डिजिटल अर्काईव्ह

येवले तालुका विशेषांक: वैशिष्ट्यपूर्ण असेही एक कॉलेज मॅगेझीन

शिक्षण क्षेत्रातील भेडसावणाऱ्या समस्या, नवनवे शैक्षणिक प्रयोग, विज्ञानाच्या प्रगतीचा हरक्षणी उंचावत जाणारा आलेख, नित्य विस्तारत जाणाऱ्या विविध ज्ञानशाखा नि नव्याने निर्माण होणारे सामाजिक संदर्भ यांची व ‘कॉलेज मॅगझीनची’ बहुतेक फारकतच दिसून येते.

शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले झाल्यानंतर ग्रामीण भागात निघालेली महाविद्यालये नव्या संदर्भातील सामाजिक बदलाचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा होती पण आजतागायत अनेक महाविद्यालये समाजापासून पृथरुच राहीली. महाविद्यालयाच्या लाखो रुपयांच्या प्रचंड इमारती, हजारो रुपयांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालये व मैंदाने यांचा आसपासच्या परिसरातील जनतेला फारसा उपयोग तर होत नाहीच पण महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेला किंवा शिकून बाहेर पडणारा विद्यार्थी व त्याचा मार्गदर्शक प्राध्यापक या दोहोंनी आपल्या बौद्धिक विकासाचा ठसा समाजावर उमटविल्याचे आशादायक चित्र क्वचितच दिसते. बहुतेक महाविद्यालये शेतकरी, कामकरी व सर्वसामान्य माणसे यांच्या पैशावर व श्रमावर उभी राहिलेली असूनही व्यर्थ गोष्टीवर महाविद्यालये अफाट खर्च करीतच असतात. ‘कॉलेज मॅगझीन’ हे त्याचे एक उदाहरण.

शिक्षण क्षेत्रातील भेडसावणाऱ्या समस्या, नवनवे शैक्षणिक प्रयोग, विज्ञानाच्या प्रगतीचा हरक्षणी उंचावत जाणारा आलेख, नित्य विस्तारत जाणाऱ्या विविध ज्ञानशाखा नि नव्याने निर्माण होणारे सामाजिक संदर्भ यांची व ‘कॉलेज मॅगझीनची’ बहुतेक फारकतच दिसून येते. सामाजिक परिवर्तनाचे एक हत्यार म्हणून तर राहोच पण हजारो रुपये खर्च करून छापलेल्या या नियतकालिकाची किंमत रद्दीपेक्षा जास्त नसावी हे दुर्देव! 

या पार्श्वभूमीवर येवले महाविद्यालयाने ‘येवले तालुका विशेषांका’च्या निमित्ताने केलेला प्रयोग अभिनंदनास पात्र आहे. येवले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचे, ऱ्हासाचे प्रतिबिंब टिपण्याचा प्रयत्न या विशेषांकाने केला आहे. अर्थात तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीचे ‘आंखो देखा हाल’ वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून व निरीक्षकाच्या बारकाईने चित्रित करण्याची संपादक मंडळाची भूमिका असली तरी 200 पृष्ठांच्या अंक संबंध तालुक्यातील सर्व अंगोपांगाचे सखोल चित्रण करता येणे केवळ अशक्य आहे शिवाय मर्यादित आर्थिक सामुग्री, अपुरा कालावधी व सामाजिक पहाणीचे चित्रण करून ते मांडण्यात विद्यार्थी लेखकांच्या पडणाऱ्या मर्यादा या ‘विशेषांका’च्याही मर्यादा आहेत हेही संपादक मंडळाने प्रामाणिकपणे मान्य केले आहे. सहाजिकच समाजकार्याचा ठेका घेतल्याचा आव व त्यातून निर्माण होणारी दांभिकता यांचा लवलेशही या अंकात दिसत नाही ही महत्वाची गोष्ट आहे.

तालुक्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणाऱ्या माहितीचे संकलन करण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांनी घेतलेले कष्ट पानोपानी दिसतात. या सर्व साहित्यातून एक सुसंगत सुर निर्माण करणे त्याहून कठीण पण संपादकीय कौशल्याने तो साधला आहे. ‘खेड्यातील भारत’ या मुख्य विचारधारेशी सर्व संकलन जोडल्याने ‘येवले तालुका विशेषांक’ हा फक्त विशिष्ट तालुक्यापूरता मर्यादित न रहाता तो खेड्यातील आजच्या खऱ्या भारताचा प्रतिनिधीक बनतो. तालुक्याची व त्यातील खेड्यांची भुरचना, नद्या, जलप्रवाह, पाझर तलाव, डोंगर, शेती, वाहतूक दळणवळण, वास्तीस्थाने, गावातील घरांची जातीनुरूप व सांपत्तिक स्थितीनुसार रचना दाखविणारे महितीपूर्व नकाशे, आलेख व टेबलस यांनी हा अंक गच्च भरला आहे. शिवाय तालुक्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे दर्शन घडविणारी शहाण्णव छायाचित्रे आपले लक्ष वेधून घेतात, अंतर्मुख करतात. विचार करायला लावतात. यातील काही छायाचित्रे तर दुर्मिळच म्हणावी लागतील. ठिकठिकाणी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चौकटी आपल्या माहितीत मोलाची भर घालतात.

या ‘येवले तालुका विशेषांक’ मुळे तीन प्रश्न निर्माण होतात.

  • महाविद्यालयीन नियतकालिक हा एक ‘विधी’ झाला आहे. विशिष्ट चाकोरी ही नियतकालिके तोडतील काय?
  • ती समाजाभिमुख होऊन काही सामाजिक कर्तव्ये पार पाडू शकतील काय?
  • लोकशाही, विज्ञाननिष्ठा व सामाजिक समता या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरातील जनसामान्यांचे, तरुणाचे, स्त्रियांचे प्रभोधनाचे व जागृतीचे कार्य पार पाडू शकतील काय?

असा अंक प्रसिद्ध करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल प्रमुख संपादक व प्राचार्य यांचे अभिनंदनच करायला हवे. या निमित्ताने त्यांनी महाविद्यालयीन नियतकालिकात एक नवा पायंडा पाडला आहे. अर्थात फक्त कॉलेजच्या कर्मकांडांची ‘नोंद’ करू इच्छिणाऱ्यांना ही नवी वात कितपत आवडेल ही गोष्ट वेगळी! हजारो रुपये खर्च करून फडतुस अंक काढण्यापेक्षा दोन वर्षांनी असा एखादा माहितीपूर्ण व सामाजिक जाणि‍वेतून काढलेला संग्राह्य अंकच स्वागतास पात्र! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी