डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ही दीर्घ मुलाखत म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे. हाश्मी यांची पत्नी मोलोयश्री हाश्मी यांचा एक छोटा आठवणीपर लेख आहे. सुरुवातीलाच त्या लिहितात की, 1 जानेवारी 1989 रोजी हाश्मीवर हल्ला झाला, 2 जानेवारीला त्यांना मृत्यूने गाठले, पण त्यानंतर दोनच दिवसांनी, म्हणजे 4 जानेवारीला ‘जनम’ने त्याच जागी प्रयोग केला. तेव्हापासून दरवर्षी त्याच दिवशी, त्याच ठिकाणी ‘जनम’तर्फे नाटक सादर केले जाते. श्रीमती मोलोयश्री महत्त्वाची माहिती देतात की, 1978 साली ‘जनम’ने धोरणात्मक निर्णय घेतला की यापुढे स्वत: नाटके लिहायची आणि सादर करायची. यातील पहिले सडक नाटक म्हणजे राकेश सक्सेना आणि सफदर हाश्मी यांनी लिहिलेले ‘मिशन’. या पुस्तकात हबीब तन्वीर यांनी 1988 साली ‘जनम’वर लिहिलेला लेख आहे. तन्वीर यांनी ‘जनम’साठी नाटकं दिग्दर्शित केली. तन्वीर यांच्या मते आजच्या सडक रंगभूमीची गंगोत्री म्हणून ‘जनम’चा उल्लेख करावा लागेल.

कला आणि राजकारण यांचे संबंध कसे असावेत, याबद्दल अभ्यासकांत नेहमी वाद असतात. काही अभ्यासकांच्या मते कलेने राजकारणाबद्दल ठसठशीत, स्पष्ट भूमिका घ्यावी. याचप्रमाणे काही अभ्यासक मानतात की कलेचे जग स्वायत्त असते, यात राजकारणाची लुडबूड नको. हा वाद अधिक तीव्र होतो, जेव्हा यात नाटकासारख्या समाजसन्मुख, प्रयोगक्षम कलेची चर्चा असते. ‘नाटक’ हा कलाप्रकार समूहमानसाला आवाहन करणारा असल्यामुळे नाटक आणि राजकारण याबद्दल नेहमी चर्चा असते. जगभरचा रंगभूमीचा इतिहास बघितला तर असे आढळते की, इतिहासाच्या अनेक टप्प्यांवर नाटकाच्या माध्यमातून बंडखोर वा क्रांतिकारक आशय समाजासमोर आणला गेला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर नाझीवादाची खिल्ली उडवणारी अनेक नाटके रंगभूमीवर आली होती. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्ण काळात ‘कीचकवध’ वगैरेंसारख्या नाटकांतून ब्रिटिश सत्तेविरुद्धच असंतोष व्यक्त होत असे. स्वातंत्र्यानंतर आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी अनेक नाटके आली होती. अलेक पद्‌सी यांनी इंग्रजी रंगभूमीवर सादर केलेल्या ‘ज्यूलियस’ सीझरमध्ये सीझरची भूमिका एका बाईने केली होती. याचाच अर्थ असा की रंगभूमीद्वारे पुरोगामी आशय, क्रांतिकारक आशय प्रभावीपणे व्यक्त करता येतो. मात्र या रंगभूमीची एकूणच मर्यादा म्हणजे सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेला प्रेक्षकवर्गच या नाटकांचा आस्वाद घेऊ शकतो. या रंगभूमीची दुसरी महत्त्वाची मर्यादा म्हणजे यातील अर्थकारण.

कमान रंगभूमीवरील नाटके (प्रोझिनियम थिएटर) करमणूकप्रधान असतात, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्मितिमूल्ये दर्जेदार असावी लागतात. उत्पादनाचा खर्च भरून काढण्यासाठी अशा नाटकांतील मनोरंजनाच्या अंगांचा सतत विचार करावा लागतो. हे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे श्री.सुधन्वा देशपांडे यांनी संपादित केलेले ‘द थिएटर ऑफ द स्ट्रीटस- द जननाट्य मंच एक्सपीरियन्स’ हे पुस्तक. या पुस्तकात ‘सडक रंगभूमी’ (स्ट्रीट थिएटर) ची सैद्धांतिक चर्चा आहे, काही मुलाखती आहेत, काही लेख आहेत. सडक रंगभूमी आणि एकूणच रंगभूमीच्या अभ्यासकांना महत्त्वाचे वाटेल असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक दिल्लीच्या जननाट्य मंच या संस्थेने प्रकाशित केले आहे.  भारतातील सडक रंगभूीच्या संदर्भात ‘जननाट्य मंच’ (ऊर्फ जनम) ही एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था दिल्लीत 1973 साली सफदर हाश्मी यांनी काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केली. दिल्लीच्या आसपासच्या भागात आणि एकूणच उत्तर भारतातील एक आदरणीय संस्था म्हणून ‘जनम’चा उल्लेख करावा लागतो. या संस्थेने सादर केलेली सडक नाटके एवढी प्रभावी असायची (आजही असतात) की 1 जानेवारी 1989 रोजी जनमचा प्रयोग सुरू असताना काही प्रतिगामी शक्तींनी कलाकारांवर प्राणघातक हल्ला केला. यात दुसऱ्या दिवशी सफदर हाश्मी मृत्युमुखी पडले. अशा संस्थेच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचे संपादन करून ही जनमची कामगिरी समाजासमोर आणल्याबद्दल श्री.सुधन्वा देशपांडे यांचे अभिनंदन!

या पुस्तकात अभ्यासकांचे लेख आहेत, काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण म्हणजे सफदर हाश्मी यांची दीर्घ मुलाखत आणि जनमला दहा वर्षे झाली तेव्हा त्यांनी लिहिलेला लेख! अपेक्षेप्रमाणे या पुस्तकाला सुधन्वा देशपांडे यांची अगदी छोटी प्रस्तावना आहे. त्यात ते नमूद करतात की, यातील लेख, मुलाखती वगैरे रंगभूमीशी या ना त्या प्रकारे संबंधित असलेल्यांच्या आहेत. याचा अर्थ असा की यातील प्रत्येक मजकुराला स्वानुभवाचे वजन आहे. ‘जनम’बद्दलच्या पुस्तकाचे महत्त्व देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे. ते दाखवून देतात की, आपल्या देशातील सडक नाटक करणाऱ्या संस्थेचे सरासरी आर्युमान पाच वर्षे असते, पण 1973 साली स्थापन झालेली ‘जनम’ आजही कार्यरत आहे. त्यांनी प्रस्तावनेच्या शेवटी सफदर हाश्मी यांच्याबद्दल मोजक्या शब्दांत व्यक्त केलेल्या भावना तशाच्या तशा देण्याचा मोह आवरत नाही... This little book is for safdar Hashmi- a visionary, who, thankfully, never became a guru. We feel his loss more than ever and we feel his presence more than ever. We miss him but we refuse to mourn him. We salute his death, and we celebrate his life.

या पुस्तकाची सुरुवात ऑक्टोबर 1988 मध्ये हाश्मी यांनी लिहिलेल्या लेखाने होते. हाश्मी यांनी हा लेख सडक नाटकांचे दशक पूर्ण होताना लिहिला होता. या लेखात हाश्मी यांनी कमान रंगभूमी आणि सडक रंगभूमी यांची चर्चा केली आहे. हाश्मी यांच्या मते आज या दोन रंगभूमींत कोणत्याही प्रकारचा संवाद नाही. यानंतर हाश्मी सडक रंगभूमीचा जागतिक संदर्भात आढावा घेतात. रशियन राज्यक्रांती 1917 च्या पहिल्या वाढदिवसाला व्हेवोल्ड मेयरहोल्ड यांनी मायकोव्हस्की यांनी लिहिलेले ‘मिस्टरी बफे’चा केलेला प्रयोग म्हणजे सडक रंगभूमीवरील पहिला प्रयोग. त्यानंतर 1920 च्या आसपास चीन, यादवी युद्धाच्या काळातील स्पेन, व्हिएतनाम, अमेरिकेतील मेक्सिकन कामगारांनी सादर केलेले प्रयोग इत्यादी प्रगती दाखवता येते. भारतात साम्यवादी पक्षाने सुरू केलेली ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ ही नाट्यसंस्था सडक रंगभूमीवरील नाटके करत असे. या ऐतिहासिक, जागतिक पार्श्वभूीच्या संदर्भात हाश्मी यांनी कमान रंगभूमी व सडक रंगभूमी यांची तुलना केली आहे. कमान रंगभूमीवरील नाटके पलायनवादी असतात, तर सडक नाटके पुरोगामी आशयाची असतात. असे असले तरी दोन्ही प्रकारचा संबंध लोकांशी असतो, याकडे दुर्लक्ष करायला नको.

मुख्य म्हणजे हाश्मी यांना रंगभूमीच्या परिणामक्षमतेबद्दल खूप आदर आहे. नेदरलँड विद्यापीठात रंगभूमीचे अध्यापन करणाऱ्या युजिन इव्हैन यांनी मे 1988 मध्ये हाश्मी यांची घेतलेली दीर्घ मुलाखत, या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या मुलाखतीत हाश्मी यांची सुरुवात कशी झाली, त्यांना कसा संघर्ष करावा लागला, त्यांचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संबंध कसे आहेत वगैरे माहिती समोर येते. मुख्य म्हणजे यातील रंगभूीबद्दलची तात्त्विक चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. हाश्मी यांच्या मते कमान रंगभूमीत अनावश्यक नखरे फार असतात. याचा अर्थ आम्ही जुनी रंगभूमी नाकारतो असे नाही. आज परंपरेसमोर वाकण्याची, परंपरेचा उदोउदो करण्याची फॅशन आहे. परंपरेबद्दल सडक रंगभूमीवरसुद्धा वैचारिक स्पष्टता नाही. मी स्वत: नागर कलाकार आहे, मी पारंपरिक रंगभूमीवर वावरू शकत नाही. मी स्वत: आदिवासी कलाकारांप्रमाणे नाचू, गाऊ शकत नाही.

पुढे युजिन इव्हैन यांनी हाश्मी यांना पारंपरिक कलेचा व्यापार करणाऱ्या हबीब तन्वीर वगैरेंबद्दल थेट प्रश्न विचारला. हाश्मी यांनी त्याला विस्तृत उत्तर दिले. जेथे जेथे हबीब तन्वीर यांनी व्यवस्थेशी समझोता केला, तेथे तेथे हाश्मी यांनी रंगभूमीसाठी सारे जीवन दिले, याकडेही हाश्मी लक्ष वेधतात. हाश्मी यांनी बादल सरकार यांच्या रंगभूमीबद्दल सणसणीत आक्षेप घेतले. सरकार यांची ‘तिसरी रंगभूमी’ दिशाभूल करणारी आहे, असा हाश्मी यांचा आक्षेप आहे. या मुलाखतीच्या उत्तरार्धात हाश्मी यांनी त्यांच्या जीवनात सडक रंगभूमी कशी शिरली, कशी वाढली इत्यादी तपशील दिले आहेत. 1977 साली जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला. त्या काळी दिल्ली शहरापासून 15 ते 20 मैल दूरवर एका कंपनीत कामगारांची संघटना नव्हती. त्यांच्या दोन अगदी साध्या मागण्या होत्या. त्या मान्य करण्याऐवजी मालकांनी सुरक्षारक्षकांना गोळीबार करण्याचा हुकूम दिला. यात सहा कामगार मारले गेले. या प्रसंगावर नाटक लिहावे, अशी हाश्मी यांना सूचना करण्यात आली. या प्रसंगापासून त्यांच्या नेतृत्वाखालील सडक रंगभूमी गतिमान झाली.

ही दीर्घ मुलाखत म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे. हाश्मी यांची पत्नी मोलोयश्री हाश्मी यांचा एक छोटा आठवणीपर लेख आहे. सुरुवातीलाच त्या लिहितात की, 1 जानेवारी 1989 रोजी हाश्मीवर हल्ला झाला, 2 जानेवारीला त्यांना मृत्यूने गाठले, पण त्यानंतर दोनच दिवसांनी, म्हणजे 4 जानेवारीला ‘जनम’ने त्याच जागी प्रयोग केला. तेव्हापासून दरवर्षी त्याच दिवशी, त्याच ठिकाणी ‘जनम’तर्फे नाटक सादर केले जाते. श्रीमती मोलोयश्री महत्त्वाची माहिती देतात की, 1978 साली ‘जनम’ने धोरणात्मक निर्णय घेतला की यापुढे स्वत: नाटके लिहायची आणि सादर करायची. यातील पहिले सडक नाटक म्हणजे राकेश सक्सेना आणि सफदर हाश्मी यांनी लिहिलेले ‘मिशन’. या पुस्तकात हबीब तन्वीर यांनी 1988 साली ‘जनम’वर लिहिलेला लेख आहे. तन्वीर यांनी ‘जनम’साठी नाटकं दिग्दर्शित केली. तन्वीर यांच्या मते आजच्या सडक रंगभूमीची गंगोत्री म्हणून ‘जनम’चा उल्लेख करावा लागेल.

तन्वीर नमूद करतात की सडक रंगभूमी म्हणजे विद्रोहाची रंगभूमी, म्हणजेच ती डाव्या शक्तींची रंगभूमी असते. एवढेच नव्हे तर तन्वीर असेही नमूद करतात की, अर्थपूर्ण, महत्त्वाची रंगभूमी डाव्यांची असते. सफदर हाश्मी यांच्या राजकीय जाणिवा एवढ्या तीव्र होत्या की, त्यांनी सडक रंगभूमीवर काम करणे, यात एक प्रकारची अपरिहार्यता होती. याचा अर्थ ‘जनम’ने फक्त सडक रंगभूमीवरच काम केले असे नाही, जनमने सुमारे अकरा नाटके कमान रंगभूमीवर सादर केली. ‘बकरी’ (1974) पासून ‘हम यहीं रहेंगे’ (1997) वगैरे पारंपरिक नाटके त्यांनी सादर केली होती. तन्वीर देत असलेली माहिती महत्त्वाची आहे. यामुळे जनमचा रंगभूमीविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. या पुस्तकाच्या उत्तरार्धात गो.पु.देशपांडे यांची मोलोयश्री हाश्मी, सुधन्वा देशपांडे, ब्रिजेश यांनी घेतलेली मुलाखत आहे. ही मुलाखत 1998 मध्ये घेतलेली आहे. गो.पु.देशपांडे यांच्या मते आजच्या काळात राजकीय रंगभूमीचा ऱ्हास होत आहे. या मुलाखतीतील बराच भाग गो.पु.देशपांडे यांनी लिहिलेल्या जोतिबा फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ नाटकाबद्दल आहे. हे नाटक ‘जनम’प्रमाणेच कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ला संस्थेने समाजासमोर आणले. गो.पुं.च्या मते या नाटकातील क्रांतिकारक आशय ‘जनम’ने सादर केलेल्या प्रयोगात योग्य प्रकारे व्यक्त झाला. गो.पुं.नी याचे कारण दिले नाही, पण जनमला क्रांतिकारक नाटके सादर करण्याचा जेवढा प्रदीर्घ अनुभव आहे तेवढा ‘प्रत्यय’ नाही; हे कारण असू शकते.

याच पुस्तकात सुधन्वा देशपांडे यांचा 1996 साली प्रकाशित झालेला लेख आहे. यात त्यांनी ‘अंधेरा’ हे नाटक करतानाचे अनुभव नमूद केले आहेत. हे नाटक जनमने अवघ्या 28 दिवसांत उभे केले. देशपांडे यांनी सडक रंगभूमी बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांत झालेले बदल नोंदवले आहेत. आजचा कामगार सुशिक्षित आहे, तंत्रकुशल आहे, तरुण आहे, जीन्स घालणारा आहे. अशा प्रेक्षकांचा प्रतिसाद वेगळा असतो. या पुस्तकात अरुण घोष यांचाही लेख आहे. अरुण घोष यांनी सडक रंगभूमीवर पीएच.डी. केलेली आहे. त्यांनी ‘जनमच्या नाटकातील भाषा’ या विषयावर लिहिले आहे. घोष यांच्या मते सडक रंगभूमीचे स्वरूपच असे असते की, यातील पात्रांची भाषा इतर नाटकांपेक्षा वेगळी असते.

सुधन्वा देशपांडे यांनी संपादित केलेले हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे सडक रंगभूमीबद्दलची सैद्धांतिक चौकट अभ्यासकांसमोर आली. या पुस्तकातील सर्वच लेखक सडक रंगभूमीशी या ना त्या प्रकारे निगडित असल्यामुळे प्रत्येक लेखामागे असलेले अनुभवाचे वजन जाणवते. मुख्य म्हणजे सफदर हाश्मी आणि त्यांची ‘जनम’ यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.

Tags: अरुण घोष सडक रंगभूमी कमान रंगभूमी सुधन्वा देशपांडे जनम सफदर हाश्मी जननाट्य मंच रंगभूमी नाटक राजकारण कला अविनाश कोल्हे जननाट्य मंच आणि सडक रंगभूमी इंग्रजी ग्रंथ परिचय arun ghosh sadak rangbhumi Kaman rangbhumi sudhanwa deshpande janm safdar Hashmi jannatya manch rangbhumi natak rajkarn kala avinash kolhe jannatya manch and sadak rangbhumi Engraji granth parichay weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके