अत्याधुनिक पद्धतीने वेषभूषा करणारा आजचा तरुण वर्ग सिनेमातील नटांची ऐट आणतो. परंतु त्याच वेळी स्त्रियांना मात्र 'नटी' सारखे वागण्याचे स्वातंत्र्य नाकारतो. हडपसरला असताना एक प्रकार मी डोळ्यांनी पाहिला. सोलापूर रोडने एक वरात चालली होती. गोरज मुहूर्तावर लग्न लावून घेण्यासाठी नवरदेव चालले होते. पाठीमागे 50-60 गाड्यांची रांग होती. बँड, वाजंत्री, ताशे, ढोल, लेझमीचा दणका उसळत होता. अशा मिरवणुकीत साहजिकच नवरानवरी पाहण्याची उत्सुकता असते.
सामाजिक सुधारणा व्हावी म्हणून महाराष्ट्रात अनेक चळवळी झाल्या. त्यांना शे-दीडशे वर्षांचा इतिहास आहे. 1873 साली म. ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या विशेषतः दलित व स्त्री शिक्षणाच्या कार्यास 1848 सालीच सुरुवात झाली होती. फुल्यांनी वर्णवर्चस्व व जन्माधिष्ठित जातधर्माच्या कल्पनेला सुरुंग लावला. गोपाळराव आगरकरांनी अनेक हल्ले चढवले. सती जाणे, केशवपन करणे, बालविवाह व शिक्षण-विन्मुखता या चालींना तिलांजली मिळाली. महर्षी कव्यांनी, गोपाळराव देशमुखांनी स्त्रियांच्या जीवनांत आत्मविश्वास निर्माण केला. या चळवळी काही वर्षे चांगल्याच फोफावल्या. त्यांचे परिणाम अगदी क्रांतिकारक ठरले. परंतु महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून व काही शहरांतून स्त्रियांचे दास्य संपले नाही. कायद्यात बदल झाले तरी रुढींचे राज्य कायम राहिले आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा झाला, परंतु जातिरिवाजाप्रमाणे, पंचासमक्ष सोडचिठ्ठी घेण्यास मुभा राहिली. महाराष्ट्रातील मराठा देशमुख समाजात स्त्रियांचे स्थान काय आहे याची खरोखर पाहणी झाली पाहिजे. पुरुषांना आजही अनेक विवाह करता येतात, परंतु स्त्रीला पुनर्विवाह करण्यास सामाजिक बंदी आहे हिंदुसमाजातील चातुर्वण्य व्यवस्थेत आपण अगदी वरचे आहोत असे दाखवण्याचा सदैव प्रयत्न होतो. आडनावापुढे 'देशमुख' असे शेपूट आवर्जून लावण्यात येते. वास्तविक बहुसंख्य मराठा देशमुख मंडळी शेती करतात. शेती करणे हे वेदप्रणित व्यवस्थेत शूद्राचे काम आहे. तरीही ही मंडळी 96 कुळीचा अभिमान सदैव बाळगतात. आपण विप्र व राजवंशाच्या जवळचे, हा फुकाचा अहंकार बाळगतात. वर्षातून एकदा 'जानवे' अडकवून नव्या जमान्याची 'जाणीव' नाकारतात. हा अहंकार जोपासासाठी स्त्रियांच्यावर अन्याय होत राहतो. मुस्लिम धर्मातील पडदापद्धतीवर हल्ला होतो; परंतु आमची देशमुख मंडळी अजूनही बायकांना पडद्यात ठेवतात. मराठवाड्यात घराची बांधणी यासाठी विशिष्ट पद्धतीने करतात. तटबंदीच्या या घरांत स्त्रिया पाहुण्यापुढे येत नाहीत. 'खानदानी आदब पुरुष दाखवतात व घरच्या स्त्रिया पाठीमागच्या अंगणात भांडयांचे ढिगारे विसळीत असतात. जुनेर झाकण्यासाठी अंगावर बूथ पांघरतात. सत्यशोधक चळवळीला 96 वर्षे झाली. 96 कुळीतील स्त्रियांची परिस्थिती पुढे आणण्याचा हा खटाटोप.
सामाजिक रुढीचे स्त्रियांच्या मनांवर प्रचंड ओझे आढळते. कोणीही परपुरुष अगर पाहूणा दिसला की डोक्यावरचा पदर सावरणे, चावडी. समोरून जाताना पायांतील चपला हातात घेऊन पदराखाली लपवून पुढे अनवाणी जाणे, सकच्छ पातळ न नेसणे. (गोल पातळामुळे आयतीच सोय झाली असली तरी) बहुतेक मराठा मंत्र्यांच्या व पुढाऱ्यांच्या बायका डोक्यावरचा पदर शक्य तो वर ढळू न देण्याची पराकाष्ठा करतात. पीएच्. डी. झालेली एक बाई तर कटाक्षाने पदर घेतातच. तो पदरही दोन्ही कान झाकून घ्यावा लागतो. एरव्ही शालीनता व खानदानीला बाधा येत असावा. स्त्रियाही या चाली अगदी निमूटपणे पाळतात. मराठमोळा म्हणतात याला. सतराशे साठ वेळा इतरांच्या पाया पडणे ही तर घृणास्पद आपत्ती असते. घरातील नणंदांना वयपरत्वे दिवाणसाव, आक्कासाहेब, ताईसाहेब, दिरांना रावसाहेब दादासाहेब अशा शब्दांत उल्लेखणे हाही एक खानदानी रिवाज आहे. या सर्व रूढी मुसलमानी राज्यांमुळे आलेल्या असाव्यात. मुस्लिम राजे गेले, इंग्रज गेले. परंतु हे 'राजे' कायम राहिलेत. उलट या सर्व रिवाजांची अपेक्षा तरुण पुरुष अगदी आग्रहाने धरताना आढळतात.
अत्याधुनिक पद्धतीने वेषभूषा करणारा आजचा तरुण वर्ग सिनेमातील नटांची ऐट आणतो. परंतु त्याच वेळी स्त्रियांना मात्र 'नटी' सारखे वागण्याचे स्वातंत्र्य नाकारतो. हडपसरला असताना एक प्रकार मी डोळ्यांनी पाहिला. सोलापूर रोडने एक वरात चालली होती. गोरज मुहूर्तावर लग्न लावून घेण्यासाठी नवरदेव चालले होते. पाठीमागे 50-60 गाड्यांची रांग होती. बँड, वाजंत्री, ताशे, ढोल, लेझमीचा दणका उसळत होता. अशा मिरवणुकीत साहजिकच नवरानवरी पाहण्याची उत्सुकता असते. वराचे वय 60 ते 65 वर्षांचे असावे. आडवातिडवा बांधाव राकट चेहऱ्याचे ते ध्यान पाहून मी चकित झालो. व सहज कुतूहलाने शेजाऱ्याला विचारले, कोणाचे लग्न आहे? उत्तर मिळाले हे पलीकडच्या गावचे पाटील आहेत. यांचे हे 6 वे लग्न. पहिल्या सर्व बायका जित्या आहेत. बहुतेक सगळ्या मागे मिरवणुकीत आहेत. मूल नाही म्हणून पाटील लग्न करतो आहे धाकट्या मेहुणीशीच आहे 16 वर्षांची. मी विचारले, "द्विभार्याप्रतिबंधक कायदा असताना हे कसे काय?" उत्तर मिळाले, "अहो पहिल्या सर्व बायकांशी जातिरिवाजाप्रमाणे त्यांनी काडीमोड घेतलेली आहे. शिवाय या वेळी मुलीला मोप पैका दिला आहे म्हणतात!" या लग्नाला आजूबाजूच्या गावांतील मोठमोठे बागायतदार, आमदार मंडळी हजर होती. लग्नानंतर मुलीच्या सर्व लक्षात आले. परंतु मंगळसूत्राच्या काळ्या धाग्याने तिचा गळा करकचून आवळला गेला होता.
आमचे घर मराठा समाजातील. शेजारीच एक लोहाराचे घर होते. पिढ्यानपिढ्या शेजारी राहिल्याने अगदी नात्यागोत्याचे संबंध निर्माण झालेले. लोहारदादांना 4-5 मुली होत्या. मुलगा नव्हता. आणि अशाच एका बाळंतपणात त्यांची पत्नी दगावली. काही दिवसांनी त्यांनी गांधर्व विवाह करून एक नवी बायको आणली. मला चांगले आठवते. या बाईंना मराठ्यांच्या घरची मंडळी सार्वजनिक समारंभात हळदकुंकू देत नसत. इतकेच नव्हे तर एखादा लग्नसमारंभात मुला-मुलीला हळद लावताना त्यांना 'पुढे येऊ नका' असे सांगण्यासही बायका कचरत नसत. अशाच एका प्रसंगी त्या बाईंच्या बरोबर कडाक्याचे भांडण झाले, व दोन्ही घरांमध्ये कायमचे वितुष्ट आहे. माझ्या एका नातेवाइकाचे लग्न ठरले. साखरपुडा, सुपारी, लग्नपत्रिका हे सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडले. मुलगी खूप देखणी होती. मुलगा काळासावळा पण शिकलेला होता. लग्नाची तीथ ठरली, मुहूर्त निघाला. आणि एवढ्यात कोठे तरी माशी शिकली व लग्न मोडल्याची बातमी माझ्या कानांवर आली. का तर म्हणे मुलीच्या आईचा गांधर्व विवाह झालेला आहे. मला त्या मुलीच्या बापाचे हाल अजून आठवतात. तो केविलवाण्या सुरात आर्जव करत होता. मुलाच्या पाया पडत होता. परंतु मुलगा गप्प. आई-वडिलांची संगती हवी म्हणे. मला मनस्वी चीड आली होती, पण काय करावे?
नुकताच एक प्रकार घडला. मुंबईत नोकरी करणाऱ्या मुलाला सातारा जिल्हातील मुलगी दाखवण्यात आली. मुलाच्या वडिलांनी संमती कळवली. लग्न झाले. हळदीच्या अंगाने मुलगी माहेरी गेली व सोळाव्यासाठी माघारी आली. नवऱ्या मुलाने आदल्या रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली! का, तर म्हणे त्याला मुलगी पसंत नव्हती. आता या मुलीने जन्म कसा जाळवा? मुलीचा बाप गुडघ्यात मान पालून बसला होता. मनात विचार करीत होता, ही का नाही मेली?
माझ्या आत्या नुकत्याच वारल्या. निधनसमयी त्यांचे वय 75 वर्षांच असावे. त्या बालविधवा होत्या. त्यांचे लग्न त्यांना पुसटसे आठवे. 7 व्या 8 या वर्षी विवाह झालेला 5-6 महिन्यांत प्लेगच्या साथीत यांचे पती निवर्तले. तेव्हापासून त्या माहेरीच होत्या. त्या नेहमी म्हणत, बायकांना रांडपण येऊ नये. सारा जन्म धुणे-भांडी वळण्यात गेला त्यांचा. त्या सांगत, तरुण वयात त्यांना कोठेही बाहेर जाण्याची परवानगी नसे. पुणे तर दूरच देवाला जायचे तेसुद्धा कोणाच्या तरी बरोबरच. सज्जात उभे राहायचे नाही, पाहुण्याच्या पुढे यायचे नाही, लग्न समारंभात मागे मागे राहायचे! पांढरे कपाळ अशुभ- त्याचे कोणाला दर्शनही होऊ नये म्हणून सारी काळजी.... आत्या सांगत... घरात एकसारखी धुसफूस चाले विधवा नणंद घरात, म्हणून भावजयांच्या माहेरची माणसे एकसारखी घालून पाडून बोलत. कितीही कष्ट उपसा, पण चहुबाजूंनी हिडीसफिडीस जग काही एक गुलामच आपल्या ताब्यात मिळालेला. नेहमी ऐकवणे- लक्ष ठेवा नाही तर ध्या-दुपारा एखाद्याचा हात धरून जाईल...'बरे, शिक्षण नाही. त्यामुळे आयुष्यभर रूमालात बांधलेल्या ज्ञानेश्वरीची पूजा करण्याव्यतिरिक काही करता आले नाही.
दक्षिण महाराष्ट्रातील एका काँग्रेस पुढाऱ्यांने ते विधुर झाल्यानंतर एका विधवेबरोबर पुनर्विवाह केला. त्या प्रकरणाची फार मोठी चर्चा झाली: दिल्लीच्या मंत्र्यांनी जागेवर जाऊन त्यांना बोध केला. "विवाह करण्याची काय आवश्यकता?" असेही विचारले, परंतु त्या बहाद्दराने आपला विचार तडीस नेला व तथाकथित भयानक सामाजिक परिणामांचा फुगा फोडून टाकला. या प्रकरणात चर्चा करताना त्या स्त्रीच्या चारित्र्याची जाहीरपणे चर्चा झाली. डॉ. राममनोहर लोहिया यांनी या बाबतीत एक क्रांतिकारक विचार बोलून दाखवला आहे. भारतीय समाज पुरुषाची योग्यता त्याच्या बुद्धीवर अजमावतो, तर स्त्री-पुरुष समान भूमिका असूनही भारतीय नारीची योग्यता तिच्या योनिशुचितेवर ठरवितात. स्त्री बुद्धीने तल्लख असली व कर्तृत्वाने श्रेष्ठ असली तरी हीन लेखण्यात जुनाट बुरसटलेली मनोवृत्ती स्पष्ट होते.
माझ्या आजोळच्या गावी काही वर्षापूर्वी एक प्रकार घडला. एका गरीब पाटलाच्या घरी त्याची सून तिच्या भावाने नांदावयास आणून पोचवली. परंतु तिला घरात कोणी घेईना. नवरा मुलगा अगदी बावळा, व डोळ्यात फूट पडलेला. तो सरळ रानात निघून गेला. त्याची आई घरात होती. तिने सूनेला घरात घेणार नाही म्हणून बजावले. लग्न सन समारंभातल्या देण्याघेण्यावरून काही भांडण शिल्लक उरले असावे. सासूबाईंच्या मते मुलगी अगदी 'चाभरट व चोरटी' आहे; 'तिला आधी सुधारावी व मगच सासरी आणून पोचती करावी. 'त्यांनी सुनावले गाव अगदीच खेडेगाव. भाऊबंदांची घरे शेजारीच खेटून. परंतु कोणालाच मध्ये बोलण्याची मुभा नसते. 'तोंड खुपसायचा चोंबडेपणा कोण करणार?' मुलीचा भाऊ जरा अरकट असावा. त्याने बाहेरूनच विचारले, 'हिला घरात घेणार का नाही? नाही तर तुमच्या हातून तिला जिवंत मारून टाका. आम्ही विचारायला येणार नाही. पण सतरा वेळा ही परवड नको.' भांडण वर्डळी वर आले. सासूबाई बाहेर येऊन म्हणाल्या, 'आम्हांला कशाला मारायला सांगता? तुमच्या हातानंच तुम्हीच तिचं काळंबेर करा. धा नवरे करून या नाही तर विहिरीत ढकलून द्या.... मी शाप घरात घेणार नाही! मुलीच्या भावाचे डोके भडकले. कारण बहिणीला प्रत्येक वेळीच घेऊन येणे व पाणउतारा करून माघारी घेऊन जाणे यामुळे तो वैतागला असावा. त्याने बहिणीला फराफर ओढीत नेले आणि गावाबाहेरच्या विहिरीत ढकलून दिले. त्या मुलीचा तो केविलवाणा टाहो ' अरे भाऊ, मला मारू नको. नकोरे भाऊ..."ती वर निघण्याचा प्रयत्न करू लागली तसा त्याने वरून एक धोंडा उचलून विहिरीत टाकला... तीन दिवसांनी प्रेत बाहेर फुगून वर आले, सगळे चिडी खूप. पाणी भरायला गेली आणि पाय पसरून पडली' एवढा पंचनामा झाला! सासर-माहेरच्या दोन्हीकडील मंडळींनी सुटकेचा श्वास सोडला. कुळाची अश्रू राहिली.
आमच्या आळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील पुढील घटना आहे. दोन भाऊ व एक बहीण. बहीण सर्वांत मोठी. तिच्या सासरची परिस्थिती अगदीच साधारण. त्यामुळे एकुलत्या एक अशा या लाडुबाई नेहमी माहेरीच राहात. हलके हलके तिचा नवराही काही दिवस सासरी येऊन राहिला. भावांची लग्ने झालेली नव्हती; व आई म्हातारी. त्यामुळे सारे कारभारीपण या बाईच्या हातात. भावांची लग्ने तिच्याच संमतीने झाली. भाऊ शिक्षणाने अगदीच कमी, परंतु पहिल वानी पेशाचे. धंदा चांगला असल्याने परिस्थिती गबर चांगल्या घरच्या मंडळीनी सुखाच्या आशेने येथे मुली दिल्या. नणंदबाईचा तोरा काही पुसू नका. त्यात मध्यंतरीच त्यांचा नवरा आपल्या घरी निघून गेला व कारभारीपणाला चटावलेला'दिवाणसाव' (थोरल्या नणंदेला ' दिवाणसाब' म्हणण्याची रीत अजूनही आहे.) माहेरीच राहिल्या. पुढे काही वर्षांनी नवऱ्याचा व त्यांचा संबंध अजिबात तुटला. 'बायकोस नांदविता न येणारा पुरुष म्हणून त्याची पत संपली. या बाईंनी भावजयांना इतका त्रास दिला की थोरल्या भावजयीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले व आत्महत्या केली. दुसरी भावजय माहेरी गेली. दिवाणसाहेबांचे मेतकूट दिवाणजी बरोबर जमल्याचे आजूबाजूचे लोक रात्रंदिवस पाहतात.
माझ्या लहानपणातील एक आठवण आहे सासरी जरा काही खट्ट झाले की मुलीला माहेरी पाठवून यायचे, असा सासरच्या माणसांचा खाक्या असे. एखादे मूल होईपर्यंत हा सासुरवास चाले. मुलीच्या आई-वडिलांनाही तोपर्यंत काळजी घ्यावी लागे. 'मुलगी नांदून निघाली म्हणजे झाले, अशी एक म्हण आहे. 'मालन' नावाच्या एका मुलीला एकदा असेच माहेरी यावे लागले. लग्नानंतर मांडवपरतणीच्या व्यवहाराची काही तरी शिल्लक उरल्याबद्दल सासरची तक्रार असावी. रात्री 10 नंतर सडकेवरून 'मालेssस मालेssस' असे ओरडत मालिशवाले जात. त्या घरातील म्हातारी मालनला एकसारखे विचारी, 'माले तुला रात्री कोण हाक मारते ते खरं सांग एकदा तर तिला चांगला चोप मिळाला. कारण म्हातारीला मालेssस शब्दातील 'स' ऐकू येत नसे. हा विनोद असला तरी स्त्रियांच्या मनोव्यापाराची दशा यातून व्यक्त होते. स्त्रीला सदैव जपावे लागते. तिचे जीवन बहरासाठी नसतेच. 'दिल्या घरी तू सुखी राहा' एवढे सांगण्यासाठीच असते.
या साऱ्या घटना सत्य आहेत व त्या मराठा समाजातील आहेत. पंचकुळी, शहाण्णव कुळी, पाटील, व कुणबी असे ढोबळमानाने प्रकार पडतात. मराठा संस्थानिकांची राजघराणी व त्यांचे जहागिरदार यांचा समावेश पंचकुळी ऊर्फ 'राजवंशीय' यांत होतो. शहाण्णव कुळी ऊर्फ देशमुख मंडळीचा एक वेगळा जया आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेब देसाई, मुगुटराव काकडे, शंकरराव मोहिते पाटील आदींचा यात समावेश होतो. मातबर देशमुखांच्या राजघराण्यांनीही सोयरिका झालेल्या आहेत. उदा. फलटणचे नाईक निंबाळकर व नागपूरचे प्रसिद्ध जमिनदार रामराव देशमुख. तिसरा वर्ग पाटील मंडळीचा. यातही अनेक प्रकार आहेत. यशवंतराव चव्हाण, अण्णा साहेब शिंदे, भाऊसाहेब हिरे आदी या गटात मोडतात. पाटील मंडळीही कडू व गोड घराणी आहेत. मोठमोठ्या पाटील घराण्याच्या सोयरिका देशमुख घराण्याबरोबर झालेल्या आहेत, व काही पाटील स्वतःला देशमुखच मानतात. शेवटचा वर्ग कुणबी समाजाचा. विदर्भात व कोकणात हा वर्ग मोठ्या प्रमाणावर आढळतो.
महाराष्ट्रातील माळी, कुणबी आदी समाजांत स्त्रियांच्या पुनर्विवाहास 'गांधर्व विवाह', 'म्होतूर लावणे 'व' पाट लावणे' असे म्हणतात. छत्रपती राजर्षी शाहूमहाराजांनी धनगर व मराठे यांचे विवाह संबंध जुळवले. परंतु ही पद्धत रूढ झाली नाही. दुसऱ्याला होण कुळातील लेखून त्याचा पाणउतारा करण्याची कर्णकालीन पद्धत अजूनही चालू आहे. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे व राजमाता जिजाबाईंचा विवाह याच कारणासाठी लखुजी जाधवांना मान्य नव्हता. हे सारे संस्कार मोगलकालीन असावेत. प्रगत विज्ञानाकडे पाठ फिरवून मराठा समाजातील बरेच सुशिक्षित ही स्वतःचा बडेजाव मिरवतात व लग्नसमारंभात स्वतःच्या खानदानीचे प्रदर्शन करतात. वास्तविक स्त्रियांना पुनर्विवाहाचा हक्क नाकारला म्हणजे झाले, अशी गोड समजूत यामागे असते. संसार करण्याचा, अपत्यप्रेमाचा हक्क हिरावून घेतलेल्या स्त्रिया निसर्गतः ही गप्प बसत नाहीत. त्यांच्या अनैतिकतेकडे डोळेझाक करण्यात येते. महाराष्ट्रातील 4 ते 5 कोटी लोकसंख्येत 1 ते 2 कोटी संख्या मराठा वर्गाची आहे. कुळाचा अभिमान फार जबर असतो. यामागे काही फार मोठे कर्तृत्व असते असे मानण्यास कोठलाही पुरावा आढळत नाही. त्याची सर्व मदार मर्दाच्या शौर्यापेक्षा स्त्रियांच्यावर लादलेल्या गुलामीच्या क्रौर्यावर आहे. लग्नसमारंभात बायकांना पडद्यात ठेवणे, त्यांना मिरवू न देता सर्व कार्यक्रम पुरुषांनीच उरकणे, व स्त्रियांचा पुनविवाह निषिद्ध मानणे, एवढ्यावरच सारे अवलंबून आहे. मराठा समाज म्हणजे 'बहुजन समाज'; तो झपाट्याने पुढे पुढे चालला असण्याचा विनाकारण बकवा करण्यात येतो. परंतु या समाजाला बुद्धीने वागण्यापेक्षा रगीत सर्व जिरवण्याची सवय लागली आहे. म. ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपतींची नावे ही मंडळी घेतात. परंतु ते फक्त ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या संदर्भात. ब्राह्मणाच्या वर्णवर्चस्वाविरुद्ध लढतानासुद्धा ही मंडळी स्वतःचा क्षुद्र अभिमान विसरत नाहीत.
मांजर डोळे मिटून दूध पिते. त्याला वाटते, आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही. परंतु सर्व गावभर वभरा होत असतो. तरीही याला वाचा का फुटत नाही? याचे कारण 'आवडी'चे व 'नावडी'चे राज्य. ही पुरुष जीवनातील फारकत मराठा समाजाने मान्य केलेली आहे. एवढे सारे असताना स्त्रिया का संघटित होत नाहीत?-असा प्रश्न कोणी उपस्थित करील. त्याची दोन-तीन कारणे माहेत. अगदी मातबर धनवंतांच्या घरांतून काहीही चालते. अगदी थोरल्या भावजयीबरोबर धाकट्या दिराने पुनविवाह केला तरी समाजात विशेष बिघडत नाही. मुलीच्या रूप-सौंदर्यामुळेही बरेच प्रश्न सुटतात; आणि राजघराण्यातील बायकांच्याजवळ पैसा असल्याने लग्ने न करता त्या सर्व सुखांचा उपभोग घेतात व भानगडी जिरवतात.
एका मोठया राजवराण्यातील सुंदर राणीने वैधव्य प्राप्त झाल्यानंतर कोळी जातीतील आपल्या शोफरबरोबर संबंध ठेवले आहेत, ही बाब सर्वांना ठाऊक आहे. तर दुसऱ्या एका राणीसाहेबांचे व नवऱ्याचे कधीच जमले नाही. त्या सदैव मुंबईत राहून तनखा खर्च करत. राजघराण्यातील स्त्रियांनी केलेल्या स्वैराचाराच्या व दुष्कर्माच्या अनेक कहाण्या चविष्टपणे गावगना सांगितल्या जातात. शील गेले तरी 'कुळ' राहिले; म्हणजे त्यांनी राजरोस दुसरा नवरा केला नाही ना मग भागले! त्याचीही दोन कारणे असतात. दुसरा विवाह केला तर ऐश्वर्याला व संपत्तीच्या हक्कांना मुकावे लागते. आंधळा व्यवहाराला मान्यता असते. आडनावापुढे देशमुख म्हणून आवर्जून लिहिणाऱ्या एका धनाढ्याने आपल्या विधवा पुतनीला (भावकीतल्या) जवळ केले आहे. अशा संबंधांतून मग दासीवंश व रांडेच्या अवलादी गावा गावातून निर्माण झालेल्या आढळतात. असे असूनही शिक्षणात मागे पडलेल्या जीवनाच्या उपभोगाला पारक्या झालेल्या स्त्रिया काही वेळेस राजरोसपणे दुसऱ्याच्या घरात घुसतात. मराठा देशमुख पुरुषांना अनेक पत्नी करता येत असूनही रांडबाजी करण्यात पुरुषार्थ वाटतो. परंतु स्त्रियांच्या पुनर्विवाहाचे धाडस तो करत नाही.
इतरांच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, बराचसा मोठा वर्ग सधन असल्याने विधवा, परित्यक्ता मुलींना पोसण्यास तो समर्थ असतो.
अगदी कनिष्ठ म्हणजे काही पाटील व कुणबी घराण्यांत स्त्रियांचे पुनर्विवाह सर्रासपणे चालतात. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, सातारा, सांगली, हे जिल्हे वगळले तर इतरत्र पाट लावण्याची चाल सर्रास सुरू आहे. नगर, नासिक, सोलापूर या विभागांतही ही चाल आहे. खानदेशातील लेवा पाटील समाजातही स्त्रियांच्या पुनर्विवाहाची चाल आहे. विदर्भातील कुणबी समाजातही ही चाल आहे. याचा अर्थ दोन ते अडीच कोटी मराठा समाजापैकी फार थोड्यापर्यंत केवळ हा व्यर्थ अहंकार शिल्लक आहे. परंतु खोट्या अभिमानाचा दर्प मात्र सर्वत्र आहे. काही कुटुंबांना आपल्या नावापुढे 'देशमुख' 'पाटील' असे लावण्याचा विलक्षण सोस आढळतो. परंतु यांपैकी अनेकांच्या घरांत परस्परांतील अनैतिक संबंधाचा रोग एवढा जडला आहे की त्याला अन्यत्र तोड सापडणार नाही.
Tags: साधना दास्यमुक्ती विशेषांक 1970 काँग्रेस शिवाजी महाराज पुणे विदर्भ मुंबई महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्र बाबा आढाव Sadhana Dasyamukti Special Issue 1970 Congress Shivaji Maharaj Pune Vidarbha Mumbai Mahatma Jyotirao Phule Maharashtra Baba Adhaav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या