डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिका-पाकिस्तान संबंध आणि दक्षिण आशिया

आता अमेरिका पाकिस्तान आणि जिहाद यांच्यातील परस्परसंबंधांची चर्चा करणारी पुस्तके प्रकाशित होत आहेत. यांतील ताजे पुस्तक म्हणजे ब्रुस रिडेल यांचे ‘डेडली एम्ब्रेस : पाकिस्तान अमेरिका ॲंड द फ्युचर ऑफ जिहाद’. रिडेल ज्येष्ठ नोकरशहा आहेत. त्यांना आशियाच्या या भागात अमेरिकन सरकार, त्याचप्रमाणे अमेरिकेचे गुप्तहेर खाते सी.आय.ए.मध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.  या पुस्तकात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे प्रतिबिंब पानोपानी पडलेले आहे. या पुस्तकात त्यांनी पानापानावर अनेक व्यक्तींची नावे घेतली आहेत. शिवाय हा मजकूर सी.आय.ए.ने प्रकाशित होण्याआधीच नजरेखालून घातल्याची नोंद या पुस्तकात आहे. याचाच अर्थ असा की हा मजकूर अमेरिकन सरकारला मान्य आहे. हे या ग्रंथाचे खरे महत्त्व आहे. 

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जागतिक राजकारणात अनेक दूरगामी बदल झाले. यांतील काही महत्त्वाचे बदल म्हणजे एक महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय. या महासत्तेचा एकमेव हेतू म्हणजे मार्क्सवादाचा पराभव. या हेतूने आंधळ्या झालेल्या अमेरिकेने सोव्हिएत युनियनची नाकेबंदी करण्यासाठी प्रसंगी विधिशून्य राजकारण केले. याचाच एक भाग म्हणजे अमेरिकेने दक्षिण आशियात भारतापेक्षा पाकिस्तानला भरपूर मदत केली. जरी पाकिस्तानात बराच काळ लष्करशाही होती तरी अमेरिकेने लोकशाही असलेल्या भारतापेक्षा पाकिस्तानला प्राधान्य दिले. वास्तविक पाहता पाकिस्तान म्हणजे शीतयुद्ध काळातील अमेरिकेचा पित्त्या. अमेरिकेने पाकिस्तानला पुढे करून स्वतःचे राजकारण साधले हा इतिहास आहे. 1971 साली अमेरिका आणि चीन यांच्यात जी मैत्री झाली त्यात पाकिस्तानचा सिंहाचा वाटा होता. नंतर मात्र अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्त्व ओसरत गेले. पाकिस्तानच्या सुदैवाने 1979 च्या डिसेंबर महिन्यात सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात रणगाडे घुसविले आणि पुन्हा एकदा अमेरिकेच्या लेखी पाकिस्तानचे महत्त्व कमालीचे वाढले. 

कम्युनिस्टांविरुद्ध लढण्यासाठी अफगाणी टोळ्यांना जी शस्त्रात्रे दिली जात होती ती पाकिस्तानमार्गे रवाना करण्याला दुसरा पर्याय नव्हता. पाकिस्तानने याचा पुरेपूर फायदा उचलला. तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख जनरल झिया यांनी पाकिस्तानच्या इस्लामीकरणाचा कार्यक्रम जोरात राबवला. यथावकाश सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यामुळे अमेरिकेच्या लेखी पाकिस्तानची गरज पुन्हा एकदा संपली. अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येत असलेल्या मदतीबद्दल हात आखडता घ्यायला सुरुवात केली. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते रागावले. अमेरिकेने आपल्याला वापरून घेतले आणि काम संपल्यावर फेकून दिले अशी भावना पाकिस्तानी राज्यकर्ते व्यक्त करायला लागले. 1991 साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर परिस्थिती जबरदस्त वेगाने बदलली. बघता बघता अमेरिका जगातील एकमेव महासत्ता म्हणून समोर आली. आता जगाला अमेरिकेची दागगिरी सहन करतच जगावे लागेल असे दिसत असतानाच ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर सप्टेंबर 2001 मध्ये दहशतवादी हल्ला केला. यामुळे अमेरिकेसमोर आणि म्हणजेच जगासमोर नवा शत्रू उभा राहिला तो म्हणजे ‘इस्लामी दहशतवाद’.यामुळे आता अमेरिका, पाकिस्तान आणि जिहाद यांच्यातील परस्परसंबंधांची चर्चा करणारी पुस्तके प्रकाशित होत आहेत. 

यांतील ताजे पुस्तक म्हणजे ब्रुस रिडेल यांचे ‘डेडली एम्ब्रेस : पाकिस्तान अमेरिका अँड द फ्युचर ऑफ जिहाद’.  रिडेल ज्येष्ठ नोकरशहा आहेत. त्यांना आशियाच्या या भागात अमेरिकन सरकार, त्याचप्रमाणे अमेरिकेचे गुप्तहेर खाते सी.आय.ए.मध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. या पुस्तकात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे प्रतिबिंब पानोपानी पडलेले आहे. या पुस्तकात त्यांनी पानापानावर अनेक व्यक्तींची नावे घेतली आहेत. शिवाय हा मजकूर सी.आय.ए.ने प्रकाशित होण्याआधीच नजरेखालून घातल्याची नोंद या पुस्तकात आहे. याचाच अर्थ असा की हा मजकूर अमेरिकन सरकारला मान्य आहे. हे या ग्रंथाचे खरे महत्त्व आहे. या पुस्तकाला लेखकाची छोटीशी प्रस्तावना आहे. लेखक नमूद करतो की त्याला 1991 सालापासून चार राष्ट्राध्यक्षांबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. याचा अर्थ असा की लेखकाला महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय कसे घेतले जातात याचा दांडगा अनुभव आहे.  लेखकाच्या मते शीतयुद्धातील संघर्षामुळे अमेरिकेला नेहमी पाकिस्तानला पाठिंबा द्यावा लागला. याबद्दल लेखकाला ना खेद आहे ना खंत. रिडेल यांच्यासारख्या नोकरशहांना अशा निर्णयात काहीही रस नसतो. अशा मांडणीचा एक फायदा म्हणजे अशा पुस्तकांत तात्त्विक चर्चा जवळजवळ नसते. असतात ते नागडेउघडे राजकीय डावपेच. हा एक प्रकारचा फायदा आहे. यामुळे अमेरिकन सरकारातील नोकरशाही कशी काम करते याबद्दल माहिती मिळते.

या पुस्तकातील पहिले प्रकरण महत्त्वाचे आहे. याचे शीर्षक आहे ‘पाकिस्तानला समजून घेताना’. यात अमेरिकेचा पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि आहे यावर प्रकाश पडतो. काळानुरूप यात बदल झाला असला तरी दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियाच्या राजकारणात अमेरिकेला वेळोवेळी पाकिस्तानची मदत झालेली आहे हे वास्तव नजरेआड करता येत नाही. यात मूलभूत बदल झाला तो 1989 मध्ये- जेव्हा सोव्हिएत युनियनच्या फौजा अफगाणिस्तानातून माघारी गेल्या तेव्हा. पण काही वर्षांत म्हणजे 2001 मध्ये सुरू झालेल्या इस्लामी दहशतवादामुळे अमेरिकेला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मदतीची गरज निर्माण झालेली आहे. 

आताची मैत्री आणि आधीची मैत्री यांतील मूलभूत फरक लक्षात घेतला पाहिजे. आता पाकिस्तानी समाजाला अमेरिकेचा विश्वास वाटत नाही. अमेरिका फक्त स्वतःची गरज बघते आणि ती संपल्यावर आपल्याकडे दुर्लक्ष करते याचा अनुभव पाकिस्तानला आलेला आहे.  दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आता पाकिस्तानात आणि एकूणच मुस्लिम जगतात अमेरिका म्हणजे ‘इस्लामचा शत्रू’ असे समीकरण दृढ झाले आहे. परिणामी पाकिस्तानातसुद्धा अमेरिकेच्या विरोधात कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांची संख्या भरपूर आहे. यांतीलच एक महत्त्वाचा गट म्हणजे अल्‌ कायदा. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली म्हणजे आजचा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध अतिशय गुंतागुंतीचे का आहेत याचा अंदाज येतो. 

लेखकाने पहिल्या प्रकरणात ही पार्श्वभूमी दिली आहे. 1958 साली पाकिस्तानने पेशावर भागात अमेरिकेला एक गुप्त विमानतळ बांधू दिला होता. येथून अमेरिकन हेरखाते चीन आणि रशिया यांच्या हालचालींवर नजर ठेवू शकत असे. लेखकाच्या मते हा पाकिस्तान अमेरिका मैत्रीचा परमोच्च बिंदू होता. (पृ.15.)  दुसरे प्रकरण पाकिस्तानात अलीकडच्या काळात झालेल्या बदलांची चर्चा करते. हे मूलभूत बदल जनरल झिया यांच्या कारकीर्दीत झाले.  जनरल झिया यांनी 1977 साली लष्करी बंड केले. त्यानंतर ते सुमारे दहा वर्षे सत्तेत होते. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी नोकरशाही आणि इतर महत्त्वाच्या संस्थांचे इस्लामीकरण केले. यामागे लष्कराची दडपशाही जशी होती तसाच मुल्ला-मौलवींचा सक्रिय पाठिंबा होता.  

लेखक नमूद करतो की झियांनी निर्माण केलेला पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानचे जनक बॅ.जीना अभिप्रेत असलेला पाकिस्तान नव्हे. झियांच्या काळात आय.एस.आय.ला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. (पृ.21.) आपल्या पटकन लक्षात येत नाही पण जसं स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताला जम्मू-काश्मीरची डोकेदुखी आहे तशीच पाकिस्तानला अफगाणिस्तानची कटकट आहे. अफगाणिस्तान - पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा म्हणजे ‘ड्यूरॅण्ड रेषा’- जी अफगाणिस्तानने कधीही मान्य केली नाही. परिणामी पाकिस्तानला त्या बाजूने सतत पख्तून राष्ट्रवादाचा सामना करावा लागला. अशा अफगाणिस्तानात जेव्हा 1979 मध्ये रशियन रणगाडे शिरले तेव्हा लाखो अफगाणी निर्वासित पाकिस्तानात शिरले. त्यांना प्रशिक्षण देऊन अमेरिकेने रशियाविरुद्धचा लढा चालवला. जेव्हा दहा वर्षांनी म्हणजे 1989 मध्ये रशियन फौजा माघारी गेल्या तेव्हा या प्रशिक्षित पण आता काम नसलेल्या अफगाण समाजाला जिहादशिवाय पर्याय नव्हता. या प्रकारे अफगाणांना वाऱ्यावर सोडून दिल्याबद्दल लेखकाने अमेरिकन सरकारच्या कोत्या धोरणावर टीका केली आहे. लेखकाने तिसरे प्रकरण पाकिस्तानात सुरू असलेल्या दोन जिहादांची चर्चा करण्यासाठी वापरले आहे.  एक जिहाद आहे तो पाश्चात्य देशांविरुद्ध आहे, तर दुसरा आहे तो भारताविरुद्ध आहे.     या दोन जिहादांची उद्दिष्टे वेगवेगळी असल्यामुळे पाकिस्तानात नेहमी यादवी युद्ध सुरू असल्याचे वातावरण असते. यामुळेच 2007 साली बेनझीर भुत्तो यांचा खून झाला. (पृ.39) या दोन जिहादांनी निर्माण केलेले ताणतणाव कमी आहेत की काय म्हणून 1998 मध्ये पाकिस्तानने अणुस्फोट केले. परिणामी दक्षिण आशियात अणुस्पर्धा सुरू झाली आहे. जगाच्या इतिहासात प्रथमच अशी भयावह स्थिती आहे की जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांसमोर उभे आहेत आणि जे गेली पन्नास वर्षे एकमेकांशी भांडत आहेत.

आता भारत पाकिस्तान संबंध- म्हणजेच काश्मीरची समस्या- आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे. लेखक पुढे दाखवून देतो की आता जिहाद आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला आहे. मुंबई शहरावर झालेल्या जिहादी हल्ल्यांत अनेक पाश्चात्त्य नागरिक मारले गेले. यामुळे आता पाश्चात्त्य समाज कोठेही सुरक्षित नाही असे वातावरण निर्माण झाले आहे. लेखक नमूद करतो की अशा प्रतिकूल परिस्थितीत ओबामा यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतली आहेत. अमेरिकासुद्धा पूर्णपणे सुरक्षित नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. 2009 साली न्यूयार्क शहरात तीन बाँब आढळले.(पृ.99.)  लेखकाने पुढच्या प्रकरणात पाकिस्तान जर जिहादी देश झाला तर काय होईल याचे चित्र रेखाटले आहे. जर जिहादी गटांनी कराची शहर आणि बंदर ताब्यात घेतले तर तेथील लोकशाही शक्तींना मदत करणे फार अवघड होईल.  लेखक नमूद करतो की जिहादी पाकिस्तानचा सर्वांत जास्त त्रास इस्रायलला होईल. पाकिस्तानने नेहमी पॅलेस्टाईन समाजाला मदत केलेली आहे. आजचा पाकिस्तान तर अण्वस्त्रधारी आहे. याचा वेगळा आणि भयानक परिणाम जगभरच्या इस्लामी समाजावर झालेला आहे, कारण अद्याप पाकिस्तान हा एकमेव इस्लामी देश आहे ज्याने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत. लेखकाच्या मांडणीनुसार पाकिस्तानला वेगळे पाडण्यापेक्षा त्याच्याशी चर्चा करत राहणे गरजेचे आहे.पृ.119.

पाकिस्तानी समाजात होत असलेले बदल समजून घेतले पाहिजेत. तेथे शहरीकरण झपाट्याने होत आहे. तेथे तीन कोटींचा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी समाजाशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.  आजच्या युगात अमेरिका आणि चीन यांच्यात सुप्त स्पर्धा आहे. यात पुन्हा एकदा पाकिस्तानचे महत्त्व वाढणार आहे. अशा स्थितीत अमेरिकेला पाकिस्तानची गरज भासणार आहेच. म्हणून अमेरिकेने भारतावर सतत दबाव ठेवला पाहिजे जेणेकरून पाकिस्तानात स्थैर्य राहील. आजही पाकिस्तानच्या दोन्ही बाजूंच्या सीमारेषा वादग्रस्त आहेत. म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची घाई करू नये. एवढेच नव्हे तर अमेरिकेने काश्मीरची समस्या सोडवण्यात पुढाकार घ्यावा असा सल्ला लेखकाने दिला आहे. लेखकाच्या मांडणीत त्याचा कल स्पष्ट दिसतो. लेखकाला दक्षिण आशियात शांतता हवी आहे, ज्यात अमेरिकेचे सामारिक हित लपलेले आहे. यासाठी लेखक काही उपाय सुचवत आहे. 

पुस्तक : ‘डेडली एम्ब्रेस’ 
लेखक : ब्रुस रिडेल 
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स, दिल्ली 
किंमत : रु. 499.  

Tags: काश्मीर आशिया जिहाद पाकिस्तान अमेरिका Kashamir Asia Jihad Pakistan America america pakistan books india pakistan book indo pak realtions pak india india pakisatan pakistan america and asia indo pak relations weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके