डिजिटल अर्काईव्ह

पंचवीस जूनपासून बेमुदत उपवासाचा माझा निश्चय

स्थानबद्ध कामगार कार्यकर्ते श्री. बा. न. राजहंस यांचे प्रधानमंत्र्यांना पत्र.

येरवडा केंद्रीय कारागृह,
जून 1, 1976 
मा. प्रधानमंत्री

2 ऑक्टोबर 1975 पासून येरवड्याच्या कारागृहात स्थानबद्ध असलेला एक राजबंदी या नात्याने मला काही गोष्टी नमूद कराव्या असे वाटते.

तुम्ही आणि तुमच्या सरकारने केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच घटनेतील 352 व्या कलमातील खास विशेषाधिकारांचा गैरवापर करून 26 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आहे. स्वतंत्र भारतातील तो एक काळा दिवस ठरेल, असे मला वाटते. कारण त्या दिवशी तुम्ही भारतीय नागरिकांचे सर्व अधिकार हिरावून घेतले आहेत. प्रत्येक नागरिकाचे अधिकार आता यापुढे तुमच्या नोकरशहांच्या लहरीवर अवलंबून राहतील! अधिक खेदाची गोष्ट अशी आहे की, अधिकाऱ्यांच्या एकतर्फी कारवाईविरोधी न्यायालयातही यापुढे दाद मागता येणार नाही. भारतीय लोकशाहीची अशा प्रकारे तुम्ही विटंबना चालवली आहे. स्वातंत्र्यलढ्यात जी मूल्ये उराशी बाळगली व ज्या मूल्यांसाठी लक्षावधी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, ती सर्व मूल्ये तुमच्या या कृतीने निर्दयपणे पायाखाली तुडवली गेली आहेत.

लोकसभा म्हणजे रबर स्टॅम्प

माझ्या माहितीप्रमाणे सबंध देशात ऐंशी हजारांहून अधिक राजकीय कार्यकर्ते देशातील निरनिराळ्या कारागृहात स्थानबद्ध आहेत. त्यांत खासदार आहेत. आमदार आहेत आणि विरोधी पक्षांचे असंख्य नेते आहेत. स्थानबद्ध करून ठेवलेल्या आम्हाला स्थानबद्धतेचे कारण माहीत नाही. गेल्या दहा महिन्यांत मिसासंबंधीच्या विशेषाधिकारांचा गैरवापर तर होतोच आहे. शिवाय वृत्तपत्रांवर प्रसिद्धिपूर्व तपासणी व अन्य अनेक जाचक निर्बंध लादले गेले आहेत. लोकसभेतील कार्यवाहीला ते प्रसिद्धी देऊ शकत नाहीत, तसेच न्यायालयाचे अधिकार मर्यादित केल्यामुळे न्यायसंस्थेचे स्वातंत्र्यही मर्यादित झाले आहे. लोकसभा म्हणजे पंतप्रधानांचा जणू काही रबरी शिक्काच बनली आहे!

छुपा जातिवाद

विरोधी पक्षांनी घातपाती कारवाया करण्याचा कट केला होता अशा सबबीखाली लोकशाही मूल्यांचे हनन करणाच्या या कृतींचे निलाजरेपणाने समर्थन केले जात आहे. आर्थिक दृष्टीने दुबळ्या घटकांच्या उन्नतीसाठी तुम्ही काही करू मागता, त्याबरोबर सामाजिक जीवनात शिस्त आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे असे तुम्ही सांगता, परंतु डाव्या आणि उजव्या अतिरेक्यांकडून या कामात अडथळे निर्माण केले जातात असाही तुमचा आरोप आहे. विरोधकांना तुम्ही हिंसक असेही म्हटले आहे, परंतु तुमचे आरोप सिद्ध होतील असा पुरावा तुम्ही दिलेला नाही किंवा ज्यांच्यावर हिंसक असल्याचे तुम्ही आरोप केले आहे त्यांना न्यायालयात खेचण्याची हिंमतही तुम्ही दाखवली नाही. दोषी ठरले तर कायद्याने होईल ती शिक्षा भोगण्यास ते सर्व तयार रहातील यात शंका नाही.

बी तसे फळ

खरे म्हणजे गेली 27 वर्षे काँग्रेसपक्षच अधिकारावर आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक जीवनात निर्माण झालेली अराजकता, वाढती बेकारी, भडकत्या किमती, भ्रष्टाचार इत्यादी सर्व गोष्टी म्हणजे काँग्रेस पक्षाच्या धोरणांचाच परिपाक आहे. तुम्ही जसे बी पेरले तसेच त्याचे फळही मिळाले आहे. असे असले तरी तुम्ही आणि तुमचे मंत्री आकाशवाणी आणि टी. व्ही.द्वारा विरोधी पक्षांवर खोटे आरोप करून जो प्रचार करत आहात. तो गोबेल्सला लाजवील असा आहे.

ब्रिटिशांचा वारसा

वेळोवेळी तुम्ही प्रतिगाम्यांना आणि जातीयवाद्यांना आपल्या सोयीने धारेवर धरत आहात. असे असले तरी स्थानबद्धांपैकी मुक्त झालेल्यांमध्ये अधिक संख्या प्रतिगामी आणि जातीय अशा जमाते इस्लामी या संघटनेशी संबंधितांचीच आहे. एक समाजवादी या नात्याने मी प्रतिगामी आणि जातीय विचारांचा विरोधक असलो तरी कोणत्याही व्यक्तिविरुद्ध मन मानेल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्याही मी विरोधी आहे. त्यामुळे जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांच्या सुटकेचे स्वागत करत असलो तरी त्यांच्या सुटकेने तुमचे ढोंग उघड़े पडले आहे, असे मला वाटते! त्यांची सुटका करण्याचा तुमचा हेतू स्पष्ट आहे. मुसलमानांत पुरोगामी विचारांचे वारे खेळू नये हाच तुमचा डाव आहे. त्यांच्यातील अल्पसंख्यत्वाच्या गंडाला कुरवाळण्याचा हा सारा प्रकार आहे. पक्षीय स्वार्थासाठी तुम्हाला त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्यांची एकगठ्ठा मते काँग्रेसला मिळावीत हाच त्यांना मुक्त करण्यात तुमचा हेतू आहे. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या या तुमच्या कारस्थानी प्रयत्नांतून ब्रिटिशांना लाजवील अशा ‘फोडा आणि झोडा’ नीतीचेच उघडेनागडे स्वरूप स्पष्ट दिसते!

फुसका कार्यक्रम

आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांचे आणि मागासलेल्या जनतेचे आपणच एकमेव हितचिंतक आहोत असे आणीबाणी जाहीर केल्यानंतरच्या आपल्या वक्तव्यांतून तुम्ही भासवत आहात. जो वीस कलमी कार्यक्रम तुम्ही जाहीर केला आहे त्यात आर्थिक आणि सामाजिक विषमता नाहीशी होईल असे काहीच नाही. आणीबाणीमुळे मागासलेल्यांचे हित साधता येईल अशी अपेक्षा आहे. परंतु आणीबाणीचे समर्थन सर्वप्रथम व्यापारी उद्योगपतींच्या संघटनांनीच केले आहे. हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. दुबळ्यांविषयीच्या कणवेने त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असे फक्त घालवेडे किंवा मूर्खच म्हणू शकतील. उलट आणीबाणीच्या निमित्ताने अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यारच तुम्ही हिसकावून घेतल्यामुळे समाजातील दुर्बल घटकच आणीबाणीचे बळी झाले आहेत.

तुमचा वीस कलमी कार्यक्रम फुसका आहे. या कार्यक्रमाने भूमिहीन शेतमजूर आणि मागासलेल्या दुर्बल घटकांचे कोणतेही प्रश्न सुटण्यास मदत झालेली नाही. ग्रामीण जनतेवर अजूनही उच्चवर्णीय स्थानिक नेते आणि तुमचे नोकरशहा यांचीच अधिसत्ता चालू आहे. लोकशाही आणि शांततामय मार्गाने संघटित लढे देऊनच या दुर्बळांना मुक्त करता येईल. परंतु दुर्दैवाने जनतेचे हे हत्यारच तुम्ही हिसकावून घेतले आहे. मूलभूत अधिकारांचा वापर दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी करता येईल अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. पण आणीबाणी जाहीर केल्याने त्यांच्या त्या आकांक्षेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आहेत. घातपाती कारवाया आणि हिंसक घटनांबद्दल तुम्ही सतत तोंडसुख घेत आहात. परंतु लोकशाही शांततामय लढ्यांचे मार्ग बंद करून तुम्हीच घातपाती आणि हिंसक मार्गाचा रस्ता मोकळा केला आहे.

इतके सर्व झाले तरी

हिंसेच्या आणि घातपाती मार्गाचा अवलंब करत असल्याचा तुमचा आरोप विरोधकांनी फेटाळून लावला आहे. लोकसभेत किंवा लोकसभेबाहेर या मार्गाचा त्यांनी कधीच पुरस्कार केलेला नाही. 21 जुलैला तुम्हाला पाठवलेल्या पत्रातही जयप्रकाशजींनी तुमचा आरोप बिनबुडाचा असल्याचे दाखवून दिले आहे. 21 आणि २२ मार्च 1976 रोजी विरोधी पक्षांची संयुक्त बैठक मुंबईला झाली होती. त्या बैठकीतही संसदीय आणि शांततामय मार्गावरच आपला विश्वास असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केले आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला वाव मिळू नये आणि लोकशाही मूल्ये बळकट व्हावी या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी एक आचारसंहिता तयार करण्याच्या कामी सहकार्य देण्याचीही तयारी असल्याने या संकल्पित विरोधी पक्षाने जाहीर केले आहे. अनेक साहित्यिक, कायदेपंडित आणि अपक्ष विचारवंतांनी आणीबाणीविरोधी मत व्यक्त केले असून नागरिक स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करावे, अशी मागणी केली आहे.

आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आचार्यांच्या परिषदेनेसुद्धा पूर्वस्थिती स्थापित करण्याचे आवाहन केले आहे. आचार्य परिषदेच्या निवेदनाचे विरोधी पक्षांनी त्याचबरोबर अपक्ष विचारवंतानी स्वागत केले आहे. तुम्हीही तुमच्या अनेक वक्तव्यांतून आपला लोकशाहीवर विश्वास असल्याचे अनेकदा सांगितले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी हिंसक आणि पक्षपाती मार्गांचा त्याग केला तर परिस्थिती पूर्ववत करण्याचा मनोदयही तुम्ही अनेकदा व्यक्त केला आहे. वस्तुतः विरोधी पक्षांचा हिंसक मार्गावर कधीच विश्वास नव्हता आणि नाहीही ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. अर्थात अशी भूमिका नसलेले उजवे कम्युनिस्ट मात्र आपल्या गळ्यातले ताईत बनले आहेत. या स्पष्टीकरणानंतर तरी तुमचे समाधान होईल आणि आचार्यांच्या निवेदनाच्या आधारे वा इतर मार्गाने तुम्ही पूर्वस्थिती प्रस्थापित कराल असे वाटले होते. परंतु विरोधकांच्या स्पष्टीकरणाला किंवा आचार्यांच्या निवेदनाला तुमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळू नये हे खेदजनक आहे. उलट सरकार अधिक लोकशाहीविरोधी बनत असल्याचे दिसून येते. कामगारांना ‘मे दिन’ साजरा करण्याची परवानगी न देणे, हे तुमच्या लोकशाही व श्रमिक विरोधी धोरणाचे उदाहरण होय.

बलिदानाची तयारी

आम्हा स्थानबद्धांना असे वाटत होते की काही दिवसांनी का होईना आपल्यातला सद्सद्विवेक जागा होईल आणि लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी खूप यातना सोसाव्या लागणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. असे असले तरी पुन्हा एकदा तुमच्या विवेकाला आवाहन करतो आणि आणीबाणी उठवून लोकशाही मूल्यांची प्रस्थापना करावी असे सुचवतो.

माझा निर्धार

मी एक छोटा माणूस आहे. गेली सत्तावीस वर्षे आणि त्याहीपूर्वी मी अनेकदा कारागृहात गेलो आहे. सामाजिक-आर्थिक समता यावी यासाठी मी झगडत राहिलो आहे. स्वातंत्र्यलढ्यात भी भाग घेतला आहे. स्वातंत्र्य हे केवळ राष्ट्रीय मूल्य आहे असे नाही तर ते एक मानवी मूल्य आहे. साऱ्या मानवसमाजाची दास्यातून दारिद्र्यातून मुक्ती झाली पाहिजे, असा स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा मी अर्थ करतो. ज्या ज्या महान व्यक्तींनी या अशा स्वातंत्र्यासाठी बलिदान केले त्या साऱ्यांपासून मी प्रेरणा घेतली आहे. त्या सर्व थोर व्यक्तींचे स्मरण करून तुरुंगातच मी ता. 25 जून 1976 पासून बेमुदत उपोषणाचा प्रारंभ करण्याचे ठरवले आहे. लोकशाही मूल्यांचे हनन करून तुम्ही जे पाप केले आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या माझ्या मनाच्या वेदना या प्रकारे मी व्यक्त करू चाहतो. 

आपणास सद्बुद्धी मिळो आणि आपला विवेक जागृत होवो, ही सदिच्छा.

आपला,
बा. न. राजहंस

Tags: बा. न. राजहंस इंदिरा गांधी आणीबाणी Indira Gandhi Emergency weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी