डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मटका, जुगार अन्‌ वेश्यांबद्दल कादंबरी लिहिण्याची तयारी करतोय, हे ऐकूण घरात काळजीचं वातावरण सुरू झालं. एखादा विषय समोर आला की त्याच्या पाठीमागं हात धुवून लागणं, हा माझा स्वभाव होता. पण ह्या वेगळ्या विषयात मी अडकत चाललोय, ह्या बद्दल ज्येष्ठ मित्रही म्हणू लागले, ‘‘कशाला ह्या घाणीत दगड मारून बघता. आजूबाजूला अनेक विषय असताना ह्यात काय पडलंय?’’ त्यामुळे काही दिवस या विषयाची चर्चा थांबवली. जवळच्यांना वाटलं, बरं झालं. पुण्याला कामाला जायचं म्हणून निघालो. अख्तरभाई आणि आबाला निरोप दिला. मुंबईला ग्रंथसंग्रहालयाच्या गेस्ट रूममध्ये भेटायचं. ते दोघे रेल्वेनं आले. ‘‘तीन गोष्टी बघायच्या. आबा ज्या रेडलाइट एरियात नेहमी जायचा, तो भाग बघायचा. काही क्लबला जायचं. आणि मणिभार्इंशी बोलायचं.’’ मी म्हणालो. ‘‘मणिभाईला गाठू अगोदर, तो बरोबर असला की सोपं जाईल.’’ सामान ठेवून निघालो. टॅक्सीत बसताना अख्तरभाई म्हणाले, ‘‘तुम्ही लेखक, पत्रकार आहे, हे मुळीच सांगायचं नाही. आपण गिऱ्हाईक म्हणूनच जातोय.’’ गिऱ्हाईक शब्दानं पोटात गोळा उठला. अंगावर काटा उभा राहिला आणि अचानक सुरेश खोपडे यांची आठवण झाली.

दशक्रिया कादंबरीपूर्वी मी हैदराबाद मुक्तिसंग्रामावर वाचन करत होतो. सासरे सहकार खात्यातील अधिकारी. सरकारी नोकरीत असूनही त्यांनी या लढ्यातील कार्यकर्त्यांना गुप्तपणे मदत केली होती. त्यांचेकडूनही माहिती मिळाली. काही वाचन केलं. कादंबरी लेखन सुरू केलं; पण पन्नास साठ पानांनंतर ती तशीच अडकून पडली आणि मधल्या काळात दशक्रिया कादंबरी लिहून झाली. पुन्हा मी नव्या विषयाच्या शोधात होतो.

एके दिवशी एक मित्र अचानक आले. स्थानिक शाळेत अध्यापन करायचे. इतर वेळात गणिताची शिकवणी घेत आणि ही वरकमाई दारू-मटण पार्टीत कारणी लावत; पण ते अलीकडे योगशिक्षक बनले होते. खाणं-पिणं सुटलं होतं. त्या मित्राने विचारलं, ‘‘काय लिहिता अलीकडे?’’

‘‘आहेत एक दोन विषय; पण अजून सुरू होत नाही.’’

‘‘माझा भाऊ आलाय योगाच्या वर्गासाठी. त्याची गोष्ट मी थोडक्यात सांगतोय. तुम्ही नंतर त्याचेशी बोला.’’

माझा लहान भाऊ एकदम हुशार. शाळेत पहिला नंबर असायचा. वर्गात शिकवलं तेवढाच अभ्यास पुरायचा. तिसऱ्या वर्गापासून तो तिरट खेळू लागला. तिरट म्हणजे पैसे लावून जुगार खेळणं. वडील वारकरी. पोष्टात रनर. कष्ट करून पोराला शिकवणारे. भाऊ मात्र आमच्या दृष्टीनं वाया गेलेली केस. दहावीला जळगाव जिल्ह्यात पहिला आला. मात्र सुटीत गावाशेजारच्या तालुक्याच्या जुगाराच्या अड्यावर जाऊ लागला. पट्टीचा खेळणारा म्हणून जिल्ह्यात खेळणाऱ्यांत नाव झालं. पुढच्या शिक्षणासाठी त्याला औरंगाबादी आणलं. पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला. मटका, तिरट खेळणं सुरूच. एका श्रीमंत मित्राच्या संगतीनं तो अधून मधून पिऊ लागला. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी परीक्षेत कॉपी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना निलंबित केलं. त्यात हाही होता. तो म्हणाला, ‘‘मी कॉपी करत नव्हतो. मित्रांसोबत अडकवलं.’’

तो गावी आला. शिकायचं नाही म्हणाला. पाटलांचा पोरगा. वडलानं लग्न करून टाकलं. तो जुगाराच्या निमित्तानं शेजारच्या मायेजीला जाई. हे जुगार आणि वेश्यांसाठी दीडशे वर्षांची परंपरा असलेलं गाव.

मायेजीला वेश्येच्या तरुण मुलीच्या प्रेमात अडकतो. तिला गावी आणतो. वाजत गाजत वरात काढतो. दहा वर्षं त्या पोरीबरोबर संबंध होते. अल्पकाळात तो मटका- जुगारांच्या अड्यातील दादा बनला. चोवीस तास खेळणं. आलेल्या पैशातून ऐष करणं. गरजूंना सढळ हातानं मदत करणं. असा हा परोपकारी पोरगा आमच्यासाठी कोडं झाला होता.

एके दिवशी त्यानं गावातील एकाला पन्नास रुपये उसने मागितले. ते प्रजापती ब्रह्मकुमारीचे शिक्षक होते. ते म्हणाले, ‘‘तुझ्या अशा कामांसाठी पैसे देण्याची आम्हांला परवानगी नाही.’’

यावर तो म्हणाला, ‘‘आजचा एक दिवस द्या. उद्या पिणं सोडतो.’’

आणि त्यानं पिणं सोडलं. माऊंट अबूला जाऊन तो प्रशिक्षक बनून आला.

 0 0

 माझे ते मित्र नव्या विषयाचं पिल्लू सोडून निघून गेले. निघताना मी त्यांना विचारलं, ‘‘पुढं काय? आणि तो आता कुठं आहे?’’ ते हसले,

‘‘फार मोठी आणि वेगवेगळ्या वळणांची ती गोष्ट आहे. तुम्ही त्यालाच एकदा भेटा. उद्या तो आश्रमावर येतोय चार दिवसांच्या शिबिरासाठी.’’

जगावेगळ्या विषयाभोवती विचार सुरू झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांची उत्तरं मला कथा नायकच देऊ शकेल काय? माणसं आपला उज्ज्वल भूतकाळ मीठमसाला लावून अभिमानानं सांगत मिरवतात. पण याची गोष्ट ही तशी नव्हती. आणि मी तर अर्धवट ऐकलेली.

औरंगाबादच्या दक्षिणेला अर्धनालाकृती डोंगराची रांग आहे. दरीत निसर्गाच्या सान्निध्यात योगाभ्यास आश्रम होता. शिबिराच्या शेवटच्या दिवशी त्याला भेटायला गेलो.

माझं नाव सांगताच पायावर डोकं टेकवीत तो म्हणाला, ‘‘नानानं सांगलं मला.’’

‘‘मग कधी वेळ काढणार गप्पा मारायला?’’माझा उतावीळपणा बघून त्यानं विचारलं, ‘‘मी तर मोकळाच आहे. तुम्हाला कधी सवड आहे?’’

‘‘बाजूला आपलं डोंगरात घर आहे. कधीही थांबता येईल.’’

‘‘एक दोन दिवसांत गावाकडं जाऊन येतो. तसं माझ्यामुळं घरचं काही आडत नाही. बायको सांभाळून घेते सारी.’’

तो गावाकडे जाऊन परत आला. त्याला घेऊन आनंदघन या डोंगरातील घरी आलो. ‘‘मला तुमच्याबद्दल ऐकायचं. सगळं मनमोकळं सांगा. तुमची परवानगी असली तर आपलं बोलणं मी टेप करणार आहे.’’ मी सुरुवात केली.

‘‘बिलकूल करा. मी जमेल तसं सांगेन. तुम्हाला काही विचारायचं असलं तर विचारा म्हणजे माझी लिंक लागेल.’’ आणि तो बोलू लागला,

‘‘ते रम्य बालपण. वडलांचा करारीपणा; पण बालपणातील दुर्लक्षाची सलणारी बोच. कुतूहलाने पत्ते खेळू लागलो. आत्मविश्वास वाढत गेला. जुगार खेळताना मिळणारा आनंद कशातही नसायचा. पुढं वेश्येची मुलगी भेटली. दहा वर्षं आपल्या संगं होती. जळगाव, भुसावळ, मुंबई सगळ्या जुगार अड्यांवर संचार सुरू झाला. ते खेळणं म्हणजे अंगात संचार होई. अल्पकाळात सगळे दादा म्हणू लागले. आज जिल्ह्यातील राजकारणात प्रतिष्ठित असणारे अनेक माझे अड्यावरचे सोबती आहेत. पूर्वी खेळू लागले की नकळत नशा चढायची. औरंगाबादी एका मित्रानं प्यायची सवय लावली. त्याला आम्ही पूजा-पाणी म्हणायचो. पण मी अनेक दिवस एक नियम पाळला. दवापाणी घेऊन क्लबवर खेळायचं नाही. जुगाराचं खेळणं आणि पिणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या. जेव्हा पिलो तेव्हा खेळायला सुट्टी. आणि जेव्हा खेळू लागे तेव्हा दोन-दोन, तीन-तीन दिवस दारूच्या थेंबाला स्पर्शही नाही.’’

‘‘त्या वेश्येच्या पोरीबद्दल... तुम्ही तिची वरात काढली होती.’’ मी मधेच विचारलं. त्यानं चमकून माझ्याकडे पाहिलं.

‘‘मी काल गावाकडं गेलो. त्यापूर्वी महिनाभर माऊंट अबूला होतो. दहा वर्षं तिनं माझ्यावर जीव टाकला. आधारानं एकनिष्ठ राहिली. तिला न सांगता माऊंट अबूला गेलो. काल बाजारात तिनं मला पाहिलं आणि पाय धरत मला विचारलं, ‘‘कुठं होता?’’

मी हादरून गेलो. कसं सांगू तिला? सांगितलं तरी तिला हे योग वगैरे काय कळणार? तरी कसंतरी म्हणालो, ‘‘माझा मार्ग आता बदललाय.’’ यावर रडत ती तिनं विचारलं, ‘‘तुझ्या नावानं मी दहा वर्षं चिरा उतरलाय. तू सगळं झटकून मोकळा झालास. मी आता काय करू? मला आता कोण आहे?’’

तो गप्प झाला. त्याच्या डोळ्यांतून अपराधाच्या धारा वाहू लागल्या. उघड्या दारातून समोरच्या जलप्रवाहाकडे बघू लागला. मी त्याला पुढं काही विचारलं नाही. टेपरेकॉर्डर बंद केला. त्याला एकट्याला सोडून बाहेर बागेत आलो.

0 0

तो गावी गेला. मटका, जुगार, वेश्या या विषयानं मनात पाय पसरायला सुरुवात केली. तीन दिवसांच्या बोलण्यातून अद्‌भुत विश्वाचं सुटंसुटं दर्शन त्याच्या बोलण्यातून झालं होतं. एकांगी चित्र समोर येऊ नये म्हणून त्याच्या गावी आलो. त्याच्या बालपणाच्या पहिलवान मित्राला बोलतं केलं.

तो म्हणाला, ‘‘आमचा हा मित्र लई हुशार आन्‌ परोपकारी गडी हाय. पण गधडी लत चिकटली  गोचीडावानी. तेवढं काढून टाकलं तर आसा मानूस सापडायचा नायी गिरना काठला.’’

त्या मित्रानं त्यांची शाळा, नदी काठ, चिंचाबोराचं बन, गिरणेचा डोह हा सगळा भूप्रदेश दाखविला. निघताना म्हणाला, ‘‘सोन्या सारका पोरगा नासक्या आंब्याच्या संगतीनं वाया जाताना बगून पोटात तुटायचं; पण आता सगळं सुटलंय बगून मनाला बरं वाटलं.’’

प्रजापती ब्रह्मकुमारीचे शिक्षक म्हणाले, ‘‘भगवंतानं ऐकलं अन त्याला मायेतून बाहेर काढलं; पण ते टिकलं पाह्यजे. त्यासाठी सत्संग हवा.’’

मी त्याला विचारलं, ‘‘मला मायेजी गाव बघायचं. त्या वेश्येच्या मुलीला भेटायचं. तुमचे मुंबईचे खेळायचे अड्डे बघायचे. ते कसं जमेल?’’

‘‘मी ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर जाऊ पाहतोय. तिथं जायला मन धजत नाही. मनात सगळा गोंधळ होतोय.’’ तो म्हणाला. थोडा विचार करून तो पुढं म्हणाला, ‘‘माझा एक मित्र आहे अख्तर भाई. त्यांना आपण भेटू.’’

‘‘काय करतात ते?’’

‘‘पूर्वी लहानपणी सट्ट्याचे बुकी होते. पुढे एजंट झाले. वेश्यावस्तीत त्यांना मान आहे. मायेजीत जाणं येणं आहे. आता भाजपचे कार्यकर्ते असून सत्ताधाऱ्यांच्या भानगडी काढण्याचं समाज कार्य करतात.’’

0 0

पाच मिनिटांत अख्तरभार्इंशी गट्टी जमली. ‘‘तुम्ही काळजी करू नका. सगळं दाखवतो. गाठभेटी घालतो. असं भन्नाट लिवा सगळ्यावर,’’

ते म्हणाले, ‘‘तुमची गाडी सोडू इथं. फटफटीवर जाऊ. गाडी बघितली की तोंडाले पानी सुटते बघणाऱ्याचे.’’ चहा घेऊन दोघंच निघालो. पंधरा कि.मी. जायचं होतं. एवढ्या वेळात अख्तरभाईनं त्याची इस्टोरी सांगून टाकली.

‘‘लहानपणापासून मायेजीत येतोय. सगळे घरच्यासारखे. त्यांच्या अडीनडीला मदत करतोय. पोलिस-कचेरीत भानगड झाली तर तोडापानीचं बघतो.’’ खराब रस्ता सुरू झाला. बोलणं थांबलं. गाव दिसू लागलं. उजव्या हाताला फटफटी थांबली. पोरं गोळा झाली.

 ‘‘हे माझ्या मानलेल्या बहिणीचं घर. तिच्या लहान बहिणीकडं मी यायचो. ती आता नाही.’’ त्यांच्या मागून आत आलो.

‘‘अरे अख्तरभाई कैसा आना हुवा?’’

‘‘मेरे दोस्त है! इसके साथ आया हूँ!’’ अख्तरची मानलेली बहीण टक लावून बघते.

‘‘तू सुना नहीं क्या? गाववाले लौडेंने धंदा बंद करने कू लगा.’’ मग ती सगळं भडभडून सांगते. दीडशे वर्षांचा पण; धंदा गावची इज्जत चालती म्हणून बंद केला.

‘‘सब जवान पोट्ट्या इधर उधर गयी. पेट में काटे तो नहीं डालते ना!’’

‘‘बाजू की रीना नहीं है क्या?’’ माझ्याकडून अख्तरकडे बघत तिने विचारलं, ‘‘अमळनेर गयी चंपा के कोठीपे. उस के पास काम था क्या?’’

‘‘ये साब कार्यकर्ते है! किताब लिख रहे हैं! तुम लोगो को सरकारसे मदत करेंगे!’’

‘‘अरे भाई, अब तब सरकारसे फोकट चोदनेवाले बहुत आकर वर्गणी लेकर गये है। सब मलई के पीछे पडे है!’’आतून चहा आला. चर्चा थांबली. तिचा निरोप घेतला.

0 0 अ

ख्तरभार्इंची फटफटी घरी सोडली. आणि साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेरकडे गाडी धावू लागली. बस स्टँडवर गाडी उभी केली. मित्राला तिथंच थांबविलं. अख्तर म्हणाले, ‘‘आपण दोघंच रिक्षाने जाऊ.’’ रिक्षावाल्याने मोहल्ला ऐकताच कळी खुलली.

जवळ येताच त्यानं विचारले, ‘‘कहाँ छोडू?’’

‘‘गल्लीच्या तोंडाशी सोड.’’ उतरल्यानंतर अख्तर म्हणाला, ‘‘चार दोन रुपये मिळतात कोठीवाल्याकडून.’’

अख्तरमागून चालू लागलो. दुपारचे बारा वाजलेले. सगळीकडे सामसूम होती. एका बैठकीत त्याच्या मागून आत आलो. मायेजीसारखाच संवाद. अख्तर मुद्‌द्याचं विचारतात, ‘‘रीना कुठं राहते? तिला भेटायचं.’’ रस्त्यावरच्या पोराला ती म्हणाली, ‘‘रीना को बुलाव. अख्तर काका आया बोलना.’’

अख्तर आणि ती मालकीण सुखदु:खाचं बोलू लागले. पंधरा मिनिटांत साधारण उंचीची सावळी मुलगी वर आली. मावशी म्हणाली, ‘‘अख्तर काका आया है!’’ ती नुकतीच न्हाऊन आली असावी.

‘‘कैसी हो रीना? मै मायेजीसे आया! यह मेरे दोस्त है! ए कहानी लिख रहै है! तू आबा के साथ थी! इसके बारे मे बोल! हजार पांचसो वो देंगे!’’

ती अवघडलेली. नजर पायाकडे, म्हणाली, ‘‘बिना काम का हराम का दाम हम लेते नहीं, काका! मुझे आज की फिक्र पडी है! कल के कितने आबा का ख्याल रखूँ?’’

आणि गप्प झाली. तिने चहा मागवला. स्वत: पैसे दिले. निघताना ती म्हणाली, ‘‘माझी पोरं शिकतात धुळ्याला. ती मोठी व्हायची वाट पाहतेय.’’

आणि पायऱ्या उतरून चालू लागली.

0 0

अख्तरभार्इंना विचारले, ‘‘आता मटका बंद झालाय. त्याची माहिती हवी.’’

‘‘मटका कधीच बंद होणार नाही. मी पन्नास वर्षं बघतोय. मटक्याची नावं बदलत गेली; पण तोच आहे. मागं आमच्या गावात गृहमंत्र्याचं भाषण होतं. आमचंच राज्य होतं. साहेबांनी सांगितलं, ‘आम्ही मटका बंद केलाय.’’ त्या वेळी पलीकडच्या गल्लीत राजरोस व्यवहार सुरू होता.

‘‘जगात दोनच व्यवहार प्रामाणिकपणे केले जातात. पहिला आहे वेश्या व्यवसाय आणि दुसरा मटक्याचा. दोन्हींतही लांडी लबाडी नाही. मटक्याचे दोन रुपये लावणाऱ्यापासून अगदी वरच्यापर्यंत सगळ्या गोष्टी विश्वासावर होतात. दोन बोटाची चिठ्ठी ही प्रामेसरी  नोट असते. तसंच वेश्यांचंही आहे. पोटासाठी त्यांचा धंदा आहे. पण हरामाचे दोन पैसे फुकट घेणार नाहीत. हे आपण अमळनेरला पाहिलंच ना!’’

‘‘आबा- तुम्ही मुंबईला जुगार खेळायला जायचे. ते ठिकाण बघता येईल काय?’’

‘‘का नाही! पण तिथं थोडा खर्च करावा लागेल. प्रत्यक्ष खेळावं लागेल. मुंबईत माझा एक भन्नाट मित्र आहे मणिभाई. गिऱ्हाईक पुरविणाऱ्यास भडवा म्हणतात. मणिभाई बालपणापासून हे काम करतो.’’ अख्तर भाईचा प्रस्ताव स्वीकारला.

मटका, जुगार अन्‌ वेश्यांबद्दल कादंबरी लिहिण्याची तयारी करतोय, हे ऐकूण घरात काळजीचं वातावरण सुरू झालं. एखादा विषय समोर आला की त्याच्या पाठीमागं हात धुवून लागणं, हा माझा स्वभाव होता. पण ह्या वेगळ्या विषयात मी अडकत चाललोय, ह्या बद्दल ज्येष्ठ मित्रही म्हणू लागले, ‘‘कशाला ह्या घाणीत दगड मारून बघता. आजूबाजूला अनेक विषय असताना ह्यात काय पडलंय?’’ त्यामुळे काही दिवस या विषयाची चर्चा थांबवली. जवळच्यांना वाटलं, बरं झालं. 

पुण्याला कामाला जायचं म्हणून निघालो. अख्तरभाई आणि आबाला निरोप दिला. मुंबईला ग्रंथसंग्रहालयाच्या गेस्ट रूममध्ये भेटायचं. ते दोघे रेल्वेनं आले. ‘‘तीन गोष्टी बघायच्या. आबा ज्या रेडलाइट एरियात नेहमी जायचा, तो भाग बघायचा. काही क्लबला जायचं. आणि मणिभार्इंशी बोलायचं.’’ मी म्हणालो. ‘‘मणिभाईला गाठू अगोदर, तो बरोबर असला की सोपं जाईल.’’ सामान ठेवून निघालो.

टॅक्सीत बसताना अख्तरभाई म्हणाले, ‘‘तुम्ही लेखक, पत्रकार आहे, हे मुळीच सांगायचं नाही. आपण गिऱ्हाईक म्हणूनच जातोय.’’

गिऱ्हाईक शब्दानं पोटात गोळा उठला. अंगावर काटा उभा राहिला आणि अचानक सुरेश खोपडे यांची आठवण झाली. मुंबईत रेल्वे पोलिस महासंचालक होते. दशक्रियामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यांना फोन लावला. मुंबईत आलोय. कादंबरी लेखनाची सामग्री जमतोय. दोन तीन दिवस रेडलाइट एरिया व काही क्लबवर जातोय. सोबत अनुभवी मित्र आहेत; पण काही अडचण आली तर आपणास मदतीसाठी फोन करीन. ‘‘तुम्ही घाबरू नका. मणिभाई आहे ना आपला. वरपर्यंत त्याला सगळे ओळखतात.’’ अख्तरभाई म्हणाले; पण मनात खोलवर धाक धुक सुरू झाली. टॅक्सी थांबली. बाजूच्या हॉटेलमध्ये आलो.

‘‘मणिभाईचा हा अड्डा आहे. चौकशी करतो. अलीकडे बऱ्याच दिवसांत भेटलो नाही. त्यामुळे मोबाईल फोन नाही.’’अख्तरने मालकास विचारलं, ‘‘वोऽ आ रहे है!’’ दाराकडे हात करत तो म्हणाला.

अख्तर अन्‌ मणिभाई कडकडून भेटले. कोपऱ्यातील टेबलाभोवती बसलो. चहाची ऑर्डर दिली. हे माझे मित्र. आपला एरिया दाखवायचा.’’

‘‘पहला टाइम इधर आया क्या?’’

‘‘मणिभाई! सिर्फ देखना है!’’

‘‘अरे भाई, इधर कोई देखने कू आता नाहीं!’’

‘‘हे स्टोरी रायटर आहेत. पुस्तक लिहिणार आहेत.’’

‘‘अच्छा! फिल्म की इस्टोरी.’’मणिभाई उद्‌गारले.

चहा पीत म्हणाले, ‘‘मेरे धंदे का टाईम है!’’

‘‘एक दिन की कितनी कमाई होती होगी?’’

‘‘यही, चार पाचसो : कभी कभी डबल भी.’’

‘‘हम दे देंगे! उसके साथ बिअर की दो बोतल!’’हे ऐकून मणिभाईची कळी खुलली.

‘‘कितना दिन का प्रोग्राम है?’’

‘‘आज उद्या रेड लाइट एरिया दाखवा. त्यानंतर तुमचे अनुभव. नंतर आम्ही क्लबवर जाणार.’’

मणिभाईने नाष्टा मागवला. ‘‘खा लो. दिनभर चलना है!’’ते म्हणाले.

निघताना त्यांच्या हाती पाचशेची नोट दिली. निघालो. आबाला बाजूच्या क्लबमध्ये पैशासह खेळायला सोडलं. दुपारची वेळ. सगळीकडे सामसूम. गंगायमुना इमारतीचा जिना चढू लागलो. अवेळी आलेलं गिऱ्हाईक समजून दारं किलकिली होऊ लागली. सगळे मणिभाईला ओळखणारे. तिसरा मजला चढू लागलो. ते पुढे. त्यांच्या मागं अख्तर. शेवटी मी. शर्ट मागून ओढला गेला. मागं वळून बघतो, तर ती मुलगी खुणावत होती. अख्तरने मला मध्ये घेतलं. एका खोलीत बैठकीत बसलो. मालकिणीने आवाज दिला. दोघी तिघी समोर आल्या.

अख्तरने विचारले, ‘‘कितने?’’ मणिभाईकडे बघत ती म्हणाली, ‘‘दादाको मालूम है!’’ मणिभाईने अख्तरला चार बोटं दाखवले. अख्तर म्हणाले, ‘‘चारशे द्या. ह्या पोरी चारचौघात बोलणार नाहीत. खोलीत विचारा काय ते?’’ अख्तरमागून चालू लागलो. खोलीपुढं थांबून त्याने त्या पोरीला हळू आवाजात सांगितलं. ‘‘बैठना नहीं! खाली बाते करता!’’ ती हसली. एक पलंग मावेल एवढ्या खोलीत ती पलंगावर पडली.

 ‘‘मला तुझ्याबद्दल सांग. या धंद्यात कशी आली? कोठून आली. नाव काय? मला फक्त तुझ्याशी बोलायचं.’’ ती हसायला लागली.

‘‘सब ऐसे ही नाटक करते हैं! काम छोडकर फालतू बाते करना...’’ ती छताकडे बघत होती. ‘‘मुझे कुछ करना नही! तेरी स्टोरी सुनना है!’’

‘‘अरे साब! मेरी स्टोरी सुनकर फिल्म बनानी है क्या? इस लाइन में सच कुछ नहीं है! नाम, गाव सब झूट है। यहाँ सिर्फ बैठना सच है! यहा आनेवाले ठोकते हैं और गुपचूप निकल जाते है!’’ ती पुन्हा गप्प झाली. डोळे बंद करून पडली. काय विचारावं? लेखकाचा फुगा तिनं फोडला होता आणि तिने डोळे उघडले. आळस देत उठून बसली. शेजारच्या खोलीचं दार उघडल्याचा आवाज ऐकून ती म्हणाली, ‘‘चलो! टाइम खतम हुवा!’’ बाजूच्या खोलीतून बाहेर येत अख्तर भाईनं विचारलं, ‘‘कामाचं बोलणं झालं का?’’ हो म्हणून बाहेर आलो.

मणिभाई सोबत तीन तास फिरत होतो. मनावर दडपण वाढत गेलं. निघताना मणिभाईचा मोबाइल नंबर घेऊन ग्रंथसंग्रहालयात परतलो.  ‘‘इथं रात्री थांबण्यापेक्षा क्लबवर जाऊ. तिथं सगळी सोय आहे. क्लब चोवीस तास सुरू असतो.’’ अख्तरभाई म्हणाले. आबानं अगोदर कल्पना दिली होतीच. तिथं चहा, पाणी, जेवण आणि झोपण्यासाठीसुद्धा सोय असते. टॅक्सीने बांद्रा मागं टाकलं. एका चौकात उतरलो. समोर एका कॉलेजची टोलेजंग इमारत. आजूबाजूला उंचउंच इमारती. कोपऱ्यावरच्या इमारतीच्या मागच्या बाजूनं जिन्याचा दरवाजा बंद. समोर बंदूकधारी सुरक्षा रक्षक. अख्तरभाईनं एक नाव घेतलं. सुरक्षा रक्षकानं वर फोन केला. जिन्यावरून एकजण खाली आला.

‘‘बहुत दिनों के बाद आना हुवा’’ म्हणत दार उघडलं. आम्ही आत येताच पुन्हा बंद झालं. दोन ठिकाणी असे सुरक्षा रक्षक. दुसऱ्या मजल्यावर मोठा हॉल. टेबलाभोवती माणसं पत्ते खेळत होती. बाजूला काऊंटर. अख्तरभाईनं दोन टोकन घेतले. त्यांच्यासाठी व आबासाठी. बाजूला चहा, कॉफी घेऊन फिरणारी मुलं. टेबलाभोवती खेळणारांत पुरुष आणि काही स्त्रियाही होत्या.

‘‘तुम्ही बसा इथं. मी आणि आबा खेळतो. आपलं बजेट किती आहे? हा गेम आहे लकचा. किती येतील सांगता येत नाही; पण जायचं आपण ठरवू शकतो.’’ अख्तरने विचारले. मी खिशातून दोन बंडल त्यांच्या हाती दिले. त्याने एक आबाकडे दिले. दोन टेबलवर दोघं बसले. खेळ सुरू झाला. कुतूहल म्हणून बघत होतो; पण मनानं त्यात गुंतवणूक नव्हती. तासाभरात दोघेही त्यात तल्लीन झाले. इकडे तिकडे बघत होतो. हॉलमध्ये सिगारेटच्या धुराचे लोट तरंगत होते. आणि सगळ्यांची जणू खेळण्यात समाधी अवस्था जाणवू लागली. तीनेक तासांनी मला कंटाळा जाणवू लागला. बाजूला बैठ्या पलंगावर दोघं-तिघं आडवे होऊन आढ्याकडे बघत होते. त्यांच्या शेजारी आडवं झालो.

दिवसभराच्या थकव्यानं डोळा लागला. सकाळी जाग झाली. बघतो तर सात वाजलेले. उठून हॉलमध्ये आलो. अख्तरभाई बाजूला बसलेले आणि आबाचा डाव सुरू होता. मला बघून अख्तरभाई म्हणाले, ‘‘बघितली कशी गधडी नशा आहे खेळाची! एकदा बसलो की कधी कधी दोन दोन दिवस उठणं होत नाही.’’ अकरा वाजता आबा उठला. टॅक्सी करून मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय गाठलं.

 0 0

मणिभाई पायऱ्यावर वाट पाहत बसलेले. अख्तरभाई म्हणाले, ‘‘तुम्ही चला वर. मी मणिभाईसाठी दवापाणी आणतो.’’ ते दोन बिअरच्या बाटल्या घेऊन आले. मणिभार्इंची दिवसभराची मजुरी हातावर ठेवली. बिअरचा घोट घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. ‘‘आपलं बोलणं टेप केलं तर चालेल काय?’’मी विचारताच ते म्हणाले, ‘‘बेलाशक! जो करना है वो करो.’’

‘‘या धंद्यात कसे आलात, गेल्या वर्षांत कसकसे बदल होत गेले. सविस्तर सांगा.’’

बिअरचा ग्लास संपवून मणिभाई बोलू लागले. पन्नास वर्षापूर्वीचं त्यांचं बालपण, शाळा कॉलेजातील दिवस, कुटुंबाची पार्श्वभूमी, या धंद्यांचा संबंध, मणिभाईचा अद्‌भुत जीवनपट समोर येऊ लागला. मणिभाईच्या भन्नाट जगण्याची तुलना मन आबाशी करू लागलं. चार तास मणिभाई न थांबता सांगत होते. वेश्या व्यवसायातील विविध स्तर, यातील सच्चेपणा, आणि आजची जीवघेणी स्पर्धा! मणिभाईचे सगळे अनुभव कथन हे वेगळ्या पुस्तकांची सामग्री आणखी वेगळ्या पुस्तकाचा ऐवज वाटू लागला. निघताना अख्तर- मणिभाईला म्हणालो, ‘‘रेडलाइट एरियातील मुली कोठीवर मालकिणीसमोर बोलायला तयार नसतात. तुमच्या ओळखीच्या बाहेर येतील का?’’

‘‘यहाँ लेके आऊ?’’ मणिभाईनं विचारलं, ‘‘खर्चा ज्यादा पडेगा.’’

ते पुढं म्हणाले, ‘‘वो एरिया मे लॉज पे बुलाएंगे! वहा बाते करेंगे. मेरी विश्वास की घरवाली है! उससे बात कर के इंतजाम करेंगे!’’

उद्या रेडलाइट एरियातील नेहमीच्या हॉटेलमध्ये बारा वाजता भेटायचं ठरलं.

 0 0

हॉटेलमध्ये पोहोचलो पण मणिभाईचा पत्ता नव्हता. फोनही लागेना. दोन तास बसून होतो. एकदाचे ते आले. ‘‘जो हुशार लडकी है बोलने वाली, कल गाव गयी. घरवालीने दुसरी को तयार किया! दो बजे आयेगी! तब तक लॉज का देखेंगे!’’ दोन तीन ठिकाणी मणिभार्इंसोबत फिरलो. खोली खाली नव्हती. शेवटी टॅक्सीनं एका ठिकाणी आलो.

खोली होती; पण मालकाने विचारले, ‘‘बॅग कहा है! बॅग नहीं रही तो पुलिस सताते है!’’ मणिभाईनं त्याला हळू काही तरी सांगितलं. त्याने खोली उघडून दिली. पैसे भरले.

‘‘तुम्ही थांबा येथे. मी तिला टॅक्सीनं घेऊन येतो.’’ मणिभाई म्हणाले व अख्तरला घेऊन बाहेर पडले. मी खोलीत बसून. हॉटेलचा पोऱ्या विचारून गेला, ‘‘कुछ मंगता क्या?’’ दोन तासांची वाट पाहणं ही एकांतपणाची कसोटीच होती. शेवटी अख्तर एकटेच परत आले. ‘‘घरवालीला काही संशय आलाय दिसतो. ऐनवेळेस ती नाही म्हणाली. जाऊ द्या. ठाण्याला माझ्या ओळखीची अन्‌ खात्रीची एक आहे. तिला भेटू सकाळी.’’ ते म्हणाले आणि लॉजमधून बाहेर पडलो.

सायंकाळी दादर भागातील एका क्लबवर दोघांना सोडून ग्रंथ संग्रहालयात परतलो.

0 0

आणखी दोन दिवस मुंबईला मुक्काम वाढला. मणिभाईसोबत कामाठीपुरा भागात भटकंती झाली. त्यांना सगळे ओळखणारे. या व्यवसायातील बुजुर्ग म्हणून मानणारे. घरवाली चहा पाजी; पण सोबतचं गिऱ्हाईक बिनकामाचं आहे हे लक्षात आलं की त्यांचा उत्साह कमी होई. फुकटची चौकशी करणाऱ्यांत कोणालाच रुची नसायची. एक दोघी पोरी बोलल्याही; पण ते खूप नाटकी, फिल्मी वळणाची रचलेली कथा वाटू लागलं. यांच्यापुढे मणिभाईची कहाणी  मात्र भन्नाट वाटायची.

आबाची गोष्ट खानदेशातील गिरणा परिसरात घडणारी; तर मणिभार्इंचं मुंबईचं मायावी अफाट क्षेत्र. आबाचा दोहीकडं वावर असला तरी कथानकाच्या दृष्टीनं ही दोन टोकं वाटत होती. परत आलो. मणिभाईला निघताना म्हणालो, ‘‘पुन्हा येतो.’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘अरे साब, यह तो छोटी झलक बतलायी. और बहुत बाकी है। फुरसतसे आव. बडी इस्टोरी हो जायगी.’’

आबाच्या सगळ्या कॅसेट ऐकू लागलो. टिपणं काढू लागलो. एक चक्कर पुन्हा गिरणाकाठी अन्‌ मायेजीला झाली. दीडशे वर्षांपासून मायेजीला चैत्रात यात्रा भरते. गिरणाकाठी देवीचं मंदिर आहे. आठवडाभर यात्रा असते. तमाशे असतात. अलीकडे सिनेाच्या टूरिंग टॉकीज सुरू झाल्यात. खानदेश गॉजिस्टरमध्ये या यात्रेचा संदर्भ आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या यात्रेच्या टॅक्सचे आकडे दिले आहेत. यावरून लोकप्रियता अन्‌ गर्दीची कल्पना करता येते. एवढंच नाही तर मुंबई-कलकत्ता-आग्रा रेल्वे लाइनवरचं हे स्टेशन. गुजरात- मध्यप्रदेश अन्‌ महाराष्ट्रातून दूरदूरचे शौकीन मायेजीला खेळायला आणि मजा करायला येत. यातून जुगार अन्‌ वेश्या व्यवसायाची भरभराट झाली.

अख्तरने एक घर दाखविलं. तीनमजली माडी. तळघरात वीस पंचीस कार पार्किंग करता येतील एवढ्या सोयी. प्रत्येक मजल्यावर हॉल. ह्या शिवाय स्वतंत्र खोल्या. मायेजी म्हटलं की खानदेशात भुवया ताणल्या जात. मायेजीची अशी ख्याती बघून बाहेर गावाची मंडळी इथं सोयरेसंबंध करायला नाराज असत. ह्यातूनच गावच्या तरुण पोरांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी बाहेरून येणाऱ्या गिऱ्हाईकांना मारझोड सुरू केली. गाडीच्या चाकांची हवा सोडणं, दम देणं सुरू झालं. राज्यकर्ते अन्‌ पोलिसांच्या आश्रयानं चालणारा हा व्यवसाय लोकक्षोभानं बंद झाला. रात्र झाली की दिवाळीसारख्या चकणाऱ्या दोन-तीन गल्ल्या ओस पडल्या होत्या.

आबा, त्याचा परिसर एवढ्यावर लक्ष केंद्रित करून लिहायचं ठरविलं. जुगारासंबंधी आणि वेश्या व्यवसायासंबंधीचं साहित्य मिळवून वाचणं सुरूच होतं. आणि पहिला खर्डा लिहायला सुरुवात करायचं ठरवलं. सकाळी लवकर उठून लिहायची माझी सवय. त्या दिवशी उठलो. आटोपून टेबलावर सुरुवात केली. दोन पानं लिहून झाली. सूर्योदयाची वेळ. बाहेर कोणी तरी आलं होतं. दार उघडलं. पोलिसांचा फौज फाटा. इन्स्पेक्टर म्हणाले, ‘‘चौकशीसाठी आलो.’’

मी खाली आलो. कार्यालय उघडलं. त्यांना काही कागदपत्रं हवी होती. मी मॅनेजरला बोलावून घेतलं. हवे ते कागद दिले. ‘‘आपण पोलीस चौकीपर्यंत चला.’’ निघताना ते म्हणाले. चौकीत कळलं, बुलडाण्याला नेत आहेत. तिथं पुन्हा चौकशी. रात्री उशीरा सांगितलं, ‘‘तुम्हाला अटक करतोय. उद्या जामीन मिळेल.’’

ते निवडणुकीचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांची सभा. दोन तीन दिवस जामीन झालाच नाही. दुसऱ्या दिवशी जिल्हा जेलमध्ये ठेवलं. मी स्वत:ला समजावलं, ‘‘जेलमध्ये अपघाताने येण्याची संधी मिळाली. पुन्हा चान्स नाही. बघून घ्यावं. इतर कैद्यांशी बोलावं.’’

तीन चार दिवसांत जे बघितलं, ऐकलं त्यामुळे अनेक वर्षं सुप्तावस्थेत असलेल्या तंट्या भिल्लाची आठवण डोकं वर काढू लागली. बुलडाण्यावरून परत आलो.

माझं मन मला सांगत होतं, ‘‘ज्या कारणाने इथं आणलं, तो गुन्हा असेल तर शिक्षा होईल. ती स्वीकारली पाहिजे. नसेल तर काही होणार नाही.’’आणि मी आबाचा विषय बाजूला सारून तंट्या भिल्लावर लिहायचं ठरवलं. चार वर्षं पुन्हा या कामात गेली. नर्मदा तापीच्या खोऱ्यात आणि विंध्य सातपुड्यातील तंट्याचा वावर असलेल्या पाचशे कि.मी. भागात फिरणं झालं. तंट्या कादंबरी, तंट्याचं चरित्र, एक किशोर कादंबरी, मूळ कागदपत्रांचा आणि तंट्याचा शोध कसा घेतला, अशी तंट्यासंबंधी सहा पुस्तके लिहून झाली. आणि पुन्हा जुगार कादंबरी मागं पडली.

मित्र विचारायचे, कुठंपर्यंत आलंय कादंबरी लेखन. मग पुन्हा त्यामागं लागलो. दीडशे पानं लिहून झाली. काही मित्रांना दाखविली. त्यात श्री.भा.ल.भोळे होते. ते म्हणाले, ‘‘ज्या खानदेशाच्या पार्श्वभूमीवर कादंबरी आहे, त्यात जुगार वेश्यांचं ठीक आहे; पण या भूभागाचा सांस्कृतिक वारसाही आहे. त्याबद्दलही विचार कर.’’

पुन्हा पहिल्यापासून पुनर्लेखन केलं. अर्धा भाग लिहून झाला. नाशिकला डॉ.रमेश वरखेडे आणि प्रा.एकनाथ पगारांसोबत वाचन केलं. त्यांची मतं ऐकली. आणि काही दिवसांनंतर आमच्या पुतण्यानं- कृष्णानं- ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा दिनी स्वत: चिता रचून जाळून घेतलं. चितेशेजारी 501 अभंगाच्या वह्या सापडल्या. त्यात शेवटच्या तीसेक अभंगांत त्यानं लिहिलं होतं, ‘‘मी अग्निसमाधी घेऊन आनंदाने चाललो आहे.’’

आबा आणि जुगार बाजूला पडला. मी कृष्णाचे अभंग वाचू लागलो. यातून ‘योगी’ हे पुस्तक आलं, त्याचं चरित्र आलं. 501 अभंगांचंही प्रकाशन झालं. जुगारातून आता मानसिकरीत्या मोकळं व्हायचं ठरविलं. लिहून झालं तेवढंच छापावं असा निर्णय घेतला. एक दोन पानांचा उपसंहार लिहिला. कदाचित पुढे मागे ऊर्वरित भाग उत्तरार्ध म्हणून येईलही. लेखनाच्या ऊर्मीबद्दल काही ठोस सांगता येत नाही; पण जुगार कादंबरी लेखनाच्या निमित्तानं झालेली भटकंती, अनुभव, अन्‌ वाचनात काही वर्षं रमलो होतो. खूप ऐवज जमला आहे. खूप लिहायचं बाकी आहे पण कधी जमेल माहीत नाही.

Tags: तंट्या योगी जुगार बाबा भांड संशोधन लेखनासाठी प्रवास कादंबरी tantyaलेखन प्रक्रिया yogi jugar baba bhand travel for writing novel writer writing process weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके