डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एस्. एम्. यांचे चिरस्मारक-सोशलिस्ट फौन्डेशन

काळाने एसेमना आमच्यातून ओढून नेले, पण त्यांची अखेरची इच्छा व आजची समाजाची गरज पुरी करण्यासाठी आम्ही हालचाल सुरू केली. एसेम यांचे जीवनभरचे सहकारी श्री. नानासाहेब गोरे यांचे मार्गदर्शन सुदैवाने आज आम्हाला लाभले व त्यांच्याच नेतृत्वाखाली एसेम यांच्या देशभरच्या मित्रांबरोबर विचारविनिमय करून सोशलिस्ट फौंडेशनचे काम पुढे चालू ठेवण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी एकत्र करण्याचे ठरले.

आज एस्. एम्. यांना आपल्यातून जाऊन बरोबर एक वर्ष झाले. आज त्यांचा पहिला स्मृतिदिन. दिवस किती भराभर गेले आणि गेल्या एका वर्षात जगात व भारतात केवढी स्थित्यंतरे घडली! केवढ्या घटना घडल्या! काही चांगल्या तर काही खेदकारक. या सर्व घटनांचा विचार करताना एसेमच्या वर्तनाची व निवडणूकविषयक विचारांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. गेल्या वर्षात भारतीय जनतेने लोकशाही मार्गाने दशकानुदशकांची काँग्रेस राजवट केंद्रातून व अनेक राज्यांतून उखडून टाकली हे खरे, पण या निवडणुका खरोखरच आदर्श होत्या का? अमेठी व मेहम या दोन मतदारसंघांची आठवण लोकशाहीला निश्चित शोभा देणारी नाही. या दोन मतदारसंघांत अनुक्रमे तत्कालीन पंतप्रधान श्री. राजीव गांधी व हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. चौटाला उमेदवार होते व दोघांच्यावर निवडणुकीत सत्तेचा, पैशाचा व हिंसेचा गैरवापर केल्याचे आरोप, दोन्ही ठिकाणी फेरमतदानाचा आदेश या घटना भारतीय लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने खरोखरच लाजिरवाण्या व धोकादायक आहेत. सत्ता टिकविण्यासाठी राज्यकर्ते व नेते हे वाटेल त्या अनिष्ट मार्गाचा अवलंब करू लागले, तर लोकशाहीला ग्रहण लागल्याशिवाय कसे राहील? या दुःखद व लाजिरवाण्या उदाहरणांच्या पार्श्वभूमीवर 1952 च्या निवडणुकीत एसेम यांनी घेतलेली उदात्त व सचोटीची भूमिका आठवली म्हणजे

विषण्ण मनाला थोडा दिलासा वाटतो. भवितव्याच्या आशेचा थोडा लामणदिवा लुकलुकताना दिसतो. 1952 साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळच्या समाजवादी पक्षाची डॉ. आंबेडकर यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाबरोबर युती होती. पण या युतीला काही अपवाद होते व त्यातलाच एक अपवाद पुणे शहर लोकसभेच्या जागेचा होता. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी श्री. केशवराव जेधे यांना पाठिंबा दिला होता, तर समाजवादी पक्षाने एसेम यांना उभे केले होते. लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा जागांवर मात्र समाजवादी व शे. का. फे. उमेदवारांचा एकमेकांना पाठिंबा होता. त्यामुळे सर्व समाजवादी व शे. का. फे. कार्यकर्ते एकमेकांशी समरस होऊन एकमेकांना साहाय्य करीत (आपल्याच पक्षातील उमेदवाराला पाडण्याच्या कारवाया करणाऱ्या आजच्या सर्व पक्षांतल्या कार्यकर्त्यांचा या विधानावर विश्वास बसणार नाही.) परिणाम असा झाला की शे. का. फे. चे सर्व कार्यकर्ते व त्यांचे हवेली मतदारसंघातील त्यावेळचे उमेदवार श्री. चवरे हे सर्व एसेमचा प्रचार करू लागले. तेव्हा स्वतः एसेमनी त्यांना डॉ. बाबासाहेबांच्या शब्दाची आठवण करून दिली. ते शे. का. फे. च्या लोकांना सांगत: “बाबासाहेबांनी केशवराव जेधे यांना पाठिंबा दिला आहे, म्हणून तुम्ही आपली मते मला न देता केशवरावांनाच दिली पाहिजेत. कारण राजकारणांत तात्पुरत्या लाभापेक्षा शाश्वत मूल्ये महत्त्वाची आहेत. दिलेला शब्द पाळणे, बोलल्याप्रमाणे वागणे हे शाश्वत मूल्य आहे.” 

आज असे सांगणारे कितीसे उमेदवार असतील! असे कोणी राजकारणी आज या भारताच्या राजकीय खेळात आहेत का? नसल्यास आपण एसेमची आठवण कशासाठी करायची, असा प्रश्न मनाला भेडसावून जातो. पण अंधुक आशेला आजही जागा आहे. विश्वनाथ प्रताप सिंग हे व्यक्तिवाचक राजकारण न करता मुद्द्यांच्या धोरणांच्या राजकारणाचा पुरस्कार करताना दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मथुरा येथे भाजपच्या मंचावर जाण्याचे नाकारले. काश्मीर संदर्भाचे घटनेतील 300 वे कलम रद्द करा, अशी भाजपची भूमिका असताना व आपले सरकार त्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे याची स्पष्ट कल्पना असतानाही ते आपली भूमिका सोडत नाहीत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेबरोबर युती केली तर निश्चित आपणास सरकारमध्ये स्थान मिळेल किंवा लोकसभेत सहज निवडून जाता येईल, असे स्पष्ट दिसत असतानाही शिवसेनेसारख्या जातीयवादी, धर्मांध शक्तीबरोबर समझोता करायचा नाही या तत्त्वनिष्ठ भूमिकेला चिकटून राहाणाऱ्या श्रीमती मृणाल गोरे यांनी पराभवाची मानहानी पत्करली. स्वपक्षीयांची देखील टीका त्या रोज सहन करीत आहेत. माझ्या मते आशेच्या या मिणमिणत्या पणत्या पाहून एसेमचा आत्मा स्वतःला धन्य मानीत असेल.

एसेम यांनी आयुष्यभर ज्या तत्त्वांचे व मूल्यांचे जतन केले, त्या सत्याचरणाचा आणि तत्त्वनिष्ठेचा वसा आपल्या अनुयायांना दिला. त्यांच्यामुळेच आज कोठे ना कोठे या मिणमिणत्या पणत्या दिसत आहेत. पण सर्वत्र दुराचरणाचा, सत्तालोलुपतेचा, संधिसाधूपणाचा अंधःकार दाटत असताना या पणत्या टिकाव धरतील काय? त्यांनी टिकाव धरून आपले तेज वाढवावे म्हणून आपापल्या शक्तीप्रमाणे प्रयत्न करणे हीच एसेमची स्मृती साजरी करण्याचा खराखुरा मार्ग. आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी याच मार्गावर आम्ही जे पाऊल टाकतो आहोत, त्याची जनतेला माहिती देऊन त्यांच्या सहकार्याची याचना करण्यासाठी हे चार शब्द लिहीत आहे. एस्. एम्. जोशी यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा आम्ही त्यांच्या काही चाहत्यांनी व मित्रांनी त्यांचा सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली. या निधीमधून त्यांनी सोशलिस्ट फौंडेशन नावाची संस्था स्थापन केली. ते नेहमी आम्हाला सांगत की ते जन्मभर सार्वजनिक क्षेत्रात सचोटीने कार्य करू शकले, ते केवळ त्यांच्या मित्रांनी व चाहत्यांनी त्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीच्या जोरावर. पण समाजपरिवर्तनाचे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना असे मित्र थोडेच मिळणार आहेत! म्हणून त्यांनी, तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या निधीमधून सोशलिस्ट फौंडेशन मार्फत मदत करण्याचे ठरविले व सुमारे 40 कार्यकर्त्यांना जवळ जवळ 20 वर्षे अल्पशी का होईना मदत केली.

सुरुवातीच्या या काळात जमलेल्या निधीमधूनच साहाय्य देण्याचे ठरविल्यामुळे हा निधी 1985 च्या सुमारास संपत आला. त्यानंतर एसेम स्वतः आजारी पडले. परंतु आजारपणातही त्यांना या गोष्टीची आठवण होती. ते आजारी असतानाच 15 ऑक्टोबर 1988 रोजी त्यांनी एक बैठक बोलावली व फौंडेशन गुंडाळून टाकायचे की अधिक निधी जमवून त्याचे कार्य पुढे चालू ठेवायचे, असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित केला. अर्थातच आम्ही सर्वांनी हे काम पुढे चालू ठेवण्याच्या बाजूने निर्णय घेतला. रुग्णशय्येवर असलेल्या एसेमनी स्वतःच्या हस्ताक्षरात जनतेला एक अपील केले. त्यात ते म्हणतात, 

“आज देशात समाजपरिवर्तनाचे कार्य करणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. त्यांची आवश्यकताही आहे. अशा कार्यकर्त्यांना अल्पशी का होईना, मदत दिल्याशिवाय ते टिकून राहू शकत नाहीत. या कामासाठी येत्या वर्षात किमान 10 लाख रुपयांचा निधी उभारावा आणि त्यातून विचार प्रबोधनाचे, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे व आर्थिक साहाय्य देण्याचे काम पुन्हा सुरू करावे, असा आमचा विचार आहे. अर्थात मित्रांच्या सहकार्याखेरीज हे काम पूर्ण करणे शक्य नाही. याची आम्हाला जाणीव आहे.”

हे निवेदन प्रसिद्ध केल्यावर आजारी असूनही एकदोन बैठकीत त्यांनी स्वतः येऊन मित्रांना आवाहन केले. त्यांच्या हयातीत, त्यांच्या डोळ्यांसमोर हे काम पुन्हा सुरू करावे, असा आमचा प्रयत्न होता. पण काळापुढे कोणाचे काय चालणार? काळाने एसेमना आमच्यातून ओढून नेले, पण त्यांची अखेरची इच्छा व आजची समाजाची गरज पुरी करण्यासाठी आम्ही हालचाल सुरू केली. एसेम यांचे जीवनभरचे सहकारी श्री. नानासाहेब गोरे यांचे मार्गदर्शन सुदैवाने आज आम्हाला लाभले व त्यांच्याच नेतृत्वाखाली एसेम यांच्या देशभरच्या मित्रांबरोबर विचारविनिमय करून सोशलिस्ट फौंडेशनचे काम पुढे चालू ठेवण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी एकत्र करण्याचे ठरले.

आज देशात राजकीय व सामाजिक क्षेत्रांत प्रचंड उलथापालथ चालू आहे. सारा समाज घुसळून व ढवळून निघत आहे. एकीकडे सत्तापरिवर्तन, कामाचा अधिकार, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अशा चांगल्या गोष्टी, तर निवडणुकीतील हिंसाचार, अंधश्रद्धा, धर्मांधता आणि फुटीरता या विषारी शक्ती दुसरीकडे डोके वर काढीत आहेत. पंचायत राज्याची नवी संकल्पना, 18 वर्षांच्या तरुणाला नव्यानेच दिलेला मताधिकार, यांमुळे समाजमानस अधिकच संवेदनशील झालेले आहे. पण त्याला कोण आणि कोणते वळण लावणार? केवळ कायदे करून किंवा नोकरशाहीवर भरंवसा ठेवून हे कार्य होणार नाही, तर ज्यांनी हे कार्यच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले आहे अशा तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज या कार्यासाठी उभी करावी लागेल व त्यांना प्रशिक्षण देऊन साधने पुरवावी लागतील. याच हेतूने आम्ही ‘एस्. एम्. जोशी सोशलिस्ट फौंडेशन’ स्थापन केले असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी संकलित करण्याचा संकल्प केला आहे. या निधीमधून पुढील कामे करण्याचा विचार आहे. 

(1) तळागाळात समाजपरिवर्तनाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करणे व त्यांचे प्रशिक्षण करणे.

(2) समतेवर आधारलेला नवसमाज निर्माण व्हावा यासाठी लोकजागृती करण्यास उपयुक्त असे साहित्य व साधने कार्यकर्त्यांना पुरविणे.

(3) कार्यकर्त्याचे विविध क्षेत्रांत प्रबोधन व प्रशिक्षण करणे. 

(4) एस्. एम्. जोशी यांच्या नावाने, समाजवादी व गांधीवादी विचारांचे संशोधन व अध्ययन केंद्र स्थापन करणे. 

(5) तळागाळात ध्येयनिष्ठेने व चिकाटीने काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांची दरवर्षी निवड करून त्यांना 'एसेम जोशी समाजकार्य पुरस्कार' देणे. आज अशा कामाची पूर्वीपक्षाही जास्त गरज आहे व त्यातून एसेम यांची स्मृती चिरंतन राहील.

एसेमांची ध्येयनिष्ठा व त्यांनी जतन केलेली समतेची मूल्ये यांची जोपासना करणारे हे सोशलिस्ट फौंडेशन वाढवणे हेच त्यांचे चिरस्मारक ठरेल. म्हणून या फौंडेशनला हरप्रकारे साहाय्य करावे अशी त्यांच्या सर्व चाहत्यांना आमची विनंती आहे.

Tags: आंबेडकर सोशलिस्ट फाऊंडेशन एसेम जोशी ambedkar  socialist foundation s m joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके