यांच्या कादंबऱ्यातील नायक नायिकांचे तोंडावळे एकसारखे आहेत. अशा आशयाची टीका केल्याबद्दल प्रा. फडके यांना बराच राग आला होता. जीवनासाठी कला की कलेसाठी कला? हा वाद पूर्वी साहित्यक्षेत्रात बराच गाजला होता आणि फडके-खांडेकर-अत्रे यांनी परस्पर टोकाची भूमिका घेऊन तो गाजविलाही होता. 

'धार आणि काठ' मध्ये प्रा. नरहर कुरुंदकर यांनी एक निराळीच भूमिका घेऊन स्वतःला जीवनवादी समजणारे खांडेकर कलावादी कसे आहेत" आणि स्वतःला कलावादी मानणाऱ्या फडक्यांनी' त्यांच्या कादंबऱ्यांतून जीवनवाद कसा मांडला आहे हे खास 'कुरुंदकरी' शैलीत दाखवून देण्याचा (सिद्ध करण्याचा) प्रयत्न केला. खुद्द फडक्यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात आणि अन्यत्र अनेक ठिकाणी कलावादी असून मीच जीवनाची-मानवी जीवनाची विविध क्षेत्रे कशी धुंडाळली आहेत आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी उपक्रमशील आणि तरीही ‘कलावादी साहित्यिक मीच कसा आहे' याची आढ्यतापूर्वक चर्चा केली आहे. स्वतःला मोठे म्हणवताना त्यांनी साने गुरुजी आणि खांडेकरांची कुचाळकी केली आहे. दुर्दैवाने क्षीरसागर आणि गंगाधर गाडगीळांसारखे समीक्षकही या कुचाळकीत सामील झाले आहेत. पण ज्या फडक्यांनी आपण युगसग्राट आहोत अशी शेखी मिरविली त्या फडक्यांचे कथात्मक साहित्य आजच्या तरुण पिढीकडून फारच थोडे वाचले जाते. 

आणि त्यांनी ज्यांची आयुष्यभर हेटाळणी केली त्या साने गुरुजी खांडेकरांचे साहित्य आजही युवा पिढीकडून आवडीने वाचले जाते. अत्रे यांचा तिसरा क्रमांक लागतो. तात्पर्य, आजच्या चंगळवादी युगातही, ज्याची संस्कारवादी, बोधवादी, मुद्दाम उबवलेले साहित्य अशी हेटाळणी झाली ते साहित्य टिकून आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रा. फडके आपली गुणवत्ता आपल्याच 'अंजली' मासिकात स्वतःच छापलेल्या खुषी पत्रांच्या आणि काही मूठभर फडके-भक्तांच्या पाठिंब्यावर सिद्ध करू पाहात होते तर साने गुरुजी, भाऊसाहेब खांडेकर आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्यिक थोरवीला जनसाधारणाचा आधार होता. फडके ज्या साने गुरुजींच्या साहित्याची टवाळकी करीत राहिले त्याच साहित्याला अत्रे-खांडेकरांनी मानवतेचे महान्मंगल स्तोत्र मानले हा केवळ योगायोग नाही. सुमारे तीस चाळीस वर्षांपूर्वीच्या तरुण पिढीवर अत्रे आणि खांडेकर यांच्या साहित्याचा केवढा मोठा प्रभाव होता याची कल्पना आजच्या तरुण पिढीला येणे शक्य नाही. 

1942 च्या काळात जसे तरुण स्वातंत्र्याच्या आणि 'वंदे मातरम्’ च्या मंत्राने भारले गेले होते, तीच अवस्था खांडेकरांच्या व आचार्य अत्र्यांच्या साहित्याविषयी 1950-60 या दशकातील तरुण पिढीची झाली होती हे आजच्या तरुण पिढीला थोडेसे चमत्कारिक वाटले तरी ती वस्तुस्थिती आहे. त्याची कारणे मात्र वेगवेगळी होती आणि आहेत. साहित्याची नाळ मानवी जीवनाशी बांधलेली आहे. कोणीही (उदा. प्रा. फडके) स्वप्नरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी साहित्य निर्माण होते अशी वल्गना केली तरी ती निव्वळ ‘शेख महंमदी' आहे. ज्याला जीवनाचा आदर्श, जीवनाचे ध्येय सापडले; जो मानवी जीवनाशी, त्यांच्या आशा आकांक्षांशी, त्यातील मानवी प्रेरणांशी, लढायांशी, हक्कांशी आणि कर्तव्यांशी समरस होतो त्यालाच साहित्याचा खरा अर्थ सापडू शकतो. म्हणून म. फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, सावरकर, म. गांधी, साने गुरुजी, आचार्य विनोबा या सर्वांना साहित्यिक मानायला हवे. 

त्या अर्थाने भाऊसाहेब खांडेकर आणि प्रल्हाद केशव अत्रे हे दोघेही साहित्यिक होते आणि त्यांच्या साहित्याचा आधार त्यांच्या सामान्य माणसावरील निष्ठेत आणि सहानुभूतीत साठविलेला होता असे मला वाटते. या प्रभावाबाबतची काही उदाहरणे मी येथे जाणीवपूर्वक नमूद करीत आहे. ‘श्यामची आई' रुपेरी पडद्यावर साकार करून आचार्य अत्र्यांना मराठी चित्रपटाला मिळणारे पहिले राष्ट्रपतीपदक मिळाले. हा त्यांचा गौरव व्यक्तिगत स्वरूपाचा नसून प्रातिनिधिक स्वरूपाचा मानला पाहिजे. साने गुरुजींची ‘श्यामची आई' साऱ्या महाराष्ट्रात अजरामर झाली. त्या बोलपटाचा परिणाम प्रेक्षागृहात केवढ्या प्रभावी प्रमाणात होत असे याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. श्यामची भूमिका करणारा त्या वेळचा बालकलाकार माधव वझे, श्यामची आई साकार करणाऱ्या वनमालाबाई, गीतकार वसंत बापट, "यशवंतां” च्या आईला स्वरबद्ध करणारे अजोड संगीतकार वसंत देसाई आणि स्वतः निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे या साऱ्यांचा सामूहिक प्रतिभा आविष्काराचा हा चित्रपट म्हणजे मराठी बोलपटसृष्टीत घडलेला एक विलक्षण चमत्कार होता. 

'मराठी मने आणि मराठी माणसांना दिलेले आचार्य अत्रे यांचे हे अपूर्व योगदान होते. ते दिवस भारलेले होते. (मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे) चळवळीच्या लढयाचा तेजस्वी काळ जसा त्या लढ्याचे प्रमुख सूत्रधार साथी एसेम, भाई डांगे आणि इतर असंख्य ज्ञात-अज्ञात नेते, कार्यकर्ते यांच्या कर्तृत्वाने मंतरलेला आहे, तसाच त्यातील वातावरणनिर्मितीचा वाटा दै. मराठा अग्रलेख आणि अत्र्यांचे घणाघाती वक्तृत्व यांच्याकडे जातो. त्यांचाही फार मोठा प्रभाव आमच्या तरुण पिढीवर पडलेला होता. 1942 च्या चळवळीच्या वेळी मी फारच लहान होतो. परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आम्ही महाविद्यालयात शिकत होतो. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. तरीही घरच्या आणि काही प्राध्यापकांच्या विरोधाला न जुमानता आम्ही काही तरुणांनी त्या वेळी सातारचे आमदार कॉम्रेड व्ही. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्तीची चळवळ यांत भाग घेतला वाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वक्तृत्वाप्रमाणेच दै. मराठा ने निर्माण केलेले वातावरण हेही एक महत्त्वाचे कारण होते. 

आचार्य अत्र्यांचे 'नवयुग', त्यांची विनोदी भाषणे, त्यांचे वक्तृत्व त्यांचा भीमकाय देह राणा भीमदेवी आवाज, त्यागी आणि ध्येयवादी पुढाऱ्यांची एकाच वेळी बेफाम स्तुती व टोकाला जाऊन केलेली टिंगळटवाळी (उदा. 'विनोबा का वानरोबा?-दै. 'मराठा' तील एका अग्रलेखाचे शीर्षक), यांचे औचित्य- औचित्य समजण्याचे आम्ही तरुणांचे ते वय नव्हते. आचार्य अत्र्यांचे लेखन आणि प्रचंड व्यक्तिमत्व यांचा फार मोठा प्रभाव आमच्या मनावर होता हे आजही मान्य केले पाहिजे. तसाच प्रभाव आमच्या पिढीतील थोड्याशा भावड्या, संवदेनशील, आदर्शाची ओढ असलेल्या तरुणांच्या मनावर 'भाऊ' खांडेकरांचा होता, त्यांचे प्रत्येक नवीन पुस्तक वाचण्यासाठी आणि सार्वजनिक संस्थांतून होणारे त्यांचे प्रत्येक भाषण ऐकण्यासाठी आम्ही शाळकरी वयापासूनच उत्सुक असू. खांडेकरांची वक्तुत्वशैली संवेदनशील श्रोत्यांवर प्रभाव पाडत असे. त्यांच्या पारदर्शी मनाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले असे, त्यामुळे श्रोते प्रभावित होत. थरारून जात. 

गंगाधर गाडगीळांनी 'दुकानातल्या वस्तूप्रमाणे खांडेकरांनी तळमळ विकायला काढली असे कुत्सितपणे म्हणून खांडेकरांना मिळालेल्या 'यती' सदृश्य लोकमान्यतेबद्दल त्यांच्या मनातील मळमळ ओकली असली तरी त्यात स्पष्ट व निर्भीड समीक्षेपेक्षा त्यांच्या (गाडगीळ यांच्या) मनाचा पूर्वग्रह व अहंकारच दिसून येतो.. भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्याचा आणि सौजन्यशील मूदु व्यक्तिमत्त्वाचा त्यावेळच्या वेगवेगळ्या प्रकृतींच्या तरुणांच्या मनावर केवढा मोठा प्रभाव पडत असे याचा एक व्यक्तिगत अनुभवच येथे देत आहे. 1958 च्या सुमाराला सातारा येथे अखिल मराठी नाट्य संमेलनाचे अधिवेशन होते, त्याचे अध्यक्ष भाऊ होते. त्यांच्या भाषणांनी आम्ही काही मित्र-मी; पद्माकर गोवईकर, कॉ. प्रभाकर महाबळेश्वर-इतके भारावून गेलो होतो की त्यांची षष्ट्यब्दि सार्वजनिक स्वरूपात साताऱ्यात घडवून आणावी असे आम्हांला वाटले. आमच्या विचारात आणखी काही तरुण सामील झाले. 

आम्ही 'खांडेकरप्रेमी वाङ्मयमंडळ' स्थापन केले. स्वतंत्र निधी गोळा केला गावातील अनेक साहित्यप्रेमींनी केवळ (साहित्यिक) खांडेकर हे नाव ऐकून सहकार्य दिले. जिल्हा पातळीवरील निबंधस्पर्धा घेण्यात आली. तिला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. सातारच्या न्यू इंग्लिशचे त्या वेळचे प्रमुख आणि मराठी साहित्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष डॉ. द. न. गोखले यांनी तर प्रमुख पाहुणे अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचा बक्षीससमारंभ घेऊन सायंकाळी प्रेक्षागृहासह सर्व सुविधा देऊ केल्या पाहुण्यांचा प्रवासखर्च व मानधन शाळेनेच दिले. हा समारंभ मोठ्या उत्साहाने आणि प्रातिनिधिक स्वरूपात साजरा झाला. खांडेकरांचे साहित्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा केवढा प्रभाव सुशिक्षित मध्यमवर्गीयांवर आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हांला आला. मात्र सौ. उषाताईंची प्रकृती ठीक नसल्याने खुद्द भाऊसाहेबच या भव्य समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. 

आणखी नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी त्या वेळच्या अनेक नामवंत लेखकांना आणि समीक्षकांना विनंती केली होती. त्यातील काहींशी प्रत्यक्ष संपर्क साधला होता. पण काही नामवंतांकडून 'माझा खांडेकरांच्या साहित्यावर जाहीर बोलण्याइतका अभ्यास नाही' असे अनपेक्षित धक्कादायक उत्तर दिले. आणि अनंत काणेकरही भाऊंच्या साहित्यावर बोललेच नाहीत. त्यांचे भाषण साहित्याच्या सर्वसाधारण स्वरूपावर झाले. त्या वेळी आम्हा तिघांना (पुढे पद्माकर लेखक कलावंत व महाबळेश्वर कॉप्रेड कम्युनिस्ट नेते झाले.) सातारच्या सार्वजनिक क्षेत्रात नगण्य स्थान होते. तरीही भाऊसाहेबांच्या जनसाधारणावरील प्रभावाने हा कार्यक्रम संस्मरणीय झाला. त्या कार्यक्रमाला कर्मवीर भाऊराव अण्णासाहेब पाटील स्वतः आवर्जून उपस्थित होते हे मला अद्यापही स्मरते. एकूण अत्रे-खांडेकरांचे साहित्य आणि त्यांची व्यक्तिमत्त्वे यांचा त्या वेळच्या तरुण संवेदनशील साहित्यप्रेमी पिढीवर फार मोठा प्रभाव होता. तितका प्रा. फडके यांच्या नटव्या व फसव्या जादुगिरी चा नव्हता. असे होते ते 'अत्रे-खांडेकरांचे मंतरलेले आणि भारलेले दिवस!'

Tags: डॉ. द. न. गोखले र. वा. दिघे ना.सी. फडके आचार्य अत्रे भाऊसाहेब खांडेकर आचार्य विनोबा साने गुरुजी म. गांधी सावरकर डॉ. आंबेडकर आगरकर लोकमान्य टिळक म. फुले अ. श्री. भडकमकर Dr. D.N. Gokhale R.V. Dighe N.S. Fadake Acharya Atre Bhausaheb Khandekar Achary Vinoba Sane Guruji M. Gandhi Sawarkar Dr. Ambedkar Agarkar Lokamanya Tilak M. Fule A.S. Bhadakamkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके