डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुलांच्या वाचन संस्काराकडे डोळेझाक : हा अपराध उद्या फार महाग पडणार आहे

आज जगात पंधरा वर्षांच्या आतील मुलांचा वर्ग जवळपास एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश एवढा आहे. हा महत्त्वाचा वर्ग आहे. या जगातील मुलांत प्रत्येक देशाचे हवामान, वेशभूषा, रीतिरिवाज, राहणीमान, भाषा, खाणं-पिणं या दृष्टीनं काहीशी भिन्नता असेलही; परंतु या वयातील बालकांच्या- मुलांच्या विचारात आणि समजुतीत एक समान सूत्र आहे. ही मुलं जाती, वर्णव्यवस्था आणि संप्रदायाच्या भिंती पाडून टाकतात. याचं कारण त्यांचं अंत:करण स्वच्छ कागदासारखं असतं. त्यांच्यावर आपण जसे संस्कार करू त्याप्रमाणे त्यांची वाढ होत असते.

मुलांसाठी लिहिणं हे जबाबदारीचं, कष्टाचं आणि तसंच अवघड काम आहे. खरं तर प्रथितयश लेखकांनी या वाङ्‌मयप्रकाराचं लेखन मुद्दाम केलं पाहिजे; दुर्दैवानं मराठीत असं फारसं होत नाही. त्यामुळेच साने गुरुजी, ना.धों ताम्हणकर, विनोबा भावे आणि यदुनाथ थत्ते यांची सशक्त बालवाङ्‌याची परंपरा सांगणाऱ्या आजच्या बालसाहित्यात या दशकात नव्या-जुन्या बालसाहित्यिकांची वानवाच दिसते आहे. अशा परिस्थितीत एखादा-दुसरा प्रयत्न ही बालसाहित्य परंपरेच्या दृष्टीनं फारशी अभिमानाची गोष्ट नाही. दर वर्षी बालकुमार साहित्य संमेलनं भरवून हा वाङ्‌मयप्रकार सुदृढ होणार नाही. याउलट मुलांसाठी आस्था असणाऱ्यांनी जबाबदारीच्या भावनेतून स्वत: लिहून हा क्षीण प्रवाह बळकट करण्याचा प्रयत्न करावयास हवा. मराठीत आज मुलांसाठी एक-दोन तपं सातत्यानं कसदार लिहिणारी दहा नावंही ठळकपणे समोर येत नाहीत.

आज बालसाहित्यिक म्हणविणाऱ्या काहींनी त्यांच्या उमेदीच्या काळात बालसाहित्याची काही पुस्तकं लिहिलीत आणि पुढं ह्याच भागभांडवलावर त्यांची यशस्वी कारकीर्द आजतागायत सुरू आहे. खरं तर आपण मुलांसाठी लिहितो, असं अभिमानानं सांगणाऱ्या शिलेदारांनी वर्षाकाठी किमान एक तरी चांगलं पुस्तक लिहिण्याचं व्रत सुरू ठेवलं पाहिजे. हे काम कर्तव्यभावनेतून घडावं, पण असं होत नाही ही आजची स्थिती आहे. कथा, कादंबरी, नाटक हे वाङ्‌यप्रकार लिहून झाले की फुरसतीच्या वेळी, सहज सटर-फटर लिहिणं म्हणजे बालसाहित्य होत नाही. उलट या प्रकारच्या लिखाणातून आपली बालसाहित्यिक निष्ठाही पातळ जाणवू लागते. आपण मुलांसाठी लिहितोय याचा अर्थ आपणास बालसाहित्यिक म्हणवून घेण्यात काहींना कमीपणा वाटत आला असावा. बालसाहित्यिकास इतर वाङ्‌मयप्रकारांच्या तुलनेत प्रतिष्ठा नाही, मान्यता नाही हा चुकीचा समजही याच्या मुळाशी असावा, त्यामुळेच कदाचित बालसाहित्य लेखन करणाऱ्यांच्याच मनात हा न्यूनगंड वाढत असावा. ही सगळी स्थिती बदलावयाची जबाबदारी बालसाहित्य लेखन करणाऱ्यांचीच आहे. त्यांनी या साहित्यप्रकाराकडं जबाबदारीनं तसंच गांभीर्यानं बघितलं पाहिजे. एवढंच नाही तर स्वत:पासून सुरुवात करून, आजची गरज ओळखून मुलांसाठी जाणीवपूर्वक लिहिलं पाहिजे. एकीकडं लेखन हे सामाजिक बांधिलकीचं म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र बालसाहित्याबद्दल अनास्था दाखवायची, हे जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत या महत्त्वाच्या साहित्याची दुरवस्था संपणार नाही.

कोणतंही अक्षर-साहित्य हे मान-सन्मान, पुरस्कार-प्रशस्तिपत्र, अध्यक्षपदगौरववृत्ती आणि गटबाजींच्या कुबड्यांची अपेक्षा करत नाही. उलट ही उसनी तकलादू कवचकुंडलं चांगल्या कलाकृतीचा अन्‌ कलावंताचा करारीपणा बोथट करण्याचंच काम करीत असतात. त्यामुळेच क्षणकाळ गौरवलेली लक्षणीय कलाकृती जनप्रवाहाच्या रेट्यापुढं कधी वाहून जाते हे कळतही नाही आणि जी मागं शिल्लक राहत आलीय,  तिच्याकडं वर्तमानानं लक्षही दिलेलं नसतं, असंच बरेचदा घडत असतं.

मुलं ही कोणत्याही राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांची सुदृढ, निकोप वाढ होणं म्हणजे त्या राष्ट्राची खरी प्रगती असते. ह्या सुदृढतेत सुसंस्कृत, संस्कारित मनाची आणि ज्ञानाची साथ अपेक्षित असते. सुसंस्कृतपणा वाढण्यास मदत करणाऱ्या अनेक प्रवाहांपैकी लेखन, वाचन हा एक मार्ग आहे. यातून बालमनावर चिरंतन संस्कार घडत असतो. नव्या ज्ञान-तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आपली एकविसाव्या शतकातील वाटचाल सुरू झाली असली तरी वाचनाचं महत्त्व कधीही कमी होत नाही, संपत तर नाहीच. जीवनातील विविध क्षेत्रं, ज्ञानाची कवाडं किलकिली करण्यास वाचनाचीच मदत होत असते. बालकांच्या जीवनात वाचन संस्काराचं महत्त्व त्यामुळेच टिकून राहणार आहे. उलट त्यांच्यासाठी उत्तम साहित्य लिहिणाऱ्यांचीच ते चातकासारखी वाट पाहत आहेत. कोणतंही परिवर्तन फक्त बाहेरून होत नाही. त्याची सुरुवात आतून म्हणजे आपल्या स्वत:पासून करायची असते. उद्याच्या रम्य जगण्याची पहाट मुलांनी पाहावी असं ज्यांना मनापासून वाटतंय, त्यांनी आता तरी सुरुवात केली पाहिजे. त्याकरिता स्वत: मुलांसाठी उत्तम वाचलं पाहिजे, तसंच त्यांना ते विकत घेऊन वाचायलाही दिलं पाहिजे. जमत असेल तर त्यांच्यासाठी जबाबदारीच्या भावनेनं लिहिलं पाहिजे.

आपल्या मुलांच्या हौसेखातर आपण त्यांचे सर्व प्रकारचे लाड पुरवतो. उत्तम शाळा निवडतो, चांगल्या शिकवणीची काळजी घेतो, आणखी काय-काय करत नाही? त्याचबरोबर त्यांचं जीवन बदलू शकणाऱ्या वाचन संस्काराकडं मात्र सोयीस्कर डोळेझाक करणं, हा अपराध उद्यासाठी कदाचित फार महाग पडणार आहे. तशी अजून वेळ निघून गेलेली नाही. आज जगाची लोकसंख्या सहाशे कोटीच्या वर झालेली आहे. यात 15 वर्षांच्या आतील मुलांची संख्या जवळपास दोनशे कोटी आहे. भारताचाच विचार केल्यास या वयोगटातील मुलांची संख्या पस्तीस कोटींच्या आसपास भरेल. आज जगात पंधरा वर्षांच्या आतील मुलांचा वर्ग जवळपास एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश एवढा आहे. हा महत्त्वाचा वर्ग आहे. या जगातील मुलांत प्रत्येक देशाचं हवामान, वेशभूषा, रीतिरिवाज, राहणीमान, भाषा, खाणं-पिणं या दृष्टीनं काहीशी भिन्नता असेलही; परंतु या वयातील बालकांच्या- मुलांच्या विचारात आणि समजुतीत एक समान सूत्र आहे. ही मुलं जाती, वर्णव्यवस्था आणि संप्रदायाच्या भिंती पाडून टाकतात. याचं कारण त्यांचं अंत:करण स्वच्छ कागदासारखं असतं. त्यांच्यावर आपण जसे संस्कार करू त्याप्रमाणे त्यांची वाढ होत असते. बालकांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम संस्कारांची आवश्यकता असते.

हा संस्कार कुटुंब, परिसर आणि उत्तम वाचनातून होत असतो. मुलांसाठी चांगलं साहित्य हा संस्कार समृद्ध करण्यास मदत करीत असतं. या संदर्भात आजच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या जमान्यात बालकांची मानसिकता आणि बालसाहित्य लेखकांची जबाबदारी याचा विचार करणं गरजेचं आहे. बालसाहित्य लिहिताना लेखकाला बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची तोंडओळख असणं आवश्यक आहे. यासाठी बालकांचं निरीक्षण आवश्यक आहे. ‘1960 नंतर बालमानसशास्त्रीय अभ्यासात बऱ्याच उलथापालथी झाल्या. बालमानसशास्त्रीय अभ्यासाचं नवं रूप डॉ.टॉ बॉवर या अमेरिकन बालमानसशास्त्रज्ञाने मांडलं आहे. त्यांनी आपल्या संशोधनातून असे सिद्ध केलं आहे. अर्भकाच्या मनोविकासात अनुभववाद आणि सहज ज्ञानवाद यांचा समन्वय आढळून येतो. त्यांच्या मते बालकं अर्भकावस्थेत अनुकरणशील होतात. त्यांना जन्मत:च आपल्या आईचं अनुकरण करता येतं. मात्र कौशल्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. डॉ. बॉवर यांनी शोधून काढलेल्या आणि आधुनिक बालमानस शास्त्रात विशेष महत्त्व पावलेल्या पुढील दोन गोष्टी आहेत.

1. अगदी जन्मत:च बालकं अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियांध्ये, गुंतागुंतीच्या खेळण्यात व खेळात, गुंतागुंतीच्या अनुभवात विशेष रस घेतात आणि एकदा तो गुंता सुटला की पुन्हा ती बालकं त्या गोष्टींकडे ढुंकूनही बघत नाहीत.

2. मुलांचा अगदी सुरुवातीपासून प्रत्यक्ष ज्ञानावर भर असतो. हे प्रत्यक्ष ज्ञान (परसेप्शन) जास्तीत जास्त प्रमाणात रूपांशी निगडित असते. हे प्रत्यक्ष ज्ञान वाढत जातं तसतशी त्यांची प्रत्यक्ष ज्ञानाची अवस्था कमी कमी होत जाते. रंग, रूप आणि रसस्पर्शादी संवेदना वाढत जातात. याचा अर्थ बालकांच्या विकासावस्थेत हळूहळू संवेदनांचं जग आकाराला येऊ लागतं. त्यामुळे याविषयीचं कुतूहल बालकांना गतिशील ठेवतं.’ वरील संदर्भात मुलांसाठी जाणीवपूर्वक लेखन करणाऱ्या आजच्या लेखकांना या सिद्धांताची माहिती असणं आवश्यक आहे, आज  सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आहे, यात टी.व्ही., रेडिओ, सी.डी., कॅमेरा, खेळणी या सर्वांचा पदोपदी संबंध येत आहे. या संदर्भात एक प्रसंग सांगतो : माझ्या एका छोट्या दोस्तास मी बालकवितेचं पुस्तक वाचावयास दिलं. त्यात आगगाडी ही कविता होती.

गाडी आली गाडी आली

झुक झुक झुक

शिटी कशी वाजे बघा कुक कुक

इंजिनाचा धूर निघे भक भक

माझ्या या छोट्या दोस्तानं वाफेवर चालणारी गाडी पाहिली नव्हती. कूक अशी शिटी ऐकली नव्हती. तो म्हणाला, ‘गाडी तर ट्राँऽऽ शिटी वाजवते. आणि गाडी धूर तर सोडीतच नाही.’ एके काळी आगगाडी या कवितेनं सारी बालकमंडळी झपाटली होती. आगगाडीचं कृतिगान गात, खेळ चालायचा. पण आजच्या युगात ही गाजलेली कविता बाद झाली आहे. तिचा संदर्भ बदलला आहे. मला वाटतं, अनेक बालवाङ्‌यकारांना आता यासारख्या संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ असा नाही की हे विषय बालसाहित्यातून बाद झालेले आहेत. विषयाचं स्वरूप बदललं आहे, संदर्भ बदलला आहे. नव्या उपकरणांशी, नव्या साधनांशी जुळवून घेत लेखकांना बालसाहित्य निर्मितीचा विचार करणं गरजेचं आहे.

एके काळी विहिरीवरची मोट, मामांच्या मळ्यात दंडानं झुळझुळ वाहणारं बालगीतातलं पाणी घरातल्या नळातून धोऽधोऽऽ वाहू लागलं आणि आज पाण्यावर तरंगणारी इलेक्ट्रॉनिक्सची होडी दिसू लागली आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे खेड्यापाड्यांतील झोपडीपर्यंत पोहोचली आहेत. अगोदर रेडिओ स्वस्त झाला. तो घराघरांत पोहोचला. मुलांच्या कानांवर गाणी पडू लागली. आजचं गीतांचं आणि गाण्यांचं स्वरूप भलतंच बदलत गेलंय. व्हीसीडीनं तर आज परिसीमाच गाठली आहे. जे मोठ्यानं चारचौघांत ऐकू नये, बघू नये, असं सगळं खुल्लमखुल्ला दाखविलं जाऊ लागलं आहे. पंचवीस वर्षांत या माध्यमानं फार मोठी मजल गाठली. दृक आणि श्राव्य या गुणांमुळे तो लोकप्रिय झाला आहे. आज अनेक घरातील मुलं टी.व्ही.समोर खिळून असतात. त्यांच्या बघण्यात व्यत्यय आला की चिडतात. बैठकीत पाहुणे आले तरीही टी.व्ही. बंद करू देत नाहीत. आवाजही कमी करू देत नाहीत. या बालकांचं मैदानावरचं खेळणं, मोकळ्या हवेतलं बागडणं, आजी-आजोबांकडून चांगल्या गोष्टी ऐकणं हे सगळं संपून गेलं आहे.

मुलांना खिळवून ठेवण्याचं, करमणूक करण्याचं सामर्थ्य टीव्हीसारख्या साधनात आहे. उलट हे काम मुलांच्या पाठ्यपुस्तकाने करावयास हवं. त्यातील कविता, गोष्टी मुलांना खेचून घेऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर आजचं बालसाहित्यही त्यांना आकर्षित करत नाही. त्यामुळेच मुलांसाठी म्हणून असणारी ही पुस्तकं फारशी वाचली जात नसावीत. टीव्ही, व्हीसीडीच्या आक्रमणामुळे मुलांचं भावविश्व हरवलं आहे. उलट आज ती चटपटीत आणि धीट झाली आहेत. कान ओढणं, केस ओढणं हे बालसुलभ मारामारीचे प्रकार आता बंद झाले आहेत. ढिशाँव ढिशाँव करीत मुलं आज फायटिंग करतात. कराटेही वापरतात. इतकंच नव्हे तर बालवाडीतील बालकं टीव्ही.वरील प्रेप्रकरणं पाहून लव्ह-किस या दृश्यांनी फारच शहाणी झाली आहेत. असली दृश्य पाहतापाहता ‘लव्ह हो रहा है, अभी कीस करेगा’, ही भावी सूचना ते आता देऊ शकतात. मुलांच्या खेळण्यातही फार मोठा बदल झाला आहे. नंदीबैल, बैलगाडी, सागरगोटे, चिंचोके, गोट्या मागे पडल्या आहेत. टीव्हीतल्याप्रमाणे मुलं लुटपुटीच्या लढाया खेळत आहेत. ही शस्त्रं मुलांच्या हाती द्यावीत का, हा प्रश्न जागतिक पातळीवरचा झाला आहे. संगणक, दूरध्वनी, मोबाईल फोन, विमानं, इलेक्ट्रॉनिक्सशी मुलांची ओळख ही काळाची गरज आहे; परंतु त्या संबंधीच्या बदलांच्या अभ्यासाची आणि पूरक वाचनसाहित्याची गरज आहे.

या विषयावर लिहिणाऱ्या लेखकांनी या प्रकारचं साहित्य मुलांसाठी तयार करावयास हवं. आताच्या मुलांचं भावविश्व क्रांतिकारकपणे बदललं आहे. मुलांची वाचनक्षमता आणि लेखनक्षमता धोक्याच्या पातळीपर्यंत घटली आहे. मुलांना वाचन-लेखनाकडे वळवण्यासाठी आजचे बालसाहित्य पुरेसं होत नाही. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात नव्या उमेदीने आजच्या मुलांचं मानसशास्त्र जाणून त्यांना आकर्षित करणारं साहित्य निर्माण करण्याची कामगिरी लेखकांना करायची आहे. आपण जे बालसाहित्य लिहितो ते मुलांना कितपत आवडेल याचा विचार सर्व लेखकांना करावा लागणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारचं साहित्य असावं, असं ठामपणे सांगणंही तितकंच अवघड आहे. तरीही आजचे जे सर्वसामान्यांचे जगण्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांनाही बालसाहित्याने स्पर्श केला पाहिजे. आज जातपात- धर्मापेक्षाही मोठा प्रश्न पर्यावरणाचा झाला आहे. पाणी टंचाईचं भीषण संकट जगापुढं आहे. त्यामुळं पाणीसंवर्धन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडं-वनस्पती वाढवणं, ही बाब महत्त्वाची आहे. ज्ञानाची कास धरून विज्ञानाने प्रयोगशीलता कशी वाढीस लागेल, हाही विचार उद्याच्या बालसाहित्य लेखकांना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या संगतीने करावा लागणार आहे. हे सारं होत असताना माणसातील माणूसपण हरवून जाणार नाही, माणसातील करुणा बधिर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. हे सगळं अवघड आहे, जोखमीचं आहे. तरीही जबाबदारीचं आहे. त्यासाठी तरुण लेखकांनी कंबर कसून जबाबदारीनं लेखन केलं पाहिजे.

Tags: डॉ.टॉ बॉवर balamanasshastra बालमानसशास्त्र vachanacha mahattva वाचनाचं महत्त्व paryavarn पर्यावरण balsahitya बालसाहित्य yadunath thatte यदुनाथ थत्ते vinoba bhave विनोबा भावे mahanor ना.धों ताम्हणकर sane guruji साने गुरुजी mulanchya vachan sanskarankade dolejhak : ha aparadha udya far mahag padanar ahe मुलांच्या वाचन संस्काराकडे डोळेझाक : हा अपराध उद्या फार महाग पडणार आहे baba bhand बाबा भांड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके