डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीतला ढिसाळपणा, स्टेडियम्स आणि इतर आवश्यक वास्तू उभारण्याच्या कामातला भ्रष्टाचार, क्रीडा साहित्याच्या खरेदी व्यवहारातले घोटाळे या विषयी हा वर्ग अनभिज्ञ आहे असे नाही. टीव्ही चॅनेलने हा सर्व तपशील त्यांच्या कानावर पोचवला आहे. पण भ्रष्टाचार ही काही त्याच्या दृष्टीने नवलपरीची बातमी नाही. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनातल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून तो अजिबात अस्वस्थ झालेला नाही. जिथे फार मोठा पैसा गुंतला आहे तिथे भ्रष्टाचार असणारच हे त्याने गृहीत धरले आहे. ‘पैसे खा पण काम करा’ अशी त्याची प्रशासनाकडून आज अपेक्षा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा व्हाव्यात असे त्याला अगदी पोटतिडिकीने वाटत नाही; पण होऊ नयेत असेही तीव्रपणे वाटत नाही. स्वतंत्र विचार करायचा आळस असल्याने तो अनेकदा राजकीय पक्ष, चॅनेल्सवरल्या चर्चा, यांच्यावर अवलंबून असतो. नेते मंडळी त्याला भडकवतात तेव्हा तो भडकतो. या अवस्थेत तो कधी भाषेचा मुद्दा घेऊन आरडाओरडा करतो; कधी धर्माचा, कधी प्रांतिक अस्मितेचा. नवी दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबाबत त्याच्या आवडत्या राजकीय पक्षाने कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही; त्यामुळे या वर्गानेही या स्पर्धांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.

देशाची एकूण आर्थिक स्थिती, देशावरला कर्जाचा भार लक्षात घेता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या देशात भरवू नयेत असे अनेकांना वाटते. दुसऱ्या अनेकांना वाटते की आपला देश प्रगतिपथावर; महासत्ता बनण्याच्या दिशेने घोडदौड करतो आहे. त्यामुळे हम भी कुछ कम नही हे जगाला दाखवून द्यायचे असेल तर जशा अणुस्फोट चाचण्या करायला हव्यात तसे राष्ट्रकुल स्पर्धांचेही आयोजन करायला हवे. चीनने जसे ऑलिंपिक स्पर्धांचे बहारदार आयोजन करून जगाला दिपवून टाकले तसे आपण राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करून जगाला दिपवले पाहिजे. चलनवाढ, महागाई या स्थानिक समस्या अगदीच मामुली आहेत. शिवाय या स्पर्धांमुळे आपल्या देशांतर्गत क्रीडा विकासाला मोठी चालना मिळेल. पहिल्या अनेकांचे म्हणणे असे, की जनतेचे आरोग्य, राहणीमान, वाहतूक, रस्तेविकास, वीजनिर्मिती अशा मूलभूत गरजांबाबत देश अजून मागासलेला आहे. या गोष्टींकडे सर्वांआधी लक्ष द्यायला हवे. स्वातंत्र्याला साठ वर्षे उलटून गेली. आता तरी निदान देशाच्या आर्थिक तरतुदींचा प्राधान्यक्रम अधिक डोळसपणे निश्चित करायला हवा.

मोठे उत्सव आयोजित करताना देशाची आर्थिक स्थिती, देशाच्या डोक्यावरला कर्जाचा भारही लक्षात घ्यायला हवा. खाजगी क्षेत्रातल्या प्रगतीने, संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तरुणांच्या कामगिरीने आणि मोठ्या शहरांच्या वरपांगी आधुनिकीकरणाने हुरळून गेलेली माणसे राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक स्पर्धांचा पुरस्कार करणारी आहेत. त्यांना हिल स्टेशन, मॉल्स, चांद्रयान, वॉटर गेम्स, अणुप्रकल्प, सागरी मार्ग, मेट्रो रेल्वे ही देशाच्या भरभराटीची चिन्हे वाटतात. पहिल्या अनेकांना हे दुसरे अनेक, विकासाचे शत्रू म्हणून संबोधतात. तर पहिले अनेक दुसऱ्या अनेकांना ‘ऋण काढून सण साजरे करणारे’ समजतात. देशातले ग्रामीण वास्तव या मंडळींच्या खिजगणतीत नाही असे त्यांना वाटते. देशातले हे दोन तट आणि या दोन तटांमधला संघर्ष या देशाला तसा नवा नाही. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या नावाने पूर्वी ते ओळखले जायचे. उदार आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यापासून ‘आहे रे’ गटाला एक प्रकारचे नैतिक बळ प्राप्त झाले आहे. या ‘आहे रे’ गटातल्या लोकांची संख्या तशी नगण्य आहे, पण म्हणून देशातल्या घडामोडीतला या लोकांचा सहभाग नगण्य नाही.

आजचे राजकीय सत्ताधारी याच गटातले आहेत. याच गटात आहेत देशातले नामांकित अर्थपंडित, तंत्रज्ञ, बडे उद्योजक आणि प्रशासक. देशातल्या घटनांवर, धोरणांवर आणि त्यांच्या अंलबजावणीवर त्यांचे नियंत्रण आहे. त्यांच्या मानसिकतेचे आणि त्यांच्यापाशी असलेल्या निर्णयक्षमतेचे प्रतिबिंब देशाच्या वर्तनावर आज स्पष्ट जाणवते. देशवासीयांच्या या वर्गवारीतून तिसरा एक ठळक वर्ग आपण नेहमी वगळतो. हा आहे - राजकीय सामाजिक घडामोडींचा फारसा विचार न करणारा, स्वत:च्या कुटुंबापुरते पाहणारा सामाजिक वर्ग. तोही अनेकांचा बनलेला आहे. किंबहुना या अनेकांची संख्या इतर कोणत्याही समूहाहून जास्त आहे. राजकीय नेते मंडळींचे या वर्गाकडे विशेष लक्ष नसले तर नवल. दर पाच वर्षांनी रांगा लावून मतदान करणारा हा समाज गट आहे. आहे रे व नाही रे वर्गांधल्या सुप्त संघर्षांपासून, देशातील सध्याच्या प्रक्षोभकारी वास्तवापासून या वर्गाला दूर ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष श्रम घेताना दिसतो. हिंदी सिनेा आणि क्रिकेट यांची त्यांना  या कामी मोलाची मदत झाली आहे. आज टीव्ही सीरिअल्सही त्यांना यासाठी अनायासे उपयोगी पडत आहेत. याखेरीज आहेत शिवजयंती, दहीहंडी, गणपती उत्सव यांसारखे समारंभ. आधीच बधीर असलेल्या या वर्गाच्या संवेदना या करमणुकीच्या क्लोरोफॉर्मने आणखी बधीर झाल्या आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीतला ढिसाळपणा, स्टेडियम्स आणि इतर आवश्यक वास्तू उभारण्याच्या कामातला भ्रष्टाचार, क्रीडा साहित्याच्या खरेदी व्यवहारातले घोटाळे या विषयी हा वर्ग अनभिज्ञ आहे असे नाही. टीव्ही चॅनेलने हा सर्व तपशील त्यांच्या कानावर पोचवला आहे. पण भ्रष्टाचार ही काही त्याच्या दृष्टीने नवलपरीची बातमी नाही. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनातल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून तो अजिबात अस्वस्थ झालेला नाही. जिथे फार मोठा पैसा गुंतला आहे तिथे भ्रष्टाचार असणारच हे त्याने गृहीत धरले आहे. ‘पैसे खा पण काम करा’ अशी त्याची प्रशासनाकडून आज अपेक्षा आहे. राष्ट्रकुल स्पर्धा व्हाव्यात असे त्याला अगदी पोटतिडिकीने वाटत नाही; पण होऊ नयेत असेही तीव्रपणे वाटत नाही. स्वतंत्र विचार करायचा आळस असल्याने तो अनेकदा राजकीय पक्ष, चॅनेल्सवरल्या चर्चा, यांच्यावर अवलंबून असतो. नेते मंडळी त्याला भडकवतात तेव्हा तो भडकतो. या अवस्थेत तो कधी भाषेचा मुद्दा घेऊन आरडाओरडा करतो; कधी धर्माचा, कधी प्रांतिक अस्मितेचा. नवी दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांबाबत त्याच्या आवडत्या राजकीय पक्षाने कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही; त्यामुळे या वर्गानेही या स्पर्धांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.

सामाजिक चळवळवाल्यांच्या यादीत आज तरी राष्ट्रकुल स्पर्धा दिसत नाही. अजून तरी कोणतीच चळवळ या संदर्भात देशात उभारली गेलेली नाही. कोट्यवधी रुपयांचा हा खेळखंडोबा पण कोणीही, अगदी जहाल वर्तमानपत्रांनीसुद्धा, त्याविरुद्ध अतिरेकी भूमिका घेतलेली दिसत नाही. अपवाद चेतन भगत या तरुणाच्या लाडक्या लेखकाचा. त्याने टाइम्स ऑफ इंडियातल्या आपल्या सदरातून जनतेला या स्पर्धांवर बहिष्कार घालायचे आवाहन केले आहे. स्पर्धांना फिरकू नका, ज्या चॅनेलवर स्पर्धा प्रक्षेपित करताहेत तो चॅनेल पाहू नका असे त्याचे आवाहन आहे. पण अद्यापपावेतो त्याला कोणाचा प्रतिसाद मिळालेला नाही. याच वृत्तपत्रातल्या जग सूर्या या ज्येष्ठ स्तंभलेखकाने आपल्या स्तंभातून चेतन भगतांच्या आवाहनाची थोडीफार दखल घेतली. पण चेतन भगतना त्यांनी उलट प्रश्न केला. ‘तुम्ही कसले स्पर्धेवर बहिष्कार घालताय? स्पर्धांच्या आयोजकांनी खूप आधी तुच्यावरच बहिष्कार घातला आहे, याची तुम्हांला कल्पना आहे का? पहिल्यापासून तुम्हा सामान्यांना बाजूला सारूनच तर त्यांचे सारे चालू आहे.’ तर एकूण चित्र हे असे आहे ‘राष्ट्रकुल स्पर्धांच्या विरोधात जो कोणी बोलेल तो राष्ट्रद्रोही’ असे नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित म्हणतात. दरम्यान, अमेरिकेने आपल्या नागरिकांना स्पर्धा काळात भारतात न फिरकण्याचा सल्ला दिला आहे. स्पर्धेत दहशतवादी हल्ले होणार असल्याची खबर म्हणे त्यांना मिळाली आहे. सुरक्षाव्यवस्था समाधानकारक नाही म्हणून ऑस्ट्रेलियाने आपले स्पर्धक स्पर्धेला न पाठवायचा निर्णय घेतला आहे. राजधानीत स्पर्धा आयोजनातल्या कामात गोंधळ माजला असताना तिथे पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनने लष्करी मुसंडी  मारल्याची खबर आहे. आता याचा निषेध करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही हे उघड आहे; पण तोही आता हळुवार शब्दात करायला हवा नाही तर स्पर्धेच्या तोंडावर नसत्या समस्या उभ्या राहायच्या.

या सगळ्या राजकीय, सामाजिक पर्यावरणात देशाच्या राजधानीत तथाकथित प्रतिष्ठित अशा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरवल्या जाताहेत. देशातल्या सतराशे साठ समस्या, वीज टंचाईचे महासंकट, धार्मिक क्षेत्रातले प्रक्षोभक वातावरण, नक्षलवादाच्या वाढत्या प्रभावाने अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका, श्रीमंत-गरीब यांच्यातली वाढती दरी, अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रभावातून, जातीयवादातून घडणारे गुन्हे, काश्मीरमध्ये निर्माण झालेली प्रक्षोभक स्थिती हे सगळे काही काळ विसरून आपल्याला आज या स्पर्धांचे स्वागत करायचे आहे. कोट्यवधी रुपयांचा हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा सोहळा. स्वागत न करून चालणारच नाही, कारण आता परतीचे दोर कापले गेले आहेत. काही वेडे म्हणताहेत, की या रकमेत किती शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणे देता येतील; किती ग्रामीण शाळांना भिंती आणि छप्परे बांधून देता येतील; दुर्ग भागातील जनतेसाठी किती आरोग्य केंद्रे निर्माण करता येतील, किती पोलिसांना उत्तम प्रतीची संरक्षक जाकिटे पुरवता येतील या सर्वांचा हिशेब एकदा केला पाहिजे. पण या वेड्यांकडे दुर्लक्ष करू या आणि राष्ट्रकर्तव्याचा भाग म्हणून आपण या स्पर्धांच्या जल्लोषात सामील होऊ या. मात्र तो करण्याआधी देशातल्या क्रीडाविश्वातील सद्य:स्थितीचा एकवार आढावा घ्यायला काय हरकत आहे.

देशी क्रीडापटूंच्या क्रीडा कौशल्याच्या वाढीसाठी 1982च्या एशियाड क्रीडास्पर्धांनी नेमका काय आणि किती हातभार लावला याचा सर्व्हे करायला हवा. किती शाळा-कॉलेजांतून आवश्यक साधनांसह या स्पर्धांचे प्रशिक्षण दिले गेले, हे तपासून पाहिले पाहिजे. आजच्या स्पर्धांच्या पार्श्वभूीवर अशी तपासणी आणि आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या 25 वर्षांत क्रिकेट हा खेळ किती फोफावला, किती परिसरात लोकप्रिय झाला, त्या तुलनेने इतर क्रीडा प्रकारांचा किती प्रसार आणि विकास झाला याचा ताळेबंद मांडणे गरजेचे आहे. अशा भव्य क्रीडा-महोत्सवांनी देशात कोणत्या खेळाला किती चालना मिळाली हे जाणून घेण्यासाठी माहितीचा अधिकारही वापरायला हरकत नाही. असे महोत्सव वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि टीव्ही प्रसारण कंपन्या यांच्या व्यवसायाला महोत्सव बरकत आणत असतील, पण त्यापलीकडे यातून काय साधले जाते याचा जमाखर्च सर्वांसमोर यायला हवा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या विरोधकांनी नाही तर स्पर्धांच्या समर्थकांनी पुढाकार घेऊन हे काम करायला पाहिजे. नाही तर तथाकथित राष्ट्रद्रोहीच अधिक राष्ट्रप्रेमी आहेत असे म्हणावे लागेल. प्रतिष्ठेच्या भलत्या संकल्पना, आज देशात जो थोडाबहुत विकास होतो आहे त्याचा खेळखंडोबा करू पाहताहेत, असा इशारा ते केव्हापासून देत आले आहेत. (व्यंगचित्रे : ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकातून.) 

Tags: chetan bhagat चेतन भगत ashiyad kridaspardha एशियाड क्रीडास्पर्धां cricket क्रिकेट mulabhut garaja मूलभूत गरजा rashtarkul krida spardha राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा awadhoot paralakar अवधूत परळकर krida konachya pida kunala क्रीडा कोणाच्या पीडा कुणाला weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके