डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझे शेतीतले प्रयोग म्हणजे मृगजळामागे धावणे...

माझे एक ज्येष्ठ कवी लेखक मित्र शेतकरी आहेत. गेली तीस वर्षं आमचा जवळून परिचय आहे. त्यांच्या शेतीतल्या चढ-उतारांचा मी साक्षीदार आहे.  त्यांना म्हणालो, ‘प्रयत्न करूनही मी शेतीचं भरकटलेलं तारू सावरू शकलो नाही. खूप पैसे टाकले. मेहनत केली; पण बेभरवशाच्या अनेक गोष्टींनी गाळातच फसत गेलोय. यात माझीही चूक असेल. नियोजन जमलं नसेल; पण वास्तव याहून फारसे वेगळे नाही.’यावर ते हसून म्हणाले, ‘शेती हा आमचा जगण्याचा श्वास आहे. तिथं आनंद मिळतो हे खरं आहे; पण माझ्यासारख्या अनेकांना शेतीशिवाय पर्यायच नाही. शेतीच्या मृगजळाबद्दल इतके वर्षं आशावादी बोलत आलोय; पण प्रत्यक्ष वास्तव बरंच वेगळं आहे. ते वास्तव सांगायला आज मन धजत नाही.’

पिंप्रीच्या शाळेत असताना अधिक उत्पादन देणाऱ्या हायब्रीड ज्वारी अन्‌ बाजरीचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू होता. एकरी पिकाचं उत्पादन वाढलं होतं. जनावरांना चारा उपलब्ध झाला.

दोन पैसे मिळताच शेतकरी मोसंबी आणि द्राक्ष बागांकडे वळले. काही वर्षांत फळबागांची दृश्य स्वरूपात समृद्धी दिसू लागली. गावातील धाब्याची घरं जाऊन विटांची उभी राहिली. दारासमोर मोटार-सायकली आल्या. गावात ट्रॅक्टर वाढले. हे सगळं मी जवळून पाहिलं होतं.

काही वर्गमित्रांचे द्राक्ष-मोसंबीचे बाग होते. सुटीच्या दिवसात त्यांच्या मळ्यात जाणं होई. या नव्या बदलानं उत्पन्नात वाढ झाल्यानं इतरही अनुकरण करू लागले. शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य आधार. त्याकरिता सुधारित पद्धतीनं शेती करावी हाच मार्ग होता.

गावी वडिलांची आठ एकर काळी आई होती. जमीन कसदार होती; पण कोरडवाहू होती. आई-वडिलांनी स्वत: तीन पुरुष विहीर खोदली. पाणी लागलं. बांधून काढली. वीजमोटरच्या पाण्यावर गहू, मिरच्या, अशी उन्हाळी पिकं सुरू केली.

पैठण इथे नुकताच नाथ सहकारी कारखाना सुरू झाला होता. कारखान्याला ऊस हवा होता. शेतकऱ्यानं ऊस लावावा म्हणून कारखान्याची माणसं प्रोत्साहन देत होती. एकरी इतक्या रकमेची हमी दाखविल्याने मोठ्या प्रमाणात ऊस लागवड सुरू झाली.

आईनं माझ्या लहान भावाच्या मदतीनं एक एकर ऊस लावला. चार कोसांवरून बेणं आणलं. पूर्वी विहिरीवर मोटारी नव्हत्या. औरंगाबादी एका मित्राचे वडील फिटर होते. ते म्हणाले, ‘ऑईल इंजिन घेऊन देतो. दिवसाला एकर भरणं होईल.’ कल्पना चांगली होती. इंजिन घेतल्यानं, उसासोबत भाजीपाला लावता येईल. त्यांनी जुनं इंजिन दाखविलं. दोन हजार किंमत कमी वाटली. शेतावर फिट करायला ते येऊन गेले. सुरू करणं, ऑईल-पाणी पाहणं, भावाला शिकवलं.

गावात पहिलं इंजिन विहिरीवर आल्याचं गावभर कौतुक झालं. ते रॉकेलवर चालायचं. भावानं भाजीपाला वाढविला. पंधरवड्यानं इंजिन सुरू होईना. फिटरला आणलं. त्याने दहा मिनिटांत दोष दूर केला, पण नंतर फिटर आणि इंजिनचा लंपडावच सुरू झाला. त्याचं येणं, छोटा मोठा भाग बदलणं, हे कंटाळवाणं चक्र सुरू झालं. इंजिनच्या किमतीपेक्षा जास्त पैसे दुरुस्तीला गेले होते आणि याच काळात गावात वीज आली. विहिरीवर विजेची मोटार बसवायचं ठरविलं. बँक ऑफ महाराष्ट्रानं मोटार आणि पाईपसाठी कर्ज दिलं. तीन हजारांत विहिरीबाहेर पाणी निघालं.

कारखान्याचे शेतकी अधिकारी म्हणाले, ‘एकरी पन्नास टन ऊस कसाही येतो. कारखान्यानं पाचशेचा भाव बांधून दिलाय. नंतर बोनस वेगळा मिळेल.’ आम्ही आकडेमोड केली. पंचवीस हजाराला मरण नाही. तीन हजारांचं कर्ज फेडून पुढच्या वर्षी पाच एकर लागवड करू. वर्षाखेर पाचपट उत्पन्न वाढेल.

ऊस वाढू लागला. टोचणी केली. शेणखताशिवाय रासायनिक खताचे डोस दिले. उसाची वाढ चांगली होती. कांड्या मोजून समाधान होई. कारखान्याचा हंगाम सुरू झाला. तोड मिळावी म्हणून शेतकी अधिकाऱ्याकडे जाऊन आलो. ‘नोंदणीच्या क्रमाने तोड सुरू आहे. तुमचा नंबर आला की टोळी हजर होईल.’ पंधरा दिवसांनी हेच उत्तर ऐकावं लागे. मे महिना संपत आला होता. ऊसाला तुरे दिसू लागले. तुरे निघणं म्हणजे वजन कमी होणं.

गावातल्या काहींचा ऊस नेला. असं कसं केलं विचारलं? ‘तुमच्या अगोदर त्यांची नोंद आहे’, उत्तर तयार होतं. पहिल्या अवकाळी वादळी पावसानं दाणादाण केली. निम्मा उभा ऊस आडवा झाला. रानात पाणी साचलं; पण तोंडचं पाणी पळालं होतं.

निरोप आला. माणसं लावून ऊस तोडा. रस्त्यापर्यंत बैलगाडीनं आणा. वापसा होताच ट्रकने उचलता येईल. एक ठेकेदार पकडला. कारखान्यानं तोडणीचे पैसे दिले नाही, तर आम्ही देतो. आणखी पाऊस येण्याअगोदर मजूर वाढवून तोडणी करा, त्याची मनधरणी केली.

तोडणी सुरू झाली. रस्त्यावर बैलगाडीनं माल येऊ लागला. दोन ट्रक उद्या येणार आणि रात्री पावसानं तडाखा दिला. निम्मा ऊस रानात उभा. काही वावरात साळायचा बाकी अन्‌ राहिलेला रस्त्यावर पडला. पाऊस उघडल्यावर रस्ता खराब म्हणून दहाबारा दिवस ट्रक आलाच नाही. शेवटी माल उचलला.

उसाची पट्टी आली. ती बघून जाणकार म्हणाले, ‘वजन कमी भरलं. दहाबारा दिवस उन्हात वाळल्यानं दुसरं काय होणार!’ पावसानं टोळी पांगली. थोडी जास्त उचल घेऊन गेले होते. उभ्या उसाचं काय करायचं? एक-दोघांना बेणं म्हणून दिलं. अर्धवट डोकं भादरल्यासारखं रान दिसू लागलं. राहिलेला ऊस शेवटी माणसं लावून तोडला. साळला. ट्रकसाठी फेरे मारले. पुन्हा पावसानं डोकं वर काढलं. बांधावरच्या उसाचे डोळे फुटू लागले. ऊसाची पट्टी आली. देणेकऱ्यांची बिळं बुजविताना हाती काही उरलं नाही. बँकेचा हप्ता अन्‌ व्याज तसंच राहिलं.

0 0

पुस्तकांच्या कामासाठी पुण्याला जाणं होई. रस्त्यात शिक्रापूरला रस्त्याकडेला मोसंबीची रोपं विक्रीसाठी ठेवलेली दिसायची. उसापेक्षा मोसंबी बरी, एक बागवान मित्र म्हणाला होता, चवथ्या-पाचव्या वर्षांपासून उत्पन्न सुरू होतं. पहिली चार वर्षं आंतरपिक घेता येतं. फळं मागं-पुढं तोडता येतात. वर्षातून दोन बहार घेता येतात म्हणून पाचशे पन्हारी शिक्रापूरहून आणली. लावून रानात खुणा केल्या. पंधरा फुटांवर खड्डे करून रोपं लावली. ऊस आणि मोसंबी शेजारी वाढू लागली.

या वर्षी लवकर उसाची तोड आली आणि अपेक्षित वजन भरलं नाही. शेजारचं तीन एकर बरड विक्रीसाठी निघालं. उसाच्या पैशात ते होणार नव्हतं. अनोळखी शेजारी घुसण्यापेक्षा ओढाताण करून विकत घेतलं.

शेतकरी आणि बळीराजा ह्या शेतीविषयक मासिकांची ओळख झाली. महाराष्ट्रभर शेतीत सुरू असलेल्या प्रयोगांचे अनुभव त्यात वाचायला मिळू लागले. पारंपरिक पद्धतीच्या शेतीला नव्या प्रयोगांची जोड दिली पाहिजे. नवं तंत्र, सुधारित बियाणं आणि खत पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. प्रयोगशील शेतकरी ठिकठिकाणी असे प्रयोग करत होते. यश मिळत होतं. उत्पन्न वाढत होतं.

शेती आणि शेतकरी हा भारतीय जीवनाचा कणा आहे. शेतीत उत्पन्न वाढलं तरच त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याच्या जगण्यात बदल होईल. आणि ह्यासाठी सर्वत्र प्रयत्न झाले पाहिजेत, असं वाटायचं.

आपण नोकरी करतो. जोडव्यवसायाची साथ आहे. दोन भाऊ गावी शेती करतात. त्या शेतीत उत्पन्न वाढलं तर भाऊ आणि कुटुंब स्वावलंबी होतील. गावाकडून शहरात नोकरी अथवा व्यवसायासाठी आलेल्यांना दोन पैसे आले की दोन स्वप्नं पडू लागतात. गावात नवं घर बांधायचं. दमदार बैठक हे भूषण वाटतं.

दुसरं, शेजारीपाजारी शेती विक्रीस निघाली की विकत घ्यावी. कोरडवाहू असली तर विहीर खोदणे, पाईप लाईन करणे, फळबागा आणि बागायती शेती हा पुढला टप्पा असतो.

एके दिवशी लहान भाऊ आला. म्हणाला, शेजारचं मोठं वावर विक्रीला निघालंय. आठ एकर बैठकीचं रान आहे. जमीन पाण्याची आहे. शेजारचा घ्यायचा म्हणतो. शेतमालक म्हणतो, ‘दोन-चार कमी द्या; पण तुम्हीच घ्या.’

बाजारभावाचा अंदाज घेतला. भावाला सांगितलं, ‘घेऊन टाकू. सौदा करून टाका. इसार द्या. हप्त्याभरात खरेदीखत करू.’ भाऊ गेला.

अठरा एकरात काय करता येईल, याची आखणी सुरू झाली. दोन दिवसानं गावाकडं चक्कर मारली. जमीन चारही कोपरे फिरून पाहिली. बरोबर एक सेवानिवृत्त अधिकारी होते. भूजल परीक्षण विभागात ते पूर्वी होते. जमिनीचा पोत, उतार, पाण्याचा संभाव्य आंतरप्रवाहाचा विचार करून त्यांनी विहिरीसाठी जागा दाखविली.

जमिनीचे खरेदीखत झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी विहीर खोदकामही सुरू झालं. दोन पुरुषांवर पाणी लागलं. पक्क्या पाण्याचं कौतुक सुरू झालं. राहुरी विद्यापीठातल्या रोपवाटिकेतून एक हजार मोसंबी आणि पाचशे गणेश डाळिंबाची रोपं आणली. आखणी करून लागवड केली. रान बैठकीचं असल्याने भुईदारानं चारही कोपऱ्याला पाणी पोहोचत होतं.

मध्येच चिकूचं पुस्तक वाचण्यात आलं. लेखक डहाणूचे होते. त्यांचेकडे चिकूची बाग होती. रोपं विक्रीची सोय होती. कमी पाण्यावर वर्षातून दोन-तीन बहार येणाऱ्या या फळझाडाची आणखी माहिती घेतली. डहाणूला जाऊन बागा पाहिल्या. येताना चारशे कलमं घेऊन आलो.

आमचे फळबागांचे प्रेम बघून विभागाचे कृषी पर्यवेक्षक म्हणाले, ‘शासनाची फळबाग लागवड योजना सुरू आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करतं. लागवडीसाठी खड्डे करणं, रोप खरेदी करणं, खत, ठिबकसिंचन यासाठी अनुदान मिळतं. ठिबकसाठी सबसिडी आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड सुरू केली. हे आमच्या योजनेत बसवू. तुमचं काम होईल. आमचा कार्यक्रम यशस्वी होईल.’ त्यांनी अर्ज भरून घेतला. इतर कागदपत्रे जोडली.

‘आमच्याकडे सहा एकर बरड आहे. त्यात आंबे लावता येतील का?’ माझ्या विचारण्याचा अवकाश, त्यांनी प्रस्तावही तयार केला. पुढच्या आठवड्यात अनुदानाचा हप्ता आला. आंब्यासाठी खड्डे खोदले. माती-खताने भरले. आंब्याची रोपे सामाजिक वनीकरणातून  आणली. इथेही विहीर झाली आणि ठिबक सिंचनही जोडले. एक वर्षाने आंब्याचे कलम बांधून घेतले.

गावातल्या मित्रांना म्हणालो, ‘शासनाची फळबागयोजना चांगली आहे. थोडी काळजी घेतली तर चारपाच वर्षांत नियमित उत्पन्न सुरू होईल. आंबा, चिकू, डाळिंब जे पाहिजे ते लावा. सरकारचे अनुदान आहे.’

‘ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. आमच्यासारख्यांनी आहे ते रान झाडात अडकवून काय खायचं? ज्वारी, बाजरी, मिरच्या हे बारमाही दुभत्या जनावरासारखं आहे.’ एकजण म्हणाला.

दुसरा म्हणाला, ‘ते पैशाचे तुकडे पाहून देतात. खड्डे करा, खत टाका, मग झाडं आणा. काट्या लावा. शेवटी ठिबकच्या एजंटची घरं भरतात. एकरकमी आमच्या हातात पैसे दिले तर झाडं लावून होतील अन्‌ दोन पैसे घरकामासाठी निगुतीनं वापरता येतील.’

तिसरा म्हणाला, ‘सरकारचा पैका हाय. तो कुटं वापस द्यायचा. वाटून खाल्लं तर तक्रारीचा ओघळ बी येणार नायी.’

शेतकऱ्याच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवू शकणाऱ्या या चांगल्या फळबाग योजनेला सतराशे भुंगे लागले. गावोगाव मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड सुरू झाली. शेतकऱ्यांनी शेतात स्वत: खड्डे करावेत. पैशाचा पुढचा हप्ता सरकार देईल, अशी साद निघाली. खड्डे होऊ लागले. खत आणि रोपासाठी अनुदान मिळू लागले. लागवड सुरू झाली. शासकीय उद्दिष्ट कागदावर पूर्ण होऊ लागलं; पण तीन-चार वर्षांनी गावातली सत्य परिस्थिती समोर येत गेली.

एकूण लागवडीच्या दहा टक्केही फळबागा उभ्या राहू शकल्या नाहीत. शेतकी अधिकारी म्हणाले, ‘तुमच्यासारखे शेतकरी फारच थोडे आहेत- ज्यांनी प्रयत्नपूर्वक फळबागा जपल्या, वाढवल्या.’

मोसंबी, डाळिंब, चिकू, आणि आंब्यांची झाडं वाढू लागली. सर्व झाडांना ठिबक सिंचन केलं. त्या वर्षी पाऊस कमी झाला. तीन विहिरींचं पाणी या फळझाडांना पुरणार नाही, लहान भाऊ म्हणाला.

एका पाहुण्यानं सुचविलं. सात-आठ किलो मीटरवर डावरवाडी शिवारात पाझर तलाव आहे. तलावाखाली अर्धा एकर शेत विकत घ्या. तिथं विहीर करा. बारामाही पक्कं पाणी मिळेल. तिथून वावरापर्यंत पाईप लाईन करा. मग पाणीच पाणी होईल.

औरंगाबादला जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था आहे. तेथील मित्रांच्या मदतीने सर्वेक्षण केलं. नकाशे तयार केले. विहीर, पाईपलाईन खर्चाचा आराखडा केला. मधल्या वेळात भावानं तलावाखाली अर्धा एकर जागा पाहिली. सौदा केला. विकत घेतली. विहीर, पाईप लाईनच्या खर्चाचा आकडा वीस लाखांपर्यंत गेला.

‘एवढा खर्च करण्यापेक्षा थेरगाव शिवारात शिवंला पक्क पाणी आहे. वाण्याच्या मळ्यात विहिरीसाठी जागा घ्या. मी बोललो त्याच्याशी. निम्या खर्चात पाणी मिळेल.’ एकानं सोप्यातला मार्ग दाखविला.

डोळ्यांसमोर वाढीला लागलेली फळझाडं दिसत होती. पाण्याची सोय केली नाही तर तोंडाशी आलेला घास हातचा जाण्याची भीती उभी राहिली. शिवेवरची जागा पुन्हा पाहिली. विहिरीसाठी जागा विकत घेतली. विहिरीचं काम सुरू केलं. पाईपलाईनसाठी नाली खोदणं सुरू केलं. दीड महिन्यात नव्या विहिरीचं पाणी पाच किलोमीटरच्या शेतात पोहोचलं. फळबागा वाढल्या, त्यासोबत चार मजूर वाढले. आठवड्याला मजुरांच्या खर्चाचं मीटरही सुरू झालं.

अंतरा-अंतरानं रासायनिक खतांचे डोस सुरू झाले. कीटकनाशकांची फवारणी सुरू झाली. आठवड्यातून एकदोन चक्कर गावाकडे सुरू झाल्या. शेतावर गड्यांसाठी खोल्या बांधल्या. बैलांसाठी गोठा उभारला. धान्य, आणि पुढं पीक येणार म्हणून साठवणूक करण्यासाठी पत्र्याच्या दोन खोल्या तयार केल्या. मूळ खर्च वाढतच होता.

तिसऱ्या वर्षी डाळिंबाचा बहार धरला. फुलं लागल्यापासून औषध फवारणीचं वेळापत्रक तयार केलं. फळं वाढू लागली. चांगला आकार आला. तोडणी केली. औरंगाबादला मंडईत माल आणला. फळव्यापाऱ्यांनी फळं बघितली. एक दोन फळं फोडून पाहिली. वरून फळ चांगलं दिसायचं; पण आत काळपट डाग. ते म्हणाले, ‘मालाची छाटणी करावी लागेल’ डागाचा माल वेगळा केला. पट्टी केली.

पैसे घेऊन भाऊ आला. म्हणाला, ‘लई किडकी जात आहे डाळिंबाची! इतका फवारा मारला. वर चांगलं दिसतं; पण आत किडलेलं.’ मोसंबीचा बाग पाचव्या वर्षी धरला. खत, पाणी, टाचणी वेळेवर केल्यानं फळांचा आकार चांगला होता. गावातही मोसंबीच्या बऱ्याच बागा होत्या. बागा विकत घेणाऱ्या बागवानाच्या चकरा सुरू झाल्या. एकजण औरंगाबादी भेटून म्हणाला, ‘तुमचा बाग घेतो. दोन पैसे जास्त देतो; पण गावातल्या इतर बागा कमी पैशात जमवून द्या.’

त्याचं हे साटंलोटं लक्षात आलं नाही सुरुवातीला. एक लाख वीस हजाराला बाग घेतो म्हणाला. भावाशी बोलून सौदा पक्का केला. पैसे देऊन माल घेऊन गेला. गावातल्या आणखी बागा त्यानं घेतल्या.

दुसऱ्या वर्षी तो पुन्हा आला. म्हणाला, ‘मुक्यात बाग घेतो.’ बाग फुटण्यापूर्वी सौदा करणे म्हणजे मुक्यात घेणे. दीड लाख ठरले. थोडी रक्कम इसारा दिली. आमचं बघून इतरांच्या बागाही त्यानं मुक्यात घेतल्या. मोसंबीला ताण दिला. पाणी तोडलं. ठराविक ताणानंतर खत-पाणी दिलं. बाग चांगली फुटली. अन्‌ पावसानं तडाखा दिला. बराच बहार गळून गेला. माल कमी लागला; पण फळं चांगली पोसली. बागवानानं माल तोडला.

‘पैशाची थोडी नड आहे. माल विकून उद्या पैसे घेऊन येतो,’ म्हणाला. बागवान ओळखीचा होता. शाळेत शिकत असताना वर्गमित्र होता. गैरविश्वास दाखविणं बरं नाही. मोसंबी तोडून घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी गावातल्या दोघांचा माल तोडला. परत आलाच नाही. निरोप पाठविला.

त्याच्या गावी जाऊन भेटलो, म्हणाला, ‘घाटा आया. ये धंदाही ऐसा है कच्चा. आता माझ्याजवळ पैसे नाहीत; पण मी तुमचे ठेवणार नाही. आले की देतो.’ परत आलो.

काही शेतकऱ्यांशी बोललो. ‘बागवानांची अशीच चाल असते.’ ते म्हणाले, अनेकांना अशाच टोप्या घालतात ते. म्हातारी मेल्याच्या दु:खापेक्षा काळ सोकावल्याचं दु:ख जास्त असतं.

एक पोलिस अधिकारी ओळखीचे होते. त्यांना हे सगळं  सांगितलं. ते हसले, ‘कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये आहे त्याचं गाव?’ त्यांनी विचारलं. मी गाव सांगताच त्यांनी फोन लावला. बागवानाचं नाव, गाव अन्‌ वृत्तांत कथन केला. दुसऱ्या दिवशी त्या पोलिस स्टेशनवरून निरोप आला. तिथं गेलो. तो बागवान मित्र तिथं बसलेला.

इन्स्पेक्टर त्याला म्हणाले, ‘यांचा देणं असलेल्या रकमेचा पुढच्या तारखेचा चेक दे.’ चेक घेतला. पुढं तो पास झालाच नाही. कोर्टात दावा दाखल केला. दोन वर्षं केस चालली. शेवटी त्यानं कोर्टात पैसे भरले. मुद्दलच घेतलं. व्याज नको म्हणून सांगितलं.

या वर्गमित्रास म्हणालो, ‘असं दुसऱ्याशी वागू नको.’

केशर आंब्याची बागही हाताशी आला. औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आंबा बागायतदार संघ स्थापन केला. तज्ज्ञांच्या मदतीनं बागाची निगा सुरू झाली. पहिल्याच वर्षी केशर आंबा निर्यात करण्याची योजना आखली. बागेला खत, फवारणी पाण्याचे नियोजन केले. केशर आंब्याची बाग बहरली. फळ काढणी, प्रतवारी करणं, शीतपेटीतून रवानगी ही कामं पार पाडली.

पहिला कंटेनर निर्यात केला, तेव्हा सर्व सहभागी शेतकऱ्यांना खूप आनंद झाला. एक टप्पा पूर्ण झाला होता. अपेडाकडून आंब्याचे पैसेही आले. गेल्या वर्षी पैठण तालुक्यात पाऊस नेहमीपेक्षा खूपच कमी झाला. दुसरं वर्षही अवर्षणाचं गेलं. शेतात फळबागा वाढल्या होत्या. आंबा, मोसंबी, या फळबागांना पाणी कमी पडू लागलं. डाळिंब, चिकूला पाणी देणं थांबविलं. अगदी फळं पोसण्याच्या वेळेस पुरेसं पाणी देता आलं नाही. शेजाऱ्याकडून पाणी विकत घेऊनही माल मनासारखा पोसला नाही. तिसऱ्या वर्षीही पाऊस सुरुवातीला हजेरी लावून नंतर गायबच झाला. मोसंबीच्या झाडांना, आंब्याला ताण पडू लागला.

गावात अर्ध क्षेत्र मोसंबीचं; पण सगळ्यांची तीच स्थिती झाली. गावात दहा वर्षांपूर्वी पाणलोट क्षेत्राचं चांगलं काम झालं होतं. शिवारात पाण्याची पातळी वाढली होती; पण शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड केली. दहा वर्षांत आहे ते पाणी वापरून टाकलं. त्यात सतत तीन वर्षं अवर्षणाच्या चक्रानं सगळ्या बागा संकटात सापडल्या. पूर्वी गावाकडे जायला उत्साह वाटायचा; पण आता पाण्याअभावी सुकणारी फळझाडं बघितली की पोटात गोळा उठू लागला.

पाणलोट क्षेत्राचं काम केल्यानं गावशिवारात चांगलं पाणी वाढलं होतं; पण अकाली लाभलेली श्रीमंती काहींना पेलवत नाही, टिकविता येत नाही. तसं आम्ही सगळ्यांनी भरमसाठ फळबाग लावून, जमिनीतलं पाणी संपवून टाकलं. ते जपून वापरण्याचा प्रयत्न वेळीच केला नाही. आणि जेव्हा लक्षात आलं, त्या वेळी खूप उशीर झाला होता.

माझे एक ज्येष्ठ कवी लेखक मित्र शेतकरी आहेत. गेली तीस वर्षं आमचा जवळून परिचय आहे. त्यांच्या शेतीतल्या चढ-उतारांचा मी साक्षीदार आहे. त्यांना म्हणालो, ‘प्रयत्न करूनही मी शेतीचं भरकटलेलं तारू सावरू शकलो नाही. खूप पैसे टाकले. मेहनत केली; पण बेभरवशाच्या अनेक गोष्टींनी गाळातच फसत गेलोय. यात माझीही चूक असेल. नियोजन जमलं नसेल; पण वास्तव याहून फारसे वेगळे नाही.’

यावर ते हसून म्हणाले, ‘शेती हा आमचा जगण्याचा श्वास आहे. तिथं आनंद मिळतो हे खरं आहे; पण माझ्यासारख्या अनेकांना शेतीशिवाय पर्यायच नाही. शेतीच्या मृगजळाबद्दल इतके वर्षं आशावादी बोलत आलोय; पण प्रत्यक्ष वास्तव बरंच वेगळं आहे. ते वास्तव सांगायला आज मन धजत नाही.’

‘शेतीत मला हे जमलं नाही, हे कधी तरी स्वत:शी कबूल करणं गरजेचं आहे,’ मी म्हणालो.

Tags: बाबा भांड पाणी गावशिवार पाणलोट क्षेत्र शेती Baba Bhand Water Village Watershed Agriculture weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके