डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेजारी किंवा मित्राकडून उधार-उसनवारीवर वस्तू मागणं, आर्थिक ऐपत असूनही दुसऱ्याचे पैसे थकवणं, विवाहित स्त्री-पुरुषांनी परस्परांना पुरेसं स्वातंत्र्य न देणं, अकारण एकमेकांचा संशय घेत राहणं, साक्षर असूनही वर्तमानपत्रं-पुस्तकं-नियतकालिकं वाचायच्या भानगडीत न पडणं, नोकरदार स्त्रिया स्वयंपाकघरात राबत असता त्यांना मदत करायचे सोडून बाहेरच्या खोलीत टीव्ही-चॅनल सर्फिंग करत बसणं किंवा मित्र जमवून पत्ते कुटणं हे सगळे भ्रष्ट आचाराचेच नमुने आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.
 

भ्रष्टाचाराचं काय करायचं असा प्रश्न आज लोक एकमेकांना विचारताना दिसतात. उद्या तेही दिसणार नाहीत. एकेकाळी भ्रष्टाचार या विषयावर निवडणुका लढवल्या जायच्या. आज भ्रष्टाचार हा निवडणूक प्रचारातील मुद्दा राहिलेला नाही, असं सर्वच पक्षांत बोललं जाऊ लागलं आहे. भ्रष्टाचाराचं कुणाला काही वाटेनासंच झालं आहे. 

आमच्या लाडक्या नेतृत्वानं भ्रष्टाचारी मार्गानं कितीही बेहिशेबी मालमत्ता गोळा केली तरी चालेल; आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचू, हे तामिळनाडूच्या जनतेनं स्पष्टपणे देशाला सांगून टाकले आहे. 

भ्रष्टाचार हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो करणारच, अशा थाटात नेतेमंडळी आज वावरत आहेत. ‘आम्हांला निवडणुकीसाठी पैसा लागतो म्हणून आम्ही भ्रष्ट मार्गानं तो मिळवतो', असं निर्लज्जपणे सांगणाऱ्या सेनाप्रमुखांच्या स्पष्टवक्तेपणाची वृत्तपत्रही तारीफ करत असतात. ‘आजवर इतरांनी खाल्ले; आता मराठी माणसांना थोडं खाऊ द्या', यांसारखी सेनाप्रमुखांची विधानं कालांतरानं क्रमिक पुस्तकांत समाविष्ट केली जायची शक्यता नाकारता येत नाही. 

सेनाप्रमुख एकटे नाहीत. मूल्यशिक्षणाच्या शाळेतून बाहेर पडलेल्या संघाच्या एका विद्यार्थ्याला टेबलावरून नोटांची बंडलं स्वीकारताना संपूर्ण भारतानं पाहिलं. नितीन गडकऱ्यांच्या नागपूरमध्ये 76 नगरसेवकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गिरफतार केल्याचे वृत्त आहे आणि म्हणून लाजिरवाणं वृत्त म्हणजे ही धरपकड लोकशाहीला काळिमा असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाचा भ्रष्टाचार कागदोपत्री सिद्ध झाला आणि त्याचा जाब त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते म्हणतात, गेल्या चाळीस वर्षांत काँग्रेसनं किती भ्रष्टाचार केलाय ते आधी बघा; मग आम्हांला विचारा. 76 नगरसेवकांना अटक होताच नागपूरात भाजपानं ‘बंद' चा आदेश दिला आणि भाजपाच्या नेत्यांनी आपण जनतेच्या मागे नव्हे तर भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे आहोत, हे देशाला उघड दाखवून दिले. भ्रष्टाचारापेक्षा भयावह काही असेल तर भ्रष्टाचाराचं समर्थन आणि भलावण करण्याची ही वृत्ती. भ्रष्टाचारापेक्षा अधिक वेगानं ती वाढते आहे आणि पूर्ण समाज पोखरून काढते आहे. 

‘तहलका प्रकरण काही लाखांचं आहे. त्याचा इतका गहजब कशासाठी ? तुलनेनं बोफोर्स दलाली प्रकरण कित्येक कोटींचे आहे', असं भाजपा नेते उघड म्हणत असतात. संरक्षण खरेदीत सरसकट भ्रष्टाचार चालतो हे तहलकानं दुनियेसमोर आणलं तेव्हा लोक हादरले. इतर खात्यातल्या भ्रष्टाचाराचं ठीक आहे, पण संरक्षणखात्यात हे घडावं ? असं काही विचारू लागले. 

हे मान्य आहे की ‘जिवाशी खेळ खेळणारा भ्रष्टाचार नको', अशी भावना या उद्गारामागे असते. पण मग अन्न, औषध खात्यातील भ्रष्टाचारानं देशात कित्येक बालकांचा बळी जातो; विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पानं भविष्यात पर्यावरणाला धोका संभवतो हे नजरेआड कसं करून चालेल ? 

आज एन्रॉनच्या रूपात कोकणात भ्रष्टाचाराचं मंदिरच उभारलं गेलं आहे. त्याविरुद्ध सुरुवातीला समाजकार्यकर्त्यांनी उठवलेला आवाज पोलिसी दंडेलीनं आणि दहशतवादानं दडपण्यात आला. राज्यातले काही अर्थशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि पत्रकार त्या वेळी एन्रॉनच्या भ्रष्ट व्यवहाराकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प जनहिताचा कसा आहे हे महाराष्ट्राला पटवण्यात गर्क होते. को.म.सा.प. या साहित्यसंस्थेनं एन्रॉनचं आर्थिक साहाय्य स्वीकारून कोकणात साहित्य संमेलन भरवलं. संमेलन अध्यक्षांची नेण्या-आणण्याची आणि निवासाची व्यवस्था एन्रॉनच्या सहकार्यानंच झाली. भ्रष्टाचाराची ही प्रतिष्ठित रूपं पाहण्यासारखी आहेत.

एखादा प्रकल्प प्रदूषणकारी आहे असा ओरडा झाला की प्रकल्पात गुंतलेली कंपनी पत्रकारांना मोफत प्रकल्पस्थळी घेऊन जाते. पत्रकारांचा तिथला निवास, खाणंपिणंही कंपनीनं प्रायोजित केलेलं असतं. ‘पब्लिक रिलेशन' या नावाखाली अशा भ्रष्ट व्यवहाराचा स्वतंत्र अकाऊंट कंपन्यांच्या वार्षिक अर्थव्यवहारात सापडतो. या सर्वांत आता काही नावीन्य उरलेलं नाही. उलट अशा गोष्टीवर चर्चा करणं हेच बुद्धूपणाचं मानलं जातं. मेधा पाटकर, अण्णा हजारे, चंद्रशेखर, लखिना या मंडळींना हसणारी; त्यांच्या मोहिमांची कुचेष्टा करणारी मोठी जमात आज जशी पत्रकार मंडळीत आहे तशी बाहेरही आहे. 

कळत नकळत सामान्य नागरिक देशात उभारलेल्या या भ्रष्टाचारी यंत्रणेत सहभागी होताना दिसतो आहे. भ्रष्टाचाराची आपल्याला हौस नसते किंबहुना भ्रष्टाचाराविना जगता आलं तर आपल्यापैकी अनेकांना हवंच आहे. पण प्रत्यक्षात काय होतं ? स्वतःच्या मालकीचं घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट असते. ते खरेदी करताना, मूळ मालकाशी काळ्या पैशात व्यवहार करावा लागतो. आयकर चुकवलेली बेहिशेबी आर्थिक संपत्ती अशा कामी उपयोगी पडते. जवळच्या नातेवाईकाला इस्पितळात दाखल करण्याची पाळी आली की त्याला चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून इस्पितळातल्या कर्मचाऱ्याला बक्षिसी देणं ही लाचच असते. मुलांच्या शाळा-प्रवेशाच्या वेळी शाळाचालकांकडे पावतीविना मोठी रक्कम मोजावी लागते. बदलीचा हुकूम रद्द करण्यासाठी आपल्यापैकी अनेक संबंधितांना पैसे चारतात. ऑफिसातल्या वरिष्ठांना खूष ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मेजवान्या, भेटवस्तू ही देखील एक प्रकारची लाचच आहे हे देणाऱ्यांना ठाऊक असते. स्वार्थासाठी माणूस हे सहज करत असतो आणि बाहेरील भ्रष्टाचाराबद्दल बोंब ठोकण्यात पुढं असतो.

भ्रष्टाचाराची व्याख्या आर्थिक व्यवहारापुरती सीमीत ठेवणं वास्तविक मूर्खपणाचं आहे. अन्याय समोर दिसत असता हात जोडून स्वस्थ बसणं हा देखील भ्रष्ट आचार मानायला हवा. शेजारच्या घरात स्त्रीवर अत्याचार होत असता डोळ्यांवर कातडं ओढणं हाही भ्रष्टाचारच. 

ऑफिसातल्या स्त्री-कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्याशी असभ्य वर्तन करणं, स्त्री कर्मचाऱ्यानं स्वतःच्या सामाजिक स्थानाचा आणि प्रचलित कायदेकानूनचा फायदा उठवून पुरुषवर्गाला अडचणीत आणणं आणि आपलं इप्सित साध्य करणं हाही भ्रष्टाचार मानला पाहिजे. थोडक्यात, भ्रष्टाचार या संज्ञेची व्याप्ती तशी मोठी आहे. दारू, सिगरेट यांच्याबर जेवढा खर्च होतो त्याच्या निम्मा खर्चही पुरुष आपल्या मुलाबाळांच्या शिक्षण-सुविधांवर, खेळण्या-पुस्तकांवर करताना दिसत नाहीत, हा भ्रष्ट आचार नाही तर काय ? 

शेजारी किंवा मित्रांकडून उधार-उसनवारीवर वस्तू मागणं, आर्थिक ऐपत असूनही दुसऱ्याचे पैसे थकवणं, विवाहित स्त्री- पुरुषांनी परस्परांना पुरेसं स्वातंत्र्य न देणं, अकारण एकमेकांचा संशय घेत राहणं, साक्षर असूनही वर्तमानपत्रं-पुस्तकं-नियतकालिक वाचायच्या भानगडीत न पडणं, नोकरदार स्त्रिया स्वयंपाकघरात राबत असता त्यांना मदत करायचं सोडून बाहेरच्या खोलीत टीव्ही-चॅनल सर्फिंग करत बसणं किंवा मित्र जमवून पत्ते कुटणं हे सगळे भ्रष्ट आचाराचेच नमुने आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.

आजच्या समाजव्यवस्थेत भ्रष्टाचारशून्य आयुष्य जगणं मुश्कील होऊन बसलं आहे हे खरं आहे. पण कमीत कमी भ्रष्टाचार घडेल अशी जीवनशैली अंगीकारायला काय हरकत आहे ? प्रत्येक वेळी शासन, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळता येणार नाही. ते बिचारे आपलंच तर प्रतिनिधित्व करत असतात. आणि ते करताना चौकशी आयोगालाही तोंड देत असतात. आपल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणारा आयोग कुणी नेमला तर ?

Tags: नितीन गडकरी पत्रकार नागपूर बोफोर्स भ्रष्टाचार तामिळनाडू Nitin Gadkari reporter Nagpur Bofors corruption #Tamilnadu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके