डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धर्माचं बालमन कळवळून निघालं. अंगावरचे ओले कपडे अंगाला घट्ट चिकटून बसले होते. त्यात गुरुजींनी शिक्षा केली. एकच गणवेश असल्याने त्याच कपडयात शाळेत यावे लागत होते. पावसात ते कपडे भिजल्याने दुसरा जोडही नव्हता.

गेल्या आठवड्यापासून पावसाला तोंड फुटलं होतं. क्षणभर थांबायला तयार नव्हता. सगळीकडे चिखल झाला होता. डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले होते. घरे गळू लागली. ओले कपडे वाळत नव्हते. अगदी आंबट कुबट वास येत होता त्यांना.

माणसं अगदी कंटाळली होती.

गेल्या महिन्यापासून वाट बघून ऐन वेळी पावसाने खूप झोडपून काढलं होतं.

थोडीसुद्धा उसंत घेता तो सतत बरसत होता. गळू फुटल्यागत पाण्याचा निचरा होत होता. आज थोडी उघडझाप होईल असं वाटायचं. परंतु दुपारी पुन्हा आकाशात ढग दाटून येत. वाट चुकलेले ढग धसमुसळेपणा दाखवीत. अनावर होऊन पावसाला सुरुवात होई.

छोटा धर्मा सादळलेल्या कपड्यांत संत तुकाराम वसतिगृहाच्या दाराशी उभा होता. बगलेत दप्तराची पिशवी होती. तीसुद्धा काहीशी ओलसर लागत होती.

आता पाऊस उघडेल, थोड्या वेळात पाऊस उघडेल या आशेने तो बराच वेळ उभा होता.

आजही शाळेत जाण्यास उशीर होणार या विचाराने तो मनात खट्ट झाला. त्याहीपेक्षा एक अनामिक भीती तळपायाच्या थंड फरशीपासून डोक्यापर्यंत चढत गेली. उशीर झाला तर?

शाळेच्या दाराशी उभ्या असलेल्या जाधव सरांशी गाठ आहे, हा विचार त्याच्या डोक्यात आला. आकडेदार मिशाचे, राकट चेहऱ्याचे जाधव सर त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले.

कालही त्याला थोड़ा उशीर झाला होता. पाऊस उघडत नव्हता, म्हणून तो थोडा वेळ थांबला होता. शाळेत पोहोचला त्यावेळी दहा मिनिटे उशीर झाला होता.

जाधव गुरुजी गेटजवळ उभे होते. त्यांनी धर्माला थांबविले.

“काय रे धर्मा? आजही उशीर केलास? त्यांनी दरडावून विचारले.

पाऊस येत होता सर.

“इतर पोरं येऊ शकतात. तू एकटा पावसात विरघळून गेला असतास का?

धर्मा गप्प उभा होता.

गुरुजींनी सपासप दोन छड्या हातावर ओढल्या.

धर्माचं बालमन कळवळून निघालं. अंगावरचे ओले कपडे अंगाला घट्ट चिकटून बसले होते. त्यात गुरुजींनी शिक्षा केली. एकच गणवेश असल्याने त्याच कपडयात शाळेत यावे लागत होते. पावसात ते कपडे भिजल्याने दुसरा जोडही नव्हता.

हे गुरुजींना कसं सांगायचं?

धर्मा तसाच वर्गात येऊन बसला.

त्याचं वर्गात लक्ष लागत नव्हतं. आजूबाजूची मुलं कोरड्या कपड्यात आली होती. तो मात्र सादळलेल्या कपड्यात होता. ओल्या कपड्यामुळे अंगाला गुथा आल्या होत्या. रात्री कपडे वाळायला टाकले होते. परंतु ओल्या हवामानामुळे कपडे वाळत नव्हते.

कालचा प्रसंग आठवून धर्मा आणखी, बेचैन झाला. काल आपण उशिरा शाळेत गेलो. गुरुजींनी नेहमीप्रमाणे शिक्षा केली. शिक्षेपेक्षा ओल्या कपड्यात आठ तास वर्गात बसणं कठीण काम होतं.

आजही पाऊस कोसळतोय.

मनातल्या मनात त्याने पावसाला खूप शिव्या घातल्या. तुला इतकं यायचं होतं तर माझ्या कपडयाची सोय करायची होती, असंही त्याने पावसाला खडसावलं.

असं किती वेळ उभं राहायचं? धर्माने इकडेतिकडे बघितलं. संत तुकाराम वसतिगृहापासून पाचेक मिनिटांच्या अंतरावर त्याची शाळा होती. पळत गेला असता तर आणखी कमी वेळ लागला असता.

पण पावसात पाय ठेवला की अर्धवट ओले कपडेही चिंब भिजून जातील. तसं वर्गात कसं बसायचं? पुन्हा समोर जाधव गुरुजींशी गाठ!

यापूर्वी धर्माला कपड्याचा कधी प्रश्न पडला नव्हता. एकच गणवेश तो फाटेपर्यंत गेली पाच वर्षे नियमित वापरीत असे. शाळा सुरू झाली की वडील एक सायकल छाप शर्ट आणि खळीची खाकी चड्डी शिवायचे. मग त्याला वर्षभर कपड्यांची फिकीर नसायची.

सुट्टीच्या दिवशी रविवारी तो कपडे धुऊन वाळवायचा. पुन्हा आठ दिवस फिकीर नसायची. गावी आणखी एक सोय होती. फाटक शर् घालून शाळेत गेलं तरी काही वाटायचं नाही. आजूबाजूला बरीचशी पोरं फाटक्या कपड्यात असायची. पोरींचे परकर झंपरही तसेच असायचे.

सातवीपर्यंत धर्मा गावीच खेडयात शिकला होता. यावर्षी आठवीसाठी शहरात औरंगाबादी आला होता. औरंगाबादी येण्याचं आणखी एक कारण होतं.

धर्माला सातवीच्या बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळाले होते. त्याच्या गावच्या गुरुजींनी त्याला औरंगाबादेत आणून संत तुकाराम वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला होता.

वसतिगृहाजवळील महात्मा फुले हायस्कूलमध्ये त्याचे नाव घातले. खेड्यातील धर्मा पहिले काही दिवस थोड़ा गोंधळला. शहरातील चटपटीत कपड्यांतील मुलामुलींना बघून तो बुजायचा.

गावाकडे वर्गात दहा-बारा मुले असायची. इथे मात्र पन्नास साठ मुलांचा मोठा वर्ग होता. सगळेजण अनोळखी होते. शाळेत आल्याच्या चौथ्या दिवसाला पावसाला सुरुवात झाली. आज आठ दिवस होऊनही तो थांबत नव्हता.

शाळेत यायला उशीर नको म्हणून धर्मा पावसात भिजत शाळेत आला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. तिसऱ्या दिवशी थोडा पाऊस थांबेपर्यंत तो वसतिगृहाच्या दाराशी थांबला. नंतर शाळेत आला. शाळेत उशीर झाल्याबद्दल त्याला छड्या खाव्या लागल्या होत्या. आपल्याकडे कपडयाचा एकच जोड आहे. पाऊस असाच येत राहिला तर? डोक्यावर घेण्यासाठी इथं पोतंसुद्धा नाही. मग छत्री कोठून आणायची?

तो शाळेत नवीन असल्यामुळे कोणाला अडचण सांगता येत नव्हती.

धर्माने विचार केला. कपड्याचे दोन जोड असते तर...

पुन्हा त्याने हा विचार मनातून झटकून टाकला.

कपड्याचा एक जोड करण्यासाठी वडिलांनी आठवड्याची मजुरी खर्च केली होती, दुसरा जोड़ घ्यायचा म्हणजे आठ दिवसांची मेहनत.

कपड्यासाठी इतके पैसे खर्च करणं चांगलं नाही, या विचाराने दुसऱ्या जोडाचा विचार त्याने हाकलून लावला.

नाहीतरी काय करायचे, कपड्यांचे दोन दोन जोड? नुसती पैशाची नासाडी. कपडे म्हणजे काही चैनीची बाब नाही. त्याहीपेक्षा दोन चार गोष्टींची पुस्तकं विकत आणावीत. नवी माहिती पुस्तकांत वाचायला मिळते.

कपड्यांचा एक जोड घातला की दुसरा रिकामा पडून असतो. पुस्तकाचं तसं नसतं. एक वाचलं, की ते डोक्यात पुरतं जाऊन बसतं. मग ते पुस्तक बाजूला ठेवलं तरी वाचलेलं विसरता येत नाही.

या विचाराने धर्मानं आतापर्यंत वीस-बावीस पुस्तके विकत घेतली होती. सुंदर कव्हर लावले होते त्यांना. चांगल्या अक्षरांत पुस्तकाचे नाव आणि त्याखाली हे पुस्तक धर्मा पवारची मालमत्ता आहे, अशी ओळ लिहिली होती. पुस्तकांना तो खूप जपायचा. कपडयांपेक्षाही जास्त.

त्याच्या आईवडिलांनासुद्धा त्याचं कौतुक वाटायचं. खाऊसाठी दिलेले पैसे धर्मा पुस्तकांसाठी खर्च करायचा. नवं पुस्तक विकत आणलं की वाचून होईपर्यंत, तो बैठक मारायचा. वाचलेली गोष्ट, माहिती सगळ्या मित्रांना सांगायचा.

यामुळे कपड्यांची त्याला फारशी हौस नव्हती. आवड नव्हती. पुस्तकांनी मात्र त्याला चांगला लळा लावला होता.

औरंगाबादला आल्यावर धर्माची वाचनाची चंगळ झाली होती. संत तुकाराम वसतिगृहात गोष्टींची खूप पुस्तके वाचायला मिळत. आणखी वर्तमानपत्रांतील दूरदूरच्या बातम्या वाचताना त्याला गंमत वाटायची.

दूरगावी बस नाल्यात पडली, की ताबडतोब वर्तमानपत्रवाल्यांना कसं कळतं, याचं त्याला आश्चर्य वाटायचं.

चुकता धर्मा वर्तमानपत्र वाचू लागला होता. गमतीजमती जमवू लागला होता. परंतु पावसानं अडचणीत आणलं होतं. एकच कपड्याचा जोड वाळत नव्हता. ओले कपडे अंगावर चढवून बसणं त्रासाचं काम होतं.

नेमकी शाळा भरण्याच्या अगोदर पावसाला सुरुवात व्हायची. तशात शाळेत येण्यास निघणं म्हणजे आणखी भिजणं.

उशीर झाला की जाधव सरांशी गाठ आहे.

कालचा मार आणि त्याहीपेक्षा अपमाजाने धर्मा आतून हादरून गेला होता. चुकीबद्दल मार खाल्ल्याचं काही नाही, पण काहीही चुकी नसताना गुरुजी मारतात, उशिरा येण्याचे कारणही ऐकून घेता शिक्षा करतात.

त्यानं ठरविलं.

आज मुकाट्याने छड्या खाण्यापूर्वी गुरुजींना उशिरा येण्याचं कारण सांगायचं.

धर्मानं कपड्याच्या पिशवीतील दप्तर बगलेत मारलं आणि शाळेच्या रस्त्याने धूम मारली. पाऊस थांबला नव्हता. उलट जोराच्या सरी येऊ लागल्या. धापा टाकीत तो शाळेच्या आवारात शिरला. जाधव गुरुजी समोर होते.

“सुकळीच्या थांब, शाळा म्हंजी काय भटारखाना वाटला व्हय रे पोट्टया. गुरुर्जीची तार लागली होती. धर्मा निर्धाराने थबकला.

ऐकू येतं का? वाबाचा बेटा आहेस का उशिरा यायला? कुठून येतोस शाळेत?

तुकाराम वसतिगृहातून.

“वाs  वाs ... म्हणजे सरकारचे जावाई तुमी. कवा यावं, कवा जावं. तुम्हाले कोण बोलणार?

सर, सारखा पाऊस येत होता.

उलटून बोलतोस बोटया. मग काय तुला मोटार पाठवायची व्हती? गुरुजींनी छड़ी उगारली.

“दोन-तीन दिवसांपासून कपडे ओले आहेत.

बोलू नगस जास्त." म्हणत त्यांनी एक फटकारा लगावला.

ओठा दातांखाली दाबून धर्मानं कळ सहन केली. पुढं काय करावं त्याला सुचेना. वर्गात जाण्यासही मन तयार नव्हतं.

क्षणभर थांबून तो चालू लागला.

कुठ जावं?

वर्गात ओल्या कपड्याने बसता येईल. पण जाधव गुरुजींच्या छडीचा वळ सलत राहणार, दिवसभर ती कळ त्रास देणार.

तो सरळ मुख्याध्यापकांच्या खोलीपर्यंत चालत आला.

मी आत येऊ सर?

काय रे, काय झालं? शाळेत आता येतोस का?

हो सर, गेले तीन दिवस शाळेला उशिरा येतोय. नियमित मार खातोय.

म्हणजे..." चमकून मुख्याध्यापकांनी विचारलं.

नाही. मी चांगला आहे. सर माझी एक अडचण आहे.

कसली अडचण? मुख्याध्यापक धर्माचे मार्कस् बघून तो हुशार विद्यार्थी असल्याचे, ओळखून होते.

“पाऊस उघडेपर्यंत मी शाळेत येणार नाही, कृपया मला तशी परवानगी द्या.

“पावसाचा आणि शाळेत येण्याचा काय संबंध."

“आहे. हे माझे कपड़े. पाऊस आहे तोपर्यंत ते भिजत राहणार. ओल्या कपड्यानं वर्गात बसलं की अंगभर गुथा होतायत. पाऊस उघडेपर्यंत थांबलो तर शाळेत यायला उशीर होतोय. उशीर झाला की जाधव सरांनी... धर्मा थांबला मधेच.

मुख्याध्यापक म्हणाले, थांबलास का? बोल ना! जाधव सरांनी मारलं, असंच ना.

“हो सर! मार खाण्याबद्दल काही वाईट वाटत नाही, पण ते ऐकून घेण्यास तयार नाहीत.

काय ऐकायचं?

माझ्याकडे एकच कपड्याचा जोड आहे. एवढं बोलून त्यानं मान खाली घातली.

मुख्याध्यापक पवारांनी क्षणभर विचार केला. शाळेतर्फे तुला एक गणवेश घेऊन देतो, पवार म्हणाले.

“नको सर! पुढील आठवड्यात माझी स्कॉलरशिप मिळेल. यावेळी पुस्तकं घेता मी आणखी एक गणवेश घेईन. पवारसरांना कोड पडलं. हा पोरगा अस का बोलतो? त्यांना त्याचं कौतुकही वाटत होतं.

पवारसर शेवटी म्हणाले, तुझी इच्छा. मी आग्रह करीत नाही. पुन्हा विचार करून तुझा विचार सांग. धर्मा कार्यालयाबाहेर पडला. पुन्हा आत येऊन त्याने विचारले, मला सुट्टी मिळेल का सर?

पवार हसले. जा, कपडे वाळल्यानंतर शाळेत ये.

धर्मा शाळेबाहेर पडला.

पावसाने पुन्हा जोर धरला. डोक्यावरून पाणी निथळत होतं. धर्मा पावसात भिजत संत तुकाराम वसतिगृहाकडे चालू लागला.

त्याला पावसाचा मनातून खूप राग येत होता. या आठवड्यात मिळणारी स्कॉलरशिप कपड्याच्या दुसऱ्या जोडासाठी खर्च करण्याची त्याची इच्छा नव्हती.

पण पाऊस उघडत नाही, तर कपडे घ्यावेच लागणार होते. शाळेकडून फुकटचे कपडे घेण्यापेक्षा स्वतःच्या कमाईतील पैशातून कपडे घेणं चांगलं.

यामुळे गोष्टींची पुस्तकं त्याला घेता येणार नव्हती, याचं मात्र त्याला पुन्हा पुन्हा वाईट वाटत होतं.

Tags: वसतिगृह औरंगाबाद पुस्तकं कपड्यांचा जोड बाबा भांड vasatigruh Aurangabad pustka paus kapdyancha jod baba bhand weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा भांड,  औरंगाबाद
baba.bhand@gmail.com

लेखक, कादंबरीकार व प्रकाशक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके