अनिल बर्वे, कुमार सप्तर्षी, पंढरीनाथ रानडे इ. मंडळीच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध समाजात आवाज उठला. समाजातील जाणकारांनी पत्रके काढली. जनमताचा दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न केला. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांचा छळवाद थांबविण्यासाठी असाच पुढाकार घेणे अगत्याचे आहे. दलित पँथरचा आधार अगर उच्चार आपणास पटणार नाही, परंतु त्यांचा आवाज व चळवळीचे स्वातंत्र्य चिरडून टाकण्याचा प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे.
शहादे तालुक्यातील ‘पुरुषोत्तम सेने’ चा यथायोग्य समाचार वृत्तपत्रांनी घेतला. पीक संरक्षण योजनेच्या नावाखाली गावागावातील भूमिहीन शेतमजुरांना झोडपून काढण्यासाठी जमीनदार शेतकऱ्यांनी तयार केलेले हे रझाकार ! दिल्लीला लोकसभेत व नागपूरला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न बराच गाजला. तरीही अजून 100-125 बंदूक परवाने रद्द करावयाचे नाहीत असे राज्य गृहमंत्री शरद पवारांनी जाहीर केले ! ही खाजगी सेना-सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम पाटलांच्या प्रेरणेने सुरु झालेली. कारखान्यांतील यशामुळे माणसांभोवतीचे तेजोवलय बदलले नाही तर नवल कसले ?
वसंतसेना- पोलिस खाते
पुरुषोत्तम सेनेचे झाले, पण मुंबईतील वसंतसेनेचे काय! महाराष्ट्र राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पोलिस दलाला वसंतसेना शब्द वापरला आहे. नामदार शरद पवार हे या खात्याचे गृहराज्य मंत्री. राज्यात वसंत व शरद असे ऋतू आलटून पालटून येत राहतात ! पुरुषोत्तम सेना ‘पीक संरक्षण योजने’च्या नावाखाली व वसंतसेना ‘शांतता आणि सुव्यवस्थे’च्या नावाखाली गरीबांच्या चळवळी दडपून टाकण्यास पुढे सरसावल्या आहेत असे म्हणावयास कोणताही प्रत्यवाय नसावा.
दलित पँथरवर दात
गेल्या दीड-दोन वर्षात मुंबईत दलित पँथर संघटनेने मूळ धरले आहे. राजा ढाले व नामदेव ढसाळ हे दोन साहित्यिक या संघटनेचे प्रवर्तक. पैकी नामदेव ढसाळ हे समाजवादी पक्षात व युक्रांदबरोबर वावरलेले, महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतूनही या संघटनेच्या शाखा निघत आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या कार्यपद्धतीची छाप दलित पँथरवर पडलेली असावी.बरेचसे दलित तरुण शिवसेनेतूनच पँथरकडे दाखल झालेले आहेत. परंतु ग्रामीण भागात प्रसार होत असतानाच या संघटनेच्या नेत्यांना योग्य त्या जाणीवा निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. ‘आम्ही’या मासिकात नामदेव ढसाळांनी पँथरची भूमिका व कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. बाबूराव बागूलांच्यासारख्या डाव्या विचारसरणीचा साहित्यिक त्यांच्या सोबतीला आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे राजा ढाल्यांच्या भाषणबाजीमुळे जरी ही संघटना शिवसेना छाप वाटली,तरी तिचे स्वरूप मूलत: वर्गीय पातळीवर, परिवर्तन करू पाहणाऱ्या संघटनेचे आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या वसंतसेनेने त्यांच्या पाचवीलाच ‘वनवास’ लिहून ठेवलेला असावा!दलित पँथरचा मुख्य हल्ला हिंदू धर्मातील कर्मकांडाविरुद्ध आहे.त्यामुळे हिंदू धर्मातील देवदेवतांच्या कृष्ण, राम, गणपतीबद्दल ही मंडळीअधूनमधून काही काही बोलत असतात. वास्तविक यात नवीन असे काहीच नाही. म. फुले यांचे लिखाण ज्यांनी वाचले असेल त्यांना याचे आश्चर्य वाटणार नाही. द्रविड कळघमचे रामस्वामी नायकर तर वयाच्या 95 व्या वर्षीही असेच कार्यव करत होते. त्यांच्यावर अनेक खटले भरूनही ते निर्दोष सुटले आहेत.म.फुले व रामस्वामी नायकर यांच्या मानाने ढाले व ढसाळ यांनी एक शतांशही कृती केल्याचे दिसत नाही.मनुस्मृती व गीता जाळण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. खासदार भाऊराव गायकवाडांनी लोकसभेत मनुस्मृती फाडलेली आहे! डॉ.बाबा आंबेडकरांनी जाहीरपणे मनुस्मृती जाळलेली आहे.मुंबईच्या युक्रांदवाल्यांनीही हा पराक्रम पूर्ण केला आहे. मग ढाले ढसाळांनीच कोणते असे घोडे मारले, कीज्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वसंतसेनेला शांतता व सुव्यवस्थेची चिंता पडावी? अश्लील भाषा म्हणावी तर ‘साहित्याच्या प्रांतात आम्हाला समजत नाही. साहित्यिकांनीच त्याचा निर्णय घ्यावा’ असे शरद पवार जाहीरपणे सांगतात.
हा छळवाद थांबवा.
पुरीचे शंकराचार्य चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा जाहीरपणे पुरस्कार करतात; महाराष्ट्र सरकार कायद्याची पुस्तके चाळीत बसते! केवढी कायद्याची चिंता? हजारो ढाले ढसाळ चिरडले गेले तरी हरकत नाही.पण एक शंकराचार्य जेलमध्ये जाता उपयोगी नाही!ढाले ढसाळांच्यावर सध्या इंडियन पीनल कोडच्या 153 B ची संक्रांत आहे. जातीजातीत वैमनस्य माजवतात. जमीन देणे घेणे मॅजिस्ट्रेट साहेबांच्या मर्जीवर. श्री. नामदेव ढसाळ याच्यावर 18, श्री. राजा ढाले यांच्यावर 19-20, भाई सनगरे व विठ्ठलराव साठे यांच्यावर 3-3, जयवंतभाई जगधने यांच्यावर 1,तर गीता जाळल्याबद्दल 264 जणांवर केसेस चालू आहेत! निकाल कोणत्याच बाजूने लागत नाही. द्या जामीन आणि घाला हेलपाटे! सांगलीपासून नागपूरपर्यंतच्या कोर्टातून रोज तारखा. एकाच दिवशी 2-2, 3-3 गावांना तारखा! कोर्टात गैर्हजर राहिले कि लगेच पकड वॉरंट! त्यातून सुटण्यासाठी रु.50 चा दंड.असा एकसारखा छळवाद सुरु आहे.
धंदेवाईक वकील
वसंतसेनेचे शिवसेनेवरचे प्रेम जगजाहीर आहे. पुण्यात डॉ. ए. ए. शेख यांना भोसकले काय किंवा अनेक किराणा दुकानांची लूट झाली काय, आरोपीच हाती लागत नाहीत ! जणू काही अगदी गनिमी काव्याची लढाई ! मानवतला तर या वसंतसेनेची पुरती दमछाक झालेली आहे. 10 निष्पाप जीवांचे बळी जातात. तरीही वसंत-शरद खुर्चीवर कायम राहतात. त्यांनी खुर्ची मोडण्याने थोडेच असे जीव वाचणार आहेत! दलित पँथरवाल्यांचे व वकील मंडळींचेही फारसे बनत नसावे. वकिलांचे म्हणणे बरोबर आहे, धंदा म्हणजे धंदा ! रजनी पटेलांचा हा आदर्श आहे. त्यांनी अशा ठिकाणी फुकट वकीली काय म्हणून करावी ? जामीन नाही, वकील नाही, न्यायदेवता बहिरी, आंधळी, आणि मुकी... बिचाऱ्या पँथार्सना मेंढरे बनवण्याची केवढी नामी व्यवस्था !
मुख्यमंत्र्यांशी चर्चा
यातही प्रचंड विनोद आहेत. पोलिसांनी केसेस करताना पंचनाम्यात काय काय लिहिले असावे? ...एखादे वाक्य व पुढे ‘भावना दुखावल्या’ बस्स! 14 ऑगस्ट 1973 रोजी मुंबईतील दलित पँथरने मोर्चा काढला. विधान भवनावर. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी 2-2 तास शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. नाईकांनी त्यांना परोपरीने सांगितले, “काही झाले तर तुम्ही माझ्याकडे येत जा... उगाच भावना भडकवू नका.” पँथर्सचे म्हणणे एकच. म. फुल्यांचे विचार मांडायला या राज्यास बंदी आहे का? चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडल्याशिवाय आम्हांला न्याय कसा मिळणार? यावर वसंतराव नाईक काय म्हणाले हे कळले नाही, परंतु 2-2.5 तास चर्चा झाली तरी !
6 ऑक्टोबरला घनपाठी वैदिकांच्या सत्कार विरोधात राज्यभवनासमोर सत्याग्रह झाला. 262 जणांना अटक झाली. पँथरही होते. पँथरांचे व. दि. पवार म्हणाले, “आज पोलिस आपल्याबरोबर फार सभ्यतेने वागले आणि याचा अनुभव जागेवरच आला. समाजवादी निदर्शक विल्सन कॉलेजजवळ तर पँथर्स मोबालिया टँक मैदानावर जमणार असल्याचे जाहीर झाले होते. गोवलिया टँक मैदानावर पोलिसांनी 144 कलम लावले होते. समाजवदी, युक्रांदवाले, रा. से. दळवाळे होते म्हणून की काय ? वसंतसेनेचा नेहमीचा खाक्या. धर की धोपट ! सरळसोट मार्ग.
अनिल बर्वे, कुमार सप्तर्षी, पंढरीनाथ रानडे इ. मंडळीच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध समाजात आवाज उठला. समाजातील जाणकारांनी पत्रके काढली. जनमताचा दबाव सरकारवर आणण्याचा प्रयत्न केला. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांचा छळवाद थांबविण्यासाठी असाच पुढाकार घेणे अगत्याचे आहे. दलित पँथरचा आधार अगर उच्चार आपणास पटणार नाही, परंतु त्यांचा आवाज व चळवळीचे स्वातंत्र्य चिरडून टाकण्याचा प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे.
Tags: Kumar Saptarshi Yukrand Socialism Shankarachary Namdeo Dhasal Raja Dhale Dalit Panthar Pik Sanrakshan Yojana Vasantrav Naik Shri. Purushottam Patil Satpuda Sahakari Kakhana Sharad Pawar Purushottam Sena कुमार सप्तर्षी युक्रांद समाजवाद शंकराचार्य नामदेव ढसाळ राजा ढाले दलित पँथर पीक संरक्षण योजना वसंतराव नाईक श्री. पुरुषोत्तम पाटील सातपुडा सहकारी साखर कारखाना शरद पवार ‘पुरुषोत्तम सेना’ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या