तमिळ संस्कृतीची खरोखर आपल्याला फारशी माहिती नसतेच. कावेरीच्या तीरावरील बहरलेल्या या संस्कृतीबद्दल पूर्णपणे अज्ञान ठेवून भारत एकात्म कसा होईल? महाराष्ट्रातही सत्यशोधक चळवळ सुरु झाली. ब्राह्मणेतर पक्ष निघाला. 100 125 वर्षात अनेक माणसे कामी आली. परंतु जातिव्यवस्थेविरुद्धचा लढा संपलेला नाही. जात सर्वांना पुरून उरली आहे. तमिळनाडू व महाराष्ट्रात एक फरक कटाक्षाने जाणवतो. तमिळ बहुजन समाज स्वाभिमान चळवळीने जागा झाला आहे. मराठी समाजाला ब्राह्मणांच्या न्यूनगंडाने पछाडले आहे. नायकरांचा वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य या सर्वांनाच विरोध होता. तेथे वर्णांतील क्षत्रियत्व, मोगली व राजपूत अमदानीतील पडदा व खानदान यांचे चमत्कारिक संघटन तयार झालेले आहे. प्रत्यक्ष तामिळनाडूमध्येही रंग पालटत आहे. परंतु या रंगासाठी तमिळ मातीचाच आधार घ्यावा लागत आहे. रामस्वामींनी मरणापूर्वी केलेल्या संकल्प पुरा करण्यासाठी कोण पुढे सरसावते हे दिसावयचे आहे. सत्तेच्या भोवती घुटमळणारी ‘भुतावळ’ जमा होत आहे; प्रश्न आहे लढाईचा.
रामस्वामी नायकरांचे निधन गेल्या आठवड्यात मद्रास येथे झाले. मरणसमयी त्यांचे वय 94 वर्षांचे होते. त्यांच्या जीवनाचे शतक थोडक्यात हुकले. एवढे वय होऊनही नायकर वृद्ध झाले नव्हते. अगदी गेल्या महिन्यात मद्रास येथे झालेल्या परिषदेत त्यांनी काही क्रांतिकारक मागण्या जाहीर केल्या. भारताच्या घटनेतील १७व्या कलमात ‘अस्पृश्यता’ शब्दाऐवजी ‘जातिव्यवस्था’ हा शब्द घालावा, चातुवर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या वाङमयास बंदी घालावी, सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा, भारताचे पंतप्रधान पद आळीपाळीने प्रत्येक प्रांताकडे देण्यात यावे...या मागण्या पूर्ण करण्यासाठी 26 जानेवारी 74 पर्यंत मुदत दिली होती. मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर नायकर प्रत्यक्ष आंदोलनात उतरणार असल्याची घोषणा झाली होती. ‘द्रमुकचा कोसळणारा डोलारा सावरण्याचा शेवटचा प्रयत्न’ अशी संभावना करण्यात आली. द्रमुक, अण्णाद्रमुक, कामराज काँग्रेस या सर्वांनी नायकरांचे नेतृत्व प्रथमपासून मानलेले आहे. द्रमुकचे राज्य असतानाही नायकरांची द्रविड कळघम स्वस्थ बसली नाही.
इ.व्ही.रामस्वामी नायकर ऊर्फ ‘पेरियार अय्या’ यांचा जन्म इरोड गावात 1879 साली झाला. तेराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. परंतु सहा वर्षातच ते संन्यासी झाले. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. हिंदू धर्मातील दोष त्यांच्या लक्षात आले. ब्राह्मण पुरोहितांकडून होत असलेल्या घोर शोषणाने त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. नायकरांनी संन्यास आश्रमाचा त्याग केला. ते परत आले. स्थानिक राजकारणात भाग घेऊ लागले. त्यांनी जाती व्यवस्थेतील आश्रम नियमांविरुद्ध दंड पुकारले. पुरोहितांनी त्यांचा धिक्कार केला. नायकरांनी आपल्या विधवा पुतणीचा पुनर्विवाह घडवून आणला. नायकरांच्या नातेवाईकांनी त्यांना बहिष्कृत केले. परंतु ब्राह्मणेतर समाजात ते लोकप्रिय झाले. इरोड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. भटशाहीचे कट्टर विरोधक असतानाही नायकरांचा ओढा जस्टीस पार्टी पेक्षा काँग्रेसकडे अधिक होता.1920 साली असहकार चळवळीत त्यांनी उडी घेतली. त्यांना दोनदा तुरूंगात जावे लागले. दारूबंदी आणि खादी यांचा त्यांनी हिरिरीने प्रचार केला. तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या चिटणीस पदी त्यांची निवड झाली. 1924 साली वायकोमला हरिजन मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह केला. काँग्रेसच्यावतीने चालविलेल्या अनाथाश्रमातील अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. ब्राह्मणेतरांसाठी राखीव जागांची मागणी त्यांनी केली. काँग्रेसमधील ब्राह्मण पुढाऱ्यांच्या मर्जीतून ते उतरले. तामिळनाडू काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी ब्राह्मण उमेदवाराचा पराभव केला. परंतु अधिकारसूत्रे ताब्यात घेण्याअगोदरच एका ब्राम्हण पुढाऱ्याने आणलेल्या अविश्वासाच्या ठरावाला त्यांना तोंड द्यावे लागले.
झुंजार पत्रकार
‘ब्राह्मणशाही’ला कंटाळून त्यांनी काँग्रेस सोडली आणि 1925मध्ये स्वाभिमान चळवळ सुरू केली. त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, पुराणातील भाकडकथा यावर हल्ले केले. रॉबर्ट इंजरसीलच्या लेखांचे त्यांनी तामिळमध्ये भाषांतर केले. हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व. द्रविडांचा उत्कर्ष यातून कधी होणार नाही असा झंजावती प्रचार त्यांनी सुरू केला. मनुस्मृति पूर्णपणे अमानुष असल्याचे घोषित केले. ‘कुडी आरसू’, (लोकसत्ता), ‘पुरतची’ (बंड), ‘पकुयारिय’व ‘विदुधुलाई’ (स्वातंत्र्य) ही त्यांची वृत्तपत्रे अक्षरशः आग ओकू लागली. 1930-31 मध्ये नायकरांनी सोव्हिएट रशिया व अन्य काही देशांचा दौरा केला. ते पूर्णपणे भौतिकवादी बनले. भौतिक वादाशिवाय हिंदी समस्या सुटणार नाहीत, तो एक तरुणोपाय आहे, असे विचार मांडून त्यांनी सरकार उलथून पाडण्यासाठी जन आंदोलने सुरू केली.1933-34 साली त्यांना शिक्षा झाली. तुरुंगवासात त्यांनी देशातील एखाद्या मोठ्या राजकीय पक्षात सामील होण्याचा विचार केला. स्वतःचा चौदा कलमी कार्यक्रम काँग्रेस व जस्टीस पार्टीकडे पाठवला. काँग्रेसने स्वीकार केला नाही, परंतु उतरती कळा लागलेल्या जस्टीस पार्टी ने त्याला स्वीकृती दिली!
एकांतिक भूमिकेकडे
1937 आली राजगोपालाचारींच्या काँग्रेस मंत्रीमंडळाने हिंदी शिक्षणाची सुरुवात केली. तामिळ संस्कृती, समृद्ध तामिळ वाङमय यावरच आलेला हा घाला समजून नायकरांनी हिंदी विरोधी काळ्या निशाणाची चळवळ सुरू केली. हिंदीविरोधी आंदोलनामुळे सर्व ब्राम्हणेतर समाजात जागृती निर्माण झाली. हिंदीविरोधी चळवळीतील पोलीस गोळीबारात दोन हुतात्मे झाले. नायकरांना तुरुंगात डांबण्यात आले. ते तुरुंगात असताना जस्टीस पार्टीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली! हिंदी भाषेच्या साम्राज्यामुळे तामिळी लोकांना गुलाम करावे लागेल. यातून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतंत्र द्रविड राज्याची उभारणी असे त्यांना वाटले. डिसेंबर 1938 मध्ये जस्टीस पार्टीने स्वतंत्र राज्याची मागणी करणारा ठराव पास केला. 1939 मध्ये नायकरांनी ‘द्रविडनाडू परिषद’ संघटित केली. 1940 मध्ये मुस्लिम लीगने लाहोरला पाकिस्तानची मागणी केल्याबरोबर ‘स्वतंत्र द्रविडनाडू’ च्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. ब्राम्हणेतर स्वतंत्र द्रविड राज्य, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम हे त्याचे घटक. आर्य ब्राह्मणांच्या राज्यापेक्षा अगदी वेगळे! 1944 साली जस्टीस पार्टीची पुनर्घटना करण्यात आली नाही.नायकरांनी सालेम परिषदेत तिचे रूपांतर ‘द्रविड कळघम’ (द्रविड संघराज्य) मध्ये केले. सवर्णांचा निषेध करण्यासाठी द्रविड कळघमच्या सभासदांनी काळे शर्ट वापरण्याची सूचना त्यांनी केली. जस्टिस पार्टीतील अनेक नेमस्त मंडळी काँग्रेसमध्ये दाखल झाली. 1945 च्या तिरुचिरापल्ली परिषदेत द्रविड कळघम संघटनेने आपली घटना ठरवली, व पक्षाचा झेंडा काळा, -मध्यभागी लाल वर्तुळ असलेला- फडकवला. द्राविड प्रजासत्ताक संघराज्य हे उद्दिष्ट व जातीपातीविहीन समाज रचनेचे ध्येय जाहीर करण्यात आले व सर्व पददलितांना व पीडितांना संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. नायकरांच्या द्रविड कळघम पक्षाने ब्रिटिश राज्याविरुद्ध असहकार पुकारला. पक्षाच्या सभासदांनी ब्रिटिश सत्तेने युद्धकाळात बहाल केलेल्या मानांची पदे व बिरुदावल्या भिरकावून दिल्या व नोकऱ्या सोडल्या. ‘अंधश्रद्धा सोडा’ व ‘स्वाभिमान धरा’ या चळवळीने मद्रास राज्यात जोम धरला. गंध टिळे पुसले गेले, शेंड्या जानवी तुटली. ब्राह्मण पुरोहितांवर समारंभात बहिष्कार सुरू झाला. विधवा विवाह, आंतरजातीय विवाहांना जोरदार चालना मिळाली. द्रविड कळघमने तयार केलेली साधी विवाह पद्धत सर्रास रूढ झाली. विवाह समारंभात अध्यक्षपदी कोणाची तरी निवड करायची, वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे अशी प्रथा सुरू झाली.
तामिळ संस्कृतीचा उत्कर्ष
‘निरीक्षश्वरवाद’ हा संघटनेचा पाया बनला. एखाद्या वेळेस हिंदू द्रविड असू शकेल खरा द्रविड कधी हिंदू असू शकणार नाही अशी म्हण रूढ झाली. हिंदू देव-देवतांची विटंबना सुरु झाली. या विटंबनाने राजकीय मजल गाठली. रामाऐवजी रावणाला नायक मानण्यात येऊ लागले. रामाच्या मूर्तीला चपलाहार घालून मद्रास मध्ये जाहीर मिरवणूक नायकरांनी काढल्याचे अनेकांच्या स्मरणात असेल. ‘रामसीते’चा आदर्श तिरस्करणीय मानण्यात येऊ लागला. उलट द्रविड संस्कृतीचा रावण आदर्श बनला. तामिळनाडूमध्ये रामाविषयी पूज्यभाव बाळगणे म्हणजे आपल्या स्वाभिमानाला तिलांजली देण्याजोगे मानण्यात येऊ लागले. रामायण व इतर जलसे द्रविड कळघमच्या नाट्यमंडळांनी स्टेजवर आणले. त्याची लोकप्रियता अफाट होती. हिंदू कर्मकांडांवरील या हल्ल्याबरोबरच तमिळ जागृतीला सुरुवात झाली. तमिळ भाषेतील वाङमय प्रकारांना जोश आला. नवे लिखाण उदयास येऊ लागले. तमिळ भाषेत घुसलेल्या संस्कृत शब्दांना अर्धचंद्र मिळाला. एकेकाळी तमिळमध्ये 50 टक्के शब्द संस्कृत होते हे प्रमाण 10,20 टक्क्यांवर आले. विसाव्या शतकातील तामिळ उठावातून अन्नमलाई विद्यापीठ साकार झाले. डॉ. एस. रामानुजन सारखा नायकरांचा पट्टशिष्य कुलगुरू झाला. द्रविड कळघममध्ये नसलेल्या तमिळ साहित्यिकांनाही या चळवळीने भारावून टाकले. ब्राह्मणेतर समाजाच्या अभिव्यक्तीस प्रतिष्ठा प्राप्त झाली. प्रभावी वक्ते, घणाघाती लेखक यांचा वर्ग निर्माण झाला. तमिळ जीवनाचा सांस्कृतिक प्रवाह वेगाने वाहू लागला. आर्य संस्कृतीच्या पगडयातून लोकांचे मानस मुक्त झाले. द्रविड कळघम संघटनेचे जाळे खेडोपाडी पसरले. ‘तमिळ राष्ट्रवादा’ची जाणीव निर्माण झाली. तमिळ जनतेची या उठावातून जोरदार सांस्कृतिक प्रगती झाली व स्वाभिमान चळवळीला अपरिमित यश लाभले.
शिष्याशी मतभेद
द्रविड कळघमच्या संघटनेच्या सुरुवातीला अण्णादुराईच्यासारखा शिष्योत्तम नायकरांना लाभला. 1947 आली फाळणीचा वेळेस स्वतंत्र द्रविड राज्यासाठी नायकरांनी मोहंमद अली जिनांबरोबर संपर्क साधला होता. परंतु जिनांनी दाद दिली नाही. ब्रिटिशांनी तमिळ जनतेची फसवणूक केली व स्वातंत्र्याच्या नावाखाली नोकरशाहीतून ब्राह्मणी वर्चस्व लादण्याचा कट केला, अशी संभावना करून नायकरांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्व समारंभांवर बहिष्कार घातला राष्ट्रध्वजाला प्रणाम करण्यास नकार दिला व काही वर्षांनी ब्राह्मणी साम्राज्यशाही म्हणून त्यांनी घटनेला मान्यता देण्यास विरोध केला.
‘स्वातंत्र्याचे आगमन’ हा निव्वळ उत्तरेकडच्या आर्यांचा विजय नसून सर्व हिंदी जनतेचा विजय आहे, असे अण्णादुराई यांनी जाहीर केले. नायकरांनी याला जुमानले नाही. याच सुमारास पक्षांतर्गत लोकशाहीच्या मागणीचे मूळ धरले. 1948 साली एका परिषदेत नायकरांच्या हुकूमशाही विरुद्ध अण्णादुराई यांनी सभात्याग केला. पक्षातील फुटीची जाणीव घेऊन नायकरांनी अण्णादुराईंची पक्षाध्यक्षपदी निवड केली. परंतु लोकशाहीकरणाच्या मागणीला वाटण्याच्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या! 1949 साली वयाच्या बहात्तराव्या वर्षी रामस्वामी यांनी 28 वर्षाच्या एका मुलीसोबत विवाह केला. ही मुलगी त्यांची शिष्या होती. तिच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे व तीच पार्टी पुढे चालू शकेल असा खुलासा रामस्वामी यांनी केला. या घटनेतून द्रविड मुन्नेत्र कळघम(द्रविड प्रागतिक संघ) पक्षाचा जन्म झाला. करुणानिधी, नटराजन, संपत इत्यादी नेते द्रविड कळघमपासून अलग झाले. अण्णादुराई यांनी द्रमुकची संघटना उभी करण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली. पण द्रमुकच्या प्रत्येक परिषदेत अण्णांच्या बरोबर पेरियार अय्यांचा गौरवाने आकडे उल्लेख होई.
माय डियर एनिमी
द्रविड कळघमच्या चळवळीने सुरुवातीच्या काळात शिवाजी गणेशनसारख्या नटाला खेचून घेतले होते. द्रमुकच्या यशात शिवाजी गणेशन बरोबरच एम. जी. रामचंद्रन, एस. एस. राजेंद्र, के. आर. रामस्वामी, एम. के. राधा या नटांचा ही वाटा मोठा होता. तमिळ लोकमतावर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. यापैकी फक्त एम. के. राधा हाच नट द्रविड कळघम बरोबर राहिला. एम. रामचंद्रन व एम. के. राधा यांच्यातील वैमनस्य पुढे फारच वाढत गेले. रामचंद्रन यांच्या खुनाचे प्रयत्न झाले. आता तर रामचंद्रन यांनीच पुढाकार घेऊन द्रमुकपासून अलग होऊन अण्णाद्रमुक ची स्थापना केली आहे. रामास्वामी नायकर यांनी आपला मोहरा बदलला. अण्णा दुराईच्या ऐवजी ‘कामराज’ त्यांचे वारस बनले. ‘मी म्हातारा झालो आहे, कदाचित मी लवकर जाईन. आता तमिळ जनतेचे हित कामराज पाहतील. तेच माझे वारस आहेत.’ असे नायकरांनी जाहीर केले. 85 वर्षांच्या नायकरांनी तमिळ जनतेला 1962 साली काँग्रेसला मते देण्याचा आदेश दिला. ‘तुम्ही काँग्रेसला मदत केली नाही तर द्रमुकच्या घोड्यावर स्वार झालेल्या राजाजींच्या दयेला तुम्हाला पात्र व्हावे लागेल.’ असे ते म्हणाले. राजाजींनी ते शत्रू मानीत आणि हे दोघे धुरंधर एकमेकांना ‘माय डियर एनिमी’ म्हणून संबोधित.
नायकरांच्या ब्राह्मणांवरील हल्ल्यामुळे कामराजांना नायकर व त्यांच्या द्रमुक बरोबरचे सख्य संपुष्टात आणावे लागले व कोणीही काँग्रेस जनाने नायकरांचा सत्कार करू नये म्हणून ताकीद द्यावी लागली. परंतु नायकरांच्या लोकप्रियतेचा त्यांनी पुरेसा फायदा घेतला. मुख्यमंत्री झाल्यावर 1962 च्या फेब्रुवारी महिन्यात मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू करण्यात आले. राजकारणाचे ‘तामिळकरण’ होण्यात नायकरांचा मोठा विजय होता. 1967 साली कामराज ‘महागाई व हिंदी विरोधी’ चळवळीत गडगडले व राज्य द्रमुकच्या ताब्यात गेले. रामस्वामी या काळातही स्वस्थ बसले नाहीत. अण्णादुराईच्या मंत्रिमंडळात मंदिरमंत्री निर्माण करण्यात आल्याबरोबर 90 वर्षाचा हा म्हातारा रामाच्या मूर्तीला चपलाहार घालून मद्रासच्या राजरस्त्यावर उतरला. तुरुंगात गेला! रामस्वामी नायकरांच्या जीवनाचे हे धावते चित्र पाहिल्यानंतर या विद्रोही माणसाच्या क्रांतिकारक कार्याची थोडीफार कल्पना येईल. तामिळनाडूमधील सांस्कृतिक बंडखोरीतून त्यांनी अस्मिता निर्माण केली. नायकरांना ‘सत्यशोधक’ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या माणसास समजून घेण्याऐवजी त्याची ‘माथेफिरू’ म्हणून बदनामीच बरीच झाली.
डॉ. लोहिया यांची भेट
23 जानेवारी 1958 रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी रामस्वामींची मद्रास मध्ये भेट घेतली. जाती-जातीत वैमनस्य माजविण्याच्या या आरोपामुळे नायकर सहा महिन्यांची शिक्षा भोगत होते. सरकारी परवानगीने हॉस्पिटलमध्ये एक तास भेटण्याची परवानगी मिळाली.
या दोन नेत्यांत मोठा गमतीदार संवाद झाला नाही
नायकर- मला इंग्लिश येत नाही आणि हिंदी तर अजिबात नाही.
डॉ. लोहिया - तुम्ही तमिळ मध्ये बोला आणि मी हिंदीतून बोलेन. हे मित्र भाषांतर करतील!
नायकर - माफ करा. अत्युत्तम.
डॉ. लोहिया - तुम्हाला बरेच दिवस भेटावेसे वाटत होते. आज मुद्दाम आलो आहे.
नायकर - मला ही आनंद झाला आहे. जणू काही बऱ्याच वर्षांचे डोक्यावरील ओझे उतरले जात आहे.
डॉ. लोहिया - तुमची प्रकृती कशी आहे?
नायकर - पहिल्यापेक्षा बरी आहे. ध्येयासाठी मला तुरुंगवास सहन करावा लागत आहे.
डॉ. लोहिया - तुमच्यासारख्यांना या वयात तुरुंगात ठेवणे योग्य नाही.
नायकर -मी माझ्या सहकाऱ्यांना कधीच हिंसेसाठी उद्युक्त केलेले नाही. मी एवढेच म्हणालो, ब्राह्मण जर शांततामय मार्गांनी गेले नाही तर लोकांनी हिंसात्मक मार्गांचा अवलंब केल्याबद्दल आश्चर्य वाटू देऊ नका. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मी वेडा झालो असून मला जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे असे सांगितले.
डॉ. लोहिया -पंतप्रधानांनी तुमच्यावर नक्की अन्याय केला आहे. तुमची केस कोर्टात सुरु आहे. कदाचित कोर्टाचा अपमान होईल. तुमचा जाती व्यवस्थेविरुद्ध चाललेला लढा योग्य आहे. परंतु हे आंदोलन व्यक्तिगत ब्राम्हणांविरुद्ध चालविणे योग्य नाही.
नायकर - मी हिंसा केलेली नाही. खरे सांगायचे म्हणजे मद्रासचा प्रेस ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्यांना मला बदनाम करावयाचे आहे. मी संयम बाळगीत आलो आहे. कदाचित माझ्या मरणानंतर ब्राह्मणांची परिस्थिती अधिक बिकट होईल. ‘कल्की’ मध्ये एक लेख आला आहे. राजगोपालचारी तीत नेहमी लिहितात. मला मिळालेली शिक्षा फार अपुरी आहे, तीत वाढ करण्यासाठी मद्रास सरकारने हाय कोर्टात जावे अशी लेखकाची सूचना आहे.
डॉ. लोहिया - केवळ विरोध करून भागणार नाही. तर व्यक्तिगत ब्राह्मणांवरील हल्ल्याचा निषेध केला पाहिजे.
नायकर- मला मान्य आहे. हिंसेमुळे दोघांचाही नाश होईल. विदुतलाई या आमच्या साप्ताहिकाने कधीही अशा हल्ल्याचा पुरस्कार केलेला नाही. मी तुम्हाला परत निक्षून सांगतो.
एकात्मतेसाठी ओळख आवश्यक
26 डिसेंबर 73 रोजी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी नायकरांना श्रद्धांजली वाहिली. मी त्यानंतर पूर्ण तहकुबी मांडली.कोणी विरोध केला नाही. परंतु सभा संपल्यानंतर दोन वार्ताहार मला भेटले. हे फार मिळमिळीत झाले. आम्हाला वाटले तुम्ही महापौर व पोलिस या प्रश्नांवर तहकुबी मांडली. अपेक्षेप्रमाणे या तहकुबीस वर्तमानपत्रातून जागा मिळाली नाही. मराठी वृत्तपत्रातून क्वचितच कोणी अग्रलेख लिहिला असेल. साने गुरुजींनी आंतरभारतीचे स्वप्न रंगवले. मराठी भाषांतर केले. तमिळ संस्कृतीची खरोखर आपल्याला फारशी माहिती नसतेच. कावेरीच्या तीरावरील बहरलेल्या या संस्कृतीबद्दल पूर्णपणे अज्ञान ठेवून भारत एकात्म कसा होईल? महाराष्ट्रातही सत्यशोधक चळवळ सुरु झाली. ब्राह्मणेतर पक्ष निघाला. 100 125 वर्षात अनेक माणसे कामी आली. परंतु जातिव्यवस्थेविरुद्धचा लढा संपलेला नाही. जात सर्वांना पुरून उरली आहे. तमिळनाडू व महाराष्ट्रात एक फरक कटाक्षाने जाणवतो. तमिळ बहुजन समाज स्वाभिमान चळवळीने जागा झाला आहे. मराठी समाजाला ब्राह्मणांच्या न्यूनगंडाने पछाडले आहे. नायकरांचा वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य या सर्वांनाच विरोध होता. तेथे वर्णांतील क्षत्रियत्व, मोगली व राजपूत अमदानीतील पडदा व खानदान यांचे चमत्कारिक संघटन तयार झालेले आहे. प्रत्यक्ष तामिळनाडूमध्येही रंग पालटत आहे. परंतु या रंगासाठी तमिळ मातीचाच आधार घ्यावा लागत आहे. रामस्वामींनी मरणापूर्वी केलेल्या संकल्प पुरा करण्यासाठी कोण पुढे सरसावते हे दिसावयचे आहे. सत्तेच्या भोवती घुटमळणारी ‘भुतावळ’ जमा होत आहे; प्रश्न आहे लढाईचा.
Tags: Dr. Ram MAnohar Lohiya Annadurai Dr. S. Ramanujan Dravidnadu Parishad Rajgopalachari Manusmruti Irod Dravid Kalgham Chaturvarnya Vyavstha Jativyavastha Asprushyata Ramswami Naykar डॉ. राम मनोहर लोहिया रामस्वामी अण्णादुराई डॉ. एस. रामानुजन द्रविडनाडू परिषद राजगोपालाचारी मनुस्मृति इरोड द्रविड कळघम चातुवर्णव्यवस्था ‘जातिव्यवस्था’ ‘अस्पृश्यता’ रामस्वामी नायकरा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या