डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वेणूबाईनं पिशवी पुन्हा कमरेला खोचली. माझ्याकडं बघून म्हणाली, ‘मालक लई शिकून मोठं व्हा. ह्या गरीब मांगीनीचा एवढाच आशीरवाद.’ वेणूबार्इंनी दोन्ही हातांची बोटं स्वत:च्या कानाजवळ नेऊन मोडली. ‘येते माय,’ म्हणून वेणूबाई उठली आणि गावातल्या दुकानाकडं तुरूतुरू चालू लागली. पाठमोऱ्या वेणूबाईकडे बघताना आईचे डोळे भरून आले. आजींच्याचेहऱ्यावरची काळजी पळून गेली.

शंभरेक घरांचं गाव होतं. सगळी मातीची छोटी घरं. गावाच्या ईशान्य कोपऱ्यातलं शेवटचं घर. घरामागं गावाची पांदण. सकाळी उजाडण्यापूर्वी बायका पांदीला जाऊन यायच्या.  फटफटलं की माणसांची वर्दळ सुरू होई. यावेळी उघड्यावर सकाळच्या विधीला बसणं अडचणीचं होई. मधेच एखादी बैलगाडी शेताकडं चालली की उठून उभं राहावं लागे. गावाच्या पूर्वेला ओढा होता. वर्षातले आठ-नऊ महिने ओढ्याला पाणी वाहायचं. त्यामुळं सकाळी माणसं ओढ्याकाठी बसायची. वाहत्या पाण्यात तोंड धुवायची. बायका धुणं धुण्यासाठी जायच्या.

जूनचा पहिला आठवडा सुरू झाला. या वर्षी पाऊस लवकर सुरू झाला. गावाचे काळया मातीचे रस्ते रीडबीड झाले.

गावाच्या शेवटच्या कोपऱ्यातल्या घरासमोर, तीन दिवसांपासून गाडी उभी होती. गाडीच्या साट्यात लाकडे फोडून भरलेली. साट्याच्या दोन्ही बाजूंना सणकाड्याच्या चार पेंढ्या ठेवल्या होत्या. गाडीतलं सरपण आणि सणकाड्या पावसानं भिजत होत्या. घराबाजूच्या सपरात बांधलेले बैल गळ्यातील घुंगुरमाळ वाजवीत आम्हाला बाहेर सोडा असे सांगत जणू उभे होते.

वडील घरात चिंतातूर बसून होते. आजीनं सगळं सामान दोन कापडी पिशव्यात बांधून तयार ठेवलं होतं. चाळीस किलोमीटर अंतरावरील गावी शाळेत जायचं होतं. आठ दिवसांपासून आई-आजीनं तयारी सुरू केली होती. ज्वारी निवडून, दाळी पीठ दळून आणलं, तिखट कुटून ठेवलं. मसाला भाजून, वाटून डब्यात भरला. हळदी पिशवीत बांधली. जिरे-मोहऱ्याची पुरचुंडी आठवणीनं बांधली. उन्हाळ्यात ब्लँकेट धुऊन ठेवलं होतं. शाळेत जाण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी आई आणि आजीची लगीनघाई धावपळ सुरू होती.

वडील घरात शांत होते. सकाळी उठून शेतावर जात. काम सुरू होते. सोमवारी शाळा सुरू होणार, त्याच्या अगोदर चार-पाच दिवसांनी वडिलांनी झाडवणास बोलविलं. सपरातील लाकडाचे ओंडके अंगणात टाकले. त्याच्या हाती कुऱ्हाड दिली. दोन दिवस विश्वनाथ लाकडं फोडत होता. बाजूला ओट्यावर बसून लाकडं फोडणाऱ्या विश्वनाथकडं मी बघत होतो. वय झालेलं, परंतू काटक विश्वनाथ घामाघूम झाला होता. लाकडं फोडणं संपल्यानंतर तो ओट्याच्या बाजूला समाधानानं बसला. रापलेल्या चेहऱ्यावरचा आनंद तो लपवू शकत नव्हता. ‘छोटे मालक, ढिलप्या बारीक केल्या या वर्षी. ढोकर राहिल्या की चुलीम्होरं धुपधुप करावं लागतं, असं मंडाबाय म्हणत व्हत्या.’ कपाळावरचा घाम उलट्या पंज्यानं पुसून त्यानं पुन्हा विचारलं. ‘कधी हाय शाळा सुरू?’ माझ्याकडून उत्तर कळताच, त्यानं दीर्घ उसासा टाकला. ‘माजं काम आटोपलं दोन दिस अगुदर.’ कुऱ्हाड आजीकडं देऊन झाडवण विश्वनाथ घराकडं चालू लागला.

जड पावलानं आई घराकडं परत येत होती. आजी चुलीजवळ बसलेली. काम झालं की नाही याचा विचार करीत वडील बैठकीत उकिडवे बसलेले. वडील बसले की, दोन बोटांनी दाढीचे खुंट उपटायचे. उपटलेला केस नाकाच्या शेंड्याला लावून टाकून द्यायचे. जास्त विचार करू लागले की, या कामाला गती यायची. आज बुधवार. शाळा सुरू होऊन तिसरा दिवस सुरू झाला. गाडीत सरपण भरून तयार होतं. परंतु घरात माझ्याबरोबर वीस-पंचवीस रुपयेही वरखर्चासाठी देण्यास नसल्याने उसणे पैसे बघणं सुरू होतं.

आई अंगणात आली. रांजणातून तांब्याभर पाणी पायावर ओतलं आणि हात चेहऱ्यावर फिरवून चुलीबाजूला बसली. तिच्या चेहऱ्यावर घरातला ताण स्पष्ट दिसत होता. आई काही सांगेल

या आशेनं आजी-वडील आईकडं बघत होते.

‘जमलं का कुठं पैशाचं?’वडलांनी तुटकपणे आईला विचारलं. पदरानं चेहऱ्यावरचा ओलेपणा पुसत आई बेफिकीरपणे म्हणाली, ‘व्हईल सकाळ पोस्तोर.’ म्हणजे काम झालं नव्हतं. वडील सुस्कारा टाकत उठले. सपरातील बैल सोडले. दिवसभर बैलांना एका ठिकाणी बांधून ठेवल्याने, तेही अवघडल्यासारखे झाले होते. ‘मी येतो बैलाला फिरवून’, घराबाहेर पडताना वडील म्हणाले आणि चिखल तुडवीत बैलामागून चालू लागले. मोकळ्या हवेत घरातला कोंडमारा कमी झाला.

शनिवारपासून आई पैशाचं बघत होती. शाळेत जाताना दिवाळीपर्यंत किरकोळ खर्चासाठी तीस-पस्तीस रुपये लागायचे. दरवर्षी आई अगोदरच पैसे जमवून ठेवायची. ऐनवेळेस खोळंबा नको म्हणून तयारी राहायची.  या वर्षी एकजण उसणे पैसे देतो म्हणाला; परंतु तिकडून पैसे मिळाले नाहीत आणि चार दिवस आई उसणे मिळावेत म्हणून सकाळ-संध्याकाळ गावात फिरत होती. आज मिळतील, उद्या मिळतील असे वायदे मिळत होते आणि पैसे मिळाले नसल्यानं शाळेत जाणं लांबत चाललं होतं.

आईनं धीर सोडला नाही. अडचण असूनही तिच्या चेहऱ्यावरचा तो ताण लपवीत होती. उलट वडील, आजोबा आणि आजींना मात्र काळजी वाटू लागली. पिठानं माखलेले हात धुऊन आजी हळू आवाजात सुनेला म्हणाली, ‘मंडण, मी बळवंताकडं जाऊन येऊ का. असंल तर देईन काही’. ‘तुम्ही येड्या झाल्या का! पाहुण्या-रावळ्यापुढं कशाला हात पसरायचा? आपली नड आपुनच भागवायची.’ आईच्या वरच्या पट्टीतल्या आवाजानं आजी चरकली. आजीचा भाऊ बळवंतराव, गावातच होता. परिस्थिती फारशी चांगली नव्हती; परंतु भावाचा आधार वाटून आजी बोलून गेल्या. सुनेनं नाही म्हणताच त्यांनी पुढं आणखी काही विचारलं नाही.

आई अंगणात बसलेली. तिन्हीसांजा टळून गेल्या. दाराशी सरपणानं भरलेली गाडी. तुरुतुरु चालत येणारी वेणूबाई मांगीणदारापुढं उभी राहिली. एक हात गाडीच्या साट्याला आधारासाठी धरलेला. आश्चर्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘मंडाबाय, दोन दीस गाडी उभी दिसतीया. छोटे मालक नाय गेले अजून साळंला?’ वेणूबाईनं आईला विचारलं. उत्तर देण्याचं टाळत आई म्हणाली, ‘काय म्हणता आतपई, दोन दिवस तुम्ही दिसल्याच नायी.’

‘मी गेले फडे घेऊन आडूळला. आताच आले.’

‘तयारी झालीया. सरपण-दळणदुळण-मीठ मसाला तयार करून ठिवला. थोडं काम नडल्यानं...’ आईचं अर्धवट बोलणं अडवीत वेणूबाईनं मधेच विचारलं. ‘अवो काय नडलं?’

‘पैशाचं जुळलं नायी...’ आई हळू आवाजात म्हणाली.

वेणूबाई गाडीजवळून अंगणात आली. आईसमोर दोन्ही पायांवर बसली. कमरेची पिशवी काढली. पाचच्या सहा हिरव्या नोटा आईच्या हातावर ठेवल्या.

‘गाडी जुपा बरं! पोराची साळा बुडलिया तीन दीस.’ वेणूबाईनं पिशवी पुन्हा कमरेला खोचली. माझ्याकडं बघूनम्हणाली, ‘मालक लई शिकून मोठं व्हा. ह्या गरीब मांगीनीचा एवढाच आशीरवाद.’ वेणूबार्इंनी दोन्ही हातांची बोटं स्वत:च्याकानाजवळ नेऊन मोडली. ‘मेते माय,’ म्हणून वेणूबाई उठली आणि गावातल्या दुकानाकडं तुरूतुरू चालू लागली.

पाठमोऱ्या वेणूबाईकडे बघताना आईचे डोळे भरून आले. आजींच्या चेहऱ्यावरची काळजी पळून गेली. आईच्या चेहऱ्यावर पूर्वीचा उत्साह दिसू लागला. वडील उशिरा बैल घेऊन परत आले. ‘काम झालं. वेणूआई पावली. पहाटंच्याला गाडी जुपा. दिवस कलेपर्यंत पिप्रीला पोहचता येईल.’ माझ्याकडं वळून आई म्हणाली, ‘जेऊन झोपा लवकर. सकाळी लवकर उठायचं.’

पहाटे आईनं लवकर उठविलं. गरम पाण्यानं आंघोळ केली. वडलांसोबत शाळेच्या गावाकडं बैलगाडी चालू लागली. दुपारी बेंबळा नदीकाठी गाडी थांबली. बैलांना कडब्याच्या दोन पेंढ्या सोडल्या. नदीच्या वाहत्या पाण्यात हातपाय धुऊन बारीक उबदार वाळूवर जेवायला बसलो. दुपारपर्यंतच्या प्रवासात वडील फारसं बोलले नाहीत. तहान लागली काय? लघवी आली तर सांग! असं तुटकतुटक बोलले. जेवणानंतर बैलांना पाणी पाजले. पुन्हा गाडी सुरू झाली. दिवस कलताना शाळेच्या गावी पोहोचलो. सरपण, सामान मठातल्या खोलीत लावलं. न थांबता वडील गाडी घेऊन परत गेले.

0

दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाली अन्‌ दिवाळीच्या सुटीनंतर वडील गाडी घेऊन यायचे. परत जाताना मात्र शेजारच्या चित्तेपिंपळगावपर्यंत चालत जायचो. तिथून बसने पाचोडला यायचो. पाचोडपासून गावापर्यंत पुन्हा पायी.

असे वर्षांमागून वर्षं जात होते. सुटीत गावी आलो की, अंगणात पुस्तक घेऊन बसायचो. पुस्तक वाचण्यापेक्षा पुस्तक वाचण्याचं नाटकच जास्त असायचं. गावातली माणसं जाता येता चौकशी करायची. कधी आला म्हणून आपुलकीनं विचारायचे. त्यावेळी हातातलं पुस्तक बघून त्यांना आणखी कौतुक वाटायचं. ‘पोरगं सुटीला आलं, पर अभ्यास बगा कसं मन लावून करतंय! ’आजोबा रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्यांना अभिमानानं सांगायचे. आजोबा एवढ्यावरच थांबायचे नाहीत. ‘नाय तर गावातले पोट्टेबगा! निस्ते हुंदडत राहते. नाय तर इटीदांडू...’ या शेरेबाजीवर काहीजण कौतुक करायचे तर एखाद-दुसरा मागं नाक मुरडायचा.

घराला लागून... मागच्या बाजूला मांगवाडा होता. दहा-पाचच घरं होती. तिसऱ्या झोपडीत वेणूबाई राहत होती. दोन मुलं आणि सवत एकत्र होते. वेणूबाईला मूलबाळ नव्हतं. सवतीची मुलं हीच तिची मुलं. मी शाळेवरून आल्याची खबर मिळाली की, वेणूबाई लगबगीनं यायची. अंगणात ऐसपैस बसून विचारायची, ‘कधी आलात मालक? आवो बया, किती वाळून गेलाय तुमी. शाळंत काही खाता की नाय?’ बाजूला आजी असली की म्हणायची, ‘रात रात अभ्यास करावा लागतो म्हणून आमच्या बापूचा पयला नंबर येतो वरगात.’ हे ऐकून वेणूबाईच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागायचा. ‘नाव काढलं बाई घराण्याचं’ म्हणून लगबगीनं पुन्हा निघून जायची.

मध्यंतरी वडील गेले.  शाळा सुरूच होती. बालवीर मेळाव्याच्या निमित्तानं भारतभर फिरणं सुरू होतं. शाळेत मार्कही बरे पडत आणि त्यात जागतिक मेळाव्यासाठी कॅनडा, अमेरिकेला निवड झाली. प्रवासापूर्वी गावी आईला भेटायला आलो. आई-आजोबा-आजींना परदेश वगैरे काही समजत नव्हता. ‘पोरगा इमानात बसून समुद्रापलीकडं जातंय.’ एवढंच आजोबा भेटेल त्याला सांगत होते. निघताना घरासमोर सगळा गाव जमा झाला. आई, आजी, आजोबा गप्प झालेले. त्यांना बोलताही येत नव्हतं. मधेच आजीनं रडायला सुरुवात केली. आजोबा भिंतीच्या कडेला टेकून गुडघ्यात डोकं घालून बसले. आईनं घट्ट मनानं स्वत:ला आवरलं. ‘आतपयी, हे काय चाललं? पोरगा चांगल्या कामाला ईमानातून चाललं, असं रडणं बरं नाय.’ आईच्या आवाजानं आजीनं डोळे पुसले. गर्दीतून वेणूबाई पुढं आली. कमरेची दोन रुपयाची नोट हाताच्या मुठीत दाबत म्हणाली, ‘मालक तिकडं देव असला तर एक रुपयाचा परसाद वाहा. एक रुपया तुम्हाला खर्चीसाठी.’ मी वेणूबाईच्या पाया पडलो. गाडी दूर जाईपर्यंत गावातले सगळे जागीच उभे होते. दूरवरून गर्दीत वेणूबाई आईला काहीतरी समजावून सांगत असल्याचं धूसर धूसर दिसत होतं.

0

दरवर्षी गावी आलो की वेणूबाईची भेट व्हायची. ती हमखास भेटायला यायची. माझं चांगलं झालं म्हणून आभाळाकडं बघून हात जोडायची.

‘मालक, आकाशातल्या देवालाच काळजी सगळ्याची. आज बाप असता तर किती आनंद झाला असता. रांडमुंड आईनं किती सोसलं. तर लई चांगलं झालं आता. ह्या मांगणीचा एवढाच आशीरवाद.’ वेणूबाईचं एवढंच कमी जास्त बोलणं. डोळे भरून बघणं आणि पुन्हा तुरुतुरु निघून जाणं. आभाळाएवढं हृदय असलेल्या गरीब वेणूबाईनं कधीही एक पैसा मागितला नाही. स्वत:च्या गरिबीची कुरकूर केली नाही. सवतीच्या जाचाचा अपशब्दही काढला नाही. ती प्रत्येक भेटीत पहिल्यासारखीच आनंदी दिसायची आणि तोंड भरून फक्त दुवा द्यायची.

0

काही वर्षांनी उन्हाळ्यात गावी आलो होतो. बरोबर बायको, मुलगा आणि मुलगी होती. बायकोची ही वेणूबाईशी ओळख झाली होती. आम्ही आलो हे कळलं की वेणूबाई हमखास भेटायला यायची. आज वेणूबाई आली नाही. लहानभावाला वेणूबाईबद्दल विचारलं.

‘तिची दोन पोरं गेलीत पोट भरायला. एकजण इथंच आहे. पण तोही लक्ष देत नाही.’ भावानं माहिती दिली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सवत आणि तिच्या मुलांना सांभाळणाऱ्या वेणूबाईवर ही वेळ यावी, हे बघून राहवलं नाही. वेणूबाईच्या झोपडीजवळ आलो. झोपडीसमोरच्या सपरात फाटक्या गोधडीवर वेणूबाई पडलेली. अंगात ताप होता. डोक्याचे पांढरे केस अस्ताव्यस्त झालेले.

‘वेणूबाई, बरं नाही का?’ माझ्या आवाजानं त्या अंथरुणावर ताडकन्‌ उठून बसल्या. सुरकुत्या पडलेल्या वेणूबाईच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ‘मालक, तुमी स्वत: मांगीनीला बगायला आलात! अरेऽ रे देवा, मी नसती आली का तुमच्याकडं. आज बरं नव्हतं म्हणून पडले व्हते.’ वेणूबाईनं स्वत:चं दुखणं विसरून विचारलं,‘बाई आल्यात काय मालक? पोरंसोरं कशी हाईत?’

आजारपण आणि खाण्यापिण्याचे हाल झाल्याने वेणूबाईची तब्येत खूप खराब झाली होती; परंतु पूर्वीचा उत्साह आणि चेहऱ्यावरचं नेहमीचं हसू कायम होतं.

वेणूबाईचा निरोप घेऊन घरी परतलो. डोळ्यांसमोर झोपडीसमोरच्या सपरात गोधडीवर खंगलेली वेणूबाई दिसू लागली. साऱ्या गावाच्या अडीअडचणीला धावून येणारी वेणूबाई, आज आजारपण आणि खाण्यापिण्याचे हाल झाल्याने अंथरुणाला खिळून पडली होती. पंचवीस वर्षांपासून मोलमजुरी करून आनंदात राहणाऱ्या वेणूबाईवर, म्हातारपणात ही वेळ आली होती. मुलं कामाधंद्याच्या निमित्तानं पांगली होती. तिला वयामुळं आता कामही होत नव्हतं. तरीही वेणूबाई कधीही कुणाबद्दल तक्रार करीत नव्हती. कुणासमोर हात पसरत नव्हती. जमेल ते काम करायची, मिळेल ते खाऊन गावभर तुरुतुरु फिरायची.

यावेळी मात्र त्यांची तब्येत खूपच खराब दिसत होती.

0

घराच्या बैठकीत बरीच माणसं जमा झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. माझं लक्ष या गप्पात लागत नव्हतं. आतली अस्वस्थता हळूहळू वाढत होती. पंचवीस-तीस वर्षांचा कालपट झरझर डोळ्यांसमोरून पुढे सरकत होता. काही माणसं आयुष्यभर दुसऱ्यांना आहे ते देत असतात. दुसऱ्यांना देण्यातच त्यांच्या आयुष्याचं मोल असतं. त्यांना त्यातच आनंद असतो. तशी वेणूबाई होती. आयुष्यभर तिनं सगळ्यांना दुवा देण्याचं काम केलं होतं.

गरीब असून कधीही लाचारीनं कुणापुढं हात पसरला नाही. भीक तर मागितली नव्हती. जमेल तेवढं काम करणं आणि आहे त्यात आनंद मानणं, हे तिचं व्रतस्थ जगणं साऱ्या गावाला परिचित होतं.

बैठकीतली माणसं पांगली. भावानं जेवणाची ताटं वाढून आणली. जेवणही गोड लागेना. अर्धवट जेऊन उठलो. ‘काय झालं? आज जेवणही नीट घेतलं नाही.’ पत्नीने विचारलं. अस्वस्थता तिने ओळखली असावी. ‘आयुष्यभर दुसऱ्यास मदत करणाऱ्या वेणूबाईचे हाल बघून...’ माझं बोलणं अर्धवट तोडत तिने मध्येच विचारलं, ‘काय झालं?’

ऐकून पत्नीही गंभीर झाली.

‘असं कर!’ लहान भावाकडं वळत मी म्हणालो,‘वेणूबाईला मळ्यात घेऊन जा. अगोदर दवाखान्यात पाठवून औषधपाणी कर. राहील शेतावर गड्याबरोबर. दोन वेळचं जेवण आपल्याला जड होणार नाही. तिच्या खाण्यापिण्याच्या खर्चाची व्यवस्था आम्ही बघू.’ भावाला हे सांगताना मनावरचा ताण कमी झाला. आत साचून राहिलेली अस्वस्थता हळूहळू कमी झाली.

जेवणानंतर भावानं गड्याला बोलावलं. ‘खळ्यातली बैलगाडी आण. वेणूआईला मळ्यात घेऊन जा.’ भावानं सांगितलं. गडी खळ्याकडं निघून गेला.

वेणूबाई येतील का शेतावर? ती कदाचित नाही म्हणेल. माझी झोपडीच बरी म्हणेल. ती खूप स्वाभिमानी होती.

घरामागं रस्ता होता. रस्त्यात दगडगोटे होते. रस्त्यानं बैलगाडी चालली की, चाकाची धाव दगडगोट्यावर आदळायची. आवाज ऐकू यायचा. कधी बैलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवाज कानी पडायचा.

‘गाडी आली वाटतं,’ भाऊ उठत म्हणाला. त्याच्या मागून मी वेणूआईच्या झोपडीसमोर आलो.

‘वेणूबाई, उठा, विहामांडव्याला डॉक्टरांकडे जाऊन या. तिकडून तसंच शेतावर जा.’

वेणूबाईनं तोंडावरची गोधडी बाजूला केली. डाव्या बाजूला वळली. उजव्या हातानं जमिनीला रेटा देऊन उठून बसली.

‘कशाले मालक डागतराकडं? व्हईल ताप कमी. दोन दीसाचा पाव्हणा हाय तो.’

भावानं आग्रहानं तिला उठविलं. गाडीत बसविलं.

‘सुई टोचून आण. तसाच वावरात घेऊन जा.’

गाडी वेशीआड जाईपर्यंत मी बैलांच्या खुरांनी उडालेल्या धुराळ्याकडं पाहत उभा होतो.

0

वेणूबाई शेतावर राहू लागली. मोकळ्या वातावरणात तिची तब्येत बरी झाली. एका भेटीत तिला म्हणालो, ‘तुम्ही बसून खा. काम कशाला करता?’

‘मालक, ही कुडी काम करते म्हून चालू हाय. म्या हातपाय नाय हालवले तर भीतीला खंडून घ्यावं लागलं.’ त्या म्हणाल्या आणि तुरुतुरु पुन्हा ते काम करू लागल्या.

वेणूबाईसोबत आणखी दोन म्हाताऱ्या शेतावर राहू लागल्या. पोरं असून म्हातारीची आबाळ करीत होते. जेवायला धड मिळत नव्हतं. आणखी एका म्हाताऱ्याची अशीच अवस्था होती.

भावाला सांगितलं, ‘ह्यांना वेणूबाईसोबत राहू दे. दोन वेळच्या भाजी-भाकरीची व्यवस्था कर. भाकरी करायला एका म्हातारीला काम दे. आजारी-बिजारी पडले तर औषध पाण्याचं बघ. खर्चाची काळजी करू नको. वेणूआईसारख्यांची मदत आणि आशीर्वादामुळेच आपण इथंपर्यंत आलोय. त्यांची अल्पशी सेवा करण्याची संधी मिळाली आहे.  मी व्यवस्था करतो.’ आणि शेतावर माऊली वृद्धाश्रमाची सुरुवात झाली.

बाबा भांड यांनी 35 वर्षे लेखन आणि प्रकाशनाचे काम करतानाच, कुटुंबाबाहेरील आत्मीय लोकांसाठी, गावातल्यांसाठी आणि समाजासाठी काही उपक्रम कर्तव्यभावनेने केले. त्यातील काही उपक्रमाविषयीचे हे सदर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या अंकात प्रसिद्ध होईल.

Tags: प्रकाशक माऊली वृद्धाश्रमाची सुरूवात शेतातील वृद्धाश्रम वेणूबाई  शाळेसाठी मदत वेणुबाईची कथा लेखक बाबा भांड Old Age home at native helpful  lady Venubai’s story   Real life story publication Publisher Author Baba Bhand weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके