डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

(मागील वर्षभर, महिन्यातून एकदा याप्रमाणे चालू असलेले ‘अधूनमधून’ हे सदर या लेखाबरोबरच समाप्त होत आहे. यशस्वी प्रकाशक असलेल्या बाबा भांड यांनी, प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त इतर व्यवसाय/उपक्रम करताना आलेले अनुभव या सदरातून मांडले. हे अनुभवकथन वाचनीय होते, रोचक होते व मुख्य म्हणजे उद्‌बोधक होते, बाबा भांड यांना धन्यवाद. -संपादक)   

लग्न ठरलं ते बहात्तरचं दुष्काळाचं वर्ष होतं. तिसऱ्या मजल्यावरील कौलारू खोलीत राहत होतो. सोबत शाळेत शिकणारी लहान बहीण व भाऊ होता. चिंचोळ्या जिन्यानं कसरत करत वर यावं लागे. घरमालकांची आणि सासऱ्यांची ओळख निघाली. चढताना त्रास होत असूनही ते खोली बघायला आले. ती बघून ते म्हणाले, ‘‘दुसरं चांगलं घर बघा किरायानं.’’ ऐसपैस बंगल्यात राहणारी आपली मुलगी ह्या बसक्या छोट्या खोलीत कशी राहील, याची त्यांना काळजी वाटली असावी. मग लग्नाअगोदरच माझं आणि आशाचं घर बघणं सुरू झालं. घरमालक विचारायचे, ‘‘लग्न झालंय काय?’’ व्हायचंय, असं ऐकलं की ते अचंब्यानं बघायचे. शेवटी अनंत भालेरावांच्या घरामागे दोन खोल्यांचं घर घेतलं. लग्नाची तारीख ठरली. आशाच्या वडिलांना चालण्या-फिरण्याचा त्रास होई. त्यामुळे नोकरीच्या वेळाअगोदर अन्‌ नंतर बरोबरीनं लग्नापूर्वीची कामं सुरू केली. नवऱ्या मुलीला लग्न ठरलं की किती उत्साह असतो; पण स्वत:च्या लग्नाची कामं स्वत: ती कर्तव्यभावनेनं करत होती. कपडे घेणं, पत्रिका छापणं, बँड, मंडप ठरवणं-सगळं स्वत: केलं. लग्न पार पडलं.

कॉलनीतल्या घरी नोकरीहून सायंकाळी परत आलो तर बंद दाराचं कुलूप तोडलेलं. दार सताड उघडं. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पांगलेलं. गादीखाली उशाशी भालचंद्र नेमाडे यांच्या बिढार कादंबरीचं हस्तलिखित ठेवलेलं होतं. ते कागद खोलीभर विस्कटून टाकले होते. हस्तलिखिताची नक्कल करण्यासाठी मी घेऊन आलो होतो. अर्धं काम झालं होतं. लग्नामुळे त्या कामात खंड पडला होता. नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याच्या घरात पैसे-दागदागिने हाती लागतील, हा चोराचा कयास असावा. माझ्या संदुकीत काही परदेशी नाणी होती. तेवढेच चोरट्यांना सापडले. बाकी हाती काही न आल्याने रागावून कपडे, गादी, विस्कटून ते निघून गेले होते. परदेशी नाण्यांपेक्षा माझे गुरुवर्य श्री.भालचंद्र नेमाडे यांचं हस्तलिखित चोरट्यांनी नेलं नाही, हे बघून जीव भांड्यात पडला. क्षणभर मनात विचार येऊन गेला- हे हस्तलिखितच फाडलं, चोरलं असतं तर?

0

दुसऱ्या दिवशी सासऱ्यांच्या घराजवळ खोली घेतली. घरमालक होते साहेबराव बागडे. ज्या पिंप्रीला मी हायस्कूलपर्यंत शिकलो, ते त्यांचं गाव. ते सहकार बँकेत सेवक होते. त्यांच्या पत्नी नगरपालिका शाळेत शिक्षिका होत्या. आमची नोकरी 12 ते 5. सकाळी मोकळा वेळ. सकाळी लिहून झालं की हाताशी बराच वेळ राही. एके दिवशी रविवारी साहेबराव म्हणाले, ‘‘काय करता सुटीचं? यायचं असेल तर या माझ्याबरोबर. खंडोबाच्या साताऱ्याला आम्ही काम सुरू केलं आहे.’’ त्यांच्या मोटारसायकलने निघालो. रेल्वेपटरी ओलांडून शहराच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर आडवे डोंगर दिसत होते. त्यांच्या पायथ्याला खंडोबाच्या मंदिराचा कळस दूरवरूनच दिसू लागला. ओढा ओलांडून मंदिरात आलो. मंदिराशेजारच्या शेतात आलो. ‘‘हे आपलं विटांचं काम सुरू आहे. हे रामभाऊ! यांची ही जागा. माती, पाणी त्यांचं; आपण मजुरी अन्‌ कोळशाची मदत करायची. त्यांची मेहनत. उत्पन्नात दोघांची भागीदारी. गेली चार वर्षं आमचा भागीदारीतला विटांचा धंदा छान चालला आहे. जोपर्यंत माणसांची नव्या घराची हौस, तोपर्यंत बांधकाम चालू राहणार, म्हणून या धंद्याला कधीच मरण नाही.’’ साहेबरावांनी धंद्याच्या चिरंतन प्रगतीचं गाजर समोर ठेवलं.  

ओढ्याकाठी एक वीटभट्टी तयार होती. ‘‘हा माल तयार आहे विक्रीला. तो विकत आला की दुसरी पेटवायची.’’ भागीदारानं तयार मालातल्या दोन विटा त्यांच्या हाती दिल्या. साहेबरावनं त्या दोन्ही विटा एकावर एक आपटून टण्‌ टण्‌ आवाज ऐकला. ‘‘चांगला निघाला माल.’’ माझा पुस्तक विक्रीचा अनुभव फारसा उत्साहकारक नव्हता. नोकरीच्या ठिकाणचा पगारही तीनशे-चारशेच्या आसपास. हे आकडे विटांच्या धंद्याच्या नफ्याशी किती जुळतात, ही जिज्ञासा जागी झाली. परत येताना हळूच त्यांना विचारलं, ‘‘किती पैसे सुटतात हजार विटामांगे?’’ माझ्या डोक्यात विटांचं गणित सुरू झालं होतं. ‘‘रुपयामागं दहा-अकरा आणे सुटतात.’’ साहेबरावांच्या उत्तरानं डोळे चमकले. दिवसभर डोक्यात आकडेमोड सुरू झाली. सायंकाळी एक तरुण आर्किटेक्ट भेटला. त्याला सहज विचारलं, ‘‘यंत्रानं विटा तयार करता येणार नाहीत का?’’ माझा प्रश्न ऐकून हसले, ‘‘काय भन्नाट आयडिया आहे. मी गेल्या महिन्यात एका मासिकात वाचलंय. माणूस निवारा म्हणून घरं बांधून राहू लागला. माती-पाण्यापासून भेंडे करणे, ते भाजणे, ही आपली अनेक वर्षांची परंपरा आहे. सिंधू काठची संस्कृती हे त्याचं उदाहरण. माती-पाणी कालवून चिखल करतात. चौकोनी साच्याला विटोळे म्हणतात- ही माणसं विटा हातानं करतात. अलीकडे गुजरातमध्ये एकानं यंत्राचा साचा बनविला. त्यानं विटा करता येतात. पट्ट्यावरून भट्टीत रचल्या जातात. भट्टीत भाजून विक्रीस तयार होतात.’’ ‘‘असा विटांचा कारखाना काढता आला तर!’’

त्यांनी माझ्याकडं आश्चर्यानं बघितलं. ‘‘कल्पना अद्‌भुत आहे. त्याकरिता अगोदर पारंपरिक विटांची भट्टी, सगळं तंत्र समजून घ्यावं लागेल.’’ ‘‘गुजरातचा तो प्रकल्प बघायला पाहिजे.’’ माझा उत्साह बघून ते म्हणाले, ‘‘आपल्या पारंपरिक वीट भट्टीतही कमाई चांगली आहे. या धंद्यात इतर व्यवसायासारखे धोकेही फारसे नाहीत. थोडं भांडवल आणि मातीची जागा असली की, सुरू करता येतं.’’ ‘‘अशी जागा बघून आलोय. शहराजवळच आहे.’’

0

साहेबरावनं चिखल-मातीचं पिल्लू डोक्यात सोडून दिलं. ‘‘तुची तयारी असेल तर आमच्या दोघांच्या भागीदारीत तुम्हालाही घेऊन टाकू.’’ त्यांचं नव्या व्यवसायाचं गाजर अन्‌ रुपयातील अकरा आणे फायद्याचं मधाचं बोट समोर फडफडू लागलं. एक हंगाम नीट साधला की, दहा-बारा लाख माल हमखास तयार होणार. कितीही भाव पडला तरी आठ आण्याला मरण नाही. त्याचा तिसरा हिस्सा म्हटलं तरी... कल्पनेतला आकडा फुगत गेला. संध्याकाळी साहेबराव ओट्यावर बसले होते. त्यांना गुजरातमध्ये यंत्रानं विटा करतात, ही माहिती ऐकवली. ‘‘ते फार पुढचं काम झालंय. हातयंत्र माती-पाणी कालवील. साच्यातून विटाही निघतील; पण ज्या मातीच्या विटा थापायच्या, तो पोयटा कसा आहे, त्यात काळी माती तर नाही ना! काही ठिकाणी पोयट्याची माती बाहेरून ढवळी दिसती; पण पोटात चुनखडीचा असर असतो. तो सहज पाहिलं तरी डोळ्यांना दिसत नाही.’’ ‘‘चुनखडी अन्‌ भट्टीचा काय संबंध?’’ ‘‘दुधात मिठाचा खडा पडल्यासारखा प्रकार आहे हा! मिठानं दूध नासतं, ते फाटलं, असं आपण म्हणतो. चुनखडीनं विटा भाजल्या की फुलतात अन्‌ फुटतात, फुटल्या की तुकडेच तुमच्या हाती. म्हणून माती कालवणारे हात अनुभवी लागतात. थडीला जेव्हा चिखल करायला धड पाडतात, तेव्हाच अनुभवी कारागिराला कळतं, माती चांगली आहे की नाही.’’

साहेबरावचं माती परीक्षा अन्‌ माती माहात्म्य डोक्यावरून गेलं. मुद्‌द्याचं विचारावं म्हणून ते पुढे म्हणाले, ‘‘रात्री रामराव आले होते. रामराव म्हणजे आपल्या वीटभट्टीच्या जागेचे मालक. चार जोड्या आणखी वाढवायच्या म्हणत होते. पंधरवड्याला पन्नास हजारांची भट्टी दाबत होते. आता आठवड्याला दाबायची म्हणतो. पाणकळ्यास दीडेक महिना आहे. तोपर्यंत होईल तेव्हा माल तयार करून ठेवला की पावसाळ्यात चढ्या भावानं विकायचा. काम वाढवायचं तर खर्चाचा बोजाही वाढणार. एकट्याला हे ओझं उरजड होणार म्हणून सरकाती बघा म्हणाला.’’ ‘‘किती आण्याचा सरकाती हवाय? आणि गुंतवणूक किती लागंल?’’ माझ्या विचारण्यानं साहेबरावानी थोडा विचार केला आणि म्हणाले, ‘‘फार नाही, माती-पाण्याला आपल्याला पैसे द्यावे लागणार नाहीत. इतरांना त्याच्यासाठीही दामाजी मोजावे लागतात. फुकटची माती आणि पाणी हीच आपली वरकमाई म्हणता येईल. दर आठवड्याला जी मजुरी होईल, फक्त ती द्यायची. माल दाबण्यापूर्वी जळतानाचा कोळसा आणून द्यायचा. भट्टी पेटवली की, आठवड्यात माल विक्रीसाठी तयार होणार. तोपर्यंत नव्या भट्टीसाठी माल थापून थप्पी मारून तयार करायचं. ती दाबली की पहिली विक्रीसाठी तयार होणार, ती विकून पैसे आले की, मजुरी जळतानाचा खर्च त्यातून भागवायचा. ही घडी एकदा बसली की मग फक्त पैसेच मोजायचं काम करायचं.’’ ‘‘तिसरा हिस्सा ठेवा माझा. पहिल्या दोन भट्ट्यांत वाटा ठेवू. तो अनुभव बघून पुढचा निर्णय मग घेऊ.’’ माझी तयारी बघून त्यांना बरं वाटलं.

घरात याबद्दल सांगितलं, सासरे म्हणाले, ‘‘लोक म्हणतात वीटभट्ट्याचा धंदा म्हणजे हात काळे करणं आहे; पण ज्याच्याबरोबर तुम्ही भागीदारी करता...’’ ते बोलायचे थांबले. माझ्या मनात या शंकेने गोंधळ उडाला. मी नाउमेद होऊ नये म्हणून ते म्हणाले, ‘‘तुमचा उत्साह बघून काळजी वाटते. नोकरी आणि धंद्यात फरक आहे. नोकरीत तोट्याची भीती नाही. महिनाअखेर ठराविक मिळणार. धंद्यात तसं नसतं. त्यात तुम्ही जो धंदा करणार त्यात तुम्हाला अनुभव काय? तुम्ही नवीन आहात. हुशारीनं काम करा. तुम्हाला आम्ही मोडता घालत नाही; पण भांडवलाचं काय करणार आहात?’’ त्यांनी मुद्‌द्याचं विचारलं. आमच्या दोघांचा पगार ह्याकरिता पुरेसा नव्हता. प्रकाशनातले पैसे इतर ठिकाणी वळवायचे नाहीत, हे आशा आणि मी सुरुवातीपासून ठरवलं होतं. ‘‘मी पतसंस्थेकडं कर्जासाठी चौकशी केली आहे. पतसंस्थेचं  काम आपले पालकर मामाच पाहतात. दहा हजार कर्ज मंजूर करतो म्हणाले. पहिला हप्ता पाच हजार उचलू. तेवढ्यात दोन भट्ट्यांचं काम भागेल. एकदा माल तयार झाला की, तो विकून काही कर्ज फेडू, उरलेल्या पैशात पुन्हा कोळसा आणू, मजुरी देऊ.’’ माझं नियोजन ऐकून ते हसले. त्या हसण्यात माझ्या नियोजनाबद्दल समाधानच त्यांना झालं, असा अर्थ मी काढला.

आशाच्या कानावर ह्या विटांच्या कारखान्याबद्दल गेलं. माझ्या या जगावेगळ्या साहसाबद्दल तिने फारसं मत व्यक्त केलं नाही अन्‌ आडकाठीही घातली नाही. मी एखादं काम करायचं ठरवलं की, करू नका, असं सांगण्याचा उपयोग होत नाही, हे तिला आतापर्यंतच्या अनुभवानं कळल्याने, ती गप्प होती. पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज भरला. पालकर मामा म्हणाले, ‘‘एक जामीनदार लागेल. दुसऱ्यास विचारण्यापेक्षा घरचाच जामीनदार आशाचीच सही घ्या. तुम्ही उत्साही आहात. नवं साहसी स्वप्न बघता. नाही तर इतर दुसरे नाकासमोरची चाकोरीतली नोकरी अन्‌ संसाराच्या चरकात जातात. तुमची ओळख झाली, तेव्हाच मी हेरलं. वेगळं काही करण्याची तुमची धडपड मला विशेष वाटते. तुमच्या या प्रकल्पास आमच्या शुभेच्छा.’’ त्यांनी मला आणखी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. आशाची सही घेतली. कर्ज मंजूर झालं. शंभर पानांची वही घेतली. वहीच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरांत इंग्रजीत लिहिलं, ‘आनंद ब्रिक्स वर्क्स, सातारा.’ त्याखाली मराठीत ‘आनंद वीट कारखाना’ही लिहिलं. प्रोप्रायटर स्वत:चं नाव टाकलं. जमेच्या बाजूला पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा आकडा लिहिला.

आता सकाळ-संध्याकाळ साताऱ्याला चकरा सुरू झाल्या. एक शंभर पानांची वही रामराव यांच्याकडे देत म्हणालो, ‘‘दररोज तारीख, काम करणाऱ्या जोड्यांचं नाव, अन्‌ थापलेल्या मालाची संख्या लिहून ठेवा.’’ माझ्या हिशोबीपणाला हसून ते म्हणाले, ‘‘टिपून ठेवता येईल; पण सगळे आकडे माझ्या डोक्यात फिट असतात. लिहिताना तरी एखादं सुटून राहण्याचा धोका. टिपणं बरं असतं सरकत करायची म्हटलं की!’’ रविवारी साहेबरावांसोबत जोड्यांचं पेमेंट करायला गेलो. जोड्यांसोबत रामराव अन्‌ त्यांचा मुलगा अशा दोन जोड्यांची नावं यादीत होती. ‘‘तुम्ही तर भागीदार आहात ना!’’ माझ्या विचारण्यावर ते माघार घेत चटकन म्हणाले, ‘‘हो! पण मजुरांसोबतीनं आम्हीही विटा थापल्यानं मी विटांची मजुरी लावली. तुम्ही नाही म्हणत असाल तर आम्ही नाही उचलणार बाप-लेकं.’’ साहेबरावानं त्यांची बाजू घेतल्यानं, मी आणखी रेटलं नाही. थापलेला माल लवकर वाळावा म्हणून उलथणं, भिंतीसारखी थप्पी मारणं, भट्टी दाबताना ते वाहून नेणं, ह्या मजुरीतही रामराव व मुलाची जोडी होती.

क्रांतिचौकात दगडी कोळश्याचं दुकान (वखार) होतं. साहेबरावांसोबत कोळसा खरेदीसाठी गेलो. ‘‘कोनसा माल दूँ?’’ कोळश्याच्या दोन ढिगांकडे हात दाखवत सरदारजी पुढं म्हणाले, ‘‘दोनो में ढाई सों रुपये टन में फरक है।’’ ‘‘किमतीत असा फरक का?’’ माझ्या विचारण्यावर ते गोड हसले. ‘‘माल में उन्नीस बीस का फर्क होता है। बाकी कुछ नही. कम भाव में थोडा चुरा ज्यादा होता है। और भट्टी के काम में बडा माल की जरूरत नही।’’ पैसे दिले. माल पाठवून दे म्हणालो. साहेबरावनं डोळ्यानं खुणवलं, हळू आवाजात म्हणाले, ‘‘आपल्यासमोर काटा करून घेऊ. माल साईटवर पोचू. गिऱ्हाईक समोर नसलं की मालावर पाणी मारून वजन ॲडजेस्ट करणं, दांडी मारणं, ड्रायव्हर मध्येच पन्नाससाठ किलो कोळसा रस्त्यात विकून वरचेवर हात चलाखीचा फटका देऊ शकतो.’’ माझ्या या व्यवहारातील अज्ञानामुळे गप्प बसलो. माल तोलला, पैसे दिले. भट्टीच्या ठिकाणापर्यंत पाठराखण केली. परत येताना साहेबराव म्हणाले, ‘‘आपण दुर्लक्ष केलं तर हात मारणाऱ्यास सांद सापडती. कोळसा मालकाच्या भरवशावर सोडला तर डबल दांडी मारण्याचा धोका. माणसाचं एकदा तोंड पोळलं की तो ताकही फुंकून पितोच ना! तुम्हाला माहीत आहे का? जालन्याला लोखंडाच्या सळयांचे खूप कारखाने आहेत. जालन्याबाहेर रस्त्याच्या गावात सळया स्वस्त मिळतात. बाहेर लोखंड वाहून नेणाऱ्या गाड्यांतून चारदोन बार वरचेवर ओढून काढतात. त्यात ड्रायव्हरची वरकमाई निघते आणि विकणाऱ्यांचा बिनाभांडवलाचा सोपा धंदा.’’ ‘‘मालकाच्या लक्षात येत नाही का? पकडलं गेलं तर?’’ माझा भाबडा प्रश्न. ‘‘आलं तर धरपकड होते. पुन्हा तोडापाणी आलीच सगळीकडं.’’

त्यांचं सांगणं डोक्यातून जात नव्हतं दिवसभर! नोकरीच्या ठिकाणी शरीरानं काम करत होतो; पण डोक्यात सकाळचा संवादच घोळत होता आणि एक कथासूत्र हातपाय पसरू लागलं. कल्पनेनं इतर बारकावे त्यात वाढत गेले.  आठवड्यात एक भट्टी तयार झाली. वरचं तोंड खोललं. एकदोन दिवस मालानं हवा खाल्ली की, माल विक्रीसाठी तयार होणार! दुसरी भट्टी दाबणं सुरू झालं. पुन्हा कोळसा आणला. शेतकरी असल्यानं शेतातला माल तयार होण्याचा आनंद अनुभवत होतो. वर्षभराचे श्रम, अडचणी, खळ्यावरची धान्याची रास पाहिली की सगळं पळून जातं, उरतं फक्त श्रमाचं समाधान.

रामभाऊ माणसं वाढवताना म्हणाले, ‘‘पाणकळा तोंडाशी आला. आणखी एक भट्टी आठवड्यात दाबून तयार ठेवतो. पाऊस आला की काम थांबेल. भट्टी दाबली अन्‌ पेटवली की मग भीती नाही पावसाची.’’ त्यांचा पूर्वानुभव होता. आमचा होकार समजून धडाक्यात काम सुरू झालं. एक भट्टी तयार होत आली. दुसरी भाजली जात होती. आणि तिसरीची थपाई सुरू होती. सकाळी आम्ही लवकर साईटवर हजर होऊ लागलो. रात्री गारा भिजवणं, सकाळी तुडवणं आणि लवकर काम सुरू करणं बघताना आदिमानवाचा निवाऱ्याचा इतिहास डोळ्यांसमोरून सरकू लागला. जंगलातील झाड-झाडोऱ्यातील आसरा सोडून माणसानं अधिक सुरक्षित मार्ग म्हणून चिखल मातीचा आधार घेतला. विटा भाजण्याचं तंत्र पुढं आलं. धाब्याच्या घराच्या जागी सिमेंट- वाळू- सळयांनी क्राँकिटचं मजबूत घर बांधू लागला. आपल्या डोक्यावरच्या आधारासाठी घरकुल बांधण्याचं स्वप्न माणसाला स्वस्थ बसू देत नाही. तो ऐपतीप्रमाणे बचत करतो. निवारा उभारतो. मग ती झोपडी असो की महाल असो. आपला चार भिंतींआडचा आसरा असावा, ही इच्छा असते आणि मग विविध रूपांतली ही निर्माणाची प्रक्रिया सुरूच राहते. माणसाच्या ह्या स्वप्नाच्या पूर्ततेची एक कडी म्हणून आपण हे काम स्वीकारलंय.

0

एका मित्राचं घराचं बांधकाम सुरू होतं. दोन ट्रक विटा पाहिजे होत्या. साहेबरावला सांगितलं. माल पोचता केला. आलेल्या पैशात तिसऱ्या भट्टीसाठी कोळसा नेऊन टाकला. शनिवारी मजुरांचा पगार केला. कमाईचं चक्र सुरू झाल्याचं समाधान फार काळ टिकलं नाही. अवेळी आकाशात ढग दाटून आले. ढगांकडे काळजीनं बघत रामराव म्हणाले, ‘‘मेलेल्या जनावरास धुंडणारे हे गिधाडं कसे उपटले मधेच? माझ्या पोटातील चिखलाच्या गोळ्याला पाणी सुटलं.’’ त्यांनी माणसं वाढवली. थापलेला, वाळलेला माल जवळ गोळा केला. उद्या सकाळी भट्टी दाबायची तयारी केली. रात्री आम्ही परत आलो. थापलेल्या विटांची काळजी करत अंथरुणावर अंग टाकलं. थोडा डोळा लागला नाही तोच स्वप्न पडू लागलं. मुसळधार पाऊस सुरू झाला. आकाशात कडाड्‌ आवाज ऐकू आला. उठून बसलो. स्वप्न म्हणजे मनातला खेळ. जी चिंता वाटते, ती स्वप्नात हजर होते, म्हणून बाहेर कानोसा घेतला. हवा जोरात सुटली होती अन्‌ रप्‌ रप्‌ टपोऱ्या थेंबांचा आवाज येऊ लागला. पहाटेपर्यंत पावसानं आडवे-उभे फटके देत धुमाकूळ घातला. अंथरुणावर उठून बसलो. डोळ्यांसमोर साताऱ्याचा आनंद वीट कारखाना फिरू लागला. उजाडताच तयार झालो. साहेबरावचा आवाज ऐकून बाहेर आलो. पावलं कारखान्याकडे वळली.

रस्त्यानं ते म्हणाले, ‘‘गधड्या पावसानं वेळ साधली दुष्मनासारखी.’’ पुन्हा गप्प झाले. जागेवर पोचलो. रामराव, त्याची बायको, पोरगा सुतक्यासारखे चेहरे करून थापलेल्या मालाच्या चिखलाकडे बघत होते. ‘‘सगळी मेहनत मातीत गेली.’’ ते म्हणाले आणि पुन्हा चिखल झालेल्या भेंड्यांकडे पाहू लागले. ‘‘दाबलेल्या भट्टीला काही झालं नसेल ना? पेटवून पाच-सहा दिवस उलटले.’’ साहेबरावच्या विचारण्यात काळजी जाणवली. त्याच्याकडे आणि सापशिडीसारखे आकाशात वर जाणाऱ्या धुराच्या आकृतीकडे बघत रामराव म्हणाले, ‘‘खोलल्यावर समजेल आता.’’ कामावरचे मजूरही जमा झाले. त्यातला एकजण कुरबुरला, ‘‘आजचा खाडा होतो जणू!’’ त्या आवाजाच्या दिशेने वसकन धावून रामराव म्हणाला, ‘‘आमच्या घरात पडलं मढं अन्‌ तुम्ही साले दीड दमडीसाठी रडं.’’ ‘‘तुम्ही पैक्यावाले. दोनाचे चार करणारे! आमच्या मुद्दलीचा वांदा झाला त्याचं काही नाही तुमाला. आमचा हिसाब करा. आम्ही बघतो पोटापाण्याचं दुसरीकडं.’’ साहेबरावनं दोघांनाही समजावलं, ‘‘अशी वेळ कोणावरही येऊ नये. अन्‌ भांडून-तंडून काही हाती लागतं का?’’ एका मोटारसायकलवर दोघं विटा घ्यायला आल्याने दु:खाच्या अन्‌ भांडणाच्या वादाला तात्पुरता खंड पडला.

‘‘साहेबरावानं भाव सांगताच गिऱ्हाइकानं विचारलं, ‘‘रात्रीतून एकदम भाव कसे चढले मालक?’’ ‘‘पाणकळा सुरू झाला की, चार महिने तयार मालच निगुतीनं विकावा लागतो, अन्‌ हेच थोडे कमाईचे दिवस.’’ नाही-हो म्हणत भाव झाला. एकदम चार ट्रक माल नेतो म्हणाले. ‘‘असं करा!’’ साहेबराव व्यवहारी बोलले, ‘‘एक ट्रक गेली की, पेमेंट जमा करा.’’ ‘‘विश्वास नसेल तर सगळे अगोदर घ्या, तुम्ही काय समजता!’’ आतापर्यंत गप्प असणारा आवाज वाढवून म्हणाला, गिऱ्हाइकाशी सौजन्यानं बोलावं वाटून मी मध्येच म्हणालो, ‘‘गैरसमज करून घेऊ नका, माल टाकल्यावर पैसे द्या.’’ दोन दिवसांत चार ट्रिप माल गेल्याने पहिल्या भट्टीचा माल संपला. दोन दिवस मजूर बसून होते, ते सगळे हातावरचे. काम केलेल्या दिवसाचे पैसे द्या, म्हणू लागले. रामराव म्हणाले, ‘‘पैसे दिले की ते इथं थांबणार नाहीत. थोडे पैसे देऊत, बाकीसाठी लटकून ठेवू.’’ अस्वस्थ अवस्थेत घरी परत आलो. घरात मातीचा चिखल झालेल्या भेंड्याबद्दल शब्दही काढला नाही.

दुसऱ्या दिवशी साहेबरावासोबत चार ट्रक विटा नेल्या, त्या ठिकाणी पोहोचलो. मालक नोकरीच्या ठिकाणी असल्याचं कळलं. पत्ता घेऊन तिथं गेलो. साहेब तीन दिवस दौऱ्यावर गेलेत. शनिवार-रविवार सुटी. आता सोमवारी येणार. घरी परत आलो. रामराव ओट्यावर बसले, ‘‘मजुरांचं खेंगटं मिटून टाकू. आता लई हातघाईवर आलेत.’’ आल्या आल्या ते मुद्द्याचं बोलले. ‘‘पेमेंट  मिळालं नाही. मालक दौऱ्यावर गेले. तुम्ही घरचा पत्ता काढून जाऊन या.’’ आंबलेला चेहरा करून ते उठले. आनंद वीट कारखान्यानं जणू आनंद पिळून काढला होता. साहेबरावाला भेटण्याचा उत्साह राहिला नाही. ते भेटू नये असंच वाटू लागलं. चार-पाच दिवसांनी तेच आले. ‘‘असं खचून कसं चालेल. उनपावसाचा खेळ असतो हा. चला, चक्कर मारून येऊ. दुसरी भट्टी खोलायची वेळ झाली आहे.’’ ते म्हणाले. त्यांच्याबरोबर आनंद वीट कारखान्यात पोहोचलो. रामरावानं भट्टीचं तोंड खोलून ठेवलं होतं. ‘‘कसा आहे माल?’’ उत्सुकतेने विचारताच ते कसंनुसं तोंड करत म्हणाले, ‘‘रंग आला नाही; पण पाणी मारून पाहू. पाणी मारलं तर धोका राहणार नाही.’’ त्यांच्या तोंडचा ‘धोका’ शब्दानं पुन्हा अस्वस्थ झालो. ‘‘चार ट्रकच्या पैशावाल्याची भेट झाली की नाही?’’ ‘‘चक्कर मारून मारून पायाचे तुकडे पडले. हे इथले देणेकऱ्याची भुतं सुधरू देईना आणि तो मालक मुलखाचा खट निघाला. निम्मेच दिले तीनदा करून. बाकी दोन दिवसांनी या म्हणाला.’’ ‘‘निम्मे मिळालेत. मग तुम्ही ते घरी का आणले नाहीत?’’ ‘‘मी कुठं पळून चाललो. मजुरांच्या पेमेंटमध्येच बरेचसे जिरून गेले. थोडे उरले ते माझ्याजवळ जमा आहेत.’’

रामरावच्या परस्पर व्यवहारानं साहेबराव चिडले; पण स्वत:ला सावरीत ते म्हणाले, ‘‘आपलं अगोदर ठरलं तसंच यापुढं करायचं.’’ एक गिऱ्हाईक आल्यानं चर्चा थांबवली. दोन ट्रक माल पाहिजे होता. एक ट्रकचे पैसे जाग्यावर दिले. दुसरीचे माल उतरताच देतो म्हणाले, ‘‘आम्ही कांडी मारून देऊ. गेल्या-गेल्या मालावर पाणी मारा.’’ रामराव गिऱ्हाईकास म्हणाले. दोन ट्रक माल पाठवला. घरी परत आलो. ‘‘आपल्याला वरच्या चार खोल्या बांधायच्या. घरच्या विटा आहेत. मिस्तरीला बोलावलं.’’ आशा म्हणाली, चार ट्रक लागेल म्हणाला, समोर थप्पी मारून ठेवू.’’ साहेबरावला संध्याकाळी हे सांगितलं. ‘‘हा माल विकून टाकू. आता उघड झाली. आठवड्यात आणखी भट्टी दाबू. तो माल तयार झाला की, तुम्ही घ्या.’’ त्यांनी सुचवलं; पण माझा आग्रह बघून ते तयार झाले. रामरावला निरोप दिला. चार ट्रक माल घरासमोर रचला. त्यावर भरपूर पाणी मारलं. दोन दिवसानं पुन्हा अवकाळी पाऊस आला. साहेबराव निम्म्या राहिलेल्या पैशांच्या पहिल्या वसुलीसाठी जाऊन आले. दुसऱ्या भट्टीच्या एक ट्रकचं येणं होतं. पहिल्या ठिकाणचे बाकी पैसे रामराव घेऊन गेले होते. दुसऱ्या ठिकाणी पाणी मारल्याने विटा फुटू लागल्या होत्या.

सकाळी घरावर बांधकाम सुरू करण्याच्या तयारीने गवंडी आले. नारळ मागवले. विटांजवळ येताच गवंडी म्हणाले, ‘‘विटा कोठून आणल्या? माल कच्चा आहे. एक वीट कामाला येणार नाही.’’ मी पळत ढिगाजवळ आलो. वीट उचलताच फुटली, हातात कोट चुरा आला. साहेबराव बँकेकडे निघाले होते. त्यांना थांबवलं. जागोजाग विरलेल्या विटा दाखवल्या. मोटारसायकलला किक मारत ते म्हणाले, ‘‘मी साइटवर जाऊन आलोय. सगळा माल असाच निघाला.’’ आणि ते फटफटी उडवीत निघून गेले. मी फटफटीनं निघणाऱ्या काळ्याशार धुराकडे आणि मातीचा ढीग झालेल्या विटांकडे बघत स्वत:शी म्हणालो, ‘‘नवं निर्माण करायची तुझी खुमखुमी अजून संपलेली नाही.’’

 

 

Tags: विट भट्टी बाबा भांड मातीचे पैसे मातीत गेले  अधूनमधून vyavsay vit kamgar vit Bhatti baba bhand matiche paise matit gele Adhunmadhun weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके