डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गदिमांच्या सौभाग्यवतींनी दोन हंडे पाणी तापवून प्रथम त्यांना आंघोळ घातली. गदिमांनी एक न्हावी उठवून आणला. त्याने चौघांच्या पायात मोडलेले काटे काढले. गदिमा भर रात्री पळापळ करून जेवणाच्या सामानाची जुळवाजुळव करताहेत. पुरणपोळीचा बेत. तळमजल्यावर राहणाऱ्या दीनानाथ मंगेशकरांची मोठी मुलगी पोळ्या लाटायला मदत करत असलेली. गदिमा म्हणाले, ‘‘अगं लता, पोळ्या कसल्या लाटतेस? हे पाहुणे फार मोठे आहेत. त्यांच्यासाठी गाणं म्हण!’’ पाहुणे थकलेले, घोरायला लागलेले. गदिमांनी त्यांना जागे केले

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा जगातील क्रांतिकारकांच्या इतिहासात एक नंबरचा इतिहास आहे. क्रांतिकारक आणि हुतात्मे यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या अंगाने अभ्यास, संकलन आणि मांडणी मराठीत आजवर फारशी झालेली नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा थोडाफार अपवाद वगळला तर क्रांतिकारकांचे स्वभाव, कृती, विचार, शैली, रूप, आवाज, व्यक्तिमत्त्व या बाबी इतिहासाच्या पडद्याआडचे गूढच राहिले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सोनेरी पान म्हणजे ‘सातारचे प्रतिसरकार’. या पर्वाचाही खराखुरा इतिहास पूर्णपणे समोर आलेला नाही. केवळ चव्वेचाळीस महिने चाललेल्या या चळवळीने जगभर खळबळ माजविली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीचे बळी ठरलेल्या जगातल्या सर्व लहानमोठ्या देशांतील क्रांतिकारकांना या चळवळीने प्रेरणा दिली. या चळवळीचे निर्विवाद नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी क्रांतिवीरांचे मोहोळ निर्माण केले. डॉ. उत्तमराव पाटील यांनी आपल्या ग्रंथात म्हटले आहे की, ‘‘श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत पेलला असे पुराणकथा सांगते. कांतिसिंहांनी साताऱ्यात उभे केलेले प्रतिसरकार मात्र क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी या दोन प्रमुख खांबांवर उभे होते. हा वास्तव इतिहास आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे स्वातंत्र्यसैनिकांना दिले जाणारे निवृत्तिवेतन न घेणारे स्वातंत्र्यसेनानी आहेत. सातारची ‘आझाद हिंद फौज’ या फौजेचे ते संघटक नेते आहेत. कुंडल बँक लूट, सुर्ली घाट पोस्टमन लूट, शेणोलीचे स्पेशल लूट, धुळे साडेपाच लाखांचा खजिना लूट, सातारा जेल फोडून बाहेर पडलेले क्रांतिवीर, सोनवडे येथे समोरासमोर गोळीबार करून पोलिसांना पळवून लावणारे लढवय्ये, हु. किसन अहिर, हु. नानकसिंग, हु. बाबुराव कोकाटे, हु.

प्रताप पाटील अशा हुतात्म्यांचे सहकारी नेते आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नागनाथअण्णांचे शौर्य, त्याग, समर्पण, कष्ट यांचे या पेक्षाही अधिक तपशिलाने खोलात जाऊन दर्शन घेता येईल. सातारच्या चळवळीत पहिले हत्यार गोव्यातून आणणारे शस्त्रसंकलक अशीही त्यांची ओळख आहे. मृत्यूचे कफन डोकीला बांधून जिवाची पर्वा न करता चळवळीत लढणारा भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषबाबू यांच्या पावलावर पावले टाकणारा, आश्चर्यकारकपणे जिवंत राहिलेला आणि स्वतंत्र भारतात हुतात्म्यांची जिवंत स्मारके उभारणारा ‘जिवंत हुतात्मा’ अशा शब्दांत जबाबदार अभ्यासकांनी त्यांचे वर्णन केलेले आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णांची स्वातंत्र्यसेनानी म्हणून असलेली ओळख बरोबरच आहे. ही ओळख अतिशय महत्त्वाचीही आहे, पण क्रांतिवीर अण्णांची एवढीच ओळख पुरेशी नाही. स्वातंत्र्य चळवळीत अशाच प्रकारचा त्याग करणारी आणखी चारदोन नावे सांगता येतील. बहुतेक सगळे स्वातंत्र्यसैनिक चळवळीतल्या ऐतिहासिक त्यागाच्या कैफातच स्वतंत्र भारतातले आपले अनमोल जीवन जगत राहिल्याचा क्लेशदायक अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. नागनाथअण्णांनी राजकीय स्वातंत्र्य जाहीर होताच खऱ्याखुऱ्या सर्वंकष स्वातंत्र्यासाठीचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध अपुऱ्या सामग्रीनिशी सुरू केले आणि या घडीपर्यंत निष्ठेने लढविले. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढवणार असल्याच्या आश्वासक हालचाली आजही चालू ठेवल्या आहेत. नागनाथअण्णांच्या आयुष्यभराच्या अस्वस्थ, अथक प्रयोगक्षम चळवळींतून खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचे स्वप्न आता धरणग्रस्त, साखर कामगार, छोटे कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, असंघटित कामगार, स्त्रिया यांच्या डोळ्यांत तरळू लागले आहे. मला वाटते अण्णांचे नेके वेगळेपण त्यांच्या या प्रतिभासंपन्न क्रांतिकारी लढ्यात आहे.

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अण्णांनी चळवळीतल्या अनेकांचे अनेक रंग पाहिले. सत्तातुरांचे संधिसाधूपण त्यांच्या तरुण क्रांतिकारी मनाला खोल जखम करून गेले. न तपासताच उघडे पडलेले काहींचे उथळ तळ अण्णांना व्यथित करून गेले. देशभर असंख्य हालचाली, उलथापालथी वेगाने घडत होत्या. नवनवे पक्ष तयार होत होते. बोलभांड (पोजी) नकली भूमिका घेणाऱ्या पुढाऱ्यांची चलती होती. महाराष्ट्रात छोटे छोटे चिंचोळे पक्ष तयार करण्यात कळप करून राहिलेले नेते रस घेत होते. डोकीवरून पदर का खांद्यावरून पदर या मतभेदांना महत्त्व आले होते. यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांचे आणि नागनाथअण्णांचे व्यक्तिगत संबंध प्रेाचे होते. तिघांनीही आपापल्या परीने अण्णांना काँग्रेसमध्ये नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तसे घडले नाही. एस.एम. अण्णांनी तार करून समाजवादी पक्षात दाखल होण्याचे निमंत्रण दिले. अण्णा शांतच राहिले. 26 फेब्रुवारी 1947, हुतात्मा किसन अहिर आणि हु. नानकसिंग यांचा पहिला स्मृतिदिन. क्रांतिसिंह नाना पाटील अध्यक्ष होते. साने गुरुजी प्रमुख पाहुणे होते. कॉ. दत्ता देशमुख प्रमुख उपस्थित होते. हजारो नागरिक साश्रू नयनाने सभा ऐकत होते. नागनाथअण्णा म्हणाले, ‘‘मी बालपणीच अण्णांच्या (नाना पाटील) चळवळीत सहभागी झालो आहे. मी माझे जीवन क्रांतिसिंहांच्या शब्दाला वाहिले आहे. सोनवाड्यात (हुतात्मा नगर) गोळीने दिशा थोडी बदलली असती तरी मी हुतात्मा झालो असतो.

पण माझा त्याग कमी पडला असावा. उरलेल्या आयुष्यात मी तो त्याग करणार आहे. मी जिवंत हुतात्म्याचे जीवन जगणार आहे. हुतात्म्यांची अपुरी स्वप्ने पुरी करण्यासाठी झगडणार आहे. कॉ. दत्ता देशमुखांनी मला साथ करावी. अण्णा आणि गुरुजींनी आशीर्वाद द्यावेत. मार्गदर्शन करावे.’’ नागनाथअण्णा हे अव्वल दर्जाचे क्रांतिकारी राजकारणी आहेत. शिक्षण, शेती, क्रीडा, कामगार आणि सहकार क्षेत्रातले रचनात्मक कार्यकर्ते आहेत. शोषणमुक्ती, सामाजिक समता आणि उत्पादकता हे त्यांचे परवलीचे शब्द आहेत. अण्णा शब्दाळ नाहीत. मूक कृतिशील आहेत. त्यांना प्रत्येक रचनात्मक कामाचे ठोस फळ कष्टकरी जनतेच्या पदरात टाकायचे आहे. प्रत्येक लढाईत भांडवली आणि धर्मांध जातीयवादी वृत्तीला दोन पावले का होईना पाठीमागे सारायचे आहे. माणसातल्या स्वार्थी वृत्तीचा बीमोड करायचा आहे. अण्णा हे हाडाचे सेनानी आहेत. त्यांना परिवर्तनाच्या लढाईत अपराजेय प्रभावी पावले टाकणारी लढाऊ कार्यकर्त्यांची फौज उभी करायची आहे. त्यांचा प्रत्येक शब्द काळजाच्या तळातून येतो. त्यांचा शब्द काळ्या दगडावरची रेघ असतो. नागनाथअण्णांच्या बरोबर होणारा प्रत्येक संवाद हवाहवासा असतोच असे नाही. त्यात डाफरणे असते. रागावणे, खडसावणे, इशारा देणे, निर्धार व्यक्त करणे असे असंख्य उग्र ंगल दाहक भावरंग असतात. अण्णांशी संपर्क आणि संबंध प्रस्थापित करणेही असेच अवघड असते. ते भूमिगत असतात. एकटे एकाकी असतात. डोंगरदऱ्यांत निवडक विश्वासू सहकाऱ्यांसह तळात घुसून काम करत असतात. रात्री झोपण्यासाठी चार चार जागा बदलत असतात. प्रसिद्धी पराङ्‌मुखता त्यांच्या आवडीची आहे. चार-चार महिने ते नागर समाजात येत नाहीत. फोटोसाठी पोज देऊन कधीच उभे राहात नाहीत.

पत्रकारांना मुलाखती देत नाहीत. सभा, सं ेलने, परिषदा, समारंभां ध्ये मंचावर मिरवत नाहीत, मेजवान्या झोडत नाहीत, कौतुक-स्तुती ऐकून घेत नाहीत, शिष्टाचारही पाळत नाहीत, विनंती धुडकावून लावतात. परिणामांची तमा न बाळगता त्यांना हवे तेच आक्रमक भाषेत मांडतात. त्यांचे वावरणे एका घायाळ, अस्वस्थ सिंहाचे भयसूचक वावरणे असते. पुढच्या क्षणी ते कोणती भूमिका घेतील, कसे वागतील, कोणती कृती करतील हे त्यांच्या दीर्घकाळच्या सहकाऱ्यांनाही कळत नाही. हा माणूस कमालीची धावपळ करतो. अंथरुणावर पडला तर चाळीस मिनिटे झोपतो. दिवस मावळला की यांना उजाडते. जिथे पाऊलवाटाही नाहीत अशा डोंगरात सलग वीस-वीस किलो ीटर चालतो. पाणी दिसेल तिथे आंघोळ करतो, दिवसातून चार-पाच वेळाही. सूर्योदयाला भाजी, भाकरी, कांदा, दही, दूध, ताक असे साधे जेवण करतात. मुंबई, पुणे, दिल्लीलाही जाताना घरची भाजी-भाकरी बांधून नेतात. तीच आवडीने खातात. घटाघटा कासांडीभर पाणी पितात. माणसे तोडायला, दुखवायला अण्णांकडून शिकावे. तरीही नागनाथअण्णा भारतातले आजचे लोकप्रिय स्वातंत्र्यसेनानी आहेत. दिवसभरात त्यांना सरासरी शंभरावर लोक भेटतात. अण्णांची भेट होईल की नाही, सांगता येत नाही. पण त्यांचा पाहुणचार मात्र घ्यावाच लागतो. मोठा ग्लास भरलेले दूध माणसाचे स्वागत करते. पोटभर साधे सकस घरगुती जेवण घेतल्याशिवाय अण्णांची भेटच होणार नाही. भेटणारा माणूस बोलण्याआधी तो कोणत्या कामासाठी आला असावा ते अण्णा बहुतेक वेळा ओळखतात. काम होणार असेल तर क्षणात उत्तर ‘‘हो!’’ होणार नसेल तर पटकन नकार. कोणत्याही कारणासाठी अण्णांनी कोणालाही बोलावले असले तरीही त्याच्या घरातून निघाल्यापासून परत घरी जाईपर्यंतचा प्रवास, भोजन, प्रासंगिक सर्व खर्च अण्णाच करणार. प्रवासात तो माणूस आजारी पडला तर लाखभर रुपये लागोत, अण्णाच खर्च करणार. मानधन मात्र कोणालाच मिळणार नाही.

नागनाथअण्णांना व्यक्तिगत शत्रू नाहीतच. त्यांचे राजकीय स्पर्धक, विरोधक ऐन निवडणुकीतही खाजगीत असो, जाहीरपणे असो अण्णांबद्दल आदरानेच बोलतात. ‘‘कोणाच्याही वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही. कोणाच्या सुतळीच्या तोड्याची अपेक्षा ठेवायची नाही!’’ हे अण्णांना त्यांचे कष्टकरी शेतकरी असणारे वडील रामचंद्र नायकवडी बापू यांनी बालपणीच शिकवले. ‘‘कोणालाही डरायचे नाही. मरायला तयार असणाऱ्याला मारणारा भेटत नसतो!’’ हा निर्भयतेचा मूलमंत्र अण्णांना आई लक्ष्मीबाई नायकवडी यांनी दिला. ‘‘नागनाथ, प्रसंगी जात सोड, पण कष्टकऱ्यांची धरलेली पात कधीच सोडू नकोस!’’ असे क्रांतिगुरू क्रांतिसिंह नाना पाटलांनी हृदयावर कोरले. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी दिवसाढवळ्या तुरुंग फोडून आलेल्या नागनाथअण्णांना जोखीम सोसून आपल्या, रयतेच्या बलदंड बाहूत घेतलं. गुप्तपणे परत वाळव्याच्या क्रांतिभूीत सुखरूपपणे आणून सोडलं. साने गुरुजींना मधु लिमयेंसारखाच नागनाथअण्णा आपला धडपडणारा मुलगा वाटायचा. एस.एम. अण्णाांना राष्ट्र सेवा दलाचा हा समाजवादी शीलाचा सैनिक वाटायचा. आचार्य जावडेकर अण्णांच्या ‘गावराज्य’ साप्ताहिकाचे मार्गदर्शक होते. जे.पी. नाईक अण्णांना आपला मानसपुत्र मानायचे. भारताचे पंतप्रधान व्ही.पी. सिंग आजारी पडले की अण्णांना भेटण्याची इच्छा व्यक्त करायचे. इंदिरा गांधी अण्णांच्या आईची पत्र लिहून आस्थेने विचारपूस करायच्या. मान्यवर काशीराम महाराष्ट्रात दहा वर्षे अण्णांसोबत फिरायचे. न्यायमूर्ती पी.बी. सावंत, कोळसेपाटील, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे, निळूभाऊ फुले, डॉ. आ.ह. साळुंखे, ए.बी. बर्धन, किर्लोस्करचे जनरल मॅनेजर पी.डी. गुणे किती नावे सांगावीत. हे सारे नागनाथअण्णांचे सुहृद आहेत. 1944 साल. एप्रिल महिना. धुळे खजिना लुटलेले नागनाथअण्णा रात्री एक वाजता सहकाऱ्यांसह ग.दि. माडगूळकरांच्या रंकाळ्याजवळच्या घरी धडकले. त्या चौघांनाही दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश. जिवंत किंवा मृत पकडून देणाऱ्यास हजारोंची बक्षिसे.

गदिमांच्या सौभाग्यवतींनी दोन हंडे पाणी तापवून प्रथम त्यांना आंघोळ घातली. गदिमांनी एक न्हावी उठवून आणला. त्याने चौघांच्या पायात मोडलेले काटे काढले. गदिमा भर रात्री पळापळ करून जेवणाच्या सामानाची जुळवाजुळव करताहेत. पुरणपोळीचा बेत. तळमजल्यावर राहणाऱ्या दीनानाथ मंगेशकरांची मोठी मुलगी पोळ्या लाटायला मदत करत असलेली. गदिमा म्हणाले, ‘‘अगं लता, पोळ्या कसल्या लाटतेस? हे पाहुणे फार मोठे आहेत. त्यांच्यासाठी गाणं म्हण!’’ पाहुणे थकलेले, घोरायला लागलेले. गदिमांनी त्यांना जागे केले. लताने सुंदर, भावभरे, हृदयस्पर्शी गीत म्हटले. तृप्त पाहुणे म्हणाले, ‘‘निघतो, कोंबडा आरवायच्या आत बाहेर पडायला हवे. जोतिबाचा डोंगर गाठायचाय!’’ ही आठवण सांगताना आजही अण्णा पाझरतात, निरागसपणे. नागनाथअण्णांनी हुतात्मा स्मारक समिती संघटित केली. किसान शिक्षण संस्था उभारली. विद्यालये, वसतिगृहे, महाविद्यालये उभारली. किसान लिफ्टस्‌ उभारल्या, रस्ते, बंधारा उभारला. लाखाच्या जवळपास झाडे लावली. हु. किसन अहिर सहकारी साखर कारखाना उभारला. कारखान्यात असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उच्चांक तयार केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार केले. 1940 साली डोंगरात चाळीस प्राथमिक शाळा सुरू केल्या. नागनाथअण्णांनी काय काय केले? कसे केले? यापेक्षा ज्या भावनेने, ज्या विचाराने, ज्या शास्त्रशुद्ध वैज्ञानिक, तर्कशुद्ध कार्यपद्धतीने, दीर्घकाळच्या परिश्रमाने, निष्ठेने केले ती पद्धत अतिशय महत्त्वाची आहे. ही विचार आणि कार्यपद्धती शोधण्यात, विकसित करण्यात आणि व्यवहारात सिद्ध करण्यात खरे मोठेपण सामावले आहे. नागनाथअण्णांचे एकमेवाद्वितीयपण या विचार निर्धारात आहे. याच विचाराला पुढे लोकांनी, ‘हुतात्मा पॅटर्न’ असे नाव दिले. हुतात्मा कारखान्याच्या अपूर्व यशानंतर हा शब्द पुढे आला. 1940 साली कामेरी ता. वाळवा येथे पहिली विद्यार्थी परिषद संघटित करणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याच्या मनात या विचाराचे बीज प्रथम पडले. सत्तर वर्षांच्या अथक साधनेचे फळ आज आपण पाहत आहोत. या साधनेतच एक प्रखर क्रांतिकारी देशभक्त घडला. उत्पादक संस्थांचा उद्‌गाता सापडला. स्वतंत्र भारताचा पद्मभूषण उमलला. नवमहाराष्ट्राचा एक शिल्पकार साकारला. समतेचा, शोषणमुक्तीचा, परिवर्तनाचा सैनिक क्रियाशील बनला. तत्त्वज्ञ शिस्तबद्धपणे सखोल तत्त्वज्ञानाची मांडणी करतात. काही माणसांच्या कृतीतून तत्त्वज्ञान व्यवहारात उभे राहते. क्रांतिवीर नागनाथअण्णा असे कृतीतून तत्त्वज्ञान उभे करणाऱ्या दुर्मिळ माणसांपैकी एक आहेत, असे मला वाटते. जसजसा काळ जाईल तसतसा अण्णांच्या तात्त्विक कृतींचा आशयप्रकाश तेजाळ बनल्याशिवाय राहणार नाही. 
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके